अमेरिकेची नवी वाट

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
2 Oct 2008 - 3:48 am

पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे. सिलिकॉन खोर्‍याचा विकास सुरू झाल्यानंतर भारतीयांचे लोंढे तिकडे जाऊ लागले ते मात्र हाँगकाँग, शांघाई, टोकियो वगैरे चिनी जपानी शहरांना जाऊन तिकडून'एले'ला जातात अशी नवी माहिती मिळाली. थेट न्यूयोर्कला जायचे माझे तिकीट निघाले तेंव्हा आपण पश्चिमेकडून जाणार असेच मला वाटले होते. नकाशात मुंबई आणि न्यूयॉर्कला जोडणारी सरळ रेषा काढली तर ती अरबस्तान आणि उतर आफ्रिकेतल्या सहाराच्या वाळवंटावरून जाते. त्यामुळे आपले विमानही कदाचित युरोपला बाजूला ठेऊन सरळ आफ्रिकेवेरून अमेरिकेला जाईल असे वाटले.

मुम्बईच्या विमानतळावरून उडणारी सगळीच विमाने आधी जुहूच्या दिशेने झेप घेतात. समुद्रावर चार पांच मैल गेल्यानंतर डावीकडे वळून हैद्राबाद, बंगळूरूकडे किंवा उजवीकडे वळून दिल्ली, कोलकात्याकडे जातात हे मी अनेक वेळा पाहिले होते. या वेळेस आपले विमान कोठेही न वळता सरळ पश्चिमेकडे पुढे जात राहील अशी माझी अपेक्षा होती. पण उड्डाणानंतर लगेच उजवीकडे वळून ते उत्तरेकडे बडोद्याच्या दिशेने जमीनीच्या वरून उडू लागलेले पाहून आपण चुकीच्या नंबराच्या विमानात बसलो की काय अशी शंका क्षणभर मनात चमकून गेली. आता हे विमान आपल्याला ज्या देशात घेऊन जाईल तिथे जाणे भागच होते. पण मॉनिटरवर न्यूयॉर्क हेच गन्तव्य स्थान दिसत असलेले पाहून जीव भांड्यात पडला आणि ते तिथे कोणच्या मार्गाने जाणार आहे याच्या कुतूहलाने मनात जन्म घेतला.

उत्तर दिशेला दहा बारा अंशाचा कोन करून आमच्या विमानाचे 'झेपावे उत्तरेकडे' सरळ रेषेत चालले होते. गुजरात आणि राजस्थानला पार करून ते पाकिस्तावर आले, तिथून अफगाणिस्तानावरून उडत जात असतांना कोणा तालिबान्याच्या तोफेचा गोळा तर तिथपर्यंत चुकून येणार नाही ना याची काळजी वाटली. पण रमजानच्या महिन्यात रात्रीचा इफ्तार खाऊन ते सारे गाढ झोपी गेलेले असणार! अफगाणिस्तानावरून आमचे विमान कझाकस्तान, उझ्बेकिस्तान वगैरे देशांवरून जात होते. ताश्कंदचा एक अपवाद सोडला तर तिकडचे कोणतेही ठिकाण ओळखीचे वाटत नव्हते. पृथ्वीवरचा इकडचा भाग मी यापूर्वी कधी नकाशातदेखील पाहिलेला नव्हता. आणखी वर (म्हणजे उत्तरेकडे) गेल्यावर उरल पर्वतांच्या रांगा (मॉनिटरवर) दिसू लागल्या. बाहेर अंधार गुडुप असल्यामुळे खिडकीतून कांहीच दिसण्यासरखे नव्हते. मॉस्कोलासुद्धा दूर पश्चिमेकडे सोडून आमचे उडाण उत्तर दिशेने वर वर चालले होते . थोड्या वेळाने इस्टोनिया, लाटव्हिया वगैरे देश बाजूला सोडून आणि फिनलंड, स्वीडन यांना मागे टाकून आम्ही नॉर्वेच्या पूर्व टोकाला स्पर्श केला. भारतापासून इथपर्यंत आम्ही जमीनीवरूनच उडत होतो. नॉर्वे ओलांडल्यानंतर पहिल्यांदा एक समुद्र आला. ऍटलांटिक महासागर जिथे आर्क्टिक महासागराला मिळत असेल तो हा भाग असावा. आपण आपल्या आयुष्यात कधीही उत्तर ध्रुवाच्या इतक्या जवळ येऊ असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. खिडकीबाहेर एक गम्मतशीर दृष्य दिसत होते. खाली सगळा अंधार होता पण आमच्या बाजूला क्षितिजापलीकडे थोडा अंधुक उजेड दिसत होता. तो बहुधा उत्तर ध्रुवाच्या पलीकडे ज्या भागात दिवस होता तिकडून आकाशात परावर्तित होत असावा.

