युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ५
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ६
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-७
हल्ला......
आत्तापर्यंत आपण जपानची तयारी, त्यांचा सराव, जपानचे राष्ट्रीय व्यक्तिमत्व व त्यातून उद्भवणारा पेचप्रसंग व त्यांनी त्यावर शोधलेला जालीम उपाय बघितला. इकडे हवाईमधे व अमेरिकेत काय चालले आहे हे बघायचे राहिलेच.....
७ डिसेंबरचा हवाई बेटांवरचा सूर्योदय नेहमीप्रमाणेच निसर्गरम्य होता. ओहाअ बेट सोनेरी किरणांमधे न्हाऊन निघत होते व त्याच्या परिघावर असणारे वाळूचे किनारे चमकत होते. किनाऱ्याला असलेली दाट झाडी पाचूसमान भासत होती. नारळाची उंच झाडे व पामची झाडे पहाटेच्या मंद वाऱ्यात डौलदारपणे डोलत होती व लाटा किनाऱ्यावर फुटत फेसाळत होत्या. हवाई बेटांना पॅसिफिकमधील पाचूचे बेट उगाच म्हणत नसत !
पाचूची बेटे....
रविवारीच्या सुट्टीच्या रम्य स्वप्नात बहुतेक सर्वजण अंथरुणात पहुडले होते. कमांडर-इन्-चीफ ॲडमिरल किमेल मात्र पहाटेच उठला होता. नौदलाशिवाय दुसरे आयुष्य नसलेला हा आधिकारी त्याचा सगळा काळ त्याचे नौदल युद्धासाठी तयार ठेवण्यात व्यतीत करत असे. आज मात्र तो दुसऱ्या एका कारणासाठी पहाटे उठला होता. आज त्याला ले. जनरल वॉल्टर शॉर्टबरोबर गोल्फचा डाव मांडायचा होता. ले. जनरल शॉर्ट हा हवाईच्या लष्कराचा प्रमुख म्हणून तैनात होता. गेला आठवडाभर किमेल व त्याचे आधिकारी आरमार समुद्रात पाठवायचे का तेथेच ठेवायचे यावर चर्चा करत होते. त्या डोकेदूखीनंतर त्याला रविवारचा हा खेळ म्हणजे एक मोठा विरंगुळाच होता.
त्याच्या आरमाराचा बराच मोठा भाग अगोदरच युद्धसदृष वातावरणामुळे २७ नोव्हेंबरपासून समुद्रात होता. त्याच्या दुसऱ्यादिवशी विमानवाहू नौका एंटरप्राईज, तीन क्रूझर, ९ डिस्ट्रॉयर असे एक आरमार वेक बेटांना विमाने पोहोचवायला गेले होते. ५ डिसेंबरला विमानवाहू लेक्झिंग्टन, ३ क्रूझर व ५ डिस्ट्रॉयर अशाच कामगिरीवर मिडवेला रवाना झाले होते व अजून एक आरमार किनाऱ्यावर उतरण्याच्या सरावासाठी ७०० मैलांवर असलेल्या जॉन्स्टन बेटांकडे रवाना झाले होते.
पर्ल हार्बरवर तळ असलेल्या सर्व विमानवाहू नौका विविध कारणांसाठी बाहेर असल्यामुळे व याच आरमारातील एक विमानवाहू नौका ‘साराटोगा’ सॅनदिॲगोमधे दुरुस्त हो़ऊन तेथून निघाल्यामुळे पर्लहार्बरवर उरलेल्या ज्या नौका होत्या त्यांना हवाई संरक्षण नव्हते. त्यांना आता बंदर सोडता येत नव्हते. या कारणांमुळे उरलेल्या सर्व आरमाराच्या नौकांना पर्लहार्बरवरच नांगर टाकण्यास आदेश देण्यात आले. पर्लहार्बरवर असलेली लष्कराची विमाने या नौकांना संरक्षण देऊ शकतील असाही या मागे विचार होता.
