कागदावर केलेले चित्र माऊंट कसे करावे, याचे प्रात्यक्षिक या लेखात बघा.
साहित्यः कागदावरील चित्र, माऊंट बोर्ड, स्टीलची पट्टी, मोजण्याचा टेप वा स्केल, पेन्सिल, माऊंट कटर, जाडा पांढरा कागद, कटिंग मॅट (किंवा साधा पुठ्ठा), सेलोटेप वा अन्य चिकट टेप.
कृती:
१. चित्र माऊट बोर्ड वर ठेऊन बघितले. बोर्ड एका बाजूने पांढरा, आणि दुसरी बाजू राखाडी असा आहे, यापैकी कोणताच रंग चित्राला उठाव देणारा वाटला नाही, त्यामुळे बोर्ड रंगवून घ्यायचे ठरवले. चित्राच्या चारी बाजूला दीड इंच जागा ठेऊन तेवढा बोर्ड कापून घेतला. (चित्र मोठे असेल तर अडीच वा जास्त इंच योग्य)
आधी लाल रंग लावून बघितला, पण तोही ठीक न वाटल्याने त्यावर रॉ सायना रंग चढवला, आणि बोर्ड वाळायला ठेवला.
.
२. पेन्सिलीने चौकोन आखून घेऊन माऊंट कटरने बोर्डात खिडकी कापून काढली. हे करताना माऊंट कटिंग मॅट वर ठेऊन कापला. (कटिंग मॅट नसल्यास साधा पुठ्ठा वा हार्ड बोर्ड ठेवता येईल)
.
३. चित्रावर खिडकी कापलेला बोर्ड ठेऊन बघितला. रंग वगैरे एकंदरित समाधानकारक वाटल्यावर चित्राएवढ्याच आकाराचा पांढरा जाड कागद कापून घेतला. आता मूळ चित्र, त्याच आकाराचा पांढरा कागद, आणि कापलेला माऊंट हे तयार आहे.
..
४. कापलेला माऊंट पालथा ठेऊन त्यावर चित्र नेमके कुठे ठेवायचे, याच्या खुणा पेन्सिलीने करून घेतल्या. (टेप लावताना चित्र सरकले, तर कळावे म्हणून). मग पालथा माऊंट, त्यावर पालथे चित्र, त्यावर पांढरा कागद असे नीट जुळवून ठेवले, आणि चारीकडे टेप लावला.
..
५. झाले चित्र माऊंट. आता ते असे दिसते आहे:
चित्रामागे जाडा पांढरा कागद लावल्याने चित्र मागून सुरक्षित रहाते ( हा कागद अॅसिड फ्री असेल, तर फार चांगले), चिकट टेप प्रत्यक्ष चित्रावर लावला जात नाही, शिवाय फ्रेम केल्यावर फ्रेमच्या मागचा हार्डबोर्ड प्रत्यक्ष चित्राच्या संपर्कात येत नाही. हे अतिशय आवश्यक आहे, कारण कालांतराने हार्डबोर्डमुळे चित्रावर डाग पडून ते खराब होते. खबरदारी म्हणून फ्रेमिंगचे वेळी आणखी एक जाडा पांढरा कागद मधे घालावा. कागदावर चित्र काढून झाल्यावर चित्र शक्यतो माऊंट करून ठेवावे.
हे चित्र मी जरा बदल म्हणून प्रयोगादाखल केले आहे, 'घोड्यांची चित्रे' असा लेख लिहिण्याचा विचार आहे. यात ग्रीक कलेपासून हुसेनचे घोडे वगैरे यावे, असा विचार आहे. मी आणखी घोड्यांची चित्रे केल्यास तीही येतील.
प्रतिक्रिया
13 Jan 2014 - 8:20 pm | मुक्त विहारि
'घोड्यांची चित्रे' असा लेख लिहिण्याचा विचार आहे. यात ग्रीक कलेपासून हुसेनचे घोडे वगैरे यावे, असा विचार आहे. मी आणखी घोड्यांची चित्रे केल्यास तीही येतील.
जरूर लिहा.
चित्रकलेतले काही समजत नाही, पण तुमच्याकडून चित्रांसंदर्भात समजावून घ्यायला नक्की आवडेल.
14 Jan 2014 - 7:15 pm | लॉरी टांगटूंगकर
+१००
जरुर लिहा. या विषयात फार एक्सपोजर मिळालेलं नाहीये अजून, समजावून घ्यायला नक्की आवडेल.
