वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
24 Apr 2014 - 3:10 pm

वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थौण नृसिंहाचे हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते.
आता पुढची सफर आहे ती लेणी क्र. १४ अर्थात "रावण की खाई" ची
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रावण की खाई अर्थात लेणी क्र. १४. ही आहे दशावतार लेणीच्या शेजारीच. पण त्याप्रमाणे दुमजली मात्र नाही. नक्षीदार कोरीव स्तंभ असलेला सभामंडप, समोरील बाजूस गर्भगृह आणि गर्भगृहाच्या पाठीमागून जात असणारा प्रदक्षिणामार्ग अशी याची रचना. ह्या लेणीत शैव आणि वैष्णव असा दोन्ही प्रकारची शिल्पे आहेत. त्याच बरोबर देवीच्या शिल्पांनाही इथे स्थान आहे. गर्भगृहात शिवलिंग नसून पीठ स्थापन केलेले आहे अर्थात त्यावरील मूर्ती आज अस्तित्वात नाही पण पीठामुळे येथे पूर्वी देवी अथवा विष्णूमूर्ती स्थापित असावी असे मानण्यास पुरेसा वाव आहे त्यातही येथी सुरुवातीच्या दोन्ही भिंतींवर दुर्गा आणि महिषासुरमर्दिनी तसेच गर्भगृहाच्या द्वारावर सरितादेवींच्या मूर्ती असल्याने हे लेणे मूळचे देवीसाठीच असल्याचे मला वाटते. हे लेणे साधारण ७ व्या ते ८ व्या शतकात खोदले गेले असावे आणि ह्यांची निर्मिती राष्ट्रकूट कालखंडात झाली असावी पण येथील द्वारपालांच्या शैलीवर कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव आहे.
येथील रावणानुग्रहाच्या मूर्तीवरूनच ह्या लेणीला नंतरच्या काळात 'रावण की खाई' असे नाव पडले असावे.

चला तर आता हे लेणे बघायला सुरुवात करू

लेणीत प्रवेश करताच समोरच गर्भगृह दिसते तर डाव्या बाजूच्या भिंतीवर वैष्णव तर उजव्या बाजूस शैव शिल्पपट आहेत तर गर्भगृहाच्या उजव्या बाजूचे भिंतीवर सप्तमातृकांचा अतिशय भय शिल्पपट आहे आणि तेच इथले प्रमुख आकर्षण.

सुरुवातीला आधी गर्भगृह पाहूयात.

गर्भगृह

ह्या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना स्तंभ असून सभामंडप आणि अंतराळ ह्या स्तंभांमुळेच विभागले गेले आहेत. गर्भगृहांच्या दोन्ही द्वारांवार मकरारूढ गंगा तर कूर्मारूढ यमुना असून त्यांच्या जोडीला स्त्री सेविका आणि द्वारपालही आहेत. वर म्हटल्याप्रमाणे गर्भगृहात आज फक्त पीठ अथवा वेदी शिल्लक राहिलेली असून येथे देवीची मोर्ती स्थापित असावी असा तर निश्चितच करता येतो.

१. लेणीचा दर्शनी भाग

a

२. मूर्तीविहिन गर्भगृह

a

३. डावीकडे यमुना, मध्यभागी द्वारपाल व उजवीकडे गंगा सेविकांसह

a

गर्भगृह पाहिल्यानंतर आता डाव्या बाजूचे शिल्पपट पाहण्यास सुरुवात करू.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीतच हे उठावातील शिल्पपट कोरलेले आहेत.

पहिलेच शिल्प आहे ते दुर्गेचे

दुर्गा

हातामध्ये त्रिशूळ धारण केलेली चतुर्भुज दुर्गा आपले वाहन सिंहाच्या पाठीवर एक पाय ठेवून मोठ्या डौलाने उभी आहे. एक हात गुडघ्यावर आधारासाठी ठेवला असून उरलेल्या दोन्ही भग्न हातांमध्ये चक्र आणि खङ्ग असावे. वरील दोन्ही बाजूस विद्याधर आहेत.

