युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-२
पर्ल हार्बरवर हल्ला चढवायची मूळ कल्पना जपानच्या विमानदल व नौदलाच्या एकत्रीत दलाचा कमांडर-इन-चीफ ॲडमिरल इसोरोकू यामामोटो याची. या माणसाने ती कल्पना नुसती मांडलीच नाही तर ती सत्यात उतरवण्यासाठी सतत प्रयत्न केले व सगळ्यांच्या विरोधास न जुमानता ती योजना पुढे रेटली होती. त्याचा या योजनेचा आग्रह विरोधाभासाने ठासून भरला होता असे म्हणायला हरकत नाही कारण याच माणसाने अमेरिकेविरुद्ध युद्ध छेडण्याबद्दल आपली मते काही वर्षांपूर्वी मोठ्या आग्रहाने मांडली होती. जपानच्या सेनेतील एक थोर युद्धव्युहरचनाकार म्हणून त्याची ही मते वाचली तर आजही आपल्याला आश्चर्य वाटेल. त्याला अमेरिकेची औद्योगिक ताकदची ओळख तो जेव्हा हारवर्डमधे शिकत होता तेव्हाच झाली होती. त्यानंतर तो जेव्हा जपानचा नौदलाचा अधिकारी म्हणून वॉशिंग्टनमधे काम करत होता तेव्हा तर त्याची त्या ताकदीबद्दल खात्रीच पटली. त्याने त्यावेळच्या पंतप्रधानांना स्पष्टच सांगितले होते ‘मला जर अमेरिकेविरुद्ध परिणामांची चिंता न करता युद्ध करायला लागले तर ते मी माझे कर्तव्य म्हणून करेन. पहिले सहा महिने माझ्या पराक्रमाने जग तोंडात बोटे घालेल पण पुढच्या दोन वर्षात काय होईल ते मी सांगू शकत नाही. तो आत्मविश्वास टिकून राहील की नाही याची माझ्या मनात शंका आहे. अमेरिकेविरुद्ध युद्ध टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आपण करावेत हा माझा आपल्याला सल्ला असेल’. असे ठाम मत असलेल्या माणसाने शेवटी ज्याची परिणीती सर्वकष युद्धात होईल असा हल्ला आखला हेही आश्चर्यच म्हणावे लागेल. याचे उत्तर हे आहे की घटनाक्रमच असा घडत गेला की यामामोटोला जपानचे हे युद्ध टाळता आले नाही. तो त्या परिस्थितीचा बळी ठरला असे म्हणायलाही हरकत नाही. पुढे जाण्याआधी ॲडमिरल यामामोटोबद्दल थोडी माहीती घेऊयात.
अवांतर माहिती : ॲडमिरल यामामोटोचा जन्म १८८४ मधे झाला त्याचे मूळनाव होते तकानो. दत्तक गेल्यावर तो झाला यामामोटो. १९०४ मधे जपानच्या नौदलाच्या ॲकॅडमीमधून तो उत्तीर्ण झाला व रशियाविरुद्ध झालेल्या युद्धात तो जखमीही झाला होता. जपानच्या नौदलाच्या स्टाफ कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यावर त्याने अमेरिकेत हारवर्डमधे अर्थशास्त्रशाखेत प्रवेश घेतला. १९२५-१९२८ या तीन वर्षासाठी तो अमेरिकेत जपानचा नॅव्हल ॲटॅची म्हणून कार्यरत होता. जपानच्या लष्कर व नौदलामधील सूप्त स्पर्धेत त्याने विमानवाहू नौकेचे महत्व ओळखले होते. आयुष्यभर त्याने विमानवाहू नौका व तीचे आगामी युद्धातील महत्व या दोन गोष्टींचा पाठपुरावा केला. जहाजांवरच्या विमानांना तो सामुराईंच्या तलवारींची उपमा द्यायचा. पर्ल हार्बरच्या हल्ल्याचे नियोजन व मिडवेतील सागरी युद्ध ही दोन युद्धे त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना. त्याचा मृत्यू एका अमेरिकन पायलटच्या हातूनच होण्याचे त्याच्या नशिबात लिहिले असावे बहुधा....
