अन्याच्या बापाची पार्टी !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
29 Oct 2013 - 6:09 pm

आत्ताच मितान ह्यांचा हा धागा वाचला आणि अस्वस्थ झालो. साहजिकच मुलाचा विचार करायला लागलो आणि ४ महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला......

हुश्श... बर्‍याच दिवसांनी एका कार्यक्रमाचं निवेदन करून नुकताच घरी निघालोय..... शेवटचा कार्यक्रम केला होता २००४ साली... म्हणजे ९ वर्षं झाली की.... गुड मॅन....... चांगला झाला...... असं ७० - ८० प्रेक्षकांसमोर बोलणं नेहेमीच आवडतं. कलाकाराला प्रोत्साहन मिळण्याइतक्या टाळ्याही मिळतात आणि एक निवेदक म्हणून प्रेक्षकांशी संवाद पण साधता येतो. एखाद्या वाक्याला किंवा सांगितलेल्या चुटक्यांना टाळ्यांपेक्षाही प्रेक्षकाच्या नुसत्या हुंकाराची जी पावती मिळते ना...त्यातच खरी मजा! आणि आज तर पूर्णपणे नवीन गाण्यांचा कार्यक्रम. नेहेमीचे बाबूजी, लताबाई, खळेकाकांचे किस्से नाहीत, प्रेक्षकांना आधीच माहिती असलेल्या चाली नाहीत, ओळखीच्या कविता नाहीत. माझा तर असा पहिलाच अनुभव.... पण प्रत्येक गाण्याचा बिल्ड-अप मस्त जमून आला आज......लोकांना शुन्यापासून त्या गाण्यापर्यंत घेऊन जायला जमलं गड्या.... आणि मिथिलेशनी पण अहिर भैरवचा काय समा बांधलाय... वन्स मोर द्यायला पण ५ सेकंद लागली लोकांना! शेवटी सायलीनी तर कळस चढवला.....असे कार्यक्रम झाले पाहिजेत अजून....निदान पंधरवड्या - महिन्यातून एकदा करायला मिळाले पाहिजेत...... झकास......छान वाटतंय......टार्गेट्स, टेंडर्स, प्रोजेक्ट प्लॅनिंग, रिसोर्स अ‍ॅलोकेशन वगैरे रगाड्यातून काहीतरी वेगळं करायला तरी मिळालं!

विचारांच्या तंद्रीत घरी पोचलोय...... घरी कोणीच कसं नाही? अन्या तर आज खुश असणार सलील कुलकर्णीना भेटायला मिळालं म्हंणून. (अन्या = अनीश - आमचे चिरंजीव, वय वर्ष ७. महा इब्लिस कार्टं. कुठे, कधी अन काय बोलून आपली विकेट काढेल भरवसा नाही).... पण गेला कुठे घोडा? मी हात-पाय धुवून बाहेर येतोय तोच डोअर-बेल वाजते. २-३-४-५ वेळा. अन्याच हा. मी बाहेर येईपर्यंत बायकोनी दार उधडलं आहे आणि आमचा कार्टा वारं प्यायल्यागत धावत येऊन माझ्या अंगावर उडी घेतोय.

"बाsssssssssबा" अशी आरोळी मारली जाते! पोरगं बिलगून म्हणतं "बाबा काय भारी बोललास तू. मला खूप खूप आवडलं तुझं 'भाषण'! तिकडच्या लोकांनापण आवडलं खूप.... ते टाळ्या वाजवत होते." त्याच्या मागे बायको आमचा हा पिता-पुत्र प्रेमाचा सोहळा गालातल्या गालात हसत बघतिये.

"थॅssssक्यू सायबा - आवडलं तुला?"

"खूप आवडलं."

"अरे पण आत्ता तुम्ही कुठे गेला होतात?"

"बाबा.... तू इतका भारी बोललास ना... म्हणून आज तुला माझ्याकडून पार्टी! आई आणि मी जाऊन मस्तानी घेऊन आलोय. आजी - आबा, काका - काकू पण येतायत."

"अरे वा! तुझ्याकडून पार्टी?"

