आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबे घेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेल पाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहे ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास न होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगत होती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली.
आजोबा गेले त्यावेळी मी तशी लहानच होते. त्यांच्या अनंत आठवणी आहेतच. मला ’ठकी’ म्हणणारे कोणी राहिलेच नाही. आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारी दोन माणसे, त्यातील एक निखळले ही जाणीव झाली. पण त्यावेळी आजी होती. आजीशी जास्त जवळीक म्हणूनही असेल कदाचित. आता आजीही गेली. आजीच्या आठवणी दाटून आल्या. आम्ही खूप लांब आहोत ह्याची जाणीव सतत त्रास देतेच. माणूस जवळ असला म्हणजे नेहमीच उपयोग होतो असे नसले तरी किमान तो जवळ असतो. आम्हाला तेही शक्य नाही. आजीचे कोणालाही काही करावे लागले नाही व तिचे कुठलेच हाल झाले नाहीत. आपले माणूस गेले की दु:ख सगळ्यांनाच होते, कोणी ते दाखवते कोणी मनात ठेवते.
वाटले आजी देवाकडे गेल्यावर सैरभैर झाली असेल. तोच तिला आजोबा भेटले असतील. त्यांनी, " काय बबे, कशी आहेस गं? " असे विचारत जवळ घेतले असेल. मनाला थोडा आधार वाटला. आजी वर एकटी नाही, तिचे सगळ्यात प्रिय माणूस आहे आता तिच्याजवळ. माणसाचे मन कसे वेडे असते, दु:खातही सुख शोधते. माझा मुलगा लहान असताना नेहमी विचारीत असे, " माणसे का मरतात? मरण टाळणे शक्य आहे का? " तेव्हा मी त्याला सांगे," अरे कोणी देवाघरी गेलेच नाही तर या पृथ्वीवर उभे राहायलाही जागा उरणार नाही." हे सत्य आपल्या माणसाच्या मृत्यूने पचवावे लागले की असह्य असते. आणि मनात येते, का? का?
आठवणींची एकच गर्दी झाली. मला ताप भरला आहे आणि मी तिची आठवण काढते आहे हे कळताच ती लागलीच येत असे. तांदुळाचे लाडू तेही फक्त तिच्या हातचेच मला अतिशय आवडतात म्हणून कोणीही मुंबईस जायला निघाले की पेढेघाटी डबा भरून ती धाडून देई. आम्ही तिच्याकडे गेलो किंवा ती आमच्याकडे आली की दररोज रात्रीची गोष्ट कधी चुकली नाही. ती जवळ घेऊन पापे घेई त्यावेळी तिच्या तोंडाला गोडसर वास येत असे. आजही मला तो जसाच्या तसा येतो. रावळगावला सुटीसाठी आम्ही जात असू, ते दोन महिने कधीच संपू नये असे वाटे. आम्हाला आवडते म्हणून कधी गव्हाचा चीक, तर कधी लसणाची चटणी आणि गरम भाकरी त्यावर मोठा लोण्याचा गोळा. कधी पॉटमधले आइसक्रीम, बादली भरून ऊसाचा रस. कोठीत पडलेली आंब्याची रास. दुपार-रात्र जेवणाची चंगळ.
सकाळी तुळशीला पाणी घालून फेऱ्या घालणारी आजी. संध्याकाळी देवाला दिवा लावून नमस्कार करणारी आजी. आजोबांची घरी येण्याची वेळ झाली की, कधी बैंगणी तर कधी अंजिरी, कधी लाल चौकडा तर कधी गर्द हिरवी नऊवारी साडी नेसून. केसांचा छानसा अंबाडा त्यावर बारीक जाळी, छोटेसे ड्बल मोगऱ्याचे दोन पाने असलेले फूल त्यावर खोवून. पावडर, कुंकू लावून, दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन,उजवा पाय दुमडून ती पार्टिशनच्या मागे उभी राही. हे कधीही चुकल्याचे मला आठवत नाही. चहा झाला की व्हरांड्यात किंवा बागेत बसून गप्पा मारीत असे. कर्तबगार पुरषाची खरी अर्धांगींनी. आजी काहिशी तापटही होतीच. खूप काळ ती काही बोलत नसे पण डोके फिरलेकी मग वाटेल तसे बोले. सगळे जरा दबकूनच असत.
