वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 Aug 2013 - 11:40 pm

वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम

वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २)
वेरूळः भाग १ (जैन लेणी)
वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी)
वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

मागच्या भागात आपण वेरूळच्या मुख्य कैलास मंदिराला फेरी मारून रामायणाच्या शिल्पपटापर्यंत आलो होतो. तर चला आता आता त्यापुढील काही शिल्पांचा आस्वाद घेत घेत सभामंडपात प्रवेश करूयात.

१. रामायणाच्या शिल्पपटाच्या पुढेच पद्मासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाचे एक शिल्प आहे.
a

जटायूवध

रामायणाच्या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस रावण आणि जटायू यांच्या युद्धाचा प्रसग कोरलेला आहे.
सीतेला आकाशागामी रथातून पळवून नेत असलेल्या रावणाला पाहून जटायू त्याच्यावर त्वेषाने हल्ला चढवत आहे. रावणाचे शरीर एका दिशेला तर रथाचे घोडे तो रथ विरुद्ध दिशेस वाहून नेत आहेत. चावे घेत असलेया जटायूचा वध करण्यासाठी एका हाताने रथाचे चक्र तर दुसर्‍या हातात शक्ती धारण केली आहे.

२. जटायूवध

a

ह्याच जटायूवधाच्या पुढील बाजूस वाली सुग्रीव युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे.

वालीवध

हा शिल्पपट दोन पॅनल्समध्ये विभागला गेलाय. वरच्या पॅनलमध्ये वाली आणि सुग्रीव एकमेकांशी द्वंद्वयुद्ध करताना दाखवले आहेत. तर खालच्या पॅनलमध्ये वालीचे मृत शरीर कवटाळून सुग्रीव दु:ख करीत बसला आहे तर वालीपत्नी तारा धाय मोकलून रडत आहे. तर बाजूला राम लक्ष्मण त्यांचे सांत्वन करायला आलेले दर्शविले आहे. रामाच्या हातून कपटाने वालीवध होण्याचा प्रसंग मात्र येथे कोरलेला नाही हे विशेष.

३. वालीवध

a

लकुलीश शिव

या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस उर्ध्वरेता अवस्थेतील लकुलीश शिवाची मूर्ती आहे. चार हस्त असलेली ही मूर्ती उभ्या अवस्थेत आहे. डावा हात अभयमुद्रेत असून उजव्या हाती त्याने लगूड धारण केले आहे.

४. लकुलीश शिव
a

५. ब्रह्मदेव
लकुलीशाच्या थोडे पुढेच ब्रह्मदेवाची अजून एक मूर्ती आहे. ह्याची दाढी अगदी इजिप्शियन फेरोंसारखी निमुळती आणि लांब आहे.

a

नरसिंह

ह्या भिंतींवरच नरसिंहाची दोन आगळीवेगळी शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे हिरण्यकश्यपूचे विदारण करणार्‍या नरसिंहाचे शिल्प सर्रास दिसते, तशी येथेही आहेतच तथापि ही शिल्पे विदारण करण्याआधी झालेल्या द्वंद्वाची आहेत.

६. नरसिंह-हिरण्यकश्यपू द्वंद्व.
a-a

ह्याच्या पुढील भागात गजेन्द्रमोक्षाचा प्रसंग कोरलेला आहे.

गजेंद्रमोक्ष

विष्णूचा परमभक्त इंद्रद्युम्न राजा पर्वतावर विष्णूचरणी लीन होण्यासाठी कठोर तप करत असता तिथे अगत्स्य ऋषी येतात. तपात मग्न झालेल्या राजाचे अगत्स्यांकडे लक्ष जात नाही तेव्हा संतापलेले अगत्स्यमुनी राजास पुढील जन्मी हत्ती होशील असा शाप देतात. पुढील जन्मी हत्ती झालेला गजेंद्र इतर हत्तींसोबत सरोवरात जलक्रीडा करण्यासाठी उतरला असता एक मगर त्याचा पाय धरून सरोवरात त्याला ओढू लागते. आपल्या पूर्वजन्माचे स्मरण असलेला गजेन्द्र त्याही अवस्थेत विष्णूची मदतीसाठी स्तोत्रगायन करून प्रार्थना करतो. तेव्हा विष्णू गरूडावरून बसून थेथे येऊन मगरीच्या तावडीतून गजेन्द्राची सुटका करून त्याला मोक्ष प्रदान करतात अशी ही कथा.

७. गजेन्द्रमोक्ष

a

अंधकासुर-गजासुर वध

गजेन्द्रमोक्षाच्या शेजारीच अंधकासुरवधाचे शिल्प पुन्हा एकदा आपल्यासमोर येते. हे शिल्प मात्र काहीसे आगळे आहे. नीलासुर, गजासुर अआणि अंधकासुर अशा ती असुरांचा वध एकाच वेळी शिव करत असल्याचे येथे दाखविले आहे.
शंकराने आपला एक पाय नीलासुराच्या मस्तकी दाबून धरलेला आहे. तर गजासुराला फाडल्यामुळे आपले हत्तीचे रूप त्यागून गजासुर आपल्या मूळ राक्षरूपात प्रकट झाला असून त्याचा चेहरा वेदनांमुळे भयानकरीत्या वाकडातिकडा झालेला आहे. तर वरील बाजूस शिवाने आपला त्रिशुळ अंधकासुराच्या छातीत खुपसून त्याला त्रिशुळावरच तोलून धरले आहे आणि एका हाता वाडगा धरून त्याच्या शरीरातले रक्त तो त्यात गोळा करत आहे. वाडग्यातून चुकून निसटलेले रक्त खाली पडून त्यापासून अजून रा़क्षस निर्माण होऊ नये म्हणून सप्तमातृकांतील एकीनेही अजून एक वाडगा उंच धरीला आहे. तर तिच्या शेजारी पार्वती प्रसन्नमुद्रेत बसून आपल्या पतीचा पराक्रम निरखीत आहे.

