युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-५
सोर्यू
त्यांच्या नशिबात गेंडापासून सुटका लिहिली होती असे म्हणावे लागेल कारण त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. अर्थात पहिल्या प्रयोगात फक्त ५० % टॉरपेडो पाण्याखाली बुडाले नाहीत. अजून थोडे संशोधन झाल्यावर ८० % टॉरपेडो पाण्यात पडल्यापडल्या लक्ष्याच्या दिशेने जाऊ लागले.
हे संशोधन वेळेवरच झाले असे म्हणावे लागेल कारण लगेचच याचे उत्पादन हाती घेण्यात आले व पहिले तीस टॉरपेडो ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात गेंडाच्या हातात पडले. पुढचे १०० नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार झाले. शेवटी इतकी घाई झाली की काही तंत्रज्ञांना त्याची जुळणी जहाजांवरच करावी लागली.
चीनचा प्रसिद्ध व्युहरचनाकार सन् त्झू म्हणतो, ‘जर शत्रूने त्याचा दरवाजा थोडा जरी किलकिला केला असेल तर त्यातून आपण घाई करुन मुसंडी मारलीच पाहिजे. सन् तत्झूच्या विचरांना जपानमधे भलताच मान होता आणि अमेरिकेने त्यांच्या संरक्षण व्यवस्थेचा दरवाजा हवाई येथे थोडा उघडला होता व जपानला त्यातून मुसंडी मारायची घाई करायची होती. त्याची पहिली पायरी म्हणून अमेरिकेला अजून बेसावध करण्याची गरज होती.
सप्टेंबर महिन्यात जपानच्या सरकारने अमेरिकेशी त्यांच्यावर लादलेल्या बंदीवर चर्चा करण्यास आरंभ केला. जपानचा अमेरिकेतील राजदुत नोमुरा व अमेरिकेचा सचिव हल यांच्यात एक आठवडाभर हे चर्चेचे गुऱ्हाळ चालले व अखेरीस जपानला तीन प्रवासी जहाजे अमेरिकेच्या हवाईमधील बंदराला लावण्याची परवानगी मिळाली.
नोमुरा
अर्थात यात त्यात कुठलेही व्यापारी सामान असणार नाही ही अट होतीच. जपानशी संबंध सुधरण्याचा दिशेने एक पाऊल या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले गेले होते. अर्थात जपानने या संधीचा बरोबर फायदा उचलला.
ऑक्टोबर २३ रोजी जपानची पहिली प्रवासी बोट, ताटूटा मारु होनोलुलुच्या बंदराला लागल्या लागल्या राजदुतवासाचा कौन्सुल जनरल किटा जहाजावर अवतरला. जहाजाच्या कप्तानने त्याला एक सिलबंद लखोटा दिला. या पत्रात किटासाठी नॅव्हल जनरल स्टाफच्या काही सूचना होत्या. त्याने ओहाअ बेटाच्या सगळ्या अमेरिकन लष्करी तळांची अचुक जागा, त्यांचे नकाशे व त्यांची लष्करी ताकद याची पूर्ण माहिती गोळा करायची होती. ही माहिती नेण्यासाठी खास माणसे येतील त्यांनाच ती द्यावीत अशीही एक सूचना त्यात होती. ताटुटा मारु हवाईबेटांवर थोडा काळ थांबले व तेथुन अमेरिकेला रवाना झाले.
ही माणसे होती ले. कमांडर सुगुरु सुझुकी व ले. कमांडर तोशिइहिदे माएजिमा. पहिला होता अमेरिकेच्या विमानदलाचा तज्ञ तर दुसरा होता पाणबुड्यांचा तज्ञ. त्यांना पर्ल हार्बरच्या माहितीचे विश्लेषण करायचे होते व जपानला त्याचा अहवाल पाठवायचा होता. परवानगी मिळालेल्या दुसऱ्या जहाजात ताईयो मारुमधे हे दोघे प्रवासी म्हणून आले होते. हे जहाज त्याला मिळालेल्या परवानगीनुसार हवाईपर्यंतच जाणार होते. जपानमधे या सगळ्या जहाजांचा मोठा गवगवा करण्यात येत होता. तेथे हे जहाज फक्त हवाईपर्यंतच का जाणार आहे असा प्रश्न विचारला गेल्यावर ‘काही विशेष कारण नाही, ते सोयिस्कर आहे’ असे उत्तर दिले गेले. या जहाजावर सुझुकी हिशेबनिसाचे काम करत होता तर माएजिमा डॉक्टरचे. म्हणजे तसे दाखविले जात होते. या जहाजाने किनारा सोडला व जमीन दिसेनाशी झाल्यावर शांतपणे उत्तरेची वाट पकडली व ज्या मार्गाने पर्लहार्बरवर हल्ला करणारी जहाजे येणार होती त्या मार्गावर त्याने मार्गक्रमण चालू केले. या सबंध प्रवासात या दोन आधिकाऱ्यांनी रात्रंदिवस (अक्षरश: रात्रंदिवस्) त्या समुद्रावर व क्षितिजावर दुर्बिणीने टेहळणी केली.
