मुसोलिनीचा उदयास्त भाग-९

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Mar 2012 - 11:26 pm

भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग - ६
भाग - ७
भाग - ८

ज्या नाझी विचारसरणीचे आणि सत्तेचे मुसोलिनीला कौतुक वाटत होते त्याच्या वजनाखाली मुसोलिनी आता दबून गेला. त्याच्या गार्दा तलावाच्या काठी असलेल्या निवासस्थानावर आता ३० SS सैनिकांचा दिवस रात्र पहारा बसू लागला. त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तोडण्यात आला. जर्मन टेलिफोनच्या मार्फतच तो बाहेर संपर्क करू शकत होता पण ते सगळे संभाषण ध्वनिमुद्रीत करण्यात येत असल्यामुळे त्यालाही काही अर्थ नव्हता.

त्याची सेना विस्कळीत झाली होती. तीन डिव्हिजन्स जर्मनीमधे प्रशिक्षण घेऊन परतली होती खरी पण त्यांच्याकडे युद्धसाहित्याची वानवा होती.
“त्यांना इटली शस्त्रसज्ज नको आहे हेच खरे आहे” मुसोलिनी वैतागून म्हणाला.
यातच भर म्हणून नेपल्सच्या जनतेने नाझी राजवटी विरुद्ध सशस्त्र उठाव केला. कम्युनिस्ट आणि सोशॅलिस्ट पार्टीच्या हजारो सदस्यांनी नेपल्सच्या डोंगराळ प्रदेशाचा आसरा घेतला आणि नाझींविरुद्ध आपला लढा चालू ठेवला. यांची संख्या लवकरच वाढून २ लाख झाली. या स्वातंत्र्यलढ्यात भूमीगत होऊन हे स्वातंत्र्यवीर नाझी सैन्याला सतावू लागले. मुसोलिनीच्या घरातील शांतताही आता नष्ट झाली. त्याच्या पत्नीला म्हणजे रॅशेलला त्याची प्रेयसी क्लारेट्टा पेटाच्ची त्याच भागात रहायला आली आहे याचा सुगावा लागला आणि वातावरण तापले. गेले सात वर्षे ही मुलगी मुसोलिनीची प्रेयसी म्हणून वावरत होती. हो मुलगीच म्हटली पाहिजे तिला कारण मुसोलिनीच्या पहिल्या मुलीपेक्षा ती दोन वर्षाने लहान होती. ती तशी लहानपणीच त्याच्या प्रेमात पडली होती. मुसोलिनीची कित्येक भाषणे तिला तोंडपाठ होती आणि ती मुसोलिनीला नियमीत पत्रे पाठवायची. झोपताना सुद्धा ती उशीखाली त्याचा फोटो ठेवून झोपायची. तिच्या १४व्या वाढदिवसाला मुसोलिनी आला नाही म्हणून ती त्याच्यावर रागावली देखील होती. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली १९३३ साली जेव्हा तिचे वय होते २१. पुढच्या काही महिन्यात तिच्या पॅलॅझो व्हेनेझिआवरच्या फेर्‍या वाढल्या पण त्यांच्या नात्याला बहुतेक प्रेमिकांचे स्वरूप अजून आले नव्हते. १९३४ साली तिने एका सैन्यातील तरूण अधिकार्‍याशी लग्न केले पण दोनच वर्षात तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर मात्र ती मुसोलिनीला रोज भेटायला लागली आणि चर्चेचा विषय झाली. त्या काळात रॅशेल मुलांना घेऊन दुसरीकडे रहात असल्यामुळे तिच्या कानावर या बातम्या उडत उडत जात होत्या पण तिने त्यावेळी त्याला एवढे महत्व दिले नव्हते. पण आता ही बया घराच्या जवळच रहायला येणार हे समजल्यावर तिचे डोके फिरले व तिने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा ठरवले. इटलीच्या गृहमंत्र्याला घेऊन ती ५० एक पोलिसांना घेऊन क्लॅरेट्टाच्या बंगल्यावर पोहोचली. त्या बंगल्याच्या उंच लोखंडी फाटकाच्या बाहेरच क्लॅरेट्टाच्या फ्रॅंझ स्पोग्लर नावाच्या शरीररक्षकाने त्यांना थांबवले आणि पळत जाऊन त्याने फोनवरून मुसोलिनीला याची कल्पना दिली. मुसोलिनीने शांतपणे त्याला सांगितले “त्या दोघींनी एकामेकांना भेटण्यास माझी काहीच हरकत नाही मात्र तमाशा झालाच तर तू त्याची काळजी घे.”

इकडे रॅशेलने चिडून ते फाटक चढून जायचा प्रयत्न चालवला होता तर इटलीचे गृहमंत्री तिचा स्कर्ट धरून तिला खाली खेचायचा प्रयत्न करत होते. “बाईसाहेब खाली या ! खाली या !”
स्पोग्लरने रॅशेलला आता घेतले. मुसोलिनीने तेवढ्यात फोन करून क्लॅरेट्टाला रॅशेलची भेट घेण्यास तयार केले होते. रॅशेलला तिची जागा दाखवण्यासाठी तिने मुद्दाम अत्यंत किमती पोषाख परिधान केला आणि गळ्यात हिर्याशचा हार व गळ्यात उंची फरचा स्टोल. अशा अवतारात ती रॅशेलला भेटायला खाली उतरली. तिला जो परिणाम साधायचा होता तो लगेचच दिसून आला. फणफणत रॅशेल म्हणाली “ही असली थेरं एखादी मुसोलिनीने ठेवलेली बाईच करू शकते. माझ्याकडे बघा ! मी त्याची बायको आहे म्हणे !”
हे ऐकल्यावर क्लॅरेट्टा संतापाने किंचाळली “ही बाई ठार वेडी आहे. धोकादायक आहे, हिला आत्ताच्या आत्ता माझ्या समोरून घेऊन जा !. एवढे बोलून ती जागेवरच बेशुद्ध पडली.
रॅशेलवर या सगळ्याचा काहीही परिणाम झाला नाही. “मला ही सगळी नाटकं माहिती आहेत. कोणी एवढ्याने मरत नाही. उठवा तिला”.