४. दुर्गा
a

ह्यानंतर येतो तो गजान्तलक्ष्मीचा शिल्पपट

गजान्तलक्ष्मी

हे शिल्प नेहमीपेक्षा किञ्चित वेगळे आहे. कमळवेलींनी भरलेल्या एका सरोवरातील कमळावर लक्ष्मी बसलेली असून दोन सेवक सरोवरातच उभे राहून वरील बाजूस लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना उभे असलेल्या सेवकांकडे पाण्याने भरलेले हंडे देत आहेत. हे सेवक हेच हंडे लक्ष्मीच्या वरचे बाजूस असणार्‍या दोन दोन हत्तींकडे देत आहेत व हे चार हत्ती लक्ष्मीच्या मस्तकी पाण्याचा अभिषेक करीत आहेत. अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.

५. गजान्तलक्ष्मी

a

ह्यानंतर इथले एक देखणे शिल्प येते ते म्हणजे भूवराहाचे

भूवराह

भूवराह हा विष्णूचा तिसरा अवतार. हिरण्याक्षाचा वध करून समुद्रात बुडालेल्या पृथ्वीला हा पुन्हा योग्य जागी स्थिरस्थावर करतो.
शंख, चक्र धारण करणारा हा भूवराह नागाच्या वेटोळ्यावर एक पाय टेकवून व दुसरा पाय जमिनीवर टेकवून मोठ्या डौलाने उभा आहे. आपला केशसंभार त्याने पाठीवर सोडला असून त्याच्या मुखातून सुळा बाहेर आला आहे. तर वराहाच्या एका हातावर आपला एक पाय दुसर्‍या पायांत मुडपून भूदेवी अर्थात पृथ्वी अगदी निर्धास्त मनाने उभी आहे. आपला तोल सांभाळण्यासाठी तिने वराहाच्या मुखावरच कोपर टेकवून आधार घेतला आहे.

६. भूवराह
a

ह्यानंतरचे शिल्प आहे ते विष्णू आणि त्याच्या दोन स्त्रियांचे

भूदेवी आणि श्रीदेवीसह विष्णू

इथे विष्णूमूर्तीचे दोन पटांत विभाजन केलेले आहे. खालील बाजूचे शिल्पपटांत मुरलीधर कृष्णाची शिल्पे आहेत तर वरील बाजूचे शिल्पपटांत विष्णू हा दोन स्त्रीयांसह बसला आहे त्यातील एक आहे लक्ष्मी अर्थात श्रीदेवी तर दुसरी आहे पृथ्वी अर्थात भूदेवी. विष्णू हा पृथ्वीचे पालन करीत असल्याने पृथ्वीला पतीस्वरूपच मानला गेलाय. येथील शिल्पांत स्त्रीसुलभ मत्सर अगदी स्पष्टपणे दिसून येतो. एकीच्या गालावर विष्णूने आपला एक हात ठेवलाय त्यामुळे मत्सर वाटून दुसरीने रागाने आपली मान किञ्चित दुसरीकडे वळवली आहे त्यामुळे विष्णू आपला दुसरा हात तिच्या गुडघ्यावर ठेवून तिची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहे.

७. भूदेवी आणि श्रीदेवीसह विष्णू
a

ह्यानंतरचे शिल्प आहे ते विष्णू-लक्ष्मीचे

विष्णू लक्ष्मी

८. विष्णू लक्ष्मी मकरतोरणात बसलेले असून दोन्ही बाजूस सेवक सेविका आहेत.

a

इथे डाव्या बाजूच्या भिंतीवरील शिल्पे संपतात.

९. डाव्या बाजूच्या भिंतीवरील शिल्पपट

a

आता उजव्या बाजूचे शिल्पपट पाहण्यास सुरुवात करू अर्थात आपण येथे फेरी मारत असल्याने प्रवेशद्वारापासून सुरुवात न करता गर्भगृहाच्या उजवीकडून शिल्पे पाहण्यास सुरुवात करूयात.

येथील शिवमूर्तींचे वर्णन माझ्या ह्याआधीच्या लेखांत कित्येकदा आल्याने पुनरुक्ती न करता त्यांची येथे केवळ छायाचित्रे देतो.