या टेहळणीचा निष्कर्ष अमेरिकेच्या दृष्टीने भयानक होता. या सबंध प्रवासात त्यांना एकही जहाज किंवा विमान आढळले नाही. हवामानही चांगले होते समुद्रावर दाट धुक्याचे आवरणही होते. हा त्यांच्या दृष्टीने एक शुभशकूनच होता. हवाईपासून ८० मैलांवर पोहोचल्यावर त्यांना अमेरिकेच्या पहिल्या विमानाचे दर्शन झाले.
ताईयो मारु शनिवारी नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी सकाळी ८.३० मिनिटांनी होनोलुलु बंदराला लागले. हा दिवस व ही वेळही जपानने हेतूपूर्वक निवडली होती. साधारणत: याच वेळी पर्ल हार्बरवर हल्ला होणार होता. अलोहा टॉवरच्या जवळील गोदीत या बोटीने नांगर टाकला व त्याच्यावरुन या दोन आधिकाऱ्यांना पर्ल हार्बरची टेहळणी करता येत होती. या गोदीत ताईयो मारुने पाच दिवस नांगर टाकला व हे पाचही दिवस हे दोघे एकदाही जमिनीवर गेले नाहीत. अर्थात् त्यांना तसा हुकुमच होता म्हणा. त्यांची व अमेरिकेच्या एफ् बी आय्च्या माणसांची गाठ पडू नये म्हणून ही काळजी घेण्यात आली होती. कामासाठी कौन्सूल जनरल किटाच त्यांना भेटायला बोटीवर येत असे. किटाने या जहाजाला एकूण तीन वेळा भेट दिली. प्रत्येक वेळा त्याच्याबरोबर जपानी दोन माणसे असायची व ते बरेच सामान आत घेऊन जाताना दिसायचे. हे अशासाठी करण्यात आले होते की समजा एफ् बी आय् च्या अधिकाऱ्यांची धाड पडलीच तर किटाकडे काहीही सापडू नये. खालच्या दर्जाच्या माणसांकडून असा गुन्हा घडला तर त्या काळात त्याचे काहीतरी उत्तर देण्यास सोपे होते.
या जहाजाबद्दल योशिकावाला बिलकुल कळून दिले गेले नव्हते व त्याला या जहाजाच्या आसपास फिरकूनही दिले जात नव्हते. समजा एफ् बी आय् त्याच्या मागावर असेल तर ? म्हणून ही काळजी घेतली गेली होती. सुझुकीने किटाकडे योशिकावासाठी कामाची एक मोठी यादी दिली होती त्यात एक महत्वाची माहिती काढायचे काम होते ते म्हणजे हल्ला होता क्षणी अमेरिका सर्वशक्तिनिशी पलटवार करेल का ती बेसावध पकडली जाईल याचे उत्तर शोधायचे. योशिकावाची उत्तरे हल्ल्यासाठी अनुकुल अशीच होती.
योशिकावाने बेटाचा उत्तम नकाशा, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे व इतर महत्वाची माहिती किटाकडे सुपुर्त केली. ही माहिती वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यातून जहाजावर पोहोचविण्यात आली. नोव्हेंबरच्या पाच तारखेला ताईयो मारुने परतीच्या प्रवासासाठी बंदर सोडले. होनोलुलुच्या बंदरात उतरल्यावर या जहाजांच्या उतारुंची अत्यंत कडक तपासणी करण्यात आली होती. पण अर्थातच कोणाकडे काहीही सापडणार नव्हतेच.
