मला समजलेले चिऊ आणि काऊ

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Apr 2012 - 10:45 am

मूळ प्रेरणादायी लेख http://www.misalpav.com/node/21326

प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की ही कथा केवळ चिऊ आणि काऊची नाही, ती आदीम `मानवप्रेमाची ' प्रतिकात्मक करूण कहाणी आहे.

काऊचा अर्थ चिऊचा पती इतकाच नसून `कावलेला' किंवा मनातून कावलेला पण बाहेरून काऊ (इथे इंग्रजीतील `काऊ' म्हणजे `गायीसारखा गरीब' असा अर्थ आहे,.... लेखकाचं भाषाप्रभुत्व लक्षात घ्या)

>तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती.

ही कथेची मध्यवर्ती संकल्पना आहे, `स्री थोडक्यात तृप्त असते पण पुरूष कायम सेटींगच्या मागे' हा अनादीक्रम लेखकानं सुरूवातीला मांडला आहे.

>काऊ तुझे जेवुन झाले की संग मग आपण गप्पा मारु" काऊ म्हणायच दिवसभर दगदग करुन वैताग आलाय त्यामुळे मला झोप आलिय आपण उद्या बोलु नक्की"

झोप हाच खरा मानवी शत्रू आहे आणि तो पुरूषाला अवेळी घेरतो (नेहमीचा अनुभव म्हणजे `पुरूष कायम जागा आणि स्त्री लगेच झोपेच्या स्वाधिन होते' या वाचकांच्या मूळ धारणांनाच लेखकानं शह दिलायं हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे)

>काऊ म्हणे "काय बोलतेस रोज रोज आय लव यु! मला माहित आहे तुझ माझ्यावरिल प्रेम" चिऊ म्हणे "अरे राजा मी फ़क्त ते व्यक्त करत असते रे जरी तुला माहित असेल तरीही"

इथे लेखकानं स्त्री सुलभ लज्जेचं बेमालूम वर्णन केलंय पण ते वाचकांच्या सहज लक्षात येण्यासारखं नाही. जर चिऊ `आय लव यु!' च्या ऐवजी नुसती `काऊ लव मी' म्हणाली असती तर गोष्ट तिथेच संपली असती हे लेखकानं हेरलंय.

>तो चिऊला म्हटला"अग चिऊ मल तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे" चीउ म्हटली "सगळ सांग राजा पण आधी बस,जेवुन घे,आरम कर आणि मग सांग"

इथे लेखकानी संयमाची परिसिमा काय असते ते दाखवलंय, काहीही झालं तरी आधी जेवण! काय आधी आणि काय नंतर याचं तारतम्य हवं.

>जेवत असताना काऊने चिऊकडे पाहिले त्याला ती आज वेगळीच भासत होती.तिच्या हालचाली मंदावल्या होत्या,तिचा रंग उडुन गेलेला होता,तिच्या डोळ्यातिल तेज कमी झालेल होत.

इथे लेखकानं पुरूषी संयमाची परिसिमा गाठलीये! `ती आज वेगळीच भासत होती' असं म्हटल्यावर वाचकांना वाटतं `आ गया काऊ लाईनमे' पण तसं नाहीये प्रथम चिऊची तब्येत महत्वाची (वाचक हो शिका, आधी जेवण मग तब्येतीची विचारपूस)

>जेवण वगैरे झाल्यावर चिऊ काउला म्हटली "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग"

सामान्य वाचक समजेल की जेवण झालं, तब्येतीची विचारपूस झाली आता नक्की काही तरी होणार! पण नाही, लेखकाला कथा एका वेगळ्याच उंचीवर न्यायची आहे. काऊ आता फारसं काही करू शकत नाही हे चिऊला माहितीये पण लेखक अशी वाक्य चिऊच्या तोंडी घालत नाही, मोठ्या खुबीनं तो वाचकाला (आणि त्यांच्या जोडीनं काऊला) सकाळपर्यंत वाट पहायला लावतो.

इथे पुन्हा लेखकाच्या विद्वत्तेला दाद द्यावी लागते कारण काऊनं जंगजंग पछाडले तरी त्याला इतक्या पहाटे जाग येणार नाही आणि चुकून आलीच तर चिऊ त्याला `ही काय वेळ आहे का?' असं विचारणार याची लेखकाला कल्पना आहे पण त्याला कथा लांबवून वाचकांच्या मनावरची पकड अजीबात सुटू द्यायची नाहीये.

>काऊने सगळ बळ एकवटुन तिला उठवायचा प्रयत्न केला तरीही चिऊ चा प्रतिसाद शुन्यच.

इथे वाचकाला (जरी हा त्याचा नित्याचा अनुभव वाटला) तरी तो एकदम त्या अनुभवातून बाहेर येतो, त्याला वाटतं आता काऊ नक्कीच काही तरी करणार!

>काऊने निट पाहिल तर चिऊच शरीर एकदम थंड पडलेल होत.काऊच्या कुशीतच ती देवाघरी निघुन गेलेली होती पण तिच्या चेहर्‍यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.

इथे देवाघरीचा अर्थ `देवघरात' असा आहे, म्हणजे मनानी ती देवपूजेत मग्न झाली होती. लेखकानं हा अर्थ मोठ्या खुबीनं मांडलायं `तिच्या चेहर्‍यावर एकप्रकारच समाधान दिसत होत.'

