गाणारं वायोलिन!!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
12 Dec 2011 - 11:48 am

एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल?
तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय.

प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी.
मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे. अतिशय प्रतिभावंत वायोलिनवादक आणि संगीतकार म्ह्णून ते प्रसिद्ध आहेत. अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांच्या नावावर आहेत. वानगीदाखल - 'स्वर आले दुरुनी', 'किती सांगू मी सांगू कुणाला' या सुप्रसिद्ध गाण्यांचे ते संगीतकार आहेत.

वायोलिन हे वाद्यच मुळात काळजाला हात घालणारं आहे. मन सैरभैर करुन टाकायची ताकद असलेलं हे वाद्य कमालीच्या कौशल्यानं जोग यांनी हाताळलं आहे. वाजवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव देखील बदलत नाहीत. ज्या सहजतेने त्यांनी वादन केले आहे ते केवळ थक्क करुन टाकणारे आहे.
वायोलिनला सतार किंवा सारंगी सारख्या पडद्या नसल्याने नेमका कुठल्या जागी बोटाने दाब दिल्याने अपेक्षित स्वर उमटणार आहे हे ठरलेले नसते, ते केवळ अंतःस्फूर्तीने आणि सरावानेच जमू शकते!
जोगांची डाव्या हाताची बोटे विलक्षण तयारीने त्या तारांवर दाबली जात असतात, त्यांच्या उजव्या हातातला गज वायोलिनच्या चार तारा कुरवाळत हालत असतो आणि मंत्रमुग्ध करणार्‍या स्वरांच्या वर्षावामध्ये आपण चिंब भिजून जात असतो!

'बाई मी विकत घेतला शाम'. 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातलं हे अजरामर गीत आधीच माझं लाडकं. गदिमांचे दिव्य स्पर्श झालेले सहजसाधे शब्द, बाबूजींचं अत्यंत गोड संगीत आणि अशाताईंचा केवळ दैवी असा आवाज या त्रिवेणी संगमावर मराठी माणूस फिदा न होईल तरच नवल! मूळ गाण्याच्या सुरुवातीची पेटी शामराव कांबळ्यांनी वाजवलेली आहे. (वादनाच्या क्षेत्रातले जे काही चमत्कार आपल्याकडे आहेत किंवा होऊन गेले त्यातले शामराव कांबळे एक होते. मला वाटतं दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. चूभूदेघे.)
नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम
अशा ओळींपासून हे गाणं सुरु होतं आणि एका क्षणात आपण वायोलिन ऐकतोय का आवाज हे समजेनासं होतं.
पहिली ओळ बाबूजींच्या आवाजात आणि नंतर गाणं आशाच्या आवाजात हा फरक देखील कानांना जाणवतो हे विशेष!
अंतर्‍याच्या शेवटी जी हरकत घेऊन आशाताई समेवर येतात ती तशीच्या तशी वायोलिन मधून येते!
मधल्या सगळ्या हरकती, बाबूजींनी घेतलेल्या ताना, आशाताईंच्या खास सानुनांसिक आवाजातले शब्द सगळं सगळं उमटतं!
शेवटच्या चौथ्या कडव्यातले शब्द आहेत - जितुके मालक तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे
इथे 'जितुके, तितुके' असंच वाजतं 'जितके, तितके असं नाही! कान देऊन ऐका.

गीतरामायण. पुन्हा एकदा गदिमा आणि बाबूजी ही जोडी.
हे तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारंच आहे. 'पराधीन आहे आहे जगती पुत्र मानवाचा' हे कारुण्यपूर्ण गीत म्हणजे संपूर्ण जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा साध्या शब्दात मांडलेला अर्क आहे!

दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

गदिमांचे शब्द हे एवढे सरस्वतीच्या लेखणीतून आल्यासारखे वाटतात की रामाने याच शब्दात भरताला समजावले असेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही संदेह नाही!