आदल्यादिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी ॲडमिरल किमेलने नागरी पोषाखात त्याच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांबरोबर एक अनौपचारिक भोजन समारंभाला हजेरी लावली होती. हा समारंभ रात्री बऱ्याच उशीरापर्यंत चालला पण ॲडमिरल किमेल मात्र त्याने स्वत:हून घालून घेतलेल्या नियमानुसार रात्री ९.३० वाजताच अंथरुणावर पडला. किमेलच्या नशिबात मात्र सकाळचा तो गोल्फचा डाव नव्हता असेच म्हणावे लागेल. ७.३० वाजता तो निघायच्या तयारीत असताना त्याचा फोन खणखणला. दुसऱ्या टोकाला ड्युटी ऑफिसर कमांडर व्हिन्सेंट एका घटनेविषयी अहवाल देत होता. डिस्ट्रॉयर वार्डला एक विचित्र वस्तू पर्ल हार्बरजवळ आढळली होती आणि ती पाणबुडी समजून तिने त्याच्यावर तोफगोळे (डेप्थ चार्जेस) टाकले होते. यात किमेलला विशेष काही वाटले नाही कारण कुठलीही अनोखी वस्तू जर पर्लहार्बरच्या जवळपास आढळली तर त्यावर बॉंब टाकण्याचा त्याचाच आदेश होता. पण नियमानुसार असे काही घडल्यास त्याला त्याच्या कार्यालयात हजर होणे आवश्यक होते. त्याप्रमाण त्याने व्हिन्सेंटला तो ताबडतोब कार्यालयात येतोय असे सांगितले.
ॲडमिरल किमेलने त्याची गाडी मागवली. त्याच्या घरापासून त्याचे कार्यालय गाडीने पाच मिनिटांच्या अंतरावर होते. गाडीची वाट बघत असतानाच व्हिन्सेंटचा दुसरा दूरध्वनी आला. ‘वार्डला संरक्षित क्षेत्रात अजून एक मासेमारी नौका सापडली आहे आणि वार्ड त्या नौकेला कोस्टगार्डच्या ताब्यात देण्यासाठी गेली आहे’. हे संभाषण चालू असतानाच व्हिन्सेंट मर्फीच्या कार्यालयात एक नौसैनिक धावत घुसला. तो ओरडत होता ‘जपानी विमाने पर्ल हार्बरवर हल्ला करत आहेत’. मर्फीचा जरी त्यावर विश्वास बसला नाही तरी त्याने ही बातमी किमेलला त्याच संभाषणादरम्यान सांगितली. दुरध्वनी टेबलावर आदळून किमेल धावतच बाहेर आला. आकाशाकडे नजर टाकताच तो जागच्या जागीच थिजला. त्याच्या आयुष्यात ती दोन मिनिटे कधीही आली नसती तर बरे झाले असते असे त्याला क्षणभर वाटून गेले. त्याचा बंगला उंचावर असल्यामुळे त्याला खालचे दृष्य स्पष्ट दिसत होते. सिनेमात ज्या प्रमाणे घिरट्या घालणारी भुते दाखवितात त्याप्रमाणे पर्ल हार्बरवरचे आकाश जपानी विमानांनी व्यापले होते. त्याच्या समोर त्याची नौदलातील दैदप्यमान कारकिर्द नष्ट होत होती. त्याच्या डोळ्यासमोर महाकाय नौकांचा काळ नष्ट होत होता व त्याची जागा नौदलाची विमाने घेत असताना तो बघत होता. ऐतिहासीक क्षणच !
