चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल
चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत
मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.
नव्या पिढीतल्या या फीचर्सची वर्गवारी करायची तर बेसिक फीचर्स- म्हणजे दिवे, वायपर्स, डोर लॉक्स, रिमोट किल्ली वगैरे इलेक्ट्रोनिक कंट्रोलरने चालणारी. त्यानंतर एक्स्टेंडेड फीचर्स - म्हणजे पॉवर विंडो, ए बी एस, एअरबॅग वगैरे. यात '' Nice to have'' फीचर्स पण असतात- म्हणजे ती असली तर बरेच, पण त्यासाठी जास्त पैसे मोजायची ग्राहकाची तयारी नसते. उदाहरणार्थ वरचीच फीचर्स पण त्यांना थोडं प्रगत करूया - म्हणजे उदा. वायपर्स- पाऊस आला की आपोआप चालू होणं आणि पाऊस वाढला की भराभरा चालणं. किंवा अंधारात गाडी घरी आणून लावली की ३० सेकंद हेडलाईट चालू रहाणं- अन आपण घरात गेलो की मग बंद होणं, किंवा खिडकीची काच बटणाने वरखाली होताना खिडकीत बोट अडकल्यास चिमटा बसू लागताच थांबणे ( anti-pinch) इत्यादी. म्हणजे आहे त्याच कंट्रोलरची क्षमता जरा वाढवली, संवेदक ( senosrs) वाढवले, की बऱ्याच जादूसारख्या वाटणाऱ्या गोष्टी साध्य होतात. मग स्पर्धेमुळे हळूहळू सगळ्याना त्याची सवय होते आणि एक्स्टेंडेड फीचर्स 'बेसिक' समजली जायला वेळ लागत नाही. अगदी दोनचार वर्षात.
आणखी पुढचा प्रकार म्हणजे प्रगत फीचर्स- याना काही अंत नाही. कमीत कमी किमतीत काय जास्तीजास्त देऊ शकता हा प्रश्न कुणीही ग्राहक विचारणारच! यामध्ये मुख्यत्वे सुरक्षितता, आराम, करमणूक, चोरी प्रतिबंधन आणि अश्वशक्ती यासंबन्धित वैशिष्ट्ये येतात. या सेगमेंट मध्ये किंमत हा मुद्दाच रहात नाही.
मध्यंतरी प्रवासात एक निवृत्त गृहस्थ भेटले होते. मी कार उद्योगामध्ये काम करतो हे कळल्यावर उत्साहात येउन गप्पा मारू लागले. म्हणाले, '' आपल्या देशात उपयुक्त अशी फीचर्स गाडीमध्ये असली पाहिजेत.'' मी म्हटलं म्हणजे कशी? तर म्हणाले, ''जसे गाडीला डावीकडे आणि उजवीकडे वळण्यासाठी इंडीकेटर असतात तसे ''यू टर्न'' इंडिकेटरचा दिवा पाहिजे- गाडीच्या मागच्या काचेवर -मध्यभागी. म्हणजे मागच्याला कळेल की हा उजव्या रस्त्यावर जाणार की यू टर्न घेणार?'' त्यांना म्हटलं, ''काका, असा दिवा कुठेच नसतो राव. यु टर्न घेताना पण डावी- उजवीकडे वळायचा दिवाच वापरतात. शिवाय लेनची शिस्त पाळली की झालं. प्रत्येक गोष्टीला दिवे कसे लावणार?'' मग विजयी मुद्रेनं म्हणाले, '' तेच तर! जे जगात करत नाहीत ते आपण भारतीयांनी करायला पाहिजे. भारतातल्या कंडीशन्सप्रमाणे बदलायला पाहिजे.''
त्यांनी त्यासाठी टाटांना पत्र पण लिहिलं. त्याना आधी फक्त पोहोच आली, नंतर अजून एक पत्र आलं की ''धन्यवाद! तुमची सूचना अभियांत्रिकी विभागाला विचारार्थ पाठवली आहे.''आणि हे महाशय अपेक्षा करत होते की कधी ना कधी ही 'सोय' होईलच.अपेक्षा आणि नवकल्पना अमर्याद असतात. भरपूर सूचना येतात, त्यातल्या काही कल्पना खरंच चांगल्या असतात.
खरं तर मागच्या विंडशिल्ड वरील ती जागा ''राखीव'' आहे- चीमझल साठी ( CHMSL) म्हणजे ब्रेक लावला की stop lamp बरोबरच ही एल. ई. डी. वाली पट्टी पण लाल रंगात उठून दिसते. जेव्हा उंच वाहन आपल्या मागे आणि खूप जवळ असते तेव्हा आपण थांबल्यावर त्याला त्याच्या उंचीमुळे कारचे stop lamps दिसत नाहीत. म्हणून हा ''सेन्ट्रली हाय माउंटेड Stop Lamp'' असणे अनिवार्य आहे. सुरक्षिततेविषयीची जी फीचर्स आहेत ती वाहन कायद्यानुसार जगात सर्वत्र अनिवार्य आहेत. त्यात बदल करता येत नाहीत. तसेच त्याचं डिझाईन कुणाला तरी वाटलं म्हणून बदलता येत नाही. शिवाय इलेक्ट्रोनिक कंट्रोलर बंद पडला तर- (अशी शक्यता अत्यंत कमी असते तरीही) म्हणून या दिव्याला कंट्रोलर व्यतिरिक्त बाहेरून वेगळ्या वायरने थेट ब्रेक पेडलला जोडले जाते. त्यामुळे ब्रेक किंवा हात ब्रेक लावला की हा दिवा नक्की लागतो. आणि मागून येणारया वाहनाला थांबण्याची सूचना देतो.
