वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम
अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्या अर्थाने इतिश्री होईल.
होळीच्या तीन दिवस आधी मित्राबरोबर गप्पा टप्पा चालू असता अचानक वेरूळच्या सहलीची योजना आखली गेली आणि होळीच्या आदल्या दिवशी पहाटे आम्ही पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने प्रस्थान केले. वाटेत बिरुटे सरांचा त्यांच्या घरी यायचा प्रेमळ आग्रह झाला पण वेळेअभावी त्यांच्याकडे जाणे जमले नाही. साधारण ११ च्या सुमारास आम्ही देवगिरी ओलांडून वेरूळला पोहोचलो. वेरूळ लेण्यांपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या वृंदावन हॉटेलचे बुकिंग आधी करून ठेवलेले असल्यामुळे रूम ताब्यात घेऊन अवघ्या १०/१५ मिनिटात आम्ही वेरूळ दर्शनाला निघालो.
मागच्याच वर्षीच्या मिपाकरांसोबतच्या वेरूळ सहलीमुळे लेणी. क्र. १५ ते ३१ ह्या पाहून झाल्याच होत्या. मात्र वेळअभावी लेणे क्र. १ ते १५ ही काही पाहता आली नव्हती. तस्मात ह्या वेळचे प्रमुख आकर्षण ही लेणी पाहणे हेच होते. अर्थात माझ्या बरोबरीचे दोघेही मित्र पहिल्यांदाच आलेले असल्याने इतर लेण्यांनाही परत भेटी देणे क्रमप्राप्त होतेच. मित्रांना आधी कैलास लेणे संबंध फिरवून आणले. तब्बल ३.३० ते ४ तास हे एकच महाकाय एकाश्म मंदिर पाहायला लागले. त्यानंतर १५ ते १ ह्या क्रमांकाची लेणी पाहायला आम्ही सुरुवात केली. ह्यातील १ ते १२ ही बौद्ध लेणी असून १३,१४ आणि १५ ही ब्राह्मणी शैलीची लेणी आहेत. १३ व्या क्रमांकाचे लेणे अतिशय साधे असून १४ आणि १५ ह्या दोन लेणींमध्ये वेरूळमधील काही अत्युत्तम शिल्पे कोरली गेली आहेत. चला तर मग आता वेळ न दवडता ही दोन्ही लेणी पाहायला सुरुवात करू.
लेणी क्र. १५ अर्थात दशावतार लेणे
कैलास लेणीच्या उजवीकडे असलेले हे भव्य दुमजली लेणे. सुरुवातीला काही पायर्या मग अखंड कातळ फोडून तयार केलेले प्रांगण, प्रांगणाच्या मध्यभागी मंडप आणि मंडपाच्या पुढे दर्शनी बाजूस स्तंभ असलेले दुमजली लेणे अशी याची रचना. ह्याची रचना बरीचशी वेरूळ येथील ११ व १२ क्रमांकाच्या (तीन ताल आणि दोन ताल) लेण्यांशी मिळतीजुळती आहेत. ही ११ व १२ बौद्ध लेणी. एकंदर रचनेवरून बौद्ध लेण्यांसाठी १५ व्या क्रमांकाचे दशावतार लेणे खोदण्यात येत होते असे वाटते पण काही कारणाने हे काम अर्धवट राहिले. बहुधा बौद्ध धर्म त्या काळात वेगाने लयास जात असल्याने, राजाश्रय संपल्याने किंवा निधीची कमतरता भासल्यामुळे हे लेणे बौद्धांनी सोडले असावे. त्यामुळे ह्याचे खालचे बाजूस स्तंभ आणि सभामंडपाशिवाय कसलेही कोरीव काम दिसत नाही. मात्र त्यानंतर लेण्याचे वरचे मजल्याचे बांधकाम मात्र राष्ट्रकूट सम्राटांनी उत्तमोत्तम शिल्पे कोरवून पूर्ण केले.
ह्या लेण्याचे अजून एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाचा शिलालेख. वेरूळच्या लेणीसमूहातील हा राष्ट्रकूटांचा एकमेव शिलालेख. हा शिलालेख आहे तो इथल्या प्रांगणातील मंडपाच्या पाठीमागच्या भिंतीवर असलेल्या वातायनाच्या वर.
