(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा)
.................................................................................................................................
आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात. जे भीडस्त असतात ते ' गंगार्पणमस्तु' म्हणून त्या रकमेवर पाणी सोडतात. जे खमके असतात ते देणेकर्याचा पिच्छा पुरवतात. ज्यांच्या अंगात रग असते ते रक्कम मिळवण्यासाठी दमदाटीपासून हाणामार्यांपर्यंत मार्ग अवलंबतात.
जेव्हा आपला घामाचा पैसा कुणीतरी विश्वासघात करुन बुडवते तेव्हा स्वाभाविकपणे प्रत्येकाचे विचार असेच असतात, 'आता कानाला खडा. कुणाला उसने पैसे देणे नाही आणि कुणाकडून उसने घेणे नाही. विश्वास गेला पानपतावर. चांगुलपणा गेला खड्ड्यात. चहा प्या, चालू पडा, पैसे मागू नका. भिकारड्या! पुढच्या खेपेस उभा राहून दाखव दारात. इ. इ.' यानंतर आपण खरंच कानाला खडा लावतो. पैसे मागणार्या प्रत्येकाकडे तिरस्काराने बघू लागतो. 'मला जरा थोडी नड होती' इतके प्रास्ताविक करणार्यापासून काही सबब सांगून दूर पळतो. यात चुकीचे काहीच नाही. साधे आपले पुस्तक वाचायला गेले तर परत येत नाही मग रकमेचे तर सोडून द्या.
पैसा सोडून बोल.. हा धागा आणि मिपाकरांच्या त्यावरील स्वाभाविक प्रतिक्रिया वाचून मला वाटले, की माझ्या मनातला एक अंतर्संघर्ष इथे मांडावा. पुस्तके लंपास होणे, किरकोळ हातउसन्या दिलेल्या रकमा बुडणे, अगदी समाधानपूर्वक काम करुन दिले तरी पैसे देण्याच्या वेळी काही क्लायंटनी फोन टाळणे, रक्कम बुडवणे हे अगदी आजही माझ्याबाबत सुरु असते. दरवेळी मी कानाला खडा लावतो आणि मान वळताच तो खडा पडून जातो. मी शहाणा झालेलो नाही. हिंदी चित्रपटात जसा संवाद असतो, की ' भले १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये', तसे मी घोकत असतो, 'भले १०० जणांनी माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला तरी चालेल, पण एका जेन्युईन गरजूला माझ्याकडून हिडीसफिडीस करण्याची वेळ आणू नकोस देवा!' असा वेडेपणा मी जाणूनबुजून का करतो, याच्या उत्तर शोधायला लागले तर ज्या घटना आठवतात त्या तुमच्यापुढे मांडू इच्छितो.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पत्नीने मला नवा मोबाईल भेट दिला होता. त्या काळात मोबाईल ही नाविन्याची गोष्ट होती. कॉल रेट आतापेक्षा जास्त होते आणि मोबाईलवर बोलणार्याकडे लोक कुतुहलाने बघत. पण लवकरच या मोबाईलमुळे माझ्या डोक्याला ताप व्हायला लागला. प्रत्येकजण मोबाईल बघायला मागायचा आणि कुतुहलापोटी कॉलपण करुन बघायचा. त्यामुळे मी कानाला खडा लावला. 'अरे माझा मोबाईल म्हणजे काय फुकट फोन वाटला का?' मी रोखठोकपणे सांगू लागलो, 'सॉरी! फोन मागू नका.' असाच एकदा गावाला चाललो होतो. बसमध्ये बसताना पत्नीचा फोन आला, 'काय रे? मिळाली का बस?' वगैरे... संभाषण संपल्यावर शेजारी घाम पुसत उभ्या असलेल्या एका बाईने मला तत्परतेने विचारले, 'तुमच्या मोबाईलवरुन एक फोन केला तर चालेल का?' मीही तत्परतेने 'सॉरी' म्हटले. तेवढ्यात मागच्या सीटवरच्या एकाने आपला मोबाईल काढला आणि त्या बाईला म्हणाला, 'घ्या ताई. यावरुन फोन करा. नंबर लावता येतो का मी लाऊन देऊ?' त्या बाईने सांगितलेला नंबर त्याने प्रेस केला आणि मोबाईल तिच्या हातात दिला. त्यावर ती बाई एकच वाक्य बोलली, ' अरे दादा! अप्पांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. मी बसमध्ये बसलीय. तू लगेच निघ.' मी सुन्न झालो. तिने एक साधीशी मदत मागायला आणि मी नाही म्हणायला एक गाठ पडली होती. मी ओशाळलो. पण आता काही करता येत नव्हते. मी बसमधून खाली उतरलो आणि उभ्या असलेल्या त्या बाईला माझी जागा रिकामी करुन दिली. तेवढीच क्षमापना.
