२२ एप्रिल २०११
मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.
ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला :)
मला खरंच फार वाईट वाटलं. सरांचा व्यासंग जाणवत होता. वयाकडे पाहता अनुभवही उदंड असणार. त्यांची नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत याची किंचित खंतही बोलण्यात होती. पण मराठी माध्यमातील शिक्षणावर विश्वासही नव्हता. मग ते मराठी माध्यमातील शिक्षक, अभ्यासक्रम इ वर अगदी निराशाजनक बोलले. मी म्हटलं," सर, मी हे सगळं ऐकूनही आशावादी आहे." तर पटकन अचानक म्हणाले - " मी थकलोय आता. संपूर्ण निराश झालोय... "
हे ऐकून मला कसंतरीच झालं.
विषय बदलून मी माझ्या कामावर आणला. तर उत्तर - " तुझ्या पात्रतेएवढा पगार देणं मला जमणार नाही. शिवाय सध्या संस्थांतर्गत राजकारण एवढं माजलंय की तुला हे लोक कितपत टिकू देतील माहीत नाही. "
हा नकार आहे हे गृहीत धरून पण एका चांगल्या माणसाला भेटल्याच्या समाधानात मी निघाले.
मग एक दिवस वाटलं, परत एकदा सुरुवातीला उमेदवारी केलेल्या शाळेतच परत का जाऊ नये ? खरं तर तिथे पैसे फार कमी मिळणार आहेत. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं, समविचारी लोक अवतीभवती असणं, कामाच्या पद्धतीत स्वातंत्र्य असणं आणि मुख्य म्हणजे हवा तेवढाच वेळ काम करता येणं या गोष्टी माझी गरज होत्या. परदेशात काढलेल्या चार वर्षात प्रत्यक्ष काम केले नसले तरी अभ्यास, वाचन भरपूर झाले होते. आधीचा अनुभवही पाठीशी होता. पण या गॅपमुळे आत्मविश्वास बोंबलला होता. कामाला सुरुवात झाल्याशिवाय, पकड आल्याची जाणीव झाल्याशिवाय हे आत्मविश्वास नावाचं शिंगरू ताब्यात येणं कठीणंच !
हा सगळा गुंता घेऊन शाळेत गेले. तेच ओळखीचे चेहरे, ओळखीचं वातावरण पाहताना घरी आल्यासारखं वाटलं. सर भेटले आणि कामाला कधी सुरुवात करतेस असा थेट प्रश्न आला.. मला मनातून आनंद झाला. उत्साहाचे कारंजे नाचू लागले. त्यांना हो म्हणाले. सरांनी कामाचे प्लानिंग करताना उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक कामांची आखणी करायला सांगितली.
पूर्वी मी खेळाडूंसाठी काम केलं होतं. आता रेग्युलर शाळेतल्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी करायचं होतं. माझ्यासोबत अजून दोन सहकारी समुपदेशक असणार होत्या.
दोन दिवसात कामाची आखणी, सहकारी मैत्रिणींची ओळख, कामाची विभागणी अशी गडबड झाली.
आज वाटतंय... हेच करण्यासाठी किती आसुसले होते मी...आता नवी सुरुवात. परत एकदा अभ्यासाला लागलं पाहिजे. स्कूल सायकॉलॉजिस्ट! म्हणजे नेमकं काय करता तुम्ही ? असे प्रश्न नेहमीचे. काय करतो आम्ही ? पालकसभेत स्वतःच्या रोल ची ओळख करून द्यावी लागेल. एका कागदावर लिहिले -
स्कूल सायकॉलॉजिस्टची कामे - विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज या सगळ्यांसोबत काम करायचे.
१. भावनिक, वर्तनविषयक आणि समायोजनाविषयक समस्यांशी झगडणार्या विद्यार्थ्यांना समूपदेशन करणे
२. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उत्तम शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी मदत करणे, त्यासाठी शिक्षण प्रक्रियेत येणारे अडथळे नेमकेपणाने शोधणे
३. मानसिकरित्या स्वस्थ, निरोगी राहाण्यासाठी संवाद कौशल्य, स्व-नियमन, समस्या निवारण, उद्दिष्ट निश्चिती, स्वयंशिस्त आणि आशावाद शिकण्यास मदत करणे
४. कौटुंबिक समस्या, अपघात, दुर्दैवी घटना अशा परिस्थितीत समायोजन साधण्यास मदत करणे
५. अध्ययन अकार्यक्षमता, भयगंड, न्यूनगंड अशा प्रकारच्या समस्या हाताळणे
६. वरील सर्व कामांसाठी गरज पडेल तिथे विविध मानसशास्त्रीय चाचण्या वापरणे
७. मुलांचे मानसशास्त्र, विकासाचे टप्पे, मुलांच्या अभिक्षमता आणि मूलभूत कौशल्ये यासंदर्भात शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणे, आवश्यक तिथे पालकांचे समुपदेशन
८. विशेष गरजा असणार्या मुलांना योग्य त्या तज्ञाकडे पाठवणे.
९. वर्गातील वातावरण निरोगी, आनंददायी आणि प्रेरणादायी ठेवण्यासाठी शिक्षकांना मदत करणे
१०. वेगवेगळ्या सांस्कृतिक परिस्थितीतून आलेल्या आणि भिन्न वातावरणात रुळू पाहणार्या मुलांना मदत करणे.
बापरे ! हे सगळं किती आदर्श वाटतं ना !
ह्म्म.. उद्यापासून हे सगळं प्रत्यक्ष करायला सुरुवात. समस्या असणारी मुलं आणि पालक येतीलच. पण मुळात समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून काही कार्यक्रम तयार करता येईल का ? शाळेत जसे शारीरिक शिक्षणाचे तास असतात, जिम असते, योगासनं आणि प्राणायाम असतात तसे मानसिक आरोग्य उत्तम रहावे म्हणून काही नियमीत कार्यक्रम आखता येईल का ?
आधी एक ठरवायचं, कोणत्याही संस्थेत राजकारण असणार, चांगल्यासोबत फारसे चांगले नसलेले लोकही असणार, गट असणार, वर्चस्व आणि हेवेदावेही असणार. यात माझी शक्ती मी कमीत कमी घालवेन.
मी मुलांसाठी काम करायला इथे आहे. त्यामुळे आधी मी माझं मानसिक आरोग्य जपेन. आणि अजून एक, मदत मागायला येणारा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक थरातला असला तरी माझी व्यावसायिक नीतिमत्ता मी जपेन.
जमेन नं ?????
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 8:07 pm | निशदे
नक्की जमणार......
लेखमाला थांबवू नका....... येणारे बरे-वाईट अनुभव इथे मांडत चला.
6 Mar 2012 - 8:19 pm | रेवती
नक्की जमेल तुला.
लेखन खूप आवडले.
6 Mar 2012 - 8:40 pm | वपाडाव
मलाही हाच धक्का माझ्या वर्तुळातील लोकांना द्यायचाय. देव करो अन मला तुमचं उदाहरण पाहुन बळ येवो...
बाकी, लेखमालेतील आणखी अनुभव येउ द्या...
6 Mar 2012 - 9:00 pm | सुकामेवा
मी स्वतः माझ्या मुलीला मराठी शाळेत घातले आहे आणि मला त्यात काहीही चूक वाटत नाही...
उगीच रस्त्यांनी जाताना हत्ती दिसला तर उगाच ए तो elephant बघ म्हण्यापेक्षा ते खूप चांगले आहे. आसे मी खूप लोक बघितले आहेत स्वतःच्या हट्टापायीं मुलांना इंग्लिश माध्यमात घालून त्यांच्या आयुष्याची वाट लावणारे.
तुम्हाला जर घरात पूर्णवेळ इंग्लिश बोलायला जमणार असेल तरच मुलांना इंग्लिश माध्यमात घाला नाहीतर तेल हि गेले तूपही गेले हाती आले धोपटणे अशी अवस्था व्हायची.
7 Mar 2012 - 3:30 pm | सुधीर
अभिनंदन! खूप छान वाटलं तुमच्या प्रतिसादाने. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजीतून शिकणं ह्यातला फरक समाजातल्या ब-याच पालकांना समजत नाही. इंग्रजी तर सोडा, मराठी साहित्याशीही दूर दूरचा संबंध नसणारे, शहरी वर्गातले, सर्वसाधारण शिकलेले, मध्यम आणि कमी उत्पन्न गटात मोडणारे पालक, इंग्रजी माध्यमाची भरमसाठ फी परवडत नसतानाही, पोटाला चिमटा काढून, अज्ञानाने, अनुकरणाने आपल्या पाल्याला, सरसकट इंग्रजी माध्यमात घालण्याचा अट्टहास धरतात तेव्हा कीव येते त्यांची आणि वाईटही वाटतं, ते भाषेची गळचेपी आपल्याच माणसांकडूनच बघताना.
कदाचित काही कारणास्तव, मतभेद होऊ शकतील, इंग्रजी आणि मराठी माध्यमात घालण्यावरून. (परदेशात तर तो पर्यायही उपलब्ध नाही) पण मला खात्री आहे, विदेशात, महाराष्ट्राबाहेर पसरलेले (महाराष्ट्रात असूनही काही कारणास्तव पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकलेले) सुज्ञ पालक आपल्या पाल्याला मराठीची गोडी जाणीवपूर्वक लावतील. (नव्हे त्यांनी ती लावावीच)
7 Mar 2012 - 3:56 pm | वपाडाव
खरं म्हणजे मला मिपावर आल्यावर वाचनाची गोडी लागली...
मी खुपच आभारी आहे मिपाचा... मला आजही इथे काही वेळा भावना व्यक्त करण्यासाठी मराठी शब्द सापडत नाहीत, मग प्रतिसाद टंकताना अर्ध्यात अडकुन राहतो... माझ्या पुढच्या पिढीला तसं व्हायला नको म्हणुन मिपावर आल्यास जी जागृती माझ्याबाबतीत घडुन आली आहे, त्यातुन वाचनाची गोडी त्यांना लाभावी याचे प्रयत्न नेहमीच करत राहील... मी शक्यतोपरी सर्व प्रयत्न करेन जेणेकरुन माय मराठी अस्ताला जाण्याची सुरुवात त्यांपासुन व्हायला नको...
7 Mar 2012 - 12:25 am | आत्मशून्य
इंग्रजी काय तसही चित्रपट बघत, अथवा मिपा मोबाइलवरुन अॅक्सेस करुन शिकता येतंच येतं असं माझं प्रांजळ मत आहे. किंबहुना त्यापलीकडच इंग्रजी आपल्याला झेपतच नाय... ;) बाकी पालकांच इंग्रजी सुधरावे प्रॅक्टीस वाढावी म्हणुन मुलांना विंग्रजी शाळेत घालणार्यांना समर्थन द्यावे की नको यावर विचार चालु आहे :)
नव्या सुरवातीस लाखो करोडो शुभेच्छा !
11 Mar 2012 - 12:05 pm | स्पंदना
वपा कधी कधी?
एक म्हण आठवली, 'बाजारात तुरी अन भट भटणीला मारी '
6 Mar 2012 - 8:45 pm | संदीप चित्रे
नक्की जमेल तुला मितान.
जमेल तसे तुझे लेख वाचतोय.
प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देऊ शकेनच की नाही माहिती नाही पण वाचतोय नक्की :)
6 Mar 2012 - 8:59 pm | गणपा
नव्या सुरवातीस शुभेच्छा..
अधनं मधनं तुझ्या दृष्टीने महत्वाचे वाटणारे किस्से टाकत जा. आमच्यासाठी मर्गदर्षक ठरतील. :)
6 Mar 2012 - 9:01 pm | प्राजु
मस्तच!!
6 Mar 2012 - 9:05 pm | सुकामेवा
माझ्या मुलीच्या शाळेच्या वाचनालयामधली या संदर्भातील ५ ते ६ पुस्तके मी वाचली आहेत त्यातून खूप काही चांगले ज्ञान मिळत आहे
अधिक वाचण्यास मिळाले तर आनंदच होईल.
6 Mar 2012 - 9:15 pm | प्रचेतस
नव्या वाटचालीस शुभेच्छा.
6 Mar 2012 - 10:17 pm | अमितसांगली
लिखाण नक्कीच मार्गदर्शक आहे
6 Mar 2012 - 10:17 pm | अमितसांगली
लिखाण नक्कीच मार्गदर्शक आहे
6 Mar 2012 - 10:21 pm | प्रास
शालेय मनोविश्लेशकाची दैनंदिनी आवडली.
हा एक चांगला उपक्रम होऊ शकेल. शक्य तेवढ्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं लिखाण इथे आल्यास एक उत्तम लेखमाला निर्माण होऊ शकेल असं वाटतंय.
मितान यांना पुढील लिखाणासाठी आणि त्यांच्या शालेय मनोविश्लेशकाच्या कार्यासाठी शुभेच्छा!
6 Mar 2012 - 11:55 pm | पैसा
लेखांना नाव "डायरी" दिलंयस तर आता थांबू नको! मुलांचे, पालकांचे आणि संस्थेचे जे अनुभव येतील ते लिहीत जा. आम्हाला पण त्यातून काही तरी नक्कीच मिळेल!
7 Mar 2012 - 4:14 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
7 Mar 2012 - 12:05 am | नंदन
दोन्ही भाग आवडले. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
7 Mar 2012 - 12:01 pm | नगरीनिरंजन
दोन्ही भाग आवडले. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
7 Mar 2012 - 12:08 am | सुहास..
टाक , टाक !!
7 Mar 2012 - 6:55 am | ५० फक्त
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा, तुमच्यासारख्या काही प्रामांणिक लोकांमुळं, ढासळत जाणारा हा समाजाचा तोल अजुन काही काळ तरी सावरुन ठेवता येईल असं वाटायला लागलंय आता .
7 Mar 2012 - 8:25 am | यकु
शुभेच्छा !
:)
7 Mar 2012 - 8:36 am | अभिरत भिरभि-या
मनापासून लिहिताय हे जाणवतेय. लिहित राहा.
7 Mar 2012 - 10:03 am | जाई.
नव्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा
7 Mar 2012 - 10:09 am | इरसाल
नक्कीच जमेल.
