युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ५
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-६
सोर्यू
अमेरिकेच्या मिडवे तळाजवळून जातात सर्व जहाजांवर वातावरण फारच तणावग्रस्त झाले कारण येथे त्यांचा ताफा जर एखाद्या अमेरिकेच्या बोटीच्या नजरेस पडला असता तर सगळा खेळ तेथेच संपला असता. हा ताफा आत्तापर्यंत कोणाच्याही दृष्टीस पडला नव्हता हा एक दैवी चमत्कारच म्हटला पाहिजे. हा विभाग पार केल्यावर मात्र सर्व लढाईच्या तयारीस लागले. हे सगळे चालू असताना वाटाघाटींचे नाटक वॉशिंग्टनमधे चालूच ठेवण्यात आले होते. ६ डिसेंबरला सर्व जहाजात काठोकाठ इंधन भरण्यात आले व रिकाम्या झालेल्या इंधनाच्या बोटी परतीच्या वाटेवर पाठविण्यात आल्या. दुपारनंतर सर्व आधिकाऱ्यांना जहाजांच्या डेकवर पाचारण करण्यात आले व त्यांना सम्राटाची आज्ञा वाचून दाखविण्यात आली. त्या पाठोपाठ यामामोटोचा आदेशही वाचून दाखविण्यात आला –‘ जपानचे भवितव्य आता आपल्या हातात आहे. स्वत:चे कर्तव्य पार पाडताना प्रत्येकाने आपले सर्वस्व पणाला लावावे.’ या नंतर सर्व ताफ्याने १८० कोनात वळण घेतले व पूर्ण वेगाने तो त्यांच्या इप्सित स्थळी निघाला. या जागी त्या महाकाय बोटी थांबणार होत्या व विमाने उड्डाण करणार होती. हे आरमार त्याच्या लक्ष्यापासून फक्त ५०० मैलांवर पोहोचले होते. लक्ष्याच्या एवढ्या जवळ येऊन जर हा ताफा उघडकीस आला असता तर.... या कल्पनेनेच वातावरण अत्यंत गंभीर व तणावपूर्ण झाले होते पण परत एकदा नशिबाने हात दिला व त्यांना शत्रूच्या कुठल्याही प्रकारच्या बोटीने वा विमानाने हेरले नाही. थोड्याच वेळात अंधार पडला आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्र्वास सोडला. मध्यरात्रीनंतर टोकियोहून एक प्रसारित करण्यात आलेला संदेश गेंडाच्या हातात पडला ज्याची तो आतुरतेने वाट पहात होता - पर्ल हार्बरवर बराज बलून्स सोडलेले नव्हते. हे महाकाय आकाराचे फूगे शत्रूच्या विमानांना अडथळे म्हणून हवेत सोडले जायचे. आकाशातील वेग नियंत्रकच म्हणाना !
बराज बलुन्स
त्यात अजून एक महत्वाची बातमी होती ती म्हणजे बंदरात टॉरपेडोला अटकाव करणाऱ्या लोखंडी जाळ्याही सोडण्यात आल्या नव्हत्या. ही बातमी फारच चांगली होती कारण या दोन्ही बाबी जपानी वैमानिकांच्या दृष्टीने फारच महत्वाच्या होत्या. अजून एका संदेशात पर्ल हार्बरमधे अमेरिकेची एकही विमानवाहू नौका नव्हती असेही सांगण्यात आले होते. या खेरीज पर्ल हार्बरचे हवामान सर्वसामान्य होते हीही माहिती पुरविण्यात आली. अर्थात त्याची गेंडाला गरज नव्हती कारण अमेरिकेचे हवामान खाते ती माहिती दर तासाला प्रक्षेपित करत होते.
इकडे जपानमधे सर्व लष्करी व नौदलाच्या आधिकारीवर्गाचे डोळे आता पर्ल हार्बरवर खिळले होते. यामामोटोच्या चीफ्-ऑफ-स्टाफने, ॲडमिरल उगाकीने त्याच्या रोजनिशीमधे लिहिले ‘हवाई, तुझी पिंजऱ्यात पकडलेल्या उंदरासारखी अवस्था होणार आहे. तुझी शेवट्ची घटका भरली आहे. अजून फक्त एक दिवस !’
डिसेंबरची ७ तारीख उजाडली आणि ॲडमिरल नागूमोने गेंडाला बोलावून सांगितले, ‘मी हे आरमार जपानपासून येथपर्यंत आणले आहे. आता या क्षणापासून हे ओझे मी तुझ्या खांद्यावर देतोय !’ या वाक्यानंतर या मोहिमेची जबाबदारी नौदलाकडून वायुदलाकडे गेली.