हा ओशाळलेपणाचा बोळा नंतर अनेक वर्षांनी निघाला. भिडे पुलाजवळ नदीकाठच्या रस्त्यावर एकदा वेगात येणार्या एका तरुणाने आमच्यापुढे स्कूटीवर असलेल्या एका आजोबांना धडक दिली. ते ज्येष्ठ नागरिक खाली पडले. किरकोळ खरचटले, पण मुका मार लागल्याने त्यांना पाय हलवता येत नव्हता. मी त्यांच्याजवळ जाताच ते म्हणाले, 'मी ठीक आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे का?' मी त्यांना तो दिला. त्यांनी घरी फोन केला. मुलाला बोलावले. डॉक्टरांकडे जाताना मला 'धन्यवाद' म्हणाले. याखेपेस मला थोडे बरे वाटले. पूर्वी मनात रुतून बसलेली बोच कुठेतरी देवापर्यंत पोचली असावी बहुतेक.
आणखी एका खेपेस मी कानाला खडा लावला होता. कामाच्या ठिकाणी एका शिपायाने 'घरच्या अडचणीमुळे मुलाची शाळेची फी भरता येत नाही' असे सांगितले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते चिमणे लेकरु तरळले आणि मी त्याला फीची रक्कम दिली. पुढे त्या माणसाला दारुचा नाद असल्याचे आणि तो नव्या माणसाकडून अशाच सबबी सांगून पैसे घेत असल्याचे कळले. खूप वाईट वाटले. मी निर्धार केला, 'आता कुण्णाला म्हणून पैसे द्यायचे नाहीत.' पण दोनच वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्य प्रसंगामुळे माझ्या कानाचा खडा पडून गेला.
आटपाट नगर होतं आणि त्यात एक गरीब ब्राह्मण होता, अशा कहाण्यांवर आज अनेक लोक तुटून पडतात. 'ब्राह्मण आणि गरीब? अहो चांगला सुखवस्तू आहे की हा समाज. त्यांना कसली आलीय मदतीची गरज?' असे उपरोधाने म्हणतात. पण आजच्या काळातील एका गरीब ब्राह्मण कुटूंबावर ओढवलेला प्रसंग मला बरेच काही शिकवून गेला. पुणे जिल्ह्यातील एका गावात हे चौकोनी ब्राह्मण कुटूंब राहते. ते दरिद्री नाही, पण गरीब या श्रेणीत मोडणारे. कर्ता पुरुष सामान्य नोकरी करणारा. घरात पत्नी, शिकणारा तरुण मुलगा व मुलगी. विशीची ही मुलगी एकदा इमारतीतून जिन्यावरुन येताना तिला चक्कर आली आणि दुर्दैवाने ती इमारतीच्या बाहेर दोन मजले उंचीवरुन पडली. कमरेतून जवळजवळ पंगू झाली. पुण्यात एका रुग्णालयाने तिच्यावर मल्टीपल सर्जरी कराव्या लागतील आणि उपचारांचा खर्च पाच लाख रुपये येईल, असे सांगितले. एकतर संसार, दोन्ही मुलांची शिक्षणे आणि हा शस्त्रक्रियेचा न पेलवणारा खर्च. त्यांनी रुग्णालयाला विनंती केली. तेथील डॉक्टरांनी मदतीच्या भावनेतून सर्व खर्च काटछाट करुन अखेर किमान साडेतीन लाख रुपये तरी उभे करावे लागतील, असे सांगितले. आता हे पैसेही ते वडील कसे उभे करणार होते? त्यांनी कसेबसे लाखभर रुपये जमवले होते. ही घटना माझ्या नातलगांनी मला सांगितली. मला वाटले, की कितीतरी सेवाभावी संस्था, संघटना, विश्वस्तनिधी असतात. तिला मदत मिळून जाईल. किमान ब्राह्मण समाजातील लोक तरी आपल्यातील गरीबाच्या मदतीला धावतील. मग मी आणि आमच्या चार परिचितांनी प्रत्येकी पाच हजार रुपये अशी पंचवीस हजार रुपये रक्कम दिली व त्यांना सांगितले, की तुम्ही असेच मदतीचे आवाहन करा. काम होऊन जाईल. इथून सुरु झाली अनुभवांची मालिका.
