(खंड्याचे मनोगत)

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
19 Oct 2013 - 12:32 pm

आमचे प्रेरणास्थानः खंड्या

जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात! तो दुष्ट पारधी आता ग़ांवात जाऊन आम्हाला विकू लागला. सकाळपासून बरीच भटकंती झाली होती. पोटात माणसं ओरडत होती. तोही उन्हाचा कावला होता. सकाळपासून त्याचा एकही पोपट कुणी विकत घेतला नव्हता. एका सज्जनाचे घर बघून, त्याने पिंजरे घराच्या कट्ट्यावर ठेवले आणि दारात उभ्या असलेल्या मुलांकडे पाणी मागितले. त्या मुलांना खूपच आनंद झालेला दिसत होता. त्यांनी घरातून मोठ्या माणसांना बाहेर बोलावले. ती माणसेही आमच्याकडे अतीव आनंदाने बघू लागली. माझी दोन 'भाईबंध' फार चिडचिड करत होते, सारखे खालीवर करत होते. मी उदास होतो, शिवाय माझा डावा डोळा ठणकत होता.त्यामुळे मी ग़प्प ग़प्प बसून होतो.तो मुलगा फारच दयाळु असावा. त्याने वडिलांना आग़्रह करुन मलाच विकत घ्यायला लावले. त्यांनी माझा पिंजरा पडवीतच टांग़ला. ती मुले पिंजर्‍याला जाळी म्हणत होती. एक चांग़ले झाले. मला लग़ेच खायला, प्यायला मिळाले. माझा जीव जरा शांत झाला. मी पेरुवर ताव मारत असताना तो मुलगा म्हणाला, 'आपण याचे नांव 'खंड्या' ठेवू या." ई...ई! मला हे नांव मुळीच आवडले नाही. तुमच्यात 'पोपटाला' खंड्या म्हणत असतील! म्हणुन मला असले नांव ठेवायचे? मी की..र्र करुन निषेध व्यक्त केला. त्यांना काही तो कळला नाही. त्यांना आपली भाषा शिकवण्यापेक्षा आपणच त्यांची शिकावी असे मनोमन ठरवले.

वेळच्यावेळी, जरुरीपेक्षा जास्त खाणे मिळू लागले. मधून मधून मोकळीकही मिळू लागली. पिंजर्‍याबाहेर काढले की मी उडत उडत बाजूच्या बाग़ेच्या पांढर्‍या भिंतीवर बसायचो. आता मी चांग़ला गुबगुबीत झालो होतो. डोळाही बरा झाला होता. इतके सग़ळे आयते मिळाल्यावर मी कशाला पळून जाईन? पण तरीही त्या मुलाच्या बाबाने माझे पंख छाटले. आता लांब ग़ग़णभरारी मारणे शक्यच नव्हते. हळुहळु त्या मुलांशी ओळख वाढली. मुलाचे नांव जी वण आणि त्याच्या बहिणीचे ग़ीता असल्याचे समजले. हा मुलगा फार हुशार! तो माझ्याशी खेळत रहायचा. मला पिंजर्‍यातून बाहेर काढायचा आणि चिठ्ठ्या उचलायला शिकवायचा. दरवेळेस चिठ्ठी उचलण्याआधी त्याची बहीण एक प्रश्न मोठ्ठ्यांदा म्हणायची.माझ्या वडिलांचे नांव काय,आईचे नांव काय, असले प्रश्न असत. मी कुठलीही चिठ्ठी उचलायचो. उत्तर बरोबर आले तर ती पोरं टाळ्या वाजवायची. भलतेच नांव आले तर ग़ोरीमोरी व्हायची. एकदा मुलीने प्रश्न विचारला." माझा भाऊ मोठेपणी कोण होणार ?" अनेक चिठ्ठ्या पडल्या होत्या. मला काय, कुठलीही चिठ्ठी उचलली तरी बक्षीस म्हणून एक मिरची मिळायची. मीही झोकांत लुटुलुटु चालत पुढे येऊन एक चिठ्ठी उचलली. बहिणीने चिठ्ठी उघडली आणि मोठ्याने वाचली, "थोर लेखक". झाले, त्या दोघांनी भरपूर टाळ्या वाजवल्या आणि मला भरपूर खायला दिले. असे मजेचे दिवस चालले होते. त्यांच्या बाथरुममधे एक हिरवा साबण ठेवलेला असे. तो चांगला सुवासिक होता. मला तो खायला खूपच आवडायचा. आता, साबण आणि पेरु यांतला फरक काय मला कळणार नाही ? पण त्या अजाण बालकांना तसे वाटायचे. बाथरुममधे मी का बसायचो ते त्यांना कधीच कळणार नाही. असो.