इकडे जपनमधे हल्ल्याची जोरदार तयारी चालली होती. ६ नोव्हेंबरला फुचिडाने हल्ल्याची शेवटची रंगीततालीम घेतली. यात सहा विमानवाहू नौकांनी व ३५० पेक्षा जास्त विमानांनी भाग घेतला. यात पर्ल हार्बरप्रमाणे लक्ष्य (बोटी) २०० मैलांवर ठेवण्यात आल्या होत्या. या रंगीततालमीत पहिले दोन हल्ले फारच वाईट झाले. या प्रयत्नांवर यामामोटोने नाखुषी व्यक्त करुन फारच कडवट टीका केली. तिसरा हल्ला मात्र ठरल्याप्रमाणे अचूक झाला. त्यावेळी दुर्दैवाने यामामोटो हजर नव्हता पण नागाटो नावाच्या जहाजावरुन (जे लक्ष्य म्हणून काम करत होते) हा हल्ला अत्यंत यशस्वी झाल्याचा संदेश मिळाला – ‘काकेगीवा मिगोटो नारी.’
जहाजांच्या आरमारी तळांवर भाग घेणाऱ्या सर्व जहांजांवरुन अनावश्यक वस्तू काढायचे काम जोरदारपणे सुरु झाले. छोट्या बोटी, फर्निचर, सजावट, खाजगी सामान इ. जहाजांवरुन उतरविण्यात आले. जहाजांचा प्रत्येक इंचन्इंच तपासण्यात आला व इंधनासाठी जागा खाली करण्यात आली. समुद्रात प्रवासात इंधन भरायचा सराव बऱ्याच वेळा करण्यात आला होता तरीपण जेथे जागा मिळेल तेथे इंधन साठविण्यात येत होते.
ही सगळी तयारी व सराव जपानच्या जनतेला अंधारात ठेऊन चालली होती. सर्व नौसैनिकांना उन्हाळी व थंडीत वापरायचे कपडे देण्यात आले होते कारण हे आरमार थंड प्रदेशात चालले आहे याची कल्पना सामान्य जनतेला येऊ नये. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने गेल्यावर व त्यांच्या सरावाचा आवाज नाहीसा झाल्यावर जनतेला शंका येईल म्हणून आसपासच्या रात्री बेरात्री विमानतळांवरुन होणाऱ्या विमानांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. ज्या बंदरावरुन हे आरमार प्रस्थान ठेवणार होते तेथे एवढे नौसैनिक गेल्यावर शांतता होईल म्हणून आसपासच्या तळांवरून नौसैनिकांना सक्तिने रजेवर पाठवून त्या बंदरावर सोडण्यात आले जेणेकरुन नौसैनिकांची वर्दळ नहमी सारखी राहील.
या आरमारातील जहाजांना प्रवासात त्यांची बिनतारी संदेश यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश होता. त्यांना फक्त जपानहून संदेश घेण्याची अनुमती होती. अर्थात जेथे शांतता असायची तेथे या तरंगांची वर्दळ वाढल्याचे लक्षात आले असते म्हणून जपानी नौदलाने त्या विभागात गेले कित्येक दिवस बनावट संदेशाची राळ उडवून दिली होती. थोडक्यात सगळे नेहमीसारखे चालले आहे, विशेष काही घडत नाही असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू होता.
१७ नोव्हेंबरच्या दुपारी या मोहिमेत सहभागी होणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना शूभेच्छा देण्यासाठी यामामोटो आणि त्याच्या आधिकाऱ्यांनी साकीबेमधे नांगर टाकलेल्या आकागीवर पाऊल ठेवले. फुचिडाला यामामोटो तणावाखाली वावरत असल्याचे स्पष्ट जाणवत होते त्याचा चेहराही नेहमीपेक्षा गंभीर होता. त्याच्या एकंदरीत अवतारावरुन हे सगळे त्याच्या मनाविरुद्ध चालले आहे असे वाटत होते.