बायको मला सांगते की घरी आल्या आल्या अन्यानी त्याची पिगी बेंक उपडी केली आणि म्हणाला "आज मी बाबाच्या कार्यक्रमाची पार्टी देणार". त्यानी सगळ्यांना फोन केले अन बोलवून घेतलं त्याच्या बाबाच्या पार्टीला. आई - बाबांना पण कार्यक्रम आवडलाय.... पण पोराच्या चेहर्‍यावरून मात्र बापाचं कौतुक ओसंडून वाहतंय.

पोरगा माझ्या मांडीवर बसूनच मस्तानी खातोय.... घरचे सगळे गप्पा मारतायत... आता त्यांच कार्यक्रामचं कौतुक अर्थातच ओसरलंय.....त्यांचे विषय वेगळेच आहेत... पण अन्या मात्र मला सांगतोय....."बाबा... त्या 'काय झाले' गाण्याला ना मला रडू येत होतं....आणि तू ती कविता पण भारी म्हटलीस.... कुठली रे??.... पुण्यनगरी???.. पुण्यनगरी म्हणजे काय रे?.... आणि तो काका ड्रम्स कसला भारी वाजवत होता ना.........आणि ना...."

मला बाकीचे चेहरे अंधुकसे दिसतायत...... अन्या बोलतोच आहे.......मला मस्तानी भरवतोय.... मी मस्तानी बरोबरच एक आवंढा गिळतो.....माझा आनंद माझ्या गालांवरून ओघळतो.

मौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

29 Oct 2013 - 6:18 pm | विजुभाऊ

सुंदर..
हा अनुभव मी घेतला आहे.
एका कार्यक्रमाचे निवेदन करून रात्री अडीच वाजता घरी आलो. माझी कन्या त्या कार्यक्रमावर एकदम खुश होती.

किसन शिंदे's picture

29 Oct 2013 - 6:25 pm | किसन शिंदे

नशिबवान आहात! :-)

त्रिवेणी's picture

29 Oct 2013 - 6:27 pm | त्रिवेणी

नशिबवान आहात.+++1111

पैसा's picture

29 Oct 2013 - 6:31 pm | पैसा

फारच छान!

प्यारे१'s picture

29 Oct 2013 - 6:36 pm | प्यारे१

मस्तच!
छान अनुभव.

अनिरुद्ध प's picture

29 Oct 2013 - 6:42 pm | अनिरुद्ध प

छान अनुभव.

मुक्त विहारि's picture

29 Oct 2013 - 8:37 pm | मुक्त विहारि

छान लिहीले आहे.

नि:शब्द !! खरंच नशीबवान आहात.

यशोधरा's picture

29 Oct 2013 - 9:10 pm | यशोधरा

किती मस्त! :)

आतिवास's picture

29 Oct 2013 - 9:26 pm | आतिवास

वा! मस्त वाटलं वाचताना!!
नेमक्या व्यक्त झाल्या आहेत भावना.

बहुगुणी's picture

29 Oct 2013 - 9:31 pm | बहुगुणी

एकदा मिपाकरांसाठी कार्यक्रम करा, माझ्याकडून अनीशला आणि त्याच्या आई-बाबांना खास पार्टी लागू :-)

जे.पी.मॉर्गन's picture

31 Oct 2013 - 12:41 pm | जे.पी.मॉर्गन

एकदा मिपाकरांचा आणि मिपाकरांसाठी कार्यक्रम व्हायला हरकत नाही! जरा मोठा "सांस्कृतिक कट्टा"! काय म्हणता?

जे पी

बहुगुणी's picture

2 Nov 2013 - 3:14 am | बहुगुणी

करा प्लॅनिंगला सुरूवात.

चतुरंग's picture

29 Oct 2013 - 10:42 pm | चतुरंग

मुलाकडून उत्स्फूर्त कौतुक आणि पार्टी म्हणजे लाख मोलाचं बक्षीस. तुमचं सर्वांचंच अभिनंदन! :)
(आणि तुम्ही निवेद्क आहात हे पहिल्यांदाच समजतंय.)

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2013 - 11:03 pm | संजय क्षीरसागर

जिओ!

