मी बाई होते म्हणुनी....
मी, बाई होते म्हणुनी. म्हणुन लग्न झाल्यावर नव-याच्या घरी यावं लागलं, पुरुष असते तर मला घर नसतं बदलायला लागलं. कसली मज्जा लग्नात, किती लोकं, किती माणसं, मित्र, शत्रु, जवळ्चे,लांबचे सगळे आले होते. आई बाबा किती आनंदात होते. तशी कधी बाबांनी किंवा आईनी आमच्या, म्हणजे आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजि केल्याचं आठवत नाही मला. एकत्र कुटुंब आमचं. माझे आईबाबा, मोठे काका काकु, त्यांची मुलगी, सगळं किती मस्त होतं. सगळ्याजणी एकत्र राहायचो, एकच मोठं घर होतं आमचं. घर कसलं राजवाडाच होता तो. पण घर म्हणलं की जीवाच्या जवळचं वाटतं.
आम्ही सगळ्या जवळपास एकाच वयाच्या, एक दोन वर्षांचा फरक असेल . घरात खाण्यापिण्याची ददात नव्हती पण शिस्त देखील तेवढीच, तसं आमचं घर जुन्या वळणाचं, संस्कारांचं होतं. सकाळी लवकर उठणं, आवरणं, मग देवघरात जाउन बसणं, कधी मोठे काका तर कधी बाबा पुजा करत असायचे. म्हणजे ब्राम्हण असायचे पुजा सांगायला, ते सांगतील तसं काका,बाबा करायचे, मध्ये मध्ये ते मंत्र म्हणायचे. आम्ही परकर पोलक्यात गप्प मागं बसुन राहायचो, समोरच्या प्रतिमेच्या गळ्यातले हार, पायातले पैंजण बघत. त्यांना म्हणे पैंजण म्हणायचं नाही असं आई सांगायची, ते तोडे आहेत. पायात म्हणजे पैंजण आणि हातात म्हणजे कंगन एवढंच कळायचं वय होतं आमचं. देवाच्या घरात, आम्हाला सगळीकडं फिरता यायचं नाही. तिथं सगळ्यात पुढं ब्राम्हण मग पाठमोरे बाबा किंवा काका आणि त्यामागं थोडं अंतर सोडुन आम्ही असायचो.
मध्ये मध्ये आई नाहीतर काकु यायच्या, देवाच्या जेवणाचं घेउन, त्याला म्हणे नैवेद्य म्हणायचं पण असायचं काय त्या ताटात, छे काय नसायचं ते विचारा, पार ताज्या ताज्या फळांपासुन गरम गरम पु-या अन दाट खीर असायची. त्या खिरीवरच्या तुपाचा असा मस्त वास यायचा की कधी एकदा पुजा संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो असं व्हायचं. देवघराच्या आत उजव्या बाजुला एक दरवाजा होता, त्याला मात्र नेहमी कुलुप असायचं. त्या दरवाज्यावर एक मोठी प्रतिमा होती, जिची पुजा केली जायची दररोज त्या लालभडक कुंकुवानं अन लालभडक फुलांनीच. पण दरवाजा उघडलेला आम्ही ती कधीच पाहिला नव्हता. मला तर त्या प्रतिमेतल्या साधु बाबाचीच भीती वाटायची, म्हणुन मी कधी कुणाला विचारलं देखील नव्हतं त्या दरवाज्याबद्दल. पण एके दिवशी मात्र, आम्ही नेहमीप्रमाणे पुजा झाल्यावर नमस्कार केला आणि बाहेर निघणार प्रसाद घेउन तेवढ्यात काकांच्या मुलीनं विचारलं ' बाबा, त्या खोलीत काय आहे ? अजुन मोठे देव आहेत का आत ? तुम्ही पाहिलेत का ते ? ' आणि क्षणांत तिथले सगळेच जण स्तब्ध झाले. काका, पुजा सांगायला आलेले ब्राम्हण, काकु, माझी आई सगळेच जण, आम्ही तर हातातला प्रसाद खायचं देखील विसरलो. काही वेळाच्या शांततेनंतर काकांचा आवाज आला ' बाळा, आपण ती खोली वर्षातुन एकदाच उघडतो, आतले देव ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, त्या दिवशीच. आणि या एक दोन वर्षात वर्षी तुम्हाला कळेलच आत काय आहे ते, या गोष्टी समजण्याएवढं मोठ्या व्हालच तुम्ही तोपर्यंत, ठीक. चला पळा आता, गुरुजी येतील ना शिकवणीला, पळा.'