आमचे विमान नाकासमोर सरळ रेषेत उडत असले तरी नकाशात मात्र ते डावीकडे वळत वळत आधी उत्तरेऐवजी वायव्येकडे, त्यानंतर पश्चिमेकडे, नैर्हुत्येकडे करीत चक्क दक्षिण दिशेने उडू लागले. वाटेत ग्रीनलँडचा बर्फाच्छादित भागही येऊन गेला आणि आम्ही उत्तरेच्या बाजूने कॅनडात प्रवेश केला. यापूर्वी एकदा मी पूर्वेच्या बाजूने कॅनडात येऊन नायगारापर्यंत म्हणजे यूएसएच्या सीमेपर्यंत आलो होतो. या वेळी ती (विमानातून) ओलांडून स्टेट्समध्ये दाखल झालो. नव्या देशात आल्याचा आनंद होताच, एक नवी वाट पाहिल्याचा बोनस मिळाला.

प्रवासअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2008 - 9:00 am | पिवळा डांबिस

नाय हो, ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे!!!!
इथे काही लोकं अशी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाची झाली आहेत....
तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही....
पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?.....

टारझन's picture

2 Oct 2008 - 11:36 pm | टारझन

छोटूली : शिळी बातमी ! ,मीपन ह्याच वाटेने येजा करते पन खरच सांगते मलापन खुप भिती वाटते विमानात मी तर झोपूनच जाते बाबा !
ड्यांबीश भौ :नाय हो, ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे!!!!इथे काही लोकं अशी आहेत ज्यांची मुलं आता लग्नाची झाली आहेत....
छोटुली बै .. तुम्हाला भिती वाटते , तुम्ही झोपा झोडता याचा आम्हाला काय फायदा , लेखकाने इथे मस्त लेख लिहून आमची माहीती वाढवली. असे प्रतिसाद टाकून काड्या करनं सोडा ....

डँबिशराव .....आहो तुम्हाला जुणी असली म्हणून काय झालं ? याचा अर्थ कुणी लिहूच नये की काय ? आम्ही २०-२५ वर्ष उशीता जलमलो आणि आजुन अमेरिकेला गेलो नाय ही काय आमची चुक आहे का ? .. घारे साहेब उत्तम नाही .. अतिउत्तम लिहीलं आहे.. फक्त एक खटकलं .. थोडक्यात आटोपलं ... मस्त ष्टाइल आहे .. आजुन लिवा ब्वॉ ...

तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही....पण हे जरा उशीरा आलं असं नाही वाट्त आपल्याला?.....
आहो काका .. हे म्हणजे थोबाडात मारून लागलं का रे बाळा ? अस विचारण्यासारखं झालं :)

असो .. उत्तम लेख. मला तरी मजा आली वाचताना .. फुडला भाग मोठा लिवा .. यापुर्वी त्याविषयी लिहिलं आहे की नाय याचा इचार न करता

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2008 - 12:00 am | पिवळा डांबिस

डँबिशराव .....आहो तुम्हाला जुणी असली म्हणून काय झालं ? याचा अर्थ कुणी लिहूच नये की काय ?
आम्ही कुठे असं म्हटलं? त्यांच्या अनुभवाबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये.
तुमच्या अनुभवाबद्दल अनादर दाखवण्याचा हेतू नाही.... हे तुम्ही वाचलं असतत तर लक्षात आलं असतं.
आम्ही फक्त हे थीम खूप जुनं आहे असं सांगितलं. त्या विधानाला चॅलेंज करायची तुमची तयारी आहे काय टारझनराव? उद्या मी "पुण्यात मिसळ कुठे मिळते" या विषयावर नवीन धागा सुरु केला तर लोक सांगतीलच ना, "की बाबा, हे जुनं झालंय!"?