किमेलसमोर त्याची गाडी ब्रेक्सचा कर्णकर्कश आवाज करत थांबली आणि किमेल त्याचा टाय बांधत आत घुसला. गाडी सुसाटत निघाली आणि त्याचा पाणबुड्यांचा कमांडर त्या गाडीला लोंबकळला. कोणालाच आता थांबायला वेळ नव्हता. ते दोघे ८.०५ ते ८.१० च्या दरम्यान CINCPAC (कमांडर-इन्-चीफ-पॅसिफिक) कार्यालयात धडकले. ते पोहोचेपर्यंत शत्रूचा हल्ला ऐनभरात आला होता. जपानची टॉरपेडो डागणारी विमाने हात लावता येतील की काय अशा उंचीवरुन किमेलच्या प्रतिष्ठित आरमाराच्या चिंधड्या उडवीत धडाधड टॉरपेडो टाकत होती तर बाँबर विमाने गिधाडे असहाय्य सावजावर तुटून पडावीत तशी हिकॅम विमानतळावर तुटुन पडत होती. त्याच्याही वरुन काही विमाने खालच्या नरकात जे काही हलताना दिसत होते त्याच्यावर मशिनगनच्या फैरी झाडत होती. थोड्याच क्षणात तेथे वेगवेगळ्या आवाजांचा कोलाहल माजला. गोळ्यांचे सु..सु आवाज, फुटणाऱ्या बाँबचे आवाज, जाग्या झालेल्या अमेरिकन तोफांच्या गर्जना आणि या सर्वांच्या आगीत जळण्याचा एक विशिष्ट वास याने युद्धाचा तो रंगमंच व्यापून गेला. त्या रंगमंचाचा थोड्याच वेळात नरक झाला. पर्ल हार्बरवरील अमेरिकेचे सैनिक या अचानक हल्ल्याने थिजले. त्यांची विचारशक्ती काम करेनाशी झाली. ॲडमिरल किमेलचा चेहरा पांढराफटक पडला. त्याने कसेबसे स्वत:ला सावरले.
फोर्ड बेटांचा ऑपरेशन ऑफिसर कमांडर लोगन रामसेने जपानने पर्ल हार्बरवर हल्ला चढविला आहे ही बातमी प्रथम जगाला जाहीर केली.
ॲडमिरल लोगन रामसे
पाणबुडी दिसल्याचा अहवाल त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर तो घाईघाईने फोर्डच्या मुख्यालयात आला होता. ती पाणबूडी खरच आढळली असेल तर त्याला तिच्या शोधासाठी विमाने रवाना करायची होती. कार्यालयासमोर सकाळ्चा बिगूल नुकताच वाजवून झाला होता आणि एक सैनिक झेंडा फडकविण्याच्या तयारीत असतानाच एक विमान अगदी खालून भयानक आवाज करत त्या कार्यालयावरुन वेगाने उडत गेले. त्याच्या एखाद्या वैमानिकाचा हा खेळ असणार हे गृहीत धरुन तो त्याच्या आधिकाऱ्यावर ओरडला,
‘ले. डिक ! त्याचा क्रमांक मला ताबडतोब पाहिजे. त्याच्यावर सुरक्षितेच्या १६ कलमांचा भंग केल्याचा खटला मला भरावा लागणार असे दिसते !’
ते विमान अगदी खालून त्याच्या खिडकीवरुन गेल्यावर त्याने विचारले,
‘मिळाला का क्रमांक ?’
‘नाही ! पण मला वाटते ते स्क्वाड्रन कमांडरचे विमान असावे.’
त्याची बिचाऱ्याची काही चूक नव्हती. एवढ्या वेगाने जाणाऱ्या विमानावरचा त्याला फक्त लाल र्ंग दिसला होता आणि त्या काळात स्क्वाड्रन कमांडर हुद्द्याच्या वैमानिकांच्या विमानांना खाली लाल रंगाची खुण असे.
‘पण त्या विमानातून काहीतरी काळी वस्तू पडताना मला दिसली’ ले. डिक बॅलिंजर.
हे बोलणे होते आहे तोच जवळच्या हॅगरमधून स्फोटाचा मोठा आवाज झाला. अनुभवी रामसेचा चेहरा क्षणात बदलला.
‘ते जपानी विमान होते आणि तो आवाज उशीरा फुटणाऱ्या बॉंबचा होता’. हे सांगताच त्याने त्याच्या कार्यालयातून बाहेर धाव घेतली व रेडिओवर असणाऱ्या सैनिकाला संदेश प्रसारित करायची आज्ञा दिली.
‘सर सांकेतिक भाषेत ?’
‘इंग्लिश – पर्ल हार्बरवर जपानचा हवाईहल्ला. हा सराव नाही.’ तो ओरडला. त्याच क्षणी या संदेशाचा तरंग जगभर पसरला आणि अर्थातच अमेरिकेत पोहोचला. किमेलच्या मुख्यालयातूनही हाच संदेश प्रसारित करण्यात आला पण फोर्डवरची संदेश यंत्रणा प्रथम कार्यान्वित झाल्यामुळे ही बातमी कमांडर रामसेने प्रथम जगाला सांगितली असे मानले जाते.
या संदेशामुळे अमेरिका खडबडून जागी झाली.
