मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले
कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले
बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले
सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले
दिसतात "अभय" येथे चकवे सभोवताली
रस्ताच जीवनाचा सुचणे कठीण झाले
- गंगाधर मुटे
------------------------------------------------------
अवांतर :
याहो पवारदादा, इकडे अभय जरासे
चिक्कार घाम जाता --णे कठीण झाले
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
30 Apr 2013 - 5:28 pm | मदनबाण
सुंदर...
माझा एक छोटासा तोडका-मोडका प्रयत्न...
जगणे महाग झाले,मरणे महाग झाले
आम आदमीचे हाल आता,जगणे महाग झाले
न राहिले भान जनास क्रिकेट पाहु लागले
दुष्काळी राज्यात आता पाणी महाग झाले
हंगाम हा अंब्यांचा हापुस महाग झाले
पायरीच घेउ आता कारण जगणे महाग झाले
घोटाळेच घोटाळे सर्व करती,ठग फार झाले
तरी कर भरतो आम्ही जगणे महाग झाले
1 May 2013 - 9:28 am | गंगाधर मुटे
सुंदर झालीय कविता.
कठीण ऐवजी मी प्रथम महाग हाच काफिया घ्यायचे ठरवले होते, पण सर्व शेर महागाई भोवतीच फिरतील असे वाटले, म्हणून महाग हा रदिफ घ्यायचे टाळले.
30 Apr 2013 - 5:48 pm | कोमल
खुपच भिडणारे..
30 Apr 2013 - 6:11 pm | अमोल केळकर
वा वा छान !
अमोल केळकर
30 Apr 2013 - 6:50 pm | विसोबा खेचर
छान..
30 Apr 2013 - 7:01 pm | तिमा
शेवटी पवारांच्या चिखलात दगड मारला नसता तर बरे होते.
1 May 2013 - 9:32 am | गंगाधर मुटे
कोमल, अमोल केळकर, विसोबा खेचर, तिमा
मनपूर्वक धन्यवाद.
1 May 2013 - 2:18 pm | अग्निकोल्हा
त्यावर काही व्यक्त व्हायची खरतर लायकीच नाही.
10 Apr 2014 - 10:32 pm | गंगाधर मुटे
मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल
------------------------------------------------------
------------------------------------------------------
------------------------------------------------------
10 Apr 2014 - 10:38 pm | अनुप ढेरे
अभिनंदन! आवडली गझल...
11 Apr 2014 - 9:10 am | मदनबाण
अभिनंदन ! :)
11 Apr 2014 - 1:06 pm | आयुर्हित
आपली ही गझल "स्पर्धा विजेती" ठरली याबद्दल मनापासून अभिनंदन.
पण काही दिवसातच ह्या सर्व गोष्टी, इतिहासात जमा होतील याची खात्री आहे.
कारण हे भ्रष्टाचारी सरकार आता काही घटकेपुरतेच उरलेले आहे.
आता डोळे पुसा, आणि जास्त रडू नका, नाहीतर मातीत ओल नाही म्हणता म्हणता पूर यायचा.
"तूच आहे तुझी जीवनाचा शिल्पकार" या अर्थी काही नवीन चांगली गजल ऐकायला आवडेल.
अण्णा हजारेंचा आदर्श "जल संधारण पद्धती" सर्वांसमोर आणता येईल का?
नवीन सिंचनाच्या पद्धती काय आहेत, कशा वापरता येतील याबद्दलही आपले मत ऐकावेसे वाटते.
नवीन सरकार येतेय, आपल्यासारख्या अनुभवी माणसाकडून सर्वांच्या मोठ्ठ्या अपेक्षा आहेत.
आणि सर्वात महत्त्वाचे,सरकारी मदत तर होईलच, पण कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता, आपण सारे मिळून काय करू शकतो, हे ऐकायला कान आसुसलेले आहेत.तेव्हा कंबर कसायला हरकत नाही.
जय जवान, जय किसान तर आहेच सोबत आता जय विज्ञान ही असू द्या!
