[प्रस्तावना - या लेखाचा पहिला भाग येथे वाचता येईल. हा (थोडा रुक्ष) भाग, झाडांचा चेतनागुणोक्ती अलंकारात झालेल्या साहित्यातील उपयोगाविषयी आहे, आणि उदाहरणार्थ द.भा. धामणस्कर, रेगे, बोरकर यांच्या काही कविता उद्धृत केल्या आहेत.]
माणसाचं किंवा मानवी जीवनाचं रुपक म्हणून झाडांचा साहित्यात उपयोग कायमच होत आला आहे. पण याचं 'मूळ' काय? उत्क्रांतीच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर झाडालाही आपल्यासारखा जीव आहे, कदाचित भावनाही आहेत हे आपल्याला समजलं असावं? आदिमानवाला जेव्हा आपल्यासारख्याच वाढणार्या, खुरटणार्या, बहरणार्या आणि उन्मळून पडणार्या झाडाबद्दल प्रथम आत्मीयता वाटली, ही झाडं तर आपल्यासारखीच असं वाटून जिवाचे मैत्र जडले; तो क्षण 'मा निषाद'च्याच तोडीचा असावा. आणि कदाचित सुसंस्कृत होण्याचा पहिला टप्पाही.
ज्या गोष्टीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो, तिला आपल्या गोटात ओढण्याचा आपण जाणता-अजाणता प्रयत्न करत असतोच, त्यातलाच झाडांचे रूपक, हा एक भाग असावा असं मला वाटतं. (ममता हा शब्दच मुळात मम-ता म्हणजे माझेपणा यातून आला असावा. आत्मीयता, आपलेपणा यांचे शब्दशः अर्थही तसेच.) एखाद्या जिवलग मित्राला भावासारखा म्हणून अधिक आतल्या वर्तुळात आपण ओढत असतो, त्यातला प्रकार. तेव्हा झाडांवर होणारं हे मानवी भावभावनांचं 'रोपण' वृक्षवल्ली आम्हां सोयरी याच भावनेतून उगवलं असावं.
'जो खांडावया घाव घाली, की लावणी जयाने केली, दोघां एकची साऊली, वृक्षु जैसा' म्हणत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणारे आणि काव्य म्हणजे काय, विचारल्यावर जिच्याकडे बोट दाखवावं अशा 'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव' सारख्या ओळी लिहून गेलेले ज्ञानेश्वर; वृक्षवल्लींना सोयरी म्हणणारे तुकाराम आणि कांदा, मुळा, भाजीत विठाई पाहणारा सावतामाळी; पाण्यात पाय सोडून बसलेला बालकवींचा औंदुबर; नितळ न्याहारीला काळा वायू घेणारी मर्ढेकरांची झाडं; गीतरामायण लिहिताना झालेल्या उन्मनी अवस्थेचे वर्णन 'चंद्रभारल्या जिवाला नाही कशाचीच चाड; मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड' अशा शब्दांत करणारे गदिमा; 'प्रत्येक झाडामाडा त्याची त्याची रुपकळा, प्रत्येक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' म्हणत प्रत्येक माणसातलं वेगळेपण शोधणारे, पावसाळ्यात 'वेली ऋतुमती झाल्या गं' असं लिहून जाणारे बोरकर; तमाच्या तळाशी दिवे लागल्याचा अपूर्व अनुभव 'रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले; तिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनि फाकले' अशा शब्दांत मांडणारे शंकर रामाणी; निष्पर्ण तरुंच्या राईत 'झाडांत पुन्हा उगवाया'ची आस लागलेले ग्रेस; 'आणिक तुझिया लाख स्मृतींचे, खेळवीत पदरात काजवे; उभे राहुनी असे अधांतरी, तुजला ध्यावे, तुजला ध्यावे' अशी