मध्यंतरी विनायक प्रभूंच्या एका समुपदेशनाच्या लेखात प्रतिक्रिया देताना मी खलिल जिब्रानच्या एका इंग्लिश मुक्तकाचा उल्लेख केला होता. विप्रंनी त्याचा अनुवाद करुन देता का म्हणून विचारणा केली होती. बरेच दिवस त्याला हात घालीन म्हणत होतो आज थोडी सवड मिळाली आणि मी त्याच्या माझ्या परीने भावानुवाद केलाय तो मिपाकरांसाठी सादर आहे.
जिब्रानने व्यक्त केलेले विचार मला पटलेत आणि माझ्या मुलाशी वागताना ते मला पदोपदी जागेवर आणायचे काम चोख करत असतात! तुम्हाला काय अनुभव येतो ते तपासून पहा.
On Children
Kahlil Gibran
Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
You are the bows from which your children
as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite,
and He bends you with His might
that His arrows may go swift and far.
Let our bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies,
so He loves also the bow that is stable.
---------------------------------------------
भावानुवाद
तुमची लेकरं ही "तुमची" नसतात.
जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती
ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,
आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.
कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,
कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.
त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,
कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.
त्यांच्या "उद्या"ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!
तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित
पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.
आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.
तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं
जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.
"तो" जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा
आणि सर्वशक्तीने "तो" आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत
कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.
तेव्हा आपलं ते धनुर्धार्याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,
कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!
चतुरंग
प्रतिक्रिया
14 Oct 2008 - 9:37 pm | लिखाळ
>कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही! <
सुंदर भावानुवाद.
जीब्रानची रचनासुद्धआ सुंदर आहे.
--लिखाळ.
14 Oct 2008 - 9:52 pm | मुक्तसुनीत
१. भाषांतराबद्दल : भाषांतर वाचताना चतुरंग यांची हातखंडा शैली या प्रसंगी कुठेतरी कमी पडली असे वाटले. कदाचित खलिल जिब्रानचे काव्य मूळ कुठल्यातरी आंग्लेतर भाषेत असणार. त्यातून ते इंग्रजीमधे आले ; आणि आता मराठीत. अनेक शतके आणि संस्कृती यांना ओलांडताना त्याचा आशय पोचला ; पण त्यातला चपखलपणा आला नाहीसे मला व्यक्तिशः वाटले. अर्थातच , चतुरंग यांचे श्रेय उणावत नाही. त्याना एका संवेदनाशील विषयावरची एक उत्तम कविता आपल्याला आणून द्यायची होती. ती त्यांनी दिली.
२. मूळ कवितेतील आशयाशी सहमत होण्यासारखे बरेच आहे. आईबाप हे मुलांचे मालक नव्हेत ; आपापल्या महत्त्वाकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत , आपल्या अपूर्ण इच्छांच्या भूतांनी त्यांना झपाटून सोडू नये, त्याना आपल्या मता-विचारांप्रमाणे वाढू द्यावे ही , आता जवळजवळ सर्वमान्य होत चाललेली एक लिबरल विचारसरणी या कवितेतून प्रसृत केली गेली आहे.
धनुष्य आणि बाणाची प्रतिमा लक्षणीय आहे. मात्र धनुष्य ताणवून घेणारे "डीव्हाईन इंटरव्हेन्शन" मला व्यक्तिशः मान्य नाही. मुले होण्याची प्रक्रिया जीवशास्त्रीय आहे ; मुले वाढवण्याच्या प्रक्रियेमधे कॉमन सेन्स, एक व्यक्ति आणि पालनकर्ता म्हणून असणारी प्रगल्भता , एक प्रकारचा लिबरॅलिझम आहे. पण "तो" नाही. "त्या"चा संबंध नाही असे माझे वैयक्तिक मत मी नमूद करतो.