काका एवढ्या सहजी ती खोली उघडुन दाखवायचं म्हणतील असं मला तरी वाटलं नव्हतं, पण ताईचा, म्हणजे काकांच्या मुलीचा चेहरा एकदम आनंदला होता, ती चालताना देखील उड्याच मारत होती. माझ्या मनात मात्र उत्सुकतेपेक्षा भीती जास्त होती त्या खोलीत काय असेल याची. एवढे दिवस त्या साधुबाबाची भीती आणि आता आत काय असेल याची भीती याचा अजुन जास्त गोंधळ माझ्या मनात व्हायला लागला. मी त्यादिवशी रात्री आईला विचारलं देखील, पण तिनं नुसतीच उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणे आमचं वय नाही अजुन, लहान आहोत असलंच काही. मला काही समाधान वाटलं नाही पण आईनं तिच्या कुशीत ओढलं तेंव्हा ती रडेल असं वाटत होतं, म्हणुन मी पण फार काही न विचारता झोपुन गेले. मला नाही आवडायचं आईनं रडलेलं. कारण तिला पण नाही आवडायचं मी रडलेलं. बाबा किंवा काका जरी रागावले तरी आई आणि काकु किती समजुन घ्यायच्या. पण कधीतरी आई सुद्धा रागावायची मग मात्र मी काकुमागं जाउन लपायची. आणि आईला पण हे माहित होतं, ती यायचीच नाही काकुच्या खोलीत. मग काकु बोलता बोलता काय झालं ते माझ्याकडुन काढुन घ्यायची, आणि मग माझी समजुन काढुन परत पाठवायची आईकडं. खरंच किती मजा यायची त्या वेळी.
मला वाटतं बहुधा दोन वर्षे गेली, आणि आमचं बालपण संपलं आम्ही मोठ्या झालो. निसर्गाचा जादुचा पिसारा उमलायला सुरुवात झाली होती. आमची खेळ्णी बदलली, खेळ बदलले, हल्ली घरात बसुन रहायला आवडेनासं झालं, बाहेर बागेत फिरावं,लांब कुठंतरी फिरुन यावं असं वाटायला लागलं. आणि एवढी वर्षे हे करत नाही म्हणुन ओरडणा-या आई आणि काकु आता हेच करु नका म्हणुन रागावायाला लागल्या. आम्हा चौघींचे बोलायचे बिषय बदलले, या घरापलीकडच्या जगाची स्वप्नं हळुहळु आकार घेत होती. एवढी वर्षे आम्ही सगळ्या मैत्रिणींच्या घरी जायचो खेळायला आता त्यावर पुर्ण बंदी आली, त्याच आमच्या घरी यायच्या. तेंव्हा देखील गप्पाच जास्त व्हायच्या. आणि खरंतर अशा गप्पांना जास्त वेळ मिळायाचाचं नाही. सकाळी उठुन आवरलं की आई आणि काकुला मदत करायला स्वयंपाकघरात जावं लागायचं, अजुन पदार्थ शिजवणं आम्हाला करावं लागत नव्हतं पण सगळी छोटी छोटी कामं आम्हाला करायला लागायची,तसं तर हे सगळं करायला नोकर चाकर होते, पण ' या वयात सगळं यायला हवं' या एका सुचनेखाली सगळं करावं लागायचं. तिथं देखील आम्ही चौघी नेहमी हसत खिदळतच असायचो, आमच्या गप्पा ऐकुन बरोबर काम करणा-या बायका देखील हसायच्या, मग आई नाहीतर काकु ओरडायच्या. लहानपणी त्या ओरडण्याची भीती वाटायची, हल्ली गंमत वाटायची. मुद्दाम असं काहितरी करावं वाटायचं ज्यामुळं त्या रागावतील.
