आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली. आणि म्हणूनच कदाचित वाचनातला हुरूप टिकून राहिला आणि एकंदर मराठी साहित्य वाचायची सवय आणि गोडी लागली. एकदम सुरुवातीला बाबा कदमांच्या एका दोन कादंबर्या वाचल्या होत्या, त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सुशिंची सालम ही कादंबरी वाचली आणि झपाटल्यासारखा सुशिंच्यासर्व कादंबर्या वाचनालयात जाऊन वाचायचा सपाटा लावला. त्यावेळी बहुतकरून फिरोझ इराणी आणि दारा बुलंद हे माझे आवडते हीरो बनले होते. मग एकदा अचानक कल्पांत ही कादंबरी हाती लागली आणि सुशिंचा एका आगळाच पैलू मला गवसला. सुशिंचा परम भक्त असल्याचा अभिमान तेव्हा गगनात मावत नव्हता. पुढे लवकरच कॉलेजला जायला लागलो आणि नेमकी 'दुनियादारी' ही कादंबरी हाती लागली. बस्स! कॉलेजजीवन अगदी झपाटून गेले होते तेव्हा.
पण आता नुकतीच ही कादंबरी आता पुन्हा एकदा वाचली (नाही, चित्रपट येणार म्हणून नाही, त्याच्या आधीच). पण ह्यावेळी ती एवढी भिडली नाही जितकी कॉलेजात असताना भिडली होती. ह्यावेळी वाचताना एम. के. श्रोत्री आणि श्रेयस यांचे नाते, सुशिंनी, कादंबरीत बरेच पोकळ दाखवले आहे असे वाटून गेले. प्रत्यक्षात एम. के. श्रोत्री आयुष्याबद्दलचे जे काही तत्त्वज्ञान कादंबरीत सांगतो ते जास्त गहन असे सुशिंनी मांडायचा प्रयत्न केला होता पण श्रेयस तळवळकराशी डायरेक्ट नाते संबंध जुळवून कादंबरीचा केलेला शेवट ह्यावेळी मला काही भावला नव्हता.
आता हा सिनेमा जेव्हा आला त्यावेळी कथानक बदलले आहे असा गदारोळ झाला होता. पात्रांची नावेदेखील बदलली आहेत असेही कळले होते. पण चित्रपट स्वतः बघितल्याशिवाय त्यावर काहीबाही वाचून मत बनविणे हे मला आवडत नाही. त्यामुळे चित्रपट बरा असो की वाईट सुशिंसाठी हा चित्रपट बघायचाच असे ठरविले होते. चेन्नैत असल्याने काही हा चित्रपट बघायला जमत नव्हते. आज पुण्यात आल्या-आल्या चित्रपट पाहून घेतला. चित्रपटगृह दुपारी बाराच्या शोलाही भरलेले होते. हे पाहून खूपच बरे वाटले आणि ही गर्दी तरुणाईची होती. त्यातल्या बहुसंख्यांना सुशि कोण हेही माहितीही नसावे.
असो, मला हा सिनेमा अतिशय आवडला. सर्वात जास्त काय आवडले असेल तर पटकथेत केलेला बदल. ह्या बदलामुळे एम. के. श्रोत्रींच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली आहे असे मला व्यक्तिशः वाटते. कादंबरीत एम. के. श्रोत्री एक शोकांतिक शेवट असलेले पात्र आहे, दुनियादारीची साक्ष देण्यासाठी उभारलेले पात्र. पण कादंबरीत एम. के. श्रोत्रींचा शेवट आणि त्याची श्रेयसशीघातलेली सांगड तितकीची पटत नाही. पण चित्रपटातल्या पटकथेत एम. के. श्रोत्रीच्या मृत्यूने श्रेयसमध्ये झालेला बदल आणि चित्रपटाच्या पटकथेतील शेवट हा अतिशय सयुक्तिक आणि वास्तविक वाटतो.
मला चित्रपट बघताना कथेत केलेले बदल कुठेही खटकले नाहीत. मुळात सिनेमा बघायला जाताना एक स्वतंत्र कलाकृती बघायला जायचे ह्या हिशोबानेच गेले होतो. त्यामुळे कुठेही तुलना केली नाही. सुशिंच्या दुनियादारी ह्या कादंबरीवर बेतलेली एक स्वतंत्र कथा/पटकथा आणि त्यावर बेतलेला एक स्वतंत्र चित्रपट असे बघितल्यास हा सिनेमा मस्तच झाला आहे. हा सिनेमा हाऊसफुल चालून 30-40 कोटींचा गल्लाही ह्या सिनेमाने जमवला आहे.