14 Oct 2008 - 11:16 pm | धनंजय
१. हे पुस्तक मात्र मुळातच इंग्रजीत लिहिलेले आहे. दुसर्या कुठल्या भाषेतून भाषांतरित नाही. यातले शब्द बहुशः अँग्लो-सॅक्सन आहेत, त्यांच्यात एक जोरकस साधेपणा आहे. इंग्रजी शैली-प्रकारांत अधिक अँग्लो-सॅक्सन किंवा अधिक लॅटिनेट असे प्रवाह आहेत. मराठीत मराठमोळी आणि संस्कृतप्रचुर अशा समांतर शैली सांगता येतील. भाषांतरात शैली हुकली असे मला जाणवते.
२. विचार पटण्यासारखे आहेत. भावानुवादातही ते चांगले अवतरलेले आहेत.
15 Oct 2008 - 12:06 am | भडकमकर मास्तर
कविता छान... ते शेवटचं कडवं जरासं समजलं नाही...
सगळंच देवाच्या कृपेनं चालत असेल तर संगोपनही त्याच्या कृपेशिवाय कसं चालेल?
मुले वाढवण्याच्या प्रक्रियेमधे कॉमन सेन्स, एक व्यक्ति आणि पालनकर्ता म्हणून असणारी प्रगल्भता , एक प्रकारचा लिबरॅलिझम आहे. पण "तो" नाही. "त्या"चा संबंध नाही असे माझे वैयक्तिक मत मी नमूद करतो.
अवांतर : मी संगोपनाच्या शाळेत नुकतीच ऍडमिशन घेतली आहे आणि शीनियर मुलांच्या चर्चा डोळे मोठे करून ऐकत आहे... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Oct 2008 - 8:04 am | चतुरंग
अनुवादाचा फारसा प्रयत्न केला नव्हता आणि तो ही इंग्रजी तर नाहीच, त्यातून माझे इंग्लिश शब्दसामर्थ्य सीमित आहे, त्यामुळे कदाचित मूळ कृतीतले भाव समजून घेण्यात मी कमी पडलो असेन.
त्याचा परिणाम चपखलपणावर होणार. सुयोग्य टीकेबद्दल धन्यवाद!
मुक्तसुनीत म्हणतात,
मूळ कवितेतील आशयाशी सहमत होण्यासारखे बरेच आहे. आईबाप हे मुलांचे मालक नव्हेत ; आपापल्या महत्त्वाकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत , आपल्या अपूर्ण इच्छांच्या भूतांनी त्यांना झपाटून सोडू नये, त्याना आपल्या मता-विचारांप्रमाणे वाढू द्यावे ही , आता जवळजवळ सर्वमान्य होत चाललेली एक लिबरल विचारसरणी या कवितेतून प्रसृत केली गेली आहे.
पण मला ते अधोरेखित भागाइतकेच सीमित आहे असे वाटत नाही. आई-बाप हे एकप्रकारे मूल ह्या संपत्तीचे विश्वस्त असतात असा भाव आहे. नाते आहे, लागेबांधे आहेत, प्रेम-माया आहे पण तरिही एकप्रकारची अलिप्तता अपेक्षिलेली आहे, न गुंतणं आणि गुंते न वाढवणं हेही शक्य असेल तर जमावं असं कवीला वाटत असावं.
मात्र धनुष्य ताणवून घेणारे "डीव्हाईन इंटरव्हेन्शन" मला व्यक्तिशः मान्य नाही.
कबूल आहे. मूळ काव्यात जिब्रानने "तो" हे कॅपिटल शब्दात वापरल्याने त्यात हे 'डिव्हाइन इंटरव्हेन्शन' आले आहे ते पोचवणे हे माझे काम होते.
काही लोक ह्याला नियती म्हणतील, कुणी पूर्वसु़कृत म्हणेल.