१०. अंधकासुरवध शिवमूर्ती

a

११. रावणानुग्रह शिवमूर्ती

a

१२. नटराज शिव

शिवाच्या डाव्या बाजूस मृदंग वाजवणारे शिवगण तर उजवे बाजूस पार्वती आहे.

a

१३. अक्षक्रीडारत शिव पार्वती

वरच्या पटांत अक्षक्रीडेत नाराज झालेल्या पार्वतीला समजावणारा शिव तर खालच्या बाजूस नंदीला उगा छळणारे शिवगण आहेत.

a

१४. महिषासुरमर्दिनी

हे शिल्प प्रवेशद्वाराच्या उजवे बाजूच्या भिंतीवर येते म्हणजे दुर्गेच्या बरोबर समोरील बाजूस.
एका हाताने महिषाचे मुख दाबून धरत त्याजवर त्वेषाने आपला एक पाय रोवत दुर्गा महिषासुराचा वध करण्यास तयार झाली आहे तर सिंहाने महिषाचा पुठ्ठा आपल्या जबड्यात पकडला आहे.

a

१५. उजवे बाजूचे शिल्पपट

a

इथल्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवरील शिल्पपट पाहून गर्भगृहाला फेरी मारत आपण येतो तो एका भव्य शिल्पपटासमोर अर्थात सप्तमातृकांसमोर.

सप्तमातृका शिल्पपट

हा शिल्पपट वेरूळमधील सप्तमातृकांपटांपैकी सर्वात भव्य आहे. वेरूळमधील इतर मातृकापटांसारखीच याची रचना. मातृकांच्या डावीकडे वीरभद्र तर उजवीकडे गणेश आणि गणेशाच्या बाजूला सर्वसंहारक काल-काली अर्थात असितांग भैरव.

सर्वसाधारणपणे नेहमीच्या सप्तमातृकापटांत वीरभद्र, मातृका अआणि गणेश आढळतात तर वेरूळच्या शिल्पपटांत ह्या सर्वांबरोबरच काल-काली पण आढळतात. मातृका ह्या मातृदेवता अर्थात प्रजननाचे प्रतिक तर काल-काली साक्षात मृत्युचे प्रतिक एका परीने जन्म मृत्युचे जीवनचक्र दर्शवणे हाच ह्या शिल्पांचा हेतू असावा.

सुरुवातीस आहे तो वीरभद्र अर्थात हा मातृकांच्या शेजारी नसून त्यांना काटकोनात आहे. इथे त्रिशूळ, डमरू नसून त्याऐवजी हातात परशु आहे. शंकराच्या अशा रूपाला चंडिकेश्वर म्हणतात व हे परशुधारी शिल्प दक्षिणेत जास्त प्रचलित आहे.

१६. वीरभद्र

a

ह्यानंतर आहेत त्या सप्तमातृका आणि गणेश
मातृकांची वाहने त्यांच्या उच्चासनाखालच्या पट्टीवर कोरलेली असल्याने ह्या मातृका अगदी सहजी ओळखता येतात. प्रत्येकीच्या हाती त्यांची बाळे आहेत. कुणी मांडीवर खेळत आहे, कुणी स्तनपान करीत आहे, कुणी आईने दिलेला खाऊ खात आहे तर कुणाची आई त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करीत आहे.

ह्या मातृका आणि त्यांची येथे कोरलेली वाहने क्रमाने अशी

ब्राह्मणी अथवा ब्राह्मी - वाहन हंस
माहेश्वरी - वाहन नंदी
कौमारी - वाहन मयुर
वैष्णवी - वाहन गरूड
वाराही - वाहन वराह
ऐन्द्राणी अथवा ऐन्द्री - वाहन हत्ती
चामुंडा - वाहन घुबड

ह्यातील इतर मातृकांची वाहने नेहमीच कायम राहिलेली दिसून येतात तर काही चामुंडा बर्‍याचदा प्रेतावर तर काही वेळा कुत्रा, शृगाल (कोल्हा - पाहा कैलास लेणीतील यज्ञशाळा) तर वाराही महिषावर बसलेली आढळून येते.

तर गणेशाच्या खालच्या बाजूस लाडू अथवा मोदकपात्र आहे.

१७. ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही

a

१८. माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी, चामुंडा आणि गणेश

a

गणेशाच्या शेजारी आहेत त्या दोन भयप्रद मूर्ती अर्थात काल काली.

काल काली

मृत्युचे प्रतिक असलेल्या ह्या कालाला असितांग भैरव असेही म्हणतात.
हाडाचा सापळाच असलेल्या कालाच्या पायाचा आधार एका प्रेतरूपी सांगाड्याने पकडला आहे तर ह्या असितांग भैरवाच्या शेजारीच कालीची भयप्रद मूर्ती आहे.

