सत्याची झडती

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 1:39 pm

रस्त्यावरून जात होते. अचानक कानावर आरोळी आली.
‘कोणतेही पुस्तक , शंभर रुपये...’
पावलांना प्रतिक्षिप्तपणे ब्रेक लागला. वळून पहिले तर फुटपाथवर एकदोन इंच जाडीची बरीच पुस्तके मांडली होती. पायांनी लगबग केली. मांडलेल्या पुस्तकांवर नजर टाकली, तर दोन नजरेत भरली.
‘सत्याचे प्रयोग’ --- मो. क. गांधी.
‘झाडाझडती’ --- विश्वास पाटील.
पण घ्यायचे धाडस होईना.
राजकारण आणि भजन या दोन प्रकरणांपासून मी चार हात लांबच राहते. श्रीयुत मो. क. गांधी या दोन विषयांबद्दलच जादातर प्रसिद्ध ! आणि ‘पानिपत’ वाचून आलेली उद्विग्नता अजुनी आठवणीत आहे. त्यामुळे ही दोन पुस्तके हातात घेताना मन साशंक.
वाचनाच्या वेडाने सगळ्या शंकांवर मात केली अन दोन्ही पुस्तके घेऊन आले. पाच-सात दिवसात फडशा पाडला.
‘सत्याचे प्रयोग’ वाचायला घेताना, आधी अपेक्षित असलेली नीरसता तर कुठेच जाणवली नाही. उलट एकोणिसाव्या शतकातले जनजीवन, समाज धारणा अन नैतिक समजुती वाचून बरेच मनोरंजन झाले. साहित्यिक मूल्य असे फारसे नसूनही लेखनात ओळीओळींमधून जाणवणारी प्रांजळता, निरपेक्षता अन निरलस दृष्टीकोन यामुळे ही आत्मकथा मनाला भिडली.
सर्वसामान्यच आयुष्य एका वेगळ्या कोनातून वळण घेऊन असामान्यत्व कसे धरण करत गेले, याचा अलौकिक प्रवास समक्ष उभा राहिला. गांधीजी इंग्लंडला जाईपर्यंतचा भाग साधारण सामान्य वळणानेच जातो. त्यांनतरच्या भागात, एका महात्म्याच्या निर्मितीची बीजे दिसून येतात. मोहनदासाने जणू शरीर अन मनाची परिक्षा घेऊन पाहायचे आरंभले. –एखादे रबर ताणून ताणून कुठपर्यंत ताणते, हे पाहावे, तसे. इंग्लंडच्या उच्चभ्रू समाजाचा जीवनविषयक दृष्टीकोन आणि भारतातील दारिद्र्यातल्या नैतिक संकल्पनांमधून थेट तथ्य अन सत्य यांचा शोध घेणे आरंभले. मिळालेले सत्य अनुभवांच्या निकषांवर पुन्हा पुन्हा घासून पाहिले. अन मग मोहनदासाला त्या सत्याचा छंदच जडला.
इंग्लंडमधून भारतात आल्यावर अन तिथून व्यवसायातील अपयशामुळे आफ्रिकेत गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिकाधिक धार येत गेली हे आफ्रिकेतील एकापेक्षा एक खडतर कसोटीचे प्रसंग वाचून ध्यानात येते. सत्य अन न्याय यांच्यासाठी दिलेला चिवट लढा, आफ्रिकेतील प्लेग, रेल्वेतील अपमान, डरबनमधील मारहाण, फिनिक्स मधील आश्रम स्थापना इ. भाग वाचताना जाणवणारी चित्तथरारकता, एखाद्या साहसकथेपेक्षा कमी नाही.
यानंतरच्या भागात या महात्म्याची सेवावृत्ती , मानवजातीची कणव , दीनदुर्बलांच्या दयनीय परिस्थितीबद्दल कळकळ, अन या सर्वांसाठी स्वत्व लुटून दिलेले योगदान पाहून मन केवळ थक्क झाले. इंग्रजी सत्तेबद्दल त्यांच्या मनात निष्ठा होती, हे जाणवले तरी, अन्यायी परकीय राजसत्तेकडूनही, दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मबळाच्या जोरावर न्याय ‘दोहून’ घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. आजच्या पिढीला हा इतिहास, जसा घडला तसा माहिती असण्याची खूप आवश्यकता आहे, असे वाटले.
यापेक्षा ‘झाडाझडती ‘ खूप वेगळे. साहित्यिक मूल्य उच्च. ‘सत्याचे प्रयोग ‘ एका खंबीर मानसिकतेचे प्रतिबिंब, तर ‘झाडाझडती’ दुर्बलांच्या वास्तविकतेचे प्रच्छन्न दर्शन ! धरणग्रस्तांचे धरणाआधीचे शांत, संथ अन नंतरचे उध्वस्त भावजीवन, स्वकीय सत्ताधाऱ्यांकडून झालेली वंचना अन पदोपदी परमेश्वर आठवावा असे कष्टमय जीवन यांचे विदारक चित्रण म्हणजे ‘झाडाझडती’. झाडा म्हणजे शोध. झडती - पूर्वजन्मीच्या पापांची कबुली. धरणग्रस्तांची आयुष्ये म्हणजे जणू पूर्वकर्मांचे भोगणे. जन्माची झडती.
जांभळी अन त्यासारख्या इतर लहान लहान वस्त्या एका संथ, स्थिर जीवनातून ओढून काढून उघड्यावर फेकल्या गेल्या, त्याचा वृत्तांत. सरकारी सुविधांचा लाभ झारीतल्या शुक्राचार्यांना संतुष्ट करणाऱ्यांनाच. इतर सर्वसामान्यांची होरपळ, पुनर्वसनाच्या नावाखाली मांडलेली अघोरी थट्टा, सरकारी नियमांच्या कात्रीत सापडून झालेली ससेहोलपट यांचे भीषण वास्तविकता दाखवणारे सार्थ चित्रण.
सरकारी सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी धडपडणारा, धरणग्रतांपैकीच एक खैरमोडे गुरुजी. त्याचे सरकारी शुक्राचार्यांनी काढलेले वाभाडे. वस्तीतल्या एकट्या-दुकट्या आयाबायांच्या जमिनी लाटण्याचा धनदांडग्या प्रस्थापित अन स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खैरमोडे गुरुजींनी केलेलं जिवाचे माळरान.
सरकारी यंत्रणा न्याययंत्रणेसारखीच अजुनी आंधळी आहे हे भीषण सत्य धरणग्रस्तांच्या निमित्ताने समोर आले.
तुलना होत नाही, पण दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर काही मुद्दे मनाला स्पर्शून गेले.
परकीय अन्यायी सत्तेशी स्वकीयांच्या हक्क अन सन्मानासाठी झुंजणारे गाधी...
स्वकीय सत्तेकडे न्याय्य हक्क अन जीवनदानासाठी झगडणारे खैरमोडे गुरुजी....
परसत्तेने स्वकीयांवर केलेल्या अमानुष अत्याचाराने कळवळलेला महात्मा...
स्वकीयांनीच सत्तेच्या आधारे तोडलेले धरणग्रस्तांचे लचके पाहून हताश अन अगतिक झालेले खैरमोडे गुरुजी....
परकीय सत्तेचा कायदा मानवतावादी बनवण्यासाठी गांधींचा लढा....
स्वसत्तेच्या कायद्यातल्या पळवाटांच्या अमानुषतेने मोडून गेलेले खैरमोडे गुरुजी...
आणि मनात आलं,
या धरणग्रस्तांना अन आजच्या ‘स्वकीय’ सत्तेला एक ‘गांधी’ पुरला असता का ?

