मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम

प्रचेतस · · भटकंती
वेरूळः भाग ५ (कैलास लेणी ३) अंतिम वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २) वेरूळः भाग १ (जैन लेणी) वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी) वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १) ----------------------------------------------------------------------------------------------------------------- मागच्या भागात आपण वेरूळच्या मुख्य कैलास मंदिराला फेरी मारून रामायणाच्या शिल्पपटापर्यंत आलो होतो. तर चला आता आता त्यापुढील काही शिल्पांचा आस्वाद घेत घेत सभामंडपात प्रवेश करूयात. १. रामायणाच्या शिल्पपटाच्या पुढेच पद्मासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाचे एक शिल्प आहे. a जटायूवध रामायणाच्या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस रावण आणि जटायू यांच्या युद्धाचा प्रसग कोरलेला आहे. सीतेला आकाशागामी रथातून पळवून नेत असलेल्या रावणाला पाहून जटायू त्याच्यावर त्वेषाने हल्ला चढवत आहे. रावणाचे शरीर एका दिशेला तर रथाचे घोडे तो रथ विरुद्ध दिशेस वाहून नेत आहेत. चावे घेत असलेया जटायूचा वध करण्यासाठी एका हाताने रथाचे चक्र तर दुसर्‍या हातात शक्ती धारण केली आहे. २. जटायूवध a ह्याच जटायूवधाच्या पुढील बाजूस वाली सुग्रीव युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे. वालीवध हा शिल्पपट दोन पॅनल्समध्ये विभागला गेलाय. वरच्या पॅनलमध्ये वाली आणि सुग्रीव एकमेकांशी द्वंद्वयुद्ध करताना दाखवले आहेत. तर खालच्या पॅनलमध्ये वालीचे मृत शरीर कवटाळून सुग्रीव दु:ख करीत बसला आहे तर वालीपत्नी तारा धाय मोकलून रडत आहे. तर बाजूला राम लक्ष्मण त्यांचे सांत्वन करायला आलेले दर्शविले आहे. रामाच्या हातून कपटाने वालीवध होण्याचा प्रसंग मात्र येथे कोरलेला नाही हे विशेष. ३. वालीवध a लकुलीश शिव या शिल्पपटाच्या थोड्या वरील बाजूस उर्ध्वरेता अवस्थेतील लकुलीश शिवाची मूर्ती आहे. चार हस्त असलेली ही मूर्ती उभ्या अवस्थेत आहे. डावा हात अभयमुद्रेत असून उजव्या हाती त्याने लगूड धारण केले आहे. ४. लकुलीश शिव a ५. ब्रह्मदेव लकुलीशाच्या थोडे पुढेच ब्रह्मदेवाची अजून एक मूर्ती आहे. ह्याची दाढी अगदी इजिप्शियन फेरोंसारखी निमुळती आणि लांब आहे. a नरसिंह ह्या भिंतींवरच नरसिंहाची दोन आगळीवेगळी शिल्पे आहेत. सर्वसाधारणपणे हिरण्यकश्यपूचे विदारण करणार्‍या नरसिंहाचे शिल्प सर्रास दिसते, तशी येथेही आहेतच तथापि ही शिल्पे विदारण करण्याआधी झालेल्या द्वंद्वाची आहेत. ६. नरसिंह-हिरण्यकश्यपू द्वंद्व. a-a ह्याच्या पुढील भागात गजेन्द्रमोक्षाचा प्रसंग कोरलेला आहे. गजेंद्रमोक्ष विष्णूचा परमभक्त इंद्रद्युम्न राजा पर्वतावर विष्णूचरणी लीन होण्यासाठी कठोर तप करत असता तिथे अगत्स्य ऋषी येतात. तपात मग्न झालेल्या राजाचे अगत्स्यांकडे लक्ष जात नाही तेव्हा संतापलेले अगत्स्यमुनी राजास पुढील जन्मी हत्ती होशील असा शाप देतात. पुढील जन्मी हत्ती झालेला गजेंद्र इतर हत्तींसोबत सरोवरात जलक्रीडा करण्यासाठी उतरला असता एक मगर त्याचा पाय धरून सरोवरात त्याला ओढू लागते. आपल्या पूर्वजन्माचे स्मरण असलेला