हा शिलालेख देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेत कोरलेला असून इ. स. ८ व्या शतकातील आहे. ॐ नमः | शिवाय ह्या वाक्याने लेखाची सुरुवात झालेली असून ह्या लेखांत दंतिवर्मन, इंद्रराज, गोविंद, कर्क, इंद्र, शर्व ह्या राष्ट्रकूट नृपतींची नावे आलेली आहेत. राजा दंतिदुर्ग हा महापराक्रमी असून त्याने येथे सैन्याचा तळ उभारला होता, शत्रूंचा पराभव केला आणि श्रीवल्लभ ही उपाधी धारण केली असे उल्लेख आले आहेत.
दशावतार लेणीच्या प्रांगणातील मंडप (ह्यात दिसणार्या जालवातायनाच्या वरील बाजूस दंतिदुर्गाचा शिलालेख आहे.)
दंतिदुर्गाचा देवनागरी शिलालेख
ह्याच मंडपाच्या चौ बाजूंना युगुलशिल्पे कोरलेली आहेत. मंडप सोडून डावीकडे येताच त्या बाजूच्या भिंतीत एक दालन कोरलेले दिसते. त्यात ब्रह्मदेव, द्वारपाल असून आतमध्ये गर्भगृहात शिवलिंग स्थापिलेले दिसते. शिवलिंगाच्या पाठीमागच्या भिंतीत त्रिमुखी शिव अर्थात अघोर, तत्पुरुष आणि वामदेव अशी तीन मुखे असलेली सदाशिवाची मूर्ती दिसते. अशाच प्रकारचे स्थापत्य वेरूळच्या कैलास लेणीमधील लंकेश्वर भागात आपणास दिसते.
चला तर आता आपण मुख्य लेणीत प्रवेश करूयात.
हे लेणे दुमजली असून खालच्या मजल्यावर मोकळ्या सभामंडपाखेरीज काहिही नाही. मंडपाच्या प्रवेशद्वारच्या बाजूस हत्ती कोरलेले असून शेजारीच मकरारूढ गंगा व कूर्मारूढ यमुना आहेत. ह्याचे जे काही सौंदर्य सामावले आहे ते आहे वरच्या मजल्यावर. सभामंडपाच्याच डाव्या अंगाला भिंतीत वरचे मजल्यावर जाण्यासाठी दगडातच जीना खोदून काढण्यात आलेला आहे.
दशावतार लेणीचा दर्शनी दुमजली भाग
वरच्या मजल्यावर जातात भव्य दिव्य असा कोरीव स्तंभांनी भरलेला एक सभामंडप नजरेस पडतो. डावी उजवीकडे आणि समोर अशा तिन्ही बाजूंच्या भिंतीत बरेच शिल्पपट कोरलेले दिसतात. सभामंडपाच्या मध्याभागी नंदी असून समोरील गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना झालेली दिसते.
सभामंडपाची रचना
सभामंडपातील नंदी
चला तर आता डावीकडच्या बाजूने चालत चालत एकेक शिल्पपट बघत बघत आपण ह्या मजल्याचा एक फेरफटका मारू.
पहिलाच शिल्पपट येतो तो म्हणजे अंधकासुरवध
अंधकासुरवध
ह्याचे वर्णन याआधीही माझ्या काही लेखांमध्ये आलेले होते त्यामुळे पुनरुक्तीचा मोह टाळून फक्त संक्षिप्त स्वरूपात शिल्पाचे वर्णन करतो.
अंधकासुराची नेहमीची शिल्पे बघता येथील शिल्पात मात्र किंचित वेगळेपणा आहे. गजासुराला फाडून शिवाने त्याचे चर्म धारण केले आहे. चंद्रकोर मस्तकी असलेल्या शिवाचा चेहरा फारसा भयानक नाही. आणि शिवाच्या हातात ह्यावेळी कपाल नसून ते कपाल अंधकाच्या खालचे बाजूस सरसावून बसलेल्या भयानक चेहर्याच्या चामुंडेच्या हाती आहे. ती अंधकाच्या शरीरातून पडणारे रक्ताचे थेंब गोळा करीत आहे. चामुंडेच्या शेजारी उजवीकडे पार्वती आहे.