जपानचे शांत बेटे ही निसर्गरम्य आहेत पण नुसती नसर्गरम्यता असून चालत नाही. दरवर्षी १० लाख खाणाऱ्या तोंडांची भर पडत असताना त्यांची खाण्यापिण्याची सोय करायला जमीन लागते. शिवाय जपानच्या महत्वाकांक्षी उद्योगजगताची खनिजांची भूकही वाढतच होती त्यामुळे जपानला आपल्या सीमा वाढविण्यावाचून गत्यंतर नव्हते. विस्तारवादी धोरण स्वीकारल्यावर त्याची नजर मग शेजारच्या देशांकडे न वळती तर नवलच. १९१० साली जपानने कोरियावर आक्रमण केले. १९१० मधे मांचुरियावर आक्रमण केले. १९३७ मधे चीनमधे त्यांच्या सेना घुसल्या व त्सुनामीने एखादे बेट गिळंकृत करावे तसे या सैन्याने ते देश पादाक्रांत करायचा सपाटा चालविला. जपानी नेतृत्वाला त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इतकी खात्री होती की त्यांनी हे करताना कशाचीही फिकीर केली नाही. जपानच्या नेतृत्वाने यापूर्वीही फिलिपाईन्स, मलाया, इंडोनेशिया (त्यावेळचे डच वेस्ट इंडिज) या देशातील खाणी ताब्यात घेण्याची स्वप्ने बघितली होतीच. १९३९ मधे यामामोटो विमानवाहू जहाजदलाचा प्रमुख झाला तोपर्यंत या देशातील खाणी म्हणजे देशच काबीज करायच्या योजना तयार झाल्याही होत्या.
अवांतर माहिती
फिलिपाईन्स, मलाया, डच ईस्ट इंडीज, थायलँड, बर्मा व पश्चिम पॅसिफिक विभागातही आक्रमण करून ती बेटे काबीज करण्याच्या योजना तयार झाल्या. या विभागाला जपानने सदर्न रिसोर्सेस एरिया असे नाव दिले होते पण प्रत्यक्षात त्याला ते ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरीटी स्फिअर असे संबोधत. म्हणजे हा जपानच्या सभोवताली पसरलेला प्रदेश जपानसाठी कच्चा माल पुरवणार होता पण त्या विभागातील देशांना ही त्यांच्या प्रगतीची संधी आहे असे भासविण्यात येणार होते. हे सगळे प्रदेश ताब्यात आल्यावर या योजनेचा दुसरा भाग या प्रदेशांचे अमेरिकेपासून व तिच्या दोस्तराष्ट्रांपासून संरक्षण कसे करायचे यासाठी खर्ची घातला होता. या योजनेचा तिसरा भाग होता शत्रुच्या दळणवळण व्यवस्थेवर निर्णायकी हल्ले करणे जेणेकरून तो जपानचे अतीपूर्वेतील अधिकार मान्य करेल. या मुख्यालयातील काही तज्ञांचे तर असेही म्हणणे होते की जपानने ऑस्ट्रेलिया व भारतावरही हल्ला करावा व जर्मनीशी मध्यपूर्वेत हातमिळवणी करावी. जपानची सदर्न रिसोर्सेस एरिया ही कल्पना आणि हिटलरच्या लेबेन्स्रॉमची कल्पना यात बरेच साम्य होते. आपण बघालच की या योजनेमधेही जर्मनीच्या ब्लिझक्रिग सारखे अचानक व जलद आक्रमण करुन अमेरिकेचे पॅसिफिक नौदल निष्प्रभ करायचे असे डावपेच होतेच.
एशिया डेव्हलेपमेंट बोर्डाचा प्रमुख जनरल ताईची सुझुकी एका बैठकीत म्हणाला, ‘तीनचार महिन्यात दक्षिणेतील सदर्न रिसोर्स भागातील काही महत्वाच्या स्थानांवर जर आपण कब्जा मिळवला तर आपला पेट्रोलियम, अल्युमिनियम, निकेल, रबर, टीन इत्यादीचा पुरवठा पुढच्या सहा महिन्यात चालू हो़ऊ शकेल व त्याच्याच पुढच्या काही महिन्यात या कच्चा मालाचा उपयोग आपल्या उत्पादनात करु शकू’
या हालचाली केल्यातर अमेरिकेशी युद्ध अटळ आहे याची यामामोटोला पूर्ण कल्पना होती. जे त्याला टाळायचे होते तेच त्याच्या नशिबात लिहिले होते. पण यामामोटोला अमेरिकेविरुद्ध युद्ध करायचे नव्हते याचा अर्थ असा कोणी घेऊ नये की तो त्या युद्धाला घाबरत होता. तो एक कडवा राष्ट्रवादी होता आणि जपानमधे आढळणारी देशभक्ती त्याच्या नसानसात भिनलेली होती. जपान व राजासाठी त्याची प्राण अर्पण करायचीही तयारी होती आणि पारंपारिक जपानच्या सामुराईप्रमाणे त्याचा एका तत्वावर दृढ विश्वास होता – ‘सगळ्याआधी कर्तव्य मग बाकी सगळे’ थोडक्यात "आधी लगीन कोंढाण्याचे !"