उपास's picture

29 Oct 2013 - 11:11 pm | उपास

आपला बाबा भारी आहे म्हणजे काय हे एक मुलगा म्हणून आणि बाबा म्हणून दोन्ही बाजूंनी अनुभवलय.. ह्याच साठी केला सारा हट्टाहास, असं भरुन पावल्याशिवाय राहात नाही, जिओ जेपी इथे शेअर केल्याबद्दल थँक्स!

लौंगी मिरची's picture

29 Oct 2013 - 11:35 pm | लौंगी मिरची

माझ्या लेकालाहि त्याच्या बापाचं भारी कौतुक असतं .
तुमचा अनुभव एकदम भारी वाटला वाचुन .

कवितानागेश's picture

30 Oct 2013 - 12:18 am | कवितानागेश

फारच गोड अनुभव. अतिशय नशीबवान आहात. :)

खरच! बाहेरच्यांपेक्षा अस घरात निरागस, कोणताही हेतू न बाळगता केलेल निखालस कौतुक कधीही सरस ठरत.
खरच नशिबवान आहात.

जे.पी.मॉर्गन's picture

30 Oct 2013 - 9:00 am | जे.पी.मॉर्गन

प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार! मी नशीबवान खराच. पण मितान ह्यांचा तो धागा वाचून खरंच खूप वाईट वाटलं हो. आई बापांना मुलांशी संवाद साधण्याइतकाही वेळ मिळू नये? किती मोठ्या आनंदाला ही लोकं मुकतात.

अनीशचाच अजून एक प्रसंग सांगतो -

अनीशः बाबा मला बर्थडेला आयपॅड हवा
मी: आयपॅड? एकदम आयपॅड का?
अनीशः अरे वेदांग, ऋजुता, अथर्व, ईशान सगळ्यांकडे आहे. मला पण टेम्पल रन, एनएफएस, सबवे सर्फर्स खेळायचंय.
मी: मी तुला एक विचारू?
अनीशः हा विचार.
मी: वेदांग, ईशान, अथर्व, ऋजुता, श्रावणी ह्यांच्यापैकी किती लोकांकडे तबला आहे?
अनीशः कोणाकडेच नाही.
मी: त्यांच्यापैकी किती जणं तबला वाजवतात?
अनीशः कुणीच नाही.
मी: बघ. विचार कर हं. तुझे सगळेच मित्र गेम्स खेळतात. पण तबला तूच एकटा वाजवतोस. मग जास्त भारी काय? आयपॅड की तबला?
अनीशः (हसून) तबला!
मी: मग? आपण आयपॅड आणायचा की तबला?
अनीशः तबला!.
मी: मग कुठे जायचं? खेळियामध्ये की शेखकडे?
अनीशः शेखकडे!!! मला ढाल्या हवाय. मग मी तो आडवा ठेऊन पखवाजसारखा वाजवणार.... धिं ना धिं धि नक - धिंना तिन ति नक....!

किसन शिंदे's picture

30 Oct 2013 - 9:57 am | किसन शिंदे

लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार देऊ तशी घडतील हे तंतोतंत पटलं या प्रसंगाकडे पाहून. आयपॅडच्या ऐवजी तबल्याची आवड लावण्याची आयडीया लय भारी!!

मित्राचा मुलगा आहे एक, ६ वर्षांचा. त्यांच्या घरी केव्हाही गेलो की, मोबाईल अथवा पीसीवर गेम खेळत बसलेला दिसतो. मित्राला त्याच्या सवयीविषयी एक दोनदा बोलूनही दाखवलं पण तो काहीतरी थातूरमातूर कारणं सांगून या गोष्टीकडे सरळपणे डोळेझाक करतो.

जसा आकार देऊ तशी घडतील हे अगदी खरं आहे, आणि जेपींनी त्यांच्या तबल्याच्या सुंदर उदाहरणातून अतिशय सहजपणे ते दाखवून दिलं आहे. What is more important is: या अतिशय impressionable वयात, भली-बुरी दोन्ही options सांगून, शेवटी निर्णय मुलालाच घ्यायला लावून decision-making चा महत्वाचा आधिकार देणं हे फारच सहज रीत्या मांडलंय, ते खास भावलं.

