बादशाही...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
22 Aug 2013 - 1:44 am

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा. या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी! पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्‍याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे. कारण एकेक म्हणता म्हणता या गल्लीत पाच/सहा हॉटेलं त्याचीच चलु झाली हळुहळू! असो..आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही!

या गल्लीतनं "हे" अवलोकन करून बाहेर पडता पडता,मनात का कोण जाणे चटकन नाव आलं ते आमच्या बादशाही'चं! लोकांना हे पुण्यातलं बादशाही(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे,आंम्हाला हे पुण्याचं-(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे. ;) (सदर वाक्यातील खोच ही ज्यानी बादशाही'ची लॉजिंगची "नियमावली" हे अस्सल पुणेरी प्रकरण वाचलं आहे,आणी त्यानंतर तो'ही वाचला आहे,त्यालाच कळेल ;) )

तर.... मनात आलं आज नेहमीच्या मेसला दांडी मारून आपल्या बादशाही'ला पुन्हा एकदा फेस करावं.घड्याळात पाहिलं आणी शेवटची पंगत मिळेल या अंदाजानीच आत गेलो.अंदाज फेल गेला नाही,कारण काऊंटरवरचा तो प्राचीन खानावळ संस्कृतीतला इसम माझ्याकडे त्याच चेहेर्‍यानी बघत टोकन-पावती फाडायच्या बेतात उभा होता. पैसे दिले पावती हतात आली,आणी "नंबर"चा पुकारा होई पर्यंत तिथल्या एका जुन्या श्टाइलच्या आणी खरोखर तितक्याच जुन्याकाळी-घेतलेल्या वेटिंगच्या लांबलचक आसनावर स्वस्थ झालो.
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/935938_500146363404988_1751480982_n.jpg
वेळही भरत आलेली असल्यामुळे ५ मिनिटातच तिनशे...ती...स! असा पुकारा आला,आणी एंट्रिला उभ्या असलेल्या माणसानी,"आतल्या बाजुची कोपर्‍याची खुर्ची..!" असं म्हणत मला "आत-धाडलं" देखिल!
https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/995471_500146383404986_388120170_n.jpg
ही खास बादशाही श्टाइल आहे. मी नवि-पेठ हा सदाशिवपेठेचा वाढता भूभाग म्हणून वेगळा केलेला,माझ्या कर्मभूमीचा एरिया सोडून शिव्हगड-रोडला विस्थापित झाल्यानंतरची (म्हणजे ७/८ वर्षानंतरची! =)) ) ही माझी पहिलीच भेट होती,त्यामुळे तो आत "सोडणारा" ,श्राद्धाला पिंडांना नमस्कार करायला जे जमतात,त्या चेहेर्‍याचा आणी पेहेरावाचा'ही- नेहमीचा वयस्क मनुष्य दिसतो का? ह्या खुषीत होतो.पण आज मला एका दुसर्‍या'च माणसानी आत सोडलं.पण श्टाइल तीच असल्यानी मला त्याच्या मागे आजही उभा असलेला तो म्हातारा दिसलाच!

यही तो इधरकी खासियत है! जश्या इथल्या पाट्या अस्सल पुणेरी,तशीच या खानावळीची संस्कृतीही अस्सल पुणेरीच.
https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/1185322_500146420071649_1518672300_n.jpg
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/581537_500146393404985_1978310668_n.jpg
खरं म्हणजे अस्सल हा शब्द वापरायला नकोच आहे, ते थोडसं ,"हे डोक्यावरचे माझे अस्सल केस आहेत!" असं म्हटल्या सारखं होतं. इथल्या खुर्च्या/टेबलं/पाण्याचे पितळी तांबे.जेवण वाढायची/जेवणाची भांडी ही सुद्धा अजून तशीच आणी तीच आहेत.
https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/1176350_500146240071667_1385661105_n.jpg
म्हणजे या खानावळीला (इथल्या माणसांसकट) नूतनीकरण नावाची नव मार्केटिंगवादी-झळ कधिही पोहोचलेली नाही. आणी ती पोहोचण शक्यही नाही.अहो कुंडितली तुळस उपटून फ्लॉवरपॉटमधे लावली तर ती गुलाबी येत नसते.आपल्याला उगाच नविनपणा केल्याची हौस भागवल्या सारखं होतं इतकच. बादशाही मधे मिळणारं साधं मराठी भोजन हे पूर्वीही भोजनच होतं आजही भोजनच आहे.(तिथल्या कोथिंबिर लाऊन दिल्या जाणार्‍या ताकासारखं!) त्याची कधिह्ही राइसप्लेट झाली नाही आणी थाळिही!

एक्स्ट्रॉ स्विटडिश पूर्विही होत्या आजही आहेत,पण त्याबरोबरच इथे खास जुन्या पुणेरी मामल्याचं-एक्स्ट्रॉ तूपंही मिळंतं. (आज शेवटच्या पंगतीला असल्यामुळं ते अदृश्य झालवतं. ;) ) इथला आमटिचा प्रकार तर एक लाजवाब प्रकार आहे.अगदी खाण्यापासून ते वाढला जाण्यापर्यंत! आपण इथे जेवत असतांना आमटिचं गरम पातेलं आणी गरमागरम आमटिचं पातेलं... असं घेऊन कुणि ना कुणी अधून मधून येरझार्‍या घालतच असतो. इथल्या आमटिचा स्वाद म्हणजे खरोखर स्वाद या शब्दाची इज्जत राखणारा स्वाद आहे. जेवताना एरवी कधीही आमटी हा प्रकार आपण पीत नाही.पण इथे आमटी ही कढी सारखी गरमागरम प्याविशी वाटते. मी ज्या वयात शाळेतल्या मास्तरांना पगार मिळण्याचं "कारण" होतो,म्हणजे ६वी ७वीत शाळेत होतो,तेंव्हा कधितरी बाबांबरोबर दुपारचा इथे पहिल्यांदा जेवायला गेलो होतो.पण पदार्थाची क्वालिटी/चव/आकार/प्रकार सर्व काहि आजही तस्से आणी तसेच आहेत.एखादी ओली भाजी,एखादी सुकी भाजी ,आमटी,भात,पोळ्या,लिंबाची एकच-फोड!,एखादी चटणी,पिठातलं डांगर,कांदा असा अत्यंत साधा आणी घरगुती मामला असतो.त्यातही महागाईच्या नावाखाली बटाट्याचा आणी गेल्या काहि वर्षातल्या सोयाबिनचा "आधार" या खानावळीनी आजही घेतलेला नाही,त्यामुळेच या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो! नव्हे रुचला पाहिजे,असं मला आमच्या बादशाही'च्या बाबतीत थोड्याश्या अडेल आग्रहानी म्हणावसं वाटतं.कारण भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे.
https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/1186735_500146300071661_1074214418_n.jpg
आजचा जमाना हा "सर्व्हिस"चा जमाना आहे.पण त्यात फक्त सर्व्हिस'च येते आहे,सेवा देणं शून्यवत झालं आहे.तश्या जमान्यातही आपलं खरंखुरं पुणेरीपण टिकवून गिर्‍हाइकं न वाढवता गेस्टपास'ही देणारी ही जुन्या पुण्या इतकीच-जुनी खानावळ आजही थाटात उभी आहे आणी तशीच पुढे राहिलंही!
https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-frc1/1004680_500146273404997_2091441227_n.jpg
===================================================================