इतर जपानी जनतेप्रमाणे यामोमोटोचाही जपानी वंश हा इतर वंशापेक्षा श्रेष्ठ असून परमेश्वरानेच त्यांना काही भव्य कार्य करण्यासाठीच या पृथ्वीतलावर पाठवले आहे या तत्वावर प्रचंड विश्वास होता. त्यांच्या या विचारसरणीमुळे आशियामधे जपानचेच वर्चस्व असायला पाहिजे या बाबतीत जपानमधे कोणाच्याही मनात संशयच नव्हता. वर उल्लेख झालेल्या सदर्न रिसोर्स एरियाच्या कार्यवाहीत सगळ्यात मोठा अडथळा कोणाचा होता तर तो अर्थातच अमेरिकेच्या नौदलाचा. खरे म्हटले तर अमेरिकेच्या पॅसिफिकमधील हलचालींना अप्रत्यक्ष यामामोटोचा हातभार लागलेला होता हे विसरता येत नाही. असो. या सगळ्या योजना यशस्वी होण्यासाठी त्या राबवताना तरी अमेरिकन नौकादलाचे अस्तित्व त्या विभागात जपानला नको होते. हे कसे जमायचे याच्यावर आता विचारविनिमय चालू झाला.
यामामोटोच्या विचारसरणीवर त्याच्या प्रशिक्षणाचा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होताच. त्या प्रभावाखाली त्याने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चालविला. तो स्वत: हवाईयुद्धाचा विशेषज्ञ होता, शूर होता, व मुलभूत विचारसरणीवर त्याचा विश्वास होता व त्याला म्हणी वापरायची सवय होती. त्याची एक आवडती म्हण होती, ‘तुम्हाला जर वाघाचे पिल्लू पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्या गुहेतच जावे लागेल ’.
या म्हणीचा अर्थ आपल्याला कळला असेलच. त्याचे लक्ष आता वाघाच्या गुहेकडे लागले होते. ती होती अमेरिकेचा हवाईमधील पर्ल हार्बर येथील पॅसिफिक आरमाराचा तळ. फिलिपाईन्स, मलाया, डच ईस्ट इंडीज, थायलँड, बर्मा व पश्चिम पॅसिफिकवर आक्रमण करण्याआधी हा तळ उध्वस्त करता येईल का याच्यावर विचारविनिमय चालू झाला. १९४१च्या जानेवारीमधे यामामोटोने त्याच्या जवळच्या मित्राला म्हणजे ॲडमिरल ताकिजिरो ओनिशीला एक पत्र लिहिले. जपानच्या लष्कर व नौदलामधे असणाऱ्या संघर्षात या ओनिशीने नेहमीच यामामोटोची बाजू घेतली होती.
यामामोटोने त्याचे पत्र अत्यंत गोपनीय आहे अशी सुरवात करुन त्याचे त्या त्या मजकुरावर त्याचे मत मागितले होते. या तीन पानी पत्रात यामामोटोने पर्ल हार्बरवरील आकस्मित हल्ल्याच्या योजनेची रुपरेषा लिहिली होती. ‘ असा हल्ला शक्य आहे का ? व असल्यास त्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करावा’ अशी विनंतीवजा आज्ञा करुन या पत्राचा शेवट करण्यात आला होता. हे पत्र वाचल्यावर ॲडमिरल ओनिशीने पहिल्यांदा काय केले असेल तर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कमांडर मिनोरु गेंडाला बोलावून घेतले. हा त्यावेळी विमानवाहू नौका ‘कागा’ वर होता. मिनोरु गेंडा हा जपानच्या नौदलातील एक अत्यंत बुद्धिमान आधिकारी होता. त्याचे व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडणारे होते. सरळ नाक, चेहऱ्यावर एक प्रकारचा घरंदाज भाव व उत्तम काटक शरीरयष्टीच्या आधिकाऱ्याचे काळेभोर डोळे समोरच्या माणसाच्या ह्र्दयाचा ठाव घेत असत.