आकागी
आकागीवर त्या दुपारी यामामोटोने केलेले आधिकाऱ्यांसमोर केलेले भाषण नेहमीसारखे नव्हते. त्याने त्याच्या आधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की जरी आपण त्यांना बेसावध पकडणार असलो तरी तुम्ही त्यांच्या तीव्र प्रतिकाराला उत्तर देण्यास तयार रहा. ‘जपानने आजपर्यंत चीन मंगोलिया रशिया या सारख्या मातब्बर शत्रूंची युद्धे केली आहेत पण यावेळी या सगळ्यांपेक्षा ताकदवान व अगणीत साधनसंपत्ती असलेल्या शत्रूशी आपली गाठ पडली आहे हे लक्षात घ्या’. यामोमोटोला त्याच्या माणसांनी अनावश्यक दुराभिमान बाळगू नये असे मनापासून वाटत होते व त्याचे प्रतिबिंब त्याच्या भाषणात पडले होते.
या भाषणानंतर निरोपाची मेजवानी झाली. मेजवानीत वातावरण गंभीर होते व जरा जास्तच औपचारिक होते. गप्पांचे आवाज दबलेले होते व हस्यविनोद नरमगरम होते. या मेजवानीत मात्र यामोमोटोने ‘या मोहिमेत यश मिळणार याची मला खात्री आहे’ असे उद्गार काढले आणि त्या नौसैनिकांच्या छातीवरचे दडपण कमी झाले. वातावरण आत्मविश्वास व आशेने भरुन गेले. शेवटी पारंपारिक सुरुमे खाण्यात आली ( हा पदार्थ जपानमधे पुढील सुखासाठी खाल्ला जातो) व विजयासाठी कुचिगुरी पिण्यात आली. ग्लास उंचावत सम्राटाचा जयजयकार करण्यात आला ‘बेंझाई ! बेंझाई ! बेंझाई !
रात्री झाली आणि अकागीवरचे सगळे दिवे मालविण्यात आले. काळ्याकुट्ट अंधारात अकागीने आपला नांगर उचलला आणि ती समुद्रात शिरली. तिच्या बरोबर तीन डिस्ट्रॉयर जातीच्या नौकांनीही किनारा सोडला. अशाच प्रकारे एकूण ३१ युद्धनौकांनी किनारा सोडून समुद्रात प्रवेश केला. यात होत्या सहा विमानवाहू नौका, दोन बॅटलशिप्स, दोन अवजड क्रुझर, एक वजनाने हलकी असलेली क्रुझर, तीन पाणबुड्या, नऊ डिस्ट्रॉयर जातीच्या युद्धनौका, आठ इंधनाच्या नौका. सगळ्यात शेवटी कागा नावाच्या विमानवाहू नौकेने सासेबो नावाचे बंदर सोडले कारण येथे तिची थोडी दुरुस्ती चालली होती.
या सर्व युद्धनौका हितोकापूबे येथे भेटणार होत्या. हा समुद्र कुरिलेस बेटांच्या जवळ होता व हे बेट कायमच दाट धुक्याने वेढलेले असते. टोकियोपासून साधारणत: उत्तरेला १००० मैल अंतरावर असून तेथे इतर जहाजांची वर्दळ जवळजवळ नसतेच. त्या समुद्रात दोन बेटे व त्यावरील मासेमारी करणाऱ्यांच्या वस्त्या सोडल्यास मनुष्यसंपर्क असा नव्हताच. नागुमोचे आरमार या बेटांच्या आसपास येण्याअगोदर या बेटांचा उर्वरित जगाशी संबंध तोडण्यात आला. अधूनमधून बर्फ पडत होता, काळकुट्ट अंधार व लाटांचा आवाज अशा वातावरणात या आरमाराने पुढच्या सूचनांची वाट बघत दाट धुक्याने वेढलेल्या त्या समुद्रावर नांगर टाकला.
तेथे पोहोचल्यावर वेळ न दडविता नागुमोने आपले काम चालू केले. त्याच रात्री म्हणजे बघा, २२ नोव्हेंबरला आठ वाजता त्याच्या स्टाफ आधिकाऱ्यांना आकागीच्या स्टाफ रुममधे जमण्याचा आदेश दिला. तेथे पर्ल हार्बर व ओआहच्या प्रतिकृती त्यांचे स्वागत करत होत्या. ले. कमांडर सुझुकी त्यांना त्या प्रतिकृतींच्या मदतीने पर्ल हार्बरची माहिती देणार होता.
