वेरूळ: भाग ८ - बौद्ध लेणी (तीन ताल व दोन ताल)

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
8 Sep 2014 - 3:34 pm

वेरूळ : भाग ७ - नवी सफर (रावण की खाई)

वेरूळच्या जैन लेणींपासून सुरुवात करून ब्राह्मणी लेण्यांचे दर्शन घेत कैलासावरून सरकत सरकत म्हणजेच लेणी क्र. ३४ पासून लेणी क्र. १३ पर्यंत उलटा प्रवास करत करत आपण आता पोहोचलो ते वेरूळच्या सर्वात जुन्या लेण्यांपाशी, बौद्ध लेण्यांपाशी.

ह्या लेण्या जुन्या म्हणजे किती जुन्या? तर फार जुन्या नाहीत, फार जुन्या नाहीत म्हणजे ह्या हिनयानपंथीयांच्या नाहीत. ह्या आहेत महायान कालखंडाच्या शेवटी शेवटी खोदल्या गेलेल्या म्हणजेच साधारण ६ व्या ते ८ व्या शतकात खोदल्या गेलेल्या. महायान कालखंडात बौद्धांमध्ये मूर्तीपूजेचा प्रसार झाल्यामुळे ह्या लेण्यांमध्ये बोधीसत्वांच्या मूर्तींबरोबरच तारा, भ्रुकूटी, जम्भाल्, हरिती, महामयुरी अशा काही आगळ्यावेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात.

चला तर मग ह्या बौद्ध लेण्यांच्या सफरीला.

लेणी क्र. १२ (तीन ताल)

तीन मजल्यांच्या रचनेमुळे ह्या लेणीला तीन ताल असे म्हटले गेले. सुरुवातीच्या काही पायर्‍या मग खडकातच खोदून काढलेले प्रवेशद्वार, त्यापुढे विस्तीर्ण प्रांगण आणि समोर तीन भव्य मजले अशी ह्याची रचना. हे तीन मजले तरी कसे तर आजचे हॉस्टेल कसे असेल तसेच. जणू जुन्या काळची वसतीगृहेच ही. पण रचना जरी अशी असली तरी येथे विश्रांतीकक्ष फारसे नाहीत. मात्र प्रत्येक मजल्यावर गाभार्‍यासदृश कक्ष आणि त्यात बुद्धमूर्ती अशी ह्याची रचना आहे. साहजिकच वर्षावास म्हणून ह्यांचा वापर फार कमी होत असावा व ही बुद्ध प्रार्थनेची केंद्रे असावीत हे सहजी लक्षात येते.

१. तीन ताल चे प्रथम दर्शन

a

सभामंडप खांबांवर तोलून धरलेला असून आतील बाजूस गर्भगृह आणि त्यात बुद्धाची धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेतील आसनस्थ प्रतिमा आहे.
प्रवेशद्वारातून आता जाताच उजवे बाजूस विविध प्रकारची बोधिसत्वांच्या प्रतिमांची मंडळे आहेत. त्यात मध्यभागी पद्मासनस्थ बोधीसत्व आणि त्याच्या बाजूने ८ बैठे बोधीसत्व अशी याची रचना. याच्याच बाजूचे एका भिंतीवर अशाच प्रकारचे एक मंडल असून त्या मंडलाचे वर बोधीसत्व आणि त्याच्या भोवती तारा आणि मंजुश्री ह्या बोधीशक्ती
आजूबाजूच्या भिंतींवर आणि स्तंभांवर देखील अशाच प्रकारच्या प्रतिमा आहेत.

२. सभामंडपाची रचना

a

३. बोधीसत्व मंडले
a

दुसर्‍या मजल्यावर जाण्यास सभामंडपाच्या डावीकडच्या भिंतीतच सोपानमार्ग खोदला आहे. दुसर्‍या मजल्याची रचनासुद्धा पहिल्या मजल्यासारखीच पण इथे असलेली शिल्पे जास्त सुस्पष्ट आणि देखणी आहेत.

इथेही भिंतींवर पहिल्या मजल्यासारखीच बोधीसत्व प्रतिमा असलेली मंडळे आहेत. उजव्या कोपर्‍यातील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर आणि त्याच्यासह स्त्री प्रतिमा अर्थात बोधीशक्ती आसनस्थ असून सर्वांनी हाती कमळे धारण केली आहेत.