जे सांगायला संतमहंतांना ग्रंथ लिहायला लागतात ते लेखक एका छोट्या कथेत सांगून जातो. `चिऊ आणि काऊ काही तरी करतील' या सामान्य जनकामनेला `ईश्वर प्रेम हेच सर्व श्रेष्ठ' असं लेखक हळूवारपणे सुचवतो आणि त्याचं `तिच्या चेहर्‍यावरचं एकप्रकारचं समाधान' असं वर्णन करतो.

>काऊला पुढच सगळ दृश्य अंधुक दिसायला लागल होत कारण त्याचे डोळे अश्रुने दबडबलेले होते आणि त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होत.

इथे लेखकानं जाताजाता कथेला पुन्हा कलटणी दिलीये.

`काऊला पुढचं सगळं दृष्य अंधुक दिसायला लागल होतं' काय करणार बिचारा? `काऊ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे' हे लेखकानं सुरूवातीलाच क्लिअर केलंय. यातून लेखकाला काऊला पुन्हा कामाची (इथे कार्यालयीन कामकाज असा अर्थ आहे) काळजी लागली आणि ....`त्याच हृद्य कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने भरुन आलेल होतं' (इथे `कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमाने' म्हणजे इंग्रजीतील `लव' आहे) हे लेखक इतक्या बेमालूमपणे सुचवतो की वाचकाला, `लेखक पुढचा भाग कधी टाकतो 'याची प्रतिक्षा लागून राहते.

(संपादकांना विनंती : इतक्या महत्वपूर्ण लेखाचं रसग्रहण केवळ प्रतिसादात्मक होण्याऐवजी यावर एक नवा लेखच होईल म्हणून लेख इथे पोस्ट केलायं. मूळ प्रतिसादावर उपप्रतिसाद आल्यानं तो तिथून काढता येत नाहीये तरी तो प्रतिसाद काढून तिथे या लेखाची लिंक द्यावी)

बालकथाव्युत्पत्तीशुद्धलेखननोकरीजीवनमानप्रतिसाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Apr 2012 - 11:08 am | मुक्त विहारि

छान केले आहे विडंबन.....

स्वातीविशु's picture

12 Apr 2012 - 11:37 am | स्वातीविशु

अरेच्चा...... ह्या जुन्या प्रतिसादाला परत उजाळा दिलाय. :)

मला वाट्ले की चिऊ आणि काऊ चा नविन एपिसोड आला आहे. ;)

मूळ कथा अत्यंत अर्थगर्भ आहे पण वाचक काऊ म्हणजे कावळा आणि चिऊ म्हणजे चिमणी असा सरधोपट अर्थ घेतायंत आणि त्यांच्या मिलनाविषयी शंका उपस्थित करून त्यांच्या प्रजाजननाची काळजी करतायंत.

खरे तर `चिऊ' हे `शिवूचे' अपभ्रंशित रूप आहे, थोडक्यात `शिव' या संहारकशक्तीचे ते स्त्रीरूप आहे. इथे पुन्हा लेखकाचं भाषाप्रभुत्व लक्षत घेण्यासारखं आहे, Chivas चा उच्चार शिवास होतो तद्वत Chiu चा शिवू. आता चिऊ चा चिमणी असा बाळबोध अर्थ नसून `आदीमायेचं दृष्यस्वरूप' असा आहे हे वाचकांना समजेल.

`चिऊ' ही मुळात `शिवू' असेल तर ती `काऊला का बरे शिवू देत नाही?' असे वाचकांना वाटू नये म्हणून लेखकाने काय प्रसंग योजना केली आहे हे पाहण्यासारखं आहे ... "काऊ आज मला कुशित घेऊन झोप,मग उठल्यावर तुला काय सांगायचे ते सांग"!

काऊचा देखील सरळ सरळ `कावळा' असा अर्थ नाहीये तो चिऊच्या हाकमारण्यानुरूप बदलत जातो पण इथे ऑडिओ नसल्यामुळे वाचकांना त्या सूक्ष्म छटा दाखवता येत नाहीत. उदाहरणादाखल जेव्हा काऊऊऊ... अशी अतिदीर्घ हाक चिऊ मारते तेव्हा ती कावलेल्या पुरूषमनाला `काऊ, असा नकोस रे कावू' असं सुचवत असते.

ज्याप्रमाणे मानव हे सर्वसमावेशक सर्वनाम असून लेखकानं ते अत्यंत दूरदृष्टीनं धारण केलंय की ज्यात एकाच वेळी स्त्री आणि पुरूषच काय तर जे या दोन्ही कॅटेगरीत बसत नाहीत ते सुद्धा येतात; तद्वत काऊ आणि चिऊ ही `प्रकृती आणि पुरूष' या द्वैताची सूक्ष्म रूपे आहेत हे वाचकांनी लक्षात घेऊन कथेचा रसास्वाद घ्यावा आणि नसत्या शंका उपस्थित करू नयेत अशी विनंती.

चिऊ आणि काऊ

ती - किती उशीर?

तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.

ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.

तो - बरं.

ती - फक्त बरं?

तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.

ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?

तो - म्हणजे कसा?

ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.

तो - डोकं फिरलंय त्याचं?

ती - त्याचं की तुझं?

तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?

ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?

तो - नाही.

ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.

तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.

ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.

तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.

ती - अरे देवा

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.

ती - बरं

तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?

ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.

तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.

ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.

तो - आता?

ती - हं आता.

तो - बरं जातो.

ती - ए काऊ थांब रे.

तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.

ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.

तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.

ती - काऊ तू मला खूप आवडतोस.

तो - मला माहितेय.

ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.

तो - बरं.

ती - अरे आता म्हण.

तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.

ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.

तो - बरं.

ती - ...

तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.

ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.

तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.

ती - चल.

- कोहम http://nileshgadre.blogspot.in/2008_09_01_archive.html