'कट्टा... On The Rocks': संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध

रमताराम's picture
रमताराम in जनातलं, मनातलं
23 Dec 2012 - 11:38 am

'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा. त्यात मग एखाद्या उदयोन्मुख कवीच्या कवितांबद्दल चर्चा होईल, क्वचित 'या वेळी पुरुषोत्तमला कोणतं नाटक घ्यायचं' याच्यावर उहापोह होईल पण बहुतेक वेळ निव्वळ टैमपास. तेव्हा 'कट्टा ऑन द रॉक्स' असे शीर्षक घेऊन आलेला हा कार्यक्रम अशाच साध्यासरळ उद्देशाने आला असेल असा माझा समज झाला. कट्टा जमवण्याचे वय केव्हाच मागे सरलेल्या माझ्यासारख्याला नावावरूनच निव्वळ तरुणाईसाठी आहे असे भासवणार्‍या या कार्यक्रमाबाबत उत्सुकता असण्याचे काही कारण नव्हते. (शिंग मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करणारे, वयाला न शोभणारे भडक रंगाचे वा एखादे शृंगारसूचक वाक्य असलेले टी शर्ट घालून, त्यातून डोकावणार्‍या गरगरीत सुखवस्तू, मध्यमवयीन पोटाला झाकू न शकणार्‍यांची गोष्ट वेगळी.) त्यामुळे आमचा तरुण मित्र अक्षय याने तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या असे आवर्जून आमंत्रण दिले तेव्हा केवळ त्याच्या विनंतीला मान द्यावा या एकाच हेतूने या कार्यक्रमाला जायचे ठरवले. म्हटलं पहिला भाग बसू या नि मग जाऊ या. तरुण मंडळींचे भावविश्व नि आपले भावविश्व सर्वस्वी वेगळे. त्यांची कविता अजून शृंगार, विरह, पाऊस वगैरे मध्ये रमणारी, क्वचित एखादा आधुनिक कवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे करियर, महाविद्यालयातील जग वगैरे बाबीही त्यात घेऊन येतो. पण आपण आता 'म्हागाई काय वाढल्ये नाय. पेट्रोलने सत्तर रुपयांचा टप्पा पार केलाय.' च्या पंथात केव्हाच सामील झालेलो. तेव्हा आपण काही इथे फार वेळ रमणार नाही याची खूणगाठ आधीच बांधून ठेवलेली. पण या तरुण मंडळींनी आमचा बेत साफ उधळून लावला." चावून चावून चोथा भांडणं आज एकदाची मिटवीन म्हणतो, जुनी मैत्री नव्या जोशात पुन्हा नव्याने करीन म्हणतो.." असं सांगत अनेक उत्तमोत्तम कविता, प्रकटन एका मागोमाग एक सादर होऊ लागले. अधेमधे कवितेला सादरीकरणाची, नृत्याचीही जोड दिली गेली. पाहता पाहता कार्यक्रम रंगत केला नि आमचा बेत केव्हाच विसरला गेला.

मुख्य सादरीकरण केले ते निरंजन परांडकर, अक्षरा राऊत आणि अमित सावरगावकर ऊर्फ सावर्‍या या तिघांनी. बहुतेक सार्‍या कविता त्यांच्या स्वतःच्या वा मित्रमंडळींच्या. सामान्यपणे आंतरजालावर वा अन्यत्र वाचलेल्या, ऐकलेल्या कवितांमुळे अर्वाचीन कवींची आम्ही धास्तीच घेतलेली. प्रेम, विरह, झाडे, रात्र, पाऊस किंवा बंडखोरी वगैरेचा उसना आव वगैरे प्रकारच्या शाळकरी कवितांनी या लोकांनी आम्हाला अगदी हैराण करून सोडले असताना या मंडळींनी सादर केलेल्या कवितांनी आम्हाला अगदी सुखद असा धक्का दिला. कविता ही प्रथम अनुभूती असावी लागते, शब्दांच्या आगगाड्या वा फुलबाज्या नव्हेत हे महत्त्वाचे सत्य ही मंडळी विसरलेली नाहीत. शब्दांचे मळे पिकवत कवितेची शेती करण्याचा अगोचरपणा यांनी केलेला नाही. कवितेचे विषय आपापल्या परिसरविश्वाचा, अनुभवविश्वाचा नि विचारविश्वाचा भाग असतात तेव्हाच अस्सल कविता जन्म घेते हे पुन्हा एकदा दिसून आले.