आजोबा गेले आणि आजीची रया गेली. तिची सोनसळी कांती करपल्या सारखी झाली. चारही मुले जवळ होती. पण सगळी आपापल्या व्यापात आणि कुटुंबात गुरफटलेली. सगळे आपलेच असले तरी फक्त आपलेच असणारे माणूस नाही याची तिला मनोमन जाणीव असावी. तिने स्वत:ला सांभाळले. चौऱ्यांशी वर्षांची झाली तरी खुटखुटीत राहिली. स्वतः:चे मन कशात न कशात रमवत राहिली. सगळ्या मुलांकडे जाऊन ती राही, तिथून निघताना तिथला स्विच ऑफ करी आणि दुसऱ्याकडे जाई. हे कसे तिला साधले होते कोण जाणे. तिच्याही नकळत ती निर्मोही झाली असावी.
मागे जाऊन एकएक प्रसंग आठवले की कळते, संवाद होणे किती आवश्यक आहे. आमच्याकडे ती जेव्हां येई तेव्हा जसे आमचे उद्योग बदलत होते तसे तिचे प्रश्नही बदलते होते. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्र-मैत्रिणीबद्दल ती विचारी, कधी जाते कधी येते ह्या वेळा हिला पाठ. मला वाटे कशाला हिला कळायला हवे हे. माझ्या मूड नुसार मी तिला ह्याची उत्तरे देई. पण स्वत:हून काही सांगत नसे. मी माझ्याच नादात दंग असे. आता वाटते, माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या आवडीचे कारण ती शोधीत असे. जेणेकरून मी तिच्याशी जास्त वेळ गप्पा करेन. मी ऑफिसला जाऊ लागले तशी, माझी कॉन्ट्रॅक्ट बस आज पाच मिनिटे उशीरा आली. किंवा अग, कावळा सारखा कावकाव करीत होता. मी म्हणे, " अग आजी, कावळा कावकाव नाही तर काय चिवचीव करेल." नातीशी बोलण्याची हि सारी निमित्ते होती. आमच्याकडे ती आनंदी असे पण तो आनंद अजून जास्ती वाढवणे माझ्या हातात असूनही त्यासाठी लागणारी क्रिया घडली नाही ह्याचे फार दु:ख होते. हेतुपुरत्सर दुसऱ्याला आनंद द्यायला हवा हे कळत नव्हते.
ह्यातून आणिक एक सत्य समोर आले. नवरा-बायको किंवा आजच्या बदलत्या सहजीवनाच्या संकल्पनेनुसार आपला सहचर सदैव बरोबर हवा. ती एकच व्यक्ती अशी आहे की ज्याला नेहमीच आपल्यात स्वारस्य असते. आपण हवेसे असतो. आयुष्यभर आपली डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारे आपले माणूस. दिवसाकाठी अनेक निर्र्थक गोष्टी आपण बडबडत असतो. त्या गोष्टीही तितक्याच उत्सुकतेने ऐकणारे, त्यावर चर्चा करणारे, कधीमधी ओरडणारे. संपूर्ण जगाचा राग ज्याच्यावर काढता येतो, तो तल्लीन होऊन पाहत असलेले दूरदर्शनचे चॅनल खटकन बदलून टाकले तरी तेही तितक्याच तन्मयतेने पाहणारे, रात्री उठून पाणी देणारे...... यादी भलीमोठी होईल, ती प्रेमाने पूर्ण करणारे एकमेव माणूस.
आजीची खोली तिच्याशिवाय ओकीबोकी झाली. माणसाचे असणे आणि नसणे यात किती काय सामावलेले आहे. आपण सगळेच जाणता-अजाणता एकमेकांना दुखावत असतो. फक्त स्वत:चाच विचार करतो, आणि त्यासाठी कडवटपणे वागतो. माणूस गेला की जाणवते थोडे गोड बोलणे, आवर्जून विचारपूस करणे, प्रेम दर्शविणे हे सहजभाव किती महत्त्वाचे व मनाची खात्री करून देणारे आहेत, " आपलेही कोणीतरी आहे. आपणही आपल्या माणसांना हवेसे आहोत." ही भावना संजीवनी बुटीचे काम करते. आणि ही संजीवनी आपल्या सगळ्यांच्या अंत:करणात ठासून भरलेली आहे, देर आहे ती वाटण्याची.
आजी गेली, शेवटचा तंतूही तुटला. आता सगळ्यांना एकत्र बांधणारे कोणीच नाही. ह्या एवढ्या मोठ्या जगात आपली माणसे फारच थोडी आहेत, काही रक्ताची आणि काही आपण मैत्ररूपाने जोडलेली. माझ्यापरीने मी माझी माणसे जीवापाड जपतेच आहे, तुम्हीही जपत असालच. अपेक्षा विरहित प्रेम, आतून उमटलेले हसू आणि दोन गोड बोल. बस आणिक कशाचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष (जालावरील संवाद) नक्कीच जमेल. तुमचीही कोणीतरी वाट पाहत आहे.....ह्याची अनुभूती करून देणारा आनंददायी संवाद!!!
