घरचा आहेर
पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटी दरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात. इतर कारागृहे आणि खुले कारागृह यात मोठा फरक हा की खुल्या कारागृहातले कैदी शेत काम करण्यासाठी कारागृहाच्या मालकीच्या शेतात जात. त्यामुळे खुल्या कारागृहाच्या कैद्यांना बराच मोकळेपणा अनुभवता येतो.
.
एकदा असेच काही कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासायला आणले. आमच्या कडे प्रशिक्षणासाठी असलेल्या इंटर्ननी त्यांना तपासलं आणि तो माझ्या कडे आला अणि म्हणाला: "सर, एक प्रॉब्लेम आहे या चार कैद्यांचा", आणि त्यानं त्याचा प्रॉब्लेम सांगितला. ऐकून मीही चकित झालो. चारही कैद्यांना गुप्तरोग झाला होता. लैंगिक संबंधातून होणारा सिफिलीस नावाचा गुप्तरोग झाल्याचा प्रथमदर्शनी निदान होतं. तसं कैद्यांमधे हा रोग होणं नवीन नव्हतं. पण चार कैद्यांना, एकाच वेळी अशी लागण होणं ही गंभीर बाब होती. जेलला साप्ताहिक व्हीजीटच्या वेळी तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी यावर चर्चा करायची असं मी तेंव्हाच ठरवून टाकलं. मात्र काही करण्या अगोदर निदानाची खातरजमा काही तपासण्या करून करणं आवश्यक होतं. तेंव्हा ही तपासणी करण्यासाठी रक्ताचा नमुना औरंगाबादला पाठवावा लागे. त्याप्रमाणे रक्तनमुने पाठवले आणि त्या रोग्यांवर उपचार सुरू केले.
.
घरी आलो पण ही बाब मला स्वस्थ बसू देईना. मी संध्याकाळी खुल्या कारागृहात पोहोचलो. आधी निरोप दिलेला होता त्यामुळे वैद्यकिय अधिकारी आणि जेलचे अधिकारी होतेच. त्यांना मी भेटीचं कारण सांगितलं आणि त्या कैद्यांशी एकेकट्यांनं भेटून माहिती घ्यायची असं ठरवलं. आधी तर ते कैदी नीट बोलेनात. मग मी तुरुंगातल्या सर्वांना बाहेर जायला सांगितलं आणि त्या चौघांना एकत्र बोलावलं. त्यांना काय आजार झालाय, तो कसा होतो ते सांगितलं. यामुळे तुरूंग प्रशासन अडचणीत येऊ शकेल हेही त्यांना सांगितलं, इतकंच नव्हे तर त्यांना मिळालेली खुल्या कारागृहाची सवलत रद्द होवून परत मुळच्या तुरूंगात खडी फोडायला जावं लागेल हेही निदर्शनास आणून दिलं. त्या चौघांची मूळ तुरूंगातल्या चांगल्या वर्तनामुळे इथं पैठण मधल्या खुल्या कारागृहासाठी निवड झाली होती. सक्तमजूरीच्या तुरूंगाच्या तुलनेत खुलं कारागृह म्हणजे तर स्वर्गच होता आणि आता स्वर्गातून परत त्या तुरूंगात जावून खडी फोडायची या कल्पनेनं त्या चौघांना घाम फुटला आणि त्यांना कंठही फुटला.
.
त्यांनी सांगितलेली हकिगत थोडक्यात अशी. खुल्या कारागृहात काही दिवस काढल्यानंतर कैद्यांना काही दिवस घरी जावून नातेवाईकांना भेटण्याची सवलत मिळते. त्यानुसार हे चौघेही नुकतेच या सवलतीचा लाभ घेवून कारागृहात परत आले होते. आता घरी जावून त्यांना "हा आजार" कसा काय झाला ते काही कळेना. तेंव्हा आणखी खोदून विचारलं तेंव्हा कळलं की तिघं आपापल्या घरी गेले होते, पण तिथं त्यांचं "थंड" स्वागत झालं होतं. त्यामुळे यांची डोकी "गरम" झाली आणि मग "जीवाची मुंबई" करण्या साठी त्यांनी खरंच मुंबई गाठली होती आणि तिथून या गुप्तरोगाचा प्रसाद यांना मिळाला होता. तिघातल्या एकाला "याबाबतची मुंबई" माहिती होती आणि यामुळे त्यांनी एकत्रितच संगनमतानं मुंबई गाठली होती.
.