ले. कमाम्डर सुझूकी जे काही सांगत होता त्यात नवीन काहीच नव्हते पण शेवटची उजळणी म्हणून त्याचे महत्व होतेच. त्याने अमेरिकेचे आरमार दर शनिवारी तळावर परतते ही महत्वाच्या माहितीवर जोर दिला. अमेरिकेच्या हवाईतळाचे सविस्तर वर्णन केले. त्यात ज्यत विमाने ठेवण्यात येत त्या हँगरच्या छताची जाडीबद्दलही महिती होती. त्याने हवाईमधील अमेरिकेच्या वायुदलाची ताकद किती आहे याबद्दलही महत्वाची माहिती दिली. दुर्दैवाने त्यात जरा अतिशयोक्ती होती. त्याच्या म्हणण्यानुसार तेथे त्या काळात अमेरिकेची ४५५ विमाने तैनात होती पण प्रत्यक्षात तेथे फक्त २३१ विमाने होती.
ले. कमांडर सुझुकी बोलत असताना नागुमो स्तब्ध राहून ती माहिती अत्यंत एकाग्रपणे ग्रहण करत होता. त्याने मधे एक शब्दही उच्चारला नाही. त्याचे बोलणे झाल्यावर मात्र त्याने अत्यंत अचुक प्रश्न विचारले. पहिला होता – पर्ल हार्बरवर जाताना जपानच्या आरमाराचा त्यांना सुगावा लागण्याची शक्यता किती होती, दुसरा होता शत्रू खरोखरच बेसावध आहे का ? तिसरा होता-शत्रू प्रत्याघात करण्याची शक्यता किती होती चौथा होता – पर्ल हार्बरवर अमेरिकेचे आरमार नसण्याची शक्यता आहे का ?
या प्रश्नांची अचुक उत्तरे सुझुकीकडे नव्हती. तेथे गोलमाल उत्तरे देऊनही चालणार नव्हते. त्याने त्याच्याकडून जमेल तेवढे या शकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न त्याने टोकियोमधेही केला होता. त्याने तीच उत्तरे दिली व सांगितले की सर्व परिस्थिती जपानला अनुकुल अशीच आहे. सुझुकीच्या माहितीत एक फार मोठी गोची होती आणि ती म्हणजे अमेरिकेच्या विमानवाहू नौकांबद्दल त्याच्याकडे अचुक व विशेष माहिती नव्हती. गेंडा व फुचिडाने वारंवार अमेरिकेच्या विमानवाहू नौकांबद्दल अनेक प्रश्न विचारुन त्याला भंडावले पण सुझुकी त्यांना खात्री देऊ शकत नव्हता हे त्यांच्या लक्षात आले.
दुसऱ्या दिवशी अकागीवर मोठी गडबड उडाली. प्रत्येक युद्धनौकेचे आधिकारी त्या दिवशी आकागीवर एका महत्वाच्या बैठकीसाठी जमा झाले होते. सर्व कमांडर, वैमानिक, महत्वाचे तंत्रज्ञ इ. काय ऐकायला मिळणार या तणावाखाली वावरत होते.
नागुमोने त्या बैठकीची सुरवात महत्वाच्या घोषणेने केली ‘या मोहिमेचे लक्ष्य पर्ल हार्बर आहे’ ही घोषणा ऐकल्यावर उपस्थितांमधे एक उत्साहाची लहर पसरली. कुजबुजींनी त्या बैठकीची शांतता भंग पावली. जरी त्यातील फार थोड्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना हे माहीत असले तरीही नागुमोने हे प्रथमच अधिकृतपणे जाहीर केले होते. खरे म्हणजे बहुसंख्य आधिकाऱ्यांना ते सरावावर बाहेर पडले आहेत असेच वाटत होते. त्यांना हा धक्काच होता. नेहमीसारखा सराव असल्याचे वाटून कित्येकजण कुटुंबियांचा निरोप न घेताच आले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
नागुमोने त्याच्या भाषणात हेही स्पष्ट केले की हल्ल्याचा निर्णय अजून झालेला नाही. अमेरिका व जपानमधे अजूनही वाटाघाटी चालू आहेत आणि त्याच्या निकालावर ते ठरणार आहे. जर वाटाघाटी यशस्वी झाल्या तर या आरमाराला परत फिरण्याचा आदेश मिळू शकतो. पण त्या जर फिसकटल्या तर मात्र हा हल्ला करण्याचाचून जपानला गत्यंतर नाही. अर्थात त्याने त्याच्या माणसांना हल्ल्यासाठी तयार राहण्यास सांगितले.