कपिलमुनी's picture

31 Oct 2013 - 1:08 pm | कपिलमुनी

मुलांना गेम- टीव्ही लावून दिला की त्यांची कट कट नसते ...ते गपचुप्प खेळत बसतात ..
असा पोरकट युक्तीवाद बरेच जण करतात ..
आइ ला स्वैपाक करायचा असेल तर ती टीव्ही लावून देते ..ह्याचे प्रमाण वाढले की त्याचे व्यसन लागते आणि त्या मध्लया गोष्टींचा वाईट परीणाम होतो ..
.
.
.
पण विभक्त कुटुंबामधल्या गृहिणीसमोर दुसरा पर्याय सहज अ‍ॅव्हेलेबल नसतो ..

सार्थबोध's picture

30 Oct 2013 - 10:25 am | सार्थबोध

बे-श-ट एकदम बेष्ट

तुषार काळभोर's picture

30 Oct 2013 - 10:52 am | तुषार काळभोर

तिकडे मुलांचे जे अनुभव सांगितले आहेत, त्याची आणि या अनुभवाची तुलना केली, तर मुलांचा आई-बाप (आणि इतरः नातेवाईक, समाज इ.) यांच्याशी असलेला(आणि नसलेला) संवाद किती फरक घडवू शकतो, हे लक्षात येते.
आई-बापाने मुलांना घडवण्या आधी "आई-बाप" घडले पाहिजेत. आणि जेपींसारख्या अनुभवी बापांकडून "पालक" म्हणून घडण्याविषयी बरंच काही शिकता येतं.
हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, जेपी.

जे.पी.मॉर्गन's picture

31 Oct 2013 - 12:53 pm | जे.पी.मॉर्गन

खरंय पैलवान.

जेव्हा पोराच्या मित्र मैत्रिणींचे पालक बघतो तेव्हा मला वाटतं की मुळात आई वडीलांचेच स्वतःबद्दल भयानक गैरसमज असतात. आपल्याला सहा आकडी पगार मिळतो ह्याची धुंदी चढलेली असते. आपलं अपत्य हे राजकन्या / राजकुमार असल्यागत ते तिला / त्याला "सर्व सुख-सोयी" देतात आणि आपला सहवास न देता येण्याचं पापक्षालन करतात.

आमचे चिरंजीव पण अधून मधून बॉम्ब टाकत असतातच. आपली "गर्लफ्रेन्ड" असल्याचं सांगून झालंय... आमच्या लग्नाला त्याला बोलावलं नाही म्हणून भडकून झालंय.... XX मावशीला उलटी होऊन तिच्या पोटातून बाळ बाहेर आलं का विचारून झालंय. ह्यातून एकच गोष्ट शिकलोय की पोरांचा सगळ्यांत जास्त विश्वास आणि कॉन्फिडन्स आई-बापावर असतो आणि काही केल्या तो मोडता कामा नये. बाकी आमचंही पालकत्त्वाचं शिक्षण चालू आहेच! :)

जे.पी.

garava's picture

30 Oct 2013 - 11:16 am | garava

मस्तच अनुभव.

पिलीयन रायडर's picture

30 Oct 2013 - 11:51 am | पिलीयन रायडर

खुपच सुंदर..!!

अमेय६३७७'s picture

30 Oct 2013 - 1:47 pm | अमेय६३७७

सुंदर अनुभव

मितान's picture

30 Oct 2013 - 2:04 pm | मितान

सुंदर अनुभव !

तुमचा तुमच्या लेकासोबतचा संवाद असाच झुळझुळता राहो !!! :)

मोदक's picture

30 Oct 2013 - 2:05 pm | मोदक

एकदम मस्त!!!!

दिपक.कुवेत's picture

30 Oct 2013 - 2:32 pm | दिपक.कुवेत

पोरगं "बाsssssssssबा" अशी आरोळी जेव्हा मारतो तेव्हा मला वाटतं त्यातचं आपण सगळं भरुन पावतो. त्या एका हाकेतच आपल्याबद्दलचा जीव्हाळा, प्रेम, आपुलकि सर्व काहि सामावलेलं असतं.

चिगो's picture

30 Oct 2013 - 11:35 pm | चिगो

सुंदर अनुभव..

सुहास झेले's picture

30 Oct 2013 - 11:46 pm | सुहास झेले

सहीच :) :)

हा मस्त धागा वाचायचा राहून गेला होता. छान लिहिलं आहे.