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
क्रमश:
प्रतिक्रिया
5 Dec 2012 - 10:30 pm | मालोजीराव
लेख नंतर वाचतो आधी पयल्या रांगेत जागा पकडून ठेवतो !
5 Dec 2012 - 10:38 pm | जानु
सुरवात तर उत्तमच आहे. वाचुयात.....
5 Dec 2012 - 10:41 pm | चित्रगुप्त
या कथेतून फार पूर्वी अनुभवलेला काळ पुन्हा एकदा उलगडतो आहे...
बंद खोलीचे रहस्य जाणण्यास उत्सुक.
6 Dec 2012 - 10:06 am | सूड
डावीकडलं चित्र तुम्ही काढलंय का ?
6 Dec 2012 - 10:04 pm | इनिगोय
ते चित्र नाहीय, रीटच केलेलं प्रकाशचित्र असावं असं वाटतंय.
5 Dec 2012 - 10:48 pm | पैसा
पुढे काय?
5 Dec 2012 - 10:49 pm | ठक
उत्तम सुरवात
पुढचा भाग लवकर भाग लवकर येउ द्यात.
5 Dec 2012 - 11:16 pm | गणपा
वाचतोय.....
6 Dec 2012 - 12:09 am | सुहास झेले
मस्त सुरुवात... पुढे?
6 Dec 2012 - 12:24 am | बॅटमॅन
पन्नासरावांच्या कल्पकतेला आणि कथाकौशल्याला शंभरपैकी शंभर मार्क!!!!!!! उत्कंठा पूर्ण वाढेश :)
6 Dec 2012 - 12:33 am | रेवती
यानंतरचे लेखन मात्र लगेच टाका. बंद दारामागे काय ते जाणून घेईपर्यंत काही स्वस्थता नाही.
आताचे लेखन भारी झाले आहे. मागच्या लेखमालिकेसारखी ही मालिका लांबवू नका प्लीज.
6 Dec 2012 - 4:36 am | स्पंदना
पुढं! पुढं काय झाल?
6 Dec 2012 - 8:40 am | अन्या दातार
हर्षद जेव्हा मालिकेची पटकथा लिहायला घेईल तो सुदिन!
6 Dec 2012 - 9:34 am | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम मालिका होईल.
जणू काही आपणही त्या घराचे एक भाग आहोत असे वाटायला लावणारी ५० रावांची एकदम जीवंत वर्णनशैली.
6 Dec 2012 - 9:38 am | किसन शिंदे
अग्निहोत्रची आठवण झाली.
6 Dec 2012 - 10:05 am | सूड
वाचतोय.
6 Dec 2012 - 10:17 am | अनुराग
वाचतोय.....
6 Dec 2012 - 10:53 am | स्पा
सुरुवात तरी भारीच झालीये
वाचतोय
आंदो
6 Dec 2012 - 10:55 am | स्पा
भाग जरा मोठे टाका हो
6 Dec 2012 - 12:16 pm | सस्नेह
रहस्यकथा आहे की कौटुंबिक कथा, काही ठाव लागेना.
पण छान आहे ! विन्ट्रेष्टिंग .
6 Dec 2012 - 1:54 pm | सुधीर मुतालीक
एग्दम गजगा लिव्लंय. आता धीर धरवनां. वैनी लवकर वाडा !!
6 Dec 2012 - 2:11 pm | सुधीर मुतालीक
" वैनी " अशी हाक मारून अज्ञाताला सिग्नल देण्याची आमची एक विचित्र स्टाइल शाळेत आमच्या ग्रुपची होती. त्याची सहज आठवण झाली, प्रतिक्रीया देताना. ( बाकी विशेष काई नै )
6 Dec 2012 - 2:18 pm | मालोजीराव
खोली उघडायची वाट पाहत आहे !
6 Dec 2012 - 2:50 pm | प्यारे१
क र्र र्र र्र र्र र्र...
असाच आवाज येईल ना खोलीचे दार उघडताना!
लौकर उघडा!