मुलीचे वडील त्या भागातील राजकीय नेत्याला भेटले. त्याने स्वतः मदत करायचे टाळले आणि वर काही देवस्थानांच्या ट्रस्टकडे जाण्यास सांगितले. मुंबईच्या एका देवस्थानाने तातडीने दहा हजार रुपये पाठवून दिले. बाकीकडून नकार आला. ब्राह्मण समाजातील पोटजातींच्या संघटनांचा अनुभव असाच संमिश्र होता. एका संघटनेने आपल्या मुंबईतील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज पाठवायला सांगितले. त्यांच्याकडूनही दहा हजार रुपये मदत आली. ब्राह्मणांच्या दुसर्या पोटजातीच्या संघटनेचा अनुभव सरकारी कार्यालयाप्रमाणे होता. त्यांनी मुलगी कोणत्या ब्राह्मण पोटजातीची आहे, हे विचारले आणि 'आमच्या घटनेत स्वशाखीयांखेरीज इतरांना मदत देण्याची तरतूद नाही. क्षमस्व' असे रोखठोक सांगितले. मुलीचा भाऊ म्हणाला, 'अहो शाखा कोणतीही असो. आज एका गरीब ब्राह्मण मुलीला पुन्हा पायावर उभे राहण्यासाठी मदतीची गरज आहे. तुम्ही नियमांना अपवाद करु शकत नाही का?' त्यावर संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, ' सॉरी. माझा नाईलाज आहे.' व्यक्तीगत पातळीवर अनेकांपर्यंत मदतीचे आवाहन पोचवले. गंमत म्हणजे कोणत्यातरी आपत्तीच्या वेळी पेपरमध्ये आपले नाव छापून यावे म्हणून मदत देणारे लोक सगळे ऐकून घेत. काहीजण म्हणत, ' असे पैसे मागून अनेकांनी आम्हाला फसवले आहे. आता आम्ही कानाला खडा लावला आहे.' हे असे अनुभव घेऊन उद्विग्न झालेल्या मुलीच्या वडिलांनी मदत मिळण्याची आशा सोडून दिली.
पण सगळ्याच लोकांनी मनाची दारे बंद केलेली नसतात. कधीकधी 'जिसका कोई नही उसका खुदा है यारो' हे सत्य ठरते. माझ्या नातलगांनी हा प्रसंग बोलता बोलता एका माहिती तंत्रज्ञान कंपनीतील मित्राला सांगितला. त्याने कंपनीचे मालक असलेल्या उद्योगपतींच्या सामाजिक विश्वस्त निधीकडे एक अर्ज करण्यास सांगितले. ट्रस्टच्या लोकांनी मुलीवरच्या शस्त्रक्रियेचे गांभीर्य आणि रुग्णालयाचा अहवाल तपासला आणि शस्त्रक्रियेचा सर्व खर्च धनादेशाने एकरकमी सुपूर्द केला. मुलीचे वडील प्रारंभी जमा केलेली रक्कम ज्याची त्याला द्यायला निघाले होते, पण आम्ही सुचवले, की पुढच्या औषधोपचाराच्या व फिजिओथेरपीसाठी त्यांनी ती रक्कम वापरावी. आता ती मुलगी हळूहळू बरी होत आहे.
हे सगळे मी इतक्या विस्ताराने एवढ्यासाठी सांगितले, की मित्रांनो! समाजात जसे चोरटे-भामटे असतात तसेच डोळ्यात मदतीची आर्त हाक घेऊन तुमच्यापुढे येणारे लोकही असतात. प्रत्येकवेळी मागणारा अभिनय करत असतोच असे नाही. पूर्वीच्या काही अनुभवांवरुन एकदम मनाची दारे बंद करु नका. माणसे वाचायला शिका. जरा खोलवर जाऊन तपास केलात तर कुणाच्या डोळ्यात लालसा आहे आणि कुणाला खरोखर मदत हवी आहे, हे तुम्हाला उमजेलच.
***
प्रतिक्रिया
8 May 2012 - 3:10 pm | निश
योगप्रभू साहेब, अतिशय अप्रतिम अप्रतिम लेख..
तुम्ही लेखात जे लिहिल आहेत ते एकदम खर आहे.
'जिसका कोई नही उसका खुदा है यारो'
आपल्या कडे जेव्हा कोणी मदत मागायला येईल तेव्हा आपण त्याला नाही न म्हणता, तो सांगतो आहे ते खर आहे की खोट ह्याची आधी माहीती घेउन त्याला होकार कींवा नकार देण उचित ठरेल.
8 May 2012 - 3:17 pm | स्पा
सुंदर लेख हो योगप्रभू
खूप आवडला..
प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात हे पटले
8 May 2012 - 3:29 pm | गवि
अत्यंत सहमत..
काहीजण मुद्दाम पैसे बुडवतात हे अगदी खरं पण एकाने केलेल्या नालायकपणाचा फटका दुसर्याला बसू नये. माणुसकी आटण्यास अशी निष्काळजी माणसे कारणीभूत होऊ नयेत.
9 May 2012 - 10:46 am | पैसा
अगदी पटलं. आणि योगप्रभूचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!!
8 May 2012 - 3:32 pm | मदनबाण
विचार करायला लावणारा सुंदर लेख...
8 May 2012 - 3:38 pm | पियुशा
लेख अन त्यातुन दिलेला संदेश लाख मोलाचा :)
आमच्या इथेच घडलेला एक किस्सा आहे
आमच्या इथले एक स्वीपर काका , त्यांच्या धाकटया मुलीला (वय ४ वर्ष) ब्लड क्यान्सर झाला होता , रुबी हॉस्पिटलला तपासण्या झाल्या CANCER पहिल्या स्टेजवर होता पाळेंमुळे पुर्ण शरिरात पसरली नव्ह्ती तातडीने उपचार केले तर मुलगी पुर्ण बरी होइल असे डॉक्टरांच म्हणन होत .खर्च होता किमान साडे तीन लाख रु.पण कमावणारा एक खाणारे सहा ,परिस्थिती अत्यंत हलाखीची ,मग त्याने त्याचा प्रॉबलेम
असच गावतल्या एका कार्यकर्त्याला सांगीतला, त्याने देखील शिर्डी संस्थान , शनि शिंगणापुर अशा ठी़काणी मुलिचे रिपोर्ट्स पाठ्वले मदतीची याचना केली पण त्यांच्याकडुन काहीच रिस्पॉन्स मिळेना एकडे एकेक दिवस महत्वाचा होता,तो माणुस तर पागल झाला होता फिरुन फिरुन कंपणी स्टाफ अन कामगार ह्यानी काही अंशी मदत केली पण ती अपुरी होती मग आमच्यातल्याच एकाने "पावतीपुस्तक " छापुन वर्गणी गोळा करुन मदत करु असे सूचवले आम्ही ते लगेच अंमलात आणले
पण लोक ना देतील २० २५ रु पण " इतक्या चौकशा करतात की बस्स " काहींनी खरच सढळ हाताने मदत केली :)
आमचे अन त्यांचे मिळुन १.५० लाख जमा झाले ते भरुन .डॉक्टरानी उपचार सुरु केले पण ऊरलेली रक्कम पण त्वरित भरावी लागणार होती मुलीला ३ महिने झाले जवळ जवळ हॉस्पिटल मध्ये उपचारांना उत्तंम प्रतिसाद मिळत होता ,पन हॉस्पिटल स्टाफने बाकीच्या पैशाचा तगादा लावलेलाच होता . (पूण्यात राहयची सोय नाही , खिशात पैसे नाही या दांपत्याने इतर पेशंट चे उरलेले ड्ब्बे खाउन दिवस काढले इतकी वाइट स्थिती ), मग शेवटी ते काका एका वरिश्ठ डॉक्टराना भेटले आपली परिस्थिती सांगीतली ,अन हेच पैसे आपण कसे कसे जमा केले आहेत याचीही कल्पना दीली अन आता मी परिस्थीतीपुढे हतबल आहे हेही सांगीतले दुसर्या दिवशी त्या कांकाचा फोन आला कंपनीत की , " रुबी हॉस्पिटल्.पुणे " यांनी उपचाराचा पुढील खर्च माफ केला आहे ,मुलीच्या उपचारावर जो काही ख्रर्च होणार आहे ते आम्ही बघुन घेउ तुम्ही निश्चिंत रहा असे डॉक्टरानी सागीतले आहे :) आज ती मुलगी पुर्णपणे बरि झाली आहे या जिवघेण्या आजारातुन :)
8 May 2012 - 3:50 pm | गवि
अत्यंत हृदयस्पर्शी.. त्यांच्या अवस्थेची कल्पनाच करवत नाहीये..
त्यांना हा आर्थिक रिलीफ मिळाला म्हणून समाधान आहे .
पण आर्थिक प्रश्न आ वासून उभा असतानाच त्याच्या बरोबर मूळ संकटही आहेच... त्या लहानग्या जिवाला काय हालातून जावं लागत असेल याच्या विचारानेही शहारा येतो आहे.
8 May 2012 - 3:46 pm | सस्नेह
अगदी सत्य अन उद्बोधक लेखन.
पैसा काय किंवा आणखी कोणत्या वस्तू काय, आज आहेत उद्या नाहीत. त्यांचा सांभाळ करता करता माणुसकी विसरून नाही चालत.
त्यातल्या त्यात तारतम्य बाळगून मदत करत राहणे हाच खरा धर्म.
8 May 2012 - 8:31 pm | मन१
ओ काकू त्या "आज आहेत उद्या नाहित" वाल्या वस्तू एखाद्यावेळेस आजच्या दिवसभरातच माझ्या घरच्यांना लागू शकतील ना.
अर्थात त्यांच्यासाठी मी वाट्टेल तो वाइटपना घ्यायला अन दुनियेला नकार द्यायला तयार आहेच.
9 May 2012 - 10:43 am | सस्नेह
मना बेटा, उद्या आपल्यावर वेळ आली तर कुणी मदत करणार नाही याबद्दल तुला इतका कसा रे कॉन्फीडन्स ? कधी कुणाला मदत केलेली दिसत नाही !
अवांतर : तुझी सही अन तुझे विचार यात इतका फरक कसा ? आय डी चोरीची केस तर नाही ?
9 May 2012 - 11:21 am | कुंदन
म्हणुन तर म्हटले आहे "मनाची कवाडे बंद करु नक"
8 May 2012 - 3:48 pm | प्रेरणा पित्रे
लेख फार आवडला.. नाण्याची दुसरी बाजु पटली.. :)
8 May 2012 - 3:49 pm | रणजित चितळे
डोळे उघडवणारा व कानातले खडे काढणारा लेख
8 May 2012 - 3:50 pm | संजय क्षीरसागर
फसवलं जाणं ही आपली माणूस ओळखण्यातली चूक आहे असं मी समजतो त्यामुळे अत्यंत सखोल विचारणा करूनच मदत करतो. मदत मागणारा खरच गरजू असेल तर तो सर्व प्रश्नांना नि:संकोच उत्तरं देतो, याउलट फसवा माणूस मोघम बोलतो आणि त्याला कमालीची घाई असते. एकदा खात्री झाल्यावर मदत इतकी मनःपूर्वक केलेली असते की ती करण्यातच आनंद मिळालेला असतो आणि मग तिचं स्मरणही रहात नाही , या मानसिकतेमुळे कधीही फसवणूक झाली नाही .
8 May 2012 - 5:06 pm | मुक्त विहारि
"फसवलं जाणं ही आपली माणूस ओळखण्यातली चूक आहे असं मी समजतो त्यामुळे अत्यंत सखोल विचारणा करूनच मदत करतो.
मदत मागणारा खरच गरजू असेल तर तो सर्व प्रश्नांना नि:संकोच उत्तरं देतो.
याउलट फसवा माणूस मोघम बोलतो आणि त्याला कमालीची घाई असते."
३ वाक्यातच मदत कुणाला करावी ते सांगीतले.
8 May 2012 - 4:03 pm | इस्पिक राजा
मला व्यक्तिशः दोन्ही लेख पटले योगप्रभू. असे बघा धन्या पण त्याच्या जागी बरोबर होता. एवढ्या जवळच्या लोकांनी एवढ्या वेळा फसवले असेल तर विश्वास कोणावर ठेवावा आणि तुम्ही तर बरोबर आहातच. वस्तुस्थिती पाहुन ज्याने त्याने योग्य तो निर्णय घ्यावा हेच खरे.
8 May 2012 - 4:04 pm | प्रेरणा पित्रे
असे लेख वाचले की मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो... :)
8 May 2012 - 4:37 pm | फारएन्ड
काही प्रतिक्रियाही चांगल्या आहेत.
8 May 2012 - 4:56 pm | स्वातीविशु
डोळे उघडवणारा लेख आवडला. खरोखर माणुसकी टिकवायची असेल तर मनाची कवाडे काही निर्लज्ज माणसांमुळे बंद करु नयेत.
8 May 2012 - 4:59 pm | ५० फक्त
दोन्ही लेख वाचुन एवढंच म्हणेन की मनाची कवाडे बंद करु नका पण खिशाची उघडताना मात्र काळजी घ्या अजुन काय.
8 May 2012 - 7:23 pm | रेवती
लेखन आवडले.
तरीही माझी तीन पुस्तके परत न आल्याची रुखरुख आहे.;)
पैसे एकदा गेले की पुन्हा मिळतात तशी पुस्तकेही मिळतात पण मला ती पुस्तके भेट म्हणून मिळाली होती. त्यावर तसे देणार्याने लिहिलेही होते. मागून नेणार्याला ते समजले असेलच की.
8 May 2012 - 7:59 pm | तिमा
लेख मनाला साद घालणारा आहे. माझे एक स्नेही ,कुणी मदत मागितली तर स्वतः, जिथे रक्कम भरायची आहे तिथे जातात आणि स्वतःच पैसे भरतात त्यामुळे फसण्याचे प्रसंग कमी येतात.
8 May 2012 - 8:27 pm | मन१
लेख उत्तम पण्....
कुणालाही मोठ्या रकमेची तथाकथित मदत करण्यापूर्वी हज्जारदा विचार करण्याच्या निर्णयाशी ठाम आहे.
कुणाला दिलेच तर पुढील मुदतीचा, चेक घेउनच मदत करेन. अर्थात पट्टीचे ठकवणारे ह्यालाही सहज पुरून उरतील ह्याचीही कल्पना आहेच.
समजा माझ्या खात्यावर लाखभर रुपये जमा आहेत कष्टाचे. आणि ह्या मदत वगैरे करण्याच्या भानगडित मला मोठा फटका बसला, निम्म्याहून अधिक रक्कम लंपास झाली अन मलाच काही अर्जंट कुटुंबियांसाठी ऐनवेळेस रक्कम कमी पडली तर ते केवढ्यास पडेल? मी तरी भ्रमिष्ट होइन, मानसिक दृष्ट्या उध्वस्त होइन किंवा जीव द्यायचा विचार मनात येइल इतपत कुटुंबाशी घट्टपणे जोडलेलो आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक असेच असणार ह्याचीही खात्री आहे. दुनिया गेली चुलीत. घरच्यास पुरुन उरलेली रक्कम फार तर द्यायचा विचार करेन, पण तेही अगदि समोरच्यास कटकट्या वटेल इतपत चौकशी करूनच. मुद्दा अतिरंजित वाटेल पण प्रत्यक्ष पाहण्यातही असे किस्से पाहिलेत.
थोडक्यात समोरच्याला रक्कम देताना मी नेहमीच विचार करतो "हाच पैसा घरच्यांच्या इलाजासाठी लागू शकतो का" किंवा "हीच कष्टाने कमावलेली रक्कम मी घरच्यांसाठी सांभाळून ठेवली, कुठे गुंतवली तर भविष्यात कामाला येइल काय"
माझ्या ह्याच वागण्याने थेट घरच्यांशीही वाइटपणा घेउन झालेला आहे. घरी "कुणाच्या तरी कुणाला", एका लांबच्या नातेवाइकास, एरव्ही कधीही जवळ रहात असूनही साधे न भेटणार्या इसमास माणुसकी म्हणून त्याने सांगितलेल्या सबबीवर विश्वास ठेवत पैसे देण्याचे आदेश घरातील ज्येष्ठांनी काढले होते. पण दिले नाहित. बोलणी खाल्ली. नाइलाज होता. झालेल्या त्रासाबद्दल त्या इसमाला आणि घरच्च्यांनाही हात जोडून सॉरी म्हणालो. पण रक्कम दिली नाही.
8 May 2012 - 8:37 pm | निशदे
दोन्ही लेख पटले.
धन्याचे म्हणणेदेखील चूक नाही.
पण माझ्या मते या परिस्थितीत काळे-पांढरे असे सरळसरळ वर्गीकरण करता येत नाही. इथे बर्याचदा व्यक्तिसापेक्ष वागलेले उत्तम.
अनेकदा एखाद्याचे समाजात वागणे, पत, प्रामाणिकपणा यातूनच पैशाची मदत ठरवावी.
त्यातूनही पैसे बुडाल्यास 'अक्कलखाती जमा' म्हणून सोडून द्यावे. पुन्हा सदर माणसाला मदतीचा प्रश्नच येत नाही.
मात्र सर्वच गरजूंना हा न्याय लावणे योग्य नाही हेदेखील पटले.
उत्तम लेख योगप्रभू...... असेच चांगले अनुभव वारंवार तुम्हाला येवोत. :)
8 May 2012 - 9:09 pm | Pearl
लेख चांगला आहे. आवडला.
आणि काही प्रतिक्रियाही छान आहेत.
१) कुणी मदत मागितली तर स्वतः, जिथे रक्कम भरायची आहे तिथे जावे आणि स्वतःच पैसे भरावे हे आवडले. ह्यानी फसवणूक व्हायची शक्यता कमी होते.
२) "फसवलं जाणं ही आपली माणूस ओळखण्यातली चूक आहे असं मी समजतो त्यामुळे अत्यंत सखोल विचारणा करूनच मदत करतो.
मदत मागणारा खरच गरजू असेल तर तो सर्व प्रश्नांना नि:संकोच उत्तरं देतो.
याउलट फसवा माणूस मोघम बोलतो आणि त्याला कमालीची घाई असते."
हे पण आवडलं.
8 May 2012 - 9:43 pm | नितिन थत्ते
छान लेख.
लेख वाचून हे आठवले.
8 May 2012 - 10:06 pm | कुंदन
हे सोयीस्कर रित्या आठवले नाही ना ;-)
http://www.misalpav.com/node/12334