क्लॅरेट्टा शुद्धीवर आल्यावर तिने परत आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला.
“इटलीसाठी, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठीही मुसोलिनीचा नाद सोड”
“पण त्याला माझी गरज आहे, हे कसे कळत नाही तुम्हा लोकांना ? त्याच्या अनेक पत्रातून त्याने मला हे लिहिले आहे.” क्लॅरेट्टाही चिडून म्हणाली
“दाखव मला”
क्लॅरेट्टा तरातरा फोनपाशी गेली आणि तिने मुसोलिनीला फोन लावला. तिने त्या पत्रातील काही भाग त्याच्या बायकोला वाचून दाखविण्याची परवानगी मागितली.
“त्याची खरेच गरज आहे का ?” मुसोलिनीने खालच्या आवाजात विचारले.
“हे टाळणे आता मला अशक्य आहे” असे म्हणून तिने फोन ठेवून दिला.

रॅशेल मुसोलिनी -

इकडे तिची वाट बघत रॅशेल काळजीत बसली होती. सकाळपासून तिला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. काहीतरी संकट कोसळणार आहे असे तिला सारखे वाटत होते. ऑगस्ट महिन्यामधे पिआत्झाले लोरेटो चौकात १५ कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यकर्त्यांना जर्मनांनी ठार मारल्यापासून (नंतर त्यांची प्रेते लटकवली होती) तिला सारख्या धमक्या येत होत्या. त्या एका रात्रीत तो चौक हुतात्म्यांचा चौक म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्या चौकाने सूडाची भावना धगधगत ठेवली होती. आजच सकाळी तिला एक पत्र मिळाले होते आणि त्यात तिला आणि तिच्या सगळ्या कुटुंबियांसाठी स्पष्ट धमकी दिली होती
आम्ही तुम्हाला सोडणार नाही. शेवटी आम्ही तुम्हाला पिआत्झाले लोरेटो चौकात घेऊन जाणार हे निश्चित”.

पिआत्झाले चौकातील कम्युनिस्टांच्या १५ कॉम्रेड्सचे हत्याकांड -

क्लॅरेट्टा पत्रे घेऊन आली आणि तिने त्यातील निवडक मजकूर वाचायला सुरवात केली. “प्रियतमे........”
“तुझ्यावाचून मी राहूच शकत नाही.........” “आत्ता तू हवी होतीस...... इ. इ.
हे प्रत्येक वाक्य रॅशेलच्या कानात तप्त तेलासारखे शिरत होते. शेवटी स्फोट होऊन तिने क्लॅरेट्टाच्या हातातील पत्रांवर झेप घेतली आणि ती हिसकावण्याचा प्रयत्न करू लागली. स्पोग्लरने तिला आवरायचा प्रयत्न केला पण त्याला तिने नखाने इतके बोचकारले की नंतर त्याला दवाखान्यात दाखल व्हावे लागले.

त्या गडबडीत तिने परत मुसोलिनीला फोन लावला आणि हे सर्व कथन केले. मुसोलिनीने स्पोग्लरला हे सगळे नाटक बंद करायचा हुकुम केला. त्याने ती पत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर जवळ जवळ दोन तास ही भांडणे चालली होती शेवटी कंटाळून याचा काही फायदा होणार नाही हे उमगून रॅशेलने, मुसोलिनीच्या बायकोने त्यातून माघार घेतली पण तेथून निघताना तिच्या तोंडातून शिव्याशापांबरोबर एक शापही अजाणतेपणे बाहेर पडला -
“तुझा शेवट फार भयानक होईल. तुला ते पिआत्झाले चौकात घेऊन जातील. बघशील तू”.

वैयक्तिक कटकटी, जर्मनांच्या कैदेत वैतागलेला मुसोलिनी स्वप्ने पहात स्वत:ची आत्मवंचना करत राहिला.

४ जून १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांच्या पहिल्या चिलखती गाड्या रोमचे दरवाजे ठोठावू लागल्या आणि जर्मनी आणि इटलीचा पराभव निश्चित झाला. गंमत म्हणजे हे स्पष्ट असतानादेखील मुसोलिनी डिसेंबरमधे मिलानला भेट देत होता आणि भाषणे देत होता आणि त्या भाषणात हिटलरच्या त्या नवीन अस्त्राविषयी जनतेला खात्री देत होता “ही अस्त्रे मी स्वत: जर्मनीत बघितली आहेत. अंतिम विजय आपलाच आहे याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही”. मुसोलिनी हा एक उत्कृष्ट वक्ता होता यात शंकाच नाही. सभा जिंकण्यात त्याच्याएवढी ताकद जगात फार कमी लोकांकडे होती. हे जे भाषण त्याने केले ते ध्वनिक्षेपणांवरून सबंध शहरात प्रक्षेपित करण्यात आले होते. सभास्थान सोडताना त्याच्या भोवती त्याच्या चाहत्यांचा, स्त्रियांचा गराडा पडला. प्रत्येकाला मुसोलिनीला हात लावायचा होता. कोणी त्याच्या अंगावर फुले तर कोणी फुलांचा गुच्छ फेकत होते. त्याचा हातही लिप्स्टिकच्या रंगाने लाल झाला. दुसर्‍या दिवशी ४०,००० लोकांनी पाठिंबा देण्यासाठी एक विराट मोर्चाही काढला. अशी ताकद होती मुसोलिनीच्या शब्दात. जादूच ती ! पण हे फॅसिझमचे शेवटचे आचके होते. इटलीच्या वरच्या भागात म्हणजे व्हाल्टेलिना प्रांतात दोस्त राष्ट्रांच्या सेनेशी मुकाबला करायचा असे ठरले. या भागात जर्मनी आणि स्वित्झरलॅंड आणि इटलीच्या सीमा भिडलेल्या आहेत आणि अनेक खिंडींतून या दोन देशात प्रवेश करता येतो. या येथे यश मिळाले तर जर्मनीच्या जोखडातूनही इटलीची सुटका होणार होती. यात मरण आले तर तो इटलीच्या इतिहासात अमरही झाला असता. पण दुर्दैवाने या योजनेला म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही आणि ती योजना बारगळली. शिवाय या डोंगरातून इटालियन बंडखोरांचेही प्राबल्य दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते आणि त्यांना मुसोलिनीचा सूड घ्यायचा होताच.