वाङ्मयप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 2:09 pm | मुक्त विहारि

आवडली..

अर्धवटराव's picture

11 Dec 2013 - 2:00 am | अर्धवटराव

>>या धरणग्रस्तांना अन आजच्या ‘स्वकीय’ सत्तेला एक ‘गांधी’ पुरला असता का ?
नाहि. म्हणुनच गांधी अधुन मधुन डोकं वर काढत राहातो. भलेही ते अल्पायुषी का असेना.

यशोधरा's picture

11 Dec 2013 - 2:17 am | यशोधरा

या धरणग्रस्तांना अन आजच्या ‘स्वकीय’ सत्तेला एक ‘गांधी’ पुरला असता का ? > नाही. हा अनेकपदरी अविरत लढा आहे दुर्दैवाने.

छान लिहिलं आहे असं तरी कसं म्हणू? चपखल लिहिलं आहेस, असं म्हणते.

संवेदनशील मनाने केलेले लेखन आवडले.

'सत्याचे प्रयोग' - पूर्वग्रह काही काळ बाजूला ठेवले की गांधीजींचे काही विचार महत्त्वाचे असल्याचं लक्षात येतं. मला ते करायला बरेच पावसाळे जावे लागलेत.

" झाडाझडती" - अत्यंत अस्वस्थ करणारं चित्रण आहे - प्रत्यक्षात ती परिस्थिती पाहिल्यामुळे अजूनच.

यातलं एक पुस्तक म्हणजे अस्वस्थता - दोन्ही सोबत म्हणजे तर विचारायलाच नको!
चांगली टिपली आहेत निरीक्षणं आणि मनाची स्पंदनं.

प्रचेतस's picture

11 Dec 2013 - 9:40 am | प्रचेतस

मुक्तक आवडले.

निमिष ध.'s picture

11 Dec 2013 - 10:56 am | निमिष ध.

बर्याच दिवसान्पासून सत्याचे प्रयोग वाचायचे मनात होते. परिक्शणामुळे अता नक्की वाचेन. धन्यु

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Dec 2013 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

सत्याचे प्रयोग खरोखरच वेगळे पुस्तक आहे. महात्मा गांधीं बद्दल अनेक नव्या गोष्टी यात कळतात / समजतात.गांधीजींनी अत्यंत प्रामाणीकपणे हे पुस्तक लिहिले आहे याचा प्रत्यय प्रत्येक प्रकरणात येतो. एकदाच वाचुन कपाटात ठेउन देण्यासारखे तर हे पुस्तक नक्कीच नाही.

महात्मा गांधीं बद्दलची माझी मत या पुस्तकाच्या वाचनानंतर बरीच बदलली.

पण हे पुस्तक तुम्हाला असत्याच्या मार्गाने विकले गेले बहुतेक. कारण मराठी पुस्तकाची छापिल किंम्मत रुपये ५० इतकी आहे आणि इंग्रजी पुस्तकाची रुपये ४० *smile*

बाकी पुस्तके (किमान मराठी पुस्तके तरी) रस्त्यावरुन विकत घेउ नये. पायरेटेड असण्याची शक्यता जास्त असते. आधिच मराठी पुस्तकांच्या विक्रीची बोंबाबोंब असते. आपण त्याला हातभार लावु नये. अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.

झाडाझडती मात्र नक्कीच वाचण्यात येईल.