आम्ही २०-२५ वर्ष उशीता जलमलो आणि आजुन अमेरिकेला गेलो नाय ही काय आमची चुक आहे का ? ..
आता तुमच्या काय-काय चुका आहेत ते आम्ही काय सांगणार? ते तुम्हालाच माहिती!!
पण माणूस कधी जलमला आणि अमेरिकेला गेला की नाही यात काही चूक वा बरोबर आहे असे मलातरी वाटत नाही.

आहो काका .. हे म्हणजे थोबाडात मारून लागलं का रे बाळा ? अस विचारण्यासारखं झालं
मला तरी मी असं काही केलंय असं वाटलं नाही. बिचार्‍या घारेसाहेबांच्या थोबाडीत मारायला मी कशाला जाऊ? त्यांची माझी तर साधी ओळखही नाही. टारझनराव, माणसाने तिरक्या नजरेनंच बघायचं असं ठरवलं तर गोष्टी वाकड्या दिसणारच! असो, अपना अपना नजरिया है!

टारझन's picture

3 Oct 2008 - 12:07 am | टारझन

काकाश्री, तुम्ही आदरनिय आहात आम्ही रहाल .. अवमान करण्याचा कुठचाही हेतु नाही ... पण ..
आम्ही फक्त हे थीम खूप जुनं आहे असं सांगितलं.
हो अगदी मान्य आहे , याला माझा विरोध नाहीच ना .. पण आमच्यासाठी नविनच आणि माझ्या मते प्रतिसादांवरून बर्‍याच जणांसाठी नविन, फक्त एवढंच की असा प्रतिसाद नविन माणसाला पुढे लिहायला प्रवृत्त करत नाही. न जाणो उद्या कोणी हा विचार करून लिहिणारच नाही की .. मी जे लिहीतोय ते कदाचित २०-२५ किंवा १००-२०० वर्षांपुर्वी तर लिहीलेलं नाही ?
त्याला चॅलेंज करायची तुमची तयारी आहे काय टारझनराव?
नाही हो काका, मी पामर काय चॅलेंज करणार तुम्हाला ?

उद्या मी "पुण्यात मिसळ कुठे मिळते" या विषयावर नवीन धागा सुरु केला तर लोक सांगतीलच ना, "की बाबा, हे जुनं झालंय!"?
काय राव तुम्ही बी ? पुण्यात माणूस सहज मिसळ खाउ शकतो ... किंवा त्याला त्याविषयी सहज माहिती मिळू शकते.. पण विमानं अमेरिकेला कोणत्या वाटेनं जातात, किंवा पहिल्यांदाच प्रवास करणारा कोणत्या मनस्थितीत असतो ही माहीती प्रांजळ शब्दांत तितकी सहज उपलब्द असेल असं नाही वाटतं.

माणसाने तिरक्या नजरेनंच बघायचं असं ठरवलं तर गोष्टी वाकड्या दिसणारच!
सहमत आहे ... मी प्रतिसाद वाकड्या नजरेनं पाहिला .. मी आपला क्षमाप्रार्थी आहे. कुठे शब्द कमी जास्त झाला असल्यास कृ माफी करावी

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2008 - 12:12 am | पिवळा डांबिस

तुमचे आमचे संबंध माफी मागण्याइतके औपचारिक (मराठीत फॉर्मल) नाहीत....
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा !!