माझ्या मते मूल जन्माला येण्याची आणि वाढण्याची प्रक्रिया जरी जीवशास्त्रीय असली तरी ते 'प्रॉडक्ट' कसे होणार आहे ह्याबद्दल फारच थोडे आडाखे आपण बांधू शकतो. पालक म्हणून आपण पाळलेली शिस्त, प्रगल्भता, कॉमन सेन्स ह्या गोष्टीने व्यक्तिमत्त्व घडण्याची, विकसित होण्याची प्रक्रिया जरी होत असली तरी ज्याला आपण 'उपजत' असे विशेषण लावतो अशा कित्येक सुप्त गोष्टींचा साठा ते बालक घेऊनच आलेले असते हे आपल्याला मान्य करावे लागते. आनुवंशिकता, वातावरण, संस्कार ह्या सगळ्यांच्या पलीकडे एक असा धागा असतो की जो आपल्याला कवेत घेता येत नाही नाहीतर आपण ठरवू तशाच गोष्टी होत गेल्या असत्या. तसे होत नाही ह्यातच जीवनाची मेख आहे. अनिश्चितता ही पुढे चालत रहाण्याची प्रेरणा आहे. मग त्याला तुम्ही कोणत्याही शब्दसमुच्चयाने संबोधा.
चतुरंग
16 Oct 2008 - 2:18 pm | धम्मकलाडू
अनेक शतके नाही हो. जिब्रान मागच्या शतकातला! (१८८३-१९३१). खय्याम नाही जी ब रा न.
Kahlil Gibran, April 1913
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
14 Oct 2008 - 11:21 pm | कलंत्री
या निमित्त्याने खलिल जिब्रान वर एखादा लेख टाकायला हवा.
15 Oct 2008 - 12:09 am | चन्द्रशेखर गोखले
असो , पण एकंदरित छान. कलंत्री म्हणाल्या ते अगदी योग्य . खलिल जिब्रान यांच्यावर लेख आल्यास हरकत नाही,
खलिल जिब्रान, ताओ ,जे.कृष्ण्मूर्ति ,ओशो हे क्रांतिकारी तत्ववेत्ते होउन गेले.
15 Oct 2008 - 1:32 am | विसोबा खेचर
पण एकंदरित छान. कलंत्री म्हणाल्या ते अगदी योग्य .
कलंत्री हे 'त्या' नसून 'ते' आहेत त्यामुळे वरील वाक्यात 'कलंत्री म्हणाले' असे हवे होते..:)
असो, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व...
आपला,
(द्वारकानाथ कलंत्रींचा मित्र) तात्या जिब्रान.
15 Oct 2008 - 12:18 am | प्राजु
तेव्हा आपलं ते धनुर्धार्याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,
कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!
खरंच आहे हे. मी तर म्हणेन की धनुष्याची प्रत्यंचा जितकी इलॅस्टीक / लवचिक असते.. तितकाच जोरदार आणि खंबिर असा त्यातून निघणारा ट्णकार असतो.
त्यामुळे आपण किती लवचिक व्हायचं हे आपणचं ठरवायचं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Oct 2008 - 3:05 am | संदीप चित्रे
रंग्या .. माझ्या अत्यंत आवडत्या कवितेची भेट दिलीस :)
मला ती मूळ कविता खूपच आवडते !!
माझ्या साडेतीन वर्षांच्या मुलाशी बोलताना 'गप्प बस्..तुला काय कळतंय' संस्कृतीपासून स्वतःला दूर ठेवताना दमछाकही होतेय :)
-----
राग मानू नकोस पण मला वाटतं की तू भावानुवाद अजून थोडा सोपा करू शकशील.. म्हणजे शकशीलच !
15 Oct 2008 - 9:48 am | विजुभाऊ
जीब्रान चे सर्व लिखाण मूळात लेबनीज भाषेत होते. ते त्यानेच पुन्हा इंग्रजीत आणले.
पण मूळ भाषेतली लय इंग्रजीत येताना थोडी लिरीकल होउन आली आहे.
जीब्रान ने हे लिखाण त्याचा प्रेषीत या ह. पैगम्बरांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात ह.पैगम्बारांनी लोकांच्या प्रश्नाना उत्तर दिले आहे अशा स्वरुपात आहेत.