14 Jan 2014 - 8:04 pm | सूड
गणेशा झालाय माझा!!
14 Jan 2014 - 9:06 pm | बॅटमॅन
फोटो भारीच. घोड्यांबद्दलचा लेख वाचण्याची उत्सुकता वाढलीये.
14 Jan 2014 - 11:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
उपयुक्त माहिती. लवकरच घोडे दौडवावे ! :)
16 Jan 2014 - 10:06 am | चौकटराजा
मस्त वेगळाच धागा आहे. आता आपण घोडे हा विषय घेऊन चित्रे काढणार आहात वा ! मिपावर काही मॉडेल्स दिसली का ?
17 Jan 2014 - 10:48 am | इन्दुसुता
उपयुक्त माहिती.
प्रात्यक्षिक आवडले. "घोड्यांची चित्रे" च्या प्रतिक्षेत
18 Jan 2014 - 7:37 am | अनिता
त्वरा करावी...घोडे सत्वर तटास भीडवावेत ही विनन्ती....
18 Jan 2014 - 11:55 am | विवेकपटाईत
आवडले,मी ही घोड्यांची वाट पाहतोय.
20 Jan 2014 - 7:03 pm | बबन ताम्बे
माउन्ट बोर्ड कुठे मिळेल ? त्याचे मटेरियल कुठ्ले असते ? तसेच चित्राला पुढ्च्या बाजुस काय लावावे जेणे करुन ते खराब होनार नाही? पातळ काच किंवा फायबर ग्लास लावता येईल काय?
21 Jan 2014 - 8:21 am | चित्रगुप्त
हल्ली अनेक प्रकारचे, निरनिराळ्या रंगांचे उत्तम माऊंट बोर्ड चांगल्या आर्ट मटेरियलच्या दुकानात मिळतात. उत्तम दर्जाचा पुठ्ठा आत असतो, आणि वरून रंगीत कागद चिकटवलेला असतो. इथे दाखवल्याप्रमाणे चित्रे माऊंट करून प्लास्टिकच्या योग्य आकाराच्या थैलीत ठेऊन पत्र्याच्या पेटीत (झुरळ, उंदीर, इ. पासून वाचवण्यासाठी) आडवी सपाट ठेवावीत. किडे, कसर लागू नये म्हणून डांबराच्या गोळीची पुरचुंडी ठेवावी.
जी चित्रे भिंतीवर लावायची असतील, तेवढ्यांनाच फक्त बाजारातून काचेची फ्रेम करवून घ्यावी, त्यापूर्वी आणखी एक जाडा पांढरा कागद चित्रामागे घालावा. चित्र फ्रेम करून भिंतीवर लावले, की प्रकाशामुळे कागद हळूहळू पिवळा पडत जाऊन चित्र जुनाट दिसू लागते. पेटीत संग्रहित केलेली चित्रे त्यामानाने बरी राहतात. भिंतीत ओल नसावी, तसेच एकच चित्र दीर्घकाळ भिंतीवर लावून ठेवण्याऐवजी बदलून लावावीत.
आणखी खोलात जायचे, तर माऊंट करताना मागील टेप चारी बाजूने न लावता फक्त वरच्या बाजूलाच लावणे जास्त योग्य असते, कारण पावसाळ्यात, उन्हाळ्यात चित्राचा कागद कमिअधिक प्रसरण पावतो. फक्त वरच्या बाजूला टेप लावल्यास खालून कागद पसरला वा आकसला, तरी त्याला सळ वा फुगीरपणा न येता तो सरळ रहातो. चित्राच्या दर्शनी भागाला काच, प्लास्टिक हे टेकलेले नसावे. चित्रे लॅमिनेट चुकूनही करू नयेत. त्यातील रसायनामुळे कालांतराने खराब होतात. याच कारणाने डिग्री सर्टिफिकेट वगैरेही लॅमिनेट करू नयेत, वा पुठ्ठ्याला चिकटवून ठेऊ नयेत.
बासनात गुंडाळून ठेवलेली पोथ्यांमधील प्राचीन चित्रे शेकडो वर्षे जशीच्या तशी राहिलेली आहेत. मात्र अलिकडे ती भिंतींवर लावल्यावर पिवळी पडू लागलेली दिसतात. चांगल्या संग्रहालयांमधे म्हणूनच कागदावरील चित्रे मंद प्रकाशात लावलेली असतात.
21 Jan 2014 - 12:07 pm | बबन ताम्बे
धन्यवाद चित्रगुप्त उपयुक्त माहिती मिळाली .