प्रतिक्रिया
3 Dec 2009 - 9:28 pm | मदनबाण
.... :(
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
3 Dec 2009 - 9:46 pm | बिपिन कार्यकर्ते
लिहिलंय सुंदर... पण तुमच्या आठवणी आम्हालाही चटका लावून गेल्या.
बिपिन कार्यकर्ते
4 Dec 2009 - 1:54 am | स्वप्निल..
असेच म्हणतो!!
3 Dec 2009 - 9:58 pm | प्रभो
सुंदर लिखाण....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
3 Dec 2009 - 10:06 pm | मेघवेडा
हृदयस्पर्शी लिखाण! अप्रतिम लिहिलंय! मांडणीही फार सुंदर!
--
मेघवेडा.
4 Dec 2009 - 1:21 am | चित्रा
तुमच्या या लेखामुळे आमच्याही आजी-आजोबांची आठवण येऊन गलबलल्यासारखे झाले.
3 Dec 2009 - 11:09 pm | अनामिक
खूप सुंदर लिहिलं आहे...
-अनामिक
3 Dec 2009 - 11:36 pm | विसोबा खेचर
डोळे पाणावले..!
4 Dec 2009 - 12:31 am | टारझन
स्पिचलेस !!
4 Dec 2009 - 1:03 am | स्वाती२
सुरेख लेखन.
>>" आपलेही कोणीतरी आहे. आपणही आपल्या माणसांना हवेसे आहोत." ही भावना संजीवनी बुटीचे काम करते.>>
अगदी अगदी.
4 Dec 2009 - 1:22 am | रामपुरी
"आता सगळ्यांना एकत्र बांधणारे कोणीच नाही."
अगदी खरं आहे...
यही दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है?
4 Dec 2009 - 1:51 am | विकास
लेखन फार आवडले...
मला देखील आजी-आजोबांची तसेच अशाच आठवणीत राहीलेल्या अशाच जीवलगांची आठवण झाली...
अपेक्षा विरहित प्रेम, आतून उमटलेले हसू आणि दोन गोड बोल. बस आणिक कशाचीही आवश्यकता नाही.
हे जितक्या लवकर समजते आणि आत्मसात करता येते तितके जीवन आनंदी होते असे वाटते...
4 Dec 2009 - 7:24 am | हर्षद आनंदी
वाचता वाचता डोळे भरुन आले..
आजी-आजोबा, हे नाते, ही माणसे खरोखर वेड लावतात. त्यांच्या अंतःकरणात मायेचा, प्रेमाचा न आटणारा झरा सदोदीत वहात असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दाला, रागावण्याला प्रेमाची सोनेरी किनार असते.
त्यांना अपेक्षा असते ती, फक्त प्रेमाच्या चार शब्दांची, नेमकी तीच तरुणाई आपल्या धुंदीत विसरते.. तरुणाईला जीवनाची सोनेरी स्वप्ने बोलवत असतात, क्षणिक मोहापायी आपण काय गमावले याची जाण वार्धक्यात येते आणि माणसे हळवी होतात.
माणसाचे असणे आणि नसणे यात किती काय सामावलेले आहे. माणुस असताना त्याची किंमत कळली तर निम्मे जग सुखी होईल..
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
4 Dec 2009 - 8:04 am | क्रान्ति
मर्मबंधातली ठेव म्हणावं असा सुरेख लेख लिहिलास.!
क्रान्ति
अग्निसखा
4 Dec 2009 - 11:27 am | विजुभाऊ
अगदी साध्या सोप्या शब्दात छान लिहिता हो तुम्ही.
4 Dec 2009 - 2:08 pm | जे.पी.मॉर्गन
साधं सोपं आणि भावस्पर्शी... खरंच आजी-आजोबांची आठवण आली.
4 Dec 2009 - 11:36 am | sneharani
सूंदर लिखाण!
4 Dec 2009 - 11:39 am | भाग्यश्री कुलकर्णी
खरच खुप चांगलं लिहीलंस.
4 Dec 2009 - 11:46 am | नेहमी आनंदी
असच म्हणते..
4 Dec 2009 - 2:31 pm | प्रकाश घाटपांडे
प्रत्येक वाक्य भावस्पर्शी. खरच स्मृतींचा मान आणि वास्तवाच भान याचा अनोखा संगम. लिहित राहा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Dec 2009 - 5:15 pm | स॑दीप
सुंदर लिखाण....
मला मझ्या अज्जीची आठवण झाली!
गारुडी,
काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...
4 Dec 2009 - 5:15 pm | स॑दीप
सुंदर लिखाण....
मला मझ्या अज्जीची आठवण झाली!
गारुडी,
काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...