सुरक्षिततेवरून एक आठवलं, काही वेळा आपण पहातो की अतिशय महागड्या आणि सुरक्षित समजल्या जाणारया गाडीचे अपघात होतात आणि त्यात प्रवासी जीव गमावतात. जर एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सीट बेल्ट वापरला 'च' पाहिजे. नाहीतर चांगली गाडी घेऊन काहीच उपयोग नाही. खरं तर सर्व फीचर्स माहित असलीच पाहिजेत. युझर मन्युअल पाहूनही सारे काही न समजल्यास डीलरला विचारून सेटिंग्ज करायला हवीत.
असेच अजून एक म्हणजे कॅमेरा वापरून खूप सोयी देण्यात आल्या आहेत - त्यात पार्किंग साठी मदत, लेन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मधील वाहनाची माहिती अशा सोयी आल्या आहेत. आपल्या गाडीत त्या असतील तर पूर्णपणे माहिती घेऊन वापरणे फायद्याचे ठरते.
युरोपात एक नवे फीचर येऊ घातलेय पुढच्या वर्षी. त्यात आता दोन जास्तीच्या एअरबॅग्ज गाडीला बाहेरून म्हणजे वायपर जवळ असणार आहेत. वळणावर गाडी हळू असताना सुद्धा रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धक्का लागलां तर ही एअरबॅग बाहेर उघडेल. कारण धक्का बसलेली व्यक्ती गाडीवर येऊन डोके बोनेटवर आपटते. म्हणून तिथेही एअरबॅग्ज लावायच्या ! याला ''सुरक्षित धडक'' फीचर पण म्हणतात!
येत्या दशकात नव्याने येणारया धडक रोधक फीचर मुळे समोरचं वाहन जवळ येऊ लागलं की आधी आवाजी संदेश आणि तरी प्रतिक्रिया न झाल्यास गाडी स्वतः ब्रेक पण लावू शकेल. किमान धडकेची तीव्रता नक्कीच कमी करता येईल. शेवटी आपोआपीकरणच ते- करू तेव्हढ थोडंच.
टायर प्रेशर दर्शक पण असेच खूप उपयुक्त. हे फीचर मूळ गाडीत नसेल तर वेगळे बसवून मिळते. त्यात पाचव्या स्पेअर चाका सहित सर्व चाकांचा हवेचा दाब दाखवला जातो. ताशी सत्तर-ऐंशी कि. मी. पेक्षा जास्त वेगात चालवणार्यांना हे अत्यावश्यक आहे. यात प्रत्येक चाकातला सेन्सर गाडीतल्या मुख्य युनिटला सतत प्रेशर कळवत राहतो. प्रत्येक चाकाला आपला आयडी असतो. चालकाला डिस्प्ले वर ते दिसत रहाते. एखादं चाक असुरक्षित असेल तर सूचना देणारा आवाज पण येतो.
आत्ता गेल्या दोन वर्षात आपल्याकडे आलेली नवी फीचर्स जी पूर्वी बेसिक नव्हती, पण आता आहेत ती म्हणजे ऑटो स्टार्ट-स्टोप आणि पेसिव्ह एन्ट्री.यातल्या पहिल्या फीचरसाठी उच्च प्रतीचे बॅटरी सेन्सर लागतात. बॅटरीत पुरेसा चार्ज शिल्लक असेल तर सिग्नलला किंवा कुठेही थांबलो तर आपोआप इंजिन थांबते. निघताना पेडल दाबले की पुन्हा सुरु! पेसिव्ह एन्ट्री मध्ये आपल्याला किल्लीने गाडी उघडावी लागत नाही, किल्ली फक्त खिशात असेल तरी त्या बाजूचं दार अनलॉक होतं. अलीकडे याबरोबर सीट मेमरीपण जोडतात, म्हणजे आपल्याला हवी तशी सीटची स्थिती गाडीला 'शिकवून' ठेवायची आणि तीन वेगवेगळ्या चालक व्यक्ती आपल्याला हवी तशी आपल्या उंचीनुसार सेटीग्ज ठेवू शकतात. जी 'किल्ली' ड्रायव्हर सीट वर, तसे सीट चे सेटिंग!