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा सर्व कर्मजात

या ओळींकडे लक्ष द्या - पहिल्या ओळीतला पहिला 'दोषी' हा दीर्घ आहे आणि दुसरा 'दोषि' र्‍हस्व आहे ते तसेच वाजतात - आणि 'ष' पोटफोड्याच वाजतो, शहामृगातला 'श' नाही! (बाबूजींच्या गाण्यातला 'ष' तर प्रसिद्धच होता तेव्हा इथे ती चूक होणे अक्षम्यच!). स्वरातलं कारुण्य, आलाप, गाण्यातले आर्त भाव एवढ्या खोलवर जातात की डोळ्यात पाणी आल्याखेरीज राहत नाही. आणि त्यातून हे वायोलिन. छ्या, काही खरं नाही!

'सखि मंद झाल्या तारका'. सुधीर मोघ्यांचं हे अप्रतिम गीत, राम फाटकांचं अफलातून संगीत आणि पुन्हा एकदा बाबूजींचा स्वर. या गाण्यात सखि मंद झाल्या तारका ही ओळ वेगवेगळ्या प्रकारे गायलेली आहे ती वायोलिनवर ऐकताना आंगावर काटा उभा राहतो!
शेवटच्या कडव्यात 'बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे' अशी पहिली ओळ आहे त्यात मृत्यू शब्द तुम्ही ऐकाच मी वर्णन करु शकत नाही! आणि त्यानंतरच्या ओळीत 'थांबेल तोही पळभरी' यात बाबूजींची 'थांबेल' शब्द म्हणण्याची एक विशिष्ठ लकब होती तीदेखील सहीसही उमटली आहे! पाहिजे तर मूळ गाणं ऐकून मग हे ऐका. केवळ लाजवाब!

'सांज ये गोकुळी' हे देखील माझं अतिशय आवडतं गाणं. सुधीर मोघ्यांचे अप्रतिम शब्द. श्रीधर फडक्यांचं कमालीचं ताजंतवानं आणि प्रसन्न करणारं विलक्षण संगीत आणि या गाण्यात आशाचा आवाज काय लागलाय, केवळ अशक्य!
जोगांनी हे गाणं ज्यापद्धतीनं वाजवलंय ते ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे गाणं श्रीधर फडक्यांनी मुळात वायोलिनसाठीच बनवलं होतं! बाकी मी फार काही सांगत बसत नाही, ऐकाच!

अजून बरीच मराठी गाणी आहेत. जालावर मिळतीलच तुम्हाला. जरूर ऐका.

पण जोगांनी हिंदी गाणंही तेवढ्याच तयारीने वाजवलं आहे (इथे 'गायलं आहे' असं म्हणायचा मला फार मोह होतोय!).
लताचं 'बैंया ना धरो ओ बलमा' हे 'दस्तक' मधलं अफाट गाणं. मुळात मदनमोहनच्या या उच्च गाण्याला हात घालायची हिंमत होणं हेच कर्मकठिण वाटावं अशी परिस्थिती त्यातून हे वाजणार आहे वायोलिनवर सगळीच 'तारांवरची' कसरत पण हे गाणं काय वाजवलंय महाराजा! केवळ सुंदर. लताच्या आवाजातले बारकावे आणि मदनमोहनच्या संगीतातल्या सिग्नेचर्स अक्षरशः अफलातून पकडल्या आहेत या माणसाने! त्रिवार वंदन!!!

त्यांची आणखीन हिंदी गाणी मिळाली तर रसिकांनी दुवे द्यावेत. माझे त्यांना लाख दुवे मिळतील! :)
यू ट्यूब वरती 'Ganare violin' असाच सर्च द्या आणि हा खजिना हाती लागेल.

(अत्यानंदित) चतुरंग

कलासंगीतसंस्कृतीआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मिश्रेया's picture

12 Dec 2011 - 12:09 pm | मिश्रेया

मी हि खुप वेळा ऐकत असते, प्रभाकर जोगा॑ना.

त्या॑च्या हातात जादु आहे.

'लिम्ब लोण उतरु कशी' हे त्या॑च्या जादुगार हाताने काळजातच घर करते.
खुप आभारी आहे आपल्या ह्या पोस्ट बद्दल.

चिंतामणी's picture

12 Dec 2011 - 1:47 pm | चिंतामणी

त्याच प्रमाणे इथे क्लीक करा.

प्रभाकर जोग हे प्रतीथयश संगीतकार आहेतच. परन्तु त्यांनी अनेक वर्षे बाबुजींचे सहायक म्हणूनसुद्धा काम केलेले आहे.