16 Oct 2008 - 4:02 am | धनंजय
खलील जिब्रान हा ख्रिस्ती दृष्टिकोनातून लिहीत असे.
या पुस्तकातील प्रेषित हा पैगंबर मुहम्मद नसावा. पुस्तकातील प्रेषित बरीच वर्षे परदेशात राहिलेला आहे, त्याला घरी नेणारे जहाज आजच बंदरात आले आहे. तो घरी जायला निघतो, तसे नगरवासी त्याला जीवनविषयक प्रश्न विचारतात. हा प्रेषित काल्पनिक असावा. वर्णनावरून कुठला ज्ञात प्रेषित ओळखू येत नाही.
(पैगंबर मुहम्मदाचे तरुणपणी लग्न झाले, आणि तो त्यानंतर आयुष्यभर आपल्या लव्याजम्यासोबत फिरला.)
16 Oct 2008 - 2:20 pm | धम्मकलाडू
जीब्रान ने हे लिखाण त्याचा प्रेषीत या ह. पैगम्बरांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात ह.पैगम्बारांनी लोकांच्या प्रश्नाना उत्तर दिले आहे अशा स्वरुपात आहेत
जिब्रान ख्रिस्ताव होता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
15 Oct 2008 - 9:52 am | यशोधरा
आवडला अनुवाद.
कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!
वा! सुरेख!
15 Oct 2008 - 10:03 am | आनंदयात्री
भावानुवाद छान आहे. अर्थात जिब्रानचे दुसरे काही आंग्ल वैगरे भाषेत न वाचल्याने तुम्ही कुठे कमी पडलाय किंवा ओरिजिनल लै भारी आहे असे काही वाटले नाही. जगनियंत्याच्या हातातले धनुष्य म्हणजे पालक, बाण म्हणजे पाल्य अन जगनियंता ते बाण कोणत्यातरी लक्षासाठी वापरतो ही कल्पना सुंदर आहे. आवडला.
तुमचे भाषांतराचे सगळे प्रयत्न स्तुत्य आहेत, कीप इट अप !!
-----------------------------------------------------------------------
टुकार अवांतरः चामारी पालक जर धनुष्य असतील, धनुष्याचा दंड म्हणजे पुरुष अन प्रत्यंचा म्हणजे स्त्री का ? अन तिचायला मग कुटंबनियोजन करणे म्हणजे साला त्या जगनियंत्याच्या वैगेरे ऑपॉर्च्युनिटीज कमी करणेच झाले की !!!!
15 Oct 2008 - 10:30 am | विसुनाना
कविता तर उत्तम आहेच पण भावानुवादही आवडला.
या निमित्ताने नटसम्राटमधल्या "कोणीच कोणाचं नसतं..." स्वगताची आठवण झाली. त्यात जन्मदाता बाप स्वतःला "आम्ही फक्त जिने असतो जिने" असे म्हणतो. ते स्वगतही जिब्रानच्या मुक्तकाच्या तोडीचं आहे. दोन मुक्तकांची तुलनात्मक चर्चा (धनुष्य की जिना) व्हावी.
15 Oct 2008 - 3:03 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी आपला मनापासुन आभारी आहे.
15 Oct 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर
आयला रंगा! कविता अंमळ भारीच आहे रे! समजायला जरा जडच गेली...!
तात्या.
15 Oct 2008 - 6:23 pm | शितल
चतुरंगजी,
अनुवाद आवडला. :)
शेवटचे कडवे तर मस्त झाले आहे.
ही इंग्रजी कविता मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हा ही ती मला खुप आवडली होती.
15 Oct 2008 - 7:34 pm | छोटा डॉन
आम्ही आत्तापर्यंत मुळ इंग्रजी का जी काय असेल ती कविता वाचलीच नव्हती त्यामुळे कंपॅरिजनचा प्रश्नच नाही ...