आणखी एक फीचर्सचा प्रकार म्हणजे माहिती देणारी फीचर्स. ही मुख्यतः विविध संपर्क यंत्रणा वापरून चालकाला माहिती देतात. इन्फोटेनमेंट गटात करमणूक आणि माहिती हे दोन्ही देणारी फीचर्स येतात- माहितीसाठी मुख्यतः जी पी आर एस, आर एफ आणि सिमकार्ड द्वारे माहिती दिली जाते. पूर्वी नवे तंत्रज्ञान आले की वापराची काहीशी घाई केली जात असे, पण आता कडक तपासण्या आणि आंतराष्ट्रीय मानांकन/ प्रमाणपत्र असल्या शिवाय काहीही थेट वापरात येत नाही. पूर्वी जेव्हा नेव्हिगेशन सुरु झाले तेव्हा एका इंग्रज बाईनी म्हणे रेल्वे रुळावरून गाडी चालविली होती- कारण जशा सूचना मिळाल्या तशी ती चालवत राहिली. रेल्वे फाटकावर 'टर्न राईट' म्हटल्यावर वळली. मग रस्ता असा का आहे असा विचार येउन पहाते तर काय, रेल्वे रुळावरून जातोय हे कळताच हादरून गेली मग कळलं की ही नकाशाची चूक आहे, यात काहीशी अतिशयोक्ती असेलच, पण तंत्रज्ञान फक्त मदतीला ठीक आहे, त्यावर अंधविश्वास उपयोगाचा नाही. मर्फीचे नियम ठाऊक असणं चांगलंच!
भारतात आपल्याला लवकरच काय काय नवीन दिसेल? तर बरेच काही! अपघाती गाडी स्वतःच अपघात झाल्याचा संदेश पाठवेल, चोरी झालेली गाडी ती कुठे आहे ते मालकाला कळवू लागेल, आपला आवाज ओळखून, समजून पडद्यावरच्या मेनूमध्ये पर्याय निवडले जाणे, ओटोपार्क मोडमध्ये गाडी टाकून स्वतः कशी पार्क होते ते बघत बसता येईल. गाड्या चोरीला जाण्याचं प्रमाण बरंच कमी होईल, समोरच्या काचेवर तुम्हाला कुणाचा फोन येतोय त्याचं नाव किंवा चेहरा दिसेल, अन ठरवता येईल की फोन घ्यायचा का नाही, स्क्रीनवर फेसबुक किंवा जो तत्सम प्रकार असेल त्यावर स्टेटस अपडेटवता येईल, अनेकांचा याला सकारण विरोध आहे- समर्थन करणारे म्हणतात की रेडीओचं च्यानल बदलतो तसंच हे सोपं आहे हे. पण सोशल मिडीया वर येणाऱ्या संदेशाचे मनावर विविध प्रकारे परिणाम होतील आणि ड्रायव्हरला विचलित करतील असा विरोधाकांचा आक्षेप आहे. महामार्गावर माणसांपेक्षा वाहनांचं नेटवर्क असणं जास्त चांगलं!
आज सहसा न दिसणारी कित्येक फीचर्स २०१६ पासून भारतात पण दिसू लागणार आहेत. पुढच्या टप्यात २०२० ला ती अनिवार्य होतील. वोल्वोच्या ह्या आणि इतर दुव्यावर माहितीपूर्ण क्लिप आणि अजून बरीच फीचर्स पहाता येतील! यातून एक महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे आपल्याला- नवग्राहकाना समोर ठेवून सगळ्या कंपन्यांचं काही ना काही नियोजन चालू आहे. थोडक्यात काय, आज वीस लाखाच्या गाडीत असणारी वैशिष्ट्ये चारपाच वर्षात दहा लाखाच्या गाडीत येतील. अगदी नको म्हटलं तरी काही फीचर्स अगदी पाच लाखाच्या गाडीत पण येतीलच, कारण तोपर्यंत ती अगदीच 'बेसिक' झाली असतील! त्याबद्दल तांत्रिक माहिती पुढे घेऊच. चला, तर मग तयार होऊया उद्याच्या नवनव्या गाड्यांचा आनंद घ्यायला!
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Apr 2014 - 3:41 am | मधुरा देशपांडे
माहितीपूर्ण लेखमाला. पुभाप्र.
25 Apr 2014 - 3:54 am | आत्मशून्य
हां लेख आवडलाच.
अच्र्ट अवांतर:- हे चित्रपट गेम्स मधे बघतो ते नायट्रोस प्रकरण काय आहे हो ? अन ते बेसिक वा एक्सटेंडेड मधे सामाविष्ट असते काय ?
अती अवांतर :- बाकी हे वाचुन काही तरी तूफानी करायचा मुड आलाय .आता रूम मधेच एका ड्रोवरला कोम्प सोबत इंटरफेस करायचा विचार करतोय. क्लिक केले की ड्रावर उघडणार क्लिक केले की बंद :) मग पुढे जाउन विविध ड्रोवर ला एक्सेस द्यायचा विचार आहे म्हणजे एडमिन, गेस्ट, फॅमिली, कामवाली असे, एकदम सिक्योर साय्फाय रूम बनेल ना ?
25 Apr 2014 - 10:17 am | झकासराव
आता गाड्यांवर आरएफाअयडी टॅग आहे.
तो ऑटो टोल वसुन करण्यासाठी.
चांगली लेखमाला सुरु आहे.
:)
25 Apr 2014 - 11:08 am | चित्रगुप्त
छान. रोचक. अशीच माहिती देत रहा.
25 Apr 2014 - 3:31 pm | मुक्त विहारि
आवडला...
25 Apr 2014 - 3:45 pm | शुचि
हा लेखही सर्वार्थाने उत्तमच. खूप आवडला. इथे "क्रूज कंट्रोल" वर गाडी अक्षरक्ष: १००-१०० मैल रेटता येते. petrol इतकं कमी जळतं. तेव्हा ते फीचर वापरले आहे.