रक्तामध्ये ओढ मातीची लागलेल्या इंदिराबाई संत; युगानुयुगीच्या चिर-तंद्रीत कृष्णाची प्रतीक्षा करणार्या राधेला 'जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न' म्हणणारे पु. शि. रेगे; 'ग्रासली झाडे दिशांनी नग्नदेही, कोरड्या डोळ्यांत आता थेंब नाही' असं लिहून जाणारे महानोर; 'रांडेपेक्षा आहे रांड, मुलापेक्षां आहे मूल' असे रोखठोक वर्णन करणार्या विंदांचे 'उगाचफूल'; काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग लिहिणारे दासू वैद्य; 'नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे' म्हणणारा संदीप खरे; गद्यातले उदाहरण द्यायचे झाले तर अंतू बर्व्याच्या दारातला गेली चाळीस वर्षं न मोहरलेला हापूस, 'कोसला'मध्ये वेताळाच्या टेकडीवरचं झाड पाहून - 'खरं झाड म्हणजे जमिनीत असतं. वरचं झाड म्हणजे आतडी, फुफ्फुसं असं. माणसाचं जमिनीत काय आहे?' असे आणि तत्सम प्रश्न पडणारा पांडुरंग सांगवीकर किवा बर्ट्रांड रसेलला 'गर्भश्रीमंतीचे झाड' म्हणणार्या पद्मजा फाटक; चौकट राजातलं बोन्सायच्या झाडाचं उघड रुपक आणि जवळचा भाग असूनही गूढ, अज्ञात राहिलेल्या देवराईचं तरल प्रतीक; शाकुंतलातील 'आद्ये वः कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः' अशा शकुंतलेच्या वर्णनापासून ते रुदालीत गुलजारच्या 'तेरा छूंआ लागे, मेरी सूखी डाल हरियाए' पर्यंत अक्षरशः एक प्रबंध लिहिता येईल इतकी उदाहरणं सापडतील.
...
जन्माला, नवनिर्मितीला पालवीची उपमा अगदी प्राचीन आहे. आणि ह्या वाढणार्या अंकुराला पाहून, 'सोसंल का त्याला, ऊन वारा पानी' म्हणत धास्तावणारे जन्मदात्यांचे वात्सल्यही तितकेच सनातन. द. भि. धामणस्कर त्यांच्या 'बरेच काही उगवून आलेले' मधल्या 'केळीचे पान' या कवितेत म्हणतात तसे -
...तर हिरव्या पाना
अस्तित्वाच्या लांबलचक देठाभोवती मातीनं
सुरक्षित गुंडाळून ठेवलेलं तुझं
शैशव उलगडत जाताना मी
किती हळुवार, किती हळवा झालो होतो हे
तुला नीट सांगताही येणार नाही आता मला...
सुरुवातीच्या पहाटत्या हिरव्यात
अधिकाधिक हिरवेपण कसे भरत गेले याचा
क्षणाक्षणांचा हिशेब माझ्या डोळ्यांत...
आता ऐन नव्हाळीत एक सौंदर्यसंपन्न हिरवा
तुझ्यात काठोकाठ भरून आणि मी
बराचसा कृतार्थ तुझा
आत्यंतिक उत्कटतेचा दिवसही
पाहतो आहे म्हणून्; तसा खूपसा भयभीतही -
तथाकथित जगरहाटीनुसार तुझ्या विनाशाला आता
कधीही सुरुवात होईल म्हणून...
मला दिसते आहे, प्राणपणाने
जपावे असे काही तुझ्यात - तू
एक देखण्या पूर्णत्वाचं प्रतीक तुझ्या अखंडतेत;
या प्रदेशातून वाहणारे चंचल वारे मात्र
माझ्याशी सहमत नाहीत. भय वाटते ते
त्यांचेच...
स्त्री ही क्षणाची पत्नी, पण अनंतकाळची माता असते असं म्हणतात. तसंच पत्नीत 'गृहिणी सखी सचिवः' च्या जोडीला आईपण शोधणार्या पुरुषालाही पितृसुलभ वात्सल्याची भावनाही जाणवत असतेच. अशाच समजूतदार, प्रेमळ सख्याच्या रुपातली पु. शि. रेग्यांची 'शेवगा' ही छोटेखानी कविता.
