ही आपुलीच वाजती पाउले. मागे लागली कर्माची भुते.
जेव्हा वाळुनीया गेले श्रावणी पाऊस ओले
जेव्हा जाळाया लागले उन्ह शिशिरी कोवळे
नाद मंदसे भासले मूढ मानव बोलले
वाजे पाऊल आपले म्हणे मागे कोण आले?
कैलास पाषाणले गंगातीर पुरावले
पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले
नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
रान रहाया कापले ताव करून जाळले
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
नाद चहूकडे आले जग बहिरे झोपले
वाजे पाऊल आपले गाणे उन्मत्त गायले
वारे काजळी माखले तारे नभीचे झाकले
सारे प्राण घुस्मटले जारे संचित संपले
नाद तीव्र ठणाणले कोठे लुटणारे गेले?
वाजे पाऊल आपले कोणी ऐकाया ना उरले
प्रतिक्रिया
12 Aug 2008 - 10:25 am | मनीषा
कविता छान आहे... माणसाने नैसर्गिक संपत्तीचा जो गैरवापर चालवला आहे त्याचे अगदी नेमके वर्णन केले आहे .
कविता आवडली !!
13 Aug 2008 - 11:31 am | पावसाची परी
>>नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
रान रहाया कापले ताव करून जाळले
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
अतिशय छान वर्णन आजच्या आपण मानवाने बिघडवलेल्य निसर्गाचे
१०/१०
13 Aug 2008 - 6:04 pm | प्राजु
क्या बात है!
कैलास पाषाणले गंगातीर पुरावले
पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले
नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
हे तर अत्युच्च.
डोळ्यात अंजन घालणारी कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Aug 2008 - 6:09 pm | चतुरंग
निसर्गक्रंदन फार नेमक्या शब्दात मांडले आहे. आपल्याच मस्तीत जगणार्या माणसाची विनाशवाटेवरील वाटचाल बोचली!
भेदक कविता! सुंदर!!
चतुरंग
13 Aug 2008 - 10:23 pm | सहज
मानवाकडून निसर्गाच्या विनाशाची गाथा.
14 Aug 2008 - 8:49 am | विसोबा खेचर
वरील मंडळींशी सहमत..
कविता लै भारी!
14 Aug 2008 - 9:15 am | हर्षद आनंदी
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
नाद चहूकडे आले जग बहिरे झोपले
----
वास्तवाचे भयाण दर्शन!!!
सारे प्राण घुस्मटले जारे संचित संपले : प्रलयकाळ जवळ येतोय्....सावधान
|| निर्लज्जम् सदा सुखी ||
14 Aug 2008 - 11:37 am | अरुण मनोहर
सर्व वाचकांचे आभार.
प्रोत्साहन दिल्या साठी मनीषा, पावसाची परी, प्राजु, चतुरंग, सहज, तात्या, हष॑द आनंदी ह्यांना विशेष धन्यवाद.