लपवीलास तु हिरवा चाफा, आज प्रितीला पंख हे लाभले ह्यासुद्धा त्यांच्याच रचना आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांनासुध्दा संगीत दिले होते.

मराठी_माणूस's picture

12 Dec 2011 - 12:24 pm | मराठी_माणूस

लेख खुप आवडला .
जोगांच्या सगळ्याच्या सगळ्या बाजारात आलेल्या कॅसेट,सीडी घेतल्या आहेत आणि खुप वेळा आनंद घेतला आहे.
सुर वाजवणे आणि व्यंजन वाजवणे ह्यातला फरक त्यांच्या वाजवण्यातुन स्पष्ट होतो.
टेकच्या वेळेस गायक्/गायीका सोबत वाजवणारे जे मोजके व्हायोलिन वादक होते त्यापैकी जोग एक.
स्वरलेखन करण्यातही ते खुप वाकबगार आहेत.

बबलु's picture

12 Dec 2011 - 12:49 pm | बबलु

_/\_

अप्रतिम.

लेखही सुंदर.

पिवळा डांबिस's picture

13 Dec 2011 - 7:43 pm | पिवळा डांबिस

असेच म्हणतो!
असेच म्हणतो!!
असेच म्हणतो!!!

मस्त कलंदर's picture

12 Dec 2011 - 12:54 pm | मस्त कलंदर

ये दिल और उनकी निगाहोंके साये, पिया बावरी, पिया तोसे, आणि कितीतरी मराठी भजने!!! कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही. हे वायोलिन अक्षरशः शब्द न् शब्द बोलतं. ऐकताना आपण कधी त्यासोबत गाऊ लागतो हे लक्षातदेखील येत नाही!!!

लेख आवडला.
दुव्यां बद्दल आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2011 - 2:14 pm | अत्रुप्त आत्मा

वा! वा! बर झाल हो, हा मस्त लेख टाकलात....फार छान,सुखद :-)

खरंय. स्वर कानात घुमल्यासारखे वाटतात अगदी. त्या सुरांतून शब्द व्यवस्थित ऐकू येतात! दोषी आणि दोषि बाबत अत्यंत सहमत! तसंच सखि मंद झाल्या तारका हे गाणं त्यातल्या सार्‍या हरकतींसकट अक्षरशः ऐकू येतं खरंच..
आणखी माझं अत्यंत आवडतं - 'आज कुणीतरी यावे' - त्यात आशाबाईंनी 'सोडुनिया घर नाती-गोती' वर जे काही स्वरनृत्य-न्यास केलंय ते तसंच्या तसं जोगांच्या बोटांनी व्हायोलिनच्या तारांवर केल्याचं एकेका स्वरातून जाणवतं आणि या अद्भुत प्रकारानं आपण अचंबित होऊन केवळ पुनःपुनः ऐकत राहतो. जादुई आहे हे सारं!

खूप मस्त लेख चतुरंग. माझ्याकडे पाच व्हॉल्युम आहेत एमपी३ फॉर्मॅट मध्ये. (धन्यवाद मितान!) कुणाला हवे असल्यास सांगा. शेअर करेन. :)

मस्त कलंदर's picture

12 Dec 2011 - 2:46 pm | मस्त कलंदर

मला हवेत.. लग्गेच शेअर कर

मेघवेडा's picture

12 Dec 2011 - 3:10 pm | मेघवेडा

थोडा वेळ दे. मला मायानं दिले त्यात ट्रॅक्सना नावं नव्हती आकडे होते. मग मी गाणी ओळखून त्या आकड्यांजागी फाईलनेम म्हणून गाण्यांची नावं लिहिली! ते पुन्हा आकड्यांमध्ये कन्व्हर्ट करून अपलोड करतो. तूही घे मजा! ;)
काही भारी औशल्य लागत नाही. जोग इतकं अप्रतिम वाजवतात की गाणं लगेच मुखी येतात पण मजा येते!

वाह आता चंगळ आहे आमची ही.
वाट पहातोय.

चतुरंग's picture

12 Dec 2011 - 5:01 pm | चतुरंग

माझा ईमेल आयडी आहेच तुझ्याकडे!

(चातक) रंगा

छोटा डॉन's picture

12 Dec 2011 - 5:06 pm | छोटा डॉन

+१, हेच म्हणतो.

