मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
भाग - ०३
तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........
पुढं....
माझ्या हातातुन रक्त वाहणं थांबतच नव्हतं, मी.आई आणि धाकट्या बहिणींबरोबर त्या खोलीबाहेर पडले, बाहेर सगळेच उत्सुक होते आत काय आहे आणि काय चाललं आहे ते पहायला, समजुन घ्यायला. त्याचवेळी आम्हा चौघींचं असं बाहेर पडण्यानं थोडा गोंधळ झाला. थोड्याच वेळात वैद्य औषधी लेप घेउन आले, तोपर्यंत आईनं हात धुतला होता, तो लेप हातावर लावल्यावर चंदनाचा स्पर्श एकदम थंड वाटला,मात्र थोडया वेळानं जसजसं त्या लेपामधलंते औषध जखमेपर्यंत पोहोचायला लागलं आग आग व्हायला सुरुवात झाली. आईच्या मांडीवर डोकं ठेवुन मी झोपले होते ती बराच वेळ. जाग आली तेंव्हा दिवस मावळलेला होता, खोलीत समया लावलेल्या होत्या त्यांच्या शांत उजेडानं जरा बरं वाटलं. आईला देखील झोप लागली होती. माझ्या हालचालीनं ती उठली, मग उठुन दोघींनी आवरलं. हातावरचा लेप वाळुन निघुन गेला होता. पलंगाच्या बाजुला त्याच्या खपल्या पडल्या होत्या, एका सखीनं येउन सगळं साफ केलं.
मला काकांना आणि बाबांना भेटायचं होतं, तसं मी आईला सांगितल्यावर तिनं कुणाला तरी तिकडं पाठवलं. दोघंही काही कामात होते, तोपर्यंत काकुकडं गेले. ती आणि ताई दोघी बाहेर बागेत फिरत होत्या. मला बघताच ताई पळत आली आणि माझा हात हातात घेतला, तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातनं दोन आसवं गळाली माझ्या हातावर आणि पुन्हा तेच झालं, आधी शीतलता आणि नंतर जळणं. मला वाटलं होतं, ताई तिच्या चुकीबद्दल काहीतरी बोलेल पण तसं काहीच झालं नाही, पण त्या धनुष्याबद्दलच बोलत राहिली. पेटीबद्दल एक चकार शब्द नव्हता तिच्या बोलण्यात. ते धनुष्य म्हणे योगी परशुरामांनी काकांना दिलं होतं, आणि त्यांना ते प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दिलेलं होतं. खरं असावं असं मला तरी वाटलं नाही. खरं आश्चर्य या पुढंच होतं, ते धनुष्य आमच्या घरातल्या कुणीच आजपर्यंत वापरलेलं नव्हतं. काका एका विशिष्ट दिवशी त्याची पुजा करत तेवढंच. काही दिवसांपुर्वी एका ऋषींच्या करवी काही निरोप पोहोचला होता काकांकडे आणि त्यानुसार ही आजचा समारंभ साजरा झाला होता.
संध्याकाळचा शेवटचा प्रहर संपल्याचं नगा-यांच्या आवाजानं लक्षात आलं, आता आमच्या वाड्याचे सगळे दरवाजे बंद होणार,उदया सुर्योदयापर्यंत ते बंद्च राहणार. आजच्या समारंभाच्या नियमांनुसार बाबा आंणि काकांना सुर्यास्ताच्या आधीच भोजन करणं गरजेचं होतं, त्यासाठी काकु मगाशीच आत गेल्या होत्या. कारंज्याबाजुच्या पाय-यांवर बसुन मी आणि ताई त्या धनुष्याबद्दलच बोलत होतो. मला त्या ताईच्या पेटीबद्दल अजुन ऐकायचं होतं, पण ती अजिबात तो विषय काढु देत नव्हती. तिनंच सांगितलं की, आज काकांनी तिच्या स्वयंवराची घोषणा केली आहे, ' जो क्षत्रिय पुरुष, त्या धनुष्याच्या प्रत्यंचा चढवुन दाखवेल अशाशीच तिचं लग्न होणार होतं'. यापुर्वी लग्नाचा विषय निघाला की ताई थोडीशी गुपचुप असे, पण आज तिच्या चेह-यावर एक वेगळीच लकाकी होती, डोळ्यात एक वेगळाच भाव होता, थोडा आनंदाचा. ज्याच्याबद्दल मला असुया वाटायला लागली होती. आतुन आईची हाक आल्यावर आम्ही दोघी उठुन आत गेलो. माझ्या खोलीकडं जाताना बाबांच्या खोलीकडं माझी नजर गेली, तिथं सख्या आता समयांच्या वाती नीट करत होत्या, म्हणजे बाबा तिथं नव्हते. मला जे विचारायचं होतं ते आज राहुन जाणार होतं हे नक्की.