त्याच्या रुढीबाह्य कल्पना व हवाईव्युहतंत्र कल्पनांचा लष्कर व नौदलांच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांवर अगोदरच प्रभाव पडला होता. जेव्हा ॲडमिरल ओनिशीने ॲडमिरल यामामोटोचे पत्र गेंडाला दाखविले. त्याच्यावर एकाग्रतेने नजर टाकल्यावर त्यातील धाडसी व मूळकल्पनेने त्याचे डोळे चमकले.
‘अवघड आहे पण अशक्य नाही’
‘नीट वाचलेस का ? यामामोटोला असे वाटते आहे की त्यांची जेवढ्या शक्य असेल तेवढ्या बॅटलशिप्स बुडवून अमेरिकेचे मनोधैर्य कोसळेल !’
त्या काळात जपान काय किंवा अमेरिका काय सगळ्या देशातच बॅटलशिप जातीच्या नौका या नौदलाचा कणा समजला जात असे व विमानवाहूनौकांपेक्षा त्यांना जास्त महत्व दिले जात असे. या महत्वाच्या बॅटलशिप बुडविल्यावर अमेरिकेच्या ताकदीला धक्का पोहोचेल व त्यांना योग्य संदेश जाईल या गृहितकावर यामामोटोने ही कल्पना मांडली होती. त्याच्या या तीन पानी पत्रात त्याने अजून काही कल्पना मांडल्या होत्या. त्यात जपानच्या वैमानिकांनी त्यांच्या लक्ष्याचा भेद केल्यावर त्यांनी त्यांच्या नौकेवर येण्याचा प्रयत्न न करता जपानकडे परत यावे व मधे कुठेतरी समुद्रात आपली विमाने उतरवावीत. त्या वैमानिकांना मग काही बोटी उचलतील व सुखरुप स्थानी घेऊन जातील. या प्रकारचे हल्ले झाल्यावर एवढ्या शूर व जीवावर उदार झालेल्या सैनिकांविरुद्ध युद्ध लढण्यात काही अर्थ नाही हे उमगून ते जपानचा नाद सोडतील असाही आशावाद या पत्रात व्यक्त केला गेला होता. अर्थात गेंडाने या कल्पनांना उडवून लावले. त्याच्यामते हल्ल्याचे प्रथम लक्ष्य हे अमेरिकेच्या विमानवाहू नौकाच पाहिजे होत्या कारण जपानच्या नौदलाला सगळ्यात जास्त धोका यांच्यापासूनच होता. परिणामकारक हल्ल्यासाठी जपानच्या सग्ळ्या विमानवाहू नौकांना पर्ल हार्बरच्या जास्तीत जास्त जवळ जाणे भाग होते. परत जहाजांवर न येण्याच्या योजनेने वैमानिकांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला असता त्यामुळे तीही कल्पना त्याने उडवून लावली. शिवाय त्यात विमानेही वाया गेली असती आणि मुख्य म्हणजे त्यात त्याचे प्रशिक्षित वैमानिकांचा बळी जाण्याचा धोका होता. त्याने असेही मत मांडले की परतणाऱ्या विमानवाहू नौकांवर विमाने नसताना जर अमेरिकेने प्रतिहल्ला चढविला तर त्या नौकांना कोणीही वाचवू शकणार नाही.
हे मते व्यक्त करुन गेंडा कागावर परतला व कामाला लागला. त्याच्या सुपीक डोक्यात आता निरनिराळ्या योजनांची नुसती गर्दी उडाली होती. दोनच आठवड्यात त्याने ॲडमिरल ओनिशीला हल्ल्याची योजना सादर केली. या योजनेत
१ सगळ्या फ्लॅटटॉप प्रकारच्या विमानवाहू नौकांनी भाग घ्यायचा होता.
२ पर्ल हार्बरवर जाताना अंधाराचा फायदा उठविण्यासाठी व कुठल्या दिशेने हल्ले होत आहेत हे शत्रूला कळू नये म्हणून हा हल्ला पहाटे करायचा होता.