टारझन's picture

3 Oct 2008 - 1:33 am | टारझन

एकदा बालगंधर्व नाट्यगृहासमोरून एक माणूस जात असतो .. गंमत म्हणून भविष्य पहावं म्हणतो .. आणि एकाला हात दाखवतो .. भविष्यकार त्याला सांगतो "बच्चा, तु तुझ्या घरातल्या बर्‍याच लोकांना खांदा देणार आहेस" .. माणूस भडकतो पैसे काही देतच नाही, थोडाच पुढे अजुन एक भविष्यवाला बसलेला असतो. माणूस त्याला हात दाखवतो ... भविष्यवाला म्हणतो " बच्चे , तु बहोत लंबा जियेंगा .. तेरी जिवनरेखा बहोत लंबी है " माणूस खुष होउन त्याला १०० रुपये देउन टाकतो .

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 9:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडाकाकांचं म्हणणं योग्य वाटतंय, २०-२५ वर्षांपूर्वीचं मला माहित नाही, पण गेल्या दहा वर्षांतलं तरी जरूर!

आणि पुन्हा विमानाचे रूट्स ठरवताना दोन मुद्दे विचारात घेतातः
१. जमीनीपासून फार लांब जायचं नाही.
२. नॉन-युक्लिडीयन भूमीतीप्रमाणे लार्ज सर्कल्स हा सगळ्यात छोटा रस्ता असतो.

नकाशात मुंबई आणि न्यूयॉर्कला जोडणारी सरळ रेषा काढली तर ती अरबस्तान आणि उतर आफ्रिकेतल्या सहाराच्या वाळवंटावरून जाते. त्यामुळे आपले विमानही कदाचित युरोपला बाजूला ठेऊन सरळ आफ्रिकेवेरून अमेरिकेला जाईल असे वाटले.

त्यामुळे मला नाही वाटत तुम्ही जो सगळ्यात छोटा रस्ता सांगितला आहे तो सगळ्यात छोटा असेलच.

अदिती

सर्किट's picture

2 Oct 2008 - 9:13 am | सर्किट (not verified)

युक्लिड किंवा त्याची बायको (नॉन युक्लिड) ह्यांविषयी मला माहिती नाही, पण जिथे सर्वात कमी इंधन लागते, तो सर्वात छोटा रस्ता !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 9:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या माझ्या प्रतिसादात सुधारणा:
लार्ज सर्कल नाही, ग्रेट सर्कल्स!

युक्लिड किंवा त्याची बायको (नॉन युक्लिड) ह्यांविषयी मला माहिती नाही, पण जिथे सर्वात कमी इंधन लागते, तो सर्वात छोटा रस्ता !
:-D
मलाही त्या दोघांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल माहिती नाही, पण ग्रेट सर्कल्सवरून गेलं तर सर्वात कमी इंधन लागेल. यात एक गृहितक आहे की पृथ्वीवर वातावरण नाही.

रामपुरी's picture

2 Oct 2008 - 9:55 am | रामपुरी

आणखी एक गृहितक...
पृथ्वी अगदी अचूक गोलाकार आहे.

अवांतरः
नवीन म्हण
मूळ मुद्द्यापेक्षा गृहितकेच जास्त

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 11:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पृथ्वी अगदी अचूक गोलाकार आहे.
त्याने काही फरक पडतो का? सॉलिड / नॉन युक्लीडीयन जॉमेट्री फक्त नियमित गोल वस्तूंसाठीच नाही, सगळ्याच त्रिमितीय वस्तूंसाठी असते.

अर्थात नियमित गोलापेक्षा थोडा फरक पडेल ग्रेट सर्कल्स आखताना. पण तो किती पडेल, म्हणजे युक्लिडीयन भूमितीशी तुलना केली तर नगण्यच असेल, पण असेल.

अदिती

रामपुरी's picture

2 Oct 2008 - 8:14 pm | रामपुरी

"फरक पडतो "हे आपणच सांगितले हे बरे झाले. सॉलिड / नॉन युक्लीडीयन जॉमेट्री जरी सगळ्याच त्रिमितीय वस्तूंसाठी असते (हे आजकाल जवळजवळ प्रत्येकालाच ठाऊक असते) तरी गोलाबद्दल बोलताना "नियमीत गोल" हे गृहितक मांडावेच लागेल असे वाटते.