25 Apr 2014 - 3:46 pm | अत्रुप्त आत्मा
भारी लिवताय हो...चालू राहुं द्यावा. :)
25 Apr 2014 - 8:50 pm | आदूबाळ
"त्या" आजोबांसारख्या ऐड्या सुचत असतात. पण माझे ऑटो इंजिनियर मित्र त्यावर थंड पाणी ओततात!
रस्त्याकडेला रस्त्याला समांतर पार्क केलेल्या दोन गाड्यांमध्ये आपली गाडी घुसवायची असेल तर बरंच पुढे मागे आणि कलाकुसर करायला लागते. त्यावर मला उपाय सुचला, की गाडीला जशी सरळ पुढे-मागे करायला चाकं असतात, तशी काटकोनात आडवं जायला चाकं केली की काम खलास! अजून चार चाकांचा खर्च नको असेल, तर असलेल्या चार चाकांना ३६० अंशात फिरता येईल अशी सोय केली की संपलं!
---या क्रांतिकारी कल्पनेची माझ्या मित्रांनी जी काय खेचलीय ... अरारारा...
आत्ता तुमचा लेख वाचून सुचलेली कल्पना:
चालकासमोरच्या काचेला औट्पुट देण्यापेक्षा चालकामागच्या काचेला देणं जास्त उपयुक्त ठरेल. इनपुट चालकाच्या ताब्यात. (खिडकीतून तोंड बाहेर काढून मागच्याला शिव्या घालणं अवघड असतं!)
उदा.
- सिग्नल असूनही मागचा उगाच पोंगा वाजवत असेल तर चालकाकडून काचेवर संदेश - "ए टरमाळ्या, बिस्मिल्ला खाँ समजतोस का स्वतःला..."
- आपल्या स्कूटी/अॅक्टिव्हाचं नाक गाडीला भिडवून उभ्या राहिलेल्या तरूणीला चालकाकडून काचेवर संदेश - "ताई दया करा...लोनवर घेतलीय हो गाडी..."
- सिग्नल तोडल्यावर पाठिमागून फुकाची शिट्टी मारणार्या मामाला चालकाकडून काचेवर संदेश - "एम एच १२ xxxx को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हय. पचास मुल्कों की पुलीस..."
25 Apr 2014 - 10:09 pm | धर्मराजमुटके
असेच काहिसे म्ह्णतो. पण मला वाटते मागच्या काचेवर कुठेतरी स्पीडोमीटर मोठ्या टायपात दिसावा. म्ह्णजे समोरच्याची गाडी किती वेगात चालली आहे त्यानुसार आपला वेग कमी जास्त करता येईल. पुढील गाडी अचानक वेग कमी करते तेव्हा मागून त्याला ठोकले जाते. अशा प्रकारचे अपघात यामुळे टाळता येतील काय ?
26 Apr 2014 - 1:15 am | बहुगुणी
zero turn drive चा concept पहा:
26 Apr 2014 - 2:31 pm | आदूबाळ
जबरदस्त!! मार डाला - काय कार आहे!
तरी झीरो टर्न ड्राईवमध्ये जे साध्य होतं ते बर्याच अंशी नॅनोमध्येही आहे. नॅनोचाही "टर्निंग रेडियस" खूप कमी आहे.
30 Apr 2014 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास.
-दिलीप बिरुटे
25 Apr 2014 - 10:10 pm | शुचि
सीट गरम करुन पार्श्वभाग शेकणारं फीचर फार लाडके आहे. थंडीत गार सीट्वर बसवत नाही ;)
26 Apr 2014 - 12:57 pm | खेडूत
:)
सीट मेमरी /हीट/ वेन्ट आणि आता मसाज पण आलाय.
अनुभव म्हणून एकदाच बसून पाहिलंय. पण लय भारी.
2 May 2014 - 8:04 pm | आयुर्हित
फक्त मसाजर ड्राईवर सीटला लावू नये,
नाहीतर मसाज सुरु झाल्यावर डुलकी यायची शक्यता आहे! हा! हा! हा!
25 Apr 2014 - 10:35 pm | खटपट्या
मस्त चालू आहे
अजून येवूद्या
25 Apr 2014 - 10:51 pm | मराठे
टोयोटा प्रियस् च्या कुठल्याश्या वर्जनमधे टपावर सोलारपॅनल्स लावले आहेत व त्यापासून मिळणार्या विजेचा उपयोग गाडीच्या ए.सी. साठी होतो. ही सोय भारतात फार उपयोगी पडू शकते. भारतात एकूणच हायब्रीड किंवा इलेक्ट्रीक गाड्या वापरायला चांगला स्कोप आहे कारण सर्वसाधारण वेग फार नसतो. अश्या वेळी 'चांगलं मायलेज देणारी गाडी' म्हणून हायब्रीड गाड्या चांगल्या विकल्या जाऊ शकतात. किंमत आटोक्यात आणण्यासाठी भारतातच ह्या गाड्यांच उत्पादन करता येईल. चेन्नई तसंही भारताचं डॅट्रोईट (मोटोर सिटी) म्हणून उदयास येतं आहे.
