अथातो प्राकृत जिज्ञासा। - ३

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
22 Nov 2011 - 9:18 pm

अथातो प्राकृत जिज्ञासा। - १

अथातो प्राकृत जिज्ञासा। - २

यापूर्वीच्या भागात आपण पाहिलेलं की प्राकृत शब्दातल्या 'प्रकृति'चा कोणता अर्थ घेता समस्या-निराकरण होते हे बघणं महत्त्वाचं ठरतं.

या संदर्भात मी ज्या गोष्टीकडे अंगुलिनिर्देश करतोय त्या ठिकाणी यापूर्वी कुणाचं लक्ष गेलेलं आहे अथवा नाही याबद्दल मला व्यक्तिशः काही माहिती नाही तरी हा विचार मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

यजुर्वेदाच्या तैत्तिरिय संहितेमध्ये एक ऋचा आढळते. ती पुढील प्रमाणे आहे –

"वाग्वै पुरा अव्याकृता वदन्ते देवो इंद्रमब्रुवान्निमां वाचं व्याकुर्वीति।
तामिंद्रौ मध्यतोSवक्रम्य व्याकरोत्तस्मादियं व्याकृतावाग् उद्यते॥"

सदर ऋचा आपल्याला यजुर्वेदकाळालाही प्राचीन अशी एक गोष्ट सांगतेय. ही गोष्ट अशी - फार प्राचीन काळी देव अखण्ड, अविभक्त, अव्यक्त (अव्याकृत) अशी अनियमित भाषा बोलत असत. ते इंद्राला म्हणाले, "ही आमची भाषा अलग - विभक्त कर." त्यावर इंद्राने अट घातली की या कामी मला वायुलाही सामील करून घ्यावं लागेल. तेव्हा या कार्यासाठी इंद्र आणि वायु या दोघांना यज्ञात एकाच वेळी सोमरस प्रदान करण्यात आला. इंद्राने वायुच्या साहाय्याने भाषेला मध्ये धरून विभक्त करून नियमित केले, नियमबद्ध केले आणि तेव्हापासून भाषा व्याकृत झाली.

यावरून आपल्याला असं म्हणता येतं की प्राचीन काळी भाषेतील उच्चार अस्पष्ट, अनियमित असावेत. र्‍हस्व-दीर्घ, श-ष, व-ब, ज-य इत्यादि काहीसे साम्य असणारे वर्ण योग्य पद्धतीने उच्चारले जात नसावेत.

या संदर्भात तैत्तिरिय शाखा संहितेच्या भट्टभास्कर भाष्यामध्ये 'अव्याकृता' शब्दाचं विवरण 'अविभक्तरुपा ...... ध्वनिमात्रमेवोदचरत्' असं, 'व्याकुरू' शब्दाचं विवरण 'विभक्तरूपा कुरू' आणि 'व्याकरोत्' शब्दाचं विवरण 'व्याकृतामकरोत्' असं केलेलं दिसतं. ऋग्वेदाच्या सायणभाष्यामध्ये 'चत्वारि वाक् परिमिता पदानि' इत्यादि ऋचेच्या विवरणामध्ये तैत्तिरिय संहितेतील उपरोक्त संदर्भ देऊन 'अखण्डाया कृत्स्नाया वाचश्चतुर्धां व्याकृतत्त्वात्' असं स्पष्टिकरण दिलेलं आहे.

म्हणजेच अनियमित शब्दोच्चार, पदांचे अखण्ड उपयोग, कदाचित अनिर्बंध आणि चुकीचे उच्चारण यामुळे कुणाला कसलाच अर्थबोध होत नसावा. अशा अनावस्था प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इंद्राची उपाययोजना करण्यात आली असावी. अशा परिस्थितीत इंद्राने एकूणच वर्णांमध्ये फरक कोणता, तो व्यक्त कसा करायचा हे समजावून सांगितलं असावं. त्यासाठी प्रत्येक वर्ण एकमेकांपासून विलग करून त्याचा एकमेकांशी असलेला भेद सांगितला असावा आणि या मार्गाने त्याने (देवांच्या) उच्चारात व्यक्तता, स्पष्टता आणि नियमितता आणली असावी.

पुन्हा प्रश्न असा पडतो की हे कार्य करण्यासाठी इंद्रच का आणि इंद्रालाही या कामासाठी वायुचं साहाय्य का घ्यावं लागलं?

या विषयीसुद्धा आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये विवेचन केलेलं सापडतं, ते इथे पहायला काहीच अडचण नसावी.
बोपदेवाने आपल्या 'कविकल्पदृम' नावाच्या धातुपाठामध्ये प्रारंभालाच आठ पूर्ववैयाकरणांचा नामोल्लेखासकट जयजयकार केलेला आहे. त्या सर्वांमध्ये त्याने इंद्राला प्रथम स्थान दिलेलं आहे. व्याकरणशास्त्राचा प्रमुख ग्रंथ भगवान् पतंजलि लिखित 'महाभाष्या'मध्ये या संदर्भात एक पुराकथा सापडते, जिचा उल्लेख या ठिकाणी अप्रस्तुत ठरणार नाही. ती कथा अशी -

असं ऐकिवात आहे की बृहस्पतिने इंद्राला एक हजार देवांची वर्षं, प्रत्येक शब्द उच्चारून शब्दशास्त्र सांगितलं, पण शब्द संपले नाहीत. बृहस्पतिसारखा प्रख्यात वक्ता, इंद्रासारखा तीक्ष्ण बुद्धीचा विद्यार्थी आणि एक हजार देववर्षे इतका प्रदीर्घ अध्ययनाचा कालावधी असूनही शब्दाचा अंत सापडला नाही मग आजकालची काय कथा?