अंधकासुरवधमूर्तीच्याच बाजूला आहे तो नटराज शिवाची मूर्ती
नटराज शिव
अष्टभुज शिव विलक्षण उन्मादाने नाचत असून त्याच्या हातात त्रिशूळ, डमरू, अग्नी आहेत तर पार्वती व इतर शिवगण शिवाचे हे नृत्य मोठ्या तन्मयतेने पाहात आहेत.
ह्यानंतरची तीन शिल्पे अनुक्रमे अक्षक्रीडारत शिव पार्वती, कल्याणसुंदर शिव व रावणानुग्रह शिवमूर्तीची आहेत. ही शिल्पे इतकी खास वाटत नाहीत. लेण्यांत असलेला प्रचंड अंधार, शिल्पमूर्तींना दिलेले चुन्याचे लेप ह्यामुळे ह्या मूर्ती दिसायला तशा विद्रूपच वाटतात.
अक्षक्रीडारत शिव पार्वती
कल्याणसुंदर शिव अर्थात शिवपार्वती विवाह
इथे तर शिल्पीचे मूर्ती कोरण्याचे गणित फसलेले स्पष्टपणे दिसते. पार्वतीला कोरण्यात उंचीची गडबड झाल्यामुळे तिला एका चौथर्यावर उभे करून ही कमतरता दूर करण्याचा काहीसा अयशस्वी प्रयत्न येथे केल्याचे दिसून येतो. खालचे बाजूस ब्रह्मा पौरिहित्य करत असून इंद्र, विष्णू विवाहसोहळ्याचे आल्याचे दाखवले आहेत.
रावणानुग्रह शिवमूर्ती
ह्यानंतर मात्र एक प्रभावी शिल्प कोरलेले आहे. ते आहे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती अर्थात कालारी शिव
मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.
येथे पिंडीला कवटाळून बसलेल्या मार्कंडेयाला यम घेऊन आल्याचे पाहून शिव हा पिंडीतून प्रकट झालेला आहे. त्याने अतिशय क्रोधाने यमाच्या पेकाटात आपली लाथ घातली असून आपला त्रिशूळ त्याच्या पोटात खुपसलेला आहे. शिवाचा त्वेष इतका आहे की त्याने घातलेल्या लाथे यमाचे कंबरडे पार मोडून गेले आहे इतका की तो मोडकळीस येऊन आपला गुडघा वाकवून खालीच बसला तर तर शिवाच्या हातातील त्रिशूळाचा दांडाही वाकडा झालेला आहे. त्याही अवस्थेत यम त्याची विनवणी करीत आहे.
कालारी शिव
आता येथे मंडपाची डावीकडची भिंत संपते. गर्भगृहाच्या एका बाजूस गंगावतरणाचा प्रसंग कोरलेला आहे तर दुसरे बाजूस लिंगोद्भव शिव मूर्ती कोरलेली आहे.
गंगावतरण
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून भगीरथ प्रयत्न करून स्वर्गातून आणलेल्या गंगेला शिव आपली जटा हळूच सोडवून गंगेला पृथ्वीवर जाण्यास जागा मोकळी करून देत आहे. उजव्या बाजूस पार्वती उभी असून डाव्या बाजूस एका पायावर तप करीत आहे. तर शिवाच्या पायांच्या खालचे बाजूस मस्तके दाखवून ती पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र मुक्तीची याचना करीत आहेत हे सूचित करत आहेत.
लिंगोद्भव शिवमूर्ती
प्रकट झालेल्या दैदिप्यमान स्तंभाचा आदी व अंत शोधून काढण्यात अयशस्वी ठरलेले हंसरूपी ब्रह्मा व वराहरूपी विष्णू यांचे गर्वहरण होऊन अनन्य भावनेने ते शिवाला शरण गेले असून शिवा त्या स्तंभातून प्रकट होऊन त्यांना अनुग्रहित करीत आहे.
यानंतर आपण गर्भगृहाच्या उजव्या बाजूने तिकडील भिंतीतले शिल्पपट पाहण्यास सुरुवात करूयात. दशावतार लेणीमधील काही अप्रतिम शिल्पपट येथे कोरलेले आहेत.
येथेच सुरुवातीचे बाजूस गजांतलक्ष्मीचे शिल्प आहे. अर्थात ते फारसे आकर्षक नाही.
