भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला 'चक दे' पिक्चर तुम्ही पाहिला आहे का ?
त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे ' हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है, और इस टीम का गुंडा मै हुं'.
पाहिला असेल तर लक्षात ठेवा, पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा, कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात.
चवीने खाणे कुणाला आवडत नाही ?
पण एखादा पदार्थ 'चांगला' होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही 'तृप्ती'ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो ?
'बेस्ट इन क्लास' उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर ? जगभरातुन कष्टाने हुडकुन आणि मागेल ती किंमत मोजुन गोळा केलेला विविध प्रकारचा कच्चा माल ? का 'हे कसे करावे, ते कसे करु नये' ह्याच्या हजारो टिपा देणारे प्रकाशित साहित्य ?
केवळ हे एवढे सगळे आणि तत्सम 'अत्युत्तम' गोळा करुन पदार्थ बनवता येतो ?
का त्यासाठी लागतो तो प्रत्येक वस्तुची किंमत ओळखणारा आणि ती वस्तु कशी, किती, केव्हा व कुठे वापरता येईल ह्याची नेमकी जाण असणारा निष्णात 'बल्लवाचार्य' ?
पुन्हा एकदा असाच प्रश्न विचारतो. बर्याचदा आपल्याला एखाद्या गाण्याची एखादा सुरेल तुकडा आवडुन जातो, तो आपल्या कर्णपटलवर वारंवार रुंजी घालत असतो व सवयीने आपणही ते गाणे गुणगुणत असतो. तर ते गाणे एवढे 'नादमधुर' बनवण्यासाठी काय लागते हो ?
विविध प्रकारची वाद्ये वाजवणारे त्या त्या वाद्याचे जगभरातले दादा कलाकार ? काळजापर्यंत जाऊन भिडणारा मधुर आवाज असलेले गायक/गायिका ? रेकॉर्डिंगची 'बेस्ट इन क्लास' सुविधा असलेला रेकॉर्डिंग स्टुडियो ? अत्युच्च दर्जाचे काव्य लिहणारे गीतकार ?
ह्या सर्वांना एकत्र आणले तर प्रत्येक गाणे हे 'क्लास' होईलच का ?
का त्यासाठी आपल्याला लागतो तो हे प्रत्येक घटक कुठे, कसे वापरावे ह्याचे ज्ञान असलेला आणि ह्या सर्वांच्या ताळमेळातुन एक प्रकारची जादु करुन अजरामर गीत पेश करणारा एक जादुगार ?
भलेही कुठल्याही दैदिप्यमान यशामागे 'टीमवर्क'चे स्थान वादादीत असले तरीही ह्या 'टीम'ला सरळ वळण लाऊन, त्या टीममधल्या प्रत्येकाची किंमत आणि महत्व अचूकपणे ओळखुन वेळ येईल तशी त्याचा चाणाक्षपणे वापर करणारा 'टीम मॅनेजर' हा ह्यात सर्वात महत्वाचा घटक नाही का ?
'गुरुविण कोण दाखवेल वाट' ह्या वचनामध्ये ज्याची आवश्यकता सांगितली जात आहे तो गुरु म्हणजे टीम मॅनेजर नव्हे काय ? समजा हाच गुरु 'अपात्र' असेल तर त्या टीमवर 'गुरुविण कोण लावेल वाट' म्हणण्याची वेळ येणार नाही काय ?
असो, नमनालाच घडाभर तेल वाहुन झाल्यावर आपण आता मुळ मुद्द्याकडे वळुयात.
फूटबॉल हा आमचा आवडता खेळ आहे, ह्या खेळावर, ह्यातल्या प्रसिद्ध टीम्सबद्दल, त्यातल्या जिगरबाज खेळाडुंबद्दल आणि त्यांच्या खेळावर मनापासुन प्रेम करुन टीमसोबत त्यांची हार-जीत साजरी करणार्या लाखो खेळवेड्या रसिकांबद्दल अनेकांनी खुप काही लिहुन ठेवले आहे, आम्हीही बर्याचदा ह्यावर जमेल तसे लिहले आहे.
पण ह्या सर्वांपेक्षा एक वेगळाच आयाम असलेल्या 'टीम मॅनेजर्स'बद्दल काही लिहुन त्यांचेही आमच्यावर असलेले ऋण फेडायचा बर्याच दिवसापासुन विचार होता त्याला आता मूर्त स्वरुप देत आहोत. ह्या लेखात मी फूटबॉल टीम्सच्या काही नावाजलेल्या मॅनेजर्सबद्दल ४-४ वाक्ये लिहुन तुम्हाला त्यांचे थोडक्यात ओळख करुन देणार आहे.