दोन प्रहर. निवांत सारें.
श्रमभराने बाजेवरतीं
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुरलेला शेवगा दारचा.
'सा विद्या या विमुक्तये' सारखाच प्रगल्भ प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे हा आपल्या वात्सल्याचे बंधन न होऊ देण्याचा. अडनिड्या वयात उगाच रागावून अबोल होऊन बसणारी टीन-एजमधली मुलं काय किंवा वेगळ्या वाटा शोधायला घर सोडून निघालेलं तारुण्य काय; सोशिक अनाग्रही आईबाप धामणस्करांच्या 'परिपक्व' झाडांसारखेच -
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही...
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...
कशासाठी जगावं, हा प्रश्न कळतं झाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर पडत असावा. पण वृद्धत्वात आणि 'मिड-लाईफ'मध्ये कदाचित जरा जास्तच वेळा. बोरकरांची ही कविता, अनंत काणेकरांच्या त्या प्रसिद्ध लघुनिबंधातलं तत्त्वज्ञानच सांगते ('दोन मेणबत्त्या'मधील दुसर्यासाठी जगलास तर जगलास, स्वत:साठी जगलास तर मेलास); पण जरा बदलून. 'स्वतःला विसरून दुसर्यांसाठी जगा' पेक्षा 'स्वतःबरोबरच दुसर्यांनाही आनंद देत जगा' असे. गीतेतल्या वर मुळे, खाली फांद्या असलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक रंजक आहेच, पण आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता जितके जमतील तितके वेगवेगळे अनुभव घ्या, असं शेवटच्या ओळीत सांगणारे बोरकर या एका ओळीतूनच 'बाणा कवीचा' दाखवून जातात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात त्यातले इतर अन्वयार्थही स्पष्ट होत जातातच.
कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी
कुणासाठी तरी झुका, झुका जडून फुलांनी
कुणासाठी तरी, या रे गाढ भरून सुखांनी
कुणासाठी तरी, गा रे मुक्त सहस्र मुखांनी
पसरून पाळेमुळे, धरा धरित्रीचा तळ
पानोपानी खेळवा रे, तिच्या कुसव्याचे जळ
भुजाबाहूंनी कवळा, स्वैर धावणारे वारे
लक्ष हिरव्या डोळ्यांत, रात्री बिंबवा रे तारे
व्हा रे असे अलौकिक, लोकी येथल्या अश्वत्थ
कंप भोगा शाखापर्णी, मुळी राहून तटस्थ
उत्पत्ती, स्थितीबरोबरच लयाचा निर्देश करण्यासाठीही झाडांचं रूपक वापरलं जातं. छान पिकत जाणार्या वृद्धत्वाची तुलना अनाग्रही, समजूतदार झाडांशी होणे साहजिकच. वाढत्या वयात, कळत जाते तसे राग-रोष सरून एक अलिप्त एकटेपणा येतो. पाडगावकर म्हणतात तसा 'सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालण्याचा' समजूतदारपणा. 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार' चा शहाणा स्वीकार. अशा वेळी, बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर -
कळत जाते तसे, कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून, कसे तळ्यामधेच पेंगू लागतात
अशी अवस्था होते. बोलण्यात वारंवार पिकल्या पानांचे, वठलेल्या खोडाचे संदर्भ येतात. असं असलं तरी, मागे वळून पाहताना मनाच्या एका समाधानी अवस्थेत, आपलं आयुष्य अगदीच काही वाया गेलं नाही अशी कृतकृत्यतेची जाणीवही कधी दिलासा देऊन जाते. 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले, तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले' सारखी. द. भा. धामणस्करांची ही शेवटची कविता अशीच नम्र कृतार्थतेची भावना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करते -
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...