४.
a

डावीकडील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर, डावीकडे स्त्री बोधीसत्व तारा वरदमुद्रेत आणि भ्रुकुटी पाण्याचा कुंभ घेऊन स्थापित आहेत.

५. रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी
a

बाजूच्या भिंतींवर अशीच लहानमोठी शिल्पे असून समोर गर्भगृह आहे. गर्भगृहाचे दार कुलूपबंद असल्याने आतली बुद्धमूर्ती पाहण्यास मिळाली नाही मात्र द्वारपट्टीकेच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसरे बाजूस वज्रपाणी बोधीसत्व आहेत.

६. बोधीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी

a-a

डावीकडच्या भिंतीतूनच तिसर्‍या मजल्यावर जायचा मार्ग आहे. येथेच भिंतीत एक दुमिळ शिल्पे आहे. ह्यात गौतमाने सत्य शोधण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केल्याचे दर्शवले आहे. ह्यात गौतम आपल्या घोड्यावर बसून आपले राज्य सोडून पुढे चालला आहे.

७. महान प्रवास
a

तिसरा मजला अवश्य पाहावाच असा. येथील भिंतींवरील शिल्पपटात बोधीसत्वांच्या भूमीस्पर्श, धम्मचक्रपरिवर्तन अशा विविध मुद्रेतील देखणी शिल्पे आहेत. तर मंडपाच्या समोरील बाजूस डावीकडे सात मानुषी बुद्ध तर उजवे बाजूस धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेत बसलेले सात बोधीसत्व आहेत. बुद्ध असलेले दोन अतिभव्य असे शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटाचंच्या आतील बाजूस म्हणजेच गाभार्‍याच्या दोन्ही बाजूना तीन तीन बौद्ध देवतांच्या स्त्री प्रतिमा (बोधीशक्ती) कोरलेल्या असून द्वारपट्टीकेच्या दोन्ही बाजूंस दोन्ही हाताची घडी घातलेले बोधीसत्व द्वारपाल आहेत. कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव ह्या हाताची घडी घातलेल्या द्वारपालांवर जाणवतो.

८. तिसरा मजला
a

९. तिसर्‍या मजल्याची साधारण रचना व त्यात असलेले शिल्पपट
a

१०. धम्मचक्रपरिवर्तन मुद्रा
a

११. ध्यानमुद्रेत बसलेले सात मानुषी बुद्ध
a

१२. धम्मचक्रपरीवर्तन मुद्रेत असणारे सात बोधीसत्व
a

१३. गर्भगृहाच्या डाव्या बाजूस असलेल्या तीन स्बोधीशक्ती प्रतिमा
a

१४. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन बोधीशक्ती प्रतिमा
a

१५. हाताची घडी घातलेला बोधीसत्व द्वारपाल
a

गाभार्‍यातील भव्य बुद्धमूर्ती मात्र दार कुलूप आवून बंद केलेले असल्याने येथेही पाहता आली नाहीच. तीन ताल बघून मग आम्ही वळलो ते लेणी क्र. ११ कडे.

लेणी क्र. ११ (दोन ताल)

ह्या लेण्याची रचना सुद्धा लेणी क्र. १२ प्रमाणेच. पूर्वी ह्या लेणीचा तळमजला ढिगार्‍यात गाडला गेला असल्याने वरचे दोन मजलेच दृश्यमान होते म्हणून ह्याला दोन ताल (दुमजली लेणे) असे नाव पडले. कालांतराने तळमजला साफ करून आजच्या स्थितीत आणला गेला.

१६. दोन तालचे मुखदर्शन

a

ह्या लेणीची रचना तीन ताल प्रमाणे असूनही अंतर्भागातलई रचना किञ्चित वेगळी आहे. आतील सभामंडप जास्त रूंद नाहीत मात्र प्रत्येक मजल्यावर मधे गाभारा व आतमध्ये बुद्धमूर्ती आहे. रचना साधारण सारखीच असल्याने येथे प्रत्येक मजल्याचे वर्णन न करता काही निवडक छायाचित्रे देतो.