रात्री जेवताना थोडासा त्रास झाला हाताला, जेवण झाल्यावर पुन्हा आईनं हाताला लेप लावला, ती माझ्या खोलीतुन निघाली तशी मी तिला अडवलं, ' आई थोडा वेळ बस ना ?' मी तिला विचारलं. ती थांबली, मागं न वळता तिनं विचारलं ' मला उत्तरं देता येणार नाहीत असे प्रश्न विचारणार असशील तर मी थांबुन काय उपयोग?' तिला काहीतरी लपवायचं होतं असं वाटलं नाही, उलट ती मला मर्यादांच आणि त्या पाळण्याचं प्रात्याक्षिक देत होती. ' हो आहेत असे काही प्रश्न, पण त्यांची उत्तरे दिली नाहीस तरी चालेल मला' आई मागं वळली तेंव्हा तिच्या डोळ्यात पाणी असेल असं वाटलं, पण तसं नव्हतं. अजुन एक प्रात्यक्षिक, कसं जगायचं याबद्दल. मी पलंगावर एका बाजुला होउन बसले आणि आईला जागा करुन दिली. तिनं खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सखीला बोलावुन तिला विचारल्याशिवाय कुणालाही आत पाठवु नये असं सांगितलं. यावरुन मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहित तरी ते मला विचारता येतील याची खात्री आईनं दिली मला.
'आई, स्वयंवर म्हणजे, उपस्थित आणि योग्य अशा वरांपैकी आपल्याला आवडेल आणि योग्य वाटेल अशा एकाची निवड करणं, होय ना? ', ' होय, क्षत्रियकुळांमध्ये स्वयंवराचा हाच अर्थ असतो' - आईला या विषयावर प्रश्नाची अपेक्षा होतीच बहुदा, तिनं शांतपणं सांगितलं. ' मग ताईच्या स्वयंवरासाठी तो धनुष्याचा पण का?, तिला अशा वराची निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही ? स्वयंवराच्या दिवशी एखादा क्षत्रिय पुरुष जर ताईला योग्य वाटला, आवडला, पण त्याला त्या धनुष्याला प्रत्यंचा नाही चढवता आली तर ताईला त्याच्याशी लग्न नाही करता येणार, असंच ना ?'- माझा पुढचा प्रश्न तिच्या उत्तराची वाटच पाहात होता. थोडंसं थांबत आई सावरुन बसली, तिनं उत्तरं दिली नसती तरी मला चालणार होतं, म्हणुनच तिच्या उत्तराची अपेक्षा न करता मी पुढचा प्रश्न विचारला ' म्हणजे तो क्षत्रिय पुरुष त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकेल, पण तो ताईला योग्य वाटला नाही किंवा आवडला नाही तरी तिनं त्याच्याशीच लग्न करायचं का ? , का त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकणं ही या स्वयंवराची एक पुर्व पात्रता आहे, जर असे एकापेक्षा अनेक क्षत्रिय पुरुष असतील जे ही गोष्ट सिद्ध करु शकले तर त्या अनेकांपैकी एकाची निवड ताईला करता येईल.? का जो कोणी पहिला क्षत्रिय पुरुष हे सिद्ध करु शकला तर स्वयंवर तिथंच थांबेल. ?
माझं बोलणं थांबलेलं पाहुन, आई हसली. मला सतावणारे एवढे प्रश्न विचारत असताना आई एवढी शांत कशी राहु शकते याचं मला आश्चर्य वाटत होतं. पलंगाच्या मागच्या नक्षीकामाला रेलुन बसल्यानं आईचं उत्तरीय खाली ओघळलं होतं, ते हातानं सावरुन घेत तिनं बोलायला सुरुवात केली. ' हे पहा बाळा, तु मला चार प्रश्न विचारले, हो ना. त्या प्रत्येक प्रश्नात एक शब्द वारंवार येतो आहे, तो कोणता यावर जरा विचार कर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझी तुलाच मिळतील. मी काही न सांगता देखील.' एवढं बोलुन ती पलंगावरुन खाली उतरली, माझ्या मस्तकावरुन हात फिरवत म्हणाली ' बाळा, मला तुम्हा तिघींच्या भविष्याची काळजी वाटते, ज्यांचं आयुष्य जन्मापासुनच अविश्वासनिय आहे, असामान्य आहे त्यांच्याबद्दल आपण सामान्यांनी काय बोलावं, का विचार करुन आपली मति कुंठित करुन घ्यावी.?' झोप आता, तुझ्या जेवणामध्ये तुला गुंगी यावी असे काही पदार्थ मी मुद्दाम घातले होते, आणि हो हाताची जास्त हालचाल नको होउ देउ.' एवढं बोलुन तिनं पलंगाच्या बाजुच्या समईतल्या दोन वाती फुंकर मारुन शांत केल्या, अन ती बाहेर जायला निघाली.