३ विमाने : डाईव्ह बॉंबर्स, उंचीवरुन बॉंब टाकणारी विमाने, टॉरपेडो डागणारी विमाने व यांच्या संरक्षणासाठी लढाऊ विमाने एवढ्या प्रकारच्या विमानांनी यात भाग घ्यायचा आहे.
४ बॉंबपेक्षा टॉरपेडोंना जास्त प्राधान्य देण्यात येईल.
यात एक अडचण होती. पर्लहार्बरच्या पाण्याची पातळी तुलनेने फार उथळ होती व त्यात टॉरपेडो कसे टाकायचे हा एक प्रश्नच होता पण गेंडाने टॉरपेडोचा आग्रह सोडला नाही. हा उथळ पाण्याचा प्रश्न काहीतरी करून सोडावायला लागेल असे त्याने ठामपणे प्रतिपादन केले. ॲडमिरल ओनिशीने गेंडाची योजना मान्य केली, त्यात स्वत:च्या काही मुद्द्यांची भर घातली व मार्च महिन्याच्या सुरवातीला तो अहवाल यामामोटोकडे पाठवून दिली. हीच योजना थोड्याफार फरकाने पुढे अमलात आणण्यात आली.
जपानच्या फर्स्ट फ्लीटचा मार्ग-धाडसी योजना !
एका महिन्यातच या मोहिमेची तयारी सुरु झाली. यासाठी एक नवीन आरमाराचे संघटन करण्यात आले. त्यात इतर आरमारात असलेल्या ५ विमानवाहू नौका काढून या आरमाराला जोडण्यात आल्या. प्रत्येक विमानवाहू नौकेला संरक्षणासाठी दोन या प्रमाणात १० डिस्ट्रॉयर जातीच्या युद्धनौका जोडण्यात आल्या. या आरमाराला नाव देण्यात आले – फर्स्ट एअर फ्लीट. जपानच्या व्युहनीतितज्ञांचे विमानवाहू नौकांचा वापर हल्ल्यासाठी करायचे जे स्वप्न होते तेही या निमित्ताने पूर्ण होणार होते. जपानच्या नौदलाला त्यांच्या लष्करावर या जयाने वरचष्मा मिळवता येणार होता हेही महत्वाचे होते. अर्थात हे मी लिहिले आहे एवढे काही सुरळीत पार पडले नाही. ज्या नौदलआधिकाऱ्यांचा बॅटलशीपवर भरवसा होता त्यांनी या योजनेला कडाडून विरोध केला कारण त्यांना हे आरमार कशासाठी वापरले जाणार आहे याची कल्पना दिलेली नव्हती. ती दिली असती तर ही योजना प्रत्यक्षात उतरली असती की नाही याची शंकाच आहे. त्याने सगळ्यांचा विरोध बाजूला सारुन ही योजना राबवायचा निर्णय घेतला आणि गेंडा झपाटल्यासारखा कामाला लागला.
या मोहिमेचे व नवीन आरमाराचे नेतृत्व यामामोटोलाच करायचे होते पण त्याच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांतून त्याला मोकळे होणे शक्य नसल्यामुळे ही जबाबदारी व्हाईस ॲडमिरल चुईची नागूमोवर टाकण्यात आली. नागूमो हा एक पारंपारिक पद्धतीने विचार करणारा नौदलआधिकारी होता. पण त्याचे नौकानयानातील कौशल्या वादातीत होते. महाकाय जहाजांच्या/युद्धनौकांच्या हालचालींच्या शास्त्रातील त्याचा अधिकार जगभर भल्याभल्यांना मान्य होता. त्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीत दुर्दैवाने त्याचा विमानांशी संबंध दुरान्वयानेही आला नव्हता. या दोन तीन गोष्टी सोडल्यास त्याची या कामी नेमणूक योग्यच होती. त्याला या नेमणुकीबद्दल कळविण्यात आले तेव्हा तो खुष झाला खरा पण जेव्हा त्याला कुठल्या कामगिरीवर जायचे आहे ते कळले तेव्हा मात्र तो आवाकच झाला. खवळलेल्या समुद्रातून ३५०० मैलांचा प्रवास करुन पर्लहार्बरवर हल्ला करायचा त्याच्यासाठी फारच धाडसी व धोकादायक प्रकार होता. ‘यातील धोक्यांचा हिशेब करायला पाहिजे’ तो मनाशी म्हणाला.
