मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! :) हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..! :)
नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं!
डौलाने हाक जरा आज नांव रे..!
मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी! छान वारा वाहतोय, सुंदर मूड आहे! मनी एखादी आस असली तरी सुंदर मूड तयार होतो, अन् त्या मुडातूनच मनीचं गुज सहजासहजी असं ओठांवर येतं! एखाद्या नाविकासमोर उघड होतं!
मग नाव कशी हाकायला हवी? डौलानेच ना? :)
त्यामुळे 'डौलाने हाक जरा आज नांव रे..' ही ओळही तशीच डौलदार वाटते! ज्या डौलाने नाव हाकणं अपेक्षित, तोच डौल त्या ओळीतही! की त्या ओळीतल्या डौलामुळे नाव खरोखरच डौलदारपणे हाकायला हवी हे पटतं? की हेच गाण्याचे शब्द अन् त्याची चाल यांचं अद्वैत?
सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे..!
क्य बात है.. ! 'पैल माझे गाव रे..' हे सागताना 'अरे समजून घे रे जरा, तीन सांजा झाल्या अन् पैलतीरी असलेल्या माझ्या गावाला मला लौकर जायचंय रे.. अशी समजावणी! एक आर्जव! आणि कुण्या जवळच्या सुहृद मित्राला सांगावं असा विश्वास..! एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं! क्या बात है..!
आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!
काय संवाद साधला माझ्या राऊनी माझ्यापाशी? आता तो संवाद त्या नाविकाला सांगायचाय! 'पैल माझे गाव रे..' ह्या आर्जवाने त्याला कधीच आपलासा केलाय! मग आता मनातल्या राऊचे संवाद त्याला सांगायला काय हरकत आहे अशी एक स्वाभाविकता..!
आषाढ गेला, श्रावण गेला अन् आता भादवा आला! भादवा हा शब्द असा गाऊन ठेवलाय की त्या एका शब्दात आषाढ आणि श्रावणाची प्रतिक्षा उभी केली आहे! आषाढ-श्रावणातली ती मौनप्रतिक्षा अखेर झालीच शेवटी प्रकट भादवा या शब्दातून..! :)
एक म्हणणं मांडलं आहे 'भादवा' ह्या शब्दातून..!
आणि आता नावेत बसल्यावर अवचित त्या नाविकासमोर आषाढ-श्रावणातला विरह ओठी आला आहे!
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
नेमकं हेच जाणवतं का हो 'धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे...!' या ओळीतनं? :)
असो, एक हृदयाला हात घालणारं गाणं! एखाद्या सर्जनशील, संवेदनशील चित्रकराला हे गाणं नुसत ऐकून हातात कुंचला घ्यावासा वाटेल आणि त्याच्या कॅन्व्हासवर डौलाने जाणारी ती छानशी शिडाची होडी उतरेल, मंद वारा वाहणारी ती सांजवेळ उतरेल.. त्या चित्रात पार्श्वरंग असतील भादवा आला ह्या म्हणण्याचे आणि असेल एक ओढ लगोलग येऊ घातलेल्या अश्विनातली...!
-- तात्या अभ्यंकर.
लेबल : तात्या अभ्यंकरांचे काही ऍब्स्ट्रॅक्ट विचार...!
पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...!
(अर्थात, मूड लागल्यास अन् सवड झाल्यास..!) :)
प्रतिक्रिया
10 Oct 2008 - 1:32 am | आनंदयात्री
भादवाही येऊन उभा राहिला आहे त्यामुळे आता पुढल्या अश्विनातलं शरदाचं चांदणं अन् अश्चिनातल्या पौर्णिमेची आस आता चांगलीच जाणवू लागली आहे! आता नाही धीर धरवत..!
उत्तम लेखन !
10 Oct 2008 - 1:41 am | मुक्तसुनीत
या गाण्याच्या रसाचा अगदी पूर्णपणे तुम्ही आस्वाद घेतला आहे या लेखात. गाण्यातल्या भावाशी पूर्णपणे एकरूप होऊन लिहिलेला आणखी एक उत्तम लेख !
या गाण्याचे संगीत दशरथ पुजारींचे ना ? शब्द कुणाचे ते विसरलो .....
>>>> एका नाविकाचं आणि स्त्री प्रवाश्याचं इतकं सुंदर नातं असू शकतं? धाकल्या दिरासारखं किंवा पाठच्या भावासारखं! क्या बात है..!
हे अगदी खरे. केवळ असाच एक हृदयात कळ आणणारा क्षण "राजा सारंगा , माझ्या सारंगा डोलकरा रं , धाकल्या दिरा रं" या गाण्यात आहे. "दर्याच्या पाण्याला उधान आयलंय " आणि अशा उधानात वहिनी धाकल्या दिराला सांगते .."चल जावया घरा..." . कुठल्याही संध्याकाळी हे गाणे कानावर पडावे आणि त्या अनामिक मायलेकरांच्या कल्पनेने भरून यावे....
10 Oct 2008 - 1:52 am | मानस
या गीताचे शब्द आहेत अशोक परांजपे ह्यांचे. माझ्या मते संगीत अशोक पत्कींनी दिले आहे.