उत्तम भावानुवाद, कविता आवडली ...
लहान मुलांना किंवा इनफॅ़क्ट कुणालाही मोहात पाडेल असे भाषासौंदर्य !
असेच अजुन येऊ द्यात ...
अवांतर : भाषा शैली पाहुन आम्हाला "अब्राहम लिंकन" च्या पत्राची आठवण झाली ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
15 Oct 2008 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,
तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!
चतुरंगसेठ,
मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारा भावानुवाद मस्तच ! अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 7:58 pm | रामदास
असेच भावानुवाद येऊ द्या.(इंग्रजीत समजायला जरा कठीणच जातं अजूनही.)
15 Oct 2008 - 11:14 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
16 Oct 2008 - 2:15 am | धनंजय
(भावानुवादाचा हा माझा प्रयत्न - चतुरंग यांचा अनुवाद सुयोग्यच आहे, पण प्रत्येक अनुवादकाची शैली वेगळी, त्याचा प्रत्यय यावा.)
तुमची मुले ही तुमची मुले नव्हेत
जीवन आसुसले आहे स्वतःसाठी, त्याचीच ही मुले
ती तुम्हाला होतात, पण तुमच्याकडून नव्हे
ती तुमच्यापाशी आहेत, पण तुमची मालमत्ता नव्हेत.
तुम्ही त्यांना आपले प्रेम द्यावे, आपले विचार नव्हेत,
कारण त्यांचे आपले स्वतःचे विचार आहेत.
तुम्ही त्यांच्या शरिराला निवारा द्यावा, आत्म्याला नव्हे,
कारण त्यांचे आत्मे राहातात भविष्याच्या घरात,
तिथे तुम्ही भेट देऊ शकणार नाही, स्वप्नातही नाही.
तुम्ही त्यांच्यासारखे व्हायला झटू शकता,
त्यांना आपल्यासारखे करायला बघू नका.
कारण जीवन मागे सरत नाही, की भूतकाळात घुटमळत नाही.
तुम्ही आहात धनुष्ये, तुमची मुले
धनुष्यातून सोडलेले जिवंत बाण.
धनुर्धर अनंताच्या मार्गावरचे लक्ष्य हेरतो
तुम्हाला त्याच्या बळानिशी वाकवतो
त्याचे बाण सुसाट, दूर उडावेत म्हणून.
धनुर्धराच्या हातून आपले वाकणे आनंदाचे व्हावे;
कारण त्याला उडणारा बाण जितका प्रेमाचा
तितकेच प्रेमाचे हे स्थिर धनुष्य असते.
16 Oct 2008 - 2:23 am | चतुरंग
तुझा अनुवाद जास्त सोपा आहे आणि तुला शब्दही चपखल गवसलेत. त्यामानाने माझा थोडा अवघड गद्य वाटतो (नाटकातलं एखादं स्वगत असावं असा).
एकाच मुक्तकाचे दोघांच्या नजरेतून दिसणारे कोन रंजक वाटतात.
ह्या विशेष प्रयत्नाबद्दल धन्यवाद!
चतुरंग
16 Oct 2008 - 2:27 am | मुक्तसुनीत
(मोअर द मेरियर !) :-)
दोघांच्या उत्तम कामगिरीमधे लाभ मधल्यामधे आमचा ;-)
16 Oct 2008 - 9:40 am | पद्मश्री चित्रे
चतुरंग यांनी केलेला अनुवाद आवडला आणि पटला..
>>कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,
कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.
धनंजय यांचा अनुवाद ही छान वाटला..
(माझ्यासारख्या कठीण शब्द ना समजणार्यांसाठी खास लिहिल्यासारखा आहे)
16 Oct 2008 - 9:50 am | अनिल हटेला
मूळ कविता नाय समजली ...
पण रंगा शेठ चा अनुवाद आवडला......
धन्यवाद !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Oct 2008 - 4:31 pm | सहज
चतुरंग, धनंजय दोघांना धन्यवाद.
