मित्रहो,
आजपासून युद्धकथेच्या मालिकेत सातवे पुष्प गुंफत आहे...............हा लेख बराच मोठा असणार आहे कारण पर्ल हार्बरची पूर्ण कहाणी सांगायचा विचार आहे....आपल्या शंकांना मी उत्तरे सगळ्यात शेवटी देईन-अर्थात मला माहीत असली तर......आजचा भाग छोटा आहे कारण बाण सुटला आहे............त्या बाणाच्या प्रवासाची ही कहाणी मला तरी रोमांचकारक वाटली......आपल्यालाही ती तशी वाटेल अशी आशा आहे..........वर टाकलेले व्यंगचित्र प्रत्येक भागावर असणार आहे.....माझ्या हातून चूका होणे सहज शक्य आहे. त्या पकडल्यावर कृपया विकट हास्य करु नये..........ही विनंती. :-)
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर
त्या अथांग सागरात जहाजांच्या ताफ्यापुढे १०० मैलावर तीन पाणबुड्या मोठ्या वेगाने पाणी कापत चालल्या होत्या. अर्थात शत्रूच्या जहाजांपासून या ताफ्याचे संरक्षण हे त्यांची जबाबदारी होती. त्या तीन पाणबुड्यांच्या मागे डिस्ट्रॉयर, क्रुझर, युद्धनौका व विमानवाहू नौकाही मोठ्या डौलाने पाणी कापत चालल्या होत्या. १०० मैल लांब पसरलेला हा जहाजांचा ताफा त्या अथांग पॅसिफिक महासागरात एखाद्या खेळण्यातील बोटींसारखा दिसत होता. त्या विशाल महासागरात या बोटींनी जवळजवळ ३५०० मैल प्रवास केला होता आणि विशेष म्हणजे तो आत्तापर्यंत कोणाच्याही दृष्टीस पडला नव्हता.
त्या विमानवाहू जहाजांच्या डेकवर अनेक विमाने आकाशाकडे नाक करुन रांगेत उभी होती. जणू काही केव्हा उडतोय याची ती वाट पहात असावीत. त्या विमानांचा कर्मचाऱ्यांची लगबग उडाली होती व त्यांच्या सराईत हालचालींमधेही एक प्रकारचा अधीरपणा जाणवत होता. इंधनाची पातळी, रेडिओ, उतरायची यंत्रणा, मशिनगन, बॉंब्ज, टॉरपेडो, दारुगोळा इत्यादि गोष्टी वारंवार तपासल्या जात होत्या. काहीजणांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती तर काहीजणांच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत होता. एका तंत्रज्ञाची नजर एका बॉंबवर पडली आणि त्यावर लिहिलेले वाक्य वाचून त्याच्या ओठांवर स्मितहास्य पसरले. ‘हा अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणार आहे’.
हा जहाजांचा ताफा जपानच्या शाही नौदलाचे पहिले एअर फ्लीटचे आरमार होते आणि ते निघाले होते अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करायला. हा हल्ला त्यांना बेसावध अमेरिकेला खिंडीत गाठून करायचा होता. हा विश्वासघातकीपण होता की नाही हा वादाचा मुद्दा हो़ऊ शकतो व तसा तो झालाही. वाद काहीही असो पण जपानने हे मोठे धाडसी पाऊल उचलले होते हे निर्विवाद. अर्थात त्यामागे अमेरिका त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आहे याचे वैफल्य व भविष्यात पॅसिफिकमधे सत्ता स्थापन करायची असेल तर अमेरिकेच्या सागरी ताकदीचा पुरता नायनाट करण्याशिवाय गत्यंतर नाही ही भूमिका होती. या असल्या डावासाठी या चिमुकल्या देशाने त्यांचा आख्खा देश व येणार्या पिढ्यांचे भवितव्य पणाला लावला होते.