संस्कृतीजीवनमानआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

22 Aug 2013 - 2:47 am | अरुण मनोहर

वाह! छान लेख.
अजून लिहायला हवे होते. ते, आणि रिकाम्या जेवणाच्या थाळीचा फटू टाकण्या ऐवजी जेवणाचे फटू टाकले असते तर इथले अनेक आत्मे अतृप्त राहिले नसते!

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 3:19 am | प्रभाकर पेठकर

लेख चांगला आहेच.

पण एवढ्या चांगल्या लेखाला त्या खरकट्या ताटाचे गालबोट लागले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 5:36 am | अत्रुप्त आत्मा

@खरकट्या ताटाचे गालबोट लाग आहे.>>> पटले आहे. :)
संपादक कृपया तो फोटो उडवुन टाका. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 5:43 am | अत्रुप्त आत्मा

हेच फोटो चोरुन घुसलेल्या न्यूज रिपोर्टरसारखे काढले आहेत! :-D

जॅक डनियल्स's picture

22 Aug 2013 - 4:01 am | जॅक डनियल्स

या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो!

जेडी पण हेच म्हणतो,

jd

(हे वाक्य जेडी च्या पहिल्या गुत्त्या मध्ये लिंचबर्ग, टेनेसी ला लावले आहे.)

खूप मस्त झाला आहे लेख. संध्याकाळी ६ च्यासुमाराला बादशाही वरून जाताना एक जो खमंग फोडणीचा वास येतो तो लेख वाचताना आला.

पाषाणभेद's picture

22 Aug 2013 - 6:00 am | पाषाणभेद

तेच म्हणतो.
>>> या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे!

असल्या वाक्यांनी लेखाची लज्जत वाढवली आहे!

स्पंदना's picture

22 Aug 2013 - 4:12 am | स्पंदना

"अडेल आग्रह"
अंहं! क्या बात है।

त्रिवेणी's picture

22 Aug 2013 - 9:27 am | त्रिवेणी

इतके दिवस फक्त नाव एकूण होते आज तुमच्यामुळे बघायला मिळाले.

रमेश आठवले's picture

22 Aug 2013 - 9:30 am | रमेश आठवले

लहानपणी बाद्शाहीमधे खाल्लेला घावन आज आठवला.
जेवणाचे इतके छान वर्णन वाचल्यावर सडकून भूक लागली आहे.
या इतक्या सदाशिवपेठी ब्राह्मणी उपहार गृहाला त्याच्या संस्थापकांनी 'बादशाही' हे नाव कसे ठेवले या बाबत नेहमी कुतूहल वाटत राहिले आहे.

आदूबाळ's picture

22 Aug 2013 - 9:47 am | आदूबाळ

घावन? मग ते बादशाही नसेल. त्याच्या बाहेरचं "न्यू पूना रिफ्रेशमेंट" असेल.

रमेश आठवले's picture

22 Aug 2013 - 1:49 pm | रमेश आठवले

अहो आदुबाळ! आपण सर्वात प्रथम बादशाही मध्ये किती वर्षापूर्वी गेला होता ? आधी माझी आणि मग प्रभाकर पेठकर यांची स्मरणशक्ति बरोबर नाही हे आपण कुठल्या आधारावर म्हणू शकता ?

तुमच्या प्रतिसादातला वैयक्तिक रोख मनावर न घेता तुम्हाला सरळ उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

- सर्वात प्रथम बादशाहीमध्ये इ.स. १९८९ मध्ये गेलो होतो.

- तुमची आणि पेठकरकाकांची स्मरणशक्ती बरोबर नाही असा माझा कोणताही दावा नाही. माझी चूक होत असेल.

रमेश आठवले's picture

23 Aug 2013 - 9:29 am | रमेश आठवले

मी काही आता बाद्शाहीम्ध्ये जावू शकत नाही. आपण जाऊ शकत असला तर बादशाही च्या मालकांना जेवणाची वेळ सोडून इतर वेळी गिर्हाइकाना snacks देण्याची सोय १९८९ च्या आधी होती का असे विचारा. तसेच बादशाहीच्या जवळचे न्यू पूना रिफ्रेशमेंट हाऊस कोणत्या साला पासून सुरु झाले ही माहिती पण विचारून घ्या.

आदूबाळ's picture

23 Aug 2013 - 11:10 am | आदूबाळ

ओक्के. विचारतो :)

माझ्या मते मीही बादशाहीच्याच आत बसून उपरोक्त पदार्थ खाल्ले आहेत. पण ९९% खात्री अशी वाटते की त्या वेळेला (१५ वर्षांपूर्वी) बादशाहीच्या ज्या भागात बसून ते खाल्ले (रेस्टॉरंटसारखा भाग - खानावळीला संलग्न - दरवाजा वेगळा) त्यालाही "बादशाही" असंच नाव होतं. नंतर तो विभाग अन्य कोणाकडे हस्तांतरित होऊन त्याला आता पूना किंवा नवीन नाव मिळालं असू शकेल.

हेदेखील एक शक्यताच. सध्या रोज येणंजाणं असलेल्यांपैकी लोकच खात्रीपूर्वक सांगू शकतील. कारण छोड आये हम वो गलियां.. :)

प्रचेतस's picture

22 Aug 2013 - 9:52 am | प्रचेतस

सुरेख ललित लेखन.
बादशाहीला कधी गेलो नाही, पण आता एक चक्कर मात्र नक्कीच होणार.

