औरंगाबादला यायचा मुख्य उद्देशच वेरूळ आणि अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यांना भेट द्यायचा हाच होता. पैकी अजिंठ्यावर लिहून झालेच, वाटेतल्या प्रवरासंगमच्या अद्भूत मंदिराबद्दल लिहिले गेले पण वेरूळवर लिहायला तसे काही सुचतच नसल्यामुळे इतके दिवस लिहायचे राहूनच गेले होते. एकंदरीत आमचा लेखनप्रवास आमच्या भटकंतीच्या अगदी उलटा सुलटा कसाही सुरु आहे.
तर मी, किसन, धन्या आणि दिनेश पुण्यावरून निघालो. औरंगाबादच्या नगरफाट्यावर बिरुटे सर आमची वाट बघत थांबलेले होतेच. आता त्यांच्यासवेच आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत खुल्ताबादला औरंगजेबाची कबर पाहायला थांबलो. मूळच्या शिवमंदिराची तोडफोड करून यावर ही कबर उभारली गेली असावी असे एकंदर त्या वास्तूच्या रचनेवरून दिसते. यादवाचे राजचिन्ह सहस्त्रदलकमल, व्यालमुखी कोरीव स्तंभाचे अवशेष त्या वास्तूच्या बांधकामात दिसतात. खुल्ताबादलाच प्रसिद्ध भद्रा मारूती देवस्थान आहे. मंदिरात उताणी झोपलेली मारूतीची भव्य मूर्ती आहे. भाविकांचा बराच राबता तिथे दिसला. तर तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही थोड्याच वेळात वेरूळ गावी पोहोचलो. वेरूळ लेणीच्या अगदी जवळच असलेले वृंदावन हॉटेल मुक्कामासाठी निवडले. बॅगा वगैरे खोलीवर ठेऊन लगेचच भरदुपारी वेरूळ लेणी पाहण्यास निघालो.
वेरूळ लेण्यांचा विस्तार प्रचंड आहे. एकूण ३४ लेण्यांपैकी १ ते १२ ही बौद्ध लेणी आहेत (हीनयान आणि महायान) १३ ते २९ ही ब्राह्मणी शैलीची लेणी (शैव-वैष्णव) आणि ३० ते ३४ अशी एकूण ५ ही जैन लेणी आहेत. वेरूळलेणी प्रवेशद्वारातून थेट कैलास एकाश्म मंदिराच्या प्रांगणातच आपला प्रवेश होतो. साहजिकच बर्याच जणांकडून फक्त कैलास लेणेच पाहिले जाते आणि इतर लेणी राहूनच जातात. त्यामुळेच आम्ही सुरुवातीला जैन लेण्यांपासून वेरूळ लेणी पाहायचे ठरवले. जैन लेणी ही थोडी लांबवर असल्याने गाडी घेऊन जाणेच सोयीस्कर ठरते. थोड्याच अवधीत जैन लेण्यांच्या प्रांगणात पोहोचलो.
वेरूळची जैन लेणी सर्वात शेवटी खोदली गेली. साधारण इ.स. नवव्या-दहाव्या शतकात. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष याच्या कारकिर्दीत हे लेणी निर्माण केली गेली. अमोघवर्षाची राणी बहुधा जैन घराण्यातील असावी. महाराष्ट्रात जैन लेणी अगदी कमी आढळतात याचे कारण म्हणजे जैनांच्या उपासना पद्धतीत संघप्रार्थनेची योजना नाही. जैनांच्या स्थापत्यशैलीचे असे खास वैशिष्ट्यपण नाही. जैन लेणी बरीचशी बौद्ध आणि ब्राह्मणी लेण्यांप्रमाणेच दिसतात. जैन लेण्यांत सर्वसाधारणपणे महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर आणि यक्ष यांच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात
वेरूळची सर्वच जैन लेणी ही एकमेकांना लागूनच आहेत नव्हे तर वेगवेगळी नसून एकच आहेत. बाहेरून जरी प्रत्येकात शिरायचे मार्ग भिन्न दिसत असले तरी प्रत्यक्षात ही सर्वच लेणी आतून जोडलेली आहेत. त्यामुळे ३५ क्रमांकाच्या लेण्यात जाऊन आणि ३० व्या क्रमांकाच्या लेणीतून बाहेर येऊ शकतो. वेरूळाच्या जैन लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंतींवर, छतावर महावीरांच्या आयुष्यावर आधारीत रंगीत चित्रे काढलेली आहेत. किंचित अजिंठ्याच्या शैलीतलीच ही चित्रे आहेत. या लेणीनंतर ही उत्तरकालीन अजिंठा चित्रशैली नामशेष झाली.