या कविता कोणाच्या आहेत? ज्यांचे बाल्य एका व्यवस्थेमध्ये गेले, तर शिक्षण उच्चशिक्षण, रोजगार हे टप्पे पार करेतो एका वेगळ्याच व्यवस्थेने त्यांच्या आयुष्याचा ताबा घेतलाय अशा पिढीचे आत्मकथन. यातले बहुतेक सारे एंजिनियरिंग, संगणक-शास्त्र, व्यवस्थापन-शास्त्र यासारख्या 'मॉडर्न' विषयांचे शिक्षण/प्रशिक्षण घेऊन आजच्या नागरी तरुणांचे 'फायनल डेस्टिनेशन' समजल्या जाणार्‍या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे. त्याअर्थी ते सार्‍या समाजाचे काय, सार्‍या नागरी समाजाचेही प्रातिनिधित्व करीत नाहीत. तेव्हा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या संपूर्ण पिढीचा प्रातिनिधिक मानता येणार नाही, परंतु आज हा दृष्टीकोनही या पिढीमध्ये कुठेतरी नक्की अस्तित्वात आहे, अगदी आमच्या मागची पिढी समजते तशी ही सगळी 'चंगळवादी' मुलांची खोगीरभरती नाही ही आश्वासक जाणीव नक्कीच सुखावणारी ठरावी. ही माझ्या मागची पिढी, त्यांच्याच 'जगण्याचा वेग वाढलेल्या या जगात आता दर तीन वर्षांत पिढी बदलते' या दाव्याला अनुसरून म्हणायचे तर बरीच पुढची पिढी. आमच्या पिढीने उच्चशिक्षण, परदेशप्रवासाचे नवल केलेले. या पिढीमधे पदवी हातात पडल्यावर दोन वर्षात परदेशवारी झाली नाही तर फाउल धरले जाते. आमच्या पिढीत आजूबाजूला एखादाच वीर पुण्यातील एकमेव एंजिनियरिंग कॉलेजला अ‍ॅड्मिशन मिळवू शके, तेव्हा तोच एक पर्याय उपलब्ध होता. आज संख्येने पन्नासच्या आतबाहेर असलेल्या एंजिनियरिंग कॉलेजेस उपलब्ध असलेल्या या पिढीत दहातले सात लोक एंजिनियरची पदवी मिरवणारे. एकेकाळी इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलाला/मुलीला शिक्षण देणे ही फॅशन होती, आज अपरिहार्यता झाली आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाणे प्रचंड कष्टाचे असत हेच खरे. मागच्या पिढीचा प्रवाह वेगळा या पिढीचा वेगळा, प्रवाहपतितत्व तेच. पण ही मंडळी या प्रवाहाला सामोरे जाताना त्याचे आंधळे समर्थन करीत नाहीत, अतिशय डोळसपणे आपल्या भवतालाचा, परिस्थितीचा धांडोळा ते घेताहेत.

काटकसरीच्या आयुष्याकडून आर्थिक समृद्धीकडे जाताना काय कमावलं काय गमावलं याचं भान असलेल्या व्यक्तींचे हे सादरीकरण आहे. कधीकाळी आपल्या लहानपणी साधे होटेलमधे जाण्याचे वायद्यामागून वायदे करणारे नि मोडणारे आपले वडील, दहावी पास झाल्यावरच भेट मिळणारे घड्याळ वगैरे मागे पडून आज मुलगा दहा-एक वर्षांचा असतानाच स्वतंत्र संगणक देण्याचे कौतुक दाखवणारे पण त्याच्यासाठी वेळ न देऊ शकणारे मम्मी-डॅडी, पुरेसे सहजीवन न लाभल्याने विरलेले त्यांचे भावबंध या सार्‍या अनुषंगांनाही न चुकता उचलत जाणारे हे तरुण एक आश्वासक वैचारिक जागरूकता दाखवून जातात.

गावापुरतं असलेल्या आयुष्याच्या सीमारेषा विस्तारत त्या विरून जाताना पाहिलेली ही पिढी. ’वापरा आणि फेकून द्या' ची नवी संस्कृती अंगीकृत करत असताना आपण कोणाचे रोजगार हिरावून घेत आहोत, नष्ट करत आहोत याचीही बूज राखणारी ही त्या पिढीतील काही सुज्ञ मंडळी. बहुतेक सारे नव्या स्वप्नांचा मागोवा घेत गावाकडून शहरांकडे, छोट्या शहरांकडून पुण्या-मुंबईसारख्या महानगरांकडे धावत असतानाही मागे जे सोडून आलो त्याचे भान राखणारी ही मंडळी आहेत. स्मरणरंजनाचे उसने कढ काढण्याऐवजी जे गमावलं त्यांच्याबद्दल मनापासून हळहळ बाळगणारी आहेत. त्यांची हळहळ, खंत द ग्रेट अमेरिकन ड्रीम जोपासणार्‍यांच्या +१ सिंड्रोमसारखी कपाटात जपलेल्या स्वप्नांच्या अडगळीसारखी होऊ नये हीच सदिच्छा यांना देऊ इच्छितो.