यानंतर येते ते त्रिपुरांतक शिवाचे.
त्रिपुरांतक शिव
तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.
येथील शिल्पपटात चंद्र-सूर्याची चाके करून शिवाने पृथ्वी हाच रथ केला आहे. ब्रह्मदेव सारथ्य करीत असून विष्णू हाच बाण म्हणून जोडून शिव आपल्या पिनाक धनुष्याने त्रिपुरासुरांचा संहार करणेस सज्ज झाला आहे.
आता यानंतर मात्र विष्णू ह्या दैवताची निगडित असलेली शिल्पे सुरु होतात. ह्याच शिल्पांमुळे ह्या लेणीला दशावतार असे नाव पडले. अर्थात नाव जरी दशावतार लेणे असे असले तरी येथे विष्णूचे अवतार वराह, नृसिंह, वामन आणि कृष्ण असे फक्त चारच दाखवलेले असून अनंतशयनी विष्णूची एक मूर्ती आहे. येथली सर्वात सुंदर शिल्पे ह्याच भागात आहेत. चला तर हि शिल्पे आता आपण पाहण्यास सुरुवात करूयात.
यात (उजवीकडून) पहिले येते ते गोवर्धन गिरिधारी कृष्णाचे.
गोवर्धन गिरीधारी.
कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार. गोकुळात इंद्रपूजेपासून गोकुळवासीयांना परावृत्त केल्यामुळे इंद्र क्रोधवश होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु करतो. कृष्ण सर्वांना घेऊन गोवर्धन पर्वतच्या आश्रयाला जातो व गोवर्धन पर्वताला आपल्या हातांवर तोलून धरत गोकुळवासीयांचे धुव्वाधार पावसापासून संरक्षण करतो.
ह्या शिल्पपटात कृष्ण हा विष्णूरूपात दाखवला असून त्याला ६ हात दाखवले आहेत. दोन हात मानुषरूपातील असून उरलेले चार हात दैवी आहेत. शंख, चक्र अशी आयुधे धारण केलेल्या कृष्णाने एक हात कमरेवर ठेवला असून चार हातांवर गोवर्धन तोलून धरलेला आहे तर उरएल्या हाताने तो गोकुळवासीयांना अभय देत आहे. गोकुळजनांसह गायीगुरे आदी खिल्लारे पर्वताच्या खाली आश्रयाला आली आहेत.
गोवर्धन गिरीधारी
गोवर्धन गिरीधारीच्या उजव्या बाजूला शिल्पपट आहे तो अनंतशयनी विष्णूचा.
अनंतशयनी विष्णू
शेषावर एका हातावर मस्तक तोलून पहुडलेल्या विष्णूचे पाय लक्ष्मी चुरत आहे. विष्णूच्या नाभीतून प्रकट झालेल्या कमळावर चतुर्मुखी ब्रह्मदेव स्थानापन्न आहे. तर विष्णूच्या खालच्या बाजूस ज्या सात मूर्ती आहेत त्यापैकी दोन मधु कैटभ राक्षस आहेत तर उरलेल्या चार हे आयुधपुरुष आहेत म्हणजे शंखपुरुष, गदापुरुष, चक्रपुरुष आणि पद्मपुरुष. उरलेली सातवी मूर्ती कोणाची हे मात्र कळत नाही.
ह्यानंतर येते ती विष्णूची वराहमूर्ती
वराहावतार
वराह हा विष्णूचा तिसरा अवतार. रसातळात बुडालेल्या पृथ्वीला वराह आपल्या दाढांवर खेचून तिला बाहेर काढत असतानाच ब्रह्मदेवाच्या वरप्रदानामुळे उन्मत्त झालेला हिरण्याक्षाचा वध करतो अशी ही संक्षिप्त कथा.
शंख, चक्र धारण केलेल्या वराहाने भूदेवीला आपल्या बाहूंवर तोलून धरले असून आपला एक पाय नागराजावर ठेवला आहे.
वराहावताराच्याच पुढे उजव्या अंगाला संबंध वेरूळ लेणीसमूहातील दोन सर्वांगसुंदर शिल्पे आहेत. ह्या दोन शिल्पांसाठी तरी ही लेणी अवश्य पाहिलीच पाहिजे. ती आहेत त्रिविक्रम आणि नृसिंहअवताराची.