अगदी सर्वांबद्दलच सर्वच माहिती लिहण्याचा अट्टाहास करणे हे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे, ते जमणे शक्य नाही. पण ह्या निमित्ताने सध्याच्या काळात फूटबॉलमधले अगदी जरी देव नसले तरी अवलिये नक्कीच असणार्या काही महान व्यक्तींसमोर आमच्या फूटबॉलप्रेमात भिजवलेली सांजवात लावण्याच्या ह्या लेखाद्वारे प्रयत्न करतो आहे.
१. सर अॅलेक्स फर्ग्युसन - मँचेस्टर युनायटेडचा वास्तुपुरुष :
बायचान्स तुमचा देवावर विश्वास असेल तर एक श्रद्धा म्हणुन केवळ त्याच भावनेने तुम्ही कधी केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ मंदिराला भेट दिली आहे का ? ह्या पद्मनाभ मंदिरातले नंबी (नंबुद्री) ब्राम्हण पुजारी पाहिले आहेत का ? निदान त्यांच्या भगवान पद्मनाभस्वामींवर असलेल्या श्रद्धेबद्दल आणि त्या सोपस्कार व कर्मकांडातुन त्यांच्यात येत असलेल्या कर्मठपणाबद्दल आणि ध्येयनिष्ठेबद्दल तुम्ही कधी काही पाहिले, वाचले, ऐकले आहे काय ?
ओके. पाहिले नसल्यास किंवा देवावर अथवा फारफारतर कर्मकांडावर विश्वास नसल्याने त्याची सत्यता जोखण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचे समकक्ष उदाहरण म्हणुन तुम्ही अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याकडे पहा असे सुचवेन.
फूटबॉल हा धर्मच मानला तर मँचेस्टर युनायटेडचे स्थानमहात्म्य, त्याचा इतिहास, त्याची भव्यता ही पद्मनाभ मंदिरापेक्षा तसुभरही कमी नाही. ह्यांचेही जगभरात लाखो भाविक आहेत आणि त्यांची 'मॅन-यु'वर अगदी भगवान पद्मनाभाएवढीच श्रद्धा आहे. ह्या मॅन-युची गेली २० वर्षे अव्याहत सेवा करणारे सर अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची श्रेष्ठताही कुठल्याही नंबीपेक्षा कणभरही कमी नाही.
किमान ७५००० ह्या संख्येने ओल्ड ट्रॅफर्डवर संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या लाल रंगाचे कपडे घालुन 'रेड डेविल्स' म्हणवले जाणारे पाठिराखे "Glory glory glory Man United, And the reds go marching on, on, on..." चा जयघोष करत असतात आणि त्याच एनर्जीवर जेव्हा मॅन-युचे ११ खेळाडु मैदानावर कमाल करत प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणत असतात तेव्हा मैदानाच्या टचलाईन म्हणवल्या जाणार्या रेषेवर उभा राहुन एक ब्रिटिशांच्या व्याख्येतला जंटलमन पोषाख केलेला सत्तरीच्या घरातला जख्ख म्हातारा अगदी शांतपणे हा खेळ बघत असलेला दिसला तर ती व्यक्ती अन्य कुणी नसुन खुद्द सर अॅलेक्स फर्ग्युसन आहे हे लक्षात ठेवा. भगवान पद्मनाभाचे सर्व पुजापाठ आणि विधी पद्धतशीरपणे झाले पाहिजेत ह्या चिंतेत नंबी लोक ज्याप्रकारे सर्व काही विसरुन आराधनेत मग्न असतात तोच आवेश सर अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यामध्ये असतो. ह्या सोपस्कारादरम्यान जे जे काही रितीला सोडुन आणि पाठिराख्यांना अप्रिय असे काही घडत असेल ते ते टाळण्यासाठी कधी प्रेमाने, कधी धूर्तपणे तर कधी चिडचिड करुन जे जे शक्य आहे ते करण्यासाठी जी चिकाटी आणि जो कर्मठपणा अंगी असावा लागतो तो असातसा मिळत नाही, अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांनी तो कमावला आहे.
त्यांचा आवर्जुन सांगण्यासारखा एक गुण म्हणजे त्यांनी शब्दांतुन निर्माण केलेला दरारा. बाळासाहेब ठाकरे जसे विरोधकाला निवडणुकीच्या आधी आणि मग नंतर जसे कच्चे खाऊन टाकतात तोच आवेश ह्या सायबांचा 'प्री-मॅच कॉन्फरंस'ला असतो. साहेब शक्यतो मिडियाला नाराज करत नाहीत व कही ना काही 'न्युज' देतातच.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या दिग्गज खेळाडुंची नुसती नावे जरी लिहायची म्हटली तर ह्य लेखात इतर काही लिहण्याइतकी जागा उरणार नाही. इथे खेळुन अणि मग बाहेर जाऊन 'स्टार' झालेले तर ढिगाने आहेत पण मॅन-युचा हा अढळ ध्रुवतारा अजुनही अचलच आहे.