26 Apr 2014 - 12:57 pm | खेडूत
प्रियस बद्दल ऐकलंय पण अशी गाडी युरोपात पण नाही पाहिली. कदाचित अजून कन्सेप्ट मध्ये असेल. होंदा सिविक चालू असताना हायब्रीडला आपल्याकडे पण तीस टक्के सबसिडी होती
28 Apr 2014 - 6:05 pm | सुखी
होय, पण मुद्दलातच तिची किंमत २१ लाखाच्या पुढे होती.... सबसिडी सकट पण गाडी परवडत नव्हती लोकान्ना...
29 Apr 2014 - 1:02 am | आयुर्हित
भारतात २००८ मध्ये ही गाडी आली, जेव्हा टोयोटाच्या इतर गाड्या १६kmpl चा माईलेज देत असत तेव्हा ही गाडी ५० kmpl चा माईलेज देणार असे ऐकले होते.पण दुर्दैवाने फक्त बोटावर मोजण्या एवढ्याही हे मोडेल पुण्यात विकलले गेले नसावे.
29 Apr 2014 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार
महिंद्राची महिंद्रा रेवा ही हायब्रीड कार (पेट्रोल आणि इलेक्ट्रीसीटी) सध्या भारतात उपलब्ध आहे.
29 Apr 2014 - 10:55 am | आयुर्हित
रेवा-पेट्रोल मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे.
क्लीन आणि ग्रीन टेक्नोलॉजी असल्यामुळे रेवा-इलेक्ट्रीसिटी ही आजच्या घडीला भारतातील एक उत्तम कार आहे.गेल्या १५ वर्षांपासून पाहतो आहे. अतिशय कमी रखरखाव असल्यामुळे खूप छान कार आहे. City driving साठी सर्वात उत्तम आहे.
30 Apr 2014 - 1:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
लिहिताना चुकले खरे,
पेट्रोल फ्री हायब्रीड कार असे असायला हवे होते.
माझ्या लिहिण्यातन भलताच अनर्थ झाला.
गैरसमजाबद्दल क्षमस्व,
30 Apr 2014 - 9:21 pm | लंबूटांग
जर कार पेट्रोल आणि वीज (बॅटरी) दोन्हींचा वापर करत असेल तर तिला हायब्रीड कार असे म्हणतात. रेवा फक्त इलेक्ट्रिक आहे. (वरील लिंक मधे तरी तसेच दिसते आहे).
बाकी इलेक्ट्रिक कार घ्यायची तर फार इच्छा आहे पण टेस्लाच घ्यायची आहे. साला पैशे कमी पडतायत एक लाखभर डॉलर :P
(भारतात उपलब्ध नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी)
-(गरीब) लंबूटांग
30 Apr 2014 - 9:24 pm | शुचि
आमची सध्याची हायब्रिड आहे. व्होल्ट!!!
1 May 2014 - 2:18 am | रेवती
टेस्लाबाबत सहमत. म्हणजे मला नकोय पण राईड घेण्याची संधी थोडक्यात हुकली. आपल्या राज्यात अजूनपर्यंत एकच बघितलीये रस्त्यावर पण पश्चिमेकडल्या राज्यात बर्याच आहेत. त्याला प्रतिक्षा यादी आहे असे ऐकले आहे.
1 May 2014 - 9:10 am | लंबूटांग
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते.
तशा आपल्या राज्यात बर्याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.
1 May 2014 - 9:25 am | लंबूटांग
एकदा राईड घेतल्यावर मग प्रत्येक वेळी ती गाडी दिसली की असे वाटते आपल्याकडे असावी. मग मी आपला मॉलमधे जाऊन त्या गाडीत बसून १७ इंच टच स्क्रीन वरून जेवढे काही करता येईल तितके करतो. अर्थात गाडी जागच्या जागीच असते.
तशा आपल्या राज्यात बर्याच मॉडेल एस आहेत. मी तर त्यांची रोडस्टर पण बघितली दोनदा. उगाचच नै पूर्वेकडची सिलीकॉन व्हॅली म्हणत बॉस्टनला ;). हो प्रतिक्षा यादी तर आहेच पण आता अगदी काही महिनेच लागतात असे ऐकले. असो, चांगल्या धाग्याची खरडवही नको करायला.
2 May 2014 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार
माहिती बद्दल धन्यवाद लंबुटांग.
जर पेट्रोल आणि वीज दोन्हीचा वापर करणार्या कारला हायब्रीड कार असे म्हणतात, तसे पेट्रोल आणि सी.एन.जी. वर चालणार्या कारला काय म्हणतात?
महिंद्रा रेवाची वेबसाईट बघताना लक्षात आले की त्यांनी सोलर पॅनेलवरुन चार्जींगची व्यवस्था त्यांच्या कार मधे केली आहे. पण मग त्यांनी कारच्या टपावरच सोलर पॅनेल का बर लावल नसेल? म्हणजे कार चालता चालता सुध्दा चार्ज होत राहिल.
2 May 2014 - 5:59 pm | लंबूटांग
अथवा सौर उर्जा विजेत रूपांतरीत करण्याची क्षमता फारच कमी आहे.
त्या गाडीची बॅटरी चार्ज होण्याइतकी ऊर्जा तयार करायला काहीशे तरी चौरस फूट क्षेत्रफळ असलेले सोलर पॅनल्स लागतील.
उदा. ह्या ठिकाणी बघितले असता दिसेल की एका माणसाला वाहून नेण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतात.