जय हिंद! जय भारत!!
11 Apr 2014 - 1:46 pm | गंगाधर मुटे
- सरकारे येतात आणि जातात. शेतीची लुट करण्याचा अधिकृत घाऊक परवाना सरकारकडेच असतो.
- शेतीचे शोषण करणारी सर्वात मोठी लुटारूंची टोळी म्हणजेच सरकार असते, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास हेच सांगतो.
- त्यामुळे भाबडा आशावाद जोपासायचे मला तरी काहीच कारण नाही.
- शेतीच्या दारिद्र्याच्या बाबतीत "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची पोकळवल्गना करणारी काव्ये एकतर मतीमंद किंवा सत्तेचा दलालच लिहू शकतो.
क्षमस्व.
11 Apr 2014 - 3:24 pm | आयुर्हित
मी ही आपल्यासारखाच सर्व सामान्य सुज्ञ नागरिक आहे कोणी मतीमंद किंवा सत्तेचा दलाल नाही.
आपण दुसऱ्या कडे एक बोट दाखवितो तेव्हा उरलेली ४ बोटे आपल्याकडेच दाखविले जातात!
दुसऱ्याला शिव्या देण्यापेक्षा स्वतःचे काय चुकते ह्याचे अवलोकन करायलाही मोठे मन लागते.
आणि विज्ञानाची कास धरल्याशिवाय पुढे समृद्धी येणार कशी?
सरकारचे चुकते कुठे हे दाखवायला शेतकरीमन असलेले मोठे नेते तयार करायला हवेतच!
ती क्षमता मातीत काम करणाऱ्या आपल्यासारख्या सुज्ञ शेतकऱ्याकडे आहे, हि आशा खोटी ठरवू नका.
"तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" अशा तर्हेची काव्ये पोकळवल्गना करणारी आहेत असे वाटत आहे, यावरूनच आपला आत्मविश्वास किती ढासळला आहे हेच दिसते. त्यामुळे फक्त कीव येते!
"कीव येईल असेच आयुष्य जगायचा संदेश" देणार असाल तर कोपऱ्यापासून हात जोडून नमस्कार आणि शुभेच्छा!
अन्यथा लढायला आपण सारे मिपाकर एक होऊ या!
11 Apr 2014 - 3:33 pm | गंगाधर मुटे
- मी तुम्हाला मतीमंद किंवा सत्तेचा दलाल जाणिवपूर्वक म्हटलेले नाही कारण "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार" ही कविता तुम्ही लिहिली हे मला माहित नव्हते.
- विज्ञानाने उत्पादन वाढू शकते शेतकर्याचे उत्पन्न वाढविणे विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे आहे.
- विज्ञान प्रगत झाल्याला बराच काळ लोटला आहे. शेतीत तंत्रज्ञान आल्याने इतरांची समृद्दी वाढली, शेतकर्यांची नाही.
- आत्मविश्वास आणि पोकळवल्गना व बढाया यामध्ये खूप अंतर आहे.
- पोकळवल्गना केल्याने आत्मविश्वास प्रदर्शित होत नाही.
11 Apr 2014 - 5:34 pm | आयुर्हित
सर्व शेतकरी बांधवांसाठी आपल्या सर्व प्रश्नांचे, आत्मविश्वासाच्या अभावाचे उत्तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार येथे देत आहे.
धन्यवाद.
11 Apr 2014 - 11:21 pm | गंगाधर मुटे
- लेख वाचला. लेखात आलेल्या माहितीचा विचार करता त्या लेखाचे शिर्षक "तूच आहेस तुझ्या समाजाचा शिल्पकार" असे असायला हवे.
- शेतकर्यांनी शिकावे किंवा आदर्श घ्यावा, असे त्या लेखात काहीही नाहीये.
- शेती हा व्यवसाय आहे, समाजसेवा नाही त्यामुळे येथे व्यावहारिक आणि आर्थिक पातळीवर मुल्यमापन करावे लागेल.