सलग २० वर्षे मॅन-युचे मॅनेजरपद संभाळताना अॅल्क्स फर्ग्युसन ह्यांनी जे जे उपलब्ध आहे ते ते सर्व कमावले आहे. 'Nothing left to prove' असे जर म्हणायचे झाले तर ते सर अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याबाबत म्हणता येईल.
१२ वेळा प्रिमियर लीगची विजेतेपद, ५ वेळा एफ.ए. कप, १० वेळा कम्युनिटी शिल्ड, २ वेळा अत्युच्च चँपिय्सन्स लीग, एकदा क्लब वर्ल्ड कप ........... अजुन काय अपेक्षा असते एका मॅनेजरकडुन ?
ह्याशिवाय प्रिमियर लीगमधला सर्वश्रेष्ठ मॅनेजर हा सन्मान १० वेळा, एक युएफा मॅनेजर ऑफ द ईअर, बीबीसीकडुन क्रिडाक्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ३ वेळा, एक ब्रिटिश हॉल ऑफ फेम, एक युरोप हॉल ऑफ फेम, एक फिफा प्रेसिडेन्ट अॅवॉर्ड ह्याहुन जेष्ठ असा सन्मान म्हणजे ब्रिटिश सरकारकडुन 'सर' ही पदवी देऊन बहुमान व सर्वात महत्वाचे म्हणजे करोडो पठिराख्यांचे प्रेम.
लोक मॅन-युला कितीही शिव्या देत असले तरी जेव्हा सर अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांचे नाव येते तेव्हा समोरच्याच् शब्दातुन आणि वागण्यातुन 'आदर' हा दिसावा लागतो आणि तो दिसतोच.
शेवटी थोडक्यात सांगतो, आजच्या काळात जर 'दिग्वीजय आणि राजसुय यज्ञ' वगैरे संकल्पना असत्या तर सर अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची १० वेळवेगळे संघ घेऊन प्रत्येकवेळी हे काम आरामात पुर्ण केले असते, हा माणुसच असा आहे .... दिग्वीजयी आणि श्रेष्ठ !
२. आर्सेन वेंगर - आर्सनेलचे गुरु द्रोण आणि इंग्लिश फूटबॉलमधला बनिया :
समजा आज महाभारताचा काळ असला असता आणि फूटबॉलला समजा राजाश्रय वगैरे मिळुन राष्ट्रखेळ असल्याचा दर्जा मिळाला असता आणि इथल्या राज्यकर्त्यांनी हस्तिनापुरात कुरुंनी जसे सर्व विद्या, अस्त्र, धर्म, निती शिकण्यासाठी 'गुरुकुल' स्थापन केले होते त्याच धर्तीवर फूटबॉल शिकण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी एखादी संस्था काढायचे ठरवले असते तर त्या शाळेचे नाव नक्की 'आर्सनेल' ठेवले असते आणि 'महर्षी आर्सेन वेंगर' तिथे कुलगुरु म्हणुन जाऊन बसले असते. इथे शिकलेल्या सर्व निष्णात खेळाडूंनी आपल्या कौशल्याने ह्या गुरुकुलाची किर्ती जगभर पोहचवली असती आणि त्याने 'आर्सेन वेंगर' व पर्यायाने आर्सनेलच्या जेष्ठतेत अजुन भर पडली असती.
पण सध्या महाभारताचा काळ नाही आणि राजाश्रय, गुरुकुल वगैरे संकल्पना अस्तित्वात नाहीत.
पण 'आर्सेन वेंगर' हा माणुस अशा परिस्थितीत हार खाऊन घाबरुन जाणार्यातला नाही, तो १९९६ पासुन ते थेट आजही आर्सनेलच्या टीमसाठी एकाहुन एक सरस खेळाडू घडवत आहे, जगभरातुन त्यांना हुडकुन आणुन त्यांच्या कौशल्याला आपल्या अनुभवाने पैलू पाडत आहे, हे पैलू पाडलेले हिरे आर्सनेलच्या कोंदणात लखलखुन त्यांना योग्य सन्मान मिळवुन देत आहेत व त्याबरोबर बाहेरच्या जगाचेही लक्ष वेधुन घेत ह्या हिर्यांसाठी मोठ्ठी किंमत मोजण्यास त्यांना भाग पाडत आहेत.
अॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यासारखे ढिगभर कप जर आर्सनेलने वेंगर ह्यांच्यासोबत जिंकले नसले तरी त्यांनी गेली १५ वर्षे आर्सनेलला एक 'लढाऊ टीम' म्हणुन जी ओळख मिळवुन दिली आहे ती आजही टिकुन आहे. सध्या भयंकर फॉर्मात असलेली अजेय बार्सिलोना जर कुणाला घाबरत असेल तर ती आर्सनेलच्या खेळाला आणि त्याचे शिल्पकार आहेत ते आर्सेन वेंगर.