१७. गर्भगृहातील भूमीस्पर्श मुद्रेतील बुद्धप्रतिमा. बुद्धाने मारविजयानंतर भूमीला स्पर्श करून तिचे आवाहन केलेयाचे हे प्रतिक.
a

१८. दुसर्‍या मजल्याची रचना
a

१९. ओसरीतील स्तंभांवरील वाळूच्या घड्याळ्यासारखी दिसणारे नकसकाम
a

२१. आतील भिंतींवरील बोधीसत्वाच्या मूर्ती असलेल्या चित्रचौकटी
a

२२. तिसर्‍या मजल्यावरून दिसणारे प्रांगण
a

ह्या भागात आपण १२ व १३ क्रमांकाच्या बौद्ध लेण्या थोडक्यात पाहिल्या. बौद्ध मूर्तीशास्त्राची फारशी माहिती नसल्याने येथे प्रत्येक मूर्तीचे सविस्तर वर्णन देणे मला शक्य झाले नाही. आता पुढच्या शेवटच्या भागात उरलेल्या बौद्ध लेणी पाहून आपण वेरूळ सफरीची सांगता करूयात.

क्रमशः

प्रतिक्रिया

विटेकर's picture

8 Sep 2014 - 3:39 pm | विटेकर

तुमचे लेख म्हणजे ईन्डोलॉजीचा तास .
प्रणाम स्वीकारा !

आवडले फोटो आणि लेख .बुध्द चरित्र माहिती असल्यास चित्रे शिल्पे समजतात .

एस's picture

8 Sep 2014 - 4:34 pm | एस

यातील खूपशा मूर्तींच्या नावाचा अर्थ किंवा त्यांचे बौद्ध धम्मातील स्थान अथवा इतर अशीच माहिती हे समजले नाही. पण तुमच्या लेखांमुळे या बाबतीतही उत्सुकता निर्माण होतेय हे चांगले आहे. छायाचित्रेही उत्तम आहेत.

मला आमचचं सजीव शील्प अजुन नीटसं कळलं नाहिये तीथे हि शील्प काय कप्पाळ कळणार?

सुहास झेले's picture

9 Sep 2014 - 12:40 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो..... :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2014 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा

हाताची घडी घातलेला अणी सप्त मानुषी लै भारी!

हे असेच मानुषी बुध्द बँकाॅकच्या जुन्या बुध्दमंदिरात पाहीले होते.त्यांचा सिग्नीफिकन्स काय अाहे? मानुषी का म्हणतात?

प्रचेतस's picture

9 Sep 2014 - 8:52 am | प्रचेतस

मानुषी बुद्ध म्हणजे मनुष्यजन्माच्या प्रत्येक कल्पामध्ये बुद्धावस्था प्राप्त झालेले. थोडक्यात बुद्धावतार. हीनयान व महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात.

हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे.
१. विपश्यी
२. शिखी
३. विश्वभू
४. क्रकुच्छन्द
५. कनकमुनी
६. काश्यप
७. शाक्यमुनी

यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.

अजया's picture

9 Sep 2014 - 1:56 pm | अजया

धन्यवाद वल्ली!

कवितानागेश's picture

14 Sep 2014 - 12:16 am | कवितानागेश

हेच विचारणार होते. :)
बाकी फोटो मस्त आलेत.

विलासराव's picture

15 Sep 2014 - 8:54 pm | विलासराव

शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे

वल्ली मस्त आहे लेख.
मी यकुबरोबर ह्या लेण्या पाहिल्यात.
पुढील बुद्ध आहेत 'अरी मैत्रेय'.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2014 - 8:57 am | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच लेख आणि फोटो आवडला ! वेरूळच्या भटकंतीची आठवण ताजी झाली :)

झकास !
रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी
यांच्या बद्धल अधिक माहिती देता येइल का ? मला वाटतं मी {नक्की नाही} की Prince of Wales Museum मधे या नावा संदर्भात काही मूर्ती आणि काही तरी रत्न चक्र पाहिल्या सारखे वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रचेतस's picture

9 Sep 2014 - 5:55 pm | प्रचेतस

अवलोकितेश्वर हा बोधीसत्वांमध्ये सर्वात प्रसिद्ध. याचे प्रमुख लक्षण म्हणजे ह्याच्या हाती कमळ असते. अथांग करुणा हा ह्याचा मुख्य गुणधर्म. हा स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून सर्वांच्या सुखाकरिता झटत असतो.
अवलोकितेश्वरामध्ये सर्वच बुद्ध समाविष्ट होतात असे मानले जाते.

तारा ही अवलोकितेश्वराची शक्ती किंवा स्त्री बोधीसत्व. तर भ्रूकुटी हे तारेचेच दुसरे रूप.

अवलोकितेश्वर आणि तारा ह्यांचे रंगांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. रक्त अवलोकितेश्वर हा लाल रंगात दाखवतात. वेरूळमधल्या ह्या मूर्टी तांबड्या रंगात रंगवलेल्या आढळून येतात म्हणून हे रक्त अवलोकितेश्वर आणि त्याची शक्ती रक्त तारा.