पात्रे आणि त्यांची वेषभूषा सत्तरीच्या दशकातली दाखवली आहे, पण कादंबरी त्या काळातली असल्याने तसे करणे गरजेचे आहे असे वाटत नाही. कारण कथेतला बदल हा, ही पूर्ण कथा फ्लॅश-बॅकच्या अंगाने पुढे आणतो त्यामुळे त्या वेषभूषा पटत जातात. अंकुशाचा दिग्या उर्फ डी.एस.पी. अतिशय समर्पक. तो दिग्या वाटतो, निदान मलातरी वाटला. अश्क्या, उम्या इत्यादी पात्रेही मस्तच. शिरीनसाठी सध्याच्या जमान्यात सई ताम्हनकर शिवाय दुसरी कोणी पर्याय असेल असे वाटत नाही असे वाटावे इतकी सई शिरीन म्हणून शोभते. (पण अभिनयाची वानवा असल्याने मूळ कथेतील पात्राची परिपक्वता दाखविण्यास तीच्या मर्यादा आड येतात). मिनू अतिशय समर्पक, मूळ कथेतील मिनू अस्तित्वात आलीय की काय असे वाटावे इतकी उर्मिला कानिटकर मिनू म्हणून शोभली आहे.
श्रेयस आणि साईनाथ ही पात्रे मात्र जबरी हुकली किंवा फसली आहेत. स्वप्नील जोश्याला त्याच्या त्या सुजलेल्या स्वरूपात श्रेयस म्हणून पचविणे खरंच खूप जड जाते. चेहेर्यावरच्या थोराडपणामुळे श्रेयसचा हळुवारपण आणि निरागसता त्याला अजिबात प्रतिबिंबित करता आलेला नाहीयेय. जितेंद्र जोशी फक्त सुरुवातीच्या, एंट्रीच्या सीनमध्ये तेवढा सुसह्य होतो बाकी चित्रपटभर त्याने ओव्हर अॅशक्टींगचा कहर केला आहे. एम. के. श्रोत्री म्हणून संदीप कुलकर्णीला काही करायला चित्रपटात वावच नाहीयेय. 2-3 सीन्समध्येच एम. के. श्रोत्रीचे दर्शन होते. पण संदीप कुलकर्णी ऐवजी मोहन जोशींना एम. के. श्रोत्री म्हणून बघायला कदाचित आवडले असते.
तर एकंदरीत ‘सुशि-भक्तांनी’ गदारोळ उडवलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट मला आवडला आणि कथेतील बदलही सार्थ वाटला, त्यामुळे एम. के. श्रोत्री ह्या पात्राला न्याय मिळाला असे मला वाटते.
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 12:41 pm | अजिंक्य विश्वास
’चांदणे शिंपीत जा’ ह्याचा सु.शि. साहित्याशी काही संबंध आहे का? त्यांची ’बरसात चांदण्याची’ अशी एक, नावात चांदणे असलेली कादंबरी आहे. पण, तिचा आणि रडण्याचा दूर-दूर पर्यंत संबंध येत नाही.
नक्की कळेल का, की ’चांदणे शिंपीत जा’ संदर्भ काय आहे हे?
9 Sep 2013 - 11:15 pm | चिगो
तलखी, ह्रद्यस्पर्श, कोवळीक, जाई, कल्पांत , क्षितीज ह्या चटकन आठवणार्या काही सुशिंच्या 'टचिंग' कादंबर्या.. अशी कुठली कथापण आठवत नाहीये..
10 Sep 2013 - 8:16 am | सोत्रि
अजिंक्य,
जरा हुकलो होतो लेख लिहीताना, संदर्भ चुकला होता, काढला आहे. धन्यवाद!!
- (कधी कधी हुकणारा) सोकाजी
9 Sep 2013 - 7:19 pm | पैसा
वेगळ्या माध्यमात येताना दिग्दर्शकाने घेतलेले स्वातंत्र्य गृहीत धरायला हवेच. शिवाय कादंबरी लिहून इतकी वर्षे मध्ये उलटली आहेत की काही बदल करणे अपरिहार्य असावे.
9 Sep 2013 - 11:18 pm | चिगो
प्रामाणिक परीक्षण आवडले.. आता हा चित्रपट टिव्ही किंवा तत्सम इतर माध्यमातूनच बघावा लागेल, असं वाटतंय..
10 Sep 2013 - 1:47 am | संदीप चित्रे
म्हणून आता चित्रपट बघायचे धाडस करीन रे बाबा!