लेणी क्र. ३४.
हे लेणे तसे लहानसेच असून एका बाजूला पार्श्वनाथ व दुसर्या बाजूला गोमटेश्वर अशा प्रतिमा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृहात महावीरांची प्रतिमा आहे. हत्तीवर बसलेला मातंग यक्ष आणि सिद्धायिका देवीबरोबरच इथे जैन अनुयायी , आकाशगामी गंधर्व आणि साधेसेच पण नक्षीदार स्तंभ येथे कोरलेले आहेत. छतावर कमळफुलांची नक्षी आहे.
१. लेणी क्र. ३४ चा दर्शनी भाग
२. गर्भगृहातील महावीरांची मूर्ती
इथूनच आतल्या भागातील एका दरवाजाने आपला प्रवेश क्र. ३३ च्या लेणीत होतो ती म्हणजे जगन्नाथसभा.
लेणी क्र. ३३: जगन्नाथसभा
हे भव्य लेणे दुमजली असून आतमध्ये नक्षीदार स्तंभांवर तोलले गेले आहे. दर्शनी बाजूस अर्धभिंत आहे. दोन्ही मजल्यांवर नक्षीदार खांब असून त्यांवर अतिशय सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. ओवरीतच हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची प्रतिमा कोरलेली असून दुसर्या बाजूला सिद्धायिकेची प्रतिमा कोरलेली आहे. या दुमजली लेण्याची खालची आणि वरची बाजू जवळपास सारखीच असून सर्व लेण्यांत तीर्थंकर, यक्ष, यक्षिणी यांच्या एकसारख्याच प्रतिमा कोरलेल्या आहेत.
ओसरी, सभांडप आणि गर्भगृहात महावीरांची मूर्ती अशी या लेणीची रचना. इथल्या भिंतीवर मूर्तींच्या जोडीने चित्रे सुद्धा रंगवलेली आढळतात. त्यात महावीरांच्या जीवनातील काही प्रसंग चित्रबद्ध केलेले आहेत. इथल्या छतांवरही देखणी चित्रे रंगवलेली असून अजिंठ्यातील चित्रांशी यांचे बरेच साध्यर्म्य दिसून येते. मात्र यात कथांपेक्षा नक्षीकाम, वादक, नर्तक, प्राणी अशीच चित्रे काढलेली आढळून येतात.
३. जगन्नाथसभेचा सभामंडप
४. नक्षीदार स्तंभ
५. पद्मासनस्थ महावीर आणि डावीकडे गोमटेश्वर
६. भिंतींवर कोरलेल्या महावीर मूर्ती व चवरी ढाळणारे गंधर्व ( मूर्तीच्या मस्तकावरील तिहेरी छत्राची संकल्पना बौद्ध कलेतून आली हे उघड आहे)
७. महावीर, गजारूढ मातंग यक्ष आणि गोमटेश्वर
८. सिद्धायिका आणि गोमटेश्वर
९. पार्श्वनाथ
१०. गर्भगृहातील महावीर
११. जगनाथसभेतील भित्तीचित्रे
१२. स्तंभ आणि छतांवरील नक्षी
१३. कुठलासा एक प्रसंग
१४. एका ठिकाणी बैलाचे चित्र रंगवलेले आहे.
१५. नृत्याच्या प्रसंगाचे एक अप्रतिम चित्र
१६. नर्तकांचेच अजून एक चित्र
जगन्नाथसभेतूनच लेणीतील एका द्वारातूनच आपला प्रवेश एका अतिशय सुरेख लेणीमध्ये होतो ती म्हणजे इंद्रसभा.
