एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि.
----------------------------------------------------------------------------------------------
१.
Hi Dear!!!!!!
कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना? आणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविन? मुंबईला कधी येते आहेस? कळव मग फोन करुन.
Actually, सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि ’विनाकारण’ लिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.
आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं? तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तु? खांदे उडवुन चार-चारदा मला Thanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतो, तेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"
किती मजा केली ना आपण कॉलेज मध्ये? कॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी ’जान’ आणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला ’अरे ये!’ म्हणुन बोलावलसही, पण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही ’जे काहि’ करतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?
आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळी? पण तू उगाच मधे पडलीस, नाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतात? मैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.
अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं -
आई:काय करते रे ती सध्या?
मी:M.B.A.
आई:आहे कुठे मग सध्या ती?
मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीची? काहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेस? तिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?
आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच ’अपघाती वळण’ अशी पाटी दिसली, आणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालं? काहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहे, काय घाई आहे? बघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(पण त्या भाजीच्या देठा बरोबरच, तीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस का? अश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची ना? फार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?
आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(मला कळ्लं, आई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मी: आऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?
आई: आई काय आई? मुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेत, शिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)
मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असं? तु कितीवेळा भेटली आहेस तिला? ८वेऽऽळा १० वेळा? आणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये ती? त्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(पण ऐकेल ती आई कसली?)
आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनु? कसा करायचा? तुला अजुन काय काय आवडंत? सगळं विचारत होती!! बाकीच्या तिघी, बाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(तिला सांगुन काहिच फायदा नव्हता, चटकन चहा संपवला आणि उठलो, तर म्हणाली - )
आई:अरे, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?
मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येय, पुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकन t-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.)
तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलो, तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच ’कोचे’ आले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रे? काय झालयं? दुपारपासुन असेच आवाज येत आहेत, आणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतो, नाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.
कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असो, पुढले ७-८ दिवस तरी जेवताना ’नाहि’ म्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.
बर, तर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या ’गधा-मझदुरी’ करतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!
असो, तु इथे कधी येते आहेस? पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझा, तेव्हा जमणार आहे का? आणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोस, आणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.
तुझा,
बुद्धुराम उर्फ जोकर.
ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!
-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------
२
Hiiiiiiii!!!!!!
खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेय, त्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.
माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्ये? ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणार? काय करणार? आता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागली, मी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांना? तरी एकमेकांच्या contact मध्ये असतो आपण.
कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होते, ती पारीजाताची नाजुक फुल आणि...........’तू’. होय, तु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं, तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडली, अजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडली, खरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.
त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील, जमेल तसा नाचशील, किमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलास, तुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.
आणि हो! माझी छेड काढणार्याला तु मारत होतास, मारत कसला ’तुडवत’ होतास. तेव्हा मी मध्ये पडले, मुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तर? म्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले, पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं ’काहितरी’ आहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतास, मी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.
अरे हो, कॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होता, आठवतयं तुला? तुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला ’एका चाकावर’ तयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलं, तुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं का? पाय टेकवत नाहिये का? चल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होते, कारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर ’तू’ त्यावेळी ’माझ्यासाठी’ तिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेच, पण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी ’बाबांना काहि झालं असतं तर?’ या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलास, कारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.
असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होता, दोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावस, आणि त्या कोसळणार्या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहि, माझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि.
तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा ’तळणीचे मोदक’ करुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.
तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते ’तुला’ बघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. का? ते तुला कदाचित समजणार नाहि.
६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतं, काय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.
आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.
हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!
’फक्त तुझीच’
रडुबाई.
ता.क. - मी नेहमी म्हणते तसा तु खरचं बुध्दुराम आहेस. वर लिहायला विसरले होते!!!
-------------------------------------------------------------
-सौरभ वैशंपायन(मुंबई).
प्रतिक्रिया
24 Aug 2008 - 11:27 pm | केशवराव
सौरभ, एकदम भन्नाट लिहिले आहेस. बर्याच स्म्रुती जाग्या झाल्या. प्रसंगाची मांडणीही छान. पुढील लेखनास शुभेछ्या.