नागूमोच्या हिशेबाने ३५०० मैल शत्रूला सुगावा न लागू देता प्रवास करणे, मधे ताफ्यातील जहाजांमधे इंधन भरण्याची सोय करणे, सगळी योजना वेळेनुसार पार पाडणे या गोष्टी समुद्र शांत असतानासुद्धा अशक्य होत्या. त्याच्यामते दुसरा धोका होता तो म्हणजे एवढ्यामोठ्या प्रवासात शत्रुला त्यांचा सुगावा लागला तर ते आरमार नष्ट होण्यास फार वेळ लागला नसता. तसे झाले तर जपानचा पराभव एका दिवसातच अटळ होता.
या योजनेबाबतीत फारसा आशावादी नसणार्या नगूमोला आता एकाच गोष्टीचा आधार होता आणि ती म्हणजे ही योजना प्रत्यक्षात उतरणार नाही ही आशा. त्याच्या मते पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेबरोबर वाटाघाटी चालू होत्या त्यामुळे युद्ध होण्याची शक्यता फार कमी होती. ( प्रत्यक्षात जपानने युद्धाची घोषणा केलीच नाही व शेवटच्या क्षणापर्यंत या तथाकथित वाटाघाटी चालूच ठेवल्या होत्या) ॲडमिरल यामामोटोने ही मोहीम त्याच्या आधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन आखली होती व त्याला ही योजना नॅव्हल जनरल स्टाफ समोर मंजूरीसाठी ठेवावीच लागेल. त्याला खात्री होती की तेथे ती मंजूर होणे शक्यच नव्हती व इतर अनेक योजनांप्रमाणे ही योजनाही त्या कार्यालयात धूळ खात पडणार आहे.
त्याच्या दुर्दैवाने या योजनेवर धूळ तर साठणार नव्हतीच पण जपान मात्र धूळीस मिळणार होता........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
1 May 2013 - 8:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्त जमलाय लेख. एवढी वर्ष जपान एक "व्हिक्टीम" होता आणि त्यांनी लास्ट रेसोर्ट म्हणुन पर्ल हार्बर वर हल्ला केला अशीचं गैरसमजुत होती. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
1 May 2013 - 1:15 pm | क्लिंटन
+१.
जपानच्या बिचारेपणाचा गैरसमज पसरविण्यात (निदान भारतात) तरी डाव्या आणि समाजवादी मंडळींचा हात आहे.पहिल्यांदा स्वतः हिटलरलाही लाजवतील अशी कृत्ये करायची आणि नंतर अमेरिकेने जोरदार पेकाट मोडल्यानंतर मात्र कोकराचा अवतार धारण करून आपण किती 'बिचारे' असा आभास निर्माण करायचा या ढोंगाला अजिबात गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
1 May 2013 - 9:08 am | प्रचेतस
खूप छान झालाय हा भाग.
1 May 2013 - 9:12 am | श्रीरंग_जोशी
या हल्ल्याच्या पूर्वतयारीची एवढी तपशिलवार माहिती प्रथमच वाचावयास मिळाली, धन्यवाद.
1 May 2013 - 10:44 am | सुहास झेले
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक :) :)
1 May 2013 - 9:29 am | इरसाल
पुढील भागाची वाट पहात आहे.
1 May 2013 - 11:25 am | विसोबा खेचर
येऊ द्या साहेब,,, खूप मोलाचं लेखन आहे हे..!
1 May 2013 - 12:44 pm | आदूबाळ
सुंदर लेखन जयंतराव!
मला एक प्रश्न पडला आहे:
जपानला आपली जरबच बसवायची होती तर सिंगापूर, हाँगकाँग सारख्या "सॉफ्ट टार्गेट"वर हल्ला का केला नाही? (सिंगापूर, हाँगकाँगचे राज्यकर्ते ब्रिटन आधीच युरोपात गुंतले होते - त्यामुळे त्यांना इकडे आड तिकडे विहीर झालं असतं.) तसं केलं असतं तर फिलिपाईन्स, डच ईस्ट इंडीज वगैरे वर कबजा मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं ठिकाण हाती लागलं असतं. पुन्हा अमेरिकेला समजलं असतं की जपानच्या महत्त्वाकांक्षा (जपानच्या तुलनेत) पश्चिम दिशेला आहेत, त्यामुळे पूर्व पॅसिफिकमधल्या आपल्या वर्चस्वाला धक्का लागायचं काही कारण नाही. अमेरिका कदाचित युद्धात उतरली नसती.