त्यानंतर नागुमोच्या चीफ-ऑफ-स्टाफने हवाईपर्यंतच्या प्रवासात काय काळजी घ्यायची याबद्दल सूचना दिल्या. या नंतर मात्र त्या बैठकीची सुत्रे वैमानिकांच्या हातात गेली. स्वत: गेंडा जवळजवळ एक तास बोलत होता त्यानंतर फुचिडा व मुराटा यांनी हवाई हल्ल्याची सस्विस्तर योजना मांडली. दुपारनंतर सर्व वैमानिकांनी त्यांच्या वैयक्तिक सहभागावर चर्चा केली. मरणाशीच गाठ असल्यामुळे त्यांना एकही मुद्दा सोडायचा नव्हता. प्रत्येक शंकेचे ते उत्तर शोधत होते. हे सर्व होत असताना पहाट केव्हा झाली हे त्यांना कळालेही नाही.
२५ तारखेला नागुमो ज्याची वाट बघत होता तो निरोप टोकियोवरुन आला. यामामोटोने त्याच्या आरमाराला हवाईच्या दिशेने जाण्यास सांगण्यात आले होते – ‘पहिला हल्ला अबकड च्या पहाटे होईल. (दिवस नंतर योग्य वेळी कळविण्यात येईल). जर वाटाघाटी यशस्वी झाल्या तर तुम्हाला ताबडतोब परत फिरायचे आहे. त्याचा मार्गही नंतर योग्य वेळी सांगण्यात येईल.’
२६ तारखेच्या पहाटे दाट धुक्याच्या आवरणाखाली या आरमाराने नांगर उचलला व हवाईबेटांच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पहिले काही दिवस हवा छान होती. धुक्यामुळे शत्रूला सुगावा लागण्याचा प्रश्नच नव्हता. वेगही इंधनाच्या बोटींइतका म्हणजे १२/१३ नॉटस एवढाच ठेवण्यात आला.
बिनतारी संदेशवहन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्व प्रकारचा संपर्क हा झेंडे व उघडझाप करणाऱ्या दिव्यांमार्फत करण्यात येत होता. काळजी म्हणून सर्व बिनतारी यंत्रणेच्या व्यवस्थांना कुलपे घालून त्याच्या किल्ल्या एका लखोट्यात बंद करण्यात आल्या. जहाजातून कमीतकमी धुर निघेल याचीही काळजी घेण्यात आली. या सगळ्या वातावरणाचा नागुमोच्या मनावर परिणाम झाला नसता तर नवलच. ज्या क्षणी या आरमाराने नांगर उचलला त्या क्षणापासून नागुमोला अमेरिकेच्या पाणबुड्यांची भीती वाटत होती. त्याच्या खांद्यांवरचे हे ओझे फारच भयंकर होते. या मोहिमेचे यश हे हवाईपर्यंत अमेरिकेला सुगावा न लागता पोहोचणे या एकाच गोष्टीवर अवलंबून होते. त्याला अजून एक भीती होती ती म्हणजे जर समजा वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि त्याचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचला नाही तर ?
नागुमोला वाटणारी काळजी व जहाजांवर असणारे तणावग्रस्त वातावरण याचे दडपण झुगारुन वैमानिक मात्र आरामात त्यांचा सराव करत होते. दिवसा सराव व संध्याकाळी साके असा त्यांचा दिनक्रम व्यवस्थित चालला होता. त्यांच्या सरावातच त्यांनी मृत्युची भीती सोडून दिली होती. एकदा माणसाने मृत्युची भीती सोडली की तो वाट्याला आलेला क्षण आनंदाने उपभोगायला शिकतो हेच खरे. त्यांनी बेटांच्या व अमेरिकन जहाजांच्या प्रतिकृतींचा इतका अभ्यास केला की ते जहाज दृष्टीस पडताच त्यांनी ते सहज ओळखले असते. बेटांवरची प्रत्येक महत्वाची खूण त्यांना आता तोंडपाठ झाली होती. सोर्यूनावाच्या जहाजावर नोबोरु कनाई नावाच्या बांब टाकणारा आधिकारी तर सतत त्याचा उडण्याचा गणवेष परिधान करुन वावरत होता. दररोज सकाळी व दुपारी तो त्याच्या विमानात जाऊन बसत असे व बॉंबिंगच्या कार्यप्रणालीची उजळणी करत असे. (या अभ्यासाचा त्याला चांगलाच फायदा झाला असे म्हणावे लागेल कारण पुढे त्याने अमेरिकेच्या ॲरिझोना जहाजावर अचुक बॉंब टाकण्यात यश मिळवले).