तिघांचं कारण कळलं. मुंबईतल्या रेड्लाईट एरियातून त्यांना ही लागण झाल्याचं निष्पन्न झालं, पण चौथ्याचं काय? तो या तिघांबरोबर नव्ह्ता हे त्या तिघांनी शपथेवर सांगितलं. त्याला खोदून खोदून विचारलं, पण त्याचं आपलं एकच पालूपद: "मी माझ्या घरी गेलो होतो. दुसरी कडे कुठेच नाही." आणि मग माझ्या मनात एक विचार आला, समजा हा खरंच खरं बोलत असेल तर? तर मग याला रोगाची लागण कुठून झाली हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होतं. मी आणखी चौकशी केली तेंव्हा कळलं की तो मुदती आधीच घरून तुरूंगात परतला होता. त्या तिघांचं घरी "थंड" स्वागत झालं म्हणून त्यांनी बाजारात जावून तो आजार विकत घेतला होता आणि या चौथ्याला मात्र या आजाराच्या रूपात "घरचा आहेर" मिळाला होता !
-अशोक
प्रतिक्रिया
13 Jul 2012 - 8:16 pm | बॅटमॅन
आयला!!!!!!!!!!!!!!!!!!!!
13 Jul 2012 - 8:41 pm | बिपिन कार्यकर्ते
भारी!
13 Jul 2012 - 9:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, अवघड केस आहे.
-दिलीप बिरुटे
13 Jul 2012 - 9:56 pm | सुनील
अवघड आहे!
13 Jul 2012 - 10:16 pm | जाई.
+२
13 Jul 2012 - 10:43 pm | पक पक पक
अवघड काय आहे त्यात..?
14 Jul 2012 - 1:22 am | टुकुल
एकदम चाट पडलो.. डॉक्टर आणी वकिलांनी त्यांची पोतडी खोलली कि असच होत.
जाता जाता: अश्या केसेस पाहुन त्यांचा (डॉक्टर) स्वता:च्या विचारांवर आणी वागणुकीवर काही परिणाम होतो का?
--टुकुल
14 Jul 2012 - 2:05 am | बॅटमॅन
प्रश्न रोचक आहे आणि दोन्ही केसेसमधील इम्प्लिकेशन्स खत्रा आहेत ;)
16 Jul 2012 - 10:46 am | डॉ अशोक कुलकर्णी
ब्याटमन भाऊ
स्थल संकोचास्तव मी अनुभव कथन थोडक्यात आटोपलं. तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. पहिल्या तिघाचं घरी "थंड" स्वागत झालं यात बरंच काही आलं. या तिघांच्या बायकानं ते ज्या काही कारणास्तव तुरुंगात होते ते पसंत नव्हतं असं दिसतं. त्यामुळे त्यांना यांच्याशी संबंध ठेवायचे नव्हते. चौथ्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती. घरचा कर्ता तुरुंगात आणि हिला कुणाचा आधार नाही अशा परिस्थितीत तिनं देहविक्रयाचा मार्ग स्विकारल्याचं स्वच्छ्पणे दिसून येतं. यात तिला दोष देणं शक्यच नाही.... पण घडलं ते असं ....
-अशोक
16 Jul 2012 - 12:12 pm | बॅटमॅन
डॉक्टरसाहेब, कारणमीमांसेबद्दल बहुत धन्यवाद. पण मी ज्या "केसेस" म्हणालो त्याचा याच्याशी संबंध नव्हता. अशा केसेस पाहून डॉक्टरांच्या/वकिलांच्या मनावरती परिणाम जर चुकून झालाच तर त्याचे इम्प्लिकेशन्स खत्रा असतील असे मला म्हणायचे होते.
16 Jul 2012 - 10:31 am | डॉ अशोक कुलकर्णी
जाता जाता: अश्या केसेस पाहुन त्यांचा (डॉक्टर) स्वता:च्या विचारांवर आणी वागणुकीवर काही परिणाम होतो का?
--टुकुल
हे असं होतंच असं नाही. नाहीतर सर्व स्त्री रोगतद्न्य गरोदर रहायला लागतील आणि मनोविकारतद्न्य मनोरुग्ण.. !!
-अशोक
14 Jul 2012 - 9:46 am | सूड
आयला !!
14 Jul 2012 - 10:02 am | इरसाल
खरचं अवघडै !!!!
वादाला तोंड फोडु इच्छित नाही. पण आरश्याच्या मागील बाजुस जावुन पाहीले तर ४ थ्या उदाहरणात चुक वाटत नाही. पहिल्या ३ नी नाही बाहेर जावुन शेण खाल्ले.तसा ४थ्याला उलट .......