रेअर ॲडमिरल बेलिंगरचा नॅव्हल एअर स्टाफ ले. कमांडर चार्लस् को हल्ला झाला तेव्हा त्याच्या अंथरुणात होता. आत्ताच उठावे का न्याहारीच्या वेळी उठावे याबद्दल त्याच्या मनात द्वंद्व चालू होते. रविवारी तो त्याच्या कुटुंबियांबरोबरची न्याहारी सहजा चुकवत नसे. विमानांचा आवाज व बॉंब फुटल्याचा आवाज ऐकल्यावर तो ताडकन त्याच्या बिछान्यातून उठला व त्याच्या पत्नीला म्हणाला, ‘उठ युद्ध सुरु झाले आहे. घाईघाईने त्याच्या मुलांना कपडे चढवायला मदत करुन तो व त्याची पत्नी बेलिंगरच्या घराकडे धावली कारण तेथे हवाईहल्ल्यापासून संरक्षण करणारे आसरे बांधण्यात आले होते. अर्थात लहानग्या पाच वर्षाच्या त्याच्या मुलाला, 'चक' ला, त्या कोंदट खोलीत लपायची मुळीच इच्छा नव्हती. त्याने बापाचे बोट सोडून एवढ्या खालून उडणारी विमाने पहाण्यासाठी पळ काढला व त्याच्या बापाला त्याच्या मागे अक्षरश: त्याला पकडायला धावावे लागले. त्याला पकडून त्या आसऱ्यात टाकून त्याने त्याच्या बायकोचा निरोप घेतला व कपडे बदलायला त्याने घराची वाट धरली. घराजवळ येताच तो वाऱ्याच्या जोरदार झोताने ढकलला गेला. हा ॲरिझोनावरील स्फोटांमुळे तयार झालेला झोत होता त्याच वेळी कानठळ्या बसविणारा आवाजही झाला ज्याने त्याच्या कानात दडे बसले. आकाशातून तुटलेल्या लोखंडी वस्तूंचा पाऊस पडत होता. त्यातील एक तुकडा त्याच्या गॅरेजच्या छपरातून त्याच्या गाडीवर पडला. को नशिबवान म्हणून वाचला व थोड्याच वेळात तो पायजम्यावर त्याची विजार चढवून त्याच्या कार्यालयात हजर झाला. त्याच्या पायात मात्र अजूनही घरातील सपाता दिसत होत्या.
कॅप्टन शुमाकर हल्ला झाल्यावर रस्त्यातील खड्डे चुकवत मुख्यालयाकडे चालला होता. रस्त्यात त्याला विमाने उभी करायची जागा दिसली. ती बघितल्यावर तो हताश झाला. कालच रात्री २ वाजता त्याने या जागी विमानांना घातपाती कृत्यापासून वाचविण्याचा सराव घेतला होता. तो इतका व्यवस्थित पार पाडला होता की सर्वांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली होती. तेथे आता हँगर कापराप्रमाणे जळत होते आणि सगळ्यात भयानक म्हणजे कालच्या सरावादरम्यान त्याने सगळी विमाने एकामेकांना चिटकवून ठेवली होती (घातपातापासून संरक्षण करण्यास सोपे जावे म्हणून) तीही आता जळत होती. त्याने त्याच्या सैनिकांना चांगली विमाने ताबडतोब बाजूला करायला सांगितली. तो आता एवढेच करु शकत होता कारण आग विझवायला पाणी नव्हते. ‘ॲरिझोना’ पाण्याच्या पाईपवरच बुडाल्यामुळे येणाऱ्या पाण्याला दाबच नव्हता.
ॲडमिरल किमेलचा बुद्धिमान चीफ-ऑफ-स्टाफ कॅप्टन विल्यम स्मिथ त्या कार्यालयात पोहोचल्यावर त्याला किमेल व व्हाईस ॲडमिरल पाय हे दोघे तो हल्ला हताशपणे बघत असलेले आढळले. पायचा पोषाख कॅलिफोर्नियामधून उडालेल्या तेलाच्या फवाऱ्याने माखलेला होता. त्या दोघांना तेथे एकत्र बघून स्मिथने नम्रपणे त्या दोघांना एकत्र राहू नये असे बजावले कारण कदाचित तेथेच स्फोट झाला असता तर ते दोघेही ठार झाले असते आणि त्या वेळी ते परवडणारे नव्हते. ते ऐकल्यावर ॲडमिरल पायने आपले बस्तान त्या इमारतीच्या दुसऱ्या टोकास हलविले.