क्लॅरेट्टा पेटाच्चीच्या डोक्यात मात्र वेगळीच योजना शिजत होती. तिच्या शरीररक्षकाच्या मदतीने तिने त्या डोंगरावर २००० मीटर उंचीवर दाट जंगलात एक लपण्याची जागा शोढून काढली होती. स्पोग्लरने तिला त्या तेथे दोनदा नेले होते. तेथे एका वृद्ध जोडप्याची झोपडीवजा जागा होती त्यात ती दोघे अनेक वर्षे राहू शकले असते. सुटकेचा मार्ग, खोटे कागदपत्रे सगळे तयार होते. क्लॅरेट्टाने ही सगळी तयारी स्वत:च्या हिमतीवर पण अत्यंत काटेकोरपणे, अक्कलहुशारीने केली होती. ती मुसोलिनीच्या कानावर घालायची जबाबदारी तिने स्पोग्लरवर टाकली. ती योजना ऐकताना मुसोलिनी चिडला नाही यातच तिने स्वत:चे यश मानले आणि ती तयारीला लागली. प्रवास तसा सोपा नव्हता. काही ठिकाणी चालावेही लागणार होते. घटना फार वेगाने घडत होत्या. मुसोलिनीला पो नदीच्या अलिकडे जर्मन सैन्य दोस्तराष्ट्रांच्या सेनेला अडवेल याची खात्री होती पण आता फार उशीर झाला होता. काही जर्मन जनरल्सनी गुप्तपणे दोस्तराष्ट्रांच्या जनरल्सबरोबर शरणागतीची बोलणी चालू केली होती.

२१ एप्रिलला दोस्तांनी बोलोना घेतले व उत्तर-पश्चिम दिशेने त्यांची आगेकूच चालू झाली. दोनच दिवसाने मुसोलिनीनीने युद्धभूमीची पहाणी करायला त्याचा एक सैनिक पाठवला होता तो परत आला. मुसोलिनीला त्याने सत्य ते सांगितले “सर्वनाश झाला आहे. काहीच उरलेले नाही”
“पण मला कळाले आहे की जर्मन सैन्य पो नदी लढवते आहे म्हणून !” मुसोलिनीने विचारले.
“ड्युसे, जर्मन्स आता कशाचेही रक्षण करत नाहीत. त्यांच्यकडे आता फक्त एकच विमान शिल्लक आहे आणि तोफखानाही उरलेला नाही. व्हाल्टेलिनाला माघार घेण्याचे आदेश आपण लवकर द्यावेत असा मी तुम्हाला सल्ला देतो”.
“असही ऐकले आहे की ते दोस्तांच्या सैन्यावर बोलोनामधे फुले उधळताएत. मला नाही वाटत हे खरे आहे !” मुसोलिनी.
“दुर्दैवाने ते खरे आहे. लोकांना आता कोणीही दिली तरी चालेल पण शांतता हवी आहे”.

शेवटपर्यंत मुसोलिनी कुंपणावर बसून होता. एकदा त्याला व्हाल्टेलिनाची योजना बरोबर वाटायची तर एकदा त्याला ती अयशस्वी होईल याची खात्री वाटे.
त्याच्या एका अधिकार्‍याने तर स्पष्टच सांगितले “ आता विरोध करणे म्हणजे आपल्या सैन्याची कत्तल घडवून आणणे आहे.”
हे सगळे चाललेले असताना क्लॅरेट्टाने आपले काम चालूच ठेवले होते. तिची आता मुसोलिनीला जबरदस्तीने न्यायची पण तयारी झाली होती. तिला आता भीती वाटत होती की मुसोलिनी तिला सोडून शेवटच्या लढाईला जाईल की काय. तिने फॅसिस्ट पार्टीतील ओळखीच्या माणसांकडून वुमेन्स ऑक्झिलिअरी फोर्सचा गणवेष मागवून घेतला, म्हणजे तिला आता मुसोलिनी बरोबर कुठेही जाता येईल. “मी मेले तर त्याच्या बरोबरच मरणार आहे” ती स्पोग्लरला म्हणाली.

शेवटचा एक प्रयत्न म्हणून मुसोलिनीने कम्युनिस्टांबरोबर तह करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिनशर्त आणि संपूर्ण शरणागती पाहिजे होती. त्याचा अर्थ मुसोलिनीला चांगला माहीत होता. पण रस्त्यात टाकून दिलेले पोलिसांचे गणवेष दुसरेच काहीतरी सांगत होते – सांगत होते की आता त्याचे लोक त्याला सोडून जात आहेत. शेवटी मुसोलिनीने ती जागा सोडायचे ठरविले. उत्तरेला ५० एक मैलांवर वर कोमो नावाचे जे तळे होते त्या ठिकाणी जायचा त्याने हुकूम केला. हा काफिला ३० वाहनांचा होता. काही कार तर बरेच ट्रक्स. कोमोला पोहोचल्यावर मुसोलिनीला परत काय निर्णय घ्यावा हे कळेना. ब्रेनेर खिंडीतून त्याला हिटलरला मिळायचे होते किंवा स्विट्झरलॅंडमधे राजकीय आसरा घ्यावा असेही त्याला वाटत होते. शेवटी मिलान पडल्याची बातमी पोहोचल्यावर त्याने आपल्या बायकोला शेवटचे पत्र लिहायला घेतले.
“माझ्या आयुष्याचा शेवट आता मला दिसू लागला आहे. माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणातील हे शेवटचे पान समज. मी माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्याबद्दल तुझी क्षमा मागतो. पण मी तुला हे प्रामाणिकपणे सांगतो की माझे खरे प्रेम फक्त माझ्या बायकोवरच होते”.