कोमल's picture

22 Aug 2013 - 10:24 am | कोमल

बादशाही..
वाह स्वाद.. (वाह ताज च्या सूरात)

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 10:27 am | प्रभाकर पेठकर

बादशाहीत एक पोटॅटो रोस्ट नांवाचा पदार्थ मिळतो. लई भारी आहे.

बाळ सप्रे's picture

22 Aug 2013 - 10:50 am | बाळ सप्रे

पदार्थ भारी असेल.. पण नाव बादशाही स्टाइल वाटत नाही :-)

आदूबाळ's picture

22 Aug 2013 - 10:54 am | आदूबाळ

हा पदार्थ "न्यू पूना रिफ्रेशमेंट हाऊस" (बादशाहीच्या शेजारी कोपर्‍यावर) येथे मिळतो. बादशाही आणि न्यू पूना अगदी आवळे जावळे भाऊ भाऊ वाटत असले तरी त्यांचे मालक वेगवेगळे आहेत.

पण पेठकरकाका म्हणतात त्याप्रमाणे हा पदार्थ लय भारी असतो. बटाट्याच्या जाडसर टोस्टमध्ये आत खोबर्‍याची हिरवी चटणी असते.
(आठवूनच पाणी सुटलं तोंडाला...:) )

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 11:26 am | प्रभाकर पेठकर

'न्यू पुना रिफ्रेशमेन्ट हाऊस' मध्ये मिळतही असेल मात्र मी 'बादशाहीतच' खाल्ला आहे.

सौंदाळा's picture

22 Aug 2013 - 10:52 am | सौंदाळा

मस्त लेख
बाबा, काका, मामा वगैरेंकडुन बादशाही बद्दल ऐकले आहे. बादशाहीवरुन गेलो देखिल आहे पण आत जाउन जेवायचा योग अजुन आलेला नाही.
२-३ वर्षापुर्वी मामा गेले होते पण चवीबद्दल नाखुष होते १९७५-७६ ची चव राहीली नाही असं काहीसं म्हणत होते.

बुवा.. स्टिंग ऑपरेशनसारखे फोटो काढण्याचे धाडस कौतुकास्पद. अन्यथा असे काही फोटोसेशन केल्याबद्दल बहुधा तिथे तुम्हाला एखाद्या बोर्डवरचे एखादे कलम दाखवून निस्सारित करण्यात आले असते. लेखही चांगला. काही वाक्ये एकदम क्वोटेबल.

बादशाहीविषयी काय बोलावे. जितके बोलावे तितके कमीच. पूर्वी लिहीलेल्या एका धाग्यातला फक्त बादशाहीबाबतचा भाग इथे पेस्टवतो आहे.

-(पूर्वाश्रमीचा बादशाही मेंबर) गवि

एक डिफॉल्ट व्यवस्था हवीच. म्हणून आम्ही बादशाही बोर्डिंग "ठेवलं" होतं. तिथे जिथे "येथे गर्दी करु नये" असं लिहिलंय त्या बोर्डाखाली घोळका आणि गलका करत आम्ही अन्नासाठी वेटिंग करत उभे रहायचो.

मी पहिल्यांदा या ठिकाणी गेलो ते स्वस्त आणि अनलिमिटेड अन्न म्हणून. काउंटरवर बसलेल्या आजोबांना मी "एक कूपन द्या.." असं म्हणून पन्नासची नोट त्यांच्या हातात दिली. त्यांनी अतिशय रागाने माझ्याकडे बघत ती माझ्या अंगावर परत फेकली. मी धसक्याने विचारलं, "का..काय झालं?"

म्हातार्‍याने एक हात वर उचलून त्याची तर्जनी मागच्या भिंतीकडे डाव्या दिशेने रोखली.

तर्जनीच्या बरोब्बर प्रोजेक्शनमधे पाहिलं तेव्हा "कृपया सुट्टे पैसे देणे" असं लिहिलं होतं.

मला स्वस्त अन्नाची नितांत गरज असल्याने मी हे मनावर न घेता त्यांना नम्रपणे सुट्टे नसल्याचं सांगितलं.

त्याने त्यावरही तोंड न उघडता रांगेतल्या माझ्या मागच्या माणसाला खूण केली.."नेक्स्ट" अशा अर्थाने.

आयचा घो..नसतील सुट्टे तर नका जेवू..

…आय मीन "नसतील सुट्टे तर नका जेवू.." असं ते आजोबा तोंडाने म्हणाले नाहीत. हे शब्द माझेच आहेत. ते आजोबा कधीही एकही शब्द बोलल्याचं आम्हाला कोणालाच आठवत नाही. मुके नव्हते एवढं नक्की. पाट्यांकडे बोटं दाखवून त्यांचं सगळं संभाषण चालायचं आणि त्यामुळे काहीही अडणार नाही इतक्या पाट्या तिथे खोलीभर लावलेल्या होत्याच. मग कशाला शब्द वाया घालवायचे? तिथे एक काळा ठोकळ्यासारखा जुना फोन ठेवला होता. तो सतत ट्रिंग ट्रिंग ट्रिंग वाजत राहायचा पण आजोबांनी एकदाही तो उचलल्याचं उदाहरण आमच्या पाहण्यात नाही. त्यांना ऐकू यायचं. पण फोन उचलला तर बोलावंही लागलं असतं. म्हणजे पुन्हा अमूल्य शब्द वाया.

मग माझे इतर होतकरू मित्र मदतीला आले. नाणी वगैरे जमवून एकवीस रुपये त्या स्थितप्रज्ञाला टिकवले आणि आत जाऊन थाळीसमोर बसलो.

ओहो..इतकं घाऊक अन्न मी आयुष्यात खाल्लेलं नव्हतं. आचार्‍यांचा वाढण्याचा सपाटा बघून मी घामाघूम झालो. आपली ताटावरची नजर क्षणभर जरी हलली तरी ताबडतोब आमटी, ताक आणि भाजी पूर्ववत भरत असे.

पोटाला तडस लागली तरी पानात अन्न टाकण्याची हिंमत होत नव्हती कारण तिथल्या असंख्य पाट्यांपैकी एकीवर "अन्नाचं महत्व" आणि न टाकण्याची ताकीद होती. बाहेर बसलेल्या कडक म्हातार्‍याचा (सॉरी..आजोबांचा) अनुभव पाहता अन्न टाकणार्‍यांवर काय कारवाई होईल याची खात्री नव्हती.