[समाप्त]
प्रतिक्रिया
26 Sep 2008 - 9:53 pm | यशोधरा
किती, किती सुंदर लिहिशील.... लिहिता रहा रे, अजून काय सांगू?
29 Sep 2008 - 4:32 pm | आनंदयात्री
अत्यंत सुंदर लेखन, प्रसन्न करणारे !!
26 Sep 2008 - 9:59 pm | ऋषिकेश
अहाहा! नितांतसुंदर आणि ओघवता भाग.. खूप खूप आवडला
मात्र मला पहिला भाग फार म्हणजे फारच जास्त आवडला (कदाचित दहिसरच्या उल्लेखामुळे व शाळेच्या चित्रामुळे असेल :) ).
पण हा भागही उ त्त म!!!! विषेशतः धामणस्करांची 'परिपक्व' कविता भन्नाट
- ऋषिकेश
26 Sep 2008 - 10:18 pm | प्राजु
अतिशय ओघवती भाषा आणि सुंदर वर्णन. लेखनात दिलेले झाडांच्याबद्दलचे कवितेतले, गीतातले, गद्यातले दाखले...
लेखनाला साज चढला आहे यांनी.
अभिनंदन.
विषेशतः धामणस्करांची 'परिपक्व' कविता भन्नाट
हेच म्हणते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Sep 2008 - 10:20 pm | अभिजीत
नंदन,
हे दोन्ही लेख प्रकाशित करून आमचे अनुभवविश्व समृद्ध केल्याबद्दल मनापासुन आभार.
तुम्ही इतकं भरभरून लिहिले आहे की वाचता वाचता मला असे वाटत राहिले की 'देणार्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' ..
पुन्हा एकदा फिरुन धन्यवाद...
26 Sep 2008 - 10:37 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो . उत्तम लेखाचा उत्तम उत्तरार्ध.
27 Sep 2008 - 8:29 am | मनिष
सहमत!!!
धामणकरांच्या कवितेसारखाच परिपक्व आणि सुरेख! अजून लिहा....
26 Sep 2008 - 11:26 pm | मुक्तसुनीत
शांता शेळक्यांच्या एका लेखाची आठवण आली हे वाचताना. त्यानी म्हण्टले होते ( विचार शांताबाईंचे, शब्द माझे) : "आमच्या घराच्या मागे पारिजातकाचे एक झाड होते. दरवर्षी त्याला बहर यायचा ; अगदी न चुकता. पूर्ण डवरून जायचे ते झाड. आजकाल लेखकाची बांधिलकी , त्याचे कर्तव्य या गोष्टीची बरीच चर्चा साहित्याच्या विमर्शात होते. या पारिजातकाचे पहा. कुणीही कसलाही उपदेश न करता हे झाड कसे नेमाने आपले बहरून येण्याचे काम चोख बजावत होते ! आपल्या कामाशी असणार्या बांधिलकीचे याहून सुंदर उदाहरण कुठे सापडणार !"
झाडांच्या या चर्चेत गीतेतील त्या सुप्रसिद्ध अश्वत्थाची आठवण आल्याशिवाय रहावत नाही : छंद हीच ज्याची पर्णे . ज्याची मुळे जमिनीवर असून फांद्या जमिनिखाली आहेत.
26 Sep 2008 - 11:43 pm | चतुरंग
उत्तमोत्तम साहित्याचे वाचन, मनन आणि चिंतन ह्या चक्रातून यशस्वी पार होऊन, त्यात अनुभवांचे सार मिसळून तृप्त झालेल्या तुझ्या मनातून हा लेख आपोआप भरुन वाहिलेला आहे, शब्दशः उतू गेलेला आहे! असे उतू जाणे वरचेवर घडो.
(तुझ्या लेखनात मला रवींद्र पिंग्यांच्या लेखनातली सहजता आणि अनुभवांचा व्यापक पट दिसला. जियो!!)