लेणी क्र. ३२: इंद्रसभा
वास्तविक जैन धर्मामध्ये इंद्र आदी देवतांचे बरेच उल्लेख आहेत पण ह्या लेण्यामध्ये इंद्राचा तसा काहीही संबंध नाही. येथील गर्भगृहाच्या दाराच्या डावीकडे हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे तर दुसर्या बाजूला सिद्धायिकेची सुदर मूर्ती आहे. ह्या दोन मूर्तींकडे पाहूनच ह्यांना इंद्र आणि इंद्राणीच्या मूर्ती समजले गेले आणि लेण्याचे नामकरण इंद्रसभा असे झाले. इंद्राशी काहीही संबंध नसला तरीही ह्या लेणीचे काम अगदी इंद्राच्या राज्यसभेला साजेसे असे कमालीचे देखणे आणि सुबक झालेले आहे.
इंद्रसभा हे लेणेसुद्धा जगन्नाथसभेसारखेच दुमजली असून त्याची रचना पण त्यासारखीच आहे. मात्र इंद्रसभेतल्या मूर्तीचे कोरीव काम अतिशय सुबक आहे तर इथल्या स्तंभांवरचे नक्षीकाम कमालीचे नाजूक आहे.
इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नकसकाम केले आहे.
१७. इंद्रसभेचा अंतर्भाग
१८. स्तंभांवरील सुरेख नक्षीकाम
१९. भिंतीवर कोरलेली मातंग यक्ष प्रतिमा
२०. सभामंडपातील कोरीव स्तंभ
२१. गोमटेश्वर
२२. पार्श्वनाथ
इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा.
हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेर्यावर मयुरादी पक्षी विहरतांना दाखवले आहेत. अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही
ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत.
२३. मातंग यक्ष प्रतिमा
ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे.
सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्या हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत.
सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते.
२४. सिद्धायिका शिल्पप्रतिमा
ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत.
२५. प्रवचन ऐकतांना स्त्रीयांची चित्रे
२६. प्रवचन ऐकतांना हात जोडलेले पुरुष
२७. छतावर रंगवलेल्या विविध प्रतिमा
२८. अंगावरील दागिने कमालीचे देखणे रंगवलेले आहेत.
इथल्या सज्जावरून लेणी क्र. ३१ अर्थात मिनी कैलासचे अतिशय सुरेख दर्शन होते. किंबहुना इंद्रसभेचा जो बाह्यभाग आहे तोच छोटा कैलासचा अंर्तभाग आहे.
२९. इंद्रसभेचा बाह्यभाग
३०. सुबक कोरीवकाम
जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसर्या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो. तळमजल्यावरही मातंग यक्ष, सिद्धायिका, गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर आदी मूर्ती कोरलेल्या आहेत.
३१. मातंग यक्ष, सिद्धायिका आणि गर्भगृहातील महावीर
३२. गोमटेश्वराची गंधर्वांसहित देखणी प्रतिमा
इथल्याच एका भिंतीवर देवनागरीत एक शिलालेख कोरलेला आहे. माझ्यामते हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते.
श्रीसोहिल ब्रह्म
चारिणा शान्ति भट्टा
रक प्रतिमेय
श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम - म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे
३३. शिलालेख
इंद्रसभेच्या खालच्या मजल्यातूनच आपला प्रवेश छोटा कैलास लेण्यात होतो.
लेणी क्र. ३०,३१ छोटे कैलास
क्र. ३०,३१ च्या लेणीलाच मिनी कैलास अथवा छोटा कैलास असेही म्हटले जाते. कैलास लेणीप्रमाणेच याची रचना आहे. एकाच कातळात कोरलेले लहानसे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला नक्षीदार उपमंडप अशी याची रचना. हे लेणेसुद्धा आधी कळस मग पाया अशा पद्धतीने खोदले गेले आहे. ह्या लेणीतील मंदिरात सभामंडप, गर्भगृह आणि वर दक्षिणी पद्धतीची शिखररचना आहे. गाभार्यात महावीरांची मूर्ती आहे. हे मंदिर कमालीचे सुंदर आणि नक्षीदार आहे.
३४. इंद्रसभेतून दिसणारे छोटा कैलास
३५. छोटा कैलासचे संपूर्ण दर्शन
इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत.