पहाटे ५.३० वाजता दोन लांबपल्ल्याची विमाने चिकुमा व टोने या नौकांवरुन सोडण्यात आली. या विमानांनी आकाशात टेहळणी करायची होती व बंदरात विमानवाहू नौका आहेत का हे बघायचे होते. शत्रूला जर ही विमाने दिसली असती तर अमेरिकेची दले सावध झाली असती पण हा धोका जाणूनबुजून पत्करण्यात आला होता. सर्व जहाजांवरील वैमानिक पहाटे तीन वाजताच उठले. उठले म्हणण्यात तसा अर्थ नाही कारण बहुतेकांनी रात्र आपल्या प्रियजनांना निरोपाची पत्रे लिहिण्यात व्यतीत केली होती. न्याहारी झाल्यावर ते सर्वजण आपापल्या जहाजाच्या ब्रिफिंगरुममधे शेवटच्या भाषणासाठी जमा झाले.
हिर्यूवर टॉरपेडो बॉंबर मात्सुमुरा हिटेमुळे तणाव जरा कमी झाला. जपानमधे थंडीत होणाऱ्या आजारापासून बचाव होण्यासाठी (संसर्ग टाळण्यासाठी) तोंडावर मासुकू नावाचे एक मास्क घालतात. मात्सुमुराने हा प्रवास सुरु झाल्यापासून इतरांसमोर हे मास्क काढले नव्हते. अगदी जेवताना सुद्धा. जपानमधे मिशा ठेवण्याची प्रथा जवळजवळ नाहीच. या दिवशी मात्र त्या खोलीत त्याने मासुकू काढून प्रवेश केला आणि त्या खोलीत हास्याचा फवारा उडाला. त्या मुखवट्याखाली मात्सुमुरा गुपचुपपणे मिशा वाढवत होता व आत्तापर्यंत त्या चांगल्याच भरगोस वाढल्या होत्या. सगळ्यांनी तो मासुकु घालत होता तेव्हा जास्त रुबाबदार दिसत होता असे मत नोंदविले व परत एकदा तेथे हास्यविनोद चालू झाले.
पहाटे ५.३० वाजता त्या सहा विमानवाहूनौका पूर्वेकडे वळाल्या व त्यांनी वाऱ्याच्या अवरोधामुळे कमी झालेला वेग भरुन काढण्यासाठी आपला वेग २४ नॉटस् केला. समुद्राने आता आपले खरे रुप दाखवायला सुरवात केली. डेकवरुन लाटांचे पाणी वहायला लागले पण नशिबाने विमाने धावपट्टीवरुन अजूनही उडू शकत होती. हल्ला करायचा असल्यामुळे आता सर्व बोटींवर युद्धनिशाणे फडकविण्यात आली व वातावरण भारुन गेले. उचंबळून आलेल्या भावना आवरुन धावपट्टीच्या तंत्रज्ञांनी धावपट्टी उड्डाणासाठी तयार करण्याचे काम चालू केले. वैमानिक आपापले साहित्य घेऊन विमानात चढत असताना न विसरता कपाळावर हाचिमाकी बांधत होते. हा एक रुमाल असतो जो पूर्वी सामुराई लढाईआधी कपाळावर बांधत. या रुमालावर मात्र ‘हिस्शो’ असे लिहिले होते. त्याचा अर्थ होता – विजय ! निश्चित विजय !’
पहिल्या फेरीत ४३ लढाऊ विमानांनी आकाशात झेप घेतली. त्याच्या मागोमाग ४९ उंचावरुन बॉंब टाकणारी विमाने, ५१ सुर मारुन बॉंबिंग करणारी विमाने व ४० टॉरपेडो टाकणाऱ्या विमानांनी उड्डाण केले. १५ मिनिटात ही १८३ विमाने आकाशात होती. कमीतकमी वेळात उड्डाण करण्याचा त्या काळातील हा एक उच्चांकच होता. हे वैमानिक जेव्हा सराव करत असत तेव्हा त्यांना यासाठी ४० मिनिटे लागत असत. प्रवासात सराव करुन त्यांनी तो काळ २० मिनिटावर आणला होता. या उड्डाणात फक्त दोन विमानांना अपघात झाला त्यातील एक विमान समुद्रात कोसळले व वैमानिकासहीत नाहीसे झाले.