24 Aug 2008 - 11:42 pm | प्रभाकर पेठकर
मस्त लिहीलं आहे. अभिनंदन.
मात्र दुसरे पत्र जरा लांबल्यासारखे वाटले. (पण का? हे मात्र मला समजलेच नाही....)
24 Aug 2008 - 11:58 pm | नि३
हे मी आधी वाचल आहे. हे मला कुण्यातरी एका मित्राने मेल द्वारे पाठ्वीले होते.क्रुपया स्वताचे काहीतरी लीहा दुसर्याने लिहलेले जसेच्या तसे छापुन आप्ल्या नावाने प्रसीद्ध करु नका.मि तात्यांना विनंती करतो हा लेख ईथन लवकरात लवकर उडवावा.
---नितिन.
25 Aug 2008 - 2:02 am | भडकमकर मास्तर
सौरभ हा एक चांगला लेखक आहे...
मला त्याचे लेखन ठाउक आहे....
... निदान या असल्या लेखनाची तो कॉपी मारणार नाही, त्याला त्याची गरज नाही..अशी मला खात्री वाटते...
________
मला लेख आवडला...
तुझे अधिकाधिक उत्तमोत्तम लेख मिपावर येत राहोत...
पुढील लेखनास शुभेच्छा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Aug 2008 - 6:18 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो, मी त्याचे लेखन आधीपासुन वाचतो आहे.
असा डायरेक्ट आरोप करणे हेच पहिल्यांदा मला बरोबर वाटत नाही ...
असो. लेख उडवु नये अशी विनंती ...
लेखन नेहमीप्रमाणे उत्तम ...
अवांतर : सौरभला "मिपा" वर पाहुन बरे वाटले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
25 Aug 2008 - 4:09 am | भाग्यश्री
हा लेख सौरभचाच आहे.. त्याच्या ब्लॉगवर मीही वाचला आहे. नितीनभाऊ, मेल वर आलेला लेख हाच खरा सोर्स असेल असं का वाटावं तुम्हाला? :?
आता त्या मेलला रिप्लाय ऑल करून खर्या लेखकाचे नाव सांगा.. मी तरी असेच करते.
25 Aug 2008 - 6:36 pm | संदीप चित्रे
भाग्यश्री ... अनुमोदन
------------
सौरभ ... लेख छान जमलाय. दोन्ही पत्रांतल्या व्यक्तींचा सूर / त्यांचे विचार मस्त लिहिल्येस.. जियो !
25 Aug 2008 - 5:13 am | प्राजु
छान लिहिलं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Aug 2008 - 5:29 am | दिगंबर
अतिशय उत्तम लेख !!
सौरभच्या ब्लोगवरिल लेखन पाहता, हा लेख त्याचाच आहे हे सिध्द करण्याचि गरज वाटत नाही.
पुढील लेखनास शुभेच्छा.. आणि प्रतिक्शा
if you find anyone in your life without smile, give him your own !!
25 Aug 2008 - 10:12 am | अनिल हटेला
सौरव दा!!
मस्त च रे !!!
आणी सुरुवात थोडी कंटाळवानी वाटली.. ...
पण नंतर एकदम दादा स्टाइल बॅटींग !!
और भी आने दो !!!
( जाने तु या जाने ना चा पंखा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Aug 2008 - 10:53 am | II राजे II (not verified)
वा,
त्या बुध्दीराम पेक्षा मला त्या मुलीचे पत्र आवडले ;)
मस्त लिहलं आहे !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
25 Aug 2008 - 6:27 pm | मनस्वी
छान लिहिलंय.. आवडलं.
जाने तू.. नाव शोभतंय.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
25 Aug 2008 - 6:43 pm | आनंदयात्री
असेच म्हणतो सौरभ .. छान लिहलय .. सुखांत केल्यामुळे खुप छान वाटले वाचायला !
और भी आन दो.
25 Aug 2008 - 9:50 pm | सौरभ वैशंपायन
"हे मी आधी वाचल आहे. हे मला कुण्यातरी एका मित्राने मेल द्वारे पाठ्वीले होते.क्रुपया स्वताचे काहीतरी लीहा दुसर्याने लिहलेले जसेच्या तसे छापुन आप्ल्या नावाने प्रसीद्ध करु नका.मि तात्यांना विनंती करतो हा लेख ईथन लवकरात लवकर उडवावा.