८. राक्षसवध
a

ही शिल्प बघून आम्ही आता सोपान चढून सभामंडपात जाण्यासाठी निघालो.
सभामंडपात प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर आहे लिंगोद्भव शिवाची मूर्ती.

लिंगोद्भव

एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
ह्या शिल्पपटात खालील बाजूस वराहरूपी विष्णू स्तंभाचा तळ शोधत असताना दाखविले आहेत तर वरील बाजूस उजवीकडे चतुर्मुखी ब्रह्मदेव स्तंभाचा वरील भाग शोधत आहेत. आदी अंताचा कसलाही थांग न लागल्याने शेवटी ते लिंगरूपी स्तंभातून प्रकट झालेल्या शिवाला शरण गेलेले आहेत.

९. लिंगोद्भव शिवप्रतिमा

a

नंदीमंडप

आता मंदिराच्या बाह्यभागावरची शिल्पे पाहून आम्ही सभामंडपात प्रवेश करतो झालो. अरेच्चा, पण त्याआधी नंदीमंडपात जाऊन एक छोटासा फेरफटका मारायलाच हवा.
सभामंडपाच्या पुढ्यातल्या सेतूवरून पुढे जाताच नंदीमंडप लागतो. दुर्दैवाने इथले फोटो मजकडून काढायचे राहिले. मंडपात नंदीची भग्न मूर्ती आहे. मंडपाचे शिखर द्राविडि पद्धतीचेच असून शिखराच्या गोपुरावर यक्ष वाद्ये वाजवत असल्याचे दृश्य कोरले आहे. जणू हा नंदीमंडपाच्या सुरुवातीस असलेला वाद्यमंडपच आहे असे ते सुचित करत आहेत. नंदीमंडपातन वेरूळच्या दोन्ही स्तंभांचे सुरेख दर्शन होते.

१०. नंदीमंडपाच्या गोपुरावरील वाद्ये वाजवणारे यक्ष
a

११. नंदीमंडपातून दिसणार्‍या वेरूळ लेणीतील बाह्य भिंतींवर कोरलेल्या इतर मूर्ती

a

आता परत फिरून चला आता सभामंडपात

सभामंडप

कैलास लेणीमंदिरातील सभामंडप एकूण १६ स्तंभावर तोललेला असून प्रत्येक स्तंभ सालंकृत असून त्यावर देवीदेवतांची शिल्पे, पौराणिक कथांमधील प्रसंग शिवाय अगदी मैथुनशिल्पेही कोरलेली आहेत. पण सभामंडपातील सर्वात मोठे आकर्षण आहे ते इथल्या छतावरील चित्रांचे. अर्थात सभामंडप अंधारी असल्याने चित्रे पाहण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. किंचित अजिंठा शैलीतली ही चित्रकला यानंतर नामशेष झाली. या खेरीज सभामंडपाच्या छतावर बरोबर मध्यभागी नटराज शिवाचे एक अप्रतिम शिल्प कोरलेले आहे.

१२. सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे
a-a-a

१३. सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे

a-a-a

१४. छतावरील नृत्यांगना

a

१५. छतावरील नृत्यांगना

a

अंतराल

येथून पुढे जाताच लागतो तो अंतराल, म्हणजेच सभामंडप आणि गर्भगृह यांमधील चिंचोळा भाग.
अंतराळाच्या एका बिंतीवर नंदीवर बसलेल्या गौरीशंकराचे शिल्प आहे तर दुसर्‍या भिंतीवर वरील बाजूस कमंडलू घेतलेली अन्नपूर्णा व तिच्या डावी-उजवीकडे ब्रह्मा आणि विष्णू आहेत. तर त्याच्या खालच्या बाजूस शिवपार्वती अक्षक्रीडेचा भग्नावस्थेतील देखावा आहे.

१६. गौरीशंकर
a

गर्भगृह

अंतराळातून आपला प्रवेश होतो ते थेट गर्भगृहात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूस उभी आहे मकरारूढ गंगा तर दुसर्‍या बाजूस आहे ती कूर्मवाहनी यमुना व गर्भगृहाच्या आतमध्ये आहे ते एकेकाळी हिरेमाणकांनी जडवलेले लखलखते शिवलिंग. ज्याची पूजा एकेकाळी राष्ट्रकूट आणि तदनंतर यादवांच्या वैभवशाली सत्ताधीशांद्वारे.