क्लॅरेट्टा आणि मुसोलिनीचे काही जूने सहकारी सोडल्यास बाकी सगळे आता त्याला सोडून गेले होते. जे त्याच्या बरोबर शेवटचे युद्ध लढणार होते तेही सर्व त्याला सोडून गेले. कम्युनिस्ट बंडखोरांची दशहतच भयंकर होती. जेव्हा मुसोलिनीने विचारले की त्याच्या बरोबर किती लोक येणार आहेत तेव्हा जे उत्तर मिळाले ते फार भयंकर होते “ १२”. बाकी सगळ्या योजना बासनात बांधून मुसोलिनीने पहाटे ५ वाजता निघून लवकरात लवकर मेरॅनोमधील जर्मन राजदुतावासास पोहोचण्याचे आदेश दिले.

४० वाहनांमधे जर्मन आणि इटालियन सैनिकांचा हा काफिला पहाटेच रवाना झाला. सगळ्यात पुढे एक लष्कराची चिलखती गाडी ज्याच्या टपावर एक तोफ बसविली होती, त्याच्या मागे मुसोलिनीची गाडी अल्फा-रोमियो आणि इतर गाड्यात माघार घेणारे जर्मन हवाईदलाचे २०० सैनिक होते. तळ्याभोवताली असलेल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून जात असताना ९ मैलांवर बंडखोरांनी रस्त्यावर टाकलेल्या खिळ्यांनी मुसोलिनीला नेणार्‍या गाडीचे उजवे चाक बसले. तीन जर्मन सैनिकांनी गाडी बाहेर उड्या मारल्या व बघितले तर त्यांना १०० एक फूटावर रस्त्यावर लाकडाचे मोठमोठे ओंडके टाकून रस्त्यावर अडथळा उभा केलेला दिसला. एका बाजूला खोल तलाव आणि एकीकडे उंच कडा व वळणारा रस्ता. घातपाताला अत्यंत योग्य जागा !. तेवढ्यात तलावाच्या भिंतीलगतच्या झुडपातून पांढरे निशाण घेतलेले तीन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बाहेर आले आणि त्यांच्याकडे आले.

त्यांच्या प्रमुखाचे नाव होते बेलिनी.

बेलिनी -

त्याने छोटीशी दाढी राखली होती आणि तो त्या ५२-गॅरिबाल्डी ब्रिगेडचा प्रमुख होता. खरेतर त्या बंडखोरांकडे कसलीही शस्त्रे नव्हती आणि पुरेशी माणसेही नव्हती. पण त्यांनी जर्मनांना मूर्ख बनावयचा प्रयत्न करायचा ठरविले. जर्मनांच्या बाजूने ले. हॅन्स याला इटालियन येत असल्यामुळे त्याने या त्रिकुटाशी बोलणी चालू केली.
“आम्ही मेरॅनोला चाललो आहोत आणि इटालियन लोकांशी आमचे कसलेही वैर नाही.”
बेलिनीने नकारार्थी मान हलवत त्याला सांगितले की त्याला या रस्त्यावरून कोणालाही सोडायचे नाही अशा आज्ञा आहेत.
“आता आपल्यावर तोफा रोखलेल्या आहेत, केवळ ५ मिनिटात मी हा काफिला उडवू शकतो. आपल्याबरोबर किती इटालियन लोक आहेत ?” बेलिनीने विचारले.
“काही इटालियन नागरीक आहेत पण मला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही. मला आणि माझ्या तुकडीला जाऊ देत”.
“ते माझ्या हातात नाही. जर आपण माझ्याबरोबर माझ्या जनरलकडे आलात तर कदाचित ते आपल्याला परवानगी देउ शकतील.”
त्या रिमझीम पावसात थोडी वादावादी झाली पण शेवटी जर्मनांनी होकार दिला. तो मिळाल्या मिळाल्या बेलिनीने पुढे एक माणूस पाठवला. त्याने प्रत्येक चौकीवर जाऊन असतील तेवढे सैनिक हजर करायचे होते आणि मशिनगनच्या चौक्या असल्याचे सोंग वठवायचे होते.
“उरलेल्या लोकांना जवळच्या टेकड्यावर रवाना करा आणि त्यांना सगळ्यांना टोपीवर काहीतरी लाल बांधायला सांगा. जर्मनांना आपली संख्या खूप आहे असे वाटेल असे काहीतरी करा” त्याने सांगितले.

या बनवेगिरीचा चांगलाच उपयोग झाला. रस्त्यात जेथे बघावे तिकडे लाल रंग दिसल्यामुळे हॅन्सची खात्री झाली की येथे आपल्यापेक्षा मोठी फौज तैनात आहे. त्याने बेलिनीच्या सगळ्या अटी मान्य करून टाकल्या. जेथे हा काफिला थांबला होता तेथे येऊन त्याने इटालियन फॅसिस्ट पुढार्‍यांना त्यांना येथेच थांबायला लागेल हे सांगितले. अर्थात त्याने ड्युसेला मात्र एका जर्मन सैनिकाचा गणवेष घालून त्यांच्या बरोबर यायची परवानगी दिली. ते ऐकल्यावर मुसोलिनी म्हणाला “मी जेव्हा हिटलरला भेटेन आणि त्याला मी कसा आलो हे कळेल तेव्हा मला मात्र शरम वाटेल”
“या खेरीज दुसरा मार्ग नाही. लवकर काय ते सांगा आम्ही आता निघणार आहोत” त्याला सांगण्यात आले. चिडून मुसोलिनीने त्या चिलखती गाडीत प्रवेश केला आणि त्याचे दार आपटून बंद केले. एका जर्मन सैनिकाने ते तेवढ्याच जोरात उघडले आणि आत एक जर्मन ओव्हरकोट आणि हेलमेट फेकले. दोनच मिनिटात मुसोलिनी ते घालून बाहेर आला. तो ओव्हरकोट त्याला फारच लांब होत होता. त्याचे हेल्मेट ठिकठाक करून त्याच्या हातात एक बंदूक देण्यात आली व डोळ्यांवर एक काळा चष्मा चढवण्यात आला. पण त्याने आता इतरांसाठी आग्रह करण्यास सुरवात केली ज्याला जर्मनांनी ठामपणे नकार दिला. शेवटी डोळ्यात पाणी आणून क्लॅरेट्टाला तरी येऊ देत अशी विनंती केली, पण तीही नाकारण्यात आली. चडफडत मुसोलिनी त्या रांगेतील तिसर्‍या ट्रकमधे चढला. आता जर्मन काही ट्रकमधे आणि इटालियन्स काही ट्रक्समधे अशी विभागणी झाली. दोंगो नावाच्या बंदरावर पोहोचल्यावर बेलिनीच्या अटीनुसार त्या सगळ्या गाड्यांची तपासणी होणार होती. तेथे पोहोचल्यावर त्यासाठी तेथे हजर असलेल्या तुकडीचा प्रमुख अर्बानो बिल लाझारो त्या रांगेतील दुसर्‍या गाडीतील कागदपत्रे तपासत असतानाच त्याला त्याच्या सैनिकाची हाक ऐकू आली. गाडीतून उडी मारून तो तेथे पोहोचला. नेग्री नावाच्या सैनिकाने त्याला बाजूला ओढले आणि तो त्याच्या कानात कुजबुजला “आपल्या हातात सापडलाय तो XXX. मी ओळखले आहे त्याला.” मुसोलिनीच्या दुर्दैवाने हा सैनिक इटलियन नौदलाच्या एका बोटीवर गनर म्हणून काम करत असताना, मुसोलिनीने त्याच बोटीतून प्रवास केला होता.