- शेतीव्यवसाय घाट्यात आहे, असे मी म्हणतो. तुरळक अपवाद वगळता "समाजसेवेचा व्यवसाय" बर्यापैकी फायद्याचाच असतो, याची मला खात्री आहे.
- देणग्या घेणे, वर्गणी गोळा करणे, शासकीय अनुदान घेणे, दंड आकारणी करून निधी गोळा करणे, असले व्यवसाय करायला कवडी एवढ्याही आत्मविश्वासाची गरज नसते.
कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेले कैक शेतकरी पुढील काही वर्षात प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झालेले आहे. बर्याचशा ढोंगी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे कोणी ढोंग उघडे पाडत नाही म्हणून समाजालाही अशांच्या कर्तूत्वाबद्दल उगीच आकर्षण असते. >>>>>>> कुर्हाडीचा दांडा
12 Apr 2014 - 3:22 am | आयुर्हित
गुजरात विकासाचे मृगजळ..या धाग्यावरचा प्रतिसाद सर्व शेतकऱ्यांनी खास खेड्यापाड्यात, गावाशहरात, प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक पंचायत समितीत, जिल्हा प्रशासनाच्या कलेक्टर समोर सार्वजनिक रित्या वाचून दाखवावा असा आहे.
जेव्हा कासव (कच्छ) धावू लागते! Blog by अनय जोगळेकर
12 Apr 2014 - 6:22 am | गंगाधर मुटे
- गुजरातचा शेतकरी FIVE STAR बंगल्यात राहतो काय?
- गुजरात मधील खेड्यातील रस्ते आरशासारखे चकाचक आहेत काय?
- गुजरात मधील खेड्यातील शेतकरी बिस्लेरी पाणी पितोय का?
- गुजरात मधील खेड्यातील शेतकरी कर्जबाजारी नाही का?
- गुजरात मधील खेड्यातील शेतकर्यांना शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढातरी रास्त भाव मिळतो का?
उत्तर जर नाही असेल तर "गुजरात विकासाचे मृगजळ" हा लेख वाचण्यापेक्षा "सत्यनारायणाची" पोथीच का वाचू नये?
पुण्य तरी पदरी पडेल!
12 Apr 2014 - 11:44 pm | आयुर्हित
श्री स्वामी समर्थ सांगून गेलेत "भाव दृढ करा"
हीच विंनती.
13 Apr 2014 - 4:26 am | गंगाधर मुटे
आत्महत्या करण्याची पाळी ऑढवलेल्या शासकियबळींचे अतृप्त आत्मे ओरडून सांगताहेत, शेतमालाच्या भावात तिपटीने "भाववाढ करा" व त्यांच्या मुलाबाळांना सुखाने जगू द्या!
12 Apr 2014 - 6:38 am | गंगाधर मुटे
देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!
11 Apr 2014 - 4:39 pm | मदनबाण
डीझेल महाग झाले पेट्रोल महाग झाले
देशातल्या जनतेस जगणे महाग झाले.
थ्रीजी, कोळसा, कॉमन वेल्थ, घोटाळे कितीक
राष्ट्रासमोर "आदर्श" कोणता ते कळणे कठीण झाले
भ्रष्टाचार,आत्महत्या बलात्कार होतात रोज
देशात आता आयुष्य कंठणे कठीण झाले
कोथींबीर महागली,अन कांद्यांचे रडगाणे झाले
१२ रु पोटभर मिळते, असे सांगणारे मत्त झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र राज्यकर्त्य
मत द्यावे कोणास ते ठरवणे कठीण झाले
11 Apr 2014 - 11:23 pm | गंगाधर मुटे
"कोथींबीर महागली,अन कांद्यांचे रडगाणे झाले" एवढी ओळ सोडून बाकी कविता आवडली.
12 Apr 2014 - 11:21 pm | मदनबाण
ओक्के. :) अजुन एक चूक झाली, २-जी च्या जागी ३-झाले आहे.
11 Apr 2014 - 4:57 pm | श्रीवेद
अभिनंदन! गझल आवडली.
13 Apr 2014 - 8:06 am | Anvita
छान !