३६. लेणी क्र. ३१ वरून दिसून येत असलेली तीमजली रचना
३७. कमानींची बदललेली रचना आणि तीर्थकरांचे प्रसंग
३८. गोमटेश्वर, मातंग यक्ष, सिद्धायिका आणि महावीरांच्या मूर्ती कोरलेला शिल्पपट
३९. गज आणि व्याल प्रतिमा
लेणीतच उजव्या बाजूला एक कैलाश लेणीप्रमाणेच एक भव स्तंभ असून त्यावर चतुर्मुखी ब्रह्मयक्षाची प्रतिमा कोरलेली आहे तर डाव्या बाजूला एकाच पाषाणात घडवलेली हत्तीची सुस्थितीतील मूर्ती आहे. मंदिराच्या सभोवतालच्या भिंती ह्या इंद्रसभेच्या बाहेरच्या बाजूस असणार्या अशा आहेत. भिंतींवर महावीर, पार्श्वनाथ यांच्या जीवनातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत. पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर. यांची तपस्या भंग करण्यासाठी कमठ या राक्षसाने हरतर्हेचे प्रयत्न केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष आणि त्याची पद्मावती यांनी पार्श्वनाथांचे संरक्षण केले. धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथांच्या मस्तकी धारण केला आहे आणि आपल्या शरीराच्या वेटोळ्यांनी त्यांच्या शरीराचे कमठापासून संरक्षण केले आहे.
बुद्ध, बुद्धशत्रू मार आणि बुद्धाचे नागराज अनुयायी नंद आणि अनुपनंद यांच्यासारखीच ही कथा.
४०. पार्श्वनाथ आणि कमठाची कथा
४१. महावीर मंदिराच्या बाहेर असलेला स्तंभ (ओबेलिस्क) आणि त्यावरील चतुर्मुखी ब्रह्मयक्ष
४२. मंदिर कळस आणि स्तंभ
४३. सुस्थितीत असलेली गजप्रतिमा
४४. या पुढे एक साधेसे लेणे असून आतमध्ये स्तंभ आणि महावीराच्या प्रतिमेशिवाय काहीही नाही.
४५. ह्या संपूर्ण लेणीसमूहाचा बाह्यभाग
४६. डावीकडची जगन्नाथसभा, मधली कातळाआड दडलेली इंद्रसभा आणि उजवीकडे छोटा कैलास
अजूनही कित्येक प्रसंग ह्या लेणीच्या भिंतींवर कोरलेले आहेत पण त्यामागच्या कथा मला ज्ञात नाहीत पण इथले मूर्तीकाम अतिशय सुरेख आहे. ह्या लेणीचा अंर्तभाग हाच इंद्रसभेचा बाह्यभाग आहे. किंबहुना ही पाचही लेणी इतकी अभिन्न आहेत की यांचे वर्णन लिहितांना यांचा वेगळा विचार करून लिहिणे अशक्यच होते पण लेणीची रचना समजण्याच्या दृष्टीने मी इथे प्रत्येक लेणीचे थोडक्यात वर्णन करायचा अल्पसा प्रयत्न केला आहे. वास्तविक हे लेणीसंकुल म्हणजे वेगवेगळ्या लेणी नसून एकाच लेणीचे हे वेगवेगळे विभाग आहेत असेच समजावे.
इथल्या भिंतीवर कोरलेल्या बरेचश्या जैन शिल्पपटांच्या कथा मला फारश्या माहित नसल्याने ह्या लेणीच्या वर्णनावर साहजिकच बर्याच मर्यादा आलेल्या आहेत.
आता पुढच्या भागात वेरूळच्या ब्राह्मणी लेणींबद्दल (शैव-वैष्णव)- रामेश्वर, नीळकंठेश्वर, जानवसा, सीतेची नहाणी अशा अप्रतिम लेणींबद्दलची माहिती आपण करून घेऊ.
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Mar 2013 - 9:10 am | मिसळलेला काव्यप्रेमी
दारुण शोंदर!!
आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाला __/\__
11 Mar 2013 - 9:13 am | मन१
असे लेख म्हणजे माहितीचा धो धो धबधबा.