+ नंदन :-)
16 Oct 2008 - 12:13 pm | नंदन
हा धागा जरा उशीरानेच वाचला :(, पण चतुरंग आणि धनंजय - दोघांचेही अनुवाद आवडले. पहिले कडवे वाचताना काही ओळी सुचल्या, त्या अशा -
ही संतती तुमची, तुमची अपत्ये नाही
जगण्याच्या जणू जिजीविषेची ग्वाही
तुम्ही केवळ माध्यम, स्रोत नव्हे हो त्यांचा
सहवासच प्रेमळ, परी मालकी नाही
द्या प्रेम तयांना, लादू नका विचार
फुलो त्यांची प्रज्ञा आणि स्वयंभ्वाकार
शारीर वास पण आत्मा भविष्यवासी
अस्पर्श तुम्हां तो, तुमच्या कह्यापार
ती स्फूर्ती तुमची, तुमची प्रतिमा नाही
सरे चाक पुढे जगण्याचे मागे नाही
तुम्ही मात्र धनुष्ये, तुमची मुले सप्राण
चापें सुटणारे भविष्यवेधी बाण
तो ताणी प्रत्यंचा, वेधी अनंत अवकाश
सोपवा करी त्या, विना राग वा रोष
जरी त्यास आवडे, अनंतछेदी तीर
तितकेच प्यार त्यां, हे सुस्थिर धनुष
यात अर्थातच काही खडे आहेत. कदाचित काही ठिकाणी यमक जुळवताना अर्थाचीही हानी झाली असावी. शिवाय स्वयंभू+आकार चा एक शब्द करण्याचे स्वातंत्र्यही घेतले आहे :). जाणकारांनी कृपया सुधारणा कराव्यात.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Oct 2008 - 4:15 pm | लिखाळ
जिब्रानची भाषा गूढ असते. वाक्ये काव्यात्मक असली तरी शब्द साधे असतात.
धनंजयाने वापरलेला मुल हा शब्द संताती किंवा बालके यापेक्षा योग्य वाटतो. पण त्यातील द्यावे, घ्यावे अशी आज्ञार्थक वाक्ये मूळ काव्यापेक्षा वेगळी वाटतात. जिब्रानच्या इतरकी काही उतार्यात तो सुचवत असतो आज्ञा देत नसतो असे वाटते.
नंदन आणि धनंजय यांचे अनुवाद छानच आहे. नंदनने तर कविताच केली आहे. फार छान.
इथे अनपेक्षित रित्या उत्तम मेजवानी मिळाली. तिघांचे आभार.
--लिखाळ.
16 Oct 2008 - 7:28 pm | धनंजय
हाच दोन अनुवदांतल्या अर्थातला सर्वात मोठा फरक आहे. तुमच्या चाणाक्ष दृष्टीचे कौतुक करावे तितके थोडेच (पण आज्ञार्थ नव्हे - विध्यर्थ).
इंग्रजीत "may" शब्दाचा अर्थ कधीकधी "करू शकणे" असा होतो खरा. हे साधारणपणे निर्जीव वस्तूंबद्दल किंवा सामान्य (="भावे") क्रियांबद्दल असते. पण असा अर्थ असेल तर जवळजवळ नेहमीच "may be" असा प्रयोग असतो.
निर्जीव :
"मोटारगाडी लाल किंवा निळी असू शकेल."
The car may be blue or it may be red.
(अपवादाने असे म्हणता येते, पण अर्थ अस्पष्ट असतो : )
The car may have had red paint, or blue, I am not sure.
(स्पष्ट अर्थ असावा, तर असे बोलावे, लिहावे : )
It may be that the car had red paint or blue, I am not sure.
The sun may be shining outside.
"बाहेर कदाचित सूर्यप्रकाश पडला असेल."
पण असे म्हटल्यास ऐकणार्याला फार विचित्र वाटेल :
The sun may shine outside.