गजेन्द्र त्याही अवस्थेत विष्णूची मदतीसाठी स्तोत्रगायन करून प्रार्थना करतो. तेव्हा विष्णू गरूडावरून बसून थेथे येऊन मगरीच्या तावडीतून गजेन्द्राची सुटका करून त्याला मोक्ष प्रदान करतात अशी ही कथा. ७. गजेन्द्रमोक्ष a अंधकासुर-गजासुर वध गजेन्द्रमोक्षाच्या शेजारीच अंधकासुरवधाचे शिल्प पुन्हा एकदा आपल्यासमोर येते. हे शिल्प मात्र काहीसे आगळे आहे. नीलासुर, गजासुर अआणि अंधकासुर अशा ती असुरांचा वध एकाच वेळी शिव करत असल्याचे येथे दाखविले आहे. शंकराने आपला एक पाय नीलासुराच्या मस्तकी दाबून धरलेला आहे. तर गजासुराला फाडल्यामुळे आपले हत्तीचे रूप त्यागून गजासुर आपल्या मूळ राक्षरूपात प्रकट झाला असून त्याचा चेहरा वेदनांमुळे भयानकरीत्या वाकडातिकडा झालेला आहे. तर वरील बाजूस शिवाने आपला त्रिशुळ अंधकासुराच्या छातीत खुपसून त्याला त्रिशुळावरच तोलून धरले आहे आणि एका हाता वाडगा धरून त्याच्या शरीरातले रक्त तो त्यात गोळा करत आहे. वाडग्यातून चुकून निसटलेले रक्त खाली पडून त्यापासून अजून रा़क्षस निर्माण होऊ नये म्हणून सप्तमातृकांतील एकीनेही अजून एक वाडगा उंच धरीला आहे. तर तिच्या शेजारी पार्वती प्रसन्नमुद्रेत बसून आपल्या पतीचा पराक्रम निरखीत आहे. ८. राक्षसवध a ही शिल्प बघून आम्ही आता सोपान चढून सभामंडपात जाण्यासाठी निघालो. सभामंडपात प्रवेशद्वाराशेजारील भिंतीवर आहे लिंगोद्भव शिवाची मूर्ती. लिंगोद्भव एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले. ह्या शिल्पपटात खालील बाजूस वराहरूपी विष्णू स्तंभाचा तळ शोधत असताना दाखविले आहेत तर वरील बाजूस उजवीकडे चतुर्मुखी ब्रह्मदेव स्तंभाचा वरील भाग शोधत आहेत. आदी अंताचा कसलाही थांग न लागल्याने शेवटी ते लिंगरूपी स्तंभातून प्रकट झालेल्या शिवाला शरण गेलेले आहेत. ९. लिंगोद्भव शिवप्रतिमा a नंदीमंडप आता मंदिराच्या बाह्यभागावरची शिल्पे पाहून आम्ही सभामंडपात प्रवेश करतो झालो. अरेच्चा, पण त्याआधी नंदीमंडपात जाऊन एक छोटासा फेरफटका मारायलाच हवा. सभामंडपाच्या पुढ्यातल्या सेतूवरून पुढे जाताच नंदीमंडप लागतो. दुर्दैवाने इथले फोटो मजकडून काढायचे राहिले. मंडपात नंदीची भग्न मूर्ती आहे. मंडपाचे शिखर द्राविडि पद्धतीचेच असून शिखराच्या गोपुरावर यक्ष वाद्ये वाजवत असल्याचे दृश्य कोरले आहे. जणू हा नंदीमंडपाच्या सुरुवातीस असलेला वाद्यमंडपच आहे असे ते सुचित करत आहेत. नंदीमंडपातन वेरूळच्या दोन्ही स्तंभांचे सुरेख दर्शन होते. १०. नंदीमंडपाच्या गोपुरावरील वाद्ये वाजवणारे यक्ष a ११. नंदीमंडपातून दिसणार्‍या वेरूळ लेणीतील बाह्य भिंतींवर कोरलेल्या इतर मूर्ती a आता परत फिरून चला आता सभामंडपात सभामंडप कैलास लेणीमंदिरातील सभामंडप एकूण १६ स्तंभावर तोललेला असून प्रत्येक स्तंभ सालंकृत असून त्यावर देवीदेवतांची शिल्पे, पौराणिक कथांमधील प्रसंग शिवाय अगदी मैथुनशिल्पेही कोरलेली आहेत. पण सभामंडपातील सर्वात मोठे आकर्षण आहे ते इथल्या छतावरील चित्रांचे. अर्थात सभामंडप अंधारी असल्याने चित्रे पाहण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. किंचित अजिंठा शैलीतली ही चित्रकला यानंतर नामशेष झाली. या खेरीज सभामंडपाच्या छतावर बरोबर मध्यभागी नटराज शिवाचे एक अप्रतिम शिल्प