१९. काल - काली

a

२०. संपूर्ण सप्तमातृकापट- वीरभद्र, गणेश आणि काल-कालीसह

a

वेरूळला जर कधी गेलात तर हे लेणे आणि हा शिल्पपट तर अवश्य बघाच.

अरे हो, ह्या लेणीच्या खालचे बाजूलाच अंतर्भागात खोल खोदले गेलेले एक पाण्याचे टाके पण आहे. पाणी जरी असले तरी आज ते पिण्यायोग्य मात्र नाही. टाक्यात जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.

२१. पाण्याचे टाके.

a

येथे आपली 'रावण की खाई' ची सफर संपते. ह्याच्या पुढचे लेणी क्र. १३ हे अपूर्णावस्थेत कोरलेले असून आत काहीही नाही.

२२. लेणी क्र. १३

a

आतापर्यंतचे मागचे सर्व भाग पाहता जैन आणि ब्राह्मणी लेणी येथे पूर्ण झाली आहेत आता शिल्लक आहेत ती वेरूळयेथील सर्वात जुनी लेणी अर्थात १ ते १२ ह्या क्रमांकाची बौद्ध लेणी. ती पाहूयात पुढच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

नाखु's picture

24 Apr 2014 - 3:25 pm | नाखु

तुम्ही "घारा पुरी" सारखी "दाखवणार असाल तरच पाहण्यात अर्थ आहे नाही तर आम्ही फक्त चित्र दर्शन पामर..

धन्यवाद..
उर्वरीत प्रतिक्रिया सावकाश धागा वाचल्यावरच..
पु.ले.प्र.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 4:24 pm | प्यारे१

१९/२२ गणेशा झालाय माझा.

१९ फटु दिसत नाहीत.

प्यारे१'s picture

24 Apr 2014 - 4:29 pm | प्यारे१

आता दिसले.

नेहमीप्रमाणंच अभ्यासू, सुंदर!
(दरवेळी काय नवीन म्हणू रे?)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Apr 2014 - 4:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेरूळ्च्या या भागाची परत मस्त उजळणी झाली. तुमच्या तोंडून माहिती ऐकत तेथे सर्व लेणी पहाण्याचा अनुभव अवर्णनिय होता !

क्रमशः बघून बरं वाटलं !!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Apr 2014 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा

धागा नेहमीप्रमाणेच...मस्स्स्स्स्स्स्स्स्स्त....माहितीपूर्ण!

आणि नेहमीची कबुली- अगोबा बरोबर सगळीकडे भटकताना नेहमी ही माहिती कमी..अधिक प्रमाणात तिथे मिळत असतेच. पण हे इथे हवं तसं..हवं तेंव्हा निवांत रवंथ करायला मिळत ना.. हे (मला) जास्त फायद्याचं आहे. तिथे ऐकताना जे मिळत ते अनुभूती या स्वरुपातलं असतं..आणि इथे त्याचा होतो तो खरा अनुभव...म्हणूनच आंम्ही सर्वजण ह्या सर्व लेखमालांचं पुस्तक येऊ दे ..म्हणून अगोबास पाठी पडतो..पण अगोबा..हे प्रथम वल्ली असल्यामुळे..ते त्यांच्या मनात-येइल तेंव्हाच घडेल! (आमचं नै ऐकणार कधी! :-/ दु..दु..! :-/ ) असो!
-------------------------------------
अता..प्रतिपाद्य विषयातील आमच्या कडील संगती:-
अनेक धार्मिक कार्यांमधे- गणपति पूजन..पुण्याहवाचन आणि मातृकापूजन असतं..या मातृकापूजनात (आता) एकंदर २३ मातृका आणि गणपति,दुर्गा,क्षेत्रपाल,आणि वास्तोष्पती या चार परिवार देवता मिळून २७ देवतांचे पूजन होते.

गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया।
देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥
धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता।
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥
गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं।
--------------------------------
आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः----

प्रेत संस्था तु चामुण्डा, वाराही महिषासना।
ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना।
माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना।
ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता।
------------------------------------

सुंदर श्लोक हो बुवा. देवीकवच माहीत होता पण पहीला माहीत नव्हता.