मुसोलिनीने त्याच्या अटकेला अजिबात विरोध केला नाही. गाडीतून उतरल्यावर शुन्यात नजर रोखून तो म्हणाला “मी काही करणार नाही”. त्याला डोंगोच्या नगरभवनात नेण्यात आले. तेथे गेल्यावर त्याने त्याच तंद्रीत भ्रमिष्टासारखे खुर्चीवर आपले अंग टाकले आणि एक पेला पाणी मागितले. बस्स !

बेलिनीला मुसोलिनीला कसलीही हानी पोहोचवायची नव्हती. पण एकीकडे त्याला फॅसिस्ट पार्टीच्या उठावाची भीती वाटत होती तर दुसरीकडे त्याला त्याच्याभोवती जमलेल्या नवीन सदस्यांचाही भरवसा नव्हता. ही मंडळी भडक डोक्याची, विचार न करणारी अत्यंत क्रूर आणि मुसोलिनीबरोबर असलेल्या कथीत संपत्तीच्या मागावर होती. त्यांच्यापासूनही मुसोलिनीचे त्याला संरक्षण करायचे होते. त्याने ताबडतोब त्याला स्वत:च्या संरक्षणाखाली जर्मासिनो नावाच्या गावातील सैनिकांच्या बरॅक्समधे हलवले. तेथे पोहोचल्यावर मुसोलिनी पहिले वाक्य बोलला. त्यानी मागे नगरभवनात राहिलेल्या क्लॅरेट्टाला एक निरोप द्यायला सांगितला”. त्या नगरभवनात पोहोचल्या पोहोचल्या बेलिनीला क्लॅरेट्टाला ओळखणे जड गेले नाही. इतरांप्रमाणेही त्याच्या मनातही तिची तिरस्कारयुक्त प्रतिमा होतीच. तिला भेटल्यावर मात्र तिच्या मागण्यांनी तो चकित झाला. एक ठेवलेली बाई म्हणून खरे तर तिने त्याला पळून जाण्याबद्दल विचारायला पाहिजे होते पण तिने विचारले “ अजून किती दिवस तो तुझ्या ताब्यात असणार आहे ? त्याला तू दोस्तराष्ट्रांच्या ताब्यात का नाही देत ?”
“उलट तो त्यांच्या हातात पडू नये म्हणून मी सर्व प्रयत्न करणार आहे”
“कसे सांगू आणि पटवू तुला ? मी एवढी वर्षं त्याच्या बरोबर रहात होते ते माझे त्याच्यावर खरे प्रेम आहे म्हणून. मी त्याच्या बरोबर असतानाच जिवंत होते असे म्हणायला हरकत नाही. विश्वास ठेवा माझ्यावर” एवढे म्हणून तिने आपले अश्रूंनी भिजलेले गाल आपल्या तळहातात लपविले आणि ती जोरजोरात हुंदके देऊ लागली.

क्लारा -

बेलिनीनीला तिची दुर्दशा पाहून कीव आली. तो तिचा शत्रू नाही हे लक्षात घेण्याची त्याने तिला विनंती केली आणि तिला या सगळ्या प्रकरणात कमीतकमी त्रास होईल याचा तो प्रयत्न करेल याची ग्वाही दिली.
“शत्रूही इतका प्रेमळ असू शकतो याचा प्रत्यय मला आज आला. माझ्यावर अजून एक उपकार करा.
बेलिनीने तिच्या समोर खुर्ची ओढली आणि तो लक्षपूर्वक तिचे बोलणे ऐकू लागला. पण त्याला ऐकू आले ते फक्त पुटपुटणे आणि तिच्या आणि मुसोलिनीच्या पुर्वायुष्यातील घटना. त्याला शंका आली की ही भ्रमिष्ट झाली आहे की काय.
बर्‍याच वेळाने तिला थांबवत बेलिनी म्हणाला “ काय आहे ? मला सांगा. मी तुम्हाला वचन देतो की मी आपल्याला शक्य असेल ती सर्व मदत करेन”.
क्लॅरेट्टाने आपली खुर्ची पुढे ओढली आणि बेलिनीचे हात घट्ट पकडत ती म्हणाली “ मला त्याच्या बरोबर ठेवा. तुम्हाला त्यात काय धोका आहे ?”
बेलिनीने आपला हात सोडवत विचार केला. तसे केले तर जे मुसोलिनीचे होईल तेच हिचे पण होणार. तो बोलणार तेवढ्यात क्लॅरेट्टा त्याच्यावर ओरडली “ मला माहिती आहे तुम्ही त्याला ठार करणार आहात”
“छे छे! तसले काही नाही” ठामपणे नकार दर्शवत बेलिनी म्हणाला.
क्लॅरेट्टाने आपले अश्रू पुसले आणि ती शांतपणे पण ठामपणे म्हणाली “ मला एक वचन दे. जर तुम्ही त्याला गोळ्या घालणार असाल तर मलाही त्याच्याबरोबर गोळ्या घाला. त्याच्या शिवाय मी जगूच शकत नाही. मी फक्त एवढेच मागणे मागते आहे”
“प्रेमासाठी स्त्री काहीही करु शकते हेच खरे” तो मनात म्हणाला. त्या क्षणी बेलिनीसारख्या युद्धाने निर्ढावलेल्या सैनिकाला खर्‍या प्रेमाचा अर्थ कळाला. तिचा एवढा तिरस्कार केल्याबद्दल त्याला स्वत:चीच शरम वाटली.
“मी माझ्या मित्रांशी चर्चा करून काय ते सांगतो.” स्वरातील कंप लपविण्याचा यत्न करत बेलिनी म्हणाला.