कोरलेले आहे. १२. सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे a-a-a १३. सभामंडपातील स्तंभावरील शिल्पे a-a-a १४. छतावरील नृत्यांगना a १५. छतावरील नृत्यांगना a अंतराल येथून पुढे जाताच लागतो तो अंतराल, म्हणजेच सभामंडप आणि गर्भगृह यांमधील चिंचोळा भाग. अंतराळाच्या एका बिंतीवर नंदीवर बसलेल्या गौरीशंकराचे शिल्प आहे तर दुसर्‍या भिंतीवर वरील बाजूस कमंडलू घेतलेली अन्नपूर्णा व तिच्या डावी-उजवीकडे ब्रह्मा आणि विष्णू आहेत. तर त्याच्या खालच्या बाजूस शिवपार्वती अक्षक्रीडेचा भग्नावस्थेतील देखावा आहे. १६. गौरीशंकर a गर्भगृह अंतराळातून आपला प्रवेश होतो ते थेट गर्भगृहात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूस उभी आहे मकरारूढ गंगा तर दुसर्‍या बाजूस आहे ती कूर्मवाहनी यमुना व गर्भगृहाच्या आतमध्ये आहे ते एकेकाळी हिरेमाणकांनी जडवलेले लखलखते शिवलिंग. ज्याची पूजा एकेकाळी राष्ट्रकूट आणि तदनंतर यादवांच्या वैभवशाली सत्ताधीशांद्वारे. १७. कैलास शिवलिंग दर्शन a उपमंदिरे दर्शन घेऊन परत सभामंडपात आलो. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना अर्धमंडप आहेत. तिकडे जाण्यासाठी सभामंडपातूनच दरवाजे कोरलेले आहेत. ह्याच प्रवेशद्वारांतून बाहेर पडून आपण पाच लहान उपमंदिरांपाशी येतो. अर्धमंडपातील स्तंभ अतिशय देखणे असून त्यांजवरही कित्येक प्रसंग कोरलेले आहेत. १८. अर्धमंडपातील स्तंभ a अर्धमंडपातून बाहेर पडून आम्ही उपमंदिरांपाशी आलो. या एकाही उपमंदिरात सध्या मूर्ती नाहीत. पण ह्यांची शिखरे अतिशय सुरेख कोरलेली आहेत तसेच उपमंदिरांवर बाहेरील भागात तसेच त्याच्या भोवतीच्या मुख्य मंदिराच्या भिंतीवर काही अप्रतिम भित्तीशिल्पे आहेत. १९. असुरावर पाय देऊन उभा असलेली शिवमूर्ती a २०. एका हाती नाग तर दुसर्‍या हाती त्रिशुळावर नरमुंड धारण केलेला भैरव शिव a २१. ही बहुधा रूमा आणि सुग्रीवाची युगुलमूर्ती असावी. a २२. भिंतीवरील ही विद्याधर मूर्ती माझे अतिशय आवडीचे शिल्प a २३. उपमंदिराची रचना a मंदिराच्या ह्या भागात इतकी देखणी शिल्पकला आहे की येथेली सर्वच चित्रे येथे देणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे तरी वर दिलेल्या शिल्पाकृतींमधून इकडील सौंदर्याची पुरेशी कल्पना यावी. ही सर्व शिल्पे बघत बघतच आम्ही दुसर्या बाजूने सभामंडपात आलो व तेथून बाहेर पडून सोपान उतरून परत कैलास मंदिराच्या प्रांगणात आलो. पण कैलास लेणे बघणे येथेच संपत नाही. त्याचे आतापर्यंत लपलेले सौंदर्य बघण्यासाठी आपल्याला लेणीमंदिराच्या पूर्ण बाहेर जाऊन त्याच्या बाजूच्या डोंगरावर जावे लागते. डोंगरावर मंदिर बघूनच बाहेर आलो. उजव्या बाजूस असलेल्या पायर्‍या चढून डोंगरावर आलो. येथेच उजवीकडे एक लहानसे लेणे खोदलेले आहे. मला तरी ते वेरूळचे मुख्य लेणे खोदण्याआधी केलेले त्याचे एक प्रारूपच वाटले. २४. कैलासाचेच एक उपलेणे a डोंगरावरून वेरूळ लेणीचे अप्रतिम दर्शन होते. २५. नंदीमंडप व त्यावरील सभामंडपाला सांधणारा सेतू a येथून पुढे नजर जाताच आपल्याला सभामंडपाचे छत दिसते. खालच्या बाजूने कधी न दिसून येणारा हा भाग. मध्यभागी कमळपुष्पासारखी नक्षी असलेल्या भागावर चार अतिशय देखणे सिंह कोरलेले आहेत. जणू त्यांनी