प्रस्तावना - मिसळपावच्या ह्या कट्ट्याचे वैशिष्ठ्य असे की उत्तर अमेरिकेतला हा पहिलावहिला कट्टा! २६ जुलै २००८ रोजी न्यूजर्सीला झालेल्या ह्या कट्ट्याचे साद्यंत वर्णन लिहा म्हणून आम्ही मागे लागलो होतो मुक्तसुनीत यांच्या, तर त्याऐवजी ती जबाबदारी चतुरंगलाच द्या म्हणून सगळे एकमतले! झाले, ती जबाबदारी आता पार पाडणे आले (स्वगत - रंगा, ते काय विडंबन करण्याइतके सोपे वाटले काय तुला? आता बस!) सांगायचे कारण असे की अपेक्षा फार वाढवून ठेवू नका! ;) असो. तर आता 'नमनाला घडाभर' न करता थेट कट्ट्यावर जाऊयात!
पुण्यात झालेल्या कट्टयाला हजेरी लावून प्राजू नुकतीच भारतवारीहून परतली होती. तिनेजुलै १० च्या सुमारास कट्टा करायचा बूट काढला आणि पूर्व किनार्यावर गडबड उडाली! ह्या भागातल्या मिपाकरांची खानेसुमारी झाली. कट्टा करायची तारीख ठरली २६ जुलै. मुक्तसुनीत यांनी सर्वात प्रथम आमंत्रण दिले पण त्यांचे वॉशिंग्टन डी.सी हे ठिकाण बर्याच जणांना बरेच लांब (४०० - ४५० मैलांपेक्षा जास्त) पडत होते म्हणून हो-ना करता करता शेवटी एकदाचे न्यूजर्सी मुक्रर झाले. इथे दोन पर्याय होते एकतर सर्वांनी बीचवर जमायचे पण उन्हाची तीव्रता आणि बरोबरची लहान मुले लक्षात घेता हा पर्याय रहित झाला, दुसरा होता घरी जमायचे वरदाचे घर इथे असल्याने ते ठिकाण पक्के झाले (वरदा आणि तिचे मिस्टर समीर ज्यांच्या सहकार्याने हा कट्टा यशस्वी होण्यास मोलाचा हातभार लागला त्या दोघांना मिपाकरांतर्फे धन्यवाद).
आता मेनू - प्राजक्ता आणि शीतल ह्या कनेटिकटमधल्या मिपाकरणींनी वरदाच्या मदतीने मिसळ जमवायचा बेत पक्का केला. चतुरंग यांनी (सौं च्या पाककौशल्यावर विसंबून ;)) पेठकरकाकांची पावभाजी आणतो असे कबूल केले! मुक्तसुनीत हे फरसाण आणि अनामिक हा डी.सी हून येताना आम्रखंड घेऊन येतो म्हणाले. पुण्याच्या पेशव्यांनी पावांची जबाबदारी शिरावर घेतली. अशा रीतीने गोष्टींना आकार यायला सुरुवात झाली. आयत्या वेळी मानस आणि अनामिक ह्यांचे यायचे रहित झाले आणि धनंजयचे यायचे ठरले! शेवटी एकदाची २६ जुलै उजाडली.
प्राजू आणि शीतल ह्या ११ च्या सुमारास वरदाकडे पोचल्या. बाकी सगळेच लोक आणखीन दुरुन येणार होते त्यामुळे १२-१२.३० च्या सुमारास एकेक करुन मंडळी जमायला लागली. प्रथम मुक्तराव आणि धनंजय आले. मग चतुरंग आले पाठोपाठ लंबूटांग (हा तर बॉस्टनहून बस करुन आलेला) आणि पुण्याचे पेशवे ह्यांनी हजेरी लावली . जवळजवळ सगळेच एकमेकांना प्रथम भेटत होते त्यामुळे थोडी औपचारिकता होती ती पाचेक मिनिटात संपली!
वरदाताईंचे घर सुंदर आहे त्याच्या तळमजल्यावर सगळ्याच मंडळींची सोय केलेली होती. लंबूटांग, पुण्याचे पेशवे, मुक्तसुनीत, धनंजय, प्राजू, शीतल, वरदा आणि चतुरंग हे मिपाकर आणि अमर व यशराज (शीतलचे पतिराज व मुलगा), जगदीश व अथर्व(प्राजूचे पतिराज आणि मुलगा), चतुरंग याच्या पत्नी व मुलगा, आणि समीर हे नॉन मिपाकर हजर होते. हळूहळू गप्पा रंगायला लागल्या.
चेष्टामस्करी सुरु झाली. एकीकडे मुलांचा दंगा सुरु होता.
वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्स, सालसा आणि भेळ हे स्टार्टर्स म्हणून टेबलावर सजले. जोडीला सॉफ्टड्रिंक्स होतीच (तात्या आणि पिडाकाकांची इथे फार आठवण झाली! ;) )
भेळ चाखून होते न होते तोच गरमागरम मिसळ आणि वाफाळती पावभाजी ह्यांनी टेबलावरच्या मोक्याच्या जागांचा ताबा घेतला.