-नीतीन."
मित्रवर,
या ले़खाची पहिलीच ओळ "एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता." अशी आहे. तारीख १७ एप्रिल २००८(खरा लेख आधीच सुचला होता, कागदावर अजुन महिनाभर आधीच उतरवला होता मात्र ब्लॉग लिहिताना अजुन नविन सुचत गेले.) तुम्हांला आलेली मेल हि जर १७ एप्रिल २००८ च्या अधीची असेल तर हा लेख इथुन उडवावा इतकेच नव्हे तर मी स्वतः इथुन निघुन जाईन. तुम्हांला जो लेख आला होता तो मला देखिल एका मैत्रिणीने पाठवला होता त्यावर मी तिला विचारले -" माझाह लेख मलाच काय पाठवतेस? आणि पाठवलास ते पाठवलास पिडिएफ करताना नाव घेतले नाहिस शेवटी? त्यावर तिनेहि सांगितले मलाहि हा लेख कुणीतरी पाठवला आहे. अजुन एक गोष्ट मध्ये "फाळणी" नावाची कविता फिरत होती ती देखिल माझीच आहे, आणि ज्याने ती पाठवली होती तेव्हा तीचा बट्ट्याबोळ करुन पाठवली होती. मी मुळ कविता इथे देईनच.
असो, तुम्हांला असे वाटणे गैर अज्जिबात नाहि उलट वाड्न्मय चौर्य होऊ नये म्हणुन तुम्ही जागरुक आहात या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
26 Aug 2008 - 3:00 pm | राघव१
नुकताच तुमच्या "फाळणी"या कवितेवर प्रतिसाद टाकलाय.
त्यात मीही हेच सांगितले आहे की त्यावेळेस वाचलेल्या त्या कवितेत १-२ कडवी अन् लेखकाचे नाव दोन्ही नव्हतेत.
हा लेखसुद्धा मला फॉरवर्ड आलेला. त्यातही लेखकाचे नाव नव्हते.
तुम्ही हे दोन्ही लिहिलेत हे समजून खूप आनंद झाला. शुभेच्छा!
राघव
25 Aug 2008 - 9:55 pm | सौरभ वैशंपायन
ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या सगळ्यांना धन्यवाद.
आणि आधी ज्यांनी माझा ब्लॉग वाचला आहे त्यांनी माझा मुळ ब्लॉग चांगला आहे हे म्हंटल्याबद्दल खास आभार.
26 Aug 2008 - 9:49 am | सुचेल तसं
सौरभदा,
खुपच छान!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी -> http://sucheltas.blogspot.com
26 Aug 2008 - 12:26 pm | सुमीत भातखंडे
सही लिहिलय यार.
जाम अवडलं.
26 Aug 2008 - 12:37 pm | स्वाती दिनेश
गोष्ट आवडली,छान लिहिले आहे.
स्वाती
26 Aug 2008 - 12:52 pm | सुनील
छान लिहिलय. आवडलं
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Aug 2008 - 5:32 pm | मन
मस्तच की राव........
अजुनही लेख येउ द्यात आता..........
एक सल्ला:- मी काही ब्लॉग पाहिले आहेत जिथे कॉपी-पेष्टच काय साधं राइट्-क्लि़क सुद्धा करता येत नाही वाचकाला.
ते ब्लॉग खरे खुरे वाचनमात्र आहेत.
निदान आता तरी आपला ब्लॉग असा बनवलात, तर भविष्यातील लेखनचौर्य बरचसं आटोक्यात आणता येइल.
आपलाच,
मनोबा
26 Aug 2008 - 5:48 pm | प्रभाकर पेठकर
फक्त कॉपी-पेस्ट करता येणार नाही. कागदावर उतरवून नव्याने टंकता येईलच की....
26 Aug 2008 - 5:58 pm | मन
पण बहुतांश मंडळी चोर्या करतानाही आळस दाखवतात.
कॉपी-पेष्ट करता येत नसेल तर प्रचंड प्रमाणात लेखन चौर्य कमी होइल(चोरांच्या आळशीपणामुळे) असं मला वाटतं.
घराला दार असलं तरी दार तोडुन चोरी करणारे आहेतच.