सविस्तर पुन्हा एकदा वाचेन म्हणतो.
सध्या वरवर पाहिलाय; आवडलाय.
अवांतर १ :-
मराठीतील अगदि सुरुवातीचा शिलालेख मानला जाणारा "श्री चावुंडराजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले" तोही जैन शिल्पातूनच आलाय ना म्हणे. जैनांनी सर्वप्रथम मराठीचा प्रसार -प्रचार सुरु केला म्हणायचा का?
वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांपूर्वीही होता का?(आय गेस होता; झानेश्वरांचे आजोबा वारीला सोल्पूरमार्गे जात असल्याचे उल्लेख पाहिलेत. शिवाय आचार्य शंकरांचा उल्लेख आहेच; "महायोगपीठे तटे भीमरथ्याम्" वगैरे.) महाराष्ट्रात जैन सत्ता आणि वारकरी रयत असं कॉम्बिनेशन कधीकाळी होतं का मग? ह्याचा जनता किम्वा शासक ह्या दोघांपैकी कुना एकाला त्रास झाला का कधी?
.
अवांतर २ :-
जैन, बौद्ध, हिंदू/पौराणिक्/वैदिक अशी सगळी लेणी एकाच ठिकाणी असली तरी नंतरच्या शासकानी आधीच्या पंथाची तोडफोड न करता शेजारीच दुसरी लेणी उभारण्याचे कामही तसे दुर्मिळ.
.
अवाम्तर ३ :-
खुलताबादेस पूर्वी गर्दी नसे. नो डाउट; जागृत देवस्थान वगैरे मानाय्ची पब्लिक त्यास; पण फारशी गर्दी नसे १९९० च्या असपास पर्यंत. मी अगदि लहान असताना जात असे तेव्हा उजाड मोकळ्या माळरानावर स्थापलेले एक इवलेसे मंदिर असेच खुल्ताबदचे रूप मला आठवते. १९८५ नंतर औरंगाबदमध्ये सेना वाढीला लागली. पाठोपाठ देवळंकडील गर्दी वाढली. कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. कित्येक ठिकाणी जीर्णोद्धार म्हणत नवी मंदिरं उभी राहिली. पण हे सगळं १९९० नंतर. शनी शिंगणापूरचे शनीदेव आणि हा झोप्या मारुती ह्यांना आसपासच्याच काळात ग्लॅमर आलं; त्यापूर्वी त्यांचा केवळ स्थानिक ठिकाणीच वट होता.
11 Mar 2013 - 10:58 am | प्रचेतस
मराठीतील पहिला शिलालेख सर्वसामान्यपणे चामुंडराये.. हा समजला जातो तर शं. गो. तुळपुळ्यांच्या मते पहिला शिलालेख अक्षीचा गधेगाळ आहे. तर दिक्षितांच्या मते अक्षीच्या शिलालेखातला सनावळीचे वाचन तुळपुळ्यांनी चुकीचे केल्यामुळे अक्षीचा शिलालेख हाच मराठीतला पहिला असे मानता येत नाही.
जैनांनी मराठी भाषेचा प्रसार केला म्हणण्यापेक्षा मराठी (महाराष्ट्री प्राकृत) हीच लोकभाषा होती आणि लोकांनीच त्याचा प्रसार केला असे मानले पाहिजे. त्यात जैन, हिंदू, बौद्ध सर्वधर्मीय आले. मराठीला खर्या अर्थाने राजाश्रय मिळाला तो देवगिरीचा शेवटचा श्रेष्ठ सम्राट रामदेवराय यादवाच्या काळात.
बाकी वारकरी संप्रदायाबद्दल मला काहीच सांगता यायचे नाही.
वेरूळच्या लेणीमध्ये तीन्ही धर्माची लेणी असली तरी बौद्ध धर्माचा प्रभाव संपल्यावर स्वतंत्र लेणी उभारतानाच ओसाड पडलेल्या २/३ बौद्ध विहारांमध्येही शैव, वैष्णव मूर्तींची स्थापना झाली. अर्थात कसलीही तोडफोड न करता.
11 Mar 2013 - 10:02 am | धन्या
वल्ली स्टाईल लेख. :)
मस्त. आवडला.