१७. कैलास शिवलिंग दर्शन
a

उपमंदिरे

दर्शन घेऊन परत सभामंडपात आलो. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना अर्धमंडप आहेत. तिकडे जाण्यासाठी सभामंडपातूनच दरवाजे कोरलेले आहेत. ह्याच प्रवेशद्वारांतून बाहेर पडून आपण पाच लहान उपमंदिरांपाशी येतो. अर्धमंडपातील स्तंभ अतिशय देखणे असून त्यांजवरही कित्येक प्रसंग कोरलेले आहेत.

१८. अर्धमंडपातील स्तंभ
a

अर्धमंडपातून बाहेर पडून आम्ही उपमंदिरांपाशी आलो. या एकाही उपमंदिरात सध्या मूर्ती नाहीत. पण ह्यांची शिखरे अतिशय सुरेख कोरलेली आहेत तसेच उपमंदिरांवर बाहेरील भागात तसेच त्याच्या भोवतीच्या मुख्य मंदिराच्या भिंतीवर काही अप्रतिम भित्तीशिल्पे आहेत.

१९. असुरावर पाय देऊन उभा असलेली शिवमूर्ती

a

२०. एका हाती नाग तर दुसर्‍या हाती त्रिशुळावर नरमुंड धारण केलेला भैरव शिव

a

२१. ही बहुधा रूमा आणि सुग्रीवाची युगुलमूर्ती असावी.
a

२२. भिंतीवरील ही विद्याधर मूर्ती माझे अतिशय आवडीचे शिल्प

a

२३. उपमंदिराची रचना
a

मंदिराच्या ह्या भागात इतकी देखणी शिल्पकला आहे की येथेली सर्वच चित्रे येथे देणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे तरी वर दिलेल्या शिल्पाकृतींमधून इकडील सौंदर्याची पुरेशी कल्पना यावी.

ही सर्व शिल्पे बघत बघतच आम्ही दुसर्या बाजूने सभामंडपात आलो व तेथून बाहेर पडून सोपान उतरून परत कैलास मंदिराच्या प्रांगणात आलो. पण कैलास लेणे बघणे येथेच संपत नाही. त्याचे आतापर्यंत लपलेले सौंदर्य बघण्यासाठी आपल्याला लेणीमंदिराच्या पूर्ण बाहेर जाऊन त्याच्या बाजूच्या डोंगरावर जावे लागते.

डोंगरावर

मंदिर बघूनच बाहेर आलो. उजव्या बाजूस असलेल्या पायर्‍या चढून डोंगरावर आलो. येथेच उजवीकडे एक लहानसे लेणे खोदलेले आहे. मला तरी ते वेरूळचे मुख्य लेणे खोदण्याआधी केलेले त्याचे एक प्रारूपच वाटले.

२४. कैलासाचेच एक उपलेणे

a

डोंगरावरून वेरूळ लेणीचे अप्रतिम दर्शन होते.

२५. नंदीमंडप व त्यावरील सभामंडपाला सांधणारा सेतू

a

येथून पुढे नजर जाताच आपल्याला सभामंडपाचे छत दिसते. खालच्या बाजूने कधी न दिसून येणारा हा भाग. मध्यभागी कमळपुष्पासारखी नक्षी असलेल्या भागावर चार अतिशय देखणे सिंह कोरलेले आहेत. जणू त्यांनी छतावर फेर धरलेला आहे.

२६. सभामंडपाचे छत

a

२७. सिंह अधिक जवळून

a

सभामंडपाच्या छतावरून पुधे नजर फिरवताच येतो तो गर्भगृहाचा कळस. हा मात्र शिखरयुक्त असून यावर अतिशय देखणे नकसकाम केलेले आहे.

२८. गाभार्‍यावरील कळस
a

२९. कैलास एकाश्ममंदिराची संपूर्ण रचना
a

हे सर्व वैभव बघता बघताच सूर्य मावळतीकडे झुकू लागला, अंधाराचा जोर वाढू लागला. पायर्‍या उतरून आम्ही भराभर खाली आलो. वेरूळ कैलास मंदिर बर्‍यापैकी पाहून झाले होते. संपूर्ण नव्हेच. नुसते कैलास मंदिर संपूर्णपणे व्यवस्थित बघायला किमान तीन दिवस हवेत. सध्यातरी आम्हास ते शक्य नव्हते. नाईलाजाने आम्ही पुढे निघालो.

बौद्ध लेणींची झलक

१ ते १५ क्रमांकाची लेणी बघायची राहिली होतीच. पण वाढत जाणार्‍या अधारामुळे ते काही शक्य झाले नाही. १५ व्या क्रमांकाचे लेणे तर कैलास मंदिराखालोखाल महत्वाचे. दशावतार लेणे. पण ते काही ह्यावेळी तरी नशिबात नव्हते. तसेच थोडे पुढे जाऊन लेणी क्र. १० च्या चैत्यगृहापाशी पोहोचलो. हे बौद्ध लेणे. अंधूक उजेडात कशीबशी यावर फक्त नजर मारता आली.
भारावलेल्या तरीही अस्वथ मनानेच आम्ही लेणीसमूहातून बाहेर पडलो ते परत इथे यायचा निश्यय करूनच.