त्रिविक्रम विष्णू.
त्रिविक्रम विष्णू म्हणजे विष्णूचा पाचवा अवतार अर्थात वामनावतार.
बलीराजाच्या न्यायप्रियतेमुळे, दानप्रियतेमुळे त्याचा पुण्यसंचय वाढत जाऊन साक्षात इंद्राच्या पदाला धोका निर्माण होतो तेव्हा तो विष्णूला शरण जातो. विष्णू वामनाचे रूप धारण करून बळीच्या यज्ञात जाऊन त्याला तीन पावले भूमिचे दान मागतो. वामनरूपी विष्णूचा कावा लक्षात यऊन शुक्राचार्य बळीला दानापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात पण बळी आपल्या दानप्रियतेपासून न ढळता दानाचे अर्ध्य वामनाच्या हातावर सोडतो. तत्क्षणी वामनापासून विष्णू प्रकट होऊन एका पावलाने जमीन तर दुसर्या पावलाने आकाश व्यापून टाकतो तर तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे बळी राजालाच विचारतो. बळी आपले मस्तक त्याच्यापुढे करून तिसरे पाऊल त्याच्यावर ठेवण्यास विनंती करतो. प्रसन्न झालेला विष्णू बळीला पाताळाचा राजा करतो. त्रैलोक्य व्यापणार्या विष्णूच्या ह्या रूपालाच त्रिविक्रम विष्णू असे म्हणतात.
उपरोक्त शिल्पपटाच्या खालच्या उजव्या बाजूस वामनाला अर्ध्य देणारा बळीराजा दाखवलेला आहे तर शुक्राचार्य त्याला दानापासून परावृत्त करताना दिसतो आहे. त्याच्या बाजूस एक स्त्री आकृती आहे ती बहुधा बळीची पत्नी किंवा एखादी सेविका असावी. तर डाव्या बाजूस वामनावर हल्ला करण्याच्या तयारीत असणार्या नमुची नामक दैत्याचे हात पाठीशी बांधून गरूड त्याचे केश पकडून खेचत असून एका हाताने त्याला थप्पड मारत आहे. ह्या गरूड-नमुची दृश्यामुळे ह्या शिल्पपटाचे सौंदर्य कमालीचे वाढलेले आहे. तर मध्यभागी त्रिविक्रम स्वरूपातील विष्णूची भव्य मूर्ती स्वर्ग व पृथ्वी आपल्या हातापायांनी व्यापून उभी आहेत. अष्टभुज त्रिविक्रमाने शंख, चक्रा, गदा, पद्म, धनुष्य, ढाल, तलवार अशी आयुधे धारण केलेली आहेत. निव्वळ अद्भूत असेच हे शिल्प आहे.
त्रिविक्रम विष्णू
ह्याच्याशेजारीच आहे इथले एक अतिसुंदर शिल्प अर्थात स्थौण नृसिंहाचे.
स्थौण नृसिंह
स्थूण म्हणजे स्तंभ. स्थौण नरसिंह म्हणजे खांबातून प्रकट होणारा नरसिंह. केवल, योग, विदारण अशा अनेक प्रकारच्या नृसिंह मूर्तींपैकी स्थौण हा एक प्रकार. नृसिंहाच्या मी पाहिलेल्या असंख्य शिल्पांपैकी हे शिल्प माझ्या मते निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ होय.
"कुठे आहे तुझा देव, ह्या खांबात आहे का" असे प्रल्हादाला म्हणून दैत्य हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारताच त्यातून अर्धा मानव, अर्धा पशू असा नरसिंह प्रकट होतो. ना आकाही ना भूमीवर अशा प्रकारे हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन शस्त्रांना अवध्य असलेल्या हिरण्यकश्यपूचे नृसिंह आपल्या नख्यांनी विदारण करतो.
ह्या शिल्पपटात स्थौण नरसिंह अर्थात विदारण अवस्थेतील आधीचा प्रसंग कोरलेला आहे.