मदनबाण's picture

13 Sep 2014 - 8:31 pm | मदनबाण

ओक्के, धन्यवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings

धन्या's picture

9 Sep 2014 - 10:20 am | धन्या

सुंदर !!!

आम्हाला व्यक्तीच्या पूजेपेक्षा व्यक्तीची शिकवण जास्त महत्वाची वाटत असल्यामुळे बुद्धिस्ट सायकॉलॉजी वाचत असूनही बुद्ध चरीत्राबद्दल विशेष उत्सुकता नव्हती.

मात्र या लेखाने डॉ. आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबींचं या संदर्भातील लेखन वाचावं असं वाटू लागलं आहे.

हाही भाग सुरेख
फोटो अप्रतिम

वल्लीचा नेहमीप्रमाणं दगडी सॉलिड लेख.

बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय.
तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का?
गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या?

मदनबाण's picture

9 Sep 2014 - 1:36 pm | मदनबाण

बाकी गौतम बुद्ध स्वतः मूर्तीपूजेच्या विरोधात होते असं कुठंतरी वाचलंय.
तथाकथित अनुयायी हे मानत नव्हते का?
गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती का आणि कशाप्रकारे बनवण्यात आल्या?

प्यारेजी हेच माझ्याही मनात होते पण उगाच राहिलो.

थेरवादी किंवा हिनयान पंथांत मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पण नंतर धर्मप्रसार करतांना बौद्ध उपासकांना बुद्धाच्या सगुण रूपातल्या प्रार्थनेची गरज भासू लागली तेव्हा पहिल्या शतकात कुशाण सम्राट कनिष्काच्या अध्यक्षतेखाली काश्मिरमध्ये झालेल्या चौथ्या धम्मपरिषदेत बुद्धमूर्ती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली व बौद्धांमध्येही मूर्तीपूजेला प्रारंभ झाला. सुरुवातीला केवळ विहारांमध्ये मर्यादित असलेल्या ह्या प्रतिमा नंतर मात्र खुद्द स्तूपांवरही कोरण्यात येऊ लागल्या व स्तूप उभारणीचा मूळ उद्देश लयास जाऊन चैत्य अधिक भरजरी होऊ लागले.

काउबॉय's picture

14 Sep 2014 - 4:25 pm | काउबॉय

म्हणूनच व्याक्तिपुजेशिवाय व्यक्तिशिकवण निर्माण होत नाही हां मूलभूत सिध्दांत मान्य करावा लागतो. भलेही शिकवण काहीही असो.

निव्वळ गुर्त्वाकर्षण अभ्यासुन तुम्ही खरे संशोधक बनणार नाही. अर्थात आम्ही हे सुध्दा अभ्यासले आहे हे निव्वळ मिरवायचा उद्देश असेल तर भाग अलहिदा.

अहो त्यांचा मिरवायचा हाच उद्देश आहे. असे लेख लिहायचे, लोकांची वाहवा मिळवायची हाच त्यांचा हेतू आहे. तुम्हाला लेण्यांबद्दल, सातवाहन काळाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांना विचारा. मग बघा ते कसे उत्तरे देतात.

तुमचे आभार्स. यापुढे प्रथम आपणास अवश्य विचारणा करेन

एस's picture

14 Sep 2014 - 10:45 pm | एस

बौद्ध धम्मात बुद्धमूर्तीला मान्यता मिळायच्या आधी गौतम बुद्ध दाखवायचे असल्यास कमळ, पदचिह्न वगैरे प्रतिकात्मक रूपात दाखवले जायचे.

तसेच मला वाचलेले आठवतेय त्यानुसार वरील धम्मपरिषद संस्कृत भाषेत झाली होती. तोपर्यंतच्या धम्मपरिषदा ह्या पाली वा प्राकृतात होत असत. चुभूदेघे.

सस्नेह's picture

9 Sep 2014 - 3:53 pm | सस्नेह

शिल्पे फारशी सुस्थितीत दिसत नाहीत.
महाराष्ट्र शासनाचे पुरातन वस्तू जतन करण्याकडे फारसे लक्ष नाही.
त्यामानाने कर्नाटकातली शिल्पे अन पुरातन वस्तू अत्यंत उत्तम स्थितीत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2014 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीशेठ, लेख आणि फोटो केवळ क्लास.
आता पुन्हा लेणी नव्याने पाहणं आलं.