तशा कार्सन सीएनजी हायब्रीड म्हणतात. प्रियसला इलेक्ट्रिक हायब्रीड
2 May 2014 - 7:14 pm | बॅटमॅन
सोलर एणर्जी वापरलेल्या हायब्रीड कारमध्ये जर १०० ज्यूल इतके वर्क झाले तर त्यांपैकी किती वर्क/ऊर्जा सौर ऊर्जेद्वारे जनरेटवली जाते? % स्प्लिट इच्यारतोय साधारणपणे.
2 May 2014 - 8:19 pm | लंबूटांग
त्यामुळे याबद्दल खेडूतच जास्ती सांगू शकतील पण मला तरी असे सांगता येणे कठीण असावे असे वाटते.
कारण ते १०० ज्यूल वर्क कोणत्या परिस्थितीत झाले ह्यावर अवलंबून आहे. सर्वप्रथम पारंपारिक कारचे काम कसे चालते ते पाहू.
तुमच्या कारचे १००/ २०० अश्वशक्तीचे इंजिन खरे तर १% वेळीच गरजेचे असते. ह्या १% मध्ये तुम्ही जेव्हा पूर्णपणे थांबलेल्या स्थितीतून गाडी चालवायला सुरूवात करता, एखाद्या चढावर/ डोंगरावर गाडी नेता आहात, कोणाला ओव्हरटेक करत आहात, कैच्याकै वेगात चालवत आहात अशा मोजक्या वेळा असतात. एरवी तुमच्या गाडीला इतक्या अश्वशक्तीची गरज म्हणावी अशी नसते. म्हणूनच शहरात गाडी चालवताना अॅव्हरेज कमी मिळते कारण सतत आपल्याला पूर्ण थांबलेल्या स्थितीतून पुन्हा गाडी मोशन मधे आणावी लागते. आता अॅव्हरेज चांगले मिळावे म्हणून मग ह्या इंजिनला वेगवेगळ्या स्पीडमधे चालवण्यासाठी गिअर्स वगैरे भानगडी येतात. इंजिनाचे स्वत:चे असे वजन चांगलेच वाढते-> अधिक ऊर्जा खर्च होते.
कोणत्याही कारच्या इंजिनाला कारचे एवढे सगळे वजन वाहून नेण्याबरोबर इतरही काही ठिकाणी उर्जा खर्च करावी लागते. गाडी चालत असताना त्या ड्राईव्हट्रेनमधे जे घर्षण असते ते, हवेमुळे होणारा विरोध, आणि तुमचे पॉवर स्टीअरींग वगैरेंना ऊर्जा पुरवणे, एअर कंडीशनिंग वगैरे वगैरे.
आता हायब्रीड कार्समधे काही गोष्टी वेगळ्या केलेल्या असतात. सर्वप्रथम नाव दर्शवते त्याप्रमाणे त्यात २ प्रकारे ऊर्जा पुरवली जाते. एलेक्ट्रिक मोटर जी बॅटरीवर चालते आणि पारंपारिक इंजिन जे पेट्रोल/ गॅसवर.
असो तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर कार जर का १० किमिप्रतितास वेगाने गेली तर बहुतांश काम इलेक्ट्रिक मोटरने केले जाईल.
2 May 2014 - 10:02 pm | खेडूत
१०० ज्यूल वर अत्यंत कमी शक्ती मिळेल. तेवढ्याने गाडीच काय पण गाडीतला रेडीओ पण चालणार नाही ! ३ व्याट चा रेडीओ तासभर चालायला किमान एक किलो ज्यूल पाहिजे. सोलर सेलची अशी सतत उर्जा देण्याची ग्यारंटी नसल्याने नुसते त्यावर अवलंबून काहीच करता येत नाही. कमर्शियल वापरापासून अद्याप हे दूर आहे. तरी बऱ्याच विद्यापीठात संशोधन मात्र जोरदार सुरु आहे. ते या आशेवर, की ब्याटरी पेक्षा कार्यक्षमपणे उर्जा साठवणारा आणि वजनाला हलका घट लवकरच सापडेल! जसे आज आहे त्या स्थितीत पाहिलं तर या प्रकाराला भविष्य नाही.
आता प्रश्न रहातो % वितरणाचा :
तसे विभाजन कळत नाही. कारण जेव्हा मधेच गाडी इंजिनवर चालते तेव्हा ब्याटरी पूर्ण शक्तीने चार्ज होते, मग एखाद्या विशिष्ट क्षणी ब्याटरीतल्या एकूण चार्ज मधली 'सौर सुपातून' मिळालेली उर्जा पहायची तर नगण्यच असेल. इंजिन कधी आणि किती वेळ चालेल हे सांगता येत नसल्याने हे गणिती मॉडेल ने काही प्रमाणात अंदाज काढता येईल. पण प्रमाण नगण्य असेल हे नक्की. आणि खर्च झालेली उर्जा कुणा एकाची नाही तर 'ब्याटरीची' असेल,
हे गाडीतलं सोलर म्हणजे सध्यातरी काहीसं '' इजय असो!'' म्हणणाऱ्या गर्दीतल्या एका आवाजा सारखं! :)
25 Apr 2014 - 10:56 pm | ऋतु हिरवा
खूप छान आणि उप्युक्त माहिती.
29 Apr 2014 - 11:49 am | बाळ सप्रे
फीचर्स खूप असतात पण आपल्याला काय गरज आहे हे ठरवणं खूप महत्वाचं.. ते अनुभवानच जाणवतं..
