मिपाकरांच्या आशीर्वादाने...

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
30 May 2014 - 7:08 pm

नमस्कार मिपाकरहो...

मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ. मध्येही दिला होता.

स्वतःच्या लेखांची अशी जाहिरात करण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, मी आधी ब्लॉगवर लेखन करायचो, पण मिपावर लेखनाला सुरुवात केल्यापासनं जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याची जी हाव/भूक लागली आहे, ती काही शमता शमणार नाही. दुसरं कारण असं की लेख साप्ताहिकात छापून आल्यापासनं आप्तेष्टांकडून ज्या काही प्रतिक्रिया येताहेत, त्या सगळ्यांचा सूर, मिपाच्या इष्टाईलमध्ये सांगायचं झाल्यास, 'चान चान' असा आहे. तो तसा इथेही 'मुद्दामून' मिळू शकतो म्हणा(माझं लेखन बाळबोध असल्यास), पण इथे दुवा दिल्याने ज्या प्रतिक्रिया येतील त्यांच्यामुळे माझ्या लेखनातल्या त्रुटी, चुका, घोडचुका, लक्षात यायला मला नेहमीप्रमाणे मदत होईल, या आशेने हे दुवा मी देत आहे. तर मिपाकरांना ही नम्र विनंती, की माझ्यासारख्या धोंड्याच्या या लेखनाची वेळात वेळ काढून मिपाकरांनी तासमपट्टी करावी आणि हिरा झालो नाही तरी गुळगुळीत सागरगोटा होण्यास मदत करावी, जेणेकरून कधीतरी माझा जिलब्यांवरून चकल्यांकडे वळायचा प्रवास सुलभ होईल.

पहिला लेख : तरुणाई विरुद्ध दिग्गज

दुसरा लेख : लीव्ह आणि इंगमार

लोकप्रभामध्ये मिपाकरांच्या आशीर्वादाने आणखी लेख छापून आल्यास 'ते कसे वाटले' हे विचारून मी पुनःपुनः मिपाकरांना त्रास देत राहणार आहे, हेवेसांनल

राजकारणचित्रपटलेखसल्लामदत

प्रतिक्रिया

एस's picture

30 May 2014 - 7:34 pm | एस

विशेषतः 'Liv and Ingmar' फारच आवडला. या नात्याचा हळुवारपणा फार ताकदीनं टिपलाय आणि तितकंच उत्कटपणे लिहिलंय. छान!

'डॉक्युमेंटरी'ला मराठीत 'माहितीपट' असा सुंदर प्रतिशब्द आहे. तसेच 'फिल्म' साठी 'चित्रपट'. बाकी सुरेख. अभिनंदन!

भेटल्यावर बोलूच...

चुकून वपाडाव वाचून उत्सुकतेने धागा उघडला हो!! असो, पण चांगली बातमी आहे. शुभेच्छा!! :)

आत्मशून्य's picture

31 May 2014 - 2:23 pm | आत्मशून्य
जेपी's picture

30 May 2014 - 8:44 pm | जेपी

लेखन वाचले.
संक्षी सरांचे मोठ्ठा होण्याच्या शुभेच्छा चांगल्या फळाला आल्या.

आपली एक गोष्ट अपूरी आहे. ती लवकर पूर्ण करा. ...ती तीन प्रेमपत्रांची गोष्ट.

आणि महत्त्वाचं राहिलंच्...अभिनंदन आणि शुभेच्छा..

संजय क्षीरसागर's picture

30 May 2014 - 10:26 pm | संजय क्षीरसागर

अभिनंदन! असाच चौफेर लिहीत राहा.... आणि ललित लेखनाकडे दुर्लक्ष करु नकोस.

यशोधरा's picture

30 May 2014 - 10:27 pm | यशोधरा

अभिनंदन!

बहुगुणी's picture

30 May 2014 - 11:25 pm | बहुगुणी

अभिनंदन! दोन्ही लेख वाचले. कदाचित नुकत्याच झालेल्या निवडणुकांचं विश्लेषण इतर अनेक माध्यमांतून कानावर पडल्यामुळे (किंवा डोळ्यांखालून गेल्यामुळे) असेल, पण मला व्यक्तिशः 'लिव्ह आणि इंग्मार' या माहितीपटाचं विश्लेषण आधिक आवडलं. हा माहितीपट शोधून पहाणारच, काय जबरदस्त प्रेमकथा आहे! आंतर्जालावर शोधल्यावर हा ट्रेलर सापडला:

लोकप्रभातच नव्हे तर इतरही ठिकाणी लिहीत रहा, आणि आम्हाला नक्की कळवत रहा, शुभेच्छा!

श्रीवेद's picture

31 May 2014 - 10:27 am | श्रीवेद

अभिनंदन!

पिवळा डांबिस's picture

31 May 2014 - 11:53 am | पिवळा डांबिस

मिपावर आजवर अनेक सभासद आले.....
त्यातील अनेकांनी नंतर इतरत्र लिखाण केलंय, स्वतःच्या सीडी/ डिव्हीडीही काढल्यात. ज्याची त्याची महत्वाकांक्षा...
वरील मार्गाने गेल्यानंतर त्यांनी नंतर मग मिपाचं नांवही नाही काढलंय वा मिपावर नंतर कधी क्वचित लेखनही केलंय!!!!
अशा कृतघ्न मिपाकरांच्या वाटेनं न जाता तुम्ही इतरत्र केलेल्या लेखनावर मिपाकरांचे अभिप्राय मागितलेत हेच खूप आहे!!
त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद!!! आणि अन्यत्र प्रकाशित झाल्याबद्दल हार्दिक अभिनंद्न!!!
आता तुमच्या लिखाणाविषयी....
तुमचा 'तरुणाई विरूद्ध दिग्गज' हा लेख बालिश वाटला...
राजकीय परिस्थीतीवर टिप्पणी करतांना उगाच काल्पनिक विस्तार करु नये अशा मताचा मी आहे...
तुमचा 'लीव्ह आणि इंगमार' त्यामानाने बरा वाटला!
सूचना: माझ्या म्हातार्‍याच्या अभिप्रायाने खचून किंवा रागावून जाऊ नका. तुम्ही भरपूर लिहा. पण प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचंच लिखाण निदान दहा वेळा तरी वाचून बघा. तुम्हालाच त्यात अनेक सुधारणा कराव्याश्या वाटतील.
तुमच्यात मला एका भावी लेखकाची बीजं दिसताहेत म्हणून मुद्दाम हा अभिप्रायप्रपंच!!
अन्यथा गरज नव्हती....
भविष्यातील लेखनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!!!