आता मुसोलिनीच्या मागे दोन प्रकारची माणसे लागली होती. कम्युनिस्टांना तो तर मेलेलाच हवा होता आणि दोस्तराष्ट्रांच्या सेनेच्या मुख्यालयाला तो जिवंत हवा होता. मुसोलिनीचे भवितव्य तो अगोदर कोणाच्या हाती लागणार होता त्याने ठरणार होते.

एक अमेरिकन अधिकारी, त्याचे नाव एमिलो डाड्डरीओ याने आपल्या १२ इटालियन गुप्तहेरांबरोबर २७ एप्रिलला स्विस सीमारेषा ओलांडली. त्यांना मुसोलिनीला पकडायची कामगिरी देण्यात आली होती. त्यांच्या या प्रयत्नात ते जेथे जेथे गेले तेथे त्यांना सर्वत्र इटालियन कम्युनिस्ट आणि जर्मन सैनिकांमधे चकमकी होत असलेल्या दिसल्या. त्या गोंधळात ते जेव्हा मिलानला पोहोचले तेव्हा मुसोलिनी तेथून गेलेला होता. मिलानला पोहोचणारा पहिलाच अमेरिकन असल्यामुळे त्याला उरलेल्या जर्मन सैनिकांची कत्तल टाळायचे काम प्रथम करावे लागले. त्यामुळे मुसोलिनीला पकडायच्या शर्यतीत तो मागे पडला.

इकडे बेलिनीमुळे कम्युनिस्टांना मात्र मुसोलिनी कुठे होता हे पक्के माहीत असल्यामुळे त्यांनी त्याचा मारेकरी नियुक्त केला. त्याचे नाव होते वाल्टर ऑडिशिओ. याचे वय तेव्हा होते ३६ आणि तो कर्नल व्हॅलेरिओ म्हणून ओळखला जाई. त्याने मुसोलिनीच्या कम्युनिस्टांच्या विरुद्ध चालवलेल्या मोहिमेअंतर्गत बराच काळ फॅसिस्ट छळ छावण्यामधे व्यतीत केला होता. हा फॅसिझमचा कट्टर विरोधक आणि युद्धामुळे निर्ढावलेला होता.

कर्नल व्हॅलेरिओ.

त्याने मोठ्या धूर्तपणे अमेरिकन डाड्डरिओ कडून कोमो आणि त्याच्या आसपास मुक्तपणे फिरण्याचा परवाना मिळवला व २८ एप्रिलला तो त्याच्या माणसांना घेऊन त्या भागासाठी रवाना झाला. बेलिनीने मोठ्या नाखुषीनेच त्याचे स्वागत केले. त्याच्या उद्धट बोलण्यामुळे खरे तर बेलिनीला तो फॅसिस्टच वाटला. पण अमेरिकन परवान्यामुळे पारडे वाल्टरच्या बाजूला झुकले आणि बेलिनीने त्याचे वर्चस्व मान्य केले.

“आपल्याला बर्‍याच मोठ्या धेंडांना गोळ्या घालायच्या आहेत. माझी आज्ञा आहे ती. मुडदे पाडा त्यांचे “ वाल्टर एकदम किंचाळला.
बेलिनीचे शब्द घशातच अडकले. चौकशी न करता एखाद्याला ठार मारणे हे फॅसिस्टांसारखेच झाले. बेलिनी विरोध करणार तेवढ्यात त्याने यादी वाचायला सुरवात केली सुद्धा.
मुसोलिनी – मृत्यूदंड
क्लारा – मृत्यूदंड......
.........
“तू त्या बाईला ठार मारणार ?” बेलिनीने विश्वास न बसून विचारले. पण वॉल्टरला ती बाई का बुवा आहे त्याने काही फरक पडत नव्हता. तो शांतपणे म्हणाला “ती एवढी वर्षे त्याच्या सर्व धोरणांमधे सामील होतीच की”
“मुसोलिनीनी ठेवलेली ती एक सामान्य, निष्पाप बाई आहे. तेवढ्यासाठी तिला शिक्षा देणे म्हणजे......” बेलिनीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचे बोलणे मधेच तोडून वॉल्टर म्हणाला “ मी कोणालाही शिक्षा देत नाही. हे सगळे वरून आलेले आहे.” वरून म्हणजे कुठून देवाला माहिती. आदल्याच दिवशी बेलिनीने मुसोलिनीला सुरक्षतेच्या कारणाने दुसर्‍या जागेवर हलवले होते. ही जागा मेझेग्रातील एका शेतावर होती आणि मुख्य म्हणजे त्याने क्लॅरेट्टालाही त्याच्या बरोबर रहायला परवानगी दिली होती. अत्यंत छोटीशी, एखाद्या गरीब शेतकर्‍याची असावी तशी ही खोली, ६२ वर्षांपूर्वी मुसोलिनीने अशाच खोलीत जन्म घेतला होता.