उडाल्यावर फुचिडाच्या तुकडीतील विमाने अकागीवर एका रेषेत उडायला लागली. हा सर्व विमानांना पर्ल हार्बरकडे त्यांच्या त्यांच्या फॉर्मेशनमधे कूच करण्याचा इशारा होता. धावपट्टीवर जागा झाल्यावर दुसरी तुकडे हवेत झेप घेणार होती. पहिल्या हल्ल्यात एकूण ३५३ विमाने भाग घेणार होती. नौदलाच्या विमानांनी भाग घेतलेल्या तोपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला असणार होता. जपानच्या उगवत्या सुर्याने आकाश व्यापून टाकले. खालून जहाजावरुन सर्व नौसैनिक मोठ्या उत्साहाने आपापल्या टोप्या हवेत फडकवत, ओरडत वैमानिकांना प्रोत्साहन देत होते. थोड्याच वेळात त्या विमानांचे ठिपक्यात रुपांतर झाल्यावर तो कोलाहल शमला. त्यांच्यातच उभ्या असलेल्या गेंडाची छाती अभिमानाने फुलून आली होती. बेन्झाईच्या रणगर्जना त्याच्या कानात घुमत असतानाच तो अकागीच्या नियंत्रणकक्षात पोहोचला. फुचिडा त्याच्या लक्ष्यावर पोहोचल्या पोहोचल्या त्याला पहिला संदेश पाठविणार होता. फर्स्ट फ्लीटच नव्हे तर जपानचे पॅसिफिक महासागरात पसरलेले इतर आरमारही या संदेशाची आतुरतेने वाट पहात होते कारण हा संदेश मिळाल्या मिळाल्या त्यावर असणारे सैनिक विविध ठिकाणी आक्रमण करणार होते. या सगळ्यांबरोबर टोकियोमधे ॲडमिरल यामामोटो त्याच्या इतर आधिकार्यांसह मोठ्या उत्सुकतेने याच संदेशाची वाट बघत होता. पहिला संदेश पहिल्यांदा उडालेल्या दोन विमानांकडून आला. - ‘पर्ल हार्बरवर सर्व अमेरिकन जहाजे हजर होती आणि त्यांना या हल्ल्याची कसलीही खबरबात नव्हती.’
बरोबर ७ वाजून ४९ मिनिटांनी गेंडाच्या समोरील यंत्रातून खरखर ऐकू आली आणि त्यातून शब्द उमटले टो ! टो ! टो! जपानी भाषेतील ‘हल्ला’ या शब्दाचा हा पहिला शब्द होता पण याने काही उलगडा होत नव्हता.
काहीच क्षणांनंतर दुसरा संदेश येऊन धडकला. टोरा ! टोरा ! टोरा !!! .............
या संदेशाचा अर्थ होता अमेरिकेच्या नौदलाला अनपेक्षित दणका देण्यात यश मिळाले आहे............
क्रमशः................
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 May 2013 - 8:52 am | लॉरी टांगटूंगकर
पुभालटा. लेखमाला अशक्य रंगत चालली आहे.
24 May 2013 - 9:13 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
मालिका जबरदस्त रंगत चाललीय.
24 May 2013 - 9:51 am | सौंदाळा
भाग ७ ची आतुरतेने वाट बघतोय.
24 May 2013 - 8:59 am | मुक्त विहारि
झक्कास...
24 May 2013 - 10:14 am | रोहन अजय संसारे
भन्नाट भन्नाट भन्नाट भन्नाट भन्नाट भन्नाट.
येवडी माहिती तर पर्ल हर्बौर चित्रपट बगून पण नाही मिळाली.
लिहत राहा खूप चं माहिती मिळत आहे
24 May 2013 - 11:30 am | जेपी
पु .भा . लवकर
24 May 2013 - 12:45 pm | मनराव
मस्त.....!!! असेच लिहित रहा.......
24 May 2013 - 1:05 pm | जयंत कुलकर्णी
आत्तापर्यंत ज्यांनी वाचले आहे व ज्यांनी माझ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आपण वाचत आहात म्हणून लिहितो आहे..............
24 May 2013 - 2:15 pm | सुहास झेले
भन्नाट... पुढचा भाग लवकर येऊ द्यात :) :)
24 May 2013 - 3:19 pm | अजो
एकदम मस्त. पुभाप्र
24 May 2013 - 5:36 pm | पैसा
अत्यंत थरारक आणि रंगतदार!
25 May 2013 - 10:41 am | विसोबा खेचर
संग्राह्य..!!
25 May 2013 - 10:59 am | नन्दादीप
बेफाट रंगलीय राव....
25 May 2013 - 5:02 pm | मोदक
धन्यवाद जयंतजी!!!!
पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.
28 May 2013 - 11:09 am | ब़जरबट्टू
जबरदस्त माहिती आहे। पुढिल भागासाठी आतुर.