मनापासून शुभेच्छा.
7 Mar 2012 - 10:35 am | sneharani
येऊ देत अनुभवाचे बोल!
:)
7 Mar 2012 - 11:25 am | प्रभाकर पेठकर
मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता.
ह्या कृती मागे नक्कीच मातृभाषेचे प्रेम आणि ते जोपासण्याचे धाडस दिसून येते. अभिनंदन.
पण, स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी अशा शिर्शका ऐवजी श्री. प्रास ह्यांच्या प्रतिसादात त्यांनी वापरलेले शालेय मनोविश्लेशकाची दैनंदिनी हे शिर्शक जास्त समर्पक ठरले असते.
7 Mar 2012 - 4:02 pm | वपाडाव
मेज/बाक वाजवुन अनुमोदन...
7 Mar 2012 - 11:30 am | प्रीत-मोहर
मस्तच ग मितानताई!!!
डायरी लिहिण बंद नको करुस.. लिहित जा इथे तुझे अनुभव :)
7 Mar 2012 - 3:58 pm | सुधीर
नव्या वाटचालीस शुभेच्छा! तुमच्या कार्यात समाजाकडून काही मदत लागल्यास जरूर हाक द्या! अगदीच सगळं टाकून कोणी मदतीला येईल अशातला भाग नाही. पण प्रत्येकाने खारीचा वाटा दिला तरी खूप होईल असे वाटते. विशेषतः भारतसरकारच्या उपक्रमातून भविष्यात मुलांच्या हाथी पडणा-या "अॅन्ड्रॉईड टॅब्स्/स्लेट" च्या माध्यमातून, अगदी खेडेगावातल्या मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्रजीचे भय कमी करण्यासाठी वा तुमचे उपक्रम राबविण्यासाठी मदत होऊ शकेल. मिपा आणि इतर संकेतस्थळांकडून नक्कीच मदत मिळेल असे वाटते.
7 Mar 2012 - 5:58 pm | मितान
(माझ्या दृष्टीने) उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
पेठकर काका , आता शीर्षक राहूद्या. लेखामध्ये शुद्ध मराठी लिहिण्याचा प्रयत्न करेन. ( शास्त्रीय परिभाषा दोन्ही भाषेत टाकेन. नाहीतर कळणार नाहीत. )
मी मनोविश्लेषक नाही. (सायकोअॅनालिस्ट) मानसतज्ञ (सायकॉलॉजिस्ट) म्हणा हवं तर.
7 Mar 2012 - 8:36 pm | वपाडाव
संपादकांना व्यनि केल्यास हे जमुन येउ शकते फक्त तुमची इच्छा असेल तर !! आग्रह नोहे...
12 Mar 2012 - 10:34 am | प्रभाकर पेठकर
आता शीर्षक राहूद्या. लेखामध्ये शुद्ध मराठी लिहिण्याचा प्रयत्न करेन. ( शास्त्रीय परिभाषा दोन्ही भाषेत टाकेन. नाहीतर कळणार नाहीत. )
मनांत कुठलाही राग न बाळगता माझा मुद्दा समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद. पी हळद आणि हो गोरी असा माझा आग्रह नाही. पण प्रयत्न असतील तर यश नक्कीच येईल. एखाद्या प्रचलित किंवा आता सर्व मान्य शब्दाला (जसे: स्टेशन, केक इ.) पर्यायी मराठी शब्द योजना करावी असे मी म्हणत नाही. पण शक्य असेल तिथे मराठी शब्दांचा वापर अवश्य करावा. एखादा शब्द अडलाच तर तिथे इंग्रजी शब्द वापरावा पण कोणी प्रतिसादातून मराठी पर्यायी शब्द सुचवला तर तो लक्षात ठेवावा. भविष्यातील लिखाणात वापरता येऊ शकेल.
मी मनोविश्लेषक नाही. (सायकोअॅनालिस्ट) मानसतज्ञ (सायकॉलॉजिस्ट) म्हणा हवं तर.
ह्यापुढे मी लक्षात ठेवेन. धन्यवाद.
7 Mar 2012 - 7:26 pm | मेघवेडा
दोन्ही भाग आवडले. शुभेच्छा आहेतच आणि यशस्वी होशीलच याबाबत खात्री आहे.
बाकी गणपास अनुमोदन. किस्से लिहित जा अधूनमधून. :)
11 Mar 2012 - 10:21 pm | सूड
गेल्याच आठवड्यात चर्चा चालू होती कोणी कोणी लिहीणं कमी केलंय त्याची. त्या यादीत तुझं पण नाव आलं होतं. परत लिहायला सुरु केल्याबद्दल अभिनंदन. नवीन वाटचालीस शुभेच्छा.
15 Mar 2012 - 11:15 am | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय. वाट बघतोय.