माझाही मेल आयडी आहेच तुझ्याकडे, प्लीज पटकन फॉर्वर्ड कर.
धन्यवाद :)

- छोटा डॉन

प्रीत-मोहर's picture

12 Dec 2011 - 5:11 pm | प्रीत-मोहर

मंदार दादा मलाही हवय!!!

नंदन's picture

13 Dec 2011 - 1:35 pm | नंदन

डान्रावांशी बा.डि.स.

प्राजु's picture

12 Dec 2011 - 9:43 pm | प्राजु

मलाही हवी आहेत.
इमेल आहे तुझ्याकडे.

स्मिता.'s picture

12 Dec 2011 - 2:48 pm | स्मिता.

लेख आणि सोबत दिलेले दुवे अतिशय आवडले. व्हायोलिन अक्षरशः गातेय असंच वाटतं ऐकताना... शब्द न् शब्द ऐकायला येतो.

पैसा's picture

12 Dec 2011 - 3:23 pm | पैसा

जोग जादूगार खरेच. दुव्यांबद्दल सर्वानाच दुवा देते!
फाउंटनच्या सीडीज खूप महाग असतात आणि लवकर खराब होतात म्हणून विकत घ्यायचं सोडून दिलं. पण आता हा खजिना फुकटात ऐकायला मिळतोय! वा, काय नशीब आहे!

चिरोटा's picture

12 Dec 2011 - 3:25 pm | चिरोटा

सुंदर ओळख. गाणारे व्हायोलिन सीडी ऐकली आहे.

५० फक्त's picture

12 Dec 2011 - 5:22 pm | ५० फक्त

यातल्या एक दोन सिडि आहेत माझ्याकडे, जबरा आहेत जोग साहेब,

आनंद's picture

12 Dec 2011 - 7:53 pm | आनंद

व्वा! मस्तच!
कालच्या सवाईतल्या श्रीमती एम. राजम यांच्या वायोलिन वादनाची नशा अजुन उतरली नाही तो पर्यंत हे म्हणजे मस्तच.
( काल घेइ छंद मकरंद वसंतराव स्टाइल न आणि नरवर क्रिष्णा समान अस वाजवलय कि बस्स.जमल तर अपलोड करतो.)

क्या बात है.. तीनही पिढ्यांनी अगदी जीवघेणं वाजवलं..

प्राजु's picture

12 Dec 2011 - 9:46 pm | प्राजु

खूपदा रात्री ही गाणी ऐकत झोपताना स्वर्ग सुख गाठल्याचा आनंद मिळतो.
मनावरची मरगळ कमी होते.
खूप शांत होतं मन.
या अवलियाच्या हातामध्ये जादू आहे, व्हॉयलिन त्याला पूर्ण शरण जातं.. आणि गाण्याचे सूर नकळत आपल्याला व्यापून टाकतात..

या अवलियाला सलाम.

प्राजु's picture

12 Dec 2011 - 10:16 pm | प्राजु

http://www.youtube.com/watch?v=uJ34uIf6J_8

हे गाणं कहर आहे..

इथे व्हिडीओ का दिसत नाहीये?

प्रास's picture

12 Dec 2011 - 10:33 pm | प्रास

दिसायला तर हवं आत्ता......

प्राजु's picture

12 Dec 2011 - 10:40 pm | प्राजु

धन्यवाद प्रास!! :)

विनोद१८'s picture

12 Dec 2011 - 11:02 pm | विनोद१८

मी आत्ताच पाहिला विडीओ दिसतोय......

विनोद१८

रामपुरी's picture

12 Dec 2011 - 10:19 pm | रामपुरी

ही नवीन ओळख करून दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.

सुहास झेले's picture

12 Dec 2011 - 11:00 pm | सुहास झेले

मस्त... असे ४-५ भाग डाऊनलोड करून ठेवले आहेत. खूप प्रसन्न वाटतं ऐकताना.

पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभार :) :)

पराधीन आहे जगतीची मजा वेगळीच आहे

इतर गाण्यात व्हायोलिनशिवाय बाकीची वाद्येही असतात त्यामुळे असेल बहुधा

पराधीन मधे फकस्त वायोलिन बाकी काही नाही

टॉपिकचे नाव वाचून एन राजमबाबत असेल असे वाटले. सध्या त्यांचा असर कमी व्हायला तयार नाहीये

रामदास's picture

13 Dec 2011 - 8:53 am | रामदास

एका नविनच विषयाला सुरुवात केली आहे . लेख वाचल्यावर अनेकांना या अनुषंगाने लिहावेसे वाटेलच आणि या निमीत्ते अनेक नविन लेख येतील अशी आशा आहे.
अवांतर :(सतार किंवा सारंगी सारख्या पडद्या नसल्याने) नेमका कुठल्या जागी बोटाने दाब दिल्याने अपेक्षित स्वर उमटणार आहे हे ठरलेले नसते, ते केवळ अंतःस्फूर्तीने आणि सरावानेच जमू शकते!
या लेखातील टाळीच्या वाक्याची दाद देत आहे

मराठी_माणूस's picture

13 Dec 2011 - 12:10 pm | मराठी_माणूस

सतारीत पडदा असतो

चतुरंग's picture

13 Dec 2011 - 7:52 pm | चतुरंग

सारंगीत पडदा नसावा अशी शंका मनात खदखदत होतीच, सारंगीचा फोटो बघितल्यावर त्यावर पडद्या नसल्याचे स्पष्ट झाले. लेखात चुकून सारंगीलाही पडद्या असल्याचा उल्लेख झालाय त्याबद्दल क्षमस्व.

-(खजील) रंगा

सर्वसाक्षी's picture

13 Dec 2011 - 11:08 am | सर्वसाक्षी

जोग साहेबांच्या एका कार्यक्रमात निवेदका कडुन असे ऐकायला मिळाले होते की प्रत्यक्ष मदन मोहन साहेबांनी काही गाण्यांमध्ये जोगांचे व्हायोलिन आवर्जुन वापरले होते.

सुंदर लेख. काल रात्री तबकड्या पुन्हा एकदा ऐकल्या.

अवांतर - झी च्या वादकरत्नांपैकी श्री महेश खानोलकर यांच्या व्हयोलिनच्या तबकड्या मिळाल्या तर जरुर ऐका. फार सुरेख वाजवितात. खानोलकर, अमर ओक, भिसाजी तावडे, मनिष कुलकर्णी, आर्चिस लेले वगैरे कलाकार केवळ त्यांच्या वाद्यसंगीताचा तीन तासाचा कार्यक्रम करतात. त्यांच्या एका कार्यक्रमात खानोलकरांनी 'क्लासात शिकविलेले व्हायोलिन आणि समजुन उमजुन, अंतःकरणापासुन वाजविलेले व्हायोलिन' यातला फरक प्रात्यक्षिकासह समजावला होता - गाणे होते 'गोरी गोरी पान'

इतके एकरुप होऊन वाजवणारे ते एक धन्य आणि इतक्या तन्मयतने ऐकून त्यातल्या अत्यंत सूक्ष्म जागा दाखवणारं लिहिणारे तुम्ही शंभर धन्य..

अनेकानेक आभार या परिचयाबद्दल..

नंदन's picture

13 Dec 2011 - 1:30 pm | नंदन

आणि सुरेल लेख! पुलंनी गोविंदराव टेंबे यांच्या हार्मोनियमवादनाबद्दल जे लिहिलं आहे (जोडाक्षरंही स्पष्ट ऐकू येणे), त्याची आठवण झाली. काही काळापूर्वी कूलटोडवर अचानक जोगांच्या व्हायोलिनच्या क्लिप्स सापडल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या गाण्यातल्या हरकती शोधण्याचा नाद लागला होता.

किंचित अवांतर - एकाच गाण्यात तंतुवाद्य आणि गायिकेच्या हरकतींची जुगलबंदी ऐकायची असेल तर लताबाईंचे हे गाणं ऐका - विशेषतः शेवटचे १५-२० सेकंद

बंडा मामा's picture

13 Dec 2011 - 6:41 pm | बंडा मामा

चतुरंग इतका छान लेख लिहिलात आणि खाली मात्र हावरटासारखे पायरेटेड गाणी मागत आहात. अहो तुम्हाला जोगांचे वादन इतके भावले तर रीतसर विकत घ्याना सीडी.किती तो फुकटेपणा. इथे जी इमेल पायरसी चालली आहे त्याहुन ह्या कलेचा मोठा अपमान नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2011 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लेख. आवडला.