नंदन's picture

2 Oct 2008 - 11:13 am | नंदन

अजून एक लक्षात घ्यायचा घटक म्हणजे पृथ्वीचे परिवलन. त्या इफेक्टचे नाव विसरलो, पण जर उत्तर गोलार्धात विमानाने सरळ रेषेत जायचा प्रयत्न जरी केला (आता घनाकृतीवर सरळ रेषा अस्तित्वात नसल्याने, वक्रतेचा परिणाम टाळण्यासाठी कमी अंतर पकडून चालू. उदा. मुंबई-अहमदाबाद), तरी ते नियोजित लक्ष्याच्या काही किमी उजवीकडे जाईल. दक्षिण गोलार्धात त्याच्या उलट.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Oct 2008 - 9:19 am | चन्द्रशेखर गोखले

लेख खूप छान आहे. पण खुपच थोडक्यात लिहिला गेला आहे. सविस्तर लिहिला तर एक चा॑गले प्रवास वर्णन होईल. अजुन लिहा.

छोटुली's picture

2 Oct 2008 - 9:40 am | छोटुली

काका,मीपन ह्याच वाटेने येजा करते पन खरच सांगते मलापन खुप भिती वाटते विमानात मी तर झोपूनच जाते बाबा !

पक्या's picture

2 Oct 2008 - 2:43 pm | पक्या

छान लेख लिहीलाय. आपल्याला तर आवडला बुवा.

>>एक नवी वाट पाहिल्याचा बोनस मिळाला.

२०-२५ वर्ष जुनी वाट , शिळी बातमी वगैरे वर काहिंनी म्हटले असले तरी तुम्ही पहिल्यांदाच अमेरिकेला येत असल्याने (बरोबर ना?) तुम्हाला हे सर्व नवंच वाटणार. तुमचा अनुभव तुम्ही छान मांडलात. येउ देत अजून.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2008 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते

मिष्टर घारे...

तुमचा लेख आवडला. तुम्ही लिहिलाय पण छान. आणि माहिती जुनी असली तरी तुमच्या करता तर ती नविन होती ना? झालं तर मग... ;) असेच लिहित जा.

बिपिन.

सहज's picture

2 Oct 2008 - 3:16 pm | सहज

घारेसाहेब, जे तुम्हाला वाटत ते लिहा बिन्धास्त. लेख आवडला.

सखाराम_गटणे™'s picture

2 Oct 2008 - 3:18 pm | सखाराम_गटणे™

सहमत

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

अवलिया's picture

2 Oct 2008 - 3:21 pm | अवलिया

सहमत

लिहित रहा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2008 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखते रहो !!! :)

तालिबान्याच्या तोफेचा गोळा तर तिथपर्यंत चुकून येणार नाही ना याची काळजी वाटली. पण रमजानच्या महिन्यात रात्रीचा इफ्तार खाऊन ते सारे गाढ झोपी गेलेले असणार!

हा हा हा हा मस्त !!! :)

एकलव्य's picture

2 Oct 2008 - 4:56 pm | एकलव्य

खरं सांगतो पण माझ्यासाठी ही नवीनच माहिती होती.

लिहित राहा! पिटुकले आणि सुटसुटीत लेख आम्हाला आवडतात.

(अडाणी) एकलव्य

अनिल हटेला's picture

2 Oct 2008 - 5:02 pm | अनिल हटेला

सहमत !!
+१

असेच म्हणतो !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ऋषिकेश's picture

2 Oct 2008 - 5:20 pm | ऋषिकेश

वा! अगदी थोडक्यात पण प्रांजळपणे मांडलेत..
मलाही विमान असे जाते हे माहित नव्हते.. जेव्हा मी पहिल्यांदा उडालो तेव्हा मलाही हा काहिसा अनपेक्षित मार्ग होता.
नंतर विचार केल्यावर .. काहि वाचल्यावर समजलं हा सर्वात जवळचा मार्ग कसा

बाकी, 'झेपावे उत्तरेकडे' ही शब्दरचना , झोपलेले तालीबानी वगैरे सह्ही ;)

लिहित रहा!! आम्ही वाचतो आहोतच !