11 Mar 2013 - 10:06 am | मदनबाण
वा... माहितीपूर्ण लेख ! :)
वेळ मिळताच परत एकदा वाचीन.
11 Mar 2013 - 10:14 am | मोदक
लेख (नेहमीप्रमाणे) आवडला.
या मूर्ती कोरण्यासाठी कोणत्या प्रकारची आयुधे वापरली गेली..? मूर्तींचा सरफेस एकदम "फाईन अॅंड स्मूथ" कसा काय केला असावा..?
आणि ती आयुधे तयार कशी केली गेली..?
11 Mar 2013 - 10:29 am | प्रचेतस
माझ्या माहितीप्रमाणे तरी फक्त छिन्नी आणि हातोडा.
वेरूळचे अतिभव्य कैलास लेणे कोरतांना फक्त ३ प्रकारच्या छिन्नी वापरल्या गेल्यात असे अनुमान तिकडील भिंतींवर असलेल्या छिन्नीच्या खुणांवरून संशोधकांनी काढलेले आहे. जैन लेण्यांतही तसेच काहीसे असेल.
मूर्तीचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी दगडाने त्यांना घासत असावेत.
11 Mar 2013 - 10:17 am | अनय सोलापूरकर
नमस्कार,
खूपच माहितीपूर्ण लेख आहे. छायाचित्रासह असल्याने आणखी रंगत आली. एकच दुरुस्ती सुचवेन.
>>> पार्श्वनाथ हे चोवीसावे तीर्थंकर
-- पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
-अनय
11 Mar 2013 - 10:31 am | रमेश आठवले
लेखातील खालील उल्लेख पहा.
." एकूण ३४ लेण्यांपैकी १ ते १२ ही बौद्ध लेणी आहेत (हीनयान आणि महायान) १३ ते २९ ही ब्राह्मणी शैलीची लेणी (शैव-वैष्णव) आणि ३० ते ३४ अशी एकूण ५ ही जैन लेणी आहेत."
"वेरूळची जैन लेणी सर्वात शेवटी खोदली गेली."
हि सगळी तीन वेगवेगळ्या धर्मांची लेणी हजारो वर्षे शेजारी शेजारी टिकून आहेत. नंतरची लेणी खोदणार्या धर्माच्या लोकांना आधीच्या दुसर्या धर्माच्या लेण्यांची मोडतोड करणे आवश्यक वाटले नाही."
या उलट याच लेखातील पुढील उल्लेख पहा.
"वाटेत खुल्ताबादला औरंगजेबाची कबर पाहायला थांबलो. मूळच्या शिवमंदिराची तोडफोड करून यावर ही कबर उभारली गेली असावी असे एकंदर त्या वास्तूच्या रचनेवरून दिसते. यादवाचे राजचिन्ह सहस्त्रदलकमल, व्यालमुखी कोरीव स्तंभाचे अवशेष त्या वास्तूच्या बांधकामात दिसतात."
या दुसर्या प्रकारची उदाहरणे भारतात जागोजागी सापडतात.
-----
अजंठा आणि वेरूळ जंगलाच्या आड लुप्त झाले व लोक या वास्तूंची आठवण विसरले हे फार चांगले झाले. १८१९ साली एका ब्रिटीश अधिकार्याने त्यांचा शोध लावला आणि त्यामुळे आपण हा महान सांस्कृतिक ठेवा आज बघू शकतो. या लेण्यांची माहिती १८१९ च्या काही शेकडे वर्ष आधी तत्कालीन राज्यकर्त्यांना झाली असती तर या लेण्यांचाही खुर्दाबाद ( खुलदाबाद) झाला असता.
आपले नशीब थोर म्हणून आपल्या आधीच्या पिढ्यांना त्यांचे विस्मरण झाले.
11 Mar 2013 - 11:01 am | अनय सोलापूरकर
नमस्कार, थोडे अवांतर. वेरूळ जैन लेण्याप्रमाणेच अनेक प्राचीन जैन मंदिर/ठिकाणे पाहण्या सारखी आहेत.
१. सावरगाव,तुळजापूर जवळ - सुंदर नक्षीकाम.