संदेशदळणवळण यंत्रणेचा आधिकारी कमांडर कर्टीस तेथे बाराव्या मिनिटाला अवतरला व ते तिघे मिळून तो विध्वंस पाहू लागले. त्यांच्या इमारतीवरुन विमाने सटासट जात होती व एक गिरकी घेऊन समुद्रात टॉरपेडो टाकायला जात होती. टॉरपेडो फुटल्यावर एक मोठा आवाज होत होता व पाणी आकाशाला स्पर्श करण्यासाठी उसळत होते. ते जेथे उभे होते तेथून त्यांना काय चालले होते हे कळत नव्हते पण हळुहळु अहवाल येऊ लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट हो़ऊ लागले.
किमेल व त्याच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना सगळ्यात जास्त धक्का कशाचा बसला असेल तर त्या हल्ल्याच्या परिणामकारकतेचा. त्यांना असे वाटत होते की हे हल्ले एक किंवा जास्तीत जास्त दोन विमानवाहू नौकांवरुन होत होते. क्षितिजाच्या पलिकडे जपानचे अजस्र नौदल उभे आहे हे समजण्याचा त्यांना काहीच मार्ग नव्हता. सगळ्यांना असेच वाटत होते. नंतर लगेचच झालेल्या चौकशी दरम्यान बऱ्याच आधिकाऱ्यांनी हा हल्ला एका किंवा दोन नौकेवरुन होत असावा असे अनुमान काढले पण या हल्ल्यासाठी आपण पाहिलेच आहे की तब्बल सहा विमानवाहू नौका वापरण्यात आल्या होत्या. जशा जशा त्या भयंकर बातम्या येऊ लागल्या तसा किमेलला ही धरती आपल्याला पोटात घेईल तर बरे हो़ईल असे वाटू लागले. प्रथम बातमी आली ॲरिझोना उडाल्याची, मग आली उलट्या झालेल्या ओक्लहोमाची. नंतर ॲरिझोना बुडण्यास सुरवात झाली आहे अशी बातमी आली. या सर्व नौका म्हणजे अमेरिकेचा मान-सन्मान, अभिमान, इ. होत्या व त्या एकामागून एक रसातळास जात असताना बघून ॲडमिरल किमेलची अवस्था काय झाली असेल त्याची आपण कल्पना करु शकतो.
फक्त १० महिन्यापूर्वीच ॲडमिरल किमेलने या आरमाराचे आधिपत्य स्वीकारले होते व फक्त २४ तास अगोदर त्याने त्याच्या आरमारातील विमानवाहू नौका पर्ल हार्बरवरुन हलविल्या होत्या. आता त्याच्या समोर हवाई संरक्षणाअभावी त्याच्या बोटींना जपानी विमाने मनात येईल तसे धोपटत होती. पर्ल हार्बरचे आकाश त्या जळणाऱ्या नौकांच्या धुराने काळवंडले होते. ते बघून किमेलच्या डोळ्यात पाणीच यायचे बाकी होते. स्मिथने आठवणीत सांगितले आहे की त्यावेळी त्यांनी यापेक्षाही वाईटाची तयारी ठेवली होती. हवाईच्या वायुदलाची ताकद नष्ट झाली होती व उभ्या असलेल्या नौकांच्या संरक्षणासाठी त्याच्याकडे कसलेही साधन नव्हते. नुसत्या बोटीच नष्ट होत नव्हत्या तर त्या दुरुस्त करण्याच्या सोयीही नष्ट होत होत्या.
या हल्ल्याचा सूड घ्यायची त्याने मनातल्या मनात भीष्मप्रतिज्ञा केली खरी पण आत कुठेतरी त्याला हे माहीत होते की त्याची नौदलातील कारकीर्द या हल्ल्याने संपुष्टात येणार आहे. कुठल्याही सेनेचे आधिपत्य करायचे म्हणजे हा धोका पत्करावाच लागतो. कोणा एका सेनाधिकाऱ्याने म्हटलेच आहे ‘या युद्धातील विजय कोणी मिळवला, हे मी सांगू शकत नाही पण आम्ही जर हे युद्ध हरलो तर मलाच त्यासाठी जबाबदार धरले जाईल हे निश्चित !’.