आर्सेन वेंगर ह्यांना इंग्लिश फूटबॉलचा 'बनिया' म्हणुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे जिथे चेल्सी, मॅन-सिटी, लिव्हरपुल, रियाल माद्रिद अशा टीम्स ट्रान्सफर विंडोमध्ये करोडो रुपये घालवुन चांगले स्टार्स विकत घेतात ते स्टार्स हे वेंगर ह्यांच्या आर्सनेल मधुन येतात. हे स्टार्स अगदी तरुण असताना व त्यांच्याभोवती एवढे वलय नसताना वेंगर त्यांना अगदी कवडीमोल म्हणावे अश भावात विकत घेतात, त्यांच्या खेळाला पैलु पाडतात, त्यांच्याकडुन मैदान गाजवुन घेतात आणि वेळ आली की अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांना विकतात.
जेव्हा इतर टीम्स प्लेयर्सच्या खरेडी-विक्रीमध्ये करोडो रुपायांच्या बुडीत खात्यात असतात तेव्हा इकडे वेंगर तेच करोडो कमावुन एखादी नवी ट्रेनिंग अॅकेडमी उघडुन उद्याचे करोडो रुपये किंमत असलेले स्टार्स बनवण्यात मग्न असतात.
धिरुभाईंना यदाकदाचित फूटबॉलमध्ये रुची असली असती तर त्यांनी नक्की आर्सेन वेंगर ह्यांना घेऊन 'रिलायन्स फूटबॉल कॉर्पोरेशन' स्थापुन करोडोंचा बिजीनेस केला असता, हा माणुस त्यासाठी अगदी योग्य आहे.
३. आन्द्रे विया बोयास - चेल्सीचा ध्येयवेडा तरुण मॅनेजर :
वय वर्ष ३५ !
हे वय काही मॅनेजर वगैरे होऊन जवळपास आपल्याच वयाच्या प्लेर्यसना 'कसे खेळावे' हे शिकवण्याचे नाही. तूर्तास ह्याचे प्रतिस्पर्धी असलेले इतर टीम्सचे मॅनेजर हे तसे म्हटले तर वयोवृद्ध म्हणु शकता असे असताना आणि एकेकाचा अनुभव विया-बोयासच्या एकुण वयाएवढा असताना हा पठ्ठ्या त्यांच्या नाकावर टिच्चुन चेल्सीसारख्या लोकप्रिय, ग्लॅमरस आणि रशियन उद्योगपतीच्या धनाढ्य पाठबळामुळे मॅनजर ह्या पदासाठी 'हॉट सीट' ठरलेली जागा पटकावुन 'युरोपियन दिग्विजया'ची स्वप्ने बघतो ही घटना अचाट आणि अतर्क्य आहे. बाय द वे, कुठल्या प्लेयरसाठी किती ट्रान्सर मनी दिला आणि त्याला किती पगार मिळतो आदी बातम्या मिडिया चवीने चघळत असताना खुद्द मॅनेजरसाठी ट्रान्सफर मनी देऊन त्याची बदली करुन घेण्याचा व एवाढ्या कमी वयात सर्वात जास्त 'कमावणारा' मॅनेजर अशी विया-बोयास ह्यांची ख्याती आहे.
आजही फूटबॉलमध्ये त्याच्या वयाचे किंवा अगदी त्याच्यापेक्षा मोठ्ठे असणारे प्लेयर्स मैदान गाजवत असताना हा तरुण रक्ताचा बेरकी माणुस समोरच्याच्या प्रदिर्घ अनुभव आणि जाण ह्यावर स्वतःच्या असिम इच्छाशक्ती आणि काही करुन दाखवण्याची प्रामाणिक भावना ह्या जोरावर भल्याभल्या टीमसमोर मोठ्ठे आव्हान उभा करत आहे ही बाब आवर्जुन नोंद घेण्यासारखी नक्की आहे.
तिकडे सर अॅलेक्स फर्ग्युसन गेली २० वर्षे एकहाती मॅन-यु संभाळत असताना त्यांच्या प्रदिर्घ अनुभवासमोर हा पठ्ठ्या "Well, It comes with confidence and time" म्हणत उभा रहातो आणि त्याचा हाच कॉन्फीडंस अजिंक्य मॅनचेस्टर सिटीचा प्रिमियर लीगमधला पहिला पराभव घडवुन आणतो. त्यासोबतच हा "It was important for us to win, but it's not about me, it's about this club, and at the moment this club is fifth in the table" असे सांगुन पुढील आव्हानास तयार असल्याचे संकेतही देतो.