२. हुमचा,कर्नाटक. - उत्कृष्ट कोरीवकाम [मिपा वर आधीच माहिती आली. दुवा शोधून टाकतो इथे.]
3. कसमलगी,कर्नाटक - भगवान पार्श्वनाथांची मूर्ती खड्गासनात आहे. या मुर्ती चा रंग दिवसाच्या प्रहरा प्रमाणे बदलतात.
४. सहस्त्रफणी पार्श्वनाथ मंदिर, विजापुर - मुर्तीवरील नागास १००० फणे आहेत. मुख्य फण्यावर पाणी / दुधाची धार धरल्यास, उर्वरित ९९९ फण्या मधून वितरीत होते. असा अभिषेक वर्षातून काही ठराविक दिवशी होतो.
५. हाळेबीडू / मूडबिद्री, कर्नाटक - येथे जैन तीर्थंकरांच्या, पाचू माणिक, मोती इ. रत्नांच्या स्फटीकांपासून बनविलेल्या अतिशय लहान व नाजूक प्रतिमा, अत्यंत सुंदर आणि टीपीकल कर्नाटकी जुन्या मंदिरात [त्याला बहुतेक 'बसदि' असा म्हणतात] ठेवल्या आहेत.
- अनय
11 Mar 2013 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर नवीन असलो तरी वल्ली म्हटले म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक / सांस्कृतीक ठेव्यांवर अभ्यासपूर्ण आणि सचित्र (सुचित्रही) लेख हे दुर्मिळ समीकरण मनात पूर्णपणे ठसले आहे !
जो इतिहास आम्हालाच माहितच नाही तो पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवणार? एक मोठी कसर भरून काढत आहात.
वल्ली, अशा लेखांबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद !
11 Mar 2013 - 8:58 pm | जेनी...
इस्पूक् काकांशी प्रचंड सहमत !
लेख आवडला त्याहिपेक्षा फोटोझ आवडले .. लेणी फीरुन आल्यागत वाटलं .
11 Mar 2013 - 12:42 pm | लॉरी टांगटूंगकर
प्रचंड माहिती आहे लेखात,
(नेहमीप्रमाणेच) आवडला आहे ...
11 Mar 2013 - 12:50 pm | बॅटमॅन
दिल वेरूळ वेरूळ हो गया :)
मस्त फटू रे. ते खांब, ते कोरीव काम अन नर्तकांची गंग्नम स्टाईल, सगळेच भारी!!!!
त्या शिलालेखाची लिपी ही बंगाली लिपीशी खूप मिळतीजुळती आहे. तीच गोष्ट "चामुंडराये..." वाल्या शिलालेखाची.
लैच भारी!!
11 Mar 2013 - 1:01 pm | स्पा
कमाल फोटू , कमाल भाग , कमाल माहिती
वल्ली सर सुटलेत फुल टू..
लवकर येऊन द्या फुढील भाग
11 Mar 2013 - 3:07 pm | सुहास झेले
पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)
11 Mar 2013 - 5:27 pm | पैसा
महावीराच्या मूर्ती डोक्यावरच्या कुरळ्या केसांसकट गौतम बुद्धासारख्या कोरल्यात का?
11 Mar 2013 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्लीशेठचा लेख केवळ आणि केवळ सुंदर आणि खूप माहितीपूर्ण.
'चवरी ढाळणारे गंधर्व' चवरी ढाळणे म्हणजे काय ?
-दिलीप बिरुटे
11 Mar 2013 - 9:01 pm | अभ्या..
अप्रतिम आणि अत्यंत अभ्यासपूर्ण लेणे वल्लीदादाचे. धन्यवाद.
आणि प्राडॉ. साहेब, चवरी ढाळणे म्हणजे ते राजाच्या सिंहासनामागे उभा राहून पंखा हलवतेत त्याला म्हणत असावेत.
गुरुद्वारातले मात्र मस्त असतेत एकदम पांढरेशुभ्र. :)
11 Mar 2013 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स रे अभ्या. गुरुदा गद्दी समोर ते पांढरेशुभ्र 'चवर्या' असतात ते आणि पंखे हलवणे म्हणजे चवरीच क्या बात है. थँक्स यार. एवढ्याचसाठी आणि अशीच एखादी जब्रा माहिती मिपावर मिळते म्हणून सालं आम्ही मिपावर पडीक असतो.