-दिलीप बिरुटे

प्रदीप's picture

13 Dec 2011 - 7:19 pm | प्रदीप

लेख छान आहे, बर्‍याच पॅशनेटली ऐकून लिहीलेला आहे.

मात्र प्रभाकर जोगांची ओळख केवळ मराठी जगतापुरतीच मर्यादित नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक दशके 'लीड व्हायोलिनीस्ट" म्हणून महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या 'स्वर आले जुळूनी' ह्या आत्मचरित्रात पुण्याच्या मराठी संगीतविश्वापासून, मुंबईच्या हिंदी चित्रपटविश्वापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, त्यात त्यांना काय मेहनत घ्यावी लागली ह्याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. पुण्याचे त्यांचे मराठी संगीतविश्व काही जाहीर कार्यक्रम (सुरूवातीस गजाननराव वाटवे, नंतर 'गीतरामायण') व मराठी चित्रपटसंगीत ह्यांपुरते मर्यादित होते. ह्या पुण्याच्या मराठी चित्रपट संगीताचे रिवाज बाळबोध व बर्‍याच अंशी अकार्यक्षम असे होते. सुमारे १९५९- ६० साली जोग मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी गेले. सुरूवातीसच त्यांना पहिल धक्का बसला तो तेथील पाश्चात्य संगीत लिपी वापरून गीते वाजवण्याच्या पद्धतीचा. ह्याचा त्यांना पुण्यात अजिबात सराव नव्हता. ते स्किल त्यांनी खडतर मेहनतीने मुंबईच्या चित्रपटसृष्टीत शिकून घेतले व लवकरच आत्मसात केले. दुसरा सराव त्यांना एकाच सुराच्या व्हायोलिनवर, त्याचे ट्यूनिंग न बदलता, वेगवेगळ्या पट्टीची गाणी वाजवण्याचा करावा लागला. ह्या संदर्भातील जोगांनी कथन केलेला अण्णासाहेब (सी. रामचंद्र) ह्यांच्या रिहसर्ललला घडलेला किस्सा अत्यंत बोलका आहे. ह्या दोन खडतर साधनेने साध्य केलेल्या टेक्निक्समुळे लवकरच जोगांनी त्या इंडस्ट्रीत 'लीड व्हायोलिनीस्ट' म्हणून जम बसवला. गाण्यांच्या रेकॉर्डिंगमधील हे अत्यंत जोखमीचे काम त्यांनी लीलया ६० ते ८० च्या दशकांतील जवळजवळ सर्व नामवंत संगीतकारांकडे केलेले आहे. त्यावेळे घडलेले एकदोन किस्सेही मजेदार आहेत.

जोगांचे व्हायोलिन 'गाणारे व्हायोलिन' आहे त्याचे मूळ त्यांच्या ह्या लीड व्हायोलिनीस्टच्या कामात बर्‍याच अंशी दडले असावे.

हे पुस्तक संग्रही असावे इतके छान आहे. 'स्वर आले जुळूनी' स्नेहल प्रकाशन (मूल्य रू. १६०-).

(जाता जाता: वरील बंडा मामा ह्यांच्या तिखट प्रतिसादाशी १०० % सहमत आहे).

स्वर आले जुळुनी हे पुस्तक तर मी जरुर घेईन.

-रगा

मराठी_माणूस's picture

13 Dec 2011 - 8:38 pm | मराठी_माणूस

ते स्किल त्यांनी खडतर मेहनतीने मुंबईच्या चित्रपटसृष्टीत शिकून घेतले व लवकरच आत्मसात केले.
ह्या बद्दल मि साशंक आहे . ते स्वत:ची वेगळी पध्दत वापरत होते असे वाटते.