तात्याबा, सुंदर लेख. अजुन येऊ देत.
10 Oct 2008 - 2:28 am | मनीषा
एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला!
---असं म्हणून या गाण्याचं आणि त्यातल्या काव्याचं त्यातल्या रंग आणि रेषांचं सुद्धा सुंदर वर्णन केलं आहे .
10 Oct 2008 - 2:45 am | प्राजु
काव्याचं आणि त्यातल्या गायकीचं रसग्रहण ते हेच.
माझं अतिशय आवडतं गाणं आहे हे. शाळेत ४ थीत असताना या गाण्यावर नाच बसवला होता असं काहिसं आठवतं आहे.
रसग्रहण आवडलं, आणि हा नवा उपक्रमही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Oct 2008 - 2:52 am | मीनल
रसग्रहण क्लास आहे .
या पुढील गाण्यातून ही खूप न उमजलेले अर्थ उलगडत जातील अस वाटत.
जेव्हा ते बुध्धीला समजतील तेव्हा ते मनाला जास्त भावतील.
मीनल.
10 Oct 2008 - 3:05 am | मीनल
शब्दांच्या अर्था बरोबर आम्हाला थोड स्वर ज्ञान मिळले तर बर होईल.
मीनल.
10 Oct 2008 - 3:10 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
10 Oct 2008 - 9:47 am | यशोधरा
ऍब्स्ट्रॅक्ट विचार आवडले.
>>पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी...!
लिहा, वाट बघत आहे!
10 Oct 2008 - 11:39 am | ऋषिकेश
मस्तच! थेट मनातून आलेला लेख
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
10 Oct 2008 - 12:27 pm | रामदास
खरं सांगू का ही सगळी गाणी मदतीला उभी राहतात जेव्हा आपल्या सोबत कुणिच नसतं आणि असावं असं वाटत असतं.
बकुळीच्या गाण्यावरून आणखी एक छान गाणं आठवलं.
मंगला नाथ यांनी गायलेलं आहे.त्यातल्या काही ओळी देतो आहे.
श्रावण घन गर्जन गाजे
दिपवी दोन्ही नयन माझे
एका अंधार्या गहन निळ्या
सोनेरी क्षणात
बकुळ फुला कधीचे तुला धुंडते वनात
जरा आठवड्याला एक अशा गतीने लिहील्यास मजा येईल.
बिनाका गीतमालाची वाट बघण्यासारखं.
10 Oct 2008 - 12:54 pm | स्वाती दिनेश
तात्या,रसास्वाद आवडला.
शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...! मधील सौंदर्य लवकर उलगडून दाखव.
स्वाती
10 Oct 2008 - 6:29 pm | चित्रा
असेच म्हणते.
11 Oct 2008 - 7:17 am | नंदन
सुरुवात छान झाली आहे, पुढील भागांची वाट पाहतो. जिथे सागरा, तुला ते आठवेल का सारे सारखी सुमन कल्याणपुरांची अनेक सुरेख गाणी आहेत. त्यांच्याबद्दलही वाचायला आवडेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Oct 2008 - 12:16 pm | बिपिन कार्यकर्ते
नंदनशी १००% सहमत.
बिपिन.
11 Oct 2008 - 12:32 am | बिपिन कार्यकर्ते
क्लास...
बिपिन.
11 Oct 2008 - 10:06 am | चतुरंग
एकदम तात्या ष्टाईल लेखन बरेच दिवसांनी!
मर्मग्राही लेखन तुम्हाला जमते तात्या. अजून येऊदेत.
चतुरंग
12 Oct 2008 - 11:53 am | शशिकांत ओक
अत्यंत मोजक्या शब्दात साकारलेली भावनिकतेची थरथर. नावेबरोबर मनाला हेलावते.
12 Oct 2008 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाविका रे, वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे..
लैच भारी गाणं आहे. हृदयाला हात घालणार्या गाण्यांचे सुंदर चित्र रेखाटलंय.
पुढलं गाणं : शब्द शब्द जपून ठेव, बकुळिच्या फुलापरी...!
लवकर लिहा !!!
-दिलीप बिरुटे
13 Oct 2008 - 8:28 am | विसोबा खेचर
आवर्जून प्रतिसाद देणार्या सर्व रसिक वाचकवरांना मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे...
ज्यांना इच्छा असूनही हे लेखन वाचायला टाईम भेटला नाही आणि ज्यांना हे लेखन बरावाईट असा कुठलाच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही त्या सर्वांचेही आभार.. :)
तात्या.
14 Oct 2008 - 6:19 pm | शुभान्कर
लेख खुपच छान.
असेच एक सुन्दर गाणे आहे. उषा मन्गेशकरांचे.. "जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले"
सगळे उषाताईंना लावणीसाठी ओळ्खतात्,पण त्यांची कितीतरी भावगीतं निव्वळ अप्रतिम आहेत. वर दिलेले गाणे असेच सन्ध्याकाळच्या "पुरिया धनाश्री" चा नमुना आहे.
त्यावर लिहा ..