युद्धकथा ही मालिका पूर्ण करण्यासाठी एकून दहा भाग लिहायचा संकल्प केला आहे. त्यात आपल्या सैनिकांची एक तरी कथा असावी म्हणून ही पूर्वी लिहलेली व आपण वाचलेली कथा यात घातली आहे. आपण ही वाचली असल्यास कृपया मला हे माहीत आहे हे लक्षात घेणे. संपादकांना हे योग्य वाटले नाही तर त्यांनी हा धागा उडवला तरी चालेल...
चो-ला ची चकमक.
सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा इशारा दिला होता. ७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही. अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले, त्याबद्दलही आपण वाचले आहेच. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले. २८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती.
चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१नंची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेच्या सैनिकांना परत पाठवायचे असे ठरले होते. डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नं.ची चौकी जी पश्चिमेला होती तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.
एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची
चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता. सीमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. अरे ला कारे विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही. तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता न आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती. या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमधे साधारणत: दोन एक मिटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते. या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला. हे झाले पण याची खबरबात मे. जोशींना (जे या कंपनीचे प्रमूख होते) त्यांना फार उशीरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मे. जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले.
ले. राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील. मे. जोशी मधे वाटेत लागणार्या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती त्या दिशेला जाताना दिसली. मे. जोशींनी ले. राठोडयांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. ले. राठोड यांनी लगेचच त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले ते असे -
नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि त्या वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला – आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ....सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच तेथे ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते. हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे. इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर. पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही. हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्या चिन्यांवर हल्ला चढवला. त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.
सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “ते वाघांसारखे लढले”.
कूकरीचे प्रात्याक्षिक - प्रशिक्षणाच्या काळात.
या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातील भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.
इकडे नं १५४० वर ले. राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जेव्हा त्यांना पोटात व छातीत गोळ्या लागल्या तेव्हा या वीराने त्या युद्धभूमीवर आपला प्राण सोडला. आपल्या पलटणीचे नेतृत्व ते मरेतोपर्यंत करत राहिले. हे बघताच मे. जोशींनी आपल्या तोफखान्याच्या अचूक मार्याने चिनी सैनिकांचे आक्रमण बंद पाडले. आपल्या तोफखान्याला मार्गदर्शन करताना त्यांच्या नजरेस एक चिनी सैनिक कड्याच्या मागून येताना दिसला. एका सैनिकाची रायफल घेऊन मे. जोशींनी त्याला यमसदनास पाठवले.
१५४५० वर आता शांतता पसरली होती तरी ताम्झे आणि रायगाप वर आता रॉकेट आणि आर.सी एल तोफांचा मारा चालू झाला. यात ताम्झेवर जास्त कारण त्या ठाण्यामुळे चिन्यांची पिछाडी धोक्यात येऊ शकली असती. यातच जेके रायफल्सच्या एका बंकरवर एक गोळा पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. हेही ठाणे गुरख्यांनी अजून ताब्यात घ्यायचे होते. चिनी पद्धतीने होणार्या (लाटे प्रमाणे) हल्ल्यांना परतवून लावण्यात येत होते.
शेवटी मेजर जोशी यांच्या तोफांनी चीनी तोफा बंद पाडल्या. चो खिंडीत ज्या आपल्या सैन्याच्य आर. सी. एल तोफा होत्या त्यांनी १५४५० जवळच्या चिनी सैनिकांच्या मशीनगनच्या तुकड्यांवर अचूक मारा करून पहिल्याच मार्यात त्या बंद पाडल्या. या तोफखान्याच्या प्रमूखाने वरून अखंड बॉंबवर्षाव चालू असताना तोफगोळ्याचा अखंड मारा चालू ठेवला तो दारूगोळा संपल्यावर थांबला. त्यासाठी त्यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले. दुर्दैवाने मला त्यांचे नाव सापडले नाही. चिनी तोफांचा मारा बघून सैनिकांना १५४५० वरून माघार घ्यायचा आदेश देण्यात आला. त्याच वेळी चीनी सैनिकांनी आकाशात हिरव्या रंगाचे प्लेअर उडवले जी युद्धबंदीची निशाणी होती. थोड्याच वेळात त्या युद्धभूमीला दाट धूक्याने वेढले आणि सगळीकडे शांतता पसरली. या धुक्याच्या आवरणात मे. जोशींनी त्या झोपड्यांच्या येथे आपले खंदक खणले. इकडे मे. नायर जे जेके रायफल्सचे होते त्यांनी ब्रिगेड कमांडला या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली होती.
त्यावेळी त्या ब्रिगेडचे प्रमूख होते ब्रिगेडियर कुंदनसिंग. त्यांनी ताबडतोब युद्धभूमीवर जाऊन ७/११ च्या उरलेल्या गुरखा रेजिमेंटच्या कंपन्यांना ताम्झेकडे कूच करण्याची आज्ञा दिली. होणार्या हल्ल्यासाठी तोफाही तयार करण्यात आल्या. हालचाल दिसतात चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.
त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मे. जोशींनी परत आपला बूट रोवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही.............
वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपल्या ताब्यातला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी ...............?
या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगीचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला.........
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
3 Sep 2012 - 11:19 am | निनाद
या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगीचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला.........
हे घडवून आणणार्या त्या गुरखा रायफल्सच्या शूर सैनिकांना मनोमन सॅल्युट!
कायर हनु भंदा मार्नु राम्रो!
(बरोबर आहे ना?)
3 Sep 2012 - 11:16 am | मन१
मागच्याही वेळेस लेख्न प्रभावी वाटलेच होते.
3 Sep 2012 - 11:30 am | अन्या दातार
जिथे जमिनीला (यांच्या दृष्टीने) किंमत असते तिथे मात्र स्वतः अतिक्रमण करतील, आरक्षण उठवून घेतील. :(
3 Sep 2012 - 11:35 am | चावटमेला
आपले लेख नेहमीच आवडतात. हाही तसाच, अगदी अंगावर शहारे आणणारा.
4 Sep 2012 - 2:54 pm | सुमीत
चावट्मेल्या,तुला शहारे न बोलता रोमांच बोलायचे आहे का? नक्कीच रोमांच असणार.
"युदधस्य कथा रम्य" कि असेच काही तरी आहे, आणि ह्या लेखात तर आपल्या भारतीय सेने बद्दल लिहिले आहे तर शहारे कशाला येतील.
3 Sep 2012 - 4:42 pm | मी_आहे_ना
आधीही वाचला होता, आवडलाही होता, पण 'आयडी' कार्यरत नव्हता, म्हणून प्रतिक्रिया नव्हती दिलेली. त्या वीरांना करू तेवढे वंदन थोडेच!
3 Sep 2012 - 6:25 pm | पैसा
लेख आवडला आणि आपल्या शूर सैनिकांबद्दल अभिमान वाटला. कृत़ज्ञता वाटली. आणि कितीएक सैनिकांच्या प्राणाचं मोल देऊन जिकलेली किंवा राखलेली भूमी राजकारणी तहात किंवा अशीही परत शत्रूच्या हातात जाऊ देतात तेव्हा ते सैनिक आपलं मनोधैर्य कसं टिकवून ठेवत असतील याचंही प्रचंड कौतुक वाटलं.
4 Sep 2012 - 3:33 pm | यशोधरा
हेच म्हणते.
4 Sep 2012 - 10:20 pm | मोदक
सुबेदार जोगींदर सिंग यांच्या बद्द्दल ही लिहावे ही नम्र सुचवणूक.
जोगींदर बाबांचे मंदीर आहे बहुदा भारत चीन सीमेवर...
5 Sep 2012 - 9:28 pm | गोंधळी
शूर सैनिकांना मनोमन सॅल्युट!
5 Sep 2012 - 10:07 pm | एस
"मेंडिंग वॉल " ही रॉबर्ट फ्रॉस्ट ची कविता आठवली.
यातल्या दोन्ही बाजू दुर्दैवाने तितक्याच खर्या आहेत...
बाकी लेख प्रचंड भावला.
6 Sep 2012 - 4:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
जयंतरावांनी लिहायचे आणि आम्ही भारावुन जाउन वाचायचे.
खरेतर मि.पा. ने जयंतराव, गवि, वल्ली यांच्या साठी एकादा स्वतंत्र विभाग सुरु करावा.
कारण काही चांगले लेख पहिल्या पानावरुन गायबतात आणि मग वाचायचेच राहुन जातात.
शुर भारतिय वीरांना माझा कडक सॅल्युट.
(भारतिय सेनादलात जायची इच्छा अपुर्ण राहिलेला)
:(
7 Sep 2012 - 2:47 pm | विटेकर
जयंत राव ,
तुमचे लेख खरेच सुन्दर असतात. नेहमीच आवडीने वाचत असतो. प्रत्येक वेळी प्रतिसाद देतोच असे नाही .. काही वेळा वेळ नसतो तर काही वेळा अंगभूत आळ्स !
"खरेतर मि.पा. ने जयंतराव, गवि, वल्ली यांच्या साठी एकादा स्वतंत्र विभाग सुरु करावा."
याच्याशी १०००% सहमत . संपादक मंड्ळाने याचा जरुर विचार करावा. असार सोडून सार शोधताना खूप त्रास होतो.
( अवांतर : या कंपूबाजांनी तर उच्छाद मांड्लाय .. इतके बाईट्स वाया जाताहेत . एकमेकां संवादिती , अहो रुपम अहो ध्वनी .. अशी गत ! प्रत्येक धाग्यावर यांच्या मताची पींक टाकलेली आहेच .. कितयेकांचा ठरवून हिरमोड केला जातो .. आणि मग चांगले लेखक केवळ वाचनमात्र उरतात..)
1 Mar 2016 - 12:18 am | जेपी
न चुकता वाचावे असे काही..
1 Mar 2016 - 8:55 am | एक एकटा एकटाच
थ रा र क
1 Mar 2016 - 6:07 pm | होबासराव
हा लेख वर आणल्याबद्दल.
लेख तर जबराट च झालाय