सर्वांचेच लक्ष आता ह्या मुख्य पदार्थांकडे लागले होते.प्राजूने, शेफ़ संजीव कपूरच्या थाटात, कोल्हापुरी मिसळ कशी तयार करायची ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि लंबूटांगने त्याचे चित्रणही केले. प्राजू आणि शीतलने केलेली मिसळ अप्रतिम होती! तर्रीदार कटाचा भुरका पावासह तोंडात जाताच ब्रम्हानंदी टाळी लागत होती!
पेठकरकाकांची चीझ-पावभाजी अप्रतिम झाली होती (पेठकरकाका झिंदाबाद! :) )
एकीकडे हास्यविनोद कोट्या ह्यांना उधाण आले होते. केशवसुमारांची आठवण सगळ्यांना झाली त्यांनी माझ्याजवळ कट्ट्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या त्या दिल्या.
मिसळ जरा जिरते तोच अनामिक याने मुक्तरावांबरोबर पाठवलेले (गुणी बाळ अनामिक! ;)) थंडगार आम्रखंड सामोरे आले!
मग काय महाराजा सर्व लोक एकदम तब्बेतीत आले.
आम्रखंडाचा आस्वाद घेऊन झाला आणि धनंजयने अचानक त्याच्या पोतडीतून केळ्याच्या सांदणाची फर्मास भेट सर्वांसमोर खुली केली! अत्यंत चवदार अशा सांदणावर सर्वांनी ताव मारला. समस्त भगिनीवर्गाने त्यांना सांदणाची पाकृ विचारुन भंडावून सोडले! ह्याचाच परिपाक म्हणून की काय लगोलग सांदणाची कृती धनंजयने मिपा वर टाकली! ;)
मग तात्यांशी फोनवर गप्पा झाल्या. ते नुकतेच मधुभाई जोशांच्या मैफिलीतून आलेले असल्याने खुषीत होते! त्यांनी लगोलग मैफिलीत ऐकलेली एक चीज फोनवरुनच पेश केली! क्या बात है! माहोल एकदम खुलत चालला होता. एकीकडे बालकांचा दंगा सुरु होता तो आता वाढल्याने त्यांना खेळवण्यासाठी वरदाच्या घराजवळ असलेल्या तळ्याकाठी जायचे ठरले. एक बालक झोपल्याने स्त्रीवर्गाने घरातच थांबायचा निर्णय घेतला. आम्ही सगळे गप्पाटप्पा करीत बीचवर गेलो.
मुक्तसुनीत यांनी 'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले! चांगलेच छुपे रुस्तुम निघाले.
लंबूटांगनेही बगळ्यांची माळ फुले म्हटले, त्याचाही आवाज छान आहे.
मग एक छानसे फोटोसेशन पूर्ण करुन आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला.
वरच्या चित्रात डावीकडून पुण्याचे पेशवे, लंबूटांग, धनंजय, मुक्तसुनीत आणि चतुरंग
वरचे चित्र - प्राजू, वरदा आणि शीतल
डावीकडचे छोटा अथर्व, त्याच्यामागे अमर आणि त्यांच्यामागे समीर दिसताहेत बाकीचे नेहेमीचेच यशस्वी!
वरदाच्या घरी परतल्यावर मुक्तसुनीत यांनी पुढच्या कट्ट्यासाठी सर्वांना डी.सी. ला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. त्यांचा प्रवास बराच लांबचा असल्याने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. पाठोपाठ आम्ही इतर मंडळीसुद्धा हळूहळू गप्पा आवरत पुढचा कट्टा कुठे करायचा ह्याची चर्चा करत आपापल्या दिशांना पांगलो.
पहिला वहिला मिपा कट्टा यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय जमलेल्या सर्व मिपाकरांना तर जातेच पण मिपाचे मेंबर्स नसलेल्या त्यांच्या इतर कुटुंबियांची मोलाची मदत आणि सहकार्य असल्याखेरीज हा कट्टा पूर्णत्त्वाला गेला नसता.
चतुरंग
ता.क. लंबूटांगने काढलेल्या मिसळीच्या चलचित्राचा यू-ट्यूबवरचा दुवा आत्ताच प्राजूने मला पाठवला, खास लोकाग्रहास्तव तो इथे डकवत आहे! ;) एंजॉय!!
(स्वगत - चला आता लोकांची पूर्ण जळजळ होईल! )
http://www.youtube.com/watch?v=VI9eVFOLJ-g
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 12:44 pm | चतुरंग
महत्त्वाची वाटलेलीच इथे डकवली आहेत.
मिसळीचा व्हीडियो रेझोल्यूशन जास्त असल्याने फार मोठ्या फाईलसाईजमधे आहे. तो छोटा करुन टाकता आला तर बघतोय.
चतुरंग
29 Jul 2008 - 4:25 pm | प्राजु
छान लिहिला आहेत वृतांत. बाकी फोटो मी माझ्या ओर्कुट प्रोफाइल ला टाकणार आहे. तिथे पहात येतील.
तेव्हढा व्हीडीओ टाकाच इथे..मलाही उत्सुकता आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2008 - 12:48 pm | मनिष
मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले, धनंजयचे सांदणही झकास...शिवाय पेठकर काकांची पाव-भाजी!!!
वा!! चतुरंग - वृत्तांत आवडला. तो मिसळीचा व्हिडीओ टाकता आला तर बघा ना...
29 Jul 2008 - 12:50 pm | प्रमोद देव
वृत्तांत आवडला. ज्यांच्याबद्दल नेहमी ऐकून असतो ते सर्व सदेह पाहायला मिळाले म्हणूनही जास्त आनंद झाला.
त्या गाण्याची ध्वनीफीतही चढवा जमले तर.
एकूण कट्टा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
29 Jul 2008 - 1:22 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
29 Jul 2008 - 12:55 pm | आनंदयात्री
जियो मिपाकर्स !!!
अटकेपार फडकवला झेंडा !!
29 Jul 2008 - 1:02 pm | मनस्वी
मस्त!
मिसळीच्या तर्रीचा रंग अल्टीमेट!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
30 Jul 2008 - 10:56 am | नंदन
असेच म्हणतो. चमचमीत मिसळ काय, पेठकरकाकांची पावभाजी, आम्रखंड आणि सांदण -- क्या बात है!
एकंदर धमाल कट्टा झालेला दिसतो आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Jul 2008 - 12:55 pm | स्वाती दिनेश
धनंजयाचं सांदण मिपा वर आले आणि तेव्हाच म्हटलं की अजून वृतांत कसा नाही आला?
तुम्ही सर्वांनी फार मजा केलेली दिसते..आणि खानपान सेवाही जोरदार दिसते आहे.सगळे फोटो मस्त आहेत!
छान ,वृतांत आवडला.
मिसळीचा व्हिडीओ टाकता आला तर पहा ना..मनिष सारखेच म्हणते,:)
स्वाती
29 Jul 2008 - 1:06 pm | सहज
इस्ट कोस्ट कट्ट्याचे वर्णन आणी इष्टजन यांची भेट घडवल्याबद्दल चतुरंग अनेक धन्यवाद!!
मुक्तसुनीत यांनी 'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले! चांगलेच छुपे रुस्तुम निघाले.
क्या बात है!! गानसुमार!!!
धनंजय यांचे सांदण पाकृ त्यातील घटकांमुळे तितकी काही रुचली नव्हती :-) पण हा फोटो पाहून नक्कीच ट्राय केली पाहीजे असे वाटते. जमल्यास हा फोटो त्या पाकृ मधे घालावा.
मस्त!! असे नियमीत कट्टे भरु दे व त्याचा वृत्तांत येऊ दे.
29 Jul 2008 - 1:23 pm | टारझन
जबराट .... फोटू पाहून एक बादली लाळ गळालीये ! =P~
सगळ्या अमेरिकनांचे अभिनंदन ...
(स्वगत : चल खवीसा , तुही अफ्रिकेत एक कट्टा तर , मेंबर .. मै और मेरी तनहाई :( )
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
29 Jul 2008 - 11:44 pm | पिवळा डांबिस
चल खवीसा , तुही अफ्रिकेत एक कट्टा तर , मेंबर .. मै और मेरी तनहाई
तू ना! तू तुझ्या खोलीत आरसे लावून घे!! फुल साईझ आणि सगळ्या भिंतींवर!!!
मग तुलाही एकदम घर भरून पाहुणे आल्यासारखं वाटेल....
मग साजरा कर कट्टा!!
:)
30 Jul 2008 - 12:29 pm | टारझन
आरशे लावणे हा ऊपाय बेष्ट आहे. किमान ३-४ खवीस होतील.
हमारे घर मधे हम च पावणे ? ह्यॅ ? नायतर ईथल्याच २-३ डांबरगोळ्या (एका पायावर यायला तयार हायती) घेऊन येतो .
जिम मधे आरश्यात पाहुन स्वता:वरच (सोहेल खान सारखा) अत्त्त्त्ती खूष होणारा
कुबड्या खवीस
29 Jul 2008 - 1:29 pm | भडकमकर मास्तर
मस्त वृत्तांत..
सर्वांचे फोटो पाहून मजा आली..
बाकीचेही विशेषतः खानपान फोटो अप्रतिम... सर्व पदार्थ माझे अत्यंत आवडते आहेत....
'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले
मला मूळ चीजेतले तेवढे "रसूल अल्ला ..." इतकेच येते... :) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
29 Jul 2008 - 3:29 pm | विसोबा खेचर
अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन....! :)
सर्व पदार्थांची चित्रे केवळ लाजवाब! आणि हो, आम्हालाही मुक्तरावांचं गाणं अगदी अवश्य ऐकलं पाहिजे एकदा! :)
बरं का मुक्तराव, ती बंदिश आम्हीही म्हणतो बर्र का! पूर्वी रागातली आहे.. :)
फोटू पाहून सगळ्यांनी अगदी भरपूर धमाल केलेली दिसते असं जाणवतंय! :)
असो,
मिसळ! महाराष्ट्रातील अनेक चवदार पदार्थांपैकी एक. परंतु सर्वांची राणी शोभावी असा तिचा रुबाब! त्या राणीच्या नावचं हे संकेतस्थळ! फक्त मिपाधर्मे मानणारं, आणि मिपा धर्माचाच प्रचार करणारं!
मिपाधर्म वाढवावा,
अवघा हलकल्लोळ करावा!
संत तात्याबांनी हाच संदेश जगाला देत मिपाधर्म स्थापन केला. आज मिपाधर्म वाढतो आहे, फुलतो आहे! तेच तात्याबांचं स्वप्न होतं! हा वृत्तांत वाचून ते स्वप्न आता सातासमुद्रापारदेखील साकार झाल्याचं कळलं आणि आनंद वाटला. संत तात्याबा आता सुखाने समाधी घेतील!
असो, या निमित्ताने, "हिंमत असेल तर स्वत:चं संस्थळ काढून दाखव!" हे ज्यांनी आम्हाला म्हटले होते त्यांनाही आमचा प्रणाम! :)
आपले,
(सातासमुद्रापार झालेल्या कट्ट्यामुळे आनंदीत झालेले!)
संत तात्याबा महाराज,
संस्थापक, मिपाधर्म.
29 Jul 2008 - 4:10 pm | श्री
अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन
असेच म्हणतो...,
पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ?
29 Jul 2008 - 5:07 pm | शितल
पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ?
हा प्रश्न वरदाला विचारा, तीला घर आवरायला नक्कीच दोन दिवस लागले असतील. :)
29 Jul 2008 - 4:38 pm | विकास
चतुरंग राव,
व्रुत्तांत आणि वृत्तांतामागील चेहरे येथे मांडल्याबद्दल आभार!
आणि व्यक्तिगत फ्रस्ट्रेशनही! :''( आम्ही काय मिस केले ते त्यामुळे कळले... अर्थात पर्याय नव्हता म्हणून येऊ शकलो नाही.
29 Jul 2008 - 5:11 pm | शितल
अरे म्हणजे आम्ही बीचवर न गेल्याने मुकत्सुनीत आणि लंबुटांग यांनी गायलेली गाणी ऐकायला नाही मिळाली :(
29 Jul 2008 - 5:48 pm | डॉ.प्रसाद दाढे
न्यू जर्सी मिपा कट्टेवाल्या॑चे हार्दिक अभिन॑दन! तात्या॑चेही अभिन॑दन!
29 Jul 2008 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पदार्थांची चित्रे, वृत्तांत, आणि मिपाकर मित्रमंडळी, सबकुछ लाजवाब !!!
अमेरीकेतील सर्व मिपा कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन !!!
-दिलीप बिरुटे
(आनंदीत)
29 Jul 2008 - 7:17 pm | राधा
व्रुतांत वाचुन छान वाटला.........
यशराज(शितल चा मुलगा) माझा दोस्त आहे......... तेव्हा त्याला काही बोलायच नाही हा , नाही तर पाहुन घेइन.....;)
29 Jul 2008 - 7:20 pm | झकासराव
मिसळीच्या कटापासुन ते केळीच्या सांदण पर्यंत सगळी प्रकाशचित्रे पाहुन पोटात भुकेचा डोंब उसळला की. :)
चतुरंग यानी वृतांत छान लिहिला असला तरी आम्ही त्यांच्या कोट्या मिस केल्या बर. :)
सर्व कट्टेकरींचे मनापासुन अभिनंदन.
वरदा आणि तिच्या यजमानाना पेशल धन्यवाद. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
29 Jul 2008 - 7:45 pm | मुक्तसुनीत
चतुरंगांनी आपल्या खुसखुशीत शैलीत लिहिलेला वृत्तांत आवडला. त्यांनी सर्व डीटेल्स उत्तम मांडलेत.
या कट्ट्याच्या आयोजनाचे सर्व श्रेय महिलावृंदाकडे जाते. प्राजु, शीतल, वरदा आणि सौ. चतुरंग यांनी खरोखरच प्रचंड कष्ट केले. आपण केलेले पदार्थ उत्तम असावेत, त्याचा आस्वाद सर्वाना घेता यावा म्हणून घेतलेली मेहनत, आणि इतके उत्तमोत्तम पदार्थ खाल्ल्यानंतर मिळालेल्या दादेनंतरचे त्यांच्या चेहर्यावरचे हास्य...वरदा आणि समीर यांचे सुंदर , प्रशस्त घर , त्या घरात आम्ही केलेला गप्पा- हास्यविनोदाचा कल्लोळ , छोट्या पोरांचे बागडणे..आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत होते ! अनामिक आणि धनंजय यांनीसुद्धा वेळात वेळ काढून उत्कृष्ट पाककृती केल्या. अनामिक स्वतः आला नव्हता , पण त्याने आवर्जून आम्रखंड पाठवला होता ! अनामिकाकरता सुचलेल्या ओळी :
अनामिका , आम्ही हादडला तुझा आम्रखंड,
थेंब तिथे ना कुणी सांडला, दुवा घे उदंड ! :-)
आमच्या लहानपणी गणेशोत्सवात सारे कुटुंब एकत्र जमायचे. आजीच्या भवती गोकुळ गोळा व्हायचे. ८७ वर्षे जगलेली आजी शेवटी पणजीसुद्धा झाली होती. अशा प्रसंगी आमच्या एका काकूने उद्गार काढले होते "एकट्या माईंनी पहा केव्हढा मोठा पसारा निर्माण केलाय ! " तात्यांना फोन केला , त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर मला हा खूप जुना विनोद आठवला !:-)
पुण्याचे पेशवे आणि लंबूटांग बस करून मजल-दरमजल करत आवर्जून आले. पेशव्यांची शरीरयष्टी एकदम पहिल्या बाजीरावासारखी आहे ....आवाजात मार खाल्ला रावांनी थोडासा !:-) (ह. घ्या. !)
धनंजय बरोबर जातायेता मिळून ८ तास मी गाडीत होतो. (धनंजय आमचा क्याप्टीव आड्यन्स ! =)) ) मला एका मराठी पुस्तकाची आठवण येते : "ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी" दुर्गा भागवतांसारख्या विदुषीबरोबर मारलेल्या गप्पांचा वृत्तांत असे त्याचे स्वरूप. मला वाटते मी एखादी २०-२५ पानांची पुस्तिका नक्की काढू शकेन ! "ऐसपैस गप्पा : धनंजयशी !"
एक आनंदात , मित्रांच्या सहवासात घालवलेला सुंदर दिवस.
30 Jul 2008 - 12:20 am | llपुण्याचे पेशवेll
नक्की काढ पुस्तक सुनीतराव.'धनंजय'चे विचार वाचायला नक्कीच आवडेल. कधी कधी मि.पा.वरील त्यांचे प्रतिसाद वाचून ते तर्कट वाटले होते मला पण प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत समंजस आणि मृदुभाषी आहे(आणि निष्णात बल्लवाचार्यही ते त्याच्या सांदणावरून कळलेच असेल सगळ्याना). त्यामुळे माझा अंदाज फुल्टू खोटा ठरला. :) त्यांच्या ज्ञानाबद्दल असलेला आदर त्यांच्या प्रत्यक्षभेटीमुळे दुणावला.
सुनीतरावदेखील हरहुन्नरी आहेतच. त्यांचे गाणे ऐकून भरुन पावलो. :) सुनीतराव पुढच्यावेळेला जमवा एखादी मैफल.
(चिरका आवाज असणारा :) )
पुण्याचे पेशवे
29 Jul 2008 - 7:59 pm | खडूस
छान वाटले वाचून.
शिकागो साईडला नाही का कुणीच ?
29 Jul 2008 - 8:22 pm | प्राजु
मी बांधलेले प्रत्येकाचे अंदाज...
वरदा : जसा अंदाज बंधला होता तशीच भेटली
शितल : कोल्हापूरच पाणी आहे.. तेव्हा वेगळा अंदाज बांधायची गरज नव्हती..
मुक्तसुनित : अंदाज चुकला.. ते तर एकदम बोलके आणि रसिक आहेत. अंदाज होता की, चष्मा लावलेले, आणि चष्म्याच्या काचाच्या वरून पहात बोलणारे असतिल.. हे तर एकदम रसिक आहेत आणि खूप बोलके आहेत.
चतुरंग : यांची विडंबने वाचून आणि लेखनातली खोली पाहून वाटले होते की, आपण शिडशिडीत बांध्याचे, थोडेसे पोक्त व्यक्तिमत्व असाल.. चूक.
धनंजय : आपल्या बद्दलचा अंदाज होता की, आपण भारदस्त (शब्दशः)व्यक्तीमत्व असाल.... चुकला.
पेशवा : याच्याबद्दल बांधलेला अंदाज एकदम बरोबर आला.
लंबूटांग : याच्याबद्दलही अंदाज बरोबर होता.
- प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2008 - 9:17 pm | आनंदयात्री
अगं काय तायडे ? धनंजयरावांचा खरडवहीतला (उपक्रमावर बहुदा :? ) हातवारे करणारा भारदस्त काटकुळा फोटो पाहिल नाहीस का ??
29 Jul 2008 - 9:23 pm | चतुरंग
चतुरंग : यांची विडंबने वाचून आणि लेखनातली खोली पाहून वाटले होते की, आपण शिडशिडीत बांध्याचे, थोडेसे पोक्त व्यक्तिमत्व असाल.. चूक.
(स्वगत - झालं रंगा, आला सगळ्यांना तुझ्या लेखनातल्या खोलीचा आणि बांध्याच्या जाडीचा अंदाज? तरी सांगत होतो जरा वजन कमी ठेव आणि फार पुढे पुढे करु नकोस तिथे पण नाही जमायचं तुला. :T )
चतुरंग
30 Jul 2008 - 2:21 am | सर्किट (not verified)
प्रतिभा आणि प्रतिमा ह्यांत गल्लत झाली होती असे दिसते ;-)
- सर्किट
29 Jul 2008 - 8:45 pm | टिउ
अरेरे! २६ जुलैला मी जर्सीतच होतो...एडिसन जवळ! तुम्हा सर्वानी जाम धमाल केलेली दिसतेय...
पुढच्या वेळी मिसळ आणि पावभाजी चापायला अजुन एक जण असणार आहे... :)
29 Jul 2008 - 9:34 pm | संदीप चित्रे
नेमका त्या वीकांतला कँपिंगला गेलो होतो त्यामुळे कट्टा मिसलो !!
मिसळ आणि पाव - भाजीचे फोटो पाहूनच भूक लागलीय !!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
29 Jul 2008 - 9:44 pm | धनंजय
खादाडी केलेली आठवते खरी, पण फोटो बघून पुन्हा भूक लागली.
मनसोक्त गप्पा मारल्या आणि पुन्हापुन्हा घेऊनघेऊन खाल्ले. डब्यात भरून घरी आणलेली दहीभात आणि पावभाजी, गप्पांची आठवण काढत-काढत तशीच चविष्ट लागली. (निस्त्याची आठवण करत खाल्लेल्या नीरफणसाच्या कापासारखे!)
पण या चटक लागणार्या गोष्टी एकदा अनुभवल्या म्हणून काही कायमची तृप्ती होत नाही...
29 Jul 2008 - 10:01 pm | यशोधरा
सहीच धमाल केलेली दिसते सगळ्यांनी!! वृत्तांत मस्त, फोटोही मस्त!!
29 Jul 2008 - 10:14 pm | केशवसुमार
:B रंगाशेठ,
कुठलाही फाफट पसारा न करता एकदम मुद्देसुद वृतांत आवडला :B ..फोटो बघून जळजळ झाली... X(
आणि त्या मिसळिच्या चलचित्रात मध्ये किती तो दंगा ~X( .. एक प्लेट मिसळ आणि १० प्लेटचा दंगा. . असो..छोट्या चमच्याने जास्त फरसाण घ्यायची टिप आवडली.. ;;)
त्या मिसळिच चलचित्र केले तसा ज्यांनी ज्यांनी गळा काढला होता त्यांचापण चलचित्र बनवायच नाहीस का..
आता शिक्षा म्हणून त्या सगळ्याना परत गळा काधायला लाव आणि त्याचे चलचित्र इथे द्या..
बाकी प्राजूताईं सारखेच मी पण अंदाज बांधले होते.. ते सगळेच्या सगळे चुकले.. :(
असो.. अमेरिकेतल्या पहिल्या यशस्वी कट्ट्या बद्दल सर्व आयोजकांचे आणि भाग घेतलेल्या सर्व मिपाकरांचे अभिनंदन.. वृतांत आणि फोटो बद्दल धन्यवाद..
(वाचक)केशवसुमार
स्वगत :थांब पुढच्या महिन्यात ३ दिवसाचा इंटरनॅशनल कट्टा होणार आहे जर्मनीत.. तेव्हा मी गळा काढतो.. तुला ज्ञानेश्वाराच्या रेड्याचा आवाज ऐकायचा होतना? :W
29 Jul 2008 - 11:48 pm | छोटा डॉन
केसु अगदी १६ आण्याचे बोललास ...
>>थांब पुढच्या महिन्यात ३ दिवसाचा इंटरनॅशनल कट्टा होणार आहे जर्मनीत.. तेव्हा मी गळा काढतो.. तुला ज्ञानेश्वाराच्या रेड्याचा आवाज ऐकायचा होतना?
मी पण साधारणता "सप्टेंबरच्या शेवटाला" तिकडे हजरी लावीन ...
तेवढी कॄपया वाट बघा ...
आमचे हे येणे नक्की आहे , बाकी डिटेल्स लवकरच कळवु ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
29 Jul 2008 - 11:51 pm | केशवसुमार
तेव्हा परत एक कट्टा करू.. काळजी नको डॉनशेठ.
(कट्टेबाज)केशवसुमार
29 Jul 2008 - 11:39 pm | पिवळा डांबिस
कांग्राचुलेशन!!
तुमचंच नाही तर सहभागी झालेल्या सगळ्याच मिपाकरांच!!
तात्याचं नांव काढलंत हो!!:)
"एकट्या माईंनी पहा केव्हढा मोठा पसारा निर्माण केलाय ! "
खरंच, बघा त्या तात्याने केऽऽऽव्हढा मोऽऽठ्ठा पसारा घालून ठेवलाय!!!:)
आणि त्या मराठी साहित्यसंमेलनवाल्यांनाही म्हणावं की बघा मेल्यांनो, मराठी माणसं (मराठी असूनही!!) कसा गुण्यागोविंदाने आणि उत्साहात समारोह साजरा करतात ते!! शिका म्हणावं मिपाकरांकडून काहीतरी!!!:)
जवळजवळ सगळेच एकमेकांना प्रथम भेटत होते त्यामुळे थोडी औपचारिकता होती ती पाचेक मिनिटात संपली!
शाब्बास! इसकू बोलता है मिपाकर!!!
चतुरंग यांनी पेठकरकाकांची पावभाजी आणतो असे कबूल केले!
पेठकरकाका, रॉयल्टी वसूल करा!! सोडू नकात!!:)
पण बाळ यशराज शांत होते कि काहि पराक्रम केले ?
हा प्रश्न वरदाला विचारा, तीला घर आवरायला नक्कीच दोन दिवस लागले असतील.
असू दे! डांबिसकाकू म्हणत्येय की, "वरदेलाही आता घर चाईल्डप्रूफ करायची सवय व्हायला हवी!!" (वरदा, हे काकू म्हणत्येय ते जसंच्या तसं लिहितोय हां! मी काही म्हणत नाहिये!!)
:)
(तात्या आणि पिडाकाकांची इथे फार आठवण झाली! )
चला, कशाने का होईना, पण आमची आठवण आली ना! आम्ही भरून पावलो!!!
(स्वगतः तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!!)
चतुरंग याच्या पत्नी व मुलगा हे नॉन मिपाकर हजर होते.
का रे रंगोबा, बाकी सर्व हजर असलेले समस्त मिपाकर आणि नॉन-मिपाकर फोटोत दिसतात आणि तुझी फॅमिली मात्र पद्धतशीररित्या बरी वगळलीस रे!! ते काही चालणार नाही!! बघितलंत इतर मिपाकरांनो, ह्या चतुरंगाने तुम्हाला कसं गंडवलं ते!!!:)
असो. मस्त वृत्तांत आणि मस्त फोटो!! आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!
अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!!
ती रॉकी माऊंटनपल्याडली घाटावरची मंडळी कट्टे भरवून र्हायली!!
आम्ही बोलवून बोलवून थकलो तुम्हाला!!
आतातरी काही मनावर घ्या!!!
:))
आपला,
पिवळा डांबिस
29 Jul 2008 - 11:46 pm | केशवसुमार
तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!!
डांबिसशेठ अगदी मनातून आलयं
(हहपोदु)केशवसुमार
स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही ..;) पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार... =))
30 Jul 2008 - 12:08 am | पिवळा डांबिस
स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही .. पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार...
तुम्हीच जोक मारताय आणि तुम्हीच खदखदून हसताय!!!
:)
30 Jul 2008 - 12:26 am | चतुरंग
तिच्यायला, आम्रखंडाबरोबर "ते" पेय घ्यायला आम्हाला काय पिसाळलेला कुत्रा चावला नाहीये!!!!
हे म्हणजे एकदम सात्विक संताप म्हणतात ना तसं आलंय!
स्वगतः कुत्र्याला काही चॉईस आहे की नाही .. पिसाळलेला असला तरी तुम्हाला नाही चावणार...
आणि केसुशेठचं स्वगत वाचून माझी गत येड्यासारखी झाली! मला नीट हसताही येईना एवढे जोरात उसळी मारुन हसू आले!! =)) =))
चतुरंग
30 Jul 2008 - 12:20 am | चतुरंग
अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!!
ती रॉकी माऊंटनपल्याडली घाटावरची मंडळी कट्टे भरवून र्हायली!!
आम्ही बोलवून बोलवून थकलो तुम्हाला!!
आतातरी काही मनावर घ्या!!!
हे बाकी खरं आहे हां! पहिला मान आम्ही पटकावला हे नि:संशय!
(स्वगत - 'बोलवून बोलवून थकले आणि ग्लेनफिडिचला लागले!' अशी नवीन म्हण होईल का? :P )
चतुरंग
30 Jul 2008 - 12:21 am | ब्रिटिश टिंग्या
आत्ताच मिसळीचा व्हिडिओ बघितला.....ग्रेट!
मिपा कट्टा सातासमुद्रापार नेल्याबद्दल सर्व इस्ट कोस्ट मिपाकरांचे अभिनंदन!
चतुरंगजी, कट्ट्याचा वृत्तांत अन् छायाचित्रे एकदम सही.
पावभाजी, मिसळ, आम्रखंड अन् सांदण.....खादाडी जोरदार झालेली दिसतेय :)
बाकी मीदेखील प्रत्येकाबद्दल बांधलेले अंदाच चुकले.....अगदी नॉर्थ-साऊथ पोल प्रमाणे :)
आणि प्राजुताई, कोल्हापुरी मिसळ बनवताना आवाज पुणेरी का काढला?
असो, पुनश्च सर्वांचे अभिनंदन!
- ब्रिटिश टिंगी
(स्वगत : युकेत परत एकदा कट्टा बनवण्याची वेळ आलीये. केसु, ऐकताय ना? मागच्या वेळेसारखी कलटी मारु नका आता.)
30 Jul 2008 - 12:36 am | ब्रिटिश टिंग्या
लंबुटांग ७ ते ८ फुट उंचीचा दिसतोय.....हायहील्स घातले होते काय त्याने? ;)
30 Jul 2008 - 2:54 am | प्राजु
आणि प्राजुताई, कोल्हापुरी मिसळ बनवताना आवाज पुणेरी का काढला?
काय करणार, पुणे आकाशवाणीवर काही काळ काम केल्याचा हा परिणाम आहे.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jul 2008 - 2:09 am | चित्तरंजन भट
वाव्वा. वृत्तान्त, कट्टा, विडिओ अगदी सुपरहिट. पुढच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा. सांदण करून बघावेच लागेल. उत्तम दिसते आहे.
30 Jul 2008 - 4:09 am | कोलबेर
...म्हणतो! सांदण करून बघावेच लागेल. उत्तम दिसते आहे.
30 Jul 2008 - 5:24 am | चित्रा
सांदणे खूपच मस्त! आणि सर्वांचे फोटो पाहून प्रसन्न वाटले!
30 Jul 2008 - 8:15 am | सखी
सांदणे व मिसळ खूपच मस्त! आणि सर्वांचे फोटो पाहून प्रसन्न वाटले! - प्राजु व्हिडीओ पण छान आला आहे गं, छान वाटले सर्वांना हसतखेळत बघताना.
30 Jul 2008 - 3:14 am | बबलु
पावभाजी, मिसळ, आम्रखंड, सांदण --- मजा आहे लेको !
अरे वेस्टकोस्टवाल्यांनो, बघा, बघा जरा!!!!
वेस्टकोस्टला आता कट्टा करायलाच पाहीजे राव. मी पुढाकार घ्यायला तयार आहे.
अस्मादिकांचे वास्तव्य सांता क्लारा ला असते (दक्षीण खाडी ..South Bay).
वासोना पार्क (Los Gatos) ला जाऊ. मिसळ-पाव खाऊ. ऊंडारू. खेळू.
काय म्हणता ??
कोण कोण आहे तयार .... वेस्टकोस्टवाले ?
30 Jul 2008 - 5:08 am | बेसनलाडू
वसोना पार्क फार छान जागा आहे.
माझे वास्तव्य सॅन होजे. सॅन होजे मधले आणखी दोघे - सर्कीट काका, श्रीकृष्ण सामंत.
फटू ऊर्फ सतीश गावडे सॅन रोमॉन ला असतात,असे कळते. ते येऊ शकतील. 'एक' सांता क्लारा मध्येच असतो.
डांबिसकाका, येताय काय परत बे एरियात? ;)
(आमंत्रक)बेसनलाडू
30 Jul 2008 - 5:09 am | सर्किट (not verified)
मीही तयार आहे.
- सर्किट ( काका ?)
30 Jul 2008 - 5:53 am | भाग्यश्री
मी पण लॉस एंजिलिसला आहे.. पण आत्ता एवढ्यात बे एरीया मधे येणं होईल असं वाटत नाही.. पिडाकाका येणार असतील तर उत्तम, नाहीतर निदान तुम्ही तरी कट्टा करून टाका.. अजुन वेस्ट कोस्ट वाल्यांचा कट्टा झाला नाही म्हणजे काय!! :)
30 Jul 2008 - 11:36 am | पिवळा डांबिस
तद माताय!
चला होऊन जाऊद्या!!
येतो आम्ही...
पण जरा उसंत द्या, लगोलग नका ठरवू! ट्रॅव्हलची नोकरी आहे माझी...
जरा कॅलेंडर बघू द्यात....
आणि जरा लॉन्ग वीकेंडला ठरवा...
मग आम्ही गेम....
नंदन (सॅन डियागो) लाही मी माझ्या घरी आधल्या रात्रीला बोलावतो आनि मग दोघेही इथूनच ड्राईव्ह करतो....
ती भाग्यश्री यायला तयार असेल तर तिलाही पिक अप करतो बरोबर!!!!
30 Jul 2008 - 3:17 am | खादाड_बोका
तिच्यायला...फार मोठी मजा "मिस" केली. =(( पोराच्या तापाने येउ शकलो नाही :''( . पण पुढच्या वेळेस नक्की येईल.
"व्हिडीओ" लिंक टाका, म्हणजे सगळ्यांना पहाता येईल @) .
मला तर स्वप्नातही भुक लागते....
30 Jul 2008 - 3:49 am | मदनबाण
अमेरीकेतील सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!!!!
सॉलिड खादाडी झालेली दिसतेय..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
30 Jul 2008 - 5:43 am | घाटावरचे भट
मी लॉस अँजलीसला असतो....मिपा वर नवा आहे, पण मलाही यायला आवडेल...अजून कोणी आहे का माझ्या आसपास?
चला वेस्ट कोस्ट्....वेस्ट कोस्ट वालं हाय का कुणी??? ('चला मंडई...' ह्या चालीवर , सौजन्य - आमची लाडकी पीएमटी)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
30 Jul 2008 - 10:54 am | नंदन
दक्षिण क्यालिफोर्नियावाल्यांचा एक कट्टा होऊ शकेल मग एल. ए. मध्ये. मी सॅन डिएगोला राहतो, पण एखाद्या वीकांताला येऊ शकेन. पिडांकाका, काय म्हणता?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Jul 2008 - 11:44 am | पिवळा डांबिस
मग मी तुला घेऊन जाईन सान्ता क्लाराला!!
आणि अहो घाटावरचे भट, तुम्हाला थाऊजंड ओक्सपर्यंत यायला जमेल काय? तर तुम्हालाही घेऊन जाऊ....
नसेल तर नंदनला विचारा तो तुम्हाला युएससीला पिक अप करू शकेल काय ते?
टीओ तू सान्ता क्लारा न्यायला आणि आणायला मी तयार आहे...
आता नवीन धागा सुरु करावा काय?:))
30 Jul 2008 - 8:37 am | संजय अभ्यंकर
चतुरंगभाऊ, जीयो!
खाओ, खिलाओ और ऐश करो!
सदर वृत्तांत, फोटो व चित्रफिती बद्दल धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/