6 Dec 2012 - 3:37 pm | सन्दीप
सुरुवात तर भारीच झालीये
6 Dec 2012 - 3:52 pm | इष्टुर फाकडा
सुंदर वातावरण निर्मिती ! दिल खुश हो गया :) पुभाप्र !
6 Dec 2012 - 4:01 pm | अत्रन्गि पाउस
"क्रमशः " वर काय्द्यने बन्दि घालाविशि वाट्ण्या इत्का सुन्द्र्र लेख...
येवु द्या!!
6 Dec 2012 - 4:12 pm | नगरीनिरंजन
वातावरण निर्मिती चांगली जमली आहे आणि उत्सुकता वाढली आहे. पुढील भागांची वाट पाहत आहे.
परंतु, निवेदिकेने एकाच घरात राहणार्या आपल्या चुलत बहिणिचे नाव न घेता 'काकांची मुलगी म्हणाली' असे म्हणणे वगैरे गोष्टी थोड्या खटकल्या.
6 Dec 2012 - 5:32 pm | स्वाती दिनेश
You are hereस्वगृह » मी बाई होते म्हणुनी.... भाग ०१ » प्रतिसाद द्या
प्रतिसाद द्या
वातावरण निर्मिती चांगली जमली आहे आणि उत्सुकता वाढली आहे. पुढील भागांची वाट पाहत आहे.
परंतु, निवेदिकेने एकाच घरात राहणार्या आपल्या चुलत बहिणिचे नाव न घेता 'काकांची मुलगी म्हणाली' असे म्हणणे वगैरे गोष्टी थोड्या खटकल्या.
असेच म्हणायचे आहे,
स्वाती
6 Dec 2012 - 5:13 pm | मनराव
सुरुवात तर झक्कास.....
पुलेशु.....
6 Dec 2012 - 5:44 pm | हर्शयोग
उत्तम सुरवात
बंद खोलीचे रहस्य जाणण्यास उत्सुक
6 Dec 2012 - 6:31 pm | अनन्न्या
आता सतत मिपाच्या संपर्कात राहणे आले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
6 Dec 2012 - 6:44 pm | रणजित चितळे
वाचतो आहे. खोलीचे रहस्य उलगडेलच पण त्यावेळचे वर्णन भावणारे आहे. एके ठिकाणी जरा टायपो झालाय तो संपादन करा. विषय लिहायच्या ऐवजी बिषय झाला आहे.
6 Dec 2012 - 6:47 pm | मी-सौरभ
पु.भा.प्र.
6 Dec 2012 - 7:00 pm | लीलाधर
चला पयली ईनिंगचे पावशतक झालेय अता शतका पर्यंत लांबवणार हात काय ? पुढची ईनिंग कधी ?
6 Dec 2012 - 7:02 pm | निनाद मुक्काम प...
@आपल्या चुलत बहिणिचे नाव न घेता 'काकांची मुलगी म्हणाली' असे म्हणणे वगैरे गोष्टी थोड्या खटकल्या.
उस मे भी कूच राझ होगा.
कथेच्या पुढे ओघात घरातील नातेसंबंध व त्या बंद खोलीशी असलेले गूढ व त्याच्याशी जोडल्या गेलेले घरातील प्रत्येक जण
एक सूचना वजा सल्ला आहे की किमान ३ भागांचे लेखन पूर्ण झाले की दुसरा भाग टाका म्हणजे पुढचा भाग आधीच तयार असल्याने नियमित अंतराने टाकता येईल.
6 Dec 2012 - 7:32 pm | सोत्रि
निनादशी सहमत!
पुढचे प्रतिसाद कथा संपूर्ण वाचून झाल्यावरच.
-(क्रमशः न आवडणारा) सोकाजी
6 Dec 2012 - 9:35 pm | Mrunalini
खुपच मस्त... पुढच्या भागाची वाट बघतोय.
6 Dec 2012 - 9:43 pm | सानिकास्वप्निल
उत्सुक्ता वाढलीये
वाचत आहे :)
18 Dec 2012 - 12:03 am | ५० फक्त
विलंबाबद्दल क्षमस्व, काही तांत्रिक कारणांमुळं विलंब झाला. पुढचा भाग सादर केला आहे...http://www.misalpav.com/node/23439