३०. लेणी क्र. १०. चैत्यगृह

a

३१. अंधूक प्रकाशातून होणार्‍या सुरुवातीच्या काही बौद्ध लेणींचे दर्शन

a

ऋणनिर्देशः गेले काही महिने औरंगाबाद सहलीवर ही मालिका मी लिहित होतो. ह्यात अजिंठा, वेरूळ यांच्यावर लिहिले गेले, किसनदेवांनी देवगिरीच्या दुर्गम दुर्गावर लिहिले तसेच परत पुण्यास जाताना वाटेत टोका गावात प्रवरासंगमातीरी असलेल्या शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिराचे दर्शनही झाले. एकंदरीत ही सहल अतिशय सुंदर झाली. किसनदेव, धन्या, दिनेश अगदी मनापासून सहभागी झाले होते. बिरूटे सरांचे मला खास आभार मानावेसे वाटतात. त्यांच्या सहभागाशिवाय ही सहल पूर्ण होऊच शकली नसती. वेरूळ दर्शन त्यांच्या मार्गदर्शनाने खूपच सुलभ झाले. आतापर्यंत फक्त जालीय ओळख असलेला हा माणूस प्रथम भेटीतच इतका जवळचा होऊ शकतो, आपला वाटू शकतो ही मिपाचीच किमया. सरांनी अतिशय जंगी पाहुणचार केला. भरपूर गप्पा टप्पा, उत्तमोत्तम जेवणे झाली. दुसर्‍या दिवशी झालेल्या अजिंठा लेणीदर्शनास सर नव्हते पण संध्याकाळी इतक्या उशिराही ते आमच्यासाठी थांबून होते, नव्हे तर त्यांनी आमची मुक्कामाची सोय सरकारी गेस्टहाऊसवर करून दिली. त्या रात्री बीबी का मकबरा पाहिला गेला. तिसर्‍या दिवशी सकाळी देवगिरी पाहून औरंगाबाद सोडले तर नगर फाट्यावर बिरूटे सर आम्हास निरोप देण्यासाठी वेळात वेळ काढून आले होते. त्यांसोबत अजून एक मिपाकर श्रुती कुलकर्णी ह्यासुद्ध्या आम्हाला भेटायला आल्या होत्या. थोडावेळ गप्पा मारून परतीच्या प्रवासास निघालो व रात्री पुण्यास पोहोचलो.

किमान एक दोन तरी ग्रूप फोटो हवेतच.

३२. जैन लेणीच्या ओसरीत बसलेले मिपाकर

a

३३. वेरूळ लेणीच्या बाहेर शेवटी

a

अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल.

तोवर समाप्त.

धन्यवाद. _/\_

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

6 Aug 2013 - 12:26 am | किसन शिंदे

शेवटचा भाग थोडा त्रोटक वाटलाय. तिथल्या अप्रतिम शिल्पांवर तुला यापेक्षा संक्षिप्त लिहीता येईल याची जाणीव आहे. वेरूळची हि एकुण लेखमालिका मी वाचलेल्या काही सर्वोत्तम लेखमालिकेंपैकी एक आहे. ज्या सखोलतेने हे लेखन झालंय यावरून ती शिल्पे तू समोर आलास कि सजीव होऊन तुला आपला इतिहास सांगत असावी असं वाटतं.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Aug 2013 - 8:28 pm | अत्रुप्त आत्मा

@यावरून ती शिल्पे तू समोर आलास कि सजीव होऊन तुला आपला इतिहास सांगत असावी असं वाटतं.>>> क्या बोल्या...! क्या बोल्या...! किसनद्येव क्या बोल्या...! बस्स... अब हम कुछ नही बोलेंगा।

किसनदेवांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी पण एक साक्षिदार आहे... (या वेळी मला मध्यंतरी झालेली पेडगाव ट्रीप प्रचंड अठवते आहे...! ) मला अभ्यासक लोकांचं नेहमीच भय वाटत आलेलं आहे.(शाळेपासून!)...पण वल्लींबरोबर अत्तापर्यंत जिथे/जिथे भेट दिली,त्या सर्व लेण्या-मंदिरे ह्यांचे जिवंत दर्शन मला झालेले आहे. नै तर आमची आपली बुद्धी-फार तर सौंदर्यवाचक होते...! ह्या पलिकडे त्या शिल्पांचा,त्यातील परस्पर अन्वयांचा अर्थ वगैरे लागण्याचा संमंधच नाही,म्हणजे आपल्या पैकी कुणी म्हणेल,की "तुमचा अभ्यासच नाही,तर अर्थ काय लावणार तुंम्ही?उगीच कायच्या-काय बोल्ता का?''
पण खरी मेख इथेही नाही. आंम्ही पेडगावला (बहाद्दुरगड) मधे पहिल्या मंदिराच्या अवारातून शिल्प पहायला सुरवात केली,मंदिराच्या आवारा-बाहेर पडलेले अनेक वीरगळ इत्यादी दिसत होते... त्याच्यापुढे एका मोठ्या पसरट शिळेवर मला देवी आणी तिच्या डोक्याबाजुनी गेलेले कमळं घेतलेले हात दिसले? (अता खरी गम्मत पुढे आहे..हे चित्र आपण क्यालेंडरांवर आणी अनेक ठिकाणी बघतो!...पण मला ती पटकन आकलन होणारी दृष्टीच नाही) मी वल्लीला हाक मारली आणी अत्यंत मूढपणानी-"ही कोणती देवी वाटते हो?..नै म्हणजे हात लैच अवघडलेत!" अशी विचारणा केल्यावर,वल्ली म्हणतात--"अहो बुवा,ही गजलक्ष्मी आहे,बघा ना..ते हात नैत काही..ते हत्तींच्या सोंडा आहेत कडेनी...लक्ष्मीवर पाण्यचा अभिषेक करणारे हत्ती...!" नंतर मी मनातल्या मनात (खरच) हत्तीच्या! -असं म्हणालो! अता हा फोटू हल्ली सर्वत्र दिसतो..(वल्ली-तो फोटू टाका हो हितं..मंजे कळेल) फक्त तो अत्ताच्या काळातला आहे. म्हणजे अता पाण्याच्या जागी पैसा,ही अत्ताच्या जगातली सगळ्यात महागडी गोष्ट..हत्ती सोंडेतून आमच्या लक्ष्मीमातेवर अभिषेकीत असतात.
============
अता हे मी माझ्यापरिनी एका अत्यंत छोट्या गोष्टीचं केलेलं मोठ्ठं वर्णन आहे,(अशी सगळी वर्णनं केली तर आमच्या अज्ञानीपणाचाही एक इति हास निर्माण होइल. :) ) ज्यांनी वल्लींबरोबर लेणी/मंदिरं पाहिली त्यांना माझ्या बोलण्यातील गमती कळतील. असो...
============