७ डिसेंबर १९४१च्या पहाटे जपानच्या त्या विमानवाहूनौकांवर वातावरण फार गंभीर होते. अनुभवी वैमानिक, ज्यांच्या गाठीशी हजारो तासांचा उडण्याचा अनुभव होता त्यांना पुढ्यात काय वाढून ठेवलेले आहे त्याची कल्पना होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती पण एक प्रकारचे दडपण दिसत होते. तुलनेने तरुण वैमानिक, ज्यांनी नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले होते, त्यांच्या चेहऱ्यावर संमीश्र भावना दाटून आल्या होत्या. त्यात भीती, उत्सुकता व आवेश यांचे फार मजेशीर मिश्रण दिसत होते. इकडे वातावरण गंभीर व शांत होते तर उथळ पाण्याला खळखळाट फार या उक्तिला अनुसुरुन तरुण वैमानिकांमधे फार आवाज येत होते. शोकागू व झुइकाकू युद्धनौकांवरच्या ज्या वैमानिकांनी अजून युद्धाचा अनुभव घेतला नव्हता त्यांची बेचैनी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मोहिमेवर निघण्याच्या अगोदरचे जेवण, भात व हिरवा चहा त्यांच्या घशाखाली उतरत नव्हता व त्यांच्या पोटात ढवळतही होते. साहजिकच आहे. ही तरुण मुले आत्ताच कोठे त्यांची प्रशिक्षण संपवून रुजू झाली होती व ते मृत्युच्या उंबरठ्यावर उभे होते. हल्ल्याआधीच्या शेवटच्या बैठकीनंतर प्रत्येक वैमानिक शिंटो मंदीराच्या प्रतिकृतीसमोर क्षणभर नतमस्तक हो़ऊन प्रार्थना करत होता. काही जण जहाजावरच्या आपल्या मित्रमंडळींचा निरोप घेत होते. ओढूनताणून हास्य विनोदही चालू होते. असे मोठे विचित्र वातावरण होते. अर्थात कुठल्याही मोहीमेच्याआधी असेच वातावरण असते व हे सैनिकही त्याला अपवाद नव्हतेच.
ही अस्वस्थता त्या वैमानिकांपुरती नव्हती तर त्या ताफ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधी ही पसरली होती. या मोहीमेचा प्रमुख व्हाईस ॲडमिरल चुईची नागुमोने तर या प्रवासात अनेक रात्री त्याच्या कार्यालयात येरझारा घालत व्यतीत केल्या होत्या कारण त्याची खात्री होती की ही मोहीम सुरु होण्याआधीच त्याचा निकाल ठरलेला होता – पराजय.....
या मोहीमेतीला जपानी वायुदलाच्या कारवाईचा प्रमुख होता कमांडर मिनोरु गेंडा. त्याच्यावर टाकलेल्या जबाबदारीच्या प्रभावाखाली त्याची विचार करायची क्षमता दबली गेली होती. शक्यतो मतप्रदर्शन न करणारा गेंडा या मोहीमेत यश मिळाले तर ते प्रचंड असेल किंवा पराजय झाला तर तो सर्वनाशी असेल असे मत मांडू लागला होता. त्याच्या निर्णयांवर १ कोटी जपानी जनतेचे भवितव्य अवलंबून आहे याची त्याला स्पष्ट जाणीव होते व त्याचाही दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या शेवटच्या तासात काय चुकू शकते याची तो मनोमन उजळणी करत होता. निराशा त्याला घेरणार तेवढ्यात त्याच्या मनातील एका कप्प्यातील आशेने उचल खाल्ली व तो मनाशी म्हणाला ‘कशाला काळजी करतोस ? तुझ्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट वैमानिक आहेत. ते तुझ्यासाठी प्राण पणाला लावण्यास तयार आहेत. इतक्या दिवसाची तयारी, आयोजन कसे वाया जाईल ? हे विचार झटकून टाक व पुढचे बघ’. गेंडाने नंतर सांगितले ‘त्या विचाराबरोबर मी माझ्या मनावर आलेले मळभ झुगारुन दिले. माझ्या मनातील भीती कुठल्याकुठे पळाली.’’
गेंडाच्या मनात हे आशानिराशेचे खेळ चालू असतानाचा जहाजाचा खर्जातील स्वर तोडत, तीव्र कर्कश्य आवाज करत एका विमानाने आकाशात झेप घेतली. हे विमान प्राथमिक टेहळणी करायला आकाशात उडाले होते.
बाण सुटला होता व कोणालाही तो आता माघारी घेणे शक्य नव्हते...............
क्रमशःच क्रमशः
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
29 Apr 2013 - 4:42 pm | मन१
सुरुवात लहान वाटली. पण पुढील अंक येणार आहेत म्हणून तो मुद्दा सोडूनही देता येइल.
29 Apr 2013 - 4:43 pm | विसोबा खेचर
मेजवानी..!