उदा. माझ्या पार्किंगच्या जागेची रुंदी कमी असल्याने दोन्ही बाजुचे बाहेरील आरसे नेहेमी मिटुन घ्यावे लागतात, मग प्रत्येक वे़ळी बाहेर निघताना काच खाली करुन ते उघडण्याचा आळस होतो.. त्यामुळे नव्या गाडीतले बटण दाबुन आरसे उघडण्याचे फीचर मला खूप महत्वाचे वाटते.
तसेच चालकाच्या बाजूची काच पूर्ण खाली अथवा वर होईपर्यंत बटण दाबून धरण्याऐवजी 'वन टच स्क्रोल' खूप महत्वाचे वाटते.
मागच्या काचेवर धरणार्या वाफेसाठी 'डी-फ्रॉस्ट' नसणे खूप त्रासदायक वाटतं..
30 Apr 2014 - 2:28 am | शुचि
परत खाऊ कधी मिळणार? :)
30 Apr 2014 - 1:17 pm | खेडूत
सर्वांचे खूप आभार!
पैजारबुवा, मराठे, आयुर्हित, सुखी : हायब्रीड- इलेक्ट्रिक वर पुढे एक भाग नियोजित आहेच.
शुचि: धन्यवाद. दर आठवड्याला एक भाग अपेक्षित आहे. दहा भाग होतील असं वाटतंय.
आवडले तर पुढे चालवता येईल- वाचकांना कंटाळा आला तर आधी बंद करता येईल! :)
30 Apr 2014 - 1:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही वाचतोय.
-दिलीप बिरुटे
30 Apr 2014 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
पॉवर स्टेअरींग, ट्युबलेस टायर्स आणि अजुन भारतात नवे असलेले ऑटो ट्रान्समिशन यांच्या मुळे झालेल्या क्रांती.
मारुती, फियाट आणि टाटा वापरत असलेले कार चे ईंजीन विरुध्द ईतर जसे की टोयाटा, ह्युंदाई यांची ईंजीने
युरो मानके आणि भारतिय मानके (स्टँडर्डस)
आपली साधी बस - व्होल्व्हो / मर्सिडीस बस, तसेच नव्या मल्टी अॅक्सल बस
टाटा, अशोक लेलॅड आणि मान यांच्या ट्रक मधले फरक
या सगळ्याबद्दल वाचायला आवडेल.
तशी ही यादी बरीच मोठी आहे.
30 Apr 2014 - 2:46 pm | मुक्त विहारि
इथे वाचणारे बरेच जण आहेत.
पण ते फक्त प्रतिसाद द्यायचा कंटाळा करतात, इतकेच.
30 Apr 2014 - 4:23 pm | अविनाश पांढरकर
+१
30 Apr 2014 - 3:03 pm | आतिवास
वाचतेय. रोचक लेखमाला.
पण पूर्वी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे 'गाडी'तलं काही कळत नाही, त्यामुळे प्रत्येक लेखावर प्रतिसाद लिहिला जात नाही- इतकंच!
30 Apr 2014 - 7:44 pm | शुचि
ऐसा होईच नही सकता :)
30 Apr 2014 - 3:50 pm | अकिलिज
निघताना ब्रेकवरचा पाय काढला की सुरु. पेडल दाबल्यावर गाडी पुढे नाही का जाणार !!
अतिशय सुंदर लेखमाला.
थोडंसं गाड्यांविषयी : परदेशात गाड्या भारताच्या तुलनेत कैक पटीनी महाग आहेत. भारतात त्या इतक्या स्वस्त कशा हे मला अजुन न सुटलेले कोडं आहे.
30 Apr 2014 - 9:55 pm | खेडूत
चांगला प्रश्न आहे!
आपल्याच पायात ब्रेक पण असतो ना! पुढे नाही जात आपण सांगितल्याशिवाय.
अक्सिलरेटर पेडलला लावलेला संवेदक हे सांगतो की पेडल किती टक्के दाबलं गेलंय.
साधारण ८-१० % दाबल्यावर चालू होते. नुसता पाय ठेवलाय का पेडल दाबलंय हे गाडी अचूक ओलखते. इंजिन चालू झाल्यावर मगच गाडी पुढे जाऊ शकते.
मुख्यतः यामुळे पेट्रोल-डीझेल ५% हून जास्त बचत होते. आणि प्रदूषण कमी होते.
महिंद्रा, टाटा च्या काही गाड्यांना हे २०११ पासून सुरु झाले आहे. परदेशी बहुधा सर्व नव्या गाड्यांत हे कांही वर्षांपासून आहेच.
किमती बाबत सहमत. लवकरच उलगडा होईल.
1 May 2014 - 2:14 am | रेवती
किमतीमध्ये फार फरक नसावा असा अंदाज आहे पण जाणून घेण्यास आवडेल.
30 Apr 2014 - 4:52 pm | प्रमोद देर्देकर
शॉलीड लेखमाला येवुदे अजुन.
30 Apr 2014 - 7:44 pm | रमेश भिडे
माहितीपूर्ण लेखमाला. .