आज या निमित्तानी मी गेल्या ३ भटकंत्यांमधे मांडलेला विचार किसनदेवांसमोर ठेवतो, वल्लींनी ही मंदिरं/लेण्या माहिती देत-देत दाखवायच्या. आणी आपल्यापैकी किंवा प्रोफेशनल अश्या कुणीतरी ते सर्व व्हिडिओ शुटमधे नजरबंद करायचं! हा माझ्या मनातला उपक्रम आहे. बेडसे पासून सुरवात! तेंव्हा बोला..सर्व मिपाकरहो..हे किती अप्रतिम होइल!!! कित्तीही वेळ लागू दे..कमी/जास्त कसंही होऊ दे... लेकिन होना मंग्ता है। :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2013 - 9:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्या सखोलतेने हे लेखन झालंय यावरून ती शिल्पे तू समोर आलास कि सजीव होऊन तुला आपला इतिहास सांगत असावी असं वाटतं.

+११११११.

अजंता व वेरूळ खूप पुर्वी बघितलं तेव्हाही मोजकीच माहिती असूनही फार प्रभावित झालो होतो. मात्र हे वर्णन वाचून आणि चित्रे बघून वर किसनदेवांनी म्हटल्यासारखाच अनुभव आला. अनेकानेक धन्यवाद !

आता पुढच्या ट्रीपला या लेखांची प्रिंटाऊट घेवून जाईन रे!

धन्स!!!! :-)

चौकटराजा's picture

7 Aug 2013 - 9:05 am | चौकटराजा

एका प्रिटला वल्लीला किमान एक मिसळ द्या कवीकडे ! ( व आमच्याकडे हा व्यवहार नोटरीफाय करा ! चार्ज एक मिसळ
उगीच जादा पाव न मागता !!! )

यशोधरा's picture

6 Aug 2013 - 9:45 am | यशोधरा

सुरेख.

सौंदाळा's picture

6 Aug 2013 - 11:03 am | सौंदाळा

सुंदर वर्णन,
औरंगाबाद आणि आजुबाजुची पर्यटन स्थळे बघायला मज्जा येते पण पुर्ण वेळ देऊन बघायची इच्छा अजुन अपुर्णच आहे.
बिबी का मकबरा, पाणचक्की, वेरुळ, अजंठा, घ्रुष्णेशवर, भद्रा मारुती, म्हैसमाळ, दौलताबाद, पैठण, नाथसागर जलाशय आणि उद्यान..१० दिवस तरी पाहीजेत.

मुक्त विहारि's picture

6 Aug 2013 - 12:39 pm | मुक्त विहारि

आवडली..

तुम्हा सर्वांची भेट घेतली पण तुम्हा सर्वांसोबत सहलीचा आनंद नाही घेता आला ह्याचेच जास्त दुख होता आहे . :(
वल्ली नेहमिप्रमानेच अतिशय अप्रतिम वर्णन व फोटु दोन्हि हि मस्तच...!

आणि त्याच बरोबर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा … !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2013 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीशेठ, पूर्वीही म्हटलं आहे आणि पुन्हा म्हणतो की लेणी दर्शन आणि भटकंती करावी ती तुमच्या बरोबरच. हं, प्रत्येक्ष लेणी पाहतांना तुम्ही तितकं बोलत नाही. (आता एवढं तेवढं चालायचंच) क्यामेरा आणि शिल्प यांचाच तेव्हा संवाद चाललेला असतो. बाकी, शिल्प कोणतही असो, ते काय आहे आणि ती कथा काय त्याची स्टोरी सांगावी ती वल्ली यांनीच. यापूर्वी लेणी अनेकादा बघितली आहे, पुस्तकही चाळले आहेच पण ही लेखमाला केवळ अप्रतिम आणि अप्रतिमच. म्हणजे यापुढे जेव्हा कोणा संबंधितांबरोबर वेरुळला गेलो तर अगोदर ही लेखमाला वाचायची सांगेन आणि नंतर वेरुळ भेट. बाकी, ऋणाबद्दलच्या उल्लेखाबद्दल आभार. पण, सांगु का वल्लीशेठ आमचं असं आहे....एकदा माणुस आवडला आणि मैत्रीचे धागे जुळले की फ़ीर हमसा दोस्त कोयी नही. वल्ली, धन्या, किसन... ही दोस्त मंडळी ही या ट्रीपची देण आहे. असो, कौतुक पुराण आवरतो.

आणि वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!!! वल्लीशेठकडून असे उत्तमोत्तम लेखन येऊ दे, यासाठीही खुप खुप शुभेच्छा...!!!

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2013 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, आपण चांदण्या रात्री मकबरा पाहिला तेव्हा आपण स्वगतासारखं बोलत होतो तो प्रसंग... साला मला सर्वात हीट
वाट्ला. काही 'कविता' 'बिविता' आठवल्या... शहाजहान आणि मुमताज आठवली .... आणि तुम्ही तेव्हा मकबरा आणि चंद्राचे फोटोचे काढल्याचे स्मरते. तेव्हा त्याचा चंद्र आणि मकबरा यांचा एखादा फोटो टाकाच म्हणतो. ईद का चांद आजच पाहुन घेऊ. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

6 Aug 2013 - 10:20 pm | प्रचेतस

धन्यवाद सर.
मकबरापासच्या बैठकीत गप्पा खूपच रंगल्या होत्या. मिनाराच्या पार्श्वभूमीवर चंद्र खूपच सुरेख दिसत होता.
मिनाराच्या पार्श्वभूमीवरील चंद्राचा फोटो नीट आला नाही मात्र त्याचवेळी नुसत्या चंद्राचा मात्र घेता आला.

ही ती चंद्रकोर
a

आणि हा तो मकबरा
a

लै जबरी फोटो अन तितकेच मस्त वर्णन. छतावरचे सिंह आणि तीन असुरांना मारण्याचे शिल्प सर्वांत जास्त आवडले. पण तरी रामायण-महाभारताचा शिल्पपट सगळ्यांत जास्त आवडला यापेक्षा.

विद्याधराची मूर्ती लै आवडती म्हणून लिहिले आहे, त्याच्या डाव्या हातात काय आहे? पुस्तक वगैरे काही?

विद्याधराची मूर्ती लै आवडती म्हणून लिहिले आहे, त्याच्या डाव्या हातात काय आहे? पुस्तक वगैरे काही?

ते नीटसे काही कळत नाही पण बहुधा मृदंगदृश एखादे तालवाद्य असावे आणो तो ते वाजवत आहे.

त्याच्या शेजारीच असलेला अजून हा एक नितांतसुंदर विद्याधर बघ.
a

ओक्के. हा विद्याधरसुद्धा मस्त जबरी देखणा आहे!

बायदवे याला विद्याधर का म्हणायचे? ब्याकग्रौंड काये?

प्रचेतस's picture

7 Aug 2013 - 1:09 pm | प्रचेतस

मूळात हे आकाशगामी आहेत. प्रत्येकाच्या हाती काही ना काही वाद्य तरी आहे किवा हे नर्तन तरीकरत आहेत. गंधर्वांशी यांचेबरेचसे साम्य दिसते.

बॅटमॅन's picture

7 Aug 2013 - 4:03 pm | बॅटमॅन

धन्स! ते यक्ष-किन्नर-चारण-गंधर्व यांपैकी कुठेतरी फिट्ट व्हावेत तर एकूण.

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 4:45 pm | अनिरुद्ध प

विद्याधर हे यक्श किन्न्रन्च्या वर्च्या पातळिवरचे आहेत असे ऐकिवात आहे,चु भु दे घे,

पैसा's picture

6 Aug 2013 - 9:40 pm | पैसा

वल्लीच्या वाढदिवसाची आम्हाला भेट! आता लवकरात लवकर तुला रजा मिळू दे आणि परत वेरूळ फेरी होऊ दे हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Aug 2013 - 10:22 pm | लॉरी टांगटूंगकर

खत्तर्नाक!
एक बाळबोध प्रश्न, फ्लॅश वापरला तर त्या गडद सावल्या कमी करता येतील तसं का करत नाही ??
संध्याकाळच्या प्रकाशातले फोटो जब्रा आवडलेत.

आता लवकर इकडे सौथ कर्णाटककडे दौरा काढणे.

लेण्यांचे फोटो काढण्याच्या बाबतीत फ्लॅशचा फारसा उपयोग होत नाही. प्रकाश जास्त पडून फोटो ओव्हरएक्स्पोज होतात.