मी ताटावर खूप नीट लक्ष ठेवून एका हाताने माश्या वाराव्यात तसं वाढप्यांना वारीत वारीत एकदाचं अन्न संपवलं.

मग मात्र मला सवय झाली. भात मुठीत कुस्करुन खाणार्‍या मद्राशांना लाज आणेल अशा रितीने चारपाच पोळ्या मस्तपैकी आमटीत कालवून खायचो.

नॉस्टाल्जिक बोलायला फार आवडतं असं नाही. पण दिसतं ते हे की आता नारायणपेठेतला तो वाडा कै. झालाय. मोठ्ठी अपार्टमेंट्स उभी राहिली तिथे. लकी कै. झालंय. शॉपिंग सेंटर झालंय तिथे. पूना कॉफी हाऊस कै. झालंय. गुडलकला आता शाकाहारी थाळी मिळते आणि कामाशिवाय बसू नये असं म्हणतात. अलका समोरच्या इराण्याच्या जागी आता साबुदाणा खिचडी मिळते. अलकासमोरचा दूधवाला सुद्धा कै. झालाय. ते बादशाहीतले आजोबासुद्धा बहुधा..आता तिथे कौंटरवर इतरच कोणी व्यक्ती आहे असं ऐकतो. तो म्हणे तोंडाने बोलतो. उत्तरही देतो. झपाझप सूचनांकडे बोटं दाखवण्याची रजनीकांतला लाजवेल अशी सफाई नव्या माणसात नाही. तो कदाचित ग्राहक देवो भव म्हणून नम्रपणेही वागत असेल की काय? आणि सुट्टेही गपचूप देत असेल तर? छे बुवा..बादशाहीत जाण्याचं धाडस नाही होणार आता..

स्पंदना's picture

22 Aug 2013 - 11:15 am | स्पंदना

वाह! गवि वाह!

ब़जरबट्टू's picture

31 Aug 2013 - 10:54 am | ब़जरबट्टू

मस्त लिहता गवि तुम्ही, कधी गेलो नाही तेथे पण तुम्ही सैर घडविली.

पुण्यात आलो होतो तेव्हा मी आणि तिर्थरुपांनी इथे थाळी घेतली होती, मला वाटत रेडिओवर मस्त गाणी देखील लागलेली होती. :)
तिर्थरुपांना त्यांच्या मित्रांनी {काळे काका} इथला जेवणा बद्धल सांगितले होते,त्यामुळ ते मला इथे घेउन आले होते.
मालक मस्त आरामात बाहेर त्यांच्या गल्ल्यावर बसलेले होते. :)
जेवण मस्त होते... :)

मदनबाणचा प्रतिसाद आणि मूळ धाग्यातले वर्णन / फोटो यावरुन एक अत्यंत विचित्र जाणीव झाली की या दोन्हीवरुन एकूण बादशाहीमधे निवांतता, शांतता असे काहीतरी आहे असा भास होतोय. आत्मारामबुवांनी धाग्यात दिलेल्या फोटोंमधेही एकदम रिकामी टेबलं आणि खोल्या दिसत आहेत.

मी अनुभवलेलं बादशाही याच्या अत्यंत उलट होतं. म्हणजे वेटिंगची प्रचंड गर्दी, पण पाटीवर क्रमाने नावे लिहून घेण्याच्या आणि पुकारा करण्याच्या शिस्तीमुळे आपला नंबर जाण्याची भीती नाही. आत प्रवेश मिळाला की गजबज गजबज. जिथे कुठे ताटाची जागा मोकळी झाली असेल तिथे एकेकाने बसून घ्यायचं.. (सर्व मित्र एकत्र बसण्याचे प्रसंग क्वचितच.. पण मग जिथे असू तिथून एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलायचे..). दणादणा वाढणारे वाढपी आणि भरपूर हलचल. असा एकंदरीत अति-सार्वजनिक माहोल असायचा. इतक्या भाऊगर्दीतही ठराविक दिवशी असणारा "खास पदार्थ" - अगदी भरल्या ताटासोबत मधेच बचकाभर भेळच किंवा वर पेठकरकाकांनी म्हटल्याप्रमाणे कसलातरी वेगळा पदार्थ सर्वांना मिळायचा. (नेमका कोणत्या दिवशी असायचा आठवत नाही पण रँडमली मिळाल्याचं आठवतं).

अनलिमिटेड अन्नाचा इतका अस्सल अविष्कार आणि त्याला मिळणारा दणदणीत न्याय मी बादशाही सोडून कुठेही पाहिलेला नाही.

आता एकदम ग्राहकवर्ग आटला की काय असे वाटून वाईटाची शंका आली.. :(

आणखी एक.. टोकन सिस्टीम - नंबर हे नंतर झालेलं दिसतंय. आधी पाटीवर नावे लिहून नावाचाच (प्रेफरेबली आडनावाचा स्वच्छ पुकारा ही पद्धत होती...

बॅटमॅन's picture

22 Aug 2013 - 12:01 pm | बॅटमॅन

टोकन सिस्टिम वैग्रे किमान महिन्याभरापूर्वीपर्यंत तरी नव्हते. मी गेलो होतो तेव्हा तीच पद्धत होती-पाटीवर आडनाव लिहून पुकारा इ.इ.

बाकी बादशाहीबद्दल काय बोलावे? जितके बोलावे तितके थोडेच. ताक आणि आमटीच्या चवीवर आपण तर बेहद्द फिदा हौत. भाज्याही एकदम जबरी-फेव्हरीट म्हंजे कोहळा रस्सा.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा

@ आत्मारामबुवांनी धाग्यात दिलेल्या फोटोंमधेही एकदम रिकामी टेबलं आणि खोल्या दिसत आहेत.>>> तुंम्ही ओपन'वर बोल्ताय...! काल मी क्लोजला होतो...! =)) म्हणून शांतता/रिकाम्या खोल्या इत्यादी दिसतय! ;) बाकी रन टाइमला तीच धावपळ,वाढपी-जेवणार्‍यांचे जोक्स... इत्यादी यथाविधी चालू आहे. :)

@आता एकदम ग्राहकवर्ग आटला की काय असे वाटून वाईटाची शंका आली.. smiley>>> ग्राहकवर्ग अटलेला नाही..आणी वाढलेलाही नाही. बादशाही हे मायकेल बेव्हेन सारखं ठराविक रन-रेटनी चालणारं गाडं आहे. :)

दत्ता काळे's picture

22 Aug 2013 - 11:47 am | दत्ता काळे

नेटकेपणा, शिस्त, सूचनांच्या विविध पाट्या, जेवणाचा आग्रह.. अ.आ.म्हणतात त्याप्रमाणे पदार्थांच्या अस्सल घरगुती चवी.
पण हिला खाणावळ म्हणवंत नाही, बादशाहीच म्हणावं. बादशाहीतली जेवणावळ मजेशीर असते त्यात एस.पी. कॉलेजची महिनावारीवर जेवणारी मुलं, मध्यमवर्गीय, नोकरदार, जुने कलावंत, बाहेरगावची, पूर्वी कधीतरी बादशाहीच्या जेवणाचा आस्वाद घेतलेली आणि आता काही कामानिमित्त पुण्यात आलेली मंडळी, हमखास इथे असतात. जेवण साधं असतं.