16 Jul 2012 - 10:39 am | डॉ अशोक कुलकर्णी
इरसाल भाऊ
वादाचा प्रश्नच नाही. चौथ्या उदाहराणात त्या कैद्याच्या बायकोची मला पण चूक वाटत नाही. हा गडी तुरूंगात गेलेला. तिचा आधार गेलेला. अशा परिस्थितीत ती "या" मार्गाला लागली असेल तर स्वेच्छेनं नक्कीच नव्हे. मी हे पण लिहिलंय की हा घरी रहाण्या साठी त्याला जी काय मुदत दिली होती त्याच्या बरंच आधी तुरुंगात परत आला होता. म्हणजे आपल्या अनुपस्थितीत घरी काय झालं हे त्यानं नक्कीच पाहिलं असणार ! असे प्रकार आपण हिंदी चित्रपटात पहात आलो आहोत..... तिथं आपण बघून सोडून देतो. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही घडलेलं , समक्ष बघितलं की मात्र बोलती बंद होते. जशी हे ऐकून माझी झाली !
-अशोक
14 Jul 2012 - 10:13 am | इरसाल
डआकाटा
14 Jul 2012 - 10:06 am | मराठमोळा
चायला,
तुरुंगात आणखीन काय काय चालतं याबद्दल एका मित्राकडुन एकदा ऐकलं होतं. फार भयानक. :(
माझ्या एका मित्राची बहीण मुंबैत डॉक्टर आहे, तिच्या म्हणण्यानुसार गुप्तरोगांच प्रमाण ट्रक ड्रायव्हर आणि पोलिस यात सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहे.
16 Jul 2012 - 10:29 am | डॉ अशोक कुलकर्णी
धन्यवाद सर्व सहृदय वाचक मित्रांचे......
-अशोक
16 Jul 2012 - 10:29 am | डॉ अशोक कुलकर्णी
धन्यवाद सर्व सहृदय वाचक मित्रांचे......
-अशोक
16 Jul 2012 - 12:54 pm | प्यारे१
आयला!
ह्यावरुन मागे अशीच एक वाचलेली गोष्ट आठवली .
कुटुंबनियोजनाची जबरदस्तीने शस्त्रक्रिया (नसबंदी) केला गेलेला तो.
नंतर त्याची बायको प्रेग्नंट.
हादरल्यावर मेव्हण्याला बोलावून बहिणीला घरी न्यायला सांगतो.
मेव्हणा 'चौकशी' करतो. त्याच्या बहिणीनेच 'गोंधळ ' केलेला असतो.
शेवटी तिच्या नवर्याची डॉक्टरमार्फत 'तपासणी' करुन झालेली नसबंदी बरोबर झाली नाही त्यामुळं 'असं' झालं असं पटवून बहिण भावोजींचा संसार सुरळीत ठेवतो असा काहीसा विषय.
16 Jul 2012 - 3:51 pm | ५० फक्त
चांगलं लिहिलं आहेत, धन्यवाद.
16 Jul 2012 - 4:46 pm | विकाल
दादा मुक्त कारागृहामध्ये कुटुंबाला परवानगी असते ना.. मग?
16 Jul 2012 - 5:17 pm | डॉ अशोक कुलकर्णी
विकाल भाऊ
कुटुंबासह रहाता येईल असं मुक्त कारागृह माझ्या माहिती प्रमाणे भारतात तरी नाही. हे पैठण च्या जवळ जायकवाडी वसाहतीच्या परिसरात जे कारागृह आहे त्याला ओपन जेल किंवा खुले कारागृह म्हणतात. इथं जेलची शेती आहे. तिथं कैदी काम करतात आणि त्यांची मजूरी त्यांच्या खात्यात जमा होते आणि ती त्यांना सुटकेच्या वेळी देण्यात येते. संध्याकाळी कैदी जेल मधे परत येतात. मात्र जेल मधलं वातावर इतर ट्र्याडीशनल जेलपेक्षा खूपच मोकळं असतं. मूळ कारागृहात शिक्षा भोगतांना ज्या कैद्यांची वर्त्णूक चांगली आहे त्यांनाच इथं आणलं जातं. ओअप्न जेलमधे सहा महिने राहिलं तर एक वर्ष शिक्षा भोगली असं समजलं जातं. अगदी अपवादात्मक उदाहरणं आहेत जेंव्हा की कैदी इथून पळून गेलेत. सांपडले तर अत्यंत कठोर कार्यवाही होते आणि परत मूळ कारागृहात खडी फोडायला जावं लागतं
-अशोक
16 Jul 2012 - 5:29 pm | विकाल
अशोकजी,
ता. आट्पाडी जि. सांगली येथे स्वतंत्रपूर येथे कैद्यांचे खुले कारागृह आहे व तेथे ते आपल्या कुटुंबासह राहतात. शेती करुन भाजी विकुन राहणारे कैदी आपणास या परिसरात दिसतील.
आपल्या देशाची न्याय व शिक्षा व्यवस्था ही मुळात 'करेक्शनल' स्वरुपीय आहे. त्यामुळे अशा व्यवस्था निर्माण केल्या आहेत.
धन्यवाद.
16 Jul 2012 - 7:57 pm | डॉ अशोक कुलकर्णी
विकाल...
नव्या माहिती बद्दल धन्यवाद!