चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
24 Oct 2012 - 11:45 am

आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत.

“काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या.

“अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत.

“अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका.

“नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी! आमच्या सचिनचा असा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही.”, घारुअण्णा तणतणत.

“च्यामारी, परवा तर, छॅsss, ह्या सचिनने आता रिटायर होण्यातच शहाणपणा आहे असे तुम्हीच म्हणत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.

“अहो बहुजनसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, लालेलाल होऊन.

“ह्या क्रिकेटचा बट्ट्याबोळ झाला आहे! असे तुम्हीच म्हणता ना हो घारुअण्णा, म्हणून भुजबळकाका तसं म्हणत असतील!”, नारुतात्यांनी चर्चेत तोंड घातले.

“तुम्ही काय त्यांचे वकीलपात्र घेतलेंय का?”, घारुअण्णा घुश्शात.

“नाही पण खरे आहे घारुअण्णा म्हणतात ते. मॅथ्यु हेडनच्या पोटात का दुखतंय ते खरंच कळलं नाही”, चिंतोपंत.

“त्या हरभजनने बरीं खोड मोडली होती त्याची”, घारुअण्णा.

“अहो, पण तो तसं बोलला तर प्रॉब्लेम काय तुम्हाला?”, भुजबळकाकाही आता सीरियस होत.

“तुम्हाला नाही कळणार हो हा उद्वेग, विनोद कांबळी बद्दल जर असे काही झाले असते, तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटले असते, हो ना?”, आता घारुअण्णा उपरोधाने.

“हे बघा, घारुअण्णा, आता तुम्ही वाकड्यात शिरताय”, भुजबळकाका काहीसे दुखावले जात.

“अहो, एका देशाने एका खेळाडूच्या कारकीर्दीची उत्स्फूर्तपणे घेतलेली दखल आहे ही, त्याच्या कारकीर्दीला दिलेला मानाचा मुजरा आहे हा आणि त्याचा आपल्याला अभिमान असायलाच हवा! म्हणून हेडनच्या ह्या वक्तव्याचा राग मलाही आला आहे, जसा घारुअण्णांना आला आहे.”, चिंतोपंत.

“कारकीर्द? मानाचा मुजरा? बरं बरं! मग जेव्हा दिलीप कुमारला ‘निशानं-ए-पाकिस्तान’ हा खिताब पाकिस्तानने दिला होता आणि त्याने तो स्वीकारला होता तेव्हा त्याला पाकिस्तानात हाकलून द्या असे तुम्हीच तावातावाने म्हणत होता ना हो घारुअण्णा”, भुजबळकाका.

“अरें देवा! ह्या भारतात, ह्या मुस्लिमांचे लांगूलचालन कधी बंद होणार आहे हे तो आकाशातला विश्वेश्वरच जाणे रे बाबा.”, घारुअण्णा उद्वेगाने.

“घारुअण्णा, तुमच्या अंगाशी आले की नेहमी त्या विश्वेश्वराला साकडें घालायची तुमची आयडिया भारीच आहे हा, खी... खी... खी... ”, नारुतात्या.

“अरे काय तुम्ही, कुठून कुठे ताणत आहात ह्या विषयाला”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“अहो सोकाजीनाना तुम्हीच सांगा, आता ह्यात घारुअण्णांचे काय चुकले?”, चिंतोपंत.

“त्याचं काय आहे चिंतोपंत, घारुअण्णांचे काय चुकले ते सोडा. हेडनचे काय चुकले ते सांगा. अहो, तो एक ऑस्ट्रेलियन आहे. त्यालाही ऑस्ट्रेलियन अस्मिता वगैरे असणारच, की नाही? त्यातही आपल्या सचिनने त्यांना त्राही भगवान कडून सोडले होतेच, त्याचीही ठसठस कुठेतरी असेलच ना. पण त्यामुळे तो जे काही बोलला ते चुकीचे कसे असेल? त्याच्या देशाचा एक सर्वोच्च बहुमान एका परकीयाला देण्यास त्याचा विरोध असेल तर त्यात त्याचे काय चुकले? काय घारुअण्णा आणि चिंतोपंत, मी नेमकं काय म्हणतोय ते ध्यानात येतंय का?”,

“त्याच्याही देशात लोकशाही आहेच की. त्या लोकशाही अंतर्गत त्या लोकशाहीने त्यालाही व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केलेले आहेच. त्यामुळे त्याने जे वक्तव्य केले ते करण्याचा त्याला हक्क आहेच. आणि तो जे म्हणाला ती त्याचा वैयक्तिक मताची पिंक होती. त्याला ना ऑस्ट्रेलियन सरकारने भीक घातली ना आपल्या सचिनने.”, सोकाजीनाना मिश्किल हसत.