10 Sep 2013 - 2:17 pm | पिलीयन रायडर
मी दुनियादारि पाहिला नाही, पण डिटेल मध्ये स्टोरी ऐकलीये. ह्याचा अर्थ असा नाही की मी अधिकारानी काही बोलु शकते..पण मला स्टोरी मधले बदल (ऐकीव माहितीवर) का खटकले ते सांगते..
१. पुस्तकाचे नाव "दुनियादारी" आहे.. "तुझी माझी यारी..." नाही. एकेकाळी कितीही जिग्गी मित्र असलो तरी दुनियादारी मध्ये सगळं वाहुन जातं. श्रेयस आणि दिग्याच काय होतं? दिग्याचं पुढे काय झालं हे ही श्रेयसला माहिती नसतं.. जिवापाड प्रेमे केलं ती मिनु आणि शिरीन.. दोघींचा हात "सोडावा लागतो"..परिस्थिती प्रेमाच्याच बाजुने असेल असं नाही.. म्हणुन "दुनियादारी"...पण पिक्चर मध्ये तर ते शेवटी एकत्र येऊन कट्ट्याशी गप्पा मारतात असं दाखवलय म्हणे.. हे फिल्मी आहे..
२. श्रेयस नेहमी प्रेम "मीरा सरदेसाई" च्या कथेकडे जात आहेत की "अपर्णा भालेराव"च्या हे पहात असतो. त्याची विचारप्रक्रिया खुप छान दाखवली आहे. अशा वेळेस मला (कादंबरीच्या नावाप्रमाणे), श्रेयसच्या विचारप्रक्रियेनुसार आणि परिस्थिती बघता त्याला कुणीच न मिळणं वास्तविकतेकडे जाणारं वाटलं.. पण पिक्चर मध्ये म्हणे तो शिरीनला पळवुन नेतो. त्यांच लग्न होतं.. हे तद्दन फिल्मी वाटलं (ऐकायला तरी)..
३. शिरीन पटेल.. गुढ व्यक्तीमत्व.. डोळे मादक.. पण तरीही खोलवर दु:खाची झाक.. श्रीमंतीची अदब..
शिरीन घाटगे... साईनाथ सोबत लग्न ठरलेलं????? का तर वडिलांसाठी.. ज्यांना मुलगा हवा असतो? शिरीनच्या पात्राच वाटोळ्ळं केलं असं मला वाटलं.. फार सुरेख व्यक्तिमत्व आहे शिरीन मुळ कादंबरी मध्ये...
कदाचित पिक्चर पहाताना हे सगळं खटकत नसेलही.. पण मग "दुनियादारी" ह्या नावाचे प्रयोजन काय असा प्रश्न पडतो..
15 Sep 2013 - 1:10 pm | सागर कोकणे
१०० % सहमत आहे.
15 Sep 2013 - 1:16 pm | चिगो
लैच भारी, ताई.. १००% सहमत..
2 Oct 2013 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल दुनियादारी चित्रपट पाहिला, आणि तो आवडला. लंच बॉक्स पाहु की दुनियादारी अशा द्विधा अवस्थेत अखेरच्या क्षणी दुनियादारी पाहिला. माझ्या आजूबाजूला ही दुनियादारी थोड्या फार फरकाने पाहात असतोच. प्रेम, द्वेष, हाणामा-या, एखादा डिएसपी, एखादा श्रेयस, एखादी शिरीन, एखादी मिनू असतेच असते आणि एखादा एम.के. देखील. तेव्हा कादंबरी वाचलेली असल्यामुळे चित्रपट कसा बनला आहे, त्याची उत्सूकता होतीच होती.
चित्रपट पाहतांना तुम्ही जर थेट्रात कादंबरी घेऊन जाणार असाल तर चित्रपट तुम्ही इंजॉय करु शकणार नाही, ही साधी समजून घेण्याची गोष्ट आहे. पटकथेतील बदल, संवादातील बदल, पात्रांमधील बदल, हे तर चित्रपटात अपेक्षितच आहे.
'डोंगराच्या कड्याच्या बाजूनं नेमकं दुश्य पाहिलं की डोंगर दुर्गम, अवघड वगैरे वाटतो. अशा वेळी माणूस या डोंगराला दुसरी बाजू असते हे विसरतो. ते लक्षात घेतलं, तर डोंगराचं अवघडपण मनात घर करुन बसत नाही.
ही आणि अशी अनेक वाक्य आपण चित्रपटात शोधायचे तसे काही कारण नाही. चित्रपटातले डी.एस.पी. आणि शिरीन आवडले. सई ताम्हणकर शिरीन म्हणून चांगली व्यक्त झाली आहे. वर पिलियन रायडर प्रतिसादात म्हणतायत तशी ''शिरीन पटेल.. गुढ व्यक्तीमत्व.. डोळे मादक.. पण तरीही खोलवर दु:खाची झाक.. श्रीमंतीची अदब..'' हे नेटकेपणाने आलं आहे. कादंबरीतली शिरीन वेगळी असेल पण म्हणून चित्रपट विस्कटला आहे, असं मला अजिबात वाटलं नाही.