4 Dec 2009 - 5:40 pm | श्रावण मोडक
बऱ्याच गोष्टींची स्मरणयात्रा घडली. माझीच.
5 Dec 2009 - 9:22 am | विनायक प्रभू
आवडला
7 Dec 2009 - 6:40 pm | भानस
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. :)
15 Jul 2014 - 7:14 pm | रेवती
हे लेखन नजरेतून सुटले होते.
खूप आवडले. आजी आजोबांची आठवण आली.
15 Jul 2014 - 10:36 pm | भानस
धन्यवाद, रेवती! :)
15 Jul 2014 - 7:22 pm | बॅटमॅन
असे लेख तत्काळ उडवल्या जावेत. लय त्रास होतो डोक्याला वाचून. :(
15 Jul 2014 - 10:36 pm | भानस
भापो! :) धन्यवाद बॅटमॅन!
15 Jul 2014 - 7:29 pm | सुबोध खरे
आपल्या आईवडिलांबरोबर प्रेमाने वागा
त्यांची किंमत तुम्हाला त्यांची खुर्ची रिकामी बघीतल्यावर जाणवेल
15 Jul 2014 - 10:41 pm | भानस
आभार्स, सुबोध खरे! :) अगदी अगदी! गृहित धरणे आपण ज्यादिवशी बंद करु तेव्हांच जाणीवपूर्वक काही करू.:)
15 Jul 2014 - 7:39 pm | यशोधरा
कुठे होते हे लिखाण? किती साधे, सहज आणि मनाला स्पर्शून जाणारे.
15 Jul 2014 - 10:42 pm | भानस
यशोधरा, मनःपूर्वक धन्यवाद!:)
15 Jul 2014 - 7:52 pm | बहुगुणी
भानस यांची दोन चांगली मुक्तकं या आठवड्यात उत्खननात वरती आली आहेत, त्यांचं इतरही खूपसं लिखाण हृद्यस्पर्शी असायचं, त्या हल्ली लिहित नाहीत का? कुणाच्या परिचयाच्या / संपर्कात असतील तर त्यांनी भानस यांना लिहितं करता येईल का हे पहावं असं आवाहन करतो.
15 Jul 2014 - 8:00 pm | आतिवास
हो. तेच मनात आलं माझ्या.
कळवते त्यांना.
15 Jul 2014 - 10:52 pm | भानस
सविता, खूप धन्यवाद गं! तुझा निरोप आल्याने कळले तरी मला. :)
15 Jul 2014 - 8:14 pm | सखी
मीही इमेल केलीय त्यांना. काल त्यांचे बरेच चांगले लेख वाचुन काढले.
उष्टावण, मोरपिसे, पहिली कमाई तर खासच. इथे त्यांचे लेखन आहे.
15 Jul 2014 - 8:18 pm | बहुगुणी
धन्यवाद, आतिवास ताई आणि सखी ताई!
15 Jul 2014 - 10:54 pm | भानस
सखी, अगं खूप आनंद वाटला तुला माझे लेख आवडल्याचे वाचून. धन्सं! धन्सं!:)
इमेल केली आहेस का? पाहते हं.. लिहिते तुला.. :)
15 Jul 2014 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
आजी आठवली !
15 Jul 2014 - 10:56 pm | भानस
आभार्स, इस्पीकचा एक्का! :)
15 Jul 2014 - 10:47 pm | भानस
बहुगुणी, आपण आवर्जून माझा लिहिण्याचा थोडासा प्रयत्न वाचलात आणि आवडल्याचे कळवलेत. खरेच खूप आनंद वाटला. धन्सं! हल्ली बरेच दिवसात नव्याने काही लिहिले नाही गेलेय. खूपश्या गोष्टी अवतीभोवती सुरुच राहतात, नवनवीन छंदही जडतात आणि ते वेळ आणि डोके व्यापून टाकतात. :):ड असो. मनावर घ्यायला हवे हेच खरे!आपल्या भावना पोचल्या! पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद! :)
15 Jul 2014 - 8:38 pm | सूड
आजीला चारपाच महिने साधा फोनही केलेला नाहीये, आता करायलाच हवा.
15 Jul 2014 - 10:48 pm | भानस
धन्सं! :) :)
16 Jul 2014 - 12:44 pm | बॅटमॅन
'वन्सं' आठवल्या एकदम ;)
15 Jul 2014 - 11:07 pm | मुक्त विहारि
आवडला..
16 Jul 2014 - 2:03 am | प्यारे१
धन्यवाद मुक्तविहारि
-कानस ;)
(ह. घ्या.)
सगळ्यांचे एकदमच आभार मानले तर???
बाकी खरंच भानसतै आपले लेख आवडले.