“त्या हेडनला एवढा सारासार विचार करण्याची शक्ती असती असती तर एक चेंडू धोपटत बसण्याचा खेळ खेळण्यापेक्षा, आपल्या चावडीवरचा, तुमच्यासारखा विचारवंत नसता का झाला? काय पटतंय का? पटत असेल तर चला चहा मागवा पटकन”, सोकाजीनाना हसू कायम ठेवत.

चिंतोपंतांनी मान हालवत चहाची ऑर्डर दिली.

साहित्यिकक्रीडाप्रकटनप्रतिक्रियामाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 Oct 2012 - 6:37 pm | शुचि

आयला मला हे सगळे रेटायर्ड लोक जास्त "सेक्सी" वाटू लागले आहेत. काय तो आवेश, काय ती वाकनिपुणता :D

बॅटमॅन's picture

24 Oct 2012 - 6:44 pm | बॅटमॅन

चला, म्हणजे "तुम्हाला कोण सेक्सी वाटते" मध्ये अजून एक भर घालायला हर्कत नै- रिटायर्ड आणि वादपटू लोक्स ;)

मेघवेडा's picture

24 Oct 2012 - 7:52 pm | मेघवेडा

हा हा मस्त! फक्त एकच.. ऑस्ट्रेलियात कॉन्स्टिट्युशनल मोनार्कीच आहे. Good old Liz is their Head of State. ;)

सोत्रि's picture

24 Oct 2012 - 9:07 pm | सोत्रि

मेवे,

सोकाजीनानांनी बहुधा हे वाचले असावे. असो, तुमचा निरोप घारुअण्णांकरवी कळवतो त्यांना.

- (घारुअण्णांचा पंखा) सोकाजी

सोकाजीनाना तुमी या चावडीवर जाणं बंद कराओ ..

घरी काकु चहा बनवत नैत का?

:( :-/

सोत्रि's picture

24 Oct 2012 - 8:29 pm | सोत्रि

पूजा,

सोकाजीनाना घरी च्या नै कै पित... ;)

- (कपर) सोकाजी

बॅटमॅन's picture

24 Oct 2012 - 11:44 pm | बॅटमॅन

तेच म्हणतो मी!!!!!! इतकी चर्चा करून शेवटी काय मागवलेनीत तर नुसता चहा!!!!! किमानपक्षी शिक्रण, मटार उसळ यांचें कॉकटेल तरीं मागवायचें होंतेंत ;)

चिगो's picture

30 Oct 2012 - 1:51 pm | चिगो

किमानपक्षी शिक्रण, मटार उसळ यांचें कॉकटेल तरीं मागवायचें होंतेंत

"..खा लेकहो, शिक्रण खा, मटार उसळ खा.." ;-) भाईकाका झिंदाबाद..

सोकाजीनाना, लै जबरा गफ्फा हां..

पैसा's picture

24 Oct 2012 - 8:32 pm | पैसा

=)) =)) =))
:D :D :D

पिवळा डांबिस's picture

24 Oct 2012 - 10:26 pm | पिवळा डांबिस

आयला, हे सोकाजीनाना फक्त चहा घेऊन जे बोलतात ते आमच्या मिपाकर सोकाजीनानाला कॉकटेल मारूनही सुचत नाही!!!
(की कॉकटेल मारल्यावरच सुचतं?)
;)

संजय क्षीरसागर's picture

24 Oct 2012 - 11:24 pm | संजय क्षीरसागर

लेखनशैली आवडली

पाषाणभेद's picture

25 Oct 2012 - 12:03 am | पाषाणभेद

चांगली चर्चा चालू आहे.

मूकवाचक's picture

25 Oct 2012 - 9:31 am | मूकवाचक

=))

मी_आहे_ना's picture

25 Oct 2012 - 11:55 am | मी_आहे_ना

मस्त चर्चा..हा भागही आवडेश!

सहज's picture

25 Oct 2012 - 12:00 pm | सहज

लै भारी!

लवकरच युनिलिव्हर व टाटा टी दोघांच्यात ही लेखमाला प्रायोजीत करण्याकरता चढाओढ होणार!!!!