नृसिंह खांबातून प्रकट झालाय आणि त्याची हिरण्यकश्यपूबरोबर झटापट सुरु झालीय. शंख, चक्र, तलवार धारण करणार्या नृसिंहाने एक हात हिरण्यकश्यपूच्या खांद्यावर ठेवून तसेच आपल्या पायाचा विळखा हिरण्यकश्यपूच्या पायास घालून त्यास पकडले आहे आणि एका हाताने त्याला थप्पड देण्याच्या तयारीत आहे. हिरण्यकश्यपू तशाही अवस्थेत हसत असून त्याने आपली तलवार बाहेर काढली असून संरक्षणासाठी ढालही हाती घेतली आहे. जणू त्याला वाटते आहे की आपल्यासारख्या वरप्रदानाने अवध्य झालेल्या दैत्यास असा विचित्रसा दिसणार्या पशूपासून काय हानी पोहोचणार. एकाच क्षणी किंचित हसरे भाव असलेल्या हिण्यकश्यपूच्या चेहर्यावर त्याच क्षणी अविश्वासाचे भाव पण दिसताहेत जणू आपला शेवट आला असल्याचे त्याने ओळखलेले आहे.
इकडे नृसिंहाच्या चेहर्यावर मूर्तिमंत क्रोध दिसत असून त्याचे डोळे विस्फारले गेले आहेत व त्यामुळे त्याच्या भ्रुकुटी कमालीच्या तआणल्या गेल्या आहेत. आपल्या कराल दाढा बाहेर काढून तो हिरण्यकश्यपूच्या संहारात मग्न झालेला आहे.
शिल्पकाराने जबरदस्त ताकदीने हे शिल्प कोरवले आहे.
माझ्या मते शेजारचे त्रिविक्रम आणि हे स्थौण नृसिंहाचे शिल्प एकाच शिल्पकाराने कोरलेले आहे इतका कमालीचा सारखेपणा ह्या दोन शिल्पांमध्ये आहे.
स्थौण नृसिंह
नृसिंहाचा क्रोधवश चेहरा
हिरण्यकश्यपूच्या चेहर्यावरील भावमुद्रा
हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते.
आता पुढची सफर आहे ती लेणी क्र. १४ अर्थात "रावण की खाई" ची
क्रमशः
प्रतिक्रिया
31 Mar 2014 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
हुश्श्श्श्श!!!! वाचून आणि पाहून थकलो!
लिहिताना काय होत असेल याचा अंदाज आला.
शेवटचे (स्थौण नृसिंह) फोटो आणि विवेचन अतिशय अवडले.
31 Mar 2014 - 11:29 pm | खटपट्या
प्रत्येक चित्राचे माहितीपूर्ण समालोचन !!!
31 Mar 2014 - 11:31 pm | यशोधरा
सुरेख!!
31 Mar 2014 - 11:43 pm | पैसा
लिखाण संक्षिप्त पण मस्त आहे. गुगलवर हे फोटो पाहिले तेव्हा एक क्षणभर काळजाचा ठोका चुकला होता, की सगळी शिल्पे अशी का दिसत आहेत! चुना कोणी आणि कशाला लावलाय? आपल्या लोकांचा काही नेम नाही!
1 Apr 2014 - 9:45 am | प्रचेतस
धन्यवाद.
हे चुन्याचे काम बहुधा अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत झालेले असावे. पुरातत्व खात्याने हे सगळे चुन्याचे अवशेष काळजीपूर्वक काढून मूळ शिल्पे पूर्ववत केली पाहिजेत.
1 Apr 2014 - 2:19 am | शशिकांत ओक
प्रभावी लेखन...
आपल्या सोबत दक्षिण भारतातील मंदिरशिल्पे पहायला आवडेल.
1 Apr 2014 - 7:32 am | कंजूस
आवडले .छान लिहिले आहे .सोलापूरपासून पाच तासांवर बदामि ,ऐहोळे ,पट्टडकल आपली वाट पाहात आहे .(रे नं 11423)
6 Apr 2014 - 1:15 pm | बोका
+1
बदामी येथील वराहावतार आणि वामनावतार
-----------
---------------------
1 Apr 2014 - 8:28 am | अजया
अत्यंत महितीपूर्ण लेखन ! तुमच्या आणि कुलकर्णीकाकांच्या लिखाणामुळे अजिंठा वेरुळ परत बघायला जावे लागणार आहे!