29 Apr 2013 - 5:01 pm | स्पा
खतरनाक सुरुवात
29 Apr 2013 - 5:21 pm | इरसाल
उत्सुकता वाढीस लागलीय.
29 Apr 2013 - 5:33 pm | गुलाम
तोंडाला पाणी सुटले आहे.
29 Apr 2013 - 7:40 pm | लॉरी टांगटूंगकर
तोंडाला पाणी सुटले आहे. अल खतरनाक सुरुवात.
29 Apr 2013 - 5:36 pm | श्रीरंग_जोशी
पुढील भागांची उत्कंठा आहे.
इतिहासातील या प्रकरणावर अनेक चित्रपट निघाले आहेत त्यातील वास्तविकता किती आणि रंजन किती ते कळायचा मार्ग सोपा होईल अशी आशा आहे.
29 Apr 2013 - 6:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
भयानक उत्सुकतेने पुभाप्र ! लवकर टाका !!
29 Apr 2013 - 6:27 pm | कपिलमुनी
मागच्या तुमच्या सर्व लेखना वरून ही लेखमाला रोचक असेल याची खात्री आणि उत्सुकता आहे ..
दुसर्या महायुद्धामधला जपानचा सहभाग , त्यांची महत्वाकांक्षा, ध्येय , हल्ले ,रणनिती त्यांनी जिंकलेला प्रदेश आणि युद्धोत्तर परीणाम हा दुर्लक्षलेला विषय !!
इतिहासाच्या पुस्तका मध्ये सुद्धा हिटलर आणि मुसोलिनीनेच भाव खाल्ला..
दुसर्या महायुद्धामधला जपान म्हणले कि आमच्यासारख्या इतिहासाचे फारसे ज्ञान नसलेल्यांना पर्ल हार्बर आणि हिरोशिमा नागासाकीचे अणुस्फोट आठवतात.. तुमच्या पूर्वीच्या लेखांमधून कामिकाझे आणि जनरल होम्मा बद्दल वाचले आहेच ..
तुम्ही एवढे माहितीपूर्ण लेख लिहिता त्याबद्दल आभार आणि पुलेशु
तुमच्या लेख
29 Apr 2013 - 8:44 pm | आदूबाळ
+१
पुढ्च्या भागची वाट पहातो आहे...
29 Apr 2013 - 10:16 pm | मुक्त विहारि
पुढ्च्या भागची वाट पहातो आहे...
29 Apr 2013 - 11:25 pm | जुइ
पुढ्च्या भागची वाट पाह्ते आहे
30 Apr 2013 - 1:59 am | अर्धवटराव
आणि आता हि पॅसीफीकच्या लढाईची मेजवानी... व्वाह.
अर्धवटराव
30 Apr 2013 - 8:20 am | प्रचेतस
जबरदस्त.
'पर्ल हार्बर' लेखमालेची केव्हापासून वाट पाहात होतो.
१ ल्या व २ र्या महायुद्धावर आधारीत पुस्तके कधीच वाचली नाहीत. शाळेतील पुस्तकांद्वारे ही माहिती मिळाली तितकेच. पण तुमच्या ह्या युद्धकथांद्वारे सविस्तर माहिती मिळत आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
30 Apr 2013 - 10:00 am | मस्त कलंदर
नेहमीप्रमाणेच छान.
फक्त
यांसारखी भाषांतर वाटावी अशी काही वाक्ये टाळता आली तर पाहा ना.
30 Apr 2013 - 1:56 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद ! बदलले आहे. खरे म्हणजे हे वाक्य टाकायची काही गरज नव्हती.....
30 Apr 2013 - 12:22 pm | बटी
सहिच
30 Apr 2013 - 1:05 pm | सुहास झेले
व्वा व्वा.... वाचतोय वाचतोय.. :)
पुढचा भाग लवकर येऊ द्यात...
30 Apr 2013 - 1:23 pm | नन्दादीप
पराकोटीच्या उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट पहातोय....
30 Apr 2013 - 1:25 pm | तिमा
जयंतराव,
आपली ही नवीन मालिका रोमहर्षक ठरेल यात शंका नाही. पुढच्याच काय, सर्वच भागांची पहाणारा
- तिरशिंगराव माणूसघाणे
30 Apr 2013 - 1:26 pm | तिमा
तेवढा तो वाट शब्द घालून घ्या.
7 May 2013 - 1:10 pm | शिलेदार
तुम्ही एवढे माहितीपूर्ण लेख लिहिता त्याबद्दल आभार.