अर्धवटराव's picture

31 Oct 2013 - 1:19 am | अर्धवटराव

पार्टी अगदी थेट हृदयात उतरली. मस्तच.

आमचे चिरंजीव, वय वर्ष चार, कधी कधी फार सेण्टी होऊन "आय लब यु बाबा" म्हणत बिलगतं तेंव्हा मनात जे धन्यतेचे उमाळे फुटतात त्याला तोड नसते. अगदी भरुन पावल्यागत वाटतं.

उपास's picture

31 Oct 2013 - 1:35 am | उपास

ते ल यु बाबा, अगदी तंतोतंतच :)

इष्टुर फाकडा's picture

31 Oct 2013 - 1:49 am | इष्टुर फाकडा

मिपावर आल्याचे कधीकधी जे सार्थक वगैरे वाटतं ना ते अशाच लेखांमुळे :)
बहुगुणी तुमचाही मुद्दा/निरीक्षण भावले. अंगी हे सगळं गोजिरं बाणवण्याचा नक्की प्रयत्न करेन !

माझ मोठ पिल्लु ६ वर्षाच आहे मागचे तिन वर्ष ते माझ्याबरोबर माझ्या प्रत्ये़क क्रिकेट मॅच मध्ये माझ्याबरोबर असते.आणी तिच्या प्रत्येक कराटे मॅच साठी मी तिच्याबरोबर असतो. मागच्या ३ वर्षात माझा प्रत्येक करंडक तिला सोबत घेउनच स्विकारलाय्,आणी तिच्या मिळणार्‍या प्रत्येक सर्टीफिकेटस साठी तिला आवडणारे चिकन लॉलिपॉप स्वतः करुन खायला घातलेत.या वर्षी एअर गण मागणी आलिय्,पोरीला कराटेबरोबर नेमबाजी शिकायचीय.बघुयायत तिच्या मापाची गण आणी चांगला ट्रेनर मिळाला तर नक्की देणार.हेच तर गरजेच असत.पोर दोन पुस्तक कमी शिकली तरी चालतील पण त्यांच्यात विजुगुषी वृत्ती भिनलीच पाहिजे.त्यासाठी स्वतः त्यांच्याबरोबरीने धावन गरजेच आहे,भले तुमच काम कितीही महत्वाच असो.

कपिलमुनी's picture

31 Oct 2013 - 1:10 pm | कपिलमुनी

मार्कांच्या रॅट रेस पासून दूर राहील तेवढी जास्त खुलेल तुमची कन्या ..

तुमचे अभिनंदन!

जे.पी.मॉर्गन's picture

31 Oct 2013 - 1:48 pm | जे.पी.मॉर्गन

बाबा - तुमचं अभिनंदन,

पोरांबरोबर आपणसुद्धा धावायला पाहिजे जे १००% खरं. आणि बहुतेक आईबाप नुसते उपदेश देतात, आचरत कधीच नाहीत. कारं त्यांच्या आई-बापांनी सुद्धा हेच केलेलं असतं.

अफलातून गोष्ट करताय!

जे.पी.

बाबा पाटील's picture

31 Oct 2013 - 1:21 pm | बाबा पाटील

माझ्याही पिताश्रींनी कधी माझ्यावर कुठल्याच गोष्टीची सक्ती केली नाही.वयाच्या १८ व्या वर्षी सगळे व्यवहार त्यांनी स्वतःहुन माझ्या हातात दिले.मी कमवत नसताना देखिल्,त्यामुळे लेकीला तु अस कर आणी तस कर हे सांगायची माझी आयुष्यात कधी हिंमत होणार नाही,स्पोर्ट्स तिची आवड आहे,तो मार्ग तिने निवडलाय त्यासाठी सगळ्या प्राथमिक सुविधा पुरवन हे माझ काम आणी तेव्हडाच तर मला करायचय्,बाकी त्यात विशेष अस काही नाही.

प्रभो's picture

31 Oct 2013 - 2:31 pm | प्रभो

भारी रे!!

साती's picture

1 Nov 2013 - 5:47 pm | साती

एकदम आवडला हा प्रसंग.