एक दिवस, मी पांढर्‍या भिंतीवर बसलो असताना, ती मुले एकदम आकाशाकडे बघायला लागली. म्हणून मी पण वर बघितले. मला त्यांत माझेच 'भाईबंध' दिसले. तक्षणी मी जी ग़ग़णभरारी घेतली ती थेट आमच्या थव्यात! पण माझी उडण्याची संवय ग़ेली होती. मी मागेमागे पडू लागलो. आमचा गटनेता म्हणाला, "अरे, तू आता आमच्यात राहू शकत नाहीस. तुला सांभाळणे आम्हाला जड जाईल." मी खूपच ग़यावया केल्यावर काही दिवस तरी थव्यात रहाण्याची परवानग़ी मिळाली.एक वर्ष गेले. मी अजूनही मागेच पडत होतो.एकदा,एका शेतावरुन जाताना खाली तीन माणसे आमच्याकडेच बघत होती. मीही खाली बघितले. अरे, हे तर जी वणरावांचे वडील. त्यांच्यासारखेच मलाही खुप लांबूनही स्पष्ट दिसायचे. त्यांनीही मला ओळखले असणार! मी स्वग़ृही परतण्याचा निर्णय घेतला. सरळ खाली झेप घेतली आणि ओळखीच्या पांढर्‍या भिंतीवर जाऊन बसलो. थोड्याच वेळांत खंड्या,खंड्या अशा हांका ऐकू आल्या. मी त्यांच्याकडे खाऊ का गिळु, अशा नजरेने बघू लागलो. खंड्या नांव मला आवडत नव्हते ना! त्यांना मात्र, मी प्रेमाने बघत आहे असेच वाटले असावे.मग ते मला घरी घेऊन आले. घरी आल्या आल्या पेरुंचा भडिमार झाला. मलाही भूक लाग़लीच होती. माझी भूकही शमली आणि रागही शांत झाला. भविष्यात, आमचे जी वण राव थोर्रथोर्र लेखक होऊन माझे नांव इतिहासात अजरामर करणार याची मला खात्रीच होती.

इतिहासकथाविडंबनप्रतिसादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2013 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त कथा

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 12:41 pm | मुक्त विहारि

झक्कास,,,

अग्निकोल्हा's picture

19 Oct 2013 - 12:51 pm | अग्निकोल्हा

.

आतिवास's picture

19 Oct 2013 - 1:03 pm | आतिवास

झकास :-)

आता 'बाहुली'च्या मनोगताची वाट पाहते :-)

तिमा's picture

19 Oct 2013 - 4:53 pm | तिमा

नाही हो, ज्या वेगाने लेख येतात त्या वेगाने विडंबने कशी पाडणार ? मग लोक मला 'आजीवन विडंबने' म्हणतील. थोडक्यांतच मजा असते.

पंख कापल्याचा उल्लेख कुठे आहे?

मुक्त विहारि's picture

19 Oct 2013 - 1:53 pm | मुक्त विहारि

"पण तरीही त्या मुलाच्या बाबाने माझे पंख छाटले."

प्यारे१'s picture

19 Oct 2013 - 4:03 pm | प्यारे१

खिक्क्क्क.
पक्ष्याच्या ह्या 'जीवन'चरित्राने अगदी 'मोहीत' झालो! ;)

अद्द्या's picture

19 Oct 2013 - 5:31 pm | अद्द्या

हिहीहाहा

एक पोपटाची आधी ती कहाणी आणि मग हि .
मुश्किले . :D

बॅटमॅन's picture

19 Oct 2013 - 8:53 pm | बॅटमॅन

बाकी ते ग़ कायम नुक्तासिंचित ठेवणे अगदी आठवणीने केलेय बरे तिमा सर ;)

तिमा's picture

20 Oct 2013 - 10:48 am | तिमा

ते 'गुबगुबीत' या शब्दांत नुक्तासिंचन करायला नाही जमलं त्या दिवशी!

बॅटमॅन's picture

20 Oct 2013 - 4:06 pm | बॅटमॅन

ग़ुबग़ुबीत ;)

मदनबाण's picture

20 Oct 2013 - 11:55 am | मदनबाण

मस्त !
बाकी पोपटाचा उल्लेख वाचुन मला माझा विठू विठू आठवला. :)