श्रेयस आणि साईनाथ पचविता येत नाही, पण त्याला विलाज नाही. एम.के.ला फार संधी नाही. पण, चित्रपट आवडला. उगाच रटाळपणा नाही. चित्रपट थबकत चाललाय असे होत नाही. चित्रपट वेगात सरकतो आणि उत्तम ठिकाणी संपवला आहे, असे वाटले.
माझे गुण चार स्टार. ****
-दिलीप बिरुटे
2 Oct 2013 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा
आपल्याला पन शिनुमा लै लै आवडला!
फक्त स्वप्निल जोशी नावाचा "बुंदि"चा लाडू सोडुन!
फेस बुका वर त्याला कुणितरी "नानकेट" =)) जोशी,असं अत्यंत समर्पक नाव-ठेवलेलं आज परत अठवलं! =))
2 Oct 2013 - 4:24 pm | क्रेझी
>> फक्त स्वप्निल जोशी नावाचा "बुंदि"चा लाडू सोडुन!
हाहाहा अगदी बुंदीचा मोठ्ठा लाडू दिसतोय तो! पण 'गेट वेल सुन' मधे थोडासा बारीक झाला असं वाटतं.
2 Oct 2013 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> फक्त स्वप्निल जोशी नावाचा "बुंदि"चा लाडू सोडुन!
=))
3 Oct 2013 - 3:37 pm | सुमीत भातखंडे
मलापण आवडला. एकदा पाहण्यासारखा नक्कीच वाटला.
गाणीपण चांगली जमल्येत सगळी.
"स्वप्निल जोशी" बद्दलच्या निरिक्षणाबाबत सहमत. खूपच थोराड दिसतो.
अवांतरः
इथे "टाइम प्लीज" बघितलाय की नाही कोणी? दुनियादारीपेक्षा खूपच सरस वाटला. सध्या एक-दोनच चित्रपटगृहात चालू आहे, पण जमल्यास नक्की बघा आणि इथे परिक्षणही लिहा.
उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर या चौघांची कामं उत्तम झाल्येत.
सईच्या अभिनयाबद्दल जे सर्वसाधारण मत आहे, त्याच्यातुलनेत खूपच उत्तम काम झालय या सिनेमात.
दुनियादारीच्या यशात कंटेंटपेक्षा तगड्या मार्केटिंगचा आणि गाण्यांचा बराच हात आहे अस मला वाटतं.
3 Oct 2013 - 3:48 pm | सस्नेह
परिक्षणाशी १०० टक्के सहमत.
4 Oct 2013 - 2:56 am | प्यारे१
टोरेन्ट कृपे पाहिला. चित्रपट आवडला असं वाटेस्तोवर मधेच असे सीन येत होते की गोंधळायला होत होतं. कादंबरी डोक्यात थोडीफार होतीच. तरी वेगळा म्हणून चित्रपट बघताना देखील चित्रपटाचा काळ, पात्रांची निवड, नि एकंदरच सगळं घोळात घोळ निर्माण करत होतं. तीन तासात कॉलेजचा बराचसा काळ बसवणं अवघडच. गँग ची निवड बरी आहे मात्र त्यांच्यातला प्रत्येक जण मी एक नंबर लक्षात राहणारं पात्र करतो का नाही बघा च्या आवेशातलं वाटलं.
तुकड्या तुकड्यात विनोद, टायमिंग, आवडत होतं. दिग्या वठला पण त्याचा दरारा अजिबात जाणवत नाही.
श्रेयसच्या पात्राला इतकी सहानुभूति का देताहेत काही कळत नव्हतं.
त्याचा 'घोनळा' का फुटतोय हे शेवटपर्यंत कळेचना. थोड्या वेळानं शाहरुखचा 'असोका' चा श्रेयसवर पेक्षा स्वप्निल जोशीवर परिणाम असेल असं राहून राहून वाटलं. सईची शिरीन आवडली. सुशांत शेलार ठीकच. अश्क्या पटतो, साई सुरुवातीनंतर काव आणतो. शेवट लईच्च्च वैतागवाणा आहे.
आपापल्या कुवतीनुसार बघावा. (अजून बघितला नसल्यास)
अवांतर : यशस्वी मराठी नाटक/ चित्रपटाचे पैसे अमराठी निर्मात्याला मिळत असतील तर मराठी सिनेमाला बरे दिवस आलेत असं म्हणावं का ह्या प्रश्नात मी नेहमी अडकतो.
अतिअवांतर : प्रतिसादाचे टायटल पुन्हा वाचा.
4 Oct 2013 - 11:05 pm | अग्निकोल्हा
श्रेयसचा घोळणा का फुटला/तो व त्याचा शेवट काय हे अगदी पाहिल्या पाहिल्याच समजले होते.
4 Oct 2013 - 2:46 pm | अर्धवटराव
मनोरंजनाकरता २:३० - ३ तास काढतो म्हटलं तर ते उत्तम जमलय... म्हणजे, एकदा पहाण्यालायक आहे. कादंबरीशी तुलना करतो म्हटलं तर "V" डोळ्यासमोर येतं... सुरुवातीला चित्रपट आणि कादंबरी एकाच बिंदुवर आहेत पण एकदा का हि संगत सुटली कि परत हात मिळवणी नाहि. किंबहुना कादंबरीतली दुनियादारी आणि चित्रपटातली दुनियादारी संपूर्ण भिन्न आहे. सुशींचं एकही कॅरेक्टर त्याच्या स्वभावाला धरुन चित्रपटात वावरत नाहि (अपवाद रानीमाँ). चित्रपटातलं कुठलच पात्र सुशींच्या पात्राची कॉपी करायचा सफल-असफल प्रयत्न देखील करत नाहि. थोडक्यात काय, तर "दुनियादारी" हे टायटल, पात्रांची नावे इ. वगळल्यास कादंबरी आणि चित्रपट अशा दोन भिन्न कलाकृतींचा आस्वाद रसीकाला घेता येतो.
आश्चर्याची बाब म्हणजे मला श्रेयसच्या रोलमधे स्वप्नील आवडला, पण डी.एस.पी आणि शिरीन हुकल्यासारखे वाटले. कादंबरीच्या पात्रांचा प्रभाव असावा.
4 Oct 2013 - 9:43 pm | आशु जोग
सुहास शिरवळकर यांच्याबद्दल खूप ऐकले होते पण कधी त्यांचे साहित्य वाचण्याचा योगच नाही आला. आजूबाजूला त्यांचे डाय-हार्ड फॅन्स होते तरी ते वाचावं अशी प्रेरणा कधी निर्माण झाली नाही. आमच्या एका मित्राला कॉलेजच्या गॅदरींगमधे सुशींच्या हस्ते पारितोषिक मिळाले होते त्याला त्याचा फार अभिमान वाटे. पण ...
'दुनियादारी' चित्रपटाची परीक्षणेही मुद्दाम वाचली नाहीत. यामुळे दुनियादारी पाहताना कोणतेच पूर्वग्रह नव्हते. चित्रपट आवडला. लक्षात राहीला, यापुढेही लक्षात राहील असे वाटते. सुशींकडेही वळावेसे वाटते आहे.
सोत्रिंच्या लिखाणानंतर एक प्रश्न पडलाय एम के आणि श्रेयस गोखले एकच का ?
4 Oct 2013 - 11:39 pm | आशु जोग
चित्रपट आवडणं न आवडणं हे तो कुठे पाहतोय यावरही अवलंबून आहे.
थिएटरमधे
सीडीवर
डीडी वर (विथ ब्रेक्स)
6 Oct 2013 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> हे तो कुठे पाहतोय
म्हणजे ?
6 Oct 2013 - 6:54 pm | आशु जोग
लोक एखादा चित्रपट पाहिल्याचं सांगतात. फारसा चांगला नव्हता म्हणतात. मग कुठे पाहिला विचारल्यावर सांगतात. "घरीच सीडीवर"
कधी कधी घरी चित्रपट पाहताना एकाग्रतेने पाहिला जात नाही. चांगला चित्रपटसुद्धा घरी कॉप्युटरवर बाकीची कामे करता करता,
किंवा टीवीवर पाहताना जाहिरातींच्या मार्यामधे नीटपणे पाहीला जात नाही.
7 Oct 2013 - 12:57 am | अग्निकोल्हा
जेव्हां जेव्हां सोत्रि वाचतो श्रोत्रि दिसतं :hz:
7 Oct 2013 - 9:48 am | सोत्रि
चश्मा बदला, चश्मा नसल्यास ग्लेयर्सची शेड बदला!
:)
-(दुनियादारी जाणलेला) सोकाजी
7 Oct 2013 - 2:01 pm | पक्या
चित्रपट आवडला नाही. एखाद दोन प्रसंग सोडले तर बोअरच होता.