कर्णाटक दौरा आता प्रस्तावित आहेच. :)

कर्णातक दौर्‍यानंतर तमिळनाडू दौराही लौकरच करावा. बृहदीश्वरर मंदिरावरचे १०० पानी इन्स्क्रिप्शन आपली वाट पाहते आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Aug 2013 - 12:23 am | लॉरी टांगटूंगकर

बृहदीश्वरर मंदिर म्हण्जे शंकराचे मंदिर, तंजावरचे बरोबर ना ?
कंबोडियापर्यंत राजाराज चोला (का राजाधिराज चोला?)चा व्यापार होता. तिथल्या Angkor Wat ची रचना चोला पद्धतीची आहे.
गंगैकोन्द चोलापुरम आणि ऐरावतेश्वर मंदीरांबद्दल (कुंभकोणम) पण लै ऐकलंय.
एकंदर तामिळनाडूचा इतिहास लै इंत्रेष्टिंग आहे. जमल्यास यावर लिहा रे, मी लै शोधाशोध केली मला फारसं काहीच सापडलं नाही.

बॅटमॅन's picture

13 Aug 2013 - 4:30 pm | बॅटमॅन

येप्प, तेच ते.

तमिळनाडूची मंदिरे हे एक वेगळंच प्रकरण आहे. इतकी भव्यदिव्य देवळे अजून कुठे बघायला नै मिळायची. याबद्दल कैक ठिकाणी लिहिले गेलेले आहे, पण एकदा तिथे जाऊन आले पाहिजे मगच ते लिखाण उत्तम होईल.

चौकटराजा's picture

7 Aug 2013 - 9:16 am | चौकटराजा

वेरूळ मी दोनदा पाहिले आहे. पण असा चिकित्सेने , आस्वादकतेने पाहिलेले नाही. वल्ली बुवांचे इतिहास पुराण हा एक मस्त अनुभव असतो. वल्ली च्या प्रस्तावित कर्नाटक दौर्‍यात सामील व्हायला त्यामुळेच आवडेल ! बाकी ही मालिका फारच माहितीपूर्ण.
@ वल्ली . ते प्रारूप कदाचित पायलट कार्व्हिंग म्हणून केलेले असावे .कारण एवढी मोठी कलाकारी करायची तर ती
perspective view मधे कशी दिसेल याची उत्सुकता कारागिरांच्या म्होरक्याला ही असावी. किंवा जे कोणी प्रायोजक राजे असतील त्यानाही दाखविण्यासाठी बनवले असेल. अनेक शक्यता आहेत.

स्पा's picture

7 Aug 2013 - 9:46 am | स्पा

अप्रतिम

शेवटचा भाग कळस झालाय.. कडक फटू काढलेस // सगळे Angels भारी
संग्रही ठेवण्यासारखी लेखमाला

आभार

सार्थबोध's picture

7 Aug 2013 - 9:51 am | सार्थबोध

सुरेख … आवडले लिखाण , छायाचित्रे विशेष छान

मदनबाण's picture

7 Aug 2013 - 10:24 am | मदनबाण

माहितीपूर्ण लेखमालिका...

सौरभ उप्स's picture

7 Aug 2013 - 10:50 am | सौरभ उप्स

मस्तच रे वल्लि.......

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 3:35 pm | सस्नेह

ही आमची वेरूळची लेणी इतकी सुंदर आहेत ?
वल्लीच्या चष्म्यातून आणखी एकदा पाहायलाच हवी !

Bhagwanta Wayal's picture

7 Aug 2013 - 4:40 pm | Bhagwanta Wayal

केवळ अप्रतिम...!

वल्ली तुला माझ्यावतीने मिपाची ट्रॉफी बक्षीस.
तूच खरा मिपाचा शिलेदार,होतकरु,अभ्यासू आणि व्यासंगी शिलेदार
औपचारीक बक्षीस समारम्भ आपण तू इकडे आल्यावर करुयात:)ट्रॉफी द्यायला प्रा डॉ साह्यबांना बोलवुयात. :)
t

मिपा गौरव असे लिहायला विसरलास का रे

अरे स्पावड्या ती मिपाचा कुमार गौरव वेगळी ट्रॉफी आहे. ती वल्लीला नाही द्यायची.;)
आपला पन्नासदादा करणार होता बे मिपा अ‍ॅवार्ड वितरण. कुठे गायबलाय सध्या कुणास ठऊक. :(

बस कर पगले, अब रूलायेगा क्या? =)) =)) =))

चित्रगुप्त's picture

9 Aug 2013 - 8:28 pm | चित्रगुप्त

फारच सुंदर लेखमाला झाली. सर्व फोटो अप्रतीम.
ब्रह्मदेव,शिवशंकर इ.च्या आणि इतर बर्‍याच फोटोतून या सर्व मूर्त्या (आणि एकाश्म मंदिर वगैरे सर्वच) कधीकाळी प्लास्टर आणि रंगांनी झाकलेले असावे, असे वाटते, याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?
आपल्याला या मूर्त्या आता आहेत तश्या बघण्याची इतकी सवय झालेली असते, की त्या रंगीत असताना कश्या दिसत असतील, याची कल्पना करणेही कठीण.

जमिनीवरून फोटो काढताना खूप उंचावरील वस्तुंचे फोटो विचित्र येतात, त्यावर हल्ली 'बलून फोटोग्राफी' वा एरियल डिजिटल फोटोग्राफी' करतात, असे वाचनात आले. यावर एक फार सुंदर पुस्तकही बघितले आहे. तसे काही करता आले, तर खूपच अद्भुत फोटो काढता येतील.
काही दुवे:
http://www.youtube.com/watch?v=T_WuAZkVo_w
http://www.paulillsley.com/airphoto/systems/balloons-kites.html
http://danwbailey.com/category/tech-aerial/

प्रचेतस's picture

9 Aug 2013 - 10:36 pm | प्रचेतस

धन्यवाद काका.