1 Apr 2014 - 10:12 am | अनुप ढेरे
मस्तं.. खूप आवडला लेख!
1 Apr 2014 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिशय सुंदर कोरीवकामे, त्यांची सुंदर चित्रे आणि वर वल्लींचे विवेचन म्हणजे त्रिवेणी संगम !
1 Apr 2014 - 1:04 pm | बॅटमॅन
मस्त रे वल्ली. इथलीही काही शिल्पे जबरीच दिसताहेत.
1 Apr 2014 - 1:37 pm | श्रीवेद
मी वेरूळ अनेकदा पहिलेले आहे. पण सम़जले अत्ताच !!
खूप मस्तं लेख.
वाचनखुण साठवलेलि आहे.
1 Apr 2014 - 2:04 pm | आत्मशून्य
बाकी दहा अवतार (क्रमाने) कोणकोणते यावर जाणकारांनी उजेड टाकावा.
1 Apr 2014 - 10:10 pm | प्यारे१
मत्स्य (जलचर),
कूर्म (उभयचर),
वराह (भूचर),
नरसिंह (अर्धमानव, अर्धपशु),
वामन (मानव शरीर असलेला पहिला),
परशुराम,
दाशरथी राम,
कृष्ण,
बुद्ध (ज्ञानावतार असं काहींचं म्हणणं आहे) आणि
कलंकी
15 Apr 2014 - 7:38 am | चौकटराजा
ह भ प वाईकर बुवा,
ते नक्की काय ?
15 Apr 2014 - 8:52 pm | अनुप ढेरे
अमृत पळवणारी मोहीनी हा अवतार नव्ह्ता का? ते रूप पण विष्णूचच होतं ना?
15 Apr 2014 - 10:44 pm | प्रचेतस
तसे विष्णूचे बरेच अवतार आहेत.
मोहिनी, हयग्रीव, शेष, संकर्षण, धन्वंतरी इत्यादी.
पण हे प्रमुख १० अवतार जे सरसकटपणे आढळतात.
17 Apr 2014 - 2:16 pm | अनुप ढेरे
धन्यवाद!
1 Apr 2014 - 9:07 pm | किसन शिंदे
नुसते फोटो पाहून जे समजलं नव्हतं ते तूझ्या लेखामुळे समजण्यास मदत झाली.
धन्यवाद!
2 Apr 2014 - 9:24 am | सुहास झेले
सुंदर रे... तुझ्या पोस्टच्या प्रिंट काढून लेणी परत बघायला हवी तुझ्या नजरेतून :)
2 Apr 2014 - 10:35 am | स्पा
छान माहितीपूर्ण लेख
2 Apr 2014 - 8:29 pm | मदनबाण
सर्व फोटो आवडले. :) माहिती वेळ मिळताच सावकाश वाचीन.
6 Apr 2014 - 12:59 am | लॉरी टांगटूंगकर
उत्तम लेख!! आरामात वाचण्यासाठी बाजूला काढला होता.. मस्त जमलाय! नेहमीप्रमाणेच!
"रावण की खाई" ची वाट पहात आहे.
8 Apr 2014 - 10:46 am | पियुशा
मस्त रे वल्ली दा ,अत्यंत महितीपूर्ण लेख :)
12 Apr 2014 - 7:06 pm | धन्या
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला.
दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले.
15 Apr 2014 - 7:43 am | चौकटराजा
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला.
दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले.
धन्याभाउंच्या नजरेत पाषाण सौंदर्य अवतरले
'अगा अघटित घडले ! " म्हणताना ते अश्म गहिवरले !
12 Apr 2014 - 7:07 pm | धन्या
आजच तुझ्याबरोबर हे लेणे पाहण्याचा योग आला.
दगडातही किती सौंदर्य असते ते मला आज कळाले.
14 Apr 2014 - 11:34 am | प्रशांत
मस्त मज्जा आलि.
या लेण्याला दशावतार का म्हणतात?
असो....
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
14 Apr 2014 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कैलास लेणीत वल्लीबरोबर पुन्हा थोडा वेळ भटकंती करता आली.
या सुंदर लेखमालिकांचे पुस्तक करावे, असं म्हणतो.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2014 - 11:55 am | प्रशांत
14 Apr 2014 - 1:03 pm | प्रचेतस
धन्यवाद.