-दिलीप बिरुटे
11 Mar 2013 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण म्हणता ते बरोबर आहे. फक्त सिंहासनाच्या पाठीमागे उभे राहून सेवक जो पंखा हलवतात त्याला दुसरा शब्द असावा.
मराठी शब्दरत्त्नाकर उघडून बघितल्यावर चवरीचा अर्थ दिलाय तो असा. चवरी म्हनजे वनगाईच्या केसांच्या झुबक्यास मूठ बसवून माशा वगैरे मारण्यासाठी (माशा हाकालणे म्हणू आपण) केलेले साधन.
-दिलीप बिरुटे
11 Mar 2013 - 9:57 pm | पैसा
याला चामर असेही म्हणतात. पुढच्या चित्रात भरताच्या हातात पांढर्या रंगाच्या केसांचे आहे ते चामर्/चवरी
11 Mar 2013 - 10:40 pm | प्रचेतस
धन्यवाद सर्वांचे
@अनय सोलापूरकर: लेखात योग्य ती दुरुस्ती केली आहे.
@पैसा: महावीरांचे केसही बुद्धासारखेच कुरळे दाखवलेले असतात. जैनांनी स्वतःची अशी स्थापत्यशैली विकसीत केली नाही. बौद्ध लेण्यांपासूनच त्यांनी प्रेरणा घेतलेली असल्याने लेणी स्थापत्यात बरीचशी समानता दिसते. महावीर आणि गौतम बुद्धाच्या मूर्तींमध्ये अगदी सूक्ष्म भेद असतात. महावीरांची बसण्याची पद्धत नेहमी एकाच प्रकारची असते. पद्मासन घालून हात मांडीवरून येऊन एकमेकांत गुंफलेले तर बुद्धाचे हात बहुधा आशीर्वादपर मुद्रेत असतात. हात गुंफलेले अगदी क्वचित दिसतात
@बिरुटे सरः चवरीचा अर्थ बरोबर आहे. चवरीचा वापर माशा वैग्रे हाकलण्यासाठी आणि वार्यासाठी होई. तर चामर म्हणजे छत्र.
11 Mar 2013 - 11:24 pm | ५० फक्त
उत्तम लेख, नविन माहिती मिळाली, पुन्हा इथं जाताना प्रिंट घेउन जाईन आणि महत्वाचं म्हणजे फोटो काढायची गरज राहिली नाही, मन भरुन लेणी पाहता येतील.
बाकी छत्र, चामरं आणि चवरी हे सगळं वेगळं असावं अशी एक शंका आहे,
चवरी म्हणलं की आठवतं दुर्लक्षित अक्षरांचं राष्ट्रगीत -
गो-या भाळी चव-या ढाळी नवरत्नांची माळा
साजणीबाई येणार साजण माझा....
15 Mar 2013 - 11:39 am | पैसा
चामर म्हणजे छत्र नव्हे. कारण 'छत्र-चामर' असे जोडशब्द वापरात आहेत. छत्र आणि चामर वापरणे हा फक्त देव आणि राजांचा अधिकार होता. 'चवर' हा 'चामर' याचा अपभ्रंश असावा.
11 Mar 2013 - 10:57 pm | किसन शिंदे
हिंदु लेण्यांवरचा भाग पटकन टाक रे.
अजून पुढे बरंच लिहायचं पडलंय.
11 Mar 2013 - 11:13 pm | सूड
नेहमीप्रमाणेच छान लिखाण !!
14 Mar 2013 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा
हम्कू अगोबा का ल्येखन नेहमिप्रमाणेच आवड्या है...!!! :-)
15 Mar 2013 - 12:04 pm | सस्नेह
उन्हात घामेघूम होत लेणी पाहण्यापेक्षा बसल्याजागी फोटो अन माहितीपण !
अन तेही निवडक अन फोटोजेनिक angle मधून !
धन्यवाद वल्लीशेठ.
22 Mar 2013 - 11:24 am | सौरभ उप्स
भारीच रे.....