वॉल्टरच्या घाईमुळे वैतागून बेलिनीने थोडा वेळ काढायचा ठरवला. त्याने सुचवले की तो त्याच्या काही माणसांना घेऊन मुसोलिनीच्या सगळ्या मंत्र्यांना जर्मासिनोतून घेऊन येईल. तो पर्यंत त्याची दोन माणसे म्हणजे मॉरेट्टी आणि कानाली हे मुसोलिनीला आणि क्लॅरेट्टाला घ्यायला जातील. डोंगोत ही सगळी माणसे वॉल्टरच्या हवाली करण्यात येतील. यात बेलिनीचे दोन उद्देश होते असे मानायला जागा आहे. डोंगोला पोहोचेपर्यंत कम्युनिस्ट पक्षांच्या वरिष्ठांना ही बातमी कळेल आणि मुसोलिनीवर खटला चालवण्यासाठी जिवंत पकडायचे आदेश देण्यात येतील. पण त्याच्या नजरेतून एक गोष्ट निसटली. मोरेट्टी हा त्याचा सैनिक असला तरीही तो एक कम्युनिस्ट अतिरेकी होता आणि तेवढाच खुनशी होता. जेव्हा मोरेट्ट आणि कानाली त्यांच्या गाडीत बसले तेव्हा त्यांच्या मागे वॉल्टरही बसलेला होता. बेलिनीच्या माणसांनी विरोध करायचा प्रयत्न केला पण वॉल्टरने दामटून ती गाडी तशीच पुढे न्यायला सांगितली.

दुपारी चारला त्यांची गाडी मुसोलिनीला ठेवलेल्या शेतावर पोहोचली. वॉल्टरने मुसोलिनीला अभिवादन करून म्हटले “मुसोलिनी चला मी तुमची सुटका करायला आलो आहे”
त्याच्याकडे बघून मुसोलिनी उपरोधाने म्हणाला “ व्वा ! सुटका का ? छान !”
त्यांना त्यांचे सामान आवरायला सांगून ते क्षणभर बाहेर उभे राहिले. त्यांना त्या फियाटमधे बसवून ते निघाले तेव्हा एक तास झाला होता. मागच्या बाजूला क्लॅरेट्टा मुसोलिनीचा हात घट्ट पकडून बसली होती. त्या गाडीच्या चालकाच्या आठवणीनुसार ते दोघे कमालीचे शांत होते. गाडीच्या बाजूला मोरेट्टी आणि लॅंप्रेडी फूटबोर्डवर उभे होते आणि समोरच्या बाजूला बंपरच्या डाव्या बाजूला बंपरवर वॉल्टर स्वत: उलटे तोंड करू बसला होता. त्याच्या एका हातातील मशीनगन त्याने गाडीच्या मागच्या भागात रोखली होती. पुढच्या वळणावर एक बंगला होता त्याचे नाव व्हिला बेलमाँटे. शांत वातावरणात आणि आडोश्याच्या त्या जागी त्याने गाडी थांबवायला सांगितली आणि मुसोलिनीला आणि क्लॅरेट्टाला बंदूकीनेच खुणावून बाहेर यायची आज्ञा केली. बाकीचे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पहारा देत उभे राहिले. त्याने मग खिशातून एक कागद काढला आणि वाचायला सुरवात केली -
“स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वोच्च मुख्यालयाच्या आज्ञेनुसार, आणि इटालियन जनतेच्या वतीने मी ........ तेवढ्यात क्लॅरेट्टा मधे पडली आणि विनवू लागली “ नाही ! नाही ! तुम्ही असे करू शकत नाही”
तिला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत वॉल्टर ओरडला “ ए बाई तुला मरायचे नसेल तर बाजूला हो !” ती बाजूला होत नाही असे दिसल्य़ावर कपाळावरचा घाम पुसत त्याने आपल्या मशीनगनच्या चापावरचे बोट तीनदा आवळले पण ती मशीन गन अडकली होती. त्याने ती टाकून पिस्तूल काढले आणि झाडले “क्लिक” असे आवाज झाले पण गोळ्या काही उडाल्या नाहीत. त्याने मोरेट्टीला ओरडून त्याची बंदूक मागितली. त्याने पळत पळत ती आणुन दिली.

गाडीचा चालक बघत होता. हे सगळे पाहून त्याच्या पोटात ढवळू लागले. मुसोलिनीने आपल्या कोटाची बटणे काढली आणि तो म्हणाला “ माझ्या छातीत गोळ्या घाल”. क्लॅरेट्टाने त्या बंदूकीची नळी हाताने धरायचा प्रयत्न केला. मागे सरकत वॉल्टरने दोन फैरी झाडल्या. एक पाच काडतुसांची आणि एक चार काडतुसांची. दोनीही कैदी खाली कोसळले पण पाच गोळ्या शरीरात जाऊनही मुसोलिनी जिवंत होता.

वॉल्टरने शेवटची गोळी त्याच्या ह्रदयातून आरपार धाडली आणि खेळ संपला.......

क्रमशः

जयंत कुलकर्णी.
हा भाग जरा मोठा झाला आहे पण परिणामकारक होण्यासाठी तसे नाईलाजाने केले आहे. पुढच्या भागात पिआत्झाले चौकातील विटंबना आणि अवांतर – त्यात यात उल्लेख झालेल्या व्यक्तिंचे पुढे काय झाले त्याबद्दलही थोडे...... कारण आपल्या मनात नेहमीच रुखरुख रहाते की यांचे पुढे काय झाले असेल .................

इतिहासकथामाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

वाचतोय.. प्रवाही लिखाण आहे..

धन्यवाद.

बहुगुणी's picture

2 Mar 2012 - 1:27 am | बहुगुणी

मुसोलिनीचा शेवट वाचून नुकताच बंडखोर सैनिकांकडून रस्त्यावरच झालेला लिबियाच्या गद्दाफीचा अंत आठवला, दोन मुजोर हुकुमशहांच्या अंतसमयीचं साम्य लक्षणीय असलं तरी क्लॅरेटाचं मुसोलिनीवर जीव ओवाळून प्रेम करणंही लक्षात राहील.

(गेल्या भागाच्या अखेरीस असलेल्या प्रकाशचित्रातील स्त्री विषयी आणि स्कॉर्झेनीविषयी या भागात काही उल्लेख असणार होता तो दिसला नाही. ती स्त्री म्हणजे मुसोलिनीची पत्नी रेचेल का?)

एक वाचनीय लेखनमाला संपत आलीय, पण इतर असंच ऐतिहासिक लेखन तुमच्याकडून वाचायला मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद!

रामपुरी's picture

2 Mar 2012 - 1:48 am | रामपुरी

...

प्राजु's picture

2 Mar 2012 - 3:34 am | प्राजु

प्रचंड ताकदीचं लिखाण आहे..
सुरेख!!