1 May 2014 - 2:06 am | रेवती
एअरबॅग सोफ्टवेअर मेन्यु मधून बंद केली असेल तर स्टीअरिंग वर किंवा समोर panel वर कुठेतरी तसे दर्शवले जाते. त्याकडे दुर्लक्ष करू नये.
सहमत. नुकत्याच झालेल्या सर्व्हिसिंगनंतर माझ्या गाडीत एयरब्याग ऑफ असा निरोप दिसतोय. आता गाडी पुन्हा घेऊन जाणे आले.
लेख आवडला.
2 May 2014 - 10:24 am | पैसा
खूपच माहितीपूर्ण आणि गाड्या कुठे "पोचणार" आहेत याची झलक दाखवणारे लिखाण!
2 May 2014 - 2:14 pm | अकिलिज
ऑटो बूट ओपनर : हातात सामान असेल आणि खिशात किल्ली असताना फक्त डिकीखाली पाय फिरवायचा. डिकीचा दरवाजा अपोआप उघडातो.
लेन असिस्ट : गाडी लेन सोडून बाहेर जात असेल आणि इंडीकेटर चालू नसेल तर ती आपोआप परत लेन मध्ये येते. मर्सिडीस बेन्झच्या बर्याचश्या वरच्या दर्जाच्या मॉडेलना उपलब्ध
अँडाप्टीव्ह दिवे : गाडी जशी वळेल तसे दिवेही वळतात.
माझ्या मते बरीचशी फीचर्स मर्सिडीस वाल्यांनी सगळ्यात पहील्यांदा विकसीत केली मग इतर गाडी बनवणार्यांनीही चालू केली.
बाकी आदूबाळ्ची मागच्या काचेच्यावरच्या संदेशांची कल्पना जाम आवडली.
अवांतर : माझ्या गाडीला ऑटो स्टार्ट-स्टोप आहे. ते ब्रेक सोडल्यावरच गाडी चालू करते. पण पेडल दाबल्यावर गाडी चालू करणारे पण असावे. पेटंटच्या भानगडीमुळे कदाचीत सगळे त्याच फीचरसाठी वेगळे बदल करत असावेत.
2 May 2014 - 2:53 pm | सुनील
भन्नाटच आहे!
समजले नाही!
दिवे गाडीला लावलेलेच असतात. गाडी वळली की ते वळणारच! गाडी डावीकडे वळून गेली आणि दिवे सरळ निघून गेले असे कसे होईल? ;)
2 May 2014 - 3:19 pm | अकिलिज
दिवे थोडे आधी वळतात. म्हणजे पुढे रस्त्यात काय वाढून ठेवलंय ते आधीच दिसतं.
ही लिंक पहा.
http://www.youtube.com/watch?v=861qN1Q-dBs
2 May 2014 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
डोळा जसा फिरतो त्या प्रकारे हे दिवे हलचाल करु शकतात खालचा व्हिडीओ बघा
दिसत नसेल तर इथे टिचकी मारा
2 May 2014 - 3:30 pm | सुनील
धन्यवाद.
कचेरीतून लिंका दिसत नाहीयेत. घरी जाऊन बघतो.
2 May 2014 - 3:44 pm | खेडूत
+१
त्याला कॉर्नरिंग लाईट पण म्हणतात. गाडी २५-३० कि मी पेक्षा कमी वेगात असेल + टर्न इंडीकेटर दिला असेल, तर स्टीअरिंग एङ्गल सेन्स करून आपण पूर्ण वळेपर्यंत त्या बाजूचा दिवा एक झोत टाकतो. त्यामुळे अंधाऱ्या कोपरयावर रस्ता ओलान्डायच्या तयारीत कुणी असेल तर ते किंवा अडथळा असल्यास चालकाला दिसतात.
2 May 2014 - 6:26 pm | रेवती
ऑटो बूट ओपनर
अगदी गरजेची गोष्ट आहे.
बाकी ते गाडी वळल्याबरोबर वळणारे दिवे समजले नाहीत.
2 May 2014 - 6:29 pm | रेवती
चित्रफीत पाहिली.
2 May 2014 - 5:18 pm | अकिलिज
एल् ई डींचे वाढते प्रमाण पाहता हा नवीन प्रकार कदाचित ५-१० वर्षात सगळ्या (परदेशी) गाड्यांना येईल. समोरच्याच्या डोळ्यात लाईट जाऊ नये म्हणून केलेली सोय.
ही लिंक पहा.
http://www.youtube.com/watch?v=__sjUpynuZM
बाकी भारतात अपघात होण्याचे मुख्य कारण डोळे दिपणे असावे. परदेशात ईतरांना त्रास होऊ नये याची खूप काळजी घेतात.
कर्नाटकात तर ६-८ लाईट लाऊन रात्रीचे ट्रका आणि बसा हाकतात. दिवाळीच जणू.
आणि आता तर गाड्यांना झेनॉन लाईट आले आहेत. प्रचंड प्रखर. हुच्च शिकलेले लोक्स ओवरटेकला पटापट गाड्या बाजूला व्हाव्यात म्हणून वापरतात.
एकदा अंधेरीला अप्परवर चालवणार्या एका बाईला वाटेत थांबवून हे अप्पर-डीप्पर समजाऊन सांगतले तर तिने सगळ्या मित्रमैत्रीणिंमध्ये मलाच खुळ्यात काढले.
3 May 2014 - 7:38 am | सुकामेवा
पुभाप्र