इंग्रजीत "You may [any verb except be]" चा अर्थ जवळजवळ नेहमीच सन्मानपूर्ण विनंती, असाच असतो.
"You may go now."
याचा अर्थ कधीही "शक्यता" नसून "विनंतीच" आहे. या एका उदाहरणात हा इंग्रजी अर्थ मराठीतही आलेला आहे.
"तुम्ही जाऊ शकता आता!"
हे पूर्ण पुस्तक असे आहे, की भक्त "काय करू" असा सल्ला विचारत आहेत, आणि प्रेषित "असे करावे" असा प्रेमळ सल्ला देत आहे. आज्ञार्थ नव्हे, विध्यर्थ.
"Do this!" नव्हे तर "You may do this."
16 Oct 2008 - 10:27 pm | लिखाळ
>>हाच दोन अनुवदांतल्या अर्थातला सर्वात मोठा फरक आहे. तुमच्या चाणाक्ष दृष्टीचे कौतुक करावे तितके थोडेच (पण आज्ञार्थ नव्हे - विध्यर्थ).<<
आभार :)
समजले..
--लिखाळ.
16 Oct 2008 - 10:31 pm | यशोधरा
नंदन आणि धनंजय यांनी केले अनुवादही आवडले.
19 Oct 2008 - 12:26 am | भडकमकर मास्तर
तीनही कविता आवड्ल्या....
चतुरंग, धनंजय आणि नंदन ही मंडळी म्हणजे मी मिपावर का येतो , या प्रश्नाची महत्त्वाची उत्तरे आहेत....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
19 Oct 2008 - 1:14 am | ऋषिकेश
वा तीनहि भाषांतरे आवडली. एकदम ट्रिपल मेजवानी.
पण मला रंगरावांचे भाषांतर सर्वाधिक भावले.. बाकी दोघांपैकी धनंजय यांची चपखल शब्द बसवताना व नंदनची यमक जुळवताना मधेच दमछाक झाल्यासारखी वाटली.(स्पष्ट मत आणि तुलनेबद्दल/मुळे वाईट वाटल्यास क्षमस्व!) रंगरावांचे चपखल शब्दयोजनेत १९-२० असेल पण सुटसुटीतपणामुळे अर्थ माझ्यापर्यंत जास्त स्पष्ट पोचला. :)
तिघांचे अनेक अनेक आभार! असेच जिब्रानबरोबर इतरही तत्वज्ञांचे काहि भाषांतर केल्यास आवडेल
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Mar 2013 - 2:53 pm | उत्खनक
अभिजात असे काही!
एक आवडलेला लेख. :)
19 Mar 2013 - 5:07 pm | प्यारे१
डोळे उघडवणारी(आंखे खोलनेवाली)कविता!
16 Feb 2017 - 8:58 pm | पिलीयन रायडर
अत्यंत आवडला भावानुवाद!! ओघवता झाला आहे अगदी!
16 Feb 2017 - 10:47 pm | एस
वा. अत्यंत छान अनुवाद सारेच.
(या निमित्ताने 'तुमची बाब्ये नि बाब्या ही तुमची कार्टी नसतात, काय समजलेत?' असा एखादा इरसाल अनुवाद करायची सुरसुरी आली आहे! ;-) )
17 Feb 2017 - 3:48 am | स्रुजा
ख्या ख्या ख्या.. घ्याच मनावर.
चतुरंगदा, अनुवाद आणि मूळ कविता अप्रतिम ! मला यमक आणि चपखल शब्दांपेक्षा प्रोज / गद्य काव्य जास्त आवडतं त्यामुळे तुमचा सर्वाधिक आवडला.
अशीच एक मराठी कविता मध्ये वाचनात आली होती - उरलो सात बाराचा उतारा पुरता अशी काहीशी. त्यात देखील तुम्ही म्हणता ती "पालक म्हणजे एक विश्वस्त" अशी भावना आली आहे.
17 Feb 2017 - 7:03 pm | चतुरंग
वाट बघतोय! ;)