मागच्या वर्षीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना 'एफ सी पोर्टो' ह्या त्याच्या मायदेशातल्या पोर्तुगीज टीमला घेऊन त्याने अनेक दादा क्लब्सना धूळ चारत 'युरोपा लीग' पटकावली तेव्हाच 'ये तो भाई लंबी रेस का घोडा है' अशी नोंद अनेकांनी करुन घेतली.
तसा म्हटला तर हा जुगार आहे, अपयश आल्यास गच्छंती अटळ आहे आणि त्याची संपुर्ण कल्पनाही विया-बोयासला आहे. पण 'ध्येयवेडे तरुण' इतिहास घडवतात असे म्हणतात, ते त्याने मागच्या वर्षी पोर्टोसोबत करुन दाखवले व म्हणुनच आज चेल्सी मॅनेजरच्या 'हॉट सीट'वर तरुणतुर्क आद्रे विया-बोयास दिमाखात आणि संपुर्ण आत्मविश्वासाने बसला आहे.
खेळात हार-जीत चालतच रहाते, पण जेव्हा काही अनपेक्षित घडवण्याची ठामपणे खात्री देणारा नव्या विचाराचा एखादा माणुस उभा रहातो तेव्हा त्याची दखल घ्यायलाच हवी, नाही का ?
------------------------------------------------------
थोडक्यात सांगायचे तर टीम कितीही मोठ्ठी असली, क्लबचा इतिहास कितीही दैदिप्यमान असला आणि त्यांनी गतकाळात कितीतरी ट्रॉफी जिंकल्या असतील, सध्या क्लबमध्ये जगातले बेस्ट टॅलेंटेड सुपरस्टार असले तर 'मॅनेजर' ही व्यक्ती महत्वाची आहे/असते.
आता कळाले का मी लेखाच्या सुरवातीला तो शाहरुखचा 'चक दे' मधला डायलॉक का लिहला ते ?
सामर्थ्य आहे टीमचे । जो जो खेळील तयाचे। परंतु तेथे मॅनेजरचे । अधिष्ठान पाहिजे।।
( क्रमशः)
प्रतिक्रिया
23 Jan 2012 - 2:30 pm | मन१
फुटबॉल काही धड समजत नाही. पण असे लेख मात्र जाम आवडतात.
हे निव्वळ खेळापुरते मर्यादित नसून त्यातली passion अधोरेखित करतात हे महत्वाचे.
वेगळ्या शब्दांत सांगायचं तर फेडरर, सचिन, अब्दुल कलाम्,स्टीव जॉब्ज, चेसपटू बॉबी फिशर, वैज्ञानिक्/गणिती टेस्ला ,भीमसेन जोशी अशी बरीच मंडळी दिसायला वेगवेगळ्या क्षेत्रात दिसत असली तरी त्यांच्यात एक गोष्ट समान आहे, त्यांच्या क्षेत्राबद्दल त्यांना असणारा ध्यास. त्यांना असणारं वेड किंवा जुनून.
अगदि तसाच ध्यास ह्या लेखातल्या व्यक्तिंनी घेतलेला दिसतोय. त्यामुळेच सामान्य वाचकालाही लेख जोदून ठेवू शकतो.
23 Jan 2012 - 2:38 pm | छोटा डॉन
परफेक्ट !!!
अत्यंत अचूक निदान केल्याबद्दल मनोबांचे आभार.
अॅक्च्युअली ही लेखमाला लिहण्यामागचा उद्देश तोच आहे.
फूटबॉल खेळ हा केवळ ११-११ प्लेयर्स मिळुन ९० मिनिटाचा सामाना खेळतात एवढेच नसते. त्यामागे अजुन आश्वासक आणि नोंद घेण्यासारखे बरेच काही असते. कित्येकवेळा प्रत्यक्ष सामन्यापेक्षा ह्या गोष्टींतुनच अधिक आनंद मिळतो.
ह्या लेखमालेतुन अशाच मनोरंजक गोष्टींची ओळख करुन देईन.
पुढचे काही भाग क्लब मॅनेजर्स, क्लबचा इतिहास, क्लबचे वैशिष्ठपुर्ण पाठिराखे, क्लबच्या 'दुश्मनी' च्या कथा, रंजक प्रसंग आणि गंमतशीर घटना, रोचक नियम, अचंबित करुन टाकणार्या ट्रान्सफर्सच्या बातम्या वगैरेवर आधारित असतील.
टेक्निकल भाषेचा अजिबात वापर न करता शक्य तितक्या सोप्या भाषेत ही माहिती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन.
- छोटा डॉन
23 Jan 2012 - 11:42 am | प्रीत-मोहर
सगळ्यात आधी डानराव पुन्हा लिहिते झाले म्हणुन त्यांचे अभिनंदन.
लेख सवड काढुन नंतर वाचल्या जाईल.
23 Jan 2012 - 11:50 am | विवेक मोडक
लेख सुरेख, पण विया बोयास आधी एका व्यक्तीचा उल्लेख झाला असता तर जास्त चांगलं वाटलं असतं.