माझ्याच प्रश्नातला एक शब्द, माझ्या भविष्याचीच काळजी, आम्हां तिघींचं सामान्य असणं, ताईचं असामान्यत्व या सर्वांनी माझ्या डोक्यात पुरता गोंधळ माजवला होता त्या चार क्षणांत. या सर्वात माझे प्रश्न कुठंतरी बाजुलाच पडले होते. मी फक्त घटनांच्या परिणामांचा, आणि त्यादेखील समोर घडणा-या आणि मला दिसणा-या परिणामांचा विचार करत होते, तर आई त्या घटनांच्या मागं घडलेल्या आणि घडवुन आणलेल्या कारणांबद्दल बोलत होती. आई खोलीतुन बाहेर पडणारच होती, तेवढ्यात या विचार चक्रातुन बाहेर येत मी तिला विचारलं, ' आई, मला काही समजलं नाही, तु काय समजावते आहेस ते, आणि ते समजल्याशिवाय मला झोप देखील येणार नाही, किमान तो शब्द कोणता ते तरी सांगुन जा'. दरवाज्याच्या चौकटीचा आधार घेत आई थांबली, एक पाय उंबरठ्यावर होता, तशीच मान मागं वळवुन माझ्याकडं पाहिलं, तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....
प्रतिक्रिया
15 Jan 2013 - 10:53 pm | रेवती
फारच इंटरेस्टींग होत चाललीये कथा.
15 Jan 2013 - 11:10 pm | पैसा
या पात्रांच्या मनात शिरायचा फार प्रयत्न कोणी केला नाही. सगळे रामायणातल्या आदर्शांबद्दल फक्त लिहितात. त्यातील इतर माणसांबद्दल त्यांच्या भावभावनांबद्दल लिखाण आवडले.
15 Jan 2013 - 11:12 pm | आनन्दिता
फार रोचक होत चाललय ...क्रमशः टंकायच राहीलय का?.
15 Jan 2013 - 11:17 pm | सूड
वाचतोय. हा ही भाग छानच !!
15 Jan 2013 - 11:23 pm | प्रचेतस
सुरेख लिखाण.
15 Jan 2013 - 11:26 pm | अभ्या..
सुरेखच लिहिले आहे ५०राव. आवडले आहे.
15 Jan 2013 - 11:46 pm | बॅटमॅन
मस्त!!!
16 Jan 2013 - 12:21 am | किसन शिंदे
सुरेख!!
खरंच क्रमशः राहिलंय का?
16 Jan 2013 - 12:28 am | संजय क्षीरसागर
लिहीत रहा..
16 Jan 2013 - 3:23 am | स्पंदना
हं. मोठीच्या आवेशयुक्त कृतीने होणारी जखम.
फारच छान लिहिता आहात. माहित असुनही उत्सुकता जागवणारी कथा.
16 Jan 2013 - 12:22 pm | सस्नेह
तपशील खुलवणारे लिखाण.
16 Jan 2013 - 3:22 pm | मालोजीराव
क्षत्रिय ???
16 Jan 2013 - 4:37 pm | ऋषिकेश
उत्तम.. आज तीन्ही भाग एकत्र वाचले.. आता पुढील भागाची प्रचंड उत्सुकता आहे.
लवकर लिहा
16 Jan 2013 - 4:56 pm | दिपक.कुवेत
पुढील भाग पटापट टाका...खुप उत्सुकता लागलिये
16 Jan 2013 - 4:58 pm | Mrunalini
खुपच छान... सीतेच्या बहिणीच्या मनातील विचार.. मस्त वाटले वाचुन... वेगळे काहितरी.
16 Jan 2013 - 6:42 pm | इष्टुर फाकडा
कथेतल्या सर्व प्रसंगांची आणि त्यातल्या संवादांची कल्पना करणे आणि त्या कल्पना इतक्या सुंदरपणे शब्दांत उतरवणे खरच खूप अवघड आहे. मानलं पन्नासराव ! शब्दप्रभू आहात हे निश्चित :)
16 Jan 2013 - 8:53 pm | इनिगोय
किती छान लिहिता हो तुम्ही!
ही कथा नेमकी काय आहे, हे गेल्या भागात कळूनही खिळवून ठेवलं आहेत. ग्रेट!
'बेस्ट ऑफ मिपा'च्या यादीत या तुमच्या कथेचा क्रमांक खूपच वरचा..
16 Jan 2013 - 11:15 pm | श्रिया
खुपच छान लिखाण.
17 Jan 2013 - 2:01 am | अर्धवटराव
उर्मीला किंवा माण्डवीची गोष्ट असावी काय? श्रुतकीर्तीला निदान इतर तिघींसारखा पतिवियोग नाहि जाणवला बहुतेक...
इतर कुठल्या ललीत साहित्यात या राजकन्यांबद्दल वाचलं नाहि. हा विषय सुचावा आणि त्यावर इतकं ओघवतं लेखन करावं... वा वा. खरच खुप प्रतिभावान आहात ५० साहेब.
अर्धवटराव
17 Jan 2013 - 11:20 pm | क्रान्ति
उत्सुकता वाढीला लावणारी शैली आहे अगदी.