सुधीर कांदळकर's picture

2 Mar 2012 - 7:10 am | सुधीर कांदळकर

कालच आठ भाग वाचले. आणि आज नववा मिळाला.

५० फक्त's picture

2 Mar 2012 - 8:04 am | ५० फक्त

जबरदस्त लिखाण, खुप आवडलं. इतिहास असा आपल्या मायबोलीतुन आणि एवढा सहज उपलब्ध झाला तर त्यात जास्त गुंतायला होतं.

अन्या दातार's picture

2 Mar 2012 - 8:23 am | अन्या दातार

इतिहासाची सर्व क्रमिक पुस्तकं टाकून द्यायला हरकत नसावी आता. तुम्ही जागतिक महायुद्धांचा इतिहास लिहा, मालोजीराव शिवाजीराजांचा इतिहास लिहिल.

क्लॅरेट्टाबद्दल कमालीचा आदर वाटतो. तितकेच कुतुहल शांतपणे मृत्युला सामोर्‍या जाणार्‍या मुसोलिनीबद्दलही आहे. मानसिक दुबळेपणामुळे त्याची सत्ता गेली असं मला अजुनही वाटतं.

काका तुम्ही खूपच चांगली माहिती दिली आहे. संपूर्ण लेखमालिका अतिशय उत्तम जमून आली आहे त्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही हे लिखाण पुढे चालू ठेवावे ही कळकळीची विनंती..

- पिंगू

प्रचेतस's picture

2 Mar 2012 - 9:20 am | प्रचेतस

सहमत आहे.
मिपावरची उत्कृष्ट आणि संग्राह्य लेखमाला.

तिमा's picture

2 Mar 2012 - 9:30 am | तिमा

जयंतराव,
सगळे भाग परत सलग वाचून काढले. लेखन इतके छान झाले आहे की याचे पुस्तक करण्याचे मनावर घ्या.
मुसोलिनीची गद्दाफीशी तुलना होणार नाही. कारण जो स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलायला तयार होतो तो कसाही असला तरी शूर शिपाईच! याउलट गद्दाफी संपत्तीची लालूच दाखवून जीव वाचवायला बघत होता.

जयंत कुलकर्णी's picture

2 Mar 2012 - 11:58 am | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

सगळी मिळून झाली ५५ a4 ची पाने कोण एवढे छोटे पुस्तक छापतय ? हं आता गुडेरियन, स्पिअर, गोअरींग, गेल्हेन, गोबेल्स इ... वर लिहून सगळ्यांचे मिळून एक पुस्तक काढता येईल म्हणा पण छापणार कोण ? अर्थात प्रयत्न करायला हरकत नाही. प्रयत्न करतो.

प्रास's picture

2 Mar 2012 - 10:20 am | प्रास

जयंतराव, एक अत्यंत वाचनीय लेखमाला वाचतोय. इतिहास असा जिवंत होऊन स्वतःला आपल्या पुढे व्यक्त करतोय असंच वाटतंय.
या महितीपूर्ण लिखाणाबद्दल तुमचा अत्यंत आभारी आहे.
(जयंतरावांचा फुल्ल्स्पीड पंखा)

धन्या's picture

2 Mar 2012 - 11:18 am | धन्या

विषयच तसा आहे म्हणा किंवा तुमची असे विषय मांडण्याचा हातखंडा म्हणा, अगदी शेवटपणे खिळवून ठेवतं तुमचं लेखन.

एक शंका आहे, या लेखमालेतील फोटो युद्धाच्या धामधूमीत कसे काय घेतले गेले?

जयंत कुलकर्णी's picture

2 Mar 2012 - 12:03 pm | जयंत कुलकर्णी

उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक सेनेचे युद्धवार्ताहर असतात. त्यांच्या कडे सगळी सामग्री असतेच. हे स्वतः सैनिक असल्यामुळे कुठेही जाऊ शकतात. फोटोग्राफी वर आजवर जि लिहिली गेलेली पुस्तके आहेत त्यात सगळ्यात उजवे US Army चे फोटोग्राफी Manual हे पुस्तक आहे.

दुसरे वर्तमानपत्रांचे युद्ध वार्ताहर. हेही जीव धोक्यात घालून आपली करामत दाखवत असतातच. बरेचसे फोटो हे चित्रफितीतील framesही असतात.

इष्टुर फाकडा's picture

2 Mar 2012 - 3:25 pm | इष्टुर फाकडा

जयंतराव, धन्यवाद !

मन१'s picture

2 Mar 2012 - 8:39 pm | मन१

थरारक जीवनपट.
तुम्ही मागच्या बहगात म्हटलात तसे मुसोलिनीने खरोखरीच स्वतःच्या हाताची कापलेली नस तशीच राहू दिली असती तर त्याचे व त्याच्या देशाचे हाल थोडे कमी झाले असते.
एवढे क्रूरकर्म करणारा माणूस क्रूर कमी व न्यूनगंडाने पछाडलेला अधिक वाटला. अगदि मोक्याच्या क्षअणी कुठली तरी अनामिक भीती त्याला दुबळे करुन जाताना दिसते, शांत डोक्याने योग्य निर्णय घेण्यास परावृत्त करताना दिसते.
कसले तरी जबरदस्त न्यून हा मनी वागवत असावा.

मन१'s picture

2 Mar 2012 - 8:42 pm | मन१

थरारक जीवनपट.
तुम्ही मागच्या बहगात म्हटलात तसे मुसोलिनीने खरोखरीच स्वतःच्या हाताची कापलेली नस तशीच राहू दिली असती तर त्याचे व त्याच्या देशाचे हाल थोडे कमी झाले असते.
एवढे क्रूरकर्म करणारा माणूस क्रूर कमी व न्यूनगंडाने पछाडलेला अधिक वाटला. अगदि मोक्याच्या क्षअणी कुठली तरी अनामिक भीती त्याला दुबळे करुन जाताना दिसते, शांत डोक्याने योग्य निर्णय घेण्यास परावृत्त करताना दिसते.
कसले तरी जबरदस्त न्यून हा मनी वागवत असावा.