ज्ञानाची क्षितीजे विस्तारताना कदाचित टोकाचा दैववाद स्वीकारलेल्या मागल्या पिढीप्रमाणे देवाला जोजवणारी नाही, की आपल्या कमकुवतपणा झाकण्यासाठी खोट्या विद्रोहाच्या गर्जना करत धिक्कारणारी नाही. पण ही पिढी त्या देवाला त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या काही नव्या प्रश्नांना सामोरे जाण्यास भाग पाडणारी आहे. आज बदलत्या काळात, बदलत्या व्यवस्थेमधे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाबाबत, स्थानाबाबत अनेक प्रश्न पडतात तसेच या नव्या व्यवस्थेमध्ये जुन्या व्यवस्थेचा सर्वोच्च अधिकारी असलेला देव, त्याचे स्थान काय अशा एका धाडसी प्रश्नाचे उत्तरही ते शोधू पाहतात.

विलक्षण सफाईने केलेले सादरीकरण, रंगमंचावरील वावरातली सहजता, कविता उच्चारताना उच्चारांमधला केवळ सुस्पष्टपणाच नव्हे तर आवाजातील चढ-उताराचा नेमकेपणा ही या कार्यक्रमाची बलस्थाने मानता येतील. संपूर्ण हौशी कलाकारांच्या गटाने सादर केलेला असल्याने फारशी अचूकता अपेक्षित नसूनही व्यावसायिक सादरीकरणाच्या तोडीस तोड असे सादरीकरण, त्यामुळे ठीकठाक असलेले नृत्यदिग्दर्शनही उगाचच मिठाचा खडा पडल्याचे भासणारे.

कविता सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत त्यात उमजून कविता सादर करणे, प्रेक्षकांपर्यंत नेमका अर्थ पोचवणे ही अंगभूत कला अतिशय दुर्मिळ. आज अशी कला मोजक्याच लोकांकडे असलेली मी पाहिली आहे. यात अरुणाताई ढेरे, चंद्रकांत काळे, किशोर कदम ऊर्फ सौमित्र आणि नव्या पिढीचा लाडका संदीप खरे या लोकांचे वारसदार आज मी निरंजन आणि 'सावर्‍या'च्या च्या रुपात रंगमंचावर पाहिले असे मी खात्रीने म्हणू शकतो. अर्थात मुळातच घटत्या मागणीची ही कला वश असलेल्या या मंडळींच्या बाबतीत ती नव्या जगाच्या धबडग्यात, त्या संघर्षातच सुख मानणार्‍या मेंढराच्या कळपाबरोबर धावताना हरवून जाईल का अशी एक भीती माझ्या मनात घर करून बसली आहे.

काही का असेना, माझ्यासारख्या स्तुतीकंजूष माणसाकडून, माझ्या टीकेचे मुख्य लक्ष्य असलेल्या काव्यक्षेत्रातच या मंडळीनी माझ्याकडून दाद मिळवली यासाठी तरी त्यांना दाद द्यायलाच हवी.

'कट्टा... On The Rocks' चे फेसबुक पानः https://www.facebook.com/events/543186905697682/

ता.क.: मी स्वतः कार्यक्रम सादर करणार्‍या ग्रुपशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. केवळ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्याचा आस्वाद म्हणून, दाद म्हणून हा लेख लिहिला आहे. वैयक्तिक वा अप्रत्यक्ष फायद्याच्या हेतूने केलेली जाहिरात नाही.

कलानाट्यप्रतिसादआस्वादशिफारस

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Dec 2012 - 9:49 pm | पैसा

चांगला कार्यक्रम दिसतोय. पण ते पुण्याबाहेर कार्यक्रम करतात का?

रमताराम's picture

23 Dec 2012 - 10:53 pm | रमताराम

नेमके ठाऊक नाही. विचारून सांगतो. परंतु याच टीमचा एक सदस्य जो आता कामानिमित्त अमेरिकेत आहे तो तिकडे वेगळ्या संचात हाच कार्यक्रम सादर करतो. बे एरियात झालेया जागतिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त वा त्याच्या अलिकडे पलिकडे याचा एक प्रयोग त्यांनी तिकडे केला होता असे कळते.