वेरूळच्या लेणीत दोन प्रकारची चित्रकला पाहायला मिळते.

पैकी सर्वात महत्वाची म्हणजे उत्तर अजिंठा प्रकारची चित्रशैली ही वेरूळ लेणीमधल्या नंदीमंडप, सभामंडप आणि लंकेश्वर उपलेण्यात छतांवर पाहायला मिळते. या प्रकारची चित्रशैली यानंतर नामशेष झाली.

ही उत्तर अजिंठा शैली
a

तर वेरूळला रंग देण्याचा प्रयत्न अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत झाला. रूढार्थाने यात चित्र मात्र काढली गेली नाहीत तर असलेल्याच शिल्पांना चुन्याचा थर लेपून त्यावर रंगांची पुटे चढवण्यात आली. जसा हल्ली प्राचीन देवळांना रंगवण्याचा प्रयत्न केला जातो तसेच. अहिल्याबाईंच्या ह्या प्रयत्नांना यश तर आले नाहीच मात्र वेरूळचे सौंदर्य काही प्रमाणात तरी बिघडलेच.

हे अहिल्यादेवींचे काम
a

बाकी त्या दुव्यांबद्दल धन्यवाद.

सुधीर's picture

10 Aug 2013 - 9:11 pm | सुधीर

सगळे लेख एकत्रित वाचले/पाहिले. जगात सुंदर गोष्टी खूप असतात. कधीकधी तुमच्यासारखा दाखवणारा (दृष्टी देणारा) लागतो. धन्यवाद! "रावणानुग्रहशिवमूर्ती" हे (दुसरे वाले "कैलासोत्थापन") हे शिल्प विशेष आवडले. इतक्याशा जागेत रावणाचे हात वगैरे कसे कोरले असतील हा विचार करून थक्क झालो.

सालाबादप्रमाणे हाही लेख वाचण्याची तसदी मी घेतलेली नाही. आख्खं बालपण दगड-धोंडयात गेलेलं असल्यामुळे प्रत्येक दगड सुंदरच दिसतो, त्याची मूर्ती घडवलेली असो वा नसो. प्रत्यक्ष लेणी पाहणं हा माझ्यासाठी कंटाळवाणा अनुभव होता.

पण... तीन दिवसांचं एकहाती ड्राईव्हींग, त्या तीन दिवसांमधील धमाल गप्पा, धमाल अनुभव आणि औरंगाबादमध्ये सरांनी केलेलं आदरातिथ्य या सार्‍यांनी ही सहल संस्मरणीय झाली हे खरे !

चौकटराजा's picture

11 Aug 2013 - 9:13 am | चौकटराजा

आख्खं बालपण दगड-धोंडयात गेलेलं असल्यामुळे
धन्या, तू कर्नाटकचा दौरा कर ...दगडांच्या देशा हे वर्णन खर्‍या अर्थाने कोणाला लागू पडते हे कळेल मित्रा ! बाकी धन्या नाव बदलून " धोंडया" नाव कसे वाटते ..... ???? आँ...?

पियुशा's picture

13 Aug 2013 - 4:20 pm | पियुशा

खासच !!! वल्ल्या तुझ किती कवतिक कराव रे आता !! :)

मृत्युन्जय's picture

13 Aug 2013 - 4:25 pm | मृत्युन्जय

मस्तच

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 4:55 pm | अनिरुद्ध प

हि लेणी साधारणता श्री आदिशन्कराचार्या नन्तरची असावित का? कारण आपण उपमन्दिरान्चा उल्लेख केला ज्याला पन्चायतन असे म्हणतात्,आणि पन्चायतनाची सुरुवात श्री आदिशन्कराचार्यानी केली होति असे ऐकिवात आहे.

आदि शंकराचार्यांचा काळ नक्की कोणता हे मला माहीत नाही. बहुधा 8/9 वे शतक असावा. मग ही लेणी त्याहून जुनी होतात. आणि हे पंचायतन नाही. एकूण ही 6 मंदिरे आहेत. बहुधा सूर्य, विष्णू आणि सप्तमातृकांची ही उपमंदिरे असावीत.

एकुजाधव's picture

16 Aug 2013 - 12:34 pm | एकुजाधव

छान लेख आहे, सलाम साहेब.

भ ट क्या खे ड वा ला's picture

22 Aug 2013 - 7:19 pm | भ ट क्या खे ड वा ला

१५/१६ वर्षापूर्वी हि लेणी पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी तेथील एका गाईड ने सांगितलेले शब्द आठवले "फक्त कैलास लेणे पाहायला तीन दिवस किमान हवेत." कार्यक्रमात बदल करून १ जास्तीचा दिवस मिळवला होता.
आपला लेख वाचून /पाहून पुन्हा जाण्याची इछ्या झाली आहे. अप्रतिम लेख आणि छायाचित्रे .

केदार-मिसळपाव's picture

11 May 2014 - 4:40 pm | केदार-मिसळपाव

वल्लीबुआ,
तुम्ही वेरुळ च्या लेण्या अश्या पद्धतीने समजवुन सांगता का?

*ROFL*