पर्ल हार्बर 'काबीज' करणं तर शक्यच नव्ह्तं. टाकला तो छापा. त्या एका छाप्याला घाबरून अमेरिका युद्धात उतरणार नाही असा बालिश विचार कसा केला जपान्यांनी?
1 May 2013 - 2:11 pm | जयंत कुलकर्णी
फिलिपाईन्स, मलाया, डच ईस्ट इंडीज, थायलँड, बर्मा व पश्चिम पॅसिफिक विभागातही आक्रमण करून ती बेटे काबीज करण्याच्या योजना तयार झाल्या. या विभागाला जपानने सदर्न रिसोर्सेस एरिया असे नाव दिले होते पण प्रत्यक्षात त्याला ते ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरीटी स्फिअर असे संबोधत. म्हणजे हा जपानच्या सभोवताली पसरलेला प्रदेश जपानसाठी कच्चा माल पुरवणार होता पण त्या विभागातील देशांना ही त्यांच्या प्रगतीची संधी आहे असे भासविण्यात येणार होते. हे सगळे प्रदेश ताब्यात आल्यावर या योजनेचा दुसरा भाग या प्रदेशांचे अमेरिकेपासून व तिच्या दोस्तराष्ट्रांपासून संरक्षण कसे करायचे यासाठी खर्ची घातला होता. या योजनेचा तिसरा भाग होता शत्रुच्या दळणवळण व्यवस्थेवर निर्णायकी हल्ले करणे जेणेकरून तो जपानचे अतीपूर्वेतील अधिकार मान्य करेल. या मुख्यालयातील काही तज्ञांचे तर असेही म्हणणे होते की जपानने ऑस्ट्रेलिया व भारतावरही हल्ला करावा व जर्मनीशी मध्यपूर्वेत हातमिळवणी करावी. आपण बघालच की या योजनेमधेही जर्मनीच्या ब्लिझक्रिग सारखे अचानक व जलद आक्रमण करुन अमेरिकेचे पॅसिफिक नौदल निष्प्रभ करायचे असे डावपेच होतेच.
हे झाल्यानंतरतुम्ही म्हणता ते त्यांनी केलेच. अडथळा होता तो पर्ल हार्बर येथील आरमाराचा......
2 May 2013 - 12:55 am | लुप्त
मस्त जमलाय...
2 May 2013 - 5:43 pm | पैसा
थरारक आणि माहितीपूर्ण! मस्त जमलाय हाही भाग!
2 May 2013 - 9:19 pm | कोमल
असेच म्हणते..
पु.भा.प्र.
3 May 2013 - 11:39 am | आनन्दा
बर्याच नवीन गोष्टी कळतायत..
3 May 2013 - 12:55 pm | मन१
बॅटलशिप्स, युद्धनौका, विमानवाहू नौका, पाणबुड्या ह्या सर्वांतील फरक, मुख्य म्हणजे प्रत्येकाचे pros and cons वाचकाला माहित आहेत असे गृहित धरून लिहिल्यासारखा लेख वाटला.
ह्या सर्वांबद्दल दोन्-पाच ओळींत अतिसंक्षिप्त का असेना पण माहिती दिलीत तरी बरं होइल.
(माझ्याकडील माहिती:- "जपानी विमानवाहू नौका अमेरिकेच्या तुलनेत जपान्यांच्या सक्षम नव्हत्या. त्यांचे आरमार पारंपरिक पद्धतीचे, मोठ्या युद्धनौका असणारे होते, विमान + जहाज हे डेडली कॉम्बिनेशन त्यात नव्हते म्हणून युद्धाच्या उत्तरार्धात जपान गोत्यात आले " पण ह्याबद्दलचे सविस्तर तपशील मजकडे नाहित. कुणी दिलेत तर बरे होइल.)
7 May 2013 - 4:00 pm | शिलेदार
खुप मस्त लिहीलय मला वाटत की स्ट्रेटे़जीक प्लन्निन्ग काय असत हे कळ्त
आभारी आहोत