व्यक्ती चेल्सीशी संबंधीत होती
23 Jan 2012 - 1:31 pm | टिवटिव
उल्लेख राहिलाय कि टाळलाय?????
23 Jan 2012 - 1:54 pm | छोटा डॉन
>>उल्लेख राहिलाय कि टाळलाय?????
चूक, दोन्हीही पर्याय चूकीचे आहेत.
स्पेशल वन 'जोसे मुर्हिनो' ह्यांचा उल्लेख जाणुनबुजुन केला नाही.
पहिला भाग माझ्या आवडत्या इंग्लिश प्रिमियर लीगला समर्पित होता आणि मुर्हिनो सध्या स्पेनमध्ये माद्रिद संभाळतात म्हणुन त्यांना ह्या भागात स्थान दिले नाही.
पुढे त्यांना आणि पेपे गुर्डियालो ह्यांना एकाच भागात घेऊ, ओके ?
- (सुस्पष्ट)छोटा डॉन
23 Jan 2012 - 4:52 pm | निखिल देशपांडे
असो
23 Jan 2012 - 8:42 pm | ब्रिटिश टिंग्या
>>असो!
सहमत आहे!
23 Jan 2012 - 12:55 pm | यकु
केवळ अप्रतिम!
कसं लिहीलंय ते सांगायला एका वाक्यात त्रिकाल पादाक्रांत करणारी डानरावचीच लेखणी पाहिजे.
डॉणराव, या स्टायलीत ही लेखमाला लिहीत राहिलात तर आम्हा पामरांना फूटबॉलमधल्या खाचाखोचा नक्कीच कळतील असा विश्वास वाटतो.
पुढील लेखनास शुभेच्छा आणि प्रतिक्षेत.
23 Jan 2012 - 1:03 pm | गणपा
फिफा विश्वचषक चालू नाही.. तरीही लेख पुर्ण वाचला.
(डॉण्रावांचा म्हटल्यावर वाचायला नको का? एकतर सटी षण्मासी लिहितात हल्ली. ;) )
ओळख परेड छान आहे. अजुन वाचण्यास उत्सुक.
23 Jan 2012 - 2:50 pm | प्यारे१
गणपाशेठ, शुद्धलेखन शुद्धलेखन....! ;)
बाकी विश्व'च'षकाबरोबर येणारा जाणारा फुटबॉलज्वर असतो आमच्याकडे. त्यामुळे टर्म्स कळेपर्यंत स्पर्धा संपली की झालं... बासनात गुंडाळून पुढे. पण मॅच बघताना मस्त वाटतं.
23 Jan 2012 - 1:12 pm | सुनील
जगातील सर्वात लोकप्रिय खेळाबद्दलची ही मालिकादेखिल लोकप्रिय होणार हे नक्की!
खेळाडू आणि मॅनेजर ही विश्वेच वेगळी. उत्तम खेळाडू हा उत्तम मॅनेजर होईलच असे नाही तसेच उत्तम मॅनेजरने कधी-काळी खेळले असलेच पाहिजे असेही नाही.
पुडील लेखाच्या प्रतीक्षेत.
अवांतर - गेल्या वर्षी फिफाच्या वेळेस मिपावर एक स्वतंत्र लेखनप्रकार उघडला गेला होता. त्या प्रकारातील लेख सध्या गायब दिसताहेत!
23 Jan 2012 - 1:13 pm | मृगनयनी
डॉनराव... छान लेख!!!
फूटबॉलबद्दल बर्याच माहित नसलेल्या गोष्टी सांगितल्याबद्दल आभार!!!! :)
24 Jan 2012 - 2:12 am | टुकुल
हेच बोलतो. धन्यवाद डानराव.
--टुकुल
23 Jan 2012 - 2:17 pm | स्मिता.
फूटबॉलबद्दल काहीच माहिती नसूनही हा लेख आवडला. टिम-मॅनेजर्सच्या गुणांची आणि कारकिर्दीची ओळख आवडली.
पुढचे भागही लवकर वाचायला आवडतील.
23 Jan 2012 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
खूप दिवसांनी वायदे आझम लिहिते झाले हे बघून सदगदित झाल्या गेल्या आहे. आज आम्ही नवशा मारुतीला एक सुपारी वाहू. ('डान्याच लेख आला आणि मिपाचा सर्व्हर गंडला' असे कोण बोंबलतोय रे तो?)
बाकी फोनवरती टाईप केलाय का लेख ? ह्या लेखातले मोठ मोठे 'पॉज' पाहून एका अनिवाशी मित्राची आठवण झाली. ;)
असो...
फुटबॉल हा तद्दन भिक्कारडा खेळ असल्याने नो कॉमेंटस.
23 Jan 2012 - 3:58 pm | विवेक मोडक
तुमच्या वेश्ट कोश्टात कोणता खेळ प्रसिद्ध आहे त्या खेळावर काहितरी येउदे अशी नम्र विनंती.
23 Jan 2012 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
त्या खेळावरती आम्ही 'गुलजार नार ही' ह्या सदरात ऑलरेडी लेखन करत आहोत टप्याटप्याने.
23 Jan 2012 - 3:46 pm | इष्टुर फाकडा
पण पहिल्या दोन व्यवस्थापकांच्या बाबतीत थोडा उपमांचा आणि विशेषणांचा मसाला जास्त झालाय असे वाटले. या खेळाबद्दल तेवढा भक्तीभाव नसल्यामुळे असे वाटत असेल कदाचित.
23 Jan 2012 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
मा. सरपंच, साष्टांग नमस्काराची स्मायली कुठे आहे?
इथेच सांगाल की वाविप्रमधे प्रश्न टाकू?
23 Jan 2012 - 4:57 pm | विजुभाऊ
हाच का तो डान्या ज्याने आय पील आणि पुणेरी पाट्या हे ल्हिले होते असा प्रश्नपडतो.
23 Jan 2012 - 4:59 pm | मेघवेडा
क्लब फुटबॉल का? बरं बरं.. चान चान!
(तेज्याला पन आमच्या क्रिकेटची घंटा सर नाय तुमच्या या खेळाला!)
23 Jan 2012 - 5:08 pm | गणपा
कंसाशी शमत आहे. ;)
23 Jan 2012 - 5:18 pm | मेघवेडा
तू अक्रूर काय रे, गणपा? ;)
23 Jan 2012 - 5:27 pm | छोटा डॉन
जाज्वल्य क्रिकेटप्रेमी, परमसचिनभक्त, कडवट क्रिकेटसैनिक आणि समस्त आंतरजालीय क्रिकेटप्रेमींचे परमपुज्य असणारे व त्यांचे नेते म्हणवले जाणारे श्री.श्री.श्री. मेघवेडा ह्यांना 'कृपया आम्हाला क्रिकेट ह्या विषयावर तोंड उघडायला लाऊ नका' अशी सादर विनंती करत आहे.
धन्यवाद :)
बाकी उद्या सकाळ तुम्ही आणि तुमची टिम रक्तबंबाळ झाला असाल तेव्हा बोलुच.
- छोटा डॉन
23 Jan 2012 - 5:42 pm | मेघवेडा
असो कशाला हो डान्राव. उघडाच की हो, ताँड म्हणतो मी. आपण वेगळा धागा काढू हवं तर. म्हणजे तुमचा हा धागा हायजॅक व्हायचा नाही! ;)
बाकी भाकितं वर्तवू लागलातसे, हातपायांच्या अॅडिशनल दोन जोड्या फुटल्या का काय अंगाला? ;)
23 Jan 2012 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
इंग्रज ज्यांना मागे सोडून गेले ते हेच.
हे राहतात इथे, कमावतात इथे आणि ह्यांच्या निष्ठा बाहेरच्यांशी.
असो..
जो क्रिकेट विषयी अद्वा तद्वा बोलतो, तो आयुष्यभर बिन लग्नाचाच राहतो आणि मेल्यावरती मुंजा होतो.
24 Jan 2012 - 4:23 am | मराठमोळा
>>जो क्रिकेट विषयी अद्वा तद्वा बोलतो, तो आयुष्यभर बिन लग्नाचाच राहतो आणि मेल्यावरती मुंजा होतो.
=)) =))
हाहाहाहा...
इतक्यात नको रे बाजार उठवू त्याचा.. :) लेखमाला तर पुर्ण करू देत..
24 Jan 2012 - 4:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पर्या, दंडवत.
डॉन्या, लेखनसंन्यास संपवलास हे उत्तम. लेख आवडला. क्रिकेटच्या मातृभूमीत सर्वात जास्त लोकप्रिय असणारा खेळ म्हणजे फुटबॉल. अर्थात मला त्यातलं फारसं समजत नाही पण काही मित्रांच्या सोबतीने थोडंफार फुटबॉल एकेकाळी पाहिलं आहे; बातम्या आणि त्यांच्यासंदर्भात जोरजोरात होणार्या चर्चा ऐकल्या आहेत. होजे मुरीह्न्यो (याचं नाव देवनागरीत कसं लिहायचं?) त्याच्या विनोदबुद्धी(!)साठी फारच आवडायचा, आवडतो.
इंग्लंडमधे निदान बालगोपाल आणि विद्यार्थीमंडळींमधे आर्सनल आणि आर्सन वेंगर यांच्या नावावरून चिक्कार विनोद घडतात. जाणत्या वयातल्या वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर सदर दुवा उघडावा.
(ब्रिटीशांकडून इंग्लिश बोलायला शिकलेली) अदिती
24 Jan 2012 - 10:04 am | प्रीत-मोहर
__/\__
=)) =))
24 Jan 2012 - 8:46 pm | पैसा
हे लग्नाला १० वर्षं झालेल्याने म्हटलं तर शोभून दिसेल.
24 Jan 2012 - 8:55 pm | Nile
लग्नाला दहा वर्ष झाल्यावर पुरेशी कटुता या वाक्यात तो घालूच शकणार नाही. उलट बिन लग्नाचा राहतो अन त्याचं कल्याण होतं असं वाक्य लिहलं जायची शक्यता वाढेल. ;-)
24 Jan 2012 - 9:02 pm | पैसा
तुला आणि पराला काय अण्भव आहे रे?
23 Jan 2012 - 5:45 pm | श्रावण मोडक
!
23 Jan 2012 - 6:04 pm | यकु
ठाण्यातल्या पॉप टेटस् मध्ये खुनाखूनी करणारे फुटबॉलप्रेमी मिपावरचेच होते म्हणा की ;-)
23 Jan 2012 - 6:04 pm | मुक्त विहारि
अप्रतिम लेख.....
23 Jan 2012 - 6:34 pm | पैसा
छान! लेख आवडला. कारण फूटबॉलपेक्षा जास्त मॅनेजर लोक आणि त्यांची मॅनेजमेंट याबद्दल चांगली माहिती आहे. पुढचा भाग कधी?
23 Jan 2012 - 6:40 pm | स्वाती२
झक्कास!
23 Jan 2012 - 7:27 pm | प्रभो
जर फक्त १९९२ नंतरच्याच मॅनेजर्स बद्दल लिहायचे असेल तर लेख ठीक आहे डानराव.
पण सर मॅट बस्बी, बॉब पैसले, केनी डाल्गलीश , बॉबी रॉबसन , बिल शँकली, सर अॅल्फ रामसे आणी ब्रायन क्लॉघ यांचा उल्लेख न केल्याबद्दल लेख फट्यावर मारण्यात आला आहे.
23 Jan 2012 - 7:52 pm | गणपा
फार लवकर फाट्यावर मारता गडे तुम्ही. जर्रा मेला धीर म्हणुन नाही.
23 Jan 2012 - 8:42 pm | प्रभो
जाणुनबुजुन ठेवला आहे ...
प्रेषक छोटा डॉन Mon, 23/01/2012 - 13:54.
>>उल्लेख राहिलाय कि टाळलाय?????
चूक, दोन्हीही पर्याय चूकीचे आहेत.
स्पेशल वन 'जोसे मुर्हिनो' ह्यांचा उल्लेख जाणुनबुजुन केला नाही.
पहिला भाग माझ्या आवडत्या इंग्लिश प्रिमियर लीगला समर्पित होता
होता असे डानरावांनी लिहिल्यावरच माझा प्रतिसाद लिहिला आहे.. ;)
24 Jan 2012 - 4:25 am | मराठमोळा
प्रभोशी सहमत, :D
(प्रभोचा मित्र)
मराठमोळा.
अवांतरः ती चेल्सीची टीम फारच भिकारडी आहे ब्वॉ.. ;)
23 Jan 2012 - 9:05 pm | रेवती
हम्म...
खेळ खेळणे, टिव्हीवर पाहणे आवडत नसले तरी तुझा बहारदार लेख वाचून हे मॅनेजर्स असलेल्या टिम्सची एकेक म्याच तरी पहावी असे वाटायला लागले आहे.
लेखन खूपच आवडले.
24 Jan 2012 - 12:57 am | Nile
या धंदेवाईक लोकांचा का उदो उदो करतात लोक कोण जाणे. मेले तिकडे युरोपात पैसे कमवतात अन पंढरपूरात आमची अन तूमची टिम म्हणत डान्राव भांडत बसतात! त्यापेक्षा देशाकरता काही तरी भरीव करा म्हणाव.
ब्राझिलीयन
24 Jan 2012 - 4:55 pm | विलासराव
तुमच्यासाठी वल्ड-कप फायनलचे (२०१४ ) तिकीट बुक करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष येउन घेउन जा.
24 Jan 2012 - 8:41 pm | अभिज्ञ
काय लिहिलेय, अन कोणी लिहिलेय ह्या पेक्षा कधी लिहिलेय ह्याला आमच्या लेखी जास्त महत्व असल्याने इतक्या दिवसांनी डॉनरावांना लिहिते झाल्याचे पाहून डोळे पाणावले.
लेख उत्तम झाला आहेच परंतु एकंदरीतच ह्या विषयावर गती कमी असल्याने या लेखाची मजा लुटता आली नाही.
बाकी क्रिकेटबद्दल प-याच्या मतांशी १००% सहमत.
अभिज्ञ