वास्तविक इथे विष्णूचे दहा अवतार नाहीत. वराह, नरसिंह, वामन, कृष्ण हे चारच अवतार आणि पाचवी अनंतशयनी विष्णूची प्रतिमा येथे आहे. ह्या वैष्णव शिल्पांमुळेच ह्यास दशावतार लेणी समजले गेले. अर्थात ही नावे तुलनेने बरीच अलीकडची आहेत.
14 Apr 2014 - 1:55 pm | सूड
ही लेणी वल्ली सोबत पाहून लेण्यासंबंधी माहिती तर मिळालीच पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला. ;)
14 Apr 2014 - 5:57 pm | अत्रुप्त आत्मा
@पण अंगात हाडे असतात आणि ती दुखतात असा वेगळा साक्षात्कारही झाला.>>> =)) स्वा'भाविक सुडुक!!! =))
15 Apr 2014 - 7:30 am | स्पंदना
किती माहीती मिळते प्रत्येक शिल्प पहाताना.
वल्लीजी धन्यवाद! अतिशय सुरेख माहीती अन फोटो.
24 Jan 2015 - 12:16 am | शशिकांत ओक
कैलास लेण्यातील अदभूतता लिंक
एलियन हा विषय चेष्टेचा मानला जातो.वरील क्लिप मधील विचारातून परग्रहावरील लोकांना माना अथवा ना माना तो आपापल्या विचारधारेचा प्रश्न आहे... पण पहा तर काय म्हणतायत ते विचारक...
24 Jan 2015 - 7:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत !
वल्ली अद्भुत आणि अचाट काम करणा-या लोकांचं काम की सामान्य मजुरांचं काम आहे हे ? कोणी तरी एक प्रमुख अभियंता असावा त्याने सांगितले आणि इतरांनी केले ? काही संदर्भ ???
-दिलीप बिरुटे
24 Jan 2015 - 8:51 am | प्रचेतस
ह्याबद्दल राष्ट्रकूट राजा कर्क दुसरा ह्याच्या शके ७३४ च्या बडोदे ताम्रपटात स्पष्ट उल्लेख आहे.
एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं
यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: |
एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री-
र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति |
भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने-
रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् |
कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी
तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा |
विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही
बाकी लेणे कोरायला १८ नाही तर १०० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागला.
राष्ट्रकूटांच्या किमान ३/४ पिढ्या तरी ह्या कामात खर्ची पडल्या.
24 Jan 2015 - 3:37 pm | गणेशा
बरोबर .. आता दुवा आठवत नाही, परंतु कैलास लेणे बनवण्यास २०० वर्ष लागलेली आहेत आणि १० पिढ्या ते बनवित होती असे नमुद होते
बाकी माणवाने तयार केलेल्या गोष्टींवर आपण देवनिर्मित असे न म्ह्णता देवप्रेरीत असे म्हंटल्याने जास्त योग्य वाटते.
26 Jan 2015 - 6:51 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
म्हणजे हे मानवेतर योनीचे काम आहे असे श्लोककर्त्याला सुचवायचे आहे काय...
आता या आणखी एका फितीत शोधकर्ता काय म्हणतो...
ती विवरे,खळगे,अद्याप कोणी भारतीयांनी कशी आत जाऊन पाहिली नाहीत वगैरे प्रश्न उठतात...
याबाबत आपल्या ऑर्किलॉजिकल खात्याला काय सांगायचे आहे ते समजले तर बरे वाटेल....
ही फीत जुलै २०१४ मधील आहे...
24 Jan 2015 - 2:20 pm | कंजूस
वेरुळदर्शन नावाचे देगलुरकर लिखित एक पुस्तक पाहाण्यात आले चांगले फोटो आणि माहिती आहे.
24 Jan 2015 - 3:51 pm | प्रचेतस
देगलुरकर सर म्हणजे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व.
सुदैवाने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग डेक्कन कॉलेजने आयोजित केलेल्या 'इतिहास आणि पुरातत्व' ह्या कार्यशाळेत आला होता.
24 Jan 2015 - 9:19 pm | माझीही शॅम्पेन
पश्चाताप ! पश्चाताप !! पश्चाताप !!
न गेल्याचा पश्चाताप दुसर काय बोलणार