त्याची जहाजे उध्वस्त होताना पहाणे जेवढे वेदनादायक होते त्यापेक्षाही जास्त वेदना त्याला त्याचे शूर सैनिक मरताना बघून होत होत्या. साहजिकच आहे. पहिले महायुद्ध व स्पेन बरोबर झालेल्या युद्धात मिळून जेवढे नौसैनिक मेले त्यापेक्षाही जास्त या एकाच हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. त्याच्यासाठी हे सैनिक म्हणजे नुसता हजेरीपट नव्हता. त्यातील कित्येकजणांबरोबर त्याने अनेक वर्षे व्यतीत केली होती. कित्येक जणांना तो व्यक्तिश: ओळखत होता तर बहुतेकांची नावेही त्याला माहीत होती आणि अर्थातच या सगळ्या माणसांची जबाबदारी त्याचीच होती.
कर्टीस व किमेल त्या खिडकीतून हा नरक बघत असतानाच एक बॉंबचा तुकडा काच फोडून आत आला व किमेलच्या छातीवर आदळला. त्याने त्याला काही दुखापत झाली नाही मात्र त्याच्या पांढऱ्याशूभ्र गणवेषावर छातीवर एक मोठा काळा डाग पडला. किमेल हा अत्यंत बुद्धिमान, व्यवहारी व वर्तमानावर विश्वास ठेवणारा माणूस होता. नाटकीपणाचा त्याला राग येत असे. पण ते सगळे बघून तो इतका हताश व उद्विग्न झाला होता की त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, ‘ हा तुकडा माझ्या छातीत घुसून मी मेलो असतो तर बरे झाले असते.’
जपानच्या हल्ल्याच्या या पहिल्या फेरीचे नेतृत्व केले होते ३० वर्षीय फुचिडाने. या माणसाला देव मानणारे वैमानिक त्याच्या तुकडीत होते हे आपण बघितलेच. त्याच्या या स्वभावाचा उपयोग पुढे त्याने प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार करण्यासाठी पुरेपुर केला पण आज सकाळी मात्र जास्तीत जास्त माणसे कशी मारता येतील याचाच तो विचार करत असावा. आजच्या काळाच्या तुलनेत त्या काळातील जपानची बॉबर विमाने फारच निष्कृष्ट होती असे म्हणायला हरकत नाही. एकतर त्यांचा वेग अत्यंत कमी होता. त्यांचे चिलखत चांगले नव्हते. त्यांच्या इंधनाच्या टाक्यांना सहज भोके पडत. (आजच्या विमानांच्या टाक्या सेल्फ हिलींग असतात). पण त्यांच्याकडे एक अमोघ अस्त्र होते ते म्हणजे ती विमाने चालविणारे अत्यंत शूर व कुशल वैमानिक. ते त्या काळातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण घेतलेले वैमानिक होते. त्यांच्या लढाऊ विमानांनाही असेच वैमानिक लाभले होते. जपानची ‘झिरो’ विमाने चांगली होती पण त्यांना चिलखत जवळजवळ नव्हतेच असे म्हटले तरी चालेल. पण त्याची खरी ताकद होती ते वैमानिक व पंखात असलेल्या २० मि. मी. तोफा व दोन मशिनगन. त्याची एकदम वर चढायची क्षमता व चपळपणा बघून अमेरिकेच्या भल्या भल्या वैमानिकांनी तोंडात बोटे घातली.