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आनंद's picture

2 Oct 2008 - 5:41 pm | आनंद

लेख आवडला, तुमची शोधक नजरही.
जयंत नारळीकरांच्या आकाशाशी जडले नाते मध्ये ही असा उल्लेख आला होता की त्यानां
न्यूयॉर्कला जाताना की (येताना ते आठ्वत नाही)मावळलेला सुर्य परत उगवताना ( उलटा) दिसला होता.
बाकी नंदन यांच्या प्रतिसादा मधले पृथ्वीचे परिवलनाचे विमानाच्या मार्गावर होणर्या परिणामा बद्द्ल समजले नाही.(माझ्या समजुती प्रमाणे काही फरक पडला नाही पाहीजे).
---आनंद

नंदन's picture

2 Oct 2008 - 5:50 pm | नंदन

खरे तर हा स्यूडो फोर्स/भासमान बल आहे. माझी शब्दरचना जरा चुकली. अधिक स्पष्टीकरण या दुव्यावरील दुसर्‍या परिच्छेदात वाचता येईल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

2 Oct 2008 - 9:18 pm | प्राजु

तुम्ही लिहीत रहा घारे सर..
अजूनही येऊदे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

2 Oct 2008 - 10:58 pm | संदीप चित्रे

न्यू यॉर्कमधे मनापासून स्वागत :)
इस्ट कोस्टला (खरंतर 'इष्ट कोस्ट' ला) बरेच मिपाकर आहेत. काहीही मदत लागल्यास जरूर कळवा.
(मदत नको असली तरी ओळख होणं चांगलंच असतं की :) )

आनंद घारे's picture

3 Oct 2008 - 2:37 am | आनंद घारे

माझ्या अज्ञानावर झालेली चर्चा वाचून काकाजींच्या शब्दात 'मजा आला'. आपली धरती वाटोळी असल्यामुळे सपाट नकाशावर दिसणारी अंतरे प्रमाणबद्ध नसतात एवढे सामान्यज्ञान माझ्याकडे होते. माझ्याकडे ग्लोब नसल्याने दोन ठिकाणांमधले अंतर सुतळीने मोजण्याचा प्रयोग मी कधी केला नाही. तरीही मुंबई व न्यूयॉर्क या दोन शहरांमधले अंतर अक्षांशांच्या बाजूने मोजण्यापेक्षा रेखांशांच्या बाजूने मोजले तर कदाचित कमी भरेल असे उगाचच वाटत होते. नंदन यांनी सांगितलेला इफेक्ट विमानाच्या उड्डाणाला उपकारक आहे की अपकारक आहे ते अजूनही समजलेले नाही. कदाचित एका दिशेने तो मदत करीत असेल आणि उलट दिशेने जातांना विरोध. दोन ठिकाणांमधले कमीत कमी अंतर कसे मोजायचे याचे तन्त्र निदान शंभर वर्षांपूर्वी विकसित झाले असावे. माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरमार्गाने जाण्यात दोन तान्त्रिक अडचणी होत्या. अशा उड्डाणाला रशियाकडून अनुमति मिळणे आणि सलग सोळा सतरा तास उडण्यसाठी आवश्यक एवढा इंधनाचा साठा बरोबर नेता येणे. यांवर मात करून थेट उड्डाणे नेमकी कधी सुरू झाली ते मला समजले नाही.
बारा वर्षांपूर्वी एकदा मला कॅनडाला जाण्याची संधी मिळाली होती, तेंव्हा ऑफीसतर्फे माझे तिकीट लंडनमार्गेच निघाले होते आणि अकौंट्स डिपार्टमेन्टतर्फे माझा टीए क्लेम पास झाला. त्याअर्थी त्यांनासुध्दा सर्वात जवळच्या मार्गाची माहिती नसावी.
ज्या वाचकांनी प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचे आभार. मजकुराचा शिळेपणा ज्यांनी नजरेला आणून दिला त्यांचेही आभार.

ईश्वरी's picture

3 Oct 2008 - 6:34 am | ईश्वरी

छान आहे लेख ...आवडला. अजून अनुभव कथन येऊ देत.
ईश्वरी