22 Jan 2014 - 1:35 am | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
एकदा उजैनला एका प्रोफेसरांच्या घरी गेलो असताना दिसलेले चित्र....
त्यांच्याशी बोलताना असे जाणवले की ते फार टापटीप व व्यवस्थित नसावेत. सूर्य संहितेच्या पोथ्या विक्रम विश्व विदयालयात ठेवायला देऊन त्यांनी तुम्ही म्हणता तशा संहितेच्या...
असा दावा करत संहितेची अवाढव्य संख्येची पाने सांभाळायला विश्वविद्यालयाच्या पुस्तकालयाला कशी दिली आहेत. याचे कथन ऐकायला मिळाले.
नंतर त्यांच्या चंद्रमौळी घरातील आतल्या खोलीत प्रवेश केल्यावर माझी नजर तेथील एका मोठ्या फ्रेमवर पडली. वाचले तेंव्हा लक्षात आले की १९५६ मधे त्यांच्या पिताजींचा पद्मश्री उपाधीने सन्मान केला गेला होता. ते उपाधीपत्र त्या फेममधे जपून ठेवले होते.
पण त्याची इतकी दयनीय अवस्था होती की विचारू नका, आपण म्हणता तसे
याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत होते. पद्मश्री हा महत्वाचा शब्द, राष्ट्राध्यक्ष बाबू ड़ॉ. राजेंद्र प्रसाद यांची सही व शिक्का यांची दैना पाहावत नव्हती. भिंतीवरील ओल फ्रेमला खाऊन कुठल्याही क्षणी ती खाली आदळेल. अशा अवस्थेत होती.
आपल्या धाग्यातून कलाकृतीची, महत्वाच्या दस्तऐवजाची निगा कशी बाळगावी यावर कलापुर्ण सचित्र मार्गदर्शन वाचून ती भेट, दस्तऐवजाची हेळसांड आठवली...
22 Jan 2014 - 8:46 am | चित्रगुप्त
@शशिकांत ओकः
मी जे लिहिले आहे, त्याचा प्रत्यक्ष पुरावा तुम्हाला उजजैनला बघायला मिळाला म्हणायचा.
यात मी 'जागा बदलून लावावीत' असे म्हटले नसून मुळात एकच वस्तु भिंतीवर फ्रेममधे दीर्घकाळ लावू नये असे म्हटले आहे. काही काळ फ्रेममधे लावून नंतर पुन्हा फ्रेममधून काढून पेटीत सुरक्षित ठेवावे, म्हणजे खराब होणार नाही.
तसेच किमान वर्षातून एकदा तरी सर्व कागद बाहेर काढून त्यांना ऊन्ह आणि हवा लागेल, असे बघणेही महत्वाचे.
22 Jan 2014 - 9:34 am | शशिकांत ओक
खरे आहे. पण ज्यांच्या कडे फक्त एकच फ्रेम आहे त्यांना भिंतीवरील जागा बदलणे सोईचेे... नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या?
22 Jan 2014 - 11:29 am | चित्रगुप्त
एकच फ्रेम असेल, तर त्यातील चित्र बदलत रहावे, म्हणजे ती चित्रे कायमची खराब होणार नाहीत. मुख्य मुद्दा दीर्घकाळ उघड्यावर राहिल्याने कागद खराब होण्याचा आहे.(अगदी फ्रेमेत असला तरिही)
घरच्या घरी चित्रांना फ्रेम कसे करावे? असा धागा काढू का?
पूर्वी फ्रेमेच्या मागे खिळे ठोकून हार्ड्बोर्ड पक्का करत, ते खिळे गंजून गेल्यावर पुन्हा काढ-घाल करणे अशक्य असायचे. हल्ली क्लिपा लावलेल्या फ्रेमा मिळतात, त्यात सहजपणे चित्र बदलता येते.
25 Jan 2014 - 11:28 pm | शशिकांत ओक
अवश्य धागा काढा. आजकाल वापरा व फेकून द्या संस्कृतिमुळे फ्रेमवर्क तसेच ठेवून आतली चित्रे बदलायला कंटाळा करणारे अनेक. तरीही काही खटपटे असतील त्यांच्या साठी जरूर लिहावा धागा.
25 Jan 2014 - 10:53 pm | पैसा
छान प्रात्यक्षिक आणि बरीच उपयुक्त माहिती मिळाली. घोड्यांच्या चित्रांबद्दलचा लेख लवकर येऊ द्या!