प्रचेतस's picture

24 Apr 2014 - 7:46 pm | प्रचेतस

धन्यवाद बुवा, पहिल्या श्लोकाप्रमाणेच म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी..., ह्याच क्रमाने सप्तमातृका पट सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र चामुंडा आणि वाराही यांची वाहने मात्र विभिन्न आढळतात.

प्रशांत's picture

26 Apr 2014 - 7:16 pm | प्रशांत

धागा नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण...!
बौद्ध लेणीचा भाग लवकर येवु द्या म्हणजे मस्त उजळणी होईल.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 5:37 pm | चित्रगुप्त

वाहवा. एकदम कडक.

चित्रगुप्त's picture

24 Apr 2014 - 5:37 pm | चित्रगुप्त

वाहवा. एकदम कडक.

फोटो व माहीती फार आवडली.

बॅटमॅन's picture

24 Apr 2014 - 6:23 pm | बॅटमॅन

नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.

लॉरी टांगटूंगकर's picture

25 Apr 2014 - 11:45 pm | लॉरी टांगटूंगकर

उत्तम धागा!!
वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहे. +१११

आतिवास's picture

1 May 2014 - 11:20 am | आतिवास

+२२२

यशोधरा's picture

24 Apr 2014 - 9:42 pm | यशोधरा

सुरेख! अजून काय म्हणायचं? अप्रतिम सुरेख.

किसन शिंदे's picture

24 Apr 2014 - 9:56 pm | किसन शिंदे

बॅट्याचंच वाक्य उसनं घेतो..

नेहमीप्रमाणेच कडक धागा. वल्लीच्या लेखावर दरवेळेस वेगळं काय म्हणायचं हा प्रश्न आहेच.

इतर ठिकाणांपेक्षा इथे असलेला भव्य सप्तमातृकापट आवडला.! भग्न होण्यापूर्वी किती भारी दिसत असतील हे शिल्पपट.

पियुशा's picture

25 Apr 2014 - 3:17 pm | पियुशा

तु आयटीत कशाला गेलास रे वल्ल्या ? खर तर इतिहासकारच होणार होता तु , माहीती अन फोटु झक्कास नेहमीसारखे :)

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 3:56 pm | आत्मशून्य

.

वाचनखूण साठवली आहे.

कवितानागेश's picture

25 Apr 2014 - 4:58 pm | कवितानागेश

मस्त. आज हे वेरुळचे सगळे धागे नीट बघतेय. :)

मराठे's picture

26 Apr 2014 - 12:10 am | मराठे

या लेण्यांमधे आणि घारापुरीच्या लेण्यांमधलं साम्य बघून दोन्हीकडील शिल्पकार एकच असावेत असं वाटतंय. विषेशतः अंधकासूर शिल्प तर चोप्य-पस्ते केल्यासारखं वाटतंय.
बादवे, सप्तमातृकांची काय गोष्ट आहे? त्यांची शिल्प अशी एका रांगेत देण्यामागे काय प्रयोजन आहे? आणि त्याच रांगेत गणपती कसा?

प्रचेतस's picture

26 Apr 2014 - 7:06 am | प्रचेतस

अंधकासूरवधमूर्ती हा शिवमूर्तींचा एक प्रकार आहे. अगदी किरकोळ फरक वगळता ही मूर्ती सगळीकडे सारख्याच प्रकारे दाखवली जाते. बाकी घारापुरीचे लेणीशी इथल्या क्र. २९ च्या लेणीशी विलक्षण साम्य आहे. अगदी लेणीचे कोरण्यापासून तिथल्या मूर्तींपर्यंत. पण घारापुरीची शिल्पकला किंबहुना मूर्तीकला ही वेरूळपेक्षा जास्त उजवी आहे असे माझे वैयक्तिक मत.

ह्या सप्तमातृका तांत्रिक समजल्या जातात. पूर्वी गणेश हा सुद्धा तांत्रिक पूजेतच पुजला जात होता. मातृकांबरोबर वीरभद्र आणि गणेश हा नेहमी असतोच.

प्रचेतस's picture

26 Apr 2014 - 7:06 am | प्रचेतस

सर्व वाचकांचे धन्यवाद.

धन्या's picture

1 May 2014 - 9:46 am | धन्या

त्या लेण्यांमध्ये निरुद्देश वाटले नव्हते की या सार्‍या मूर्तींमागे कहाण्या दडलेल्या आहेत.