चतुरंग
27 Sep 2008 - 12:06 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
27 Sep 2008 - 12:08 am | ऋषिकेश
वा! काय बोललात रंगराव... अगदी सहमत आहे :)
(+१) ऋषिकेश
27 Sep 2008 - 12:34 am | पिवळा डांबिस
लेख अतिशय सुंदर उतरला आहे!
पुनःपुन्हा वाचत रहावे असे वाटणारा लेख!!!
जियो, नंदन!!!
-डांबिसकाका
(स्वगतः त्या दळवींच्या तात्या रेडकरासारखो (रेफः सारे प्रवासी घडीचे) हो पण एक तरूण तात्या रेडकर मिपावर इलेलो दिसतांसा!!! ह. घे.)
:)
27 Sep 2008 - 12:41 am | प्रियाली
वर इतके कौतुक झाले आहे की पुन्हा तेच शब्द लिहित नाही.
पण इतके समग्र संदर्भ कसे गोळा केलेस. ते कसे तुझ्यापुढे येत राहिले आणि आठवणीत राहिले त्याबद्दल अवश्य काहीतरी लिहि.
27 Sep 2008 - 3:10 am | धनंजय
बहुतेक संदर्भ मी वाचलेले नाहीत, पण त्यांच्या अवतरणातून नंदन यांनी काही प्रमाणात तरी त्यांचे सार माझ्यापर्यंत पोचवले.
ज्या कविता, कडवी उद्धृत केली आहेत - फारच नेमका आणि हळुवार परिणाम करतात.
27 Sep 2008 - 3:18 am | मृदुला
लेखमाला संपू नये असे वाटते आहे. आणखी भरपूर लिहावे.
प्रियालीशीही सहमत.
27 Sep 2008 - 8:16 am | विसोबा खेचर
नंदनसायबा,
आपण तर साला तुझा व्यासंग पाहून खलासच झालो!
'देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी..' या अभिजितच्या म्हणण्याशी आणि 'लेखमाला संपूच नये..' या मृदुलाच्या म्हणण्याशी पूर्ण सहमत...
अवांतर - शांता शेळकेंची विद्यार्थीनी आणि मराठीची शिक्षिका असलेल्या माझ्या म्हातारीला तुझ्या लेखाचा प्रथम भाग अतिशय आवडला होता. आज हा दुसराही भाग प्रकाशित झाल्याचे मी तिला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली,
"मला लवकरात लवकर या लेखाचाही प्रिन्ट आऊट काढून वाचायला दे. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून सर्वप्रथम तो लेख वाचला पाहिजे!"
आता लगेचंच या लेखाचा प्रिन्ट आऊट काढून तिला वाचायला देतो आहे. ती वाट पाहते आहे! :)
तात्या.
27 Sep 2008 - 8:30 am | सुनील
दोन्ही लेख वाचले. फार सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिले आहे! वाचनाचा व्यासंग तर ठायी ठायी जाणवतो.
कोंक्रिटच्या जंगलात राहाणार्यांसाठी तर असे लेख म्हणजे वार्याच्या सुखद लहरींसारखेच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Sep 2008 - 12:42 pm | घाटावरचे भट
नंदन साहेब, तुमचा लेख किती आवडला ह्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत...
तुम्ही अजून खूप लिहायला हवं, एवढीच अपेक्षा!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
27 Sep 2008 - 2:16 pm | मनीषा
इतके संदर्भ ...आणि त्याची गुंफणही तशीच देखणी.
असे लेख वाचताना असच म्हणावसं वाटतं .." --------शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं म्हणूनच 'वाचू आनंदे'...." (माधुरी पुरंदरें "वाचू आनंदे " )
27 Sep 2008 - 4:51 pm | स्वाती दिनेश
नंदन ,सुरेख लिहिलं आहेस रे.. अप्रतिम..,तुझं कौतुक कोणत्या शब्दांत करू?