छतावर फेर धरलेला आहे. २६. सभामंडपाचे छत a २७. सिंह अधिक जवळून a सभामंडपाच्या छतावरून पुधे नजर फिरवताच येतो तो गर्भगृहाचा कळस. हा मात्र शिखरयुक्त असून यावर अतिशय देखणे नकसकाम केलेले आहे. २८. गाभार्‍यावरील कळस a २९. कैलास एकाश्ममंदिराची संपूर्ण रचना a हे सर्व वैभव बघता बघताच सूर्य मावळतीकडे झुकू लागला, अंधाराचा जोर वाढू लागला. पायर्‍या उतरून आम्ही भराभर खाली आलो. वेरूळ कैलास मंदिर बर्‍यापैकी पाहून झाले होते. संपूर्ण नव्हेच. नुसते कैलास मंदिर संपूर्णपणे व्यवस्थित बघायला किमान तीन दिवस हवेत. सध्यातरी आम्हास ते शक्य नव्हते. नाईलाजाने आम्ही पुढे निघालो. बौद्ध लेणींची झलक १ ते १५ क्रमांकाची लेणी बघायची राहिली होतीच. पण वाढत जाणार्‍या अधारामुळे ते काही शक्य झाले नाही. १५ व्या क्रमांकाचे लेणे तर कैलास मंदिराखालोखाल महत्वाचे. दशावतार लेणे. पण ते काही ह्यावेळी तरी नशिबात नव्हते. तसेच थोडे पुढे जाऊन लेणी क्र. १० च्या चैत्यगृहापाशी पोहोचलो. हे बौद्ध लेणे. अंधूक उजेडात कशीबशी यावर फक्त नजर मारता आली. भारावलेल्या तरीही अस्वथ मनानेच आम्ही लेणीसमूहातून बाहेर पडलो ते परत इथे यायचा निश्यय करूनच. ३०. लेणी क्र. १०. चैत्यगृह a ३१. अंधूक प्रकाशातून होणार्‍या सुरुवातीच्या काही बौद्ध लेणींचे दर्शन a
ऋणनिर्देशः गेले काही महिने औरंगाबाद सहलीवर ही मालिका मी लिहित होतो. ह्यात अजिंठा, वेरूळ यांच्यावर लिहिले गेले, किसनदेवांनी देवगिरीच्या दुर्गम दुर्गावर लिहिले तसेच परत पुण्यास जाताना वाटेत टोका गावात प्रवरासंगमातीरी असलेल्या शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिराचे दर्शनही झाले. एकंदरीत ही सहल अतिशय सुंदर झाली. किसनदेव, धन्या, दिनेश अगदी मनापासून सहभागी झाले होते. बिरूटे सरांचे मला खास आभार मानावेसे वाटतात. त्यांच्या सहभागाशिवाय ही सहल पूर्ण होऊच शकली नसती. वेरूळ दर्शन त्यांच्या मार्गदर्शनाने खूपच सुलभ झाले. आतापर्यंत फक्त जालीय ओळख असलेला हा माणूस प्रथम भेटीतच इतका जवळचा होऊ शकतो, आपला वाटू शकतो ही मिपाचीच किमया. सरांनी अतिशय जंगी पाहुणचार केला. भरपूर गप्पा टप्पा, उत्तमोत्तम जेवणे झाली. दुसर्‍या दिवशी झालेल्या अजिंठा लेणीदर्शनास सर नव्हते पण संध्याकाळी इतक्या उशिराही ते आमच्यासाठी थांबून होते, नव्हे तर त्यांनी आमची मुक्कामाची सोय सरकारी गेस्टहाऊसवर करून दिली. त्या रात्री बीबी का मकबरा पाहिला गेला. तिसर्‍या दिवशी सकाळी देवगिरी पाहून औरंगाबाद सोडले तर नगर फाट्यावर बिरूटे सर आम्हास निरोप देण्यासाठी वेळात वेळ काढून आले होते. त्यांसोबत अजून एक मिपाकर श्रुती कुलकर्णी ह्यासुद्ध्या आम्हाला भेटायला आल्या होत्या. थोडावेळ गप्पा मारून परतीच्या प्रवासास निघालो व रात्री पुण्यास पोहोचलो.
किमान एक दोन तरी ग्रूप फोटो हवेतच. ३२. जैन लेणीच्या ओसरीत बसलेले मिपाकर a ३३. वेरूळ लेणीच्या बाहेर शेवटी a अर्थात वेरूळ वरील लिखाण येथेच संपत नाही. पण तूर्तास तिथली उरलेली लेणी पाहिली नसल्याने नाईलाजाने येथे अर्धविराम घ्यावा लागत आहे. परत वेरूळला गेल्यावर तिथल्या उरल्या लेणी बघून मगच वेरूळ लिखाणाची खर्‍या अर्थाने इतिश्री होईल. तोवर समाप्त. धन्यवाद. _/\_

वाचन 34694 प्रतिक्रिया 0