प्रदीप's picture

13 Dec 2011 - 8:47 pm | प्रदीप

सुरूवातीस (पुण्यास असतांना व मुंबईस गेल्यागेल्या) त्यांनी भारतीय पद्धतिने नोटेशन लिहीण्याची स्वतःची पद्धत निर्माण केली होती हे खरे आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीत पाश्चात्य पद्धतिनेच सर्व व्यवहार केले जात (अजूनही असावेत, कल्पना नाही). अनेकदा अ‍ॅरेंजर वादकांस त्यांची नोटेशन्स करून देतो, त्यानुसार वादकांना वाजवावे लागते. तिथे त्यांनी ही पद्धति शिकून घेतली असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. मला वाटते त्यांनी ह्या संदर्भात रामलाल शर्मांचा (लक्ष्मीकांत- प्यारेलाल द्वयीतील प्यारेलाल शर्मा ह्यांचे वडिल, हे इंडस्ट्रीत सुविख्यात व्हायोलीनवादक होते व त्यांनी अनेकांना ही नोटेशन्स शिकवली आहेत) ह्यांचा उल्लेख केला आहे.

मराठी_माणूस's picture

13 Dec 2011 - 9:20 pm | मराठी_माणूस

रामप्रसाद शर्मा हे ब्रास सेक्शन पहायचे.
प्यारेलाल स्वतः व्हायोलिन एक्सपर्ट आहेत आणि सुरवातीला त्यानी अरेंजर म्हणुन सुध्दा काम केले आहे त्या मुळे त्यांची स्टाफ नोटेशन वर चांगलीच कमांड आहे.

क्रान्ति's picture

13 Dec 2011 - 7:48 pm | क्रान्ति

अप्रतिम लेख आणि मोलाचे दुवे!

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2011 - 9:38 pm | बिपिन कार्यकर्ते

सुरेख! जोगांबद्दल तर क्या केहने!

सन्जोप राव's picture

13 Dec 2011 - 10:18 pm | सन्जोप राव

सुंदर लेख आणि दुवे.
'बैंया ना धरो' मधल्या प्रसाद गोंदकरच्या सतारीलाही एक टाळी असू द्या.

मीनल's picture

14 Dec 2011 - 12:15 am | मीनल

http://myurmee.blogspot.com/2011/09/blog-post_15.html

इथे मी ज्या सी डी बद्दल लिहिले आहे ती श्री प्रभाकर जोग यांची. त्या सूरांनी आम्हाला खूप दिवस तारून नेले असे म्हटले तरे चालेल.
अजून काहीही लिहू शकत नाही मी आता.

चिंतामणी's picture

14 Dec 2011 - 12:57 am | चिंतामणी

वाचीक पोस्ट निशब्द करून गेला.

याशिवाय जास्त काहीही लिहू शकत नाही.
:( :-( :sad:

धनंजय's picture

14 Dec 2011 - 12:44 am | धनंजय

मजा आली गाणी ऐकून. धन्यवाद चतुरंग.

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2011 - 8:12 pm | प्रभाकर पेठकर

केवळ अप्रतिम खेरीज शब्दच नाही उरले. धन्यवाद श्री चतुरंग.

श्री. प्रभाकर जोग ह्यांच्या बद्दल अजून एक विलक्षण अनुभव म्हणजे. १९७८ साली एका कार्यक्रमात त्यांनी व्हायोलीनवर 'मिमिक्रि' सादर केली होती. त्यात, गिरणीच्या भोंग्याचा, पोलीसगाडीच्या सायरनचा, दूरदर्शनच्या आणि आकशवाणी लखनऊच्या 'ओपनिंग ट्यून'चा आवाज तर व्हायोलीनमधून काढलाच परंतु, सर्वात ग्रेट, रस्त्यावर भांडणार्‍या ४-५ वेगवेगळ्या आकाराच्या, जातीच्या, जवळच्या आणि पार दूSSSरून भांडणात सहभाग घेणार्‍या कुत्र्यांचा आवाज व्हायोलीनवर काढला होता. एखाद्या वाद्यावर, मी ऐकलेली ती पहिली आणि शेवटची मिमिक्री. पुन्हा योग आला नाही.

रामदास's picture

16 Dec 2011 - 9:54 am | रामदास

बाळ साठे पण करायचे. (सुराज साठेचे काका.)

एक वेगळी आठवण-डॉ.विद्याधर ओक यांनी हार्मोनियमवर 'शुक्रतारा मंदवारा' वाजवले होते ठाण्यात.त्यातला 'क्र' त्यांना लोकाग्रहास्तव २-३ वेळा वाजवून दाखवावा लागला होता.
अप्रतीम.
गाणारे व्हायोलीनच्या बाबत "सवालही पैदा नही होता"