जपानचे झिरो.....
जपानच्या फर्स्ट फ्लीटचा हा दाट धुक्याच्या आवरणाखाली पर्ल हार्बरचा घास घेण्यासाठी प्रवास चालू असताना अमेरिकेचे जे काही लक्ष पॅसिफिक महासागराकडे होते ते दक्षिणेकडे होते. कारण काही जपानी जहाजे त्या विभागता मुक्तपणे संचार करत होती. अमेरिकेत वर्तमानपत्रात बातम्या छापून येत होत्या, ‘अध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी नौकांच्या चीनी समुद्रात होणाऱ्या हालचालींसाठी जपानच्या राजदुताला जाब विचारण्यासाठी पाचारण केले...इ.इ.’ एवढेच काय २८ नोव्हेंबरच्या न्यु-यॉर्क टाईम्सची ही बातमी बघा ‘बहुधा थायलंडला धोका आहे’.
जपानने अजून एक गनिमीकावा केला. त्यांची जी तिसरी बोट होती – ‘ताटुटा मारु’ ती आता चीनमधून सुटका केलेल्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेला पोहोचविण्याच्या कामगिरीवर जाणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. त्याच्या बदल्यात अमेरिकेतील जपानचे नागरिक यातून परतणार होते. याला अमेरिकेत वर्तमानपत्रातून प्रचंड प्रसिद्धी देण्यात आली होती. हे जहाज डिसेंबरच्या १४ तारखेला पोहोचणार होते. डिसेंबरच्या तीन तारखेला न्यु-यॉर्क टाईम्सच्या टोकियोच्या वार्ताहराने हा जपानची सद्भावना आहे असे जाहीर केले. ७ डिसेंबरला या जहाजाने आपला अमेरिकेच्या दिशेने होणारा प्रवास थांबवून शांतपणे उलट दिशेने प्रवास चालू केला.
या आरमाराच्या प्रवासाच्या सातव्या दिवशी नागुमोची एक काळजी टोकियोवरुन आलेल्या संदेशामुळे मिटली. त्यात ‘निकिता पर्वतावर चढाई करा’ असा सांकेतिक आदेश होता. याचा अर्थ होता वाटाघाटी निष्फळ ठरल्या असून युद्धाला पर्याय नाही. याच संदेशात हल्ल्याची तारीखही पहिल्यांदाच जाहीर केली गेली होती..
...........७ डिसेंबर.
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
20 May 2013 - 1:40 pm | मुक्त विहारि
सुंदर भाग..
20 May 2013 - 1:49 pm | सौंदाळा
वाटच बघत होतो. :)
भाग आला म्हणुन हा प्रतिसाद.
भाग वाचुन झाला की पुढचा प्रतिसाद देतो.
20 May 2013 - 4:03 pm | सौंदाळा
वाचला. मस्तच नेहमीप्रमाणे.
हल्ला जवळ आल्यामुळे उत्कंठा वाढत चालली आहे.
जर फक्त ह्या हल्ल्यापर्यंतच लिहिणार असाल तर अमेरिकेचे प्रत्युत्तर: हिरोशिमा, नागासाकी अणुहल्ल्यापर्यंत याच किंवा पुढील मालिकेत लिहावे ही विनंती.
20 May 2013 - 1:54 pm | प्रचेतस
जबरदस्त लिखाण आणि अगदी तपशीलवार वर्णन.
20 May 2013 - 6:02 pm | मनराव
मस्त इतिहास उलघडता आहात...... उत्तम लेखन.......
हि मालिका संपल्यावर आणखी असेच इतिहास घडवलेल्या घटनांवर लेख येउ देत.....
21 May 2013 - 2:00 pm | अजो
नेहमी प्रमाणे मस्त. पु भ प्र.
22 May 2013 - 9:30 am | पैसा
आणि उत्कंठावर्धक! नेहमीप्रमाणेच अप्रतिम!