स्वाती
29 Sep 2008 - 12:50 pm | नंदन
आपल्या सार्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. हे दोन भाग लिहिण्यापूर्वी त्यांचा फॉर्माट कसा असेल, याबद्दल डोक्यात काहीच पक्कं नव्हतं. सुदैवाने लिहिता लिहिता दोन वेगळे भाग तयार झाले.
झाडे पाहून आठवलेल्या कवितांबद्दल लिहायचे बराच वेळ डोक्यात होतेच, पण पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बोरकरांच्या काव्यवाचनाच्या सीडीज ऐकताना झाडांच्या चेतनागुणोक्ती अलंकाराबद्दल लिहायचं सुचलं. बरेचसे संदर्भ त्या सीडीमुळेच आठवणीत होते. कोंभाची लवलव... हा त्यातलाच. लेख लिहिताना मग ओघाने त्यावरून तुकाराम-सावतामाळी यांचे आठवले. दासू वैद्यांची कविता , रेग्यांची त्रिधा राधा आणि मर्ढेकरांच्या न्हालेल्या जणू... या कवितांवर मागे अनुदिनीवर लिहिले असल्याने, तेही डोक्यात होते. मराठी अनुदिनींवर सुरू असणार्या कवितांच्या खो-खो या खेळात रामाणींची कविता सापडली. गदिमांचे भारलेले झाड, अंतू बर्व्याचा हापूस, चौकट राजा, ग्रेसचे झाडांत पुन्हा उगवाया लिहितानाच सुचले. ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी वाचताना शकुंतलेचे वर्णन आणि अदिती/संहिता यांच्या मिपावरील एका प्रतिक्रियेत (रसेलवरील एका लेखाच्या) 'गर्भश्रीमंतीचे झाड'चा उल्लेख सापडला. इंदिरा संत, महानोर, विंदा, अनिल यांचे कवितासंग्रह वाचून त्यातले काही उल्लेख टिपून ठेवले होते, (तरी अनिलांची काठावरून वाकून सावळे रूप पाहणारी बाभळ राहिलीच.) ते हा लेख लिहिताना वापरले.
त्यामुळे प्रियाली यांच्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे झाले तर, दुसरा भाग हा पहिल्याइतका उत्स्फूर्त नाही. जवळची पुस्तकं धुंडाळून किंवा वाचताना काही सापडले, तर त्याची नोंद करून ठेवून, ते संदर्भ येथे वापरलेले आहेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Sep 2008 - 8:44 pm | लिखाळ
>>'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव <<
वहवा.
नंदन,
हा भाग सुद्धा अतिशय छान.
वरील सर्व प्रतिसादातून कौतूकाचे सर्व चपखल शब्द वापरुन झाले आहेत. त्या सर्वांना समहत असे लिहितो. चतुरंगांनी केलेले कौतूक तर फारच छान आहे.
-- (आनंदित) लिखाळ.
9 Oct 2008 - 1:32 am | केशवसुमार
नंदनशेठ,
आज बरेच दिवसांनी निवांत वेळ मिळाला..तात्याने दिलेल्या प्रतिसादात ह्या लेखाचा दुवा मिळाला.. वाचन खूण करूर ठेवावे असे लेख..दोन्ही लेख अतिशय सहज आणि ओघवते झाले आहेत अभिनंदन..
केशवसुमार
9 Oct 2008 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केवळ सुरेख !!! आपल्या साहित्यअभिरुचीची ही एक अप्रतिम ओळख.
9 Oct 2008 - 4:15 pm | श्रावण मोडक
ही संदर्भचौकट ध्यानी घेतली तर ही सुंदर लेखमाला इथेच थांबवली हेच छान. कारण विस्तारात पुढे भटकंती होण्याची भीती दाट आहे.
18 Jun 2010 - 1:49 pm | सहज
.
18 Jun 2010 - 7:32 pm | अक्षय पुर्णपात्रे
निव्वळ निखळ वाचनानंद.
30 Oct 2015 - 2:50 pm | मारवा
मिपा क्लासिक-४-ब