सारेच हौशी असल्याने नि बहुतेक सारे आयटीच्या धावपळीच्या जगातले असल्याने फार वारंवार प्रयोग होत नाहीत. नेमक्या याच कारणासाठी याची ध्वनिमुद्रिका काढावी - निदान खासगी वितरणासाठी तरी - अशी सूचना मी संयोजकांपर्यंत पोचवली आहे. बघू या ते काय ठरवतात ते.

आता कामानिमित्त अमेरिकेत आहे >>>
बे एरियात झालेया जागतिक मराठी साहित्य संमेलनानिमित्त >>>
बहुतेक सारे आयटीच्या धावपळीच्या जगातले असल्याने >>>

हे फार महत्त्वाचे नाही का? सांगितल्याशिवाय पुढे काही सांगता आले नसते. ;)

कवितानागेश's picture

23 Dec 2012 - 10:26 pm | कवितानागेश

एकदा बघायला हवा... :)

अर्धवटराव's picture

25 Dec 2012 - 12:35 am | अर्धवटराव

>>आजचा सुविचारः जो बोलतो तोच असतो!
-- उदात्ततेच्य परिसीमा गाठलेला सुविचार. शेवटची वाकुल्या दाखवणारी स्माईली तर चिमुकल्या गोपालकृष्णाप्रमाणे निमीषार्धात ब्रह्मांड दाखौन गेली.

अर्धवटराव

कार्यक्रमाची ओळख आवडली.

अमितसावरगांवकर's picture

27 Dec 2012 - 12:58 pm | अमितसावरगांवकर

प्रिय मंदार काळे,
तुमचा लेख वाचला. पहिली आणि अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया होती ती म्हणजे – वाचून एकदम भरून आलं. कारण आमचा कार्यक्रम लोकांना आवडतो किंवा थोडासा का होईना भावतो हे नक्कीच जाणवले. कारण तसंही जोवर माणूस “मोठा” होत नाही तोवर कोणीच त्याची (चांगली असो अथवा वाईट) कोणीच दखल घेत नाही. तशी आमची सुद्धा आत्तापर्यंत कोणीच घेतली नाहीये पण तुम्ही आपणहून इतकं भरभरून लिहीलत त्याबद्दल आभार.
त्यातून तुमच्यासारखे अत्यंत संयतपणे आपले विचार मांडणारे लोकं आज अभावानेच आढळतात. खरं सांगायचं तर आम्ही खरंच कवी नाही (ते तर कविता ऐकून लगेचच लक्षात आले असेल तुमच्या) पण आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आम्ही थोडेसे जागरूक नक्कीच आहोत.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कट्टा ही फक्त टाईमपास करण्याची जागा नसून अनेक चांगले विचार मुक्तपणे एकमेकांशी बोलण्याची सुद्धा जागा आहे ह्याची सुद्धा लोकांना जाणीव करून द्यायची होती. जे वाटतं आणि जसं वाटतं तसाच्या तसं ते लोकांपर्यंत पोचवायचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
कदाचित तुम्ही म्हणालात तशी ही “घटत्या मागणीची” कला आहे आणि ती सर्व “मेंढरांनी” सुद्धा आवर्जून पहावी यासाठीच आम्ही “काव्यवाचन” ह्या पारंपारिक पद्धतीपेक्षा त्याचा नाटकासारखा प्रयोग केला आहे. प्रत्येक प्रयोगाला नवनवीन गोष्टी करायची यांत पूर्ण मुभा आहे, याची सुद्धा आम्हाला पुरेपूर जाणीव आहे.
आणि हो! तुमच्यासारखे सुजाण आणि समजूतदार प्रेक्षक असतील तर आम्ही कार्यक्रमांची संख्या नक्कीच वाढवू. पुढच्या कट्ट्यावर भेटूच... पुन्हा एकदा..

स्पंदना's picture

31 Dec 2012 - 5:11 pm | स्पंदना

धन्स ररा. एका फार छान कार्यक्रमाची ओळख करुन दिलीत. अन वरील अमित सारगावकर यांचा प्रतिसादही आवडला.

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 5:02 pm | ऋषिकेश

अरे वा! बघितला पाहिजे.
'कधितरी वेड्यागत' मध्ये विभावरी देशपांडे यांचा 'राधे तुझा रंग गोरा' मध्य लागलेला आवाज जसा फाइंड होता तसे काहितरी गवसेलसे दिसते.

नक्की बघेन.. इथे माहिती दिल्याबद्दल आभार!

शुचि's picture

3 Jan 2013 - 4:38 am | शुचि

ओळख फार आवडली.