एकदा आपण जेवणाचं कूपन घेतलं की, तिथ नांवं पुकारणार्‍या माणसाला आपलं नावं आणि माणसांची संख्या सांगायची कि तो पाटीवर ( स्लेटवर ) पेन्सीलने नांव लिहीतो, ती पाटी त्याच्या कायम हातात असते. आपला नंबर आला कि तो खणखणीत आवाजात नांव आणि संख्या पुकारतो. अजिबात मागे-पुढेचा गोंधळ नाही. बहुतेक वाढपी सगळे कोकणी असावेत. नेहमीचे मेंबर्स .. एस पी ची पोरे..महिनावारीवाले ह्यांची अन् त्या वाढप्यांची क्वचित चेष्टामस्करी चाललेली असते. मालकही वेळ असेल तर त्यात सामिल होतो. इथली आमटी आणि ताक ह्याला जास्त डिमांड आहे. वाढपीही सढळ हाताने सगळेच पदार्थ वाढत असतात. जुना, जाड पितळी तांब्या प्रत्येक पानाशेजारी पाणी भरून ठेवलेला असतो. एकूण घरगुती वातावरणातच आपण जेवतो आहोत असे वाटते.

"भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे." - हे खरंय.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 3:44 pm | अत्रुप्त आत्मा

@एकदा आपण जेवणाचं कूपन घेतलं की, तिथ नांवं पुकारणार्‍या माणसाला आपलं नावं आणि माणसांची संख्या सांगायची कि तो पाटीवर ( स्लेटवर ) पेन्सीलने नांव लिहीतो, ती पाटी त्याच्या कायम हातात असते. आपला नंबर आला कि तो खणखणीत आवाजात नांव आणि संख्या पुकारतो.>>> तो मी जो वयस्क माणूस पूर्वी होता,म्हटलं त्याच्यापर्यंतच हे चालू होतं.नंबर पुकारण्याची पद्धत अलिकडची आहे. :)

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो

आम्हाला दारुचा आणि जुगाराचा असे दोनच अडडे माहिती आहेत. पुरोहितांचाही कसलातरी अडडा असतो हे नविनच ऐकतोय.

आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली.

एकाच वाक्यात आपण सवाईला जातो आणि आपण पानाचेही "शौकिन" आहोत हे सांगण्याची खुबी वाखाणण्याजोगी आहे.

"बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो

तुम्ही स्वतःच्या रुपयांनीसुद्धा पानांचे पार्सल नेता?

आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो.

काय न्याहाळत होतात ते नाही लिहिलंत. आणि हेडफोन जेबीएलचे आहेत हे लिहायचं राहीलं का?

आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती

तुमची सदाशिवपेठ ???

आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा.

अच्छा. म्हणजे सदाशिवपेठेतील गल्ल्या या मुल्यांचे आगार होत्या असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि तुम्हाला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही तर मग तसं लिहिताय तरी कशाला?

या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी!

तात्विक - सात्विक. वा व्वा. काय यमक जुळवले आहे. अर्थात तुमच्यासारखी "सुलभ" कवीला यमके जुळवणे ही अवघड गोष्ट नाही म्हणा.

पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्‍याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे.

तुमचीही वाटचाल नवसंशोधक होण्याच्या दृष्टीने चालू आहे तर. आज "असा माझा आपला एक अंदाज आहे" म्हणताय, उदया मी केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले आहे असे म्हणाल.

आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही!

मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.

क्रमशः

प्रचेतस's picture

22 Aug 2013 - 12:58 pm | प्रचेतस

धन्या
aaaaaaaaa

=)) =)) =))

आज सकाळी सकाळी विजुभौंच्या ढाब्यावरचे शिक्रण खाल्ला होतास काय बे धन्या =)) =))

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Aug 2013 - 1:48 pm | लॉरी टांगटूंगकर

धन्या बेक्कार पेटलाय!!!

मालोजीराव's picture

22 Aug 2013 - 2:05 pm | मालोजीराव

धनाजीराव २०-२० च्या मूडमध्ये हाय काय :))

स्पंदना's picture

22 Aug 2013 - 2:32 pm | स्पंदना

धनाजीराव??
जागे व्हा! काय? काय?? काय??? दिसला लेख काढ मापं?
:))

नाही हो. आत्माराम बपू आमचे नेलेले पुस्तक परत न करनारे मित्र आहेत. शिवाय आम्ही सिंहगड रोडवरचे सख्खे शेजारी आहोत.

जागे व्हा! काय? काय?? काय??? दिसला लेख काढ मापं?

मी चांगल्या लेखाला कधीच नावे ठेवत नाही. :)

तुम्ही स्वतःच्या रुपयांनीसुद्धा पानांचे पार्सल नेता?

अर्थात तुमच्यासारखी "सुलभ" कवीला यमके जुळवणे ही अवघड गोष्ट नाही म्हणा.

आणि शेवटी तर, पोटावर पाय दिलायं! :

मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.

आणि वर पुन्हा आणखी `बुवालिक्स' ची हमी -

क्रमशः

पेरूगेट पासल्या पूना गेस्ट हाऊसच्या जेवणावर सगळी गुजराण झाल्यानं बादशाहीचं कधी प्रेम वाटलं नाही. नंतर बर्‍याच वर्षांनी कोणताही नॉस्टाल्जिया न ठेवता, दोन्हीकडे जेवल्यावर, पहिलाच पर्याय योग्य वाटला.

धन्यानं डायरेक्ट बुवांच्या सोग्यालाच हात घातलायं!

छे हो. मी नाही त्यातला.
बुवा आमचे मित्र आहेत. शिवाय आम्ही सख्खे शेजारी आहोत.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2013 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

@शिवाय आम्ही सख्खे शेजारी आहोत. >>> =)) आणी आता भेटू तेंव्हा अख्खे शेजारी होणार! =))

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा

धन्या.................................................................!!! http://www.sherv.net/cm/emoticons/bad/cowboy-shooting-gun-smiley-emoticon.gif
======================================
तू गाव मला मेल्या... http://www.sherv.net/cm/emo/laughing/evil-laugh-smiley-emoticon.gif मग आतली आणी बाहेरची अश्या दोन्ही कड्या लाऊन घेतो तुला...! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/tommy-submachine-gun.gif

=)) =)) =))

बॅटमॅन's picture

22 Aug 2013 - 3:59 pm | बॅटमॅन

मग आतली आणी बाहेरची अश्या दोन्ही कड्या लाऊन घेतो तुला...!

=)) =)) =)) =)) =))

आत्मूस नक्की का? =)) =)) =)) =))

हे आकाशातल्या बापा, आत्म्याला क्षमा कर!

(आत्मूस-तुमचा फुलटॉस "प्लेड" केला आहे नुस्ता, कांय समजलेंनीत ;) =)) =)) )

प्यारे१'s picture

22 Aug 2013 - 7:48 pm | प्यारे१

हा हा हा हा!

स्पंदना's picture

23 Aug 2013 - 3:35 am | स्पंदना

हा हा हा!!
लोळतेय मी हसुन हसुन!

आत्मुस कड्यांऐवजी गप पुस्तक वापिस करा.
उसका पुस्तक दे दे रे बाबा! (परेश रावल स्टायल)

अद्द्या's picture

22 Aug 2013 - 12:55 pm | अद्द्या

अक्षरशः बादशाही पासून १०० मीटर च्या अंतरावर जवळजवळ ७-८ महिने काढलेत . पण . दुर्दैव म्हणावं माझं . कधी जायचा चान्स नाही मिळाला .

पुढच्या पुणे भेटीत दुपारचं " जेवण " इथेच फिक्श .

लई भारी लेख आत्मे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2013 - 1:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लेख !

बादशाहीमध्ये एकदाच जेवलो आहे कारण आमच्या होस्टेल्पासून ते दूर होते. पण तेथे राहणार्‍या कॉलेजमधल्या विद्यार्थांच्या तोंडी बादशाहीचे नाव सदैव असायचे !

अशीच आठवण आली अलिबागच्या मोघे खाणावळीची. अजुनही ती खाणावळ आहे. व त्यांची आमटी हि खरच अप्रतिम. आज त्यांची तिसरी पिढि खाणावळ चालवते आहे. अ आत्मा साहेब मस्त लेख. फार सुंदर लेख

सौंदाळा's picture

22 Aug 2013 - 2:23 pm | सौंदाळा

नरसोबा वाडीचे सोमण..
खानावळीतले साधे जेवण किती रुचकर असु शकते याचे उत्तम उदाहरण..इथली डाळीची पातळ आमटी म्हणजे स्वर्ग.

सावंतवाडीतली साधले मेस अ‍ॅड करावी..

सौंदाळा's picture

22 Aug 2013 - 2:30 pm | सौंदाळा

वाह गवि काय आठवण काढलीत, खवय्या, खाद्य समीक्षक असावं तर तुमच्यासारखं :)
शाकाहारी जेवणाच्या अशा काही सुंदर जागा आहेत या की इकडे गेल्यावर नेहमी जिभल्या चाटत खाणारे चिकन, मासे पण खाल्ले जाणार नाहीत माझ्याकडुन.

मेघवेडा's picture

22 Aug 2013 - 6:15 pm | मेघवेडा

आणखी वझे @ मालवण.

अनिरुद्ध प's picture

22 Aug 2013 - 2:37 pm | अनिरुद्ध प

सहा महिन्यापुर्वी कामासाठी पुण्याला आलो होतो,जोडीदाराने उदरभरणासाठी बाद्शाहीत जाण्याचा आग्रह धरला,म्हणुन गेलो,मग कळले की थाळी अनलिमिटेड आहे,जेवण उत्क्रुष्ठ होते,गवी यान्नी सान्गितल्याप्रमाणे,गल्ल्याजवळ गर्दि सुद्धा होति,पण लवकरच नाव पुकारले गेले,ताक आमटी उत्क्रुष्ठ तसेच पोळ्यासुद्धा गरमागरम्,आत्मारामजी,धन्स आठ्वणी जाग्या केल्या बद्दल.

आत्मारामजी,धन्स

मज्जा मज्जा ;)

अनिरुद्ध प's picture

22 Aug 2013 - 4:10 pm | अनिरुद्ध प

यात मज्जा मज्जा smiley असे वाटण्यासारखे काय आहे,जरा मलातरी कळुदेकी मी काय मोठा विनोद केला आहे म्हणजे मला सुद्धा मज्जा मज्जा करता येईल.

५-६ वर्षांपुर्वी तिथले वाढपी खाकी चड्ड्या घालायचे. आता प्रमोशन झालंय, पँट घालतात.
पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा इतर खानावळीतील सवई प्रमाणे 'राईस' मागीतला.. त्या चड्डीवाल्या माणसाने इथे राईस मिळत नाही असं सांगीतलं, अन निघुन गेला. थोड्या वेळाने त्याने मला 'भात' वाढला.. :D
अजुनही पाटी-पेन्सिल वापरायची पद्द्त आहे.
हात धुवायच्या बेसिनच्या नळातुन सदाशीव पेठेला शोभेल अशी बचत करणारी बारिक धार येते.
बाकी जेवण १ लंबर.. लै बेस..

गवि's picture

22 Aug 2013 - 2:50 pm | गवि

अगदी अगदी...

नळाची बारीक धार हे अत्यंत खास आणि अचूक निरीक्षण. सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीये पण बादशाहीतल्या बेसिनच्या नळाची ही सूक्ष्म धार हाही तिथल्या वैशिष्ट्याचा अव्वल नमुना आहे.

यसवायजी's picture

22 Aug 2013 - 3:04 pm | यसवायजी

>>सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीय>>>.
स्वारी हां गवी भाऊ.. आमचं तोंड म्हणजे बघा x x x..

--
अजुन एक न आवडलेली गोष्ट-
एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..

हा किस्सा खास गविंना सांगण्यामागील प्रयोजन काय?

यसवायजी's picture

22 Aug 2013 - 5:13 pm | यसवायजी

मी गवींना कधी भेटलो नाही. काही खास प्रयोजन नव्हतं. पण तसं काही असेल तर पुन्ह्यांदा माफी करा गवी भाऊ..

विटेकर's picture

22 Aug 2013 - 2:48 pm | विटेकर

आवडेश ! या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण !
सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे .

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2013 - 4:03 pm | अत्रुप्त आत्मा

@या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण ! >>> आमंत्रण स्विकारण्यात आले आहे! :)

@सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे. >>> =)) खादाड कंपूच्या सणमाणणीय सदश्यांण्णो...आपापले ८० रुपये घेऊन या रे! =))

चला... एक कट्टा बादशाहीला !

नावनोंदणी करा.

कट्टा दिनांक-श्रावण संपून उतार्‍याचा एक दिवस गेल्यानंतरचा..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif - ७ सप्टेंबर...! (आणी शनिवार असल्यामुळे सगळ्यांना जमेलसे वाटते.)

अभ्यागत---

१) विटेकर काका आणी मी...! ;)

२) ....

पक पक पक's picture

22 Aug 2013 - 6:22 pm | पक पक पक

अभ्यागत---

१) विटेकर काका आणी मी...!

२) धन्या अन वल्लिचे कुपन घेउन त्यांच्यासकट मि देखिल.... ;)

अभ्यागत म्हणजे माझ्यासारखे काय ?;-)

आयला अगदी अस्स्स्स्साच पीजे सुचला होता बघ बे मला ;) =))

विटेकर's picture

23 Aug 2013 - 11:28 am | विटेकर

आम्हाला वेळ मंजूर आहे.. आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ?
"पर्वती सफर"याला जोडून घेता येईल का ? नै , जेवण अन लिमिटेड आहे . . जरा तयारीनेच जाऊ या की !
कस्से ? ( डोळा बारिक केल्याची स्मायली ...)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2013 - 7:55 pm | अत्रुप्त आत्मा

@आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ? >>> तेच ना...! मी सिरियसली'च म्हणत होतो... पण कुणीच नावनोंदणी करैत नाहीत. :-/ सगळे जण दु...दु... आहेत. :-/

तिथे आमच्या मधुची गाडीपण जवळच आहे,सकाळी जमू..तिथे नाष्टा हाणू. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif

नंतर उंडारू, http://www.sherv.net/cm/emo/happy/bliss-smiley-emoticon.gif

आणी मग बादशाही...........! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

प्रभाकर पेठकर's picture

23 Aug 2013 - 11:06 pm | प्रभाकर पेठकर

ए! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठेवा न! किंवा निदान तेंव्हा पुन्हा दुसरा कट्टा ठरवा.

बाकी काही म्हणा, उंडारण्याची स्मायली लैच जबरी आहे.

बादशाही मेस मधे अगदी कधीतरी दहा बारा वर्षांपूर्वी जेवलोहोतो.
इकडे साउथ अफ्रीकेत येण्यापूर्वी पुन्हा एकदा बादशाहीत जेवायला गेलो.
तिथले आजोबा ( कै तवकर ) हे कालवश झालेत मात्र बादशाही मेस ची शिस्त आणि अन्नाची चव अबाधीत आहेत.
"क्वालीटी इज अल्टिमेट कस्टमर डिलाईट" हे वाक्य इथूनच घेतल्यासारखे वाटते.
कस्टमर सॅटिस्फिकेशन च्या भलत्या कल्पनाना इथे थारा नाही. मात्र अन्नाची चव / क्वालीटी हे कित्येक वर्षात त्यानी राखलेली आहे. पोटभर आणि घरगुती अन्न जेवायच्या ज्या अपेक्षेने आपण बादशाहीत जातो त्या अपेक्षा तेथे नक्की पूर्ण होतात.

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 5:03 pm | प्रभाकर पेठकर

रामदरा, पुलं उद्यान आणि आता बादशाही थाळी....... भारतभेटीत पुण्यातील अतिआवश्यक गोष्टींची यादी वाढते आहे.

सौंदाळा's picture

22 Aug 2013 - 5:10 pm | सौंदाळा

आणि गोवन थाळी विसरु नका बरं का पेठकरकाका :)

प्रभाकर पेठकर's picture

22 Aug 2013 - 5:18 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: नाही विसरणार.

चौकटराजा's picture

22 Aug 2013 - 5:15 pm | चौकटराजा

.
बुवांचा धागा वाचून मी जेवायला गेलो. मला वरील पाटी वाचावयास मिळाली . अर्थात मी ही चोरूनच फोटो घेतला.
आता बुवांना आत घातले तर पंचाईत.गणपती जवळ आलेत. त्यात चातुर्मासाच सीझन सुरू. अरे बापरे मी चोरूनच
फोटो घेतलाय ! बुवा मला बी घेउनशान जातात काय?

गवि's picture

22 Aug 2013 - 5:29 pm | गवि

ऑ.. ? हे नवीनच दिसतंय. पाट्यांचे फोटो काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई?

अरेरे..

आणि अपमान करण्याबद्दल यांना काय आकर्षण आहे कोण जाणे. कित्येक पाट्यांवर अपमानाची भीती घालतात.

बुवा. ते पहा बुवा.. कायदेशीर मनाई असेल तर पाट्या काढाव्या लागतील. तिथून नव्हे, इथून..

आदिजोशी's picture

22 Aug 2013 - 7:29 pm | आदिजोशी

हे खरी पाटी नव्हे. खर्‍या पाटीवर फोटोशॉप वापरून बनवण्यात आलेली पाटी आहे. ज्यांचे हे रोजचे काम आहे त्यांना एका फटक्यात कळेल. नीट बघितल्यास फोटोशॉपींगच्या काही ठळक चुका लक्षात येतील. अनअनुभवी माणसाने केलेले अत्यंत खराब रिटचींग आहे.

अभ्या..'s picture

22 Aug 2013 - 8:58 pm | अभ्या..

आदी हुश्शार झाला ब्वा.
आता पीएम या पाटीचे:)
मालमत्ता ला एक काना एक्स्ट्रा झालाय. पेंटर लोकांची अलैंमेंट शक्यतो अशी नसते. असा फॉण्ट पेंटर वापरत नाहीत. ब्याक्ग्राउण्डाला कलर असा फासत नाहीत. अक्षरांचे पर्स्स्पेक्तिव्ह गंडले आहे.
सबब हे फोटोशॉप चे कलाकारी काम बादशाहीला शोभत नाही.
धन्यवाद:)

चौकटराजा's picture

22 Aug 2013 - 9:20 pm | चौकटराजा

लेका, धागा बुवाचा आहे ! तिथे पंच महत्वाचा ! तो काय चुकला आहे का तो बोल ! हे रसग्रहण काय चाल्ल्या आहे !

पंच असले की पंच नामा होणारच. बुवाना खाण्यातले कळते आमाला फोटोशॉप मधले कळते.
तरीबी आता तुमी म्हन्ताव म्हनुन, गुरजी लिव्हा हो तुम्ही.
कीपीटप :-D

किसन शिंदे's picture

22 Aug 2013 - 8:59 pm | किसन शिंदे

फोटोशॉप केल्याचं सरळ सरळ दिसतंय. या अ‍ॅड्याची नजर लय बारीक ब्वा! :)

सुबोध खरे's picture

22 Aug 2013 - 6:17 pm | सुबोध खरे

लेख उत्तम आहे
पण बादशाहीचे जेवण तेवढे भावले नाही. पुण्यात प्रथम १९८३ साली गेलो. काका स प ला होते त्यामुळे वडिलांच्या चकरा तेथे होत. वडिलांच्या तोंडून बादशाहीचे नाव ऐकले होते म्हणून एकदा गेलो. पुणेरी भाषेत सडेतोड (मुंबईच्या भाषेत उर्मट) वागणे होते. जेवण "भरपूर" होते पण चव एवढी आवडली नाही. साधारण कोणत्याही खानावळीत असावी तशीच होती. आम्ही खाण्यात जेमतेमच असल्यामुळे भरपूर हा दर्जाच्या निकष नाही.
कदाचित मूळ पुण्याचा नसल्याने एखाद्या गोष्टीचा जसा जाज्वल्य अभिमान असतो तसा नव्हता किंवा जास्त अपेक्षेने गेलो म्हणूनही असेल.कदाचित मुंबईच्या गुजराती/ मारवाडी थाळी देणार्यांचे अगत्य तेथे नव्हते म्हणूनही असेल.
वर्णन यथातथ्य आहे यात वाद नाही आणि तेथील लोकांचे वागणे परत डोळ्यासमोर उभे राहिले.

पक पक पक's picture

22 Aug 2013 - 6:25 pm | पक पक पक

बाकी खाद्य भ्रमंती वरील लेखांची बुवांची बादशाहत या लेखात देखील त्यांनी सिद्ध केली आहे.. :)

बुवा.. लेख नेहमीप्रमाणे भारी!!!

फुलस्केप कागदावरती सूचनांचा भडीमार असणारी; हस्ताक्षरात लिहिलेली, प्लॅस्टीक पेपर स्टेपल केलेली पाटी आता नाहिये का..?

"सुजाण आणि सुसंकृत नागरिक जेवताना मोबाईल वर बोलत नाहीत"

"कृपया आपल्या आवडीची भाजी आहे का याची चौकशी करून टोकन घ्यावे"

(बादशाही पेक्षा "जनसेवा" ची थाळी आवडणारा) मोदक

किसन शिंदे's picture

22 Aug 2013 - 9:04 pm | किसन शिंदे

बुवा लेख फर्मासच!
एक काम का नाही करत, पुण्यातल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल एक लेखमलिकाच सुरू करा ना. तुमची लिहण्याची शैली एकदम खुसखूशीत आहे. त्या मेल्या धन्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, त्याला सवयच आहे कुचकट बोलायची. ;)

प्रचेतस's picture

22 Aug 2013 - 9:08 pm | प्रचेतस

खिक्क.

देवगिरी, धन्या आणि संतापलेले किसनदेव. =))

धमाल मुलगा's picture

22 Aug 2013 - 9:23 pm | धमाल मुलगा

बादशाहीला जाण्याचा योग कधी आलाच नाही. म्हणजे, तशी फार हौसही कधी वाटली नाही, अन 'उपाशी मरेन पण फालतु कारणासाठी अपमान करुन घेणार नाही!' असा बाणा ही जास्त महत्वाची कारणं असावीत. बादशाहीपेक्षा आमची उपस्थिती (कधीमधी) पुना बोर्डिंगला असायची.
बरं, दोस्तांच्या आग्रहाला बळी पडून जावं म्हणावं, तर आमच्यासारख्या तामसी माणसाचं मित्रमंडळ आणि काय वेगळं असणार? बादशाहीसदृश ठिकाणी जेवण्यापेक्षा आम्ही पडीक असायचो ते 'आवारे खानावळीत' :) आवारेमध्ये मेस लावणार्‍या काही होपलेस केसेसपैकी आम्हीही एक. सकाळी मटण, रात्री चिकन असा दणकून बेत....रोजचा! शेवटी डॉक्टरनं शिव्या घातल्यावर आवारेच्या वार्‍या थांबल्या.

तर ते असोच. बादशाहीचं बहुत कौतुक ऐकलं आहे, पुढेही ऐकत राहूच. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या ठिकाणचं आकर्षण असं कधी वाटलंच नाही.

चौकटराजा's picture

22 Aug 2013 - 9:27 pm | चौकटराजा

गुरूवारची पुना बोरर्डिंगाची मुगाच्या डाळीची खिचडी व वाटीतले दही ! वा ! वा!

धमाल मुलगा's picture

22 Aug 2013 - 9:40 pm | धमाल मुलगा

डाळिंब्यांची उसळ! :)

पैसा's picture

23 Aug 2013 - 12:07 am | पैसा

आणि धन्याने केलेले रसग्रहण सुद्धा भारी आहे! का कोण जाणे आज सकाळीच धन्याने केलेले एक रसग्रहण आठवले होते! =))

शशिकांत ओक's picture

23 Aug 2013 - 12:17 am | शशिकांत ओक

'नाम में क्या लिखा है' म्हणतात पण बाद शाही या नामामधे 'शाही' म्हणजे रॉयल असे विशेषण आहे ते पुर्णपणे 'बाद' म्हणजे खारिज़ आहे असे सुचवून त्यातील पितळी तांब्या-भांडी व ठोकळेबाज बाकडी व खुर्च्या 'टोकनधारी इसमांना 'चला आटपा लवकर' असे नकळत सुचवत, चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.