या सगळ्यात विमानात भयंकर होती ती त्यांची टॉरपेडो डागणारी विमाने. या विमानांच्या तुकड्यांचा प्रमुख होता ले. कमांडर शिगेचारु मुराटा. याचे वय त्यावेळी ३२ होते व त्याला चीनच्या युद्धाचा चांगलाच अनुभव होता. विमान उडाविण्याची त्याच्याकडे नैसर्गिक क्षमता किंवा कला होती असे म्हटले तरी चालेल. लवकरच जपानचा तो एस् (एस् ऑफ एसेस्) पायलट झाला. वैमानिकाला अनुकुल अशी अंगकाठी लाभलेला हा माणूस तीक्ष्ण विनोदबुद्धीचा होता. त्याच्या विनोदाने त्याचे वैमानिक नेहमीच हसतमुख रहात असत. अत्यंत लोकप्रिय असा हा वैमानिक सांन्ता क्रूझच्या युद्धात २६ ऑक्टोबर १९४२ रोजी ठार झाला. पण त्या दिवशी पर्ल हार्बरवर त्याला मुक्त संचार होता व त्याला आज तरी मृत्युवरही मात करायची खात्री होती. या सगळ्या विमान दलांनी एवढा कसून सराव केला होता की त्यांना त्यात एकही चूक अपेक्षित नव्हती. तरीही प्रत्यक्षात एक गालबोट लागलेच.
प्रथम उडालेल्या टेहळणी विमानांचा अहवाल आणि होनोलोलू आकाशवाणीचे अजूनही चाललेले संगीताचे कार्यक्रम एकून पर्ल हार्बर अजूनही शांत झोपले आहे अशी खूणगाठ मनाशी बांधून फुचिडाने एक फ्लेअर आकाशात उडवला. या खुणेचा अर्थ होता की ‘आश्चर्याचा धक्का देण्यात यश’. असा संदेश मिळाल्यावर टॉरपेडो विमानांनी प्रथम शत्रूच्या जहाजांवर हल्ला चढवायचा होता. कारण त्यांना त्यावेळी धुराचा त्रास झाला नसता. प्रतिकाराचा तर प्रश्नच नव्हता. पण लढाऊ विमानांच्या एका स्क्वाड्रन प्रमुखाला हा संदेश ढगामुळे दिसला नाही व त्याने हा संदेश समजल्याची प्रतिखूण न केल्यामुळे फुचिडाने परत एक फ्लेअर उडवला.
दोन फ्लेअर उडाल्यास त्याचा अर्थ दुर्दैवाने वेगळा होता.............
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
28 May 2013 - 9:24 pm | मोदक
वाचतोय...
पुढचे भाग लौकर येवूद्यात!!!
28 May 2013 - 9:30 pm | भटक्य आणि उनाड
फार उत्सुकता ताणू नका हो... अधीर्तेने वाचत आहे.. रोमान्चक...
28 May 2013 - 10:39 pm | लॉरी टांगटूंगकर
यैच बोलता!!
28 May 2013 - 10:28 pm | मुक्त विहारि
आवडला...
28 May 2013 - 11:10 pm | जुइ
थरारक आहे हे सर्व..
29 May 2013 - 5:58 am | श्रीरंग_जोशी
सदर लेखमालिका म्हणजे एक पर्वणीच आहे.
असेच बांग्लादेश मुक्तिसंग्रामाबाबत वाचायला आवडेल.
29 May 2013 - 1:16 pm | गुलाम
+१...
बांग्लादेश मुक्तिसंग्रामाबद्दल तुमच्या सिद्धहस्त लेखणीतुन आलेलं काहीतरी वाचायला प्रचंड आवडेल.
29 May 2013 - 8:11 am | जेपी
नेहमी प्रमाणे खिळवून ठेवणारे .
29 May 2013 - 9:36 am | प्रचेतस
जबरदस्त लेखमाला.
29 May 2013 - 10:11 am | अमोल खरे
असेच म्हणतो. नेहेमी प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळत नाही, पण माझ्यासारखे असंख्य वाचक ही लेखमाला न चुकता वाचत आहेत. पुढील भाग लवकर टाका.
29 May 2013 - 3:45 pm | अजो
मस्त भाग. पुभाप्र.
29 May 2013 - 5:52 pm | आतिवास
वाचते आहे.
लेख मालेच्या शेवटी संदर्भ पुस्तकांची/लेखांची सूची दिल्यास त्याचा मला उपयोग होईल.
29 May 2013 - 11:44 pm | सोहम७
मस्त जयन्त सर ८ भाग लवकरच् येउ दे सहन नाहि होत :)
30 May 2013 - 10:20 am | सुहास झेले
नेहमीप्रमाणे अप्रतिम भाग... आता पुढचा भाग लवकर येऊ द्यात :) :)