सुहास झेले's picture

1 May 2014 - 11:02 am | सुहास झेले

वल्लीचा धागा म्हणजे पर्वणीच... सगळ्या भागाच्या प्रिंट काढून पुन्हा लेणी पाहणे आलेच :)

पैसा's picture

1 May 2014 - 11:31 am | पैसा

मस्त माहिती आणि फोटो.

सस्नेह's picture

1 May 2014 - 4:20 pm | सस्नेह

ही शिल्पे तुमच्याशी शिक्रेट्मधे बोलतात अशी आम्हाला दाट शंका आहे !
सप्तमातृका अन काली यांच्यामधला गणेश लै भारी.
रच्याकने, वेरूळ आणि बेळ्ळूर यांचा काही संबंध आहे का हो ?

प्रचेतस's picture

1 May 2014 - 7:53 pm | प्रचेतस

शिल्पे तिथे गेल्यावर बोलू लागतातच यात काहीच संशय नाही. :)

वेरूळ आणि बेळ्ळूरचा काहीच संबंध नाही. वेरूळ हे 'इला' नदीच्या काठावर वसले असल्याने त्याचे मूळचे नाव एलापूर होते. शिलालेखांत तेच नाव आहे. पुढे त्याचा एलापूर, वेलापूर, वेरूळ असा अपभ्रंश झाला तर बेलूर येथील मंदिरे हे कर्णाटकातल्या होयसाळांची १२/१३ व्या शतकातली निर्मिती.

बॅटमॅन's picture

23 May 2014 - 12:04 pm | बॅटमॅन

ही एला नदी आजही आहे की कसे? असल्यास नाव तेच आहे की बदललेय?

प्रचेतस's picture

23 May 2014 - 12:41 pm | प्रचेतस

एला नदी आजही आहे. वेरूळच्या सीतेच्या नहाणीजवळचा (धुमार लेणे) जो सर्वात मोठा धबधबा आहे तिथूनच वाहते ती. वेलगंगा हे तिचे आजचे नाव. उन्हाळ्यात कोरडी तर पावसाळ्यात वाहती.

इथे बघ गूगल मॅप मध्ये.

बॅटमॅन's picture

23 May 2014 - 12:51 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद.

प्रचेतस's picture

23 May 2014 - 12:58 pm | प्रचेतस

हाच तो एला नदीचा धबधबा

a

डाव्या बाजूस अंमळ पांढरट खडक दिसतोय तोच ना?

प्रचेतस's picture

23 May 2014 - 1:34 pm | प्रचेतस

त्याच्यास आसपासचा भाग. किंबहुना हा सर्वच भाग पावसाळ्यात मोठ्या प्रपातात बदलतो.

बॅटमॅन's picture

26 May 2014 - 2:16 pm | बॅटमॅन

ओह अच्छा, धन्यवाद.

स्पा's picture

22 May 2014 - 2:40 pm | स्पा

वाव.. जबराट धागा
फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे सुसाट
आमच्या वेरूळ भ्रमंतीची आठवण झाली

सौंदाळा's picture

23 May 2014 - 10:18 am | सौंदाळा

अरेच्चा, हे वाचायचे राहुनच गेलं होतं
मस्तच.
पुभाप्र

इशा१२३'s picture

26 May 2014 - 1:45 pm | इशा१२३

फोटो आणि माहिती नेहेमीप्रमाणेच मस्त ...आवडली..

आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का? :-)
आणि एका बाजूला यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ? साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ? साप्तमातृकांच्या ह्या नावांचा उल्लेख कुठे आहे समजेल का?

आपल्या समोर आपल्या पत्नीच्या हनुवटीला कुणी हाथ लावला तर तिच्या पतीला वाटतो तो पुरुषसुलभ मत्सर असतो का?

:)

यमुना , दुसर्या बाजूला गंगा आहेत हे कसा कळला ?

वाहनांवरून. यमुनेचे वाहन कूर्म तर गंगेचे मकर.

साप्तमातृकांची हि नवे कुठे वाचलीत ?

लै फेमस नावे आहेत ही. बहुतेक पुराणांत, महाभारतात ही नावे आहेतच.
वर बुवांनी काही मंत्र दिलेत. त्यात आहेत ही नावे.