-दिलीप बिरुटे

हाही भाग माहीतीपूर्ण !!

यशोधरा's picture

11 Sep 2014 - 10:08 pm | यशोधरा

सुरेख. फोटो, माहिती, सर्वच उत्तम.

पैसा's picture

13 Sep 2014 - 2:51 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि माहिती!

खटपट्या's picture

14 Sep 2014 - 12:13 am | खटपट्या

लेख आणि फोटो दोन्ही अतिशय अप्रतिम.
प्रत्यक्ष वेरूळ ला कधी गेलो नाही पण गेलो असतो तरी एवढी माहिती मिळाली नसती असे आता वाटायला लागले आहे. जेव्हा जाईन तेव्हा या लेखाचे प्रिंट ओउट घेवून जाईन.

आम्हीही वेरूळ पाहून आलो. मात्र असे अद्भूत आविष्कार आम्हाला दिसू शकले नाहीत. तुम्ही पाहता, दाखवता हीच गोष्ट अलौकिक आहे. त्याकरता सादर प्रणाम. लेख आवडला.

१९ वे चित्र तर अविस्मरणीय आहे. धन्य ते निर्माण करणारे कलावंत. आणि धन्य तुम्ही, ज्यांनी ते त्यातील सौंदर्यासह ते आमच्यापर्यंत पावते केलेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2014 - 4:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

वल्लीदादा, तुसी ग्रेट हो.

पैजारबुवा,

काव्यान्जलि's picture

15 Sep 2014 - 6:08 pm | काव्यान्जलि

वल्ली सर.. या वीकेंड ला श्री. उदय इंदुरकर सरांसोबत ( कदाचित तुम्हाला माहित असतील) वेरूळ वारीचा अनुभव घेतला. त्यांच्या सोबतचा हा प्रवास म्हणजे पर्वणीच होती. ब्लशिंग इंडिअन स्टोन्स हि संस्था अश्या प्रकारच्या ट्रिप्स अरेंज करते . तुम्ही इथे दिलेल्या माहितीचा देखील खूप फायदा झाला. धन्यवाद . खूप मस्त वाटलं . तिथली सर्व शिल्प आपल्या सोबत काहीतरी बोलू पाहत आहेत असं वाटत होत. त्या वातावरणातून परत यावं अस वाटतंच नव्हतं. २ दिवस देखील खूप कमी वाटले. परत नक्की यायचं असं ठरूनच आम्ही तिकडून निघालो..

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 6:55 am | कवितानागेश

इंदूरकरांचे एक प्रेझेन्टेशन फार पूर्वी पाहिलं आहे. आता तर अजून माहितीचा खजिना असेल त्यांच्याकडे. :)

उदयन इंदुरकरांचा कार्यक्रम एकदा पाहिलेला आहे. प्रेझेंटेशन खूप छान असतं.

किसन शिंदे's picture

18 Sep 2014 - 10:35 pm | किसन शिंदे

मागच्या वेरूळ दौर्‍यात या लेणी पाहायच्या राह्यल्या असं वाटतंय. सुर्यास्त झाला होता आणि कैलास मंदिरातच बराच वेळ गेल्यामुळे या सुंदर आणि अतिप्राचीन लेण्यांचं दर्शन हूकलेच. :(

प्रचेतस's picture

19 Sep 2014 - 9:32 am | प्रचेतस

हो ना.
तेव्हा आपण वेरूळला एकच दिवस होतो. दुसर्‍या दिवशी अजिंठ्याला जायचं असल्याने ही लेणी पाहता आली नव्हती.
मात्र त्यानंतरच्या दोन फेर्‍यांत मात्र पाहून घेतलीच. :)

कंजूस's picture

19 Sep 2014 - 9:24 am | कंजूस

सांची पाहिलं का?

प्रचेतस's picture

19 Sep 2014 - 9:31 am | प्रचेतस

नाही ना.
सांची, खजुराहो करायचं आहे. योग कधी येतोय कुणास ठाऊक..!

विलासराव's picture

19 Sep 2014 - 10:15 am | विलासराव

मला न्याल तर लवकरच योग येईल.

प्रशांत's picture

19 Sep 2014 - 1:23 pm | प्रशांत

वल्लीशेठ, लेख आणि फोटो केवळ क्लास.
छान उजळणी झाली.

पुढची वेरुळ वारी कधि?