पण म्हणुन "दाराचा उपयोगच नाही" असं म्हणुन कसं चालेल?
दारं काढुन टाकली तर चोर्या १०० पटीनं वाढतील.
(ज्यंच्या मनात चोरीचा विचार सहसा डोकावला नस्ता, तेही कदाचित
उघडी घरं पाहुन आपापला हात मारुन घेतील.(मूळ कल्पना:- "गॉड इज डेड " ईश्वराच्या म्रुत्युनंतर निर्माण झालेली निर्नायकी अवस्था, आणि नैतिकतेच्या गाभ्याला हात घालणारा विषय))
बाकी, विषयांतराबदल माफी असावी.
आपलाच,
मनोबा
26 Aug 2008 - 10:30 pm | भाग्यश्री
प्रिंट स्क्रीन हा ऑप्शन आहेच की शिल्लक??
27 Aug 2008 - 2:24 am | शितल
लेख आवडला.
भावना मस्त मांडल्या आहेत. :)
27 Aug 2008 - 2:52 am | धनंजय
लिहिला आहे.
पूर्वी इंग्रजीत "एपिस्टोलरी" शैलीच्या कादंबर्या लिहीत. म्हणजे पूर्ण कथानकच पत्रापत्रातून उघड करीत. वाचकाचे मन गुंतलेले राहावे म्हणून जे कौशल्य लागते, ते तुमच्यापाशी आहे.
27 Aug 2008 - 7:55 am | सहज
चांगल लिहल आहे. :-)
वेगवेगळ्या विषयावर तुमचे लेखन वाचायला आवडत आहे.
27 Aug 2008 - 11:31 am | पावसाची परी
खुप छान लिहिलय
मला माहित आहे अशा लेखनाला भाग नसतात तरीही राहुन राहुन वाटते की तिच पत्र वाचल्यावर तो कस रिअऍक्ट करेल्......तिला काय लिहील परत्..... कसा बोलेल.
त्याला खरच मनात खोलवर कुठे ती आवडते का?
जमला तर पुन्ह फक्त १ भाग त्यान्च काय ठरत हे कळण्यापुरत.....
तिने पत्र छानच लिहिलय्......तो खुप आवडला.......पण मुल खरच बावळट असतात हो......कळत नाही त्यान्ना काही......
27 Aug 2008 - 12:11 pm | मदनबाण
मस्तच.... फार आवडले ..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
27 Aug 2008 - 6:11 pm | सौरभ वैशंपायन
लेख आवडला हे वाचुन बरे वाटले.
हो मान्य आहे आम्हि मुलं या बाबतीत ९९.९९% बुध्दु असतो.
मी तीच्या तोंडि एक ओळ दिलीये "माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि." या एका वाक्यावर माझ्या ३-४ मैत्रिणींनी या आधीहि माझा बराच जीव खाल्ला आहे. अनेक शिव्या ऐकवल्या होत्या, वरुन मलाच विचारतात "स्वानुभाव आहे का?" मी "नाहि "म्हणालो तर त्यांची रीऍक्शन - "हुश्श!!!!नशिब!" अशी होती. (पण का ते मला कळलच नाहि.)
27 Aug 2008 - 6:19 pm | सौरभ वैशंपायन
धन्यवाद!
पावसाची परी,
हा हा मलाहि तेव्हाच वाटलं त्याचहि उत्तर असाव म्हणुन पण खर सांगु का? मला तेव्हा काहि सुचलं नाहि, आणि सध्या माझ्या परीक्षेच्या कारणाने सुचेस वाटतहि नाहिये. तरी पुढील ४-६ महिन्यात त्याच तीला दिलेलं उत्तर सुचेल अशी अपेक्षा करायला काहि हरकत नाहिये. विचार करायला "टोच्या" दिलात म्हणुन धन्यवाद.
5 Sep 2008 - 11:50 am | झकासराव
छान आहे पत्रा पत्री :)
आधी ब्लॉगवर वाचली होती तुझ्या (एकेरी चालेल ना??)
शिवाय ब्लॉगवर ते वाघांची मोजणी करायला गेला होतात त्यातील पहिला लेख वाचला होता.
तु मिसळपाव वर आल्यामुळे खरच बर वाटल :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao