दाबेली (प्रतिसाद)
मूळ लिंक http://www.misalpav.com/node/21166
खरे तर ह्या पाकक्रुतीला प्रतिसाद देणार होतो. पण तो खूप मोठा झाल्याने वेगळा लेख टाकत आहे....
----------------------------------------------------------------------------------
काही, काही पदार्थ नुसतेच खाल्ले जात नाहीत.डोसा, इडली हे पदार्थ चटणी किंवा सांभाराबरोबर.(एक वेळ तुम्ही हरिणाला सांबर किंवा , सांबराला हरीण म्हटले तरी चालेल,पण सांभाराला, सांबार असे म्हणणे अजिबात चालत नाही.)
एकदा चुकून मी सांभाराला ,सांबार असे म्हणालो म्हणून माझी मद्रासी मैत्रीण मला सोडून गेली आणि मला मग इडली आणि डोशांसाठी मला टपरी शोधायला लागली. अर्थात मला तरी ती इष्टापत्तीच ठरली.त्यामुळे विविध चवींच्या इडल्या आणि डोसे खायला मिळाले.
उत्तम वडा-पाव गाडीवर तसेच हे पदार्थ टपरीवर हा अलिखित नियम आहे."यम" पण हे पदार्थ खात असतांना येत नाही, असे ऐकिवात आहे.तुम्ही कधी वाचले आहे काय. की बाबा "टपरीवर इडली खातांना अमुक-तमुक व्यक्तीला यमराजांनी तातडीने बोलावून घेतले" असे.
भात हा रश्श्या, रस्सम, सांभाराबरोबर जास्त घेवून थोडा ताक, दही ह्या बरोबर खावा.
भाकरी आणि चपाती पण असेच काही तरी बरोबर असल्याशिवाय नुसते खाता येत नाहीत.
पाव हा पण असाच प्रकार.नुसता पाव खाणारे हे केवळ परीस्थितिला आधी शरण जावून मग हा मार्ग अवलंबणारे.
फार पूर्वी "पावाचा" उपयोग धर्म बाटवण्यासाठी करत असत.इतिहासात एखाद्या अन्न पदार्थाचा असा वापर परत झाला नाही.वामनाने ३ पावलात ब्रम्हांड पालथे घातले होते असे म्हणतात.आज-काल मात्र "पाव" ह्याएकाच पदार्थाने संपूर्ण पृथ्वीतलावरराज्य सुरु केले आहे.
"Aish Merahrah" ह्या इजिप्तच्या पावाच्या प्रकारापासून ते थेट " Zwieback" ह्या जर्मन प्रकारा पर्यंत
पावाचे A टू Z असे शेकडो प्रकार आहेत.पाव बनवणे आणि तो योग्य प्रकारे टिकवणे हे "शास्त्र" आहेच पण हा पदार्थ योग्य त्या पदार्था बरोबर खाणे ही "कला" आहे.
लहानपणी हा "बन-पावचे" रूप घेवून दुधाबरोबर आला.मला दुध पिण्यासाठी खूप प्रलोभने दाखवल्या गेली.पार "अश्वताथ्मा" ते "फेरेडॉल" पर्यंत.ते दुध बन-पावाबरोबर जास्त शोषल्या जात असल्याने मी त्या बन-पावा बरोबर तह केला.शाळा सुटली आणि मग तो बन-पाव आणि दुध, दुसरे घर शोधायला गेले.मग हा "पाव"कधी आम्लेट आणि भुर्जी बरोबर तर कधी मिसळ आणि वडे ह्या सोबत आला.मी तरी पाव ह्याच ४ आणि पाव-भाजीची भाजी ह्याच ५व्या पदार्थांबरोबर खातो.भज्जी आणि सामोसे ह्यांच्या बरोबर पाव खाणारे केवळ पावाचाच नाही तर समस्त खवय्ये मंडळींचा अपमान करतात.(ते "दही-मिसळ" खाणारे पण असेच.ते तर काय कारल्याची भाजी पण लग्नात ठेवतील.)
हे एक वेळ ठीक आहे हो पण "दाबेली" म्हणजे नुसता उच्छाद.एकतर बटाट्यात काही गोड घालणे हाच त्या बटाट्यांचा अपमान आणि वरून त्याला आंबटपणा आणण्यासाठी "चिंच".(१८ वर्षानंतर आवडीने "चिंच" आणि "बोरे" खाणारे पुरुष मी तरी फार कमी बघितले आहेत.आंबटपणासाठी "लिंबू" उत्तम.१८ वर्ष पूर्ण झाली की ज्याच्या आधी डोक्यावरून लिंबू ओवाळून आणि मग त्या व्यक्तीला घरादारावर ओवाळून बाहेरच्या जगात सोडले जाते त्याच जातीत आम्ही मोडतो.मग तेच ओवाळलेले लिंबू वापरून स्वत:वर उपचार करून घेतो.देवाने "लिंबू" निर्माण करून बऱ्याच "लिंबू-टिम्बुंची" सोय करून ठेवली आहे.लहानपणी "लिंबूटिंबू" हा शब्द खेळतांना का वापरतात हे मोठेपणी सुरापान करतांना समजले.)
ह्या "दाबेली" वरून आठवले, साखरपुडा ते लग्न हा नव-दाम्पत्याचा सुखाचा काळ असे म्हणतात.१७६० जणींनी आमच्या बरोबर सुखाचा संसार करायला नकार दिला.रोज सुरापान करणाऱ्यात त्यांना, सुर न दिसता असुर दिसला म्हणे.शेवटी एक जण कशी-बशी तयार झाली.रोज-रोज डोंबिवलीतील विविध हॉटेलांना भेटी देवूनपण माझी होणारी बायको नंतर कंटाळवाणी दिसायला लागली.वेळीच लक्ष देणे भाग होते.म्हणून मग आधी मित्रांच्या सल्ल्याने साडी देवून बघितली, कोल्ड कॉफी झाली तरी पण पहिले पाढे पंचावन्न.मग विचारले की बाईग तुला नक्की काय हवे आहे.तर म्हणाली "दाबेली".आता ही गोष्ट मिळते कुठे मला काही माहित न्हवते.तर तीच मला घेवून गेली.बघितले तर काय.मी नेहमीच बघत असलेली "कच्छी दाबेली".(एक दिवस मित्राला विचारले होते की हा काय प्रकार? तर तो म्हणाला,"आरं गड्या ते बाई माणसांचे खाणे हाय. आपल्यासाठी नाय." मित्राचे ऐकून न्हवते खाल्ले.)पण त्या "सा.पु.ते.ल. (साखरपुडा ते लग्न) काळात वाग्धत्त वधूला काय नाही म्हणनार?.काय नियम वगैरे आहेत की नाही?.
मनाची तयारी करून गेलो.त्या दाबेलीवाल्याने आधी तो "बन-पाव" फाडला.एक तर शाळा आणि बनपाव एकाच वेळी सोडलेले.ठीक आहे बाबा दे बाबा "बन-पाव".तर नाही म्हणून त्याने त्याला कसली तरी लाल चटणी लावली.म्हणालो आता तरी दे.त्याचा परत नकार.आता हा बल्लव काय देईल ते कुणास ठावूक? बायकोला पण माझे हे "दाबेली" बाबतीत अगाध ज्ञान बघून हे कसले ध्यान तिच्या ओढणीला बांधल्या गेले आहे ह्याची चुणूक कळाली.(साडी द्यायला त्यांच्या घराची आर्थिक व जीन्स घालायची तिची शारीरिक कुवत न्हवती).मग त्याने त्यात ती बटाट्याची भाजी कोंबली.थोडे शेंग-दाणे घातले (बटाट्याचा अजून एक अपमान).मग त्याने तो प्रकार त्याला पिवळे लोणी लावून थोडे भाजल्याचा आभास निर्माण केला.आता तरी देईल असे वाटले, तर बायको वदली (इतर लोकांच्या मते किंचाळली.नंतर मी पण लोकांचे हे मत मान्य केले...."सापुतेल" काळात अशा बर्याच सत्य गोष्टी वाग्दत्त वधू समोर बोलता येत नाही आणि लग्ना नंतर सवय झाल्याने पुढेपण बोलता येत नाहित)
हां तर काय सांगत होतो , माझी वाग्दत्त वधु किंचाळली, "ये क्या भैय्या थोडा डाळिंब के दाणे और थोडे द्राक्ष डालो".(ती १००% मुंबईकर आहे.)मग त्याने परत त्यात हे पदार्थ टाकले.डाळिंब, द्राक्ष, मोसंबी हे पदार्थ.(हो पदार्थच.... आंबा,चिक्कू,केळी ही खरी फळे). आपण आजारी पडलो की आपण आजारी आहोत हे जगाला कळावे म्हणून घरात आपल्याला दाखवायला म्हणून आणतात.आणि इतर लोकच खावून जातात.मी एका बैठकीत ४/५ कलिंगडे सहज हाणू शकतो पण अद्याप मी एक आख्खे डाळिंब आणि मोसंब संपवू शकलेलो नाही.
डाळींबाचे दाणे आणि द्राक्ष असे पावात आणि बटाट्याच्या घालून खाण्यापुर्वीच डोळ्यातून पाणी आले.कारण समजले तर कांदा.आंबट-गोड, खारट बटाट्या बरोबरआणि शिवाय डाळींबाचे दाणे आणि द्राक्षाबरोबर, चक्क कांदा.(मी तर उद्या लोक "श्रीखंडाला लसणीची फोडणी" देवून ती खात आहेत आणि एक मेकांना ती शिफारीश पण करत आहेत असे पण दृश्य बघायला मनाची तयारी केली आहे.)
अय्या कित्ती टेस्टी!!! असे म्हणून तिने तो पदार्थ खायला (आम्ही स्वगत....गिळायला,ओरपायला) सुरुवात केली.आता इथ पर्यंत आमचे ग्रह ठीक चालले होते.मग एकदमच वक्री झाले.
सहज तिच्या लक्षात आले की अरे हा तर काहीच खात नाही आहे.तिने आधी थोडी विनंती केली.दाबेली खावून मग दारू पिणे काही योग्य कॉम्बिनेशन नाही आहे.त्यामुळे मी हसून नाही म्हणालो.तिला तो तिच्या स्त्रीत्वाचा अपमान का काहीसेसे वाटले.त्यामुळे तिने मला तो घास भरवला.आणि मी तो एका क्षणात थुंकून टाकला.त्याच क्षणी मी लग्न मोडले.तिने मला भरवलेला पहिलाच घास, शेवटचा ठरला.
यथावकाश दुसरे जे स्थळ आधी आले ते स्वीकारले.लग्ना आधी कुठे ही इकडे-तिकडे न फिरता लग्न केले.एक दिवस मी आणि बायको फिरायला गेलो.सहज म्हणून विचारले "दाबेली" खाणार.तिने चक्क नकार दिला.आवडत नाहीम्हणाली.आपण खूष.त्या खुषीत महाराज चक्क गजरा विकत घेतला.बायकोला घरी सोडून आम्ही "अस्वले" (म्हणजे बियर ) आणायला गेलो.येतांना बायकोसाठी आईस-क्रीम आणले.घरी मस्त सुवास सुटला होता.बियर स्टीलच्या ग्लासात ओतली (आम्ही पूर्ण वर्ष भर एकच ग्लास वापरतो उगाच ड्राय-डेला एक आणि इतर दिवशी वेगळा असली भानगड नाही आणि खरे तर आर्थिक कुवत पण नाही.१०० रु.च्या बियरला १०००रु. चा ग्लास काय कामाचा?.बरे मुले तर महाभारतकाळ सोडून डायरेक्ट ह्या काळात आलेली त्यामुळे अस्त्र म्हणून सुपारी ते कुंकवाचा डबा काही पण चालते त्यांना).चकणा म्हणून बघतो तर "दाबेली".(भोगा आपल्या कर्माची फळे).
बायकोला विचारले तर म्हणाली बाहेरची आवडत नाही म्हणाली."सानिकास्वप्निल" नावाच्या एका मैत्रिणीने आंतर-जालेवर टाकली आहे म्हणाली.लग्न झाल्यामुळे नकाराला काहीच अर्थ न्हवता (अगदी कस्पटा एव्हढा सुध्धा).सहज चाखून बघितले तर छान चव लागली.म्हणजे ह्या "सानिकास्वप्निल" ताईंनी पाकक्रूती व्यवस्थित दिलेली दिसत आहे.
शेवटी काय, तर पदार्थातले घटक महत्वाचे आहेतच, पण पदार्थ सुंदर होतो ते कृतीने, आणि ते बनवत असलेल्या व्यक्तीच्या आणि त्या पाककृतीच्या केलेचा आस्वाद घेणार्या व्यक्तींच्या एक-मेकांवरील प्रेमाने आणि विश्वासाने....
प्रतिक्रिया
26 Apr 2012 - 2:15 pm | गणपा
हा हा हा मस्त खुस खुशीत 'प्रतिसाद'. ;)
26 Apr 2012 - 2:15 pm | इरसाल
खतरनाक आहे.
आव्ड्ले आव्ड्ले आव्ड्ले
26 Apr 2012 - 2:32 pm | नि३सोलपुरकर
सायबानु दाबेली मस्त बनली आहे.
ह. ह.पु.
26 Apr 2012 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार
चव आवडल्या गेली आहे.
26 Apr 2012 - 2:52 pm | मदनबाण
हा.हाहा... :)
माझी बायडी इथली पाकॄ आवडीने वाचते,मिपा वाचन करुन मला पदार्थ / भाजी करुन खायला घालते ! :) मिपाचा आजवरचा सगळ्यात मोठ्ठा फायदा मला झाला आहे. ;)
26 Apr 2012 - 3:03 pm | मेघवेडा
हा हा हा.. खुसखुशीत!
26 Apr 2012 - 3:04 pm | स्पा
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))
26 Apr 2012 - 3:24 pm | चिगो
दाबेलीपुराण आवडले..
26 Apr 2012 - 3:25 pm | गवि
मस्त...टेसदार धागा..
26 Apr 2012 - 4:01 pm | प्रचेतस
हेच म्हणतो. झक्कास.
26 Apr 2012 - 3:47 pm | सूड
मस्त !! आवडलं लिखाण.
26 Apr 2012 - 3:59 pm | चाणक्य
लिहिलं आहे. आवड्या
(माझा एक मित्र या 'कच्छी दाबेली' ला 'कच्चं दाबलेलं' म्हणायचा)
26 Apr 2012 - 4:35 pm | प्रभाकर पेठकर
व्वा फार मस्तं खुसखुशीत लेख.
दाबेलीला प्रमाणाबाहेर दूषणे देऊन झाल्यावर शेवटच्या दोन ओळीत तरी दाबेलीचा स्विकार झाल्याचे पाहून बरे वाटले.
26 Apr 2012 - 5:06 pm | मुक्त विहारि
त्या ताईंनी एव्हढी मस्त पाक्-क्रुती दिली आहे की.... "दाबेली-द्वेष्टा" पण निदान एकदा तरी ती खावून बघेलच बघेल...(आम्ही तर आधी बायकोच्या धाकाने एक तुकडा खाल्ला आणि मग नंतर चव आवडली म्हणून ३/४ दाबेल्या खाल्ल्या)
26 Apr 2012 - 5:05 pm | मुक्त विहारि
त्या ताईंनी एव्हढी मस्त पाक्-क्रुती दिली आहे की.... "दाबेली-द्वेष्टा" पण निदान एकदा तरी ती खावून बघेलच बघेल...(आम्ही तर आधी बायकोच्या धाकाने एक तुकडा खाल्ला आणि मग नंतर चव आवडली म्हणून ३/४ दाबेल्या खाल्ल्या)
26 Apr 2012 - 5:05 pm | सानिकास्वप्निल
अबब! एवढा मोठा प्रतिसाद :P
खूप आवडले लेखन / प्रतिसाद एकदम रुचकर :)
पेठकर काकांशी सहमत दाबेलीचा स्विकार केल्याबद्दल मंडळ आभारी आहे :)
26 Apr 2012 - 5:07 pm | ५० फक्त
मस्त एकदम आवडलं लिखाण, धन्यवाद.
26 Apr 2012 - 5:58 pm | रेवती
हुश्श्य! आवडली दाबेली एकदाची!;)
लेखन आवडले.
26 Apr 2012 - 6:24 pm | संजय क्षीरसागर
बायकोला गजरा -आईस्क्रिम आणि स्वतःला बिअर इतकं आजूबाजूच डेकोरेशन केल्यावर कुणीही दाबून हाणणार!
शीर्षकात मात्र तू < स्ट्राँग> हे बिअरला म्हटलंय? का कच्छी दाबेलीला? का कच्छी दाबेली खावून दिलेल्या प्रतिसादाला? ते ज्याम कळलं नाही!
28 Apr 2012 - 1:08 pm | मुक्त विहारि
तिघांनाही...
26 Apr 2012 - 6:25 pm | निश
मुक्त विहारि साहेब, अतिशय मस्त लेख आहे.
हा लेख वाचुन आधीच वजनी असलेला मी बहुतेक अंमळ जरा अजुनच वजनी होऊन अस वाटत आहे.
26 Apr 2012 - 6:36 pm | बॅटमॅन
जबरा लेख. त्यातला हा भाग
>>काही, काही पदार्थ नुसतेच खाल्ले जात नाहीत.डोसा, इडली हे पदार्थ चटणी किंवा सांभाराबरोबर.(एक वेळ तुम्ही हरिणाला सांबर किंवा , सांबराला हरीण म्हटले तरी चालेल,पण सांभाराला, सांबार असे म्हणणे अजिबात चालत नाही.)
एकदा चुकून मी सांभाराला ,सांबार असे म्हणालो म्हणून माझी मद्रासी मैत्रीण मला सोडून गेली आणि मला मग इडली आणि डोशांसाठी मला टपरी शोधायला लागली. अर्थात मला तरी ती इष्टापत्तीच ठरली.त्यामुळे विविध चवींच्या इडल्या आणि डोसे खायला मिळाले.
वाचून सांभाराच्या इतिहासाबद्दल एक मस्त कथा ऐकली होती ती सांगतो.
स्थळः तंजावूरच्या भोसले राजघराण्याच्या राजवाड्यातील मुख्य स्वयंपाकघर,
काळः इ.स. १६८४-१७१२ मध्ये कधीतरी.
स्वराज्यसंस्थापक शिवछत्रपतींचे सावत्र भाऊ जे व्यंकोजी, त्यांचे थोरले सुपुत्र शाहुजी/शहाजी हे तंजावरचे त्या काळातील राजे होते. टिपिकल मराठा गड्याप्रमाणे त्यांनाही आमसुल वगैरे घालून केलेली आमटी लै आवडायची. येका वर्षी त्यांच्याकडे त्यांचे 'कझिन' बंधू संभाजी आले होते. नेमकी तेव्हाच महाराष्ट्रातून आणलेली आमसुले संपली. मग आमटीत आंबटपणा कसा आणायचा? हा प्रश्न पडला. मुख्य आचारी म्हणाला की लोकल लोक चिंच वापरतात. मग राजाज्ञा झाली आणि डाळीत चिंच, तसेच सोबत अनेक भाज्या घालून एक मस्त डिश तयार करण्यात आली. संभाजी व इतर दरबार्यांना खिलवली गेली. सर्वांना डिश जाम आवडली. संभाजी आला असताना ही डिश तयार केली गेली, सबब हिचे नाव 'सांबार' पडले.
संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Sambar_%28dish%29#History
http://www.hindu.com/fr/2004/07/16/stories/2004071602510600.htm
http://www.zine5.com/archive/pad08.htm
महान इतिहासकार श्री. गजानन मेहेंदळे यांनी सांगितल्यानुसार 'सांबारे' नामक पदार्थ सवाई माधवरावाच्या लग्नात बनविला गेला होता. हा पदार्थ कसा करतात? त्याचे या सौदिंडियन सांबाराशी काही साधर्म्य आहे का?
मराठी लोकांचे भारतीय संस्कृतीच्या विकासात आणखी काय योगदान असेल ते असो, परंतु सांबाररूपाने हे जे योगदान दिलेले आहे, त्याला तोड नाही!! समस्त सौदिंडियनांना सांगा,
'ते आम्ही, मुदपाकगेहिं जिथल्या सांबार हो शोधिले' :)
(सांबाराचा आणि ते शोधणार्या तंजावुरी मराठ्यांचा कट्टर फॅन)
27 Apr 2012 - 10:29 am | मृत्युन्जय
जियो बॅट्मॅन. या लिंकाचा ऐ उपेग होणार अहे आम्हाला ( काही जुने स्कोर सेटल करण्यासाठी ;) ). धन्यवाद :)
27 Apr 2012 - 11:38 am | बॅटमॅन
धन्यवाद मृत्युंजय. करा करा स्कोर सेटल आणि आम्हालापण कळवा काय होते ते ;) मराठी पाऊल पडते पुढे!
27 Apr 2012 - 8:44 pm | अस्वस्थामा
आपला प्रतिसाद वापरून आम्ही आमच्या समस्त सौदिंडियन मित्र मंडळींवर एकहाती हल्ला बोल केलेला आहे.. हर हर महादेव...
28 Apr 2012 - 12:36 am | बॅटमॅन
हर हर महादेव!!!!
26 Apr 2012 - 6:54 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
खीखीखी
मी पण. मला तर डाळिंब म्हटले की नखांना लागणारी जिभाळी आठवते..
डाळींब खायला शिकवा राव कुणीतरी.
मागे कुठेतरी 'डाळींब सोलण्याची कला' असला धागा उडतउडत वाचला होता.
26 Apr 2012 - 9:08 pm | पैसा
मस्त खुसखुशीत लेख! सगले पंचेस लैच आवडले!
बॅटमॅन, (अननसाचे वगैरे) सांबारे हा पदार्थ महाराष्ट्रातही प्रभू जातीत पूर्वापार पारंपरिक रीत्या बनवला जातो. त्याची व्युत्पत्ती नेमकी कशी असावी याबद्दल काही अंदाज नाही, पण व्यंकोजी राजांची कथा मात्र मनोरंजक आहे!
26 Apr 2012 - 11:11 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद पैसातै :)
बरं मग अननसाचे सांबारे वगैरे जे बनवितात, ते मी कधी पाहिले नाही म्हणून विचारतो, ते सौदिंडियन सांबाराशी जरा तरी सिमिलर आहे का? जमल्यास ब्रीफलि पाकृ डिस्क्रैब करून टाकावी अशी येक(नम्र) विनंती.
( सांबार व रसमची बॅरेल्स व सोबत भाताचे ढिगारे रिचविण्याची फँटसी असलेला) बॅटमॅन.
26 Apr 2012 - 11:36 pm | पैसा
ही कृती सी के पी लोकांची आहे.
१. तुपात जिर्याची फोडणी करणे, त्यात वाटलेल्या मिरच्या घालणे.
२. फोडणीत चिमूटभर हळद, चमचाभर तांदुळाचे पीठ कालवलेले २ कप पाणी , चवीपुरती साखर आणि मीठ आणि अननसाचे तुकडे घालून शिजवणे.
३. एका नारळाचे दूध घालून उकळी यायच्या बेतात आलं की गॅस बंद करा, मग भाताबरोबर खा, किंवा नुसतंच ओरपा.
मात्र त्यांची वडीच्या सांबाराची जी कृती आहे ती काहीशी वरणफळांसारखी आहे. बेसनाच्या वड्या भाजलेल्या कांदा-खोबरं-गरम मसाल्याच्या ग्रेव्हीत घालून शिजवायच्या.
थोडक्यात म्हणजे भाताबरोबर घ्यायच्या पातळ पदार्थाला हे लोक सांबारे म्हणत असावेत. सी के पी लोकांची पदार्थांची नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, भुजणे, मिरवणी, गोळवणी वगैरे. ही नावं कुठून आली असावीत यावर काही संशोधन करता येतंय का बघा बरं!
26 Apr 2012 - 11:48 pm | बॅटमॅन
थ्यांक्यु बरं का पाकृबद्दल :) नारळाचे दूध वगैरे येकदम वेगळं आन विंट्रेष्टिंग हाये सगळं..आता "अननसाचे" सांबारे हे भारतात अननस आल्यावरच झालेले असणार हे तर नक्कीच..ते पोर्तुगीजांनी आणले म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी बाळाजी आवजी चित्र्यांनी खाल्लेले असेल की नाही माहिती नाही पण पेशवाई काळात मात्र नक्की ओरपल्या गेले असेल हे नक्की ;)
>>थोडक्यात म्हणजे भाताबरोबर घ्यायच्या पातळ पदार्थाला हे लोक सांबारे म्हणत असावेत.
असेच म्हणतो. बाकी गोनीदांच्या कादंबरीमय शिवकालात "धिरडे-गुळवणी" असा पदार्थ वाचलेला आठवतोय, पण बाकी काहीच माहिती नाही.
(खाणे सोडून बाकी घंटा काही माहिती नसलेला परंतु खाद्यसंस्कृतीच्या इतिहासाबद्दल अमाप कुतूहल असलेला)
27 Apr 2012 - 6:25 am | स्पंदना
>>धिरडे-गुळवणी>>
धिरडी म्हणजे जवळ जवळ आंबोळीचाच प्रकार, पण गुळवणी म्हणजे भरपुर पाण्यात गुळ घालुन त्याला उकळी आणतात, अन वाढायच्या आधी दुध मिसळतात. आमच्या गावी पोळीच गावजेवण असेल तर एव्हढ दुध कोठुन आणाय्च म्हणौन असेल पण् ताटाला द्रोणात गुळवणी वाढायचे लहाणपणी. आणखी एक या जेवणाची पोळी एव्हढी गोड पण नसायची, मे बी गुळवणी बरोबर म्हणुन असेल तस. याच गुळवणीला थोडीशी वेलची असते.
पण धिरडी गुळवणी हा प्रकार जरा वेगळा आहे. तांदुळ सकाळी सकाळी एक नारळ फोडुन त्या नारळाच्या पाण्यात भिजवायचे. एक तासाभरात जेव्हढे भिजतील तेव्हढे बास होतात. आता हे छानसे मिक्सरवर बारिक करुन त्याची धिरडी काढायची, अन ती काढताना तव्याला कांदा वापरुन तेल लावायच( कांदा अर्धा कापायचा अन काट्याचमच्याला लटकवायचा, अन तो वापरुन तेल पसरायच तव्यावर.)
आता या बरोबरची गुळवणी, तो जो फोडलेला नारळ आहे ना? त्याच मिक्सरवर बारिक करुन छान घट्ट दुध काढायच. त्यात थोडा गुळ न जायफळाची रेघ ( जायफळ सहाणेवर उगळ की काही वेगळाच वास देउन जात) . अन मग मस्त वरपायच.
27 Apr 2012 - 1:00 pm | बॅटमॅन
वा वा वा वा!!!! धिरडे माहिती होते, पण सर्व वर्णन वाचून धिरडे गुळवणी हा प्रकार अल्टिमेट वाटतो आहे एकदम. आऊसाहेबांना आता बनवायला सांगतोच लग्गेच घरला गेलो की :)
(चविष्ट पदार्थांबरोबरच चविष्ट वर्णनानेही खतरनाक भूक चाळवली जाणारा)
26 Apr 2012 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा
हसी बहुत दाबेली,ल्येकिन भायेरच पड्ती है..पढते पढते...
27 Apr 2012 - 12:52 am | पाषाणभेद
:-)
एकदम खुसखुशीत लेख.
27 Apr 2012 - 6:38 pm | शुचि
हाहाहा मस्त प्रतिसाद!!!!! मी मेले वाचून.
27 Apr 2012 - 6:31 am | स्पंदना
अच्छा ! एकुण भैयाच्या हातची नाही आवडत तर तुम्हाला, पण बायकोच्या हातची मात्र हाण-हाणली? ( नाही तर बायको न हाणल असत का?)
बाकि सुर- असुर,लग्नात कारल्याची भाजी, जिन्सची शारिरीक कुवत, हे पंचेस लय भारी.
पण एक गोष्ट लक्षात आली का मुवी? एव्हढे दणादण बोक्सिंग करुन शेवटाला हार तुमचीच झाली नाही का?नाही म्हण्जे दाबेली मुकाट खायला लागलात ना?
28 Apr 2012 - 1:11 pm | मुक्त विहारि
"पण एक गोष्ट लक्षात आली का मुवी? एव्हढे दणादण बोक्सिंग करुन शेवटाला हार तुमचीच झाली नाही का?नाही म्हण्जे दाबेली मुकाट खायला लागलात ना?"
काय करणार? लग्न झालेल्या पुरुषांचे भोग आहेत हे...
27 Apr 2012 - 12:12 pm | गवि
दाबेली आणि डबलरोटी यात काही फरक आहे का?
धन्यवाद.
27 Apr 2012 - 12:33 pm | प्रभाकर पेठकर
काय गविसाहेब,
जरा गुगला की....
27 Apr 2012 - 12:49 pm | गवि
बस का पेठकरकाका.. आता तसं गूगलल्यावर तर मुदलातली दाबेलीची पाककृतीही शंभर ठिकाणी मिळेल.
मित्रमंडळ गप्पा रंगवून बसलेलं असताना चालू विषयावर आपल्या मनात शंका आली तर आपण समोरच्या बैठकीतल्या मित्रांना विचारतो की आधी गूगलून पाहतो..??
समजा प्रास आणि मी हाटेलीत बसलो आहोत आणि मला अचानक भूनिंबादि काढ्याचा नेमका काय इफेक्ट असतो अशी शंका आली तर तिथेच मी वैद्यराज प्रासना आधी विचारीन.. हां त्या ऐवजी हातातल्या मोबाईलवर भूनिंबादि असा शब्द टंकला तर मला हिस्ट्री-जॉग्रफी मिळेल हे खरंच.. :)
मिपा ही मित्रांची चोवीसतास चालू राहणारी गप्पायुक्त मैफिल आहे असं मी समजतो.
27 Apr 2012 - 1:21 pm | प्रभाकर पेठकर
मित्रमंडळ गप्पा रंगवून बसलेलं असताना चालू विषयावर आपल्या मनात शंका आली तर आपण समोरच्या बैठकीतल्या मित्रांना विचारतो की आधी गूगलून पाहतो..??....
..... मित्रांची चोवीसतास चालू राहणारी गप्पायुक्त मैफिल आहे असं मी समजतो.
चला हे एक बरं झालं. आता कोणी कोणाकडे कुठल्या लिंका मागायला नकोत आणि कोणी कोणाला द्यायला नकोत.
मलाही एक माहिती हवी होती.
डबलरोटी आणि पावारोटी ह्यात काय फरक आहे??
27 Apr 2012 - 1:32 pm | गवि
असा काही रोख नव्हता आणि तुम्हाला तसं वाटलं असेल तर त्याचं वाईट वाटलं.
एकूण या विषयावर चर्चा चालू होती आणि त्यात आलेली शंका वाचनाच्या ओघात विचारली. शंकेलाही कारण हे की नुकतेच गर्दीच्या एका स्टॉलवर व्हेंडरने कोणालातरी "डबलरोटी देवू की दाबेली?" असं विचारल्याचं ऐकलं. त्याच्याकडे कडक वाटणारे मोठे गोल पाव आणि नेहमीचे चौकोनी मऊसर लादीपाव अशा दोन व्हरायटीज दिसत होत्या. बाकी मटेरियल एकच दिसत होतं. मी जाताजाता हा संवाद ऐकला आणि गर्दीमुळे तत्क्षणी त्या विक्रेत्याकडून शंकासमाधान करुन घेऊ शकलो नाही.
गूगल करुन पाहिलं नव्हतं हे खरंच. जाऊदे. माझ्याकडून पूर्णविराम..
27 Apr 2012 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर
उद्देश नसतानाही चर्चा जरा गंभीर झाली. मी मजेमजेत लिहीत होतो. हसतं खेळतं वातावरण गंभीर झाल्याबद्दल (आणि त्याला माझा प्रतिसाद कारणीभूत असल्यामुळे) क्षमस्व. कृपया राग मानू नये.
दाबेली आणि डबलरोटी ह्यात फरक काय?
माझ्या मते डबलरोटी म्हणजे पाव आणि त्यावर संस्कार करून (पाककृतीत दिल्याप्रमाणे) दाबेली बनवितात.
त्या विक्रेत्याच्या 'डबलरोटी देऊ की दाबेली?' ह्या प्रश्नाचा अर्थ, एकूण प्रसंग, त्याच्याकडे उपलब्ध पदार्थ आणि 'त्या' गिर्हाईकाने मागवलेला पदार्थ ह्या सर्व गोष्टींना विचारात घेऊन, ओळखावा लागेल असे वाटते. असो.
27 Apr 2012 - 6:37 pm | शुचि
हाहाहा ..... अफलातून विनोदी झाला आहे लेख =))
27 Apr 2012 - 7:42 pm | तिमा
मला तर कित्येक दिवस, लोकलमधल्या लेडीज डब्याच्या गर्दीत चिरडल्या गेलेल्या स्त्रीला 'दाबेली' म्हणतात, असे वाटायचे.
28 Apr 2012 - 12:33 am | बॅटमॅन
ज ह ब ह रा!!!!!!!!!!!!!!!!!!!!
28 Apr 2012 - 3:25 pm | साती
नश्शीब, हेच आणि एवढंच वाटायचं!
28 Apr 2012 - 3:35 pm | साती
मस्त झालीय दाबेली.
आमच्या हातून पण एकदा तिकडच्या स्वारीला दाबेली खाऊ घालण्याचा प्रमाद घडला होता.
अगदी अश्शाच प्रतिक्रीया.
पण त्यावेळी ऑलरेडी लग्न होऊन काही वर्षे झाल्याने कोणी कोणाला सोडले नाही (स्वारीने मला किंवा मी दाबेलीला)).
28 Apr 2012 - 10:42 pm | मुक्त विहारि
लय भारी....