या गोष्टीमध्येही इंद्र हा शब्दशास्त्राचा ज्ञाता म्हणूनच समोर येतो. म्हणूनच मग असंही म्हणता येतं की या अनुषंगानेच तैत्तिरिय संहितोक्त देवभाषेला इंद्राने वर्णांचा स्पष्टोच्चार सांगणारे व्याकरण पढवून देवांची भाषा स्पष्ट केली.

या कामासाठी इंद्राने वायुची मदत का घतली तर या विषयी 'चरक संहिते'मध्ये 'सूत्रस्थाना'तील 'वातकलाकलीय' अध्यायात संदर्भ सापडतो, "वायु: .... प्रवर्तको उच्चावचानां ..... प्रवर्तको वाचः, प्रकृति: स्पर्शशब्दयो:, श्रोत्रस्पर्शनयोर्मूलं,...।" म्हणजेच वायु हा वाणीच्या उच्चारणात महत्त्वाचा भाग आहे. वायुशिवाय हे उच्चारण शक्यच होणार नाही. त्याचप्रमाणे वायुच स्पर्श आणि शब्द यांचे मूळ कारण आहे. श्रोत्र आणि स्पर्शज्ञान यांनाही वायुच कारणीभूत आहे. म्हणजेच वायु जसा शब्दोच्चारणाला कारणीभूत होतो, तसाच तो शब्दज्ञानालाही आवश्यक असतो. मग अव्याकृत वाणीला व्याकृत, नियमित करण्यासाठी वायुला साहाय्याला घेण्यावाचून पर्यायच नाही. वाणी उच्चारणासाठी आणि उच्चारित वाणीच्या ग्रहणासाठी वायु आवश्यकच असल्याने इंद्राने वायुच्या साहाय्याची अट घातली आणि शास्त्रिय दृष्ट्याही ते योग्य असल्याचंच लक्षात येतं.

आत्तापर्यंतचा उहापोह पहाता यजुर्वेदाच्या तैत्तिरिय संहितेमध्ये उल्लेखलेल्या देवभाषेची अवस्था भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेल्या, "अव्यक्तादीनि भूतानि" या प्राथमिक अव्यक्त अवस्थेला समान अशी समजून घ्यावी लागते. सृष्टीच्या आरंभी जशी सर्व महाभूते अव्यक्त अवस्थेत, एकमेकांमध्ये मिश्रित, वेगवेगळी करता न येणार्‍या अवस्थेत असली तरी मूळात ती वेगवेगळीच असतात, त्याप्रमाणेच वाणी अथवा भाषेचे स्वरूप आपल्याला मानावे लागते. या स्वरूपातच तैत्तिरिय संहितोक्त देवभाषा होती असं आपल्याला समजून घ्यावं लागतं - म्हणावं लागतं आणि या भाषेलाच इंद्राने व्याकृत केलं हे सुद्धा मानावं लागतं. असं व्याकृत करणं म्हणजेच इंद्राने या देवभाषेला पहिल्यांदा शब्द कसे वापरायचे ते शिकवलं, म्हणजेच 'शब्दानुशासन' सांगितलं, अर्थात त्याने भाषेला 'व्याकरण' दिलं, शब्द आणि त्यांच्या उच्चारणाचे नियम दिले आणि 'प्रमाण' भाषेची निर्मिती केली. अशी प्रमाण भाषा जी कुठेही उच्चारली गेली तरी तिच्यामधून निघणारा अर्थ एकच असेल, व्यक्त होणारे विचारही एकच असतील. हीच भाषा आपल्या सर्वांची मूळ भाषा असं म्हणता येतं.

इथपर्यंत मुद्दा बर्‍यापैकी स्पष्ट झाला असेल असं वाटतं. यापुढे पुढल्या लेखात या मूळ भाषेसंदर्भात विवेचन करण्याचा विचार आहे.

भाषाप्रकटनविचारसमीक्षामतमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 Nov 2011 - 9:57 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण भाग.
इंद्र, वायू, बृहस्पती हे रूपकात्मरित्याच घेतले आहेत असे गृहित धरतोय.

प्रास's picture

22 Nov 2011 - 10:42 pm | प्रास

इंद्र, वायू, बृहस्पती हे रूपकात्मरित्याच घेतले आहेत असे गृहित धरतोय.

खरं तर इन्द्र, वायु, बृहस्पति हे रुपकात्मक की व्यक्तिविशेष हा मुद्दाच इथे अप्रस्तुत आहे.

भाषेच्या संदर्भाने आपल्यासमोर वेद ग्रंथांतील वाङ्मयीन पुरावे आलेले आहेत. यांचा उपयोग भाषेच्या संदर्भानेच करणं योग्य ठरावं. या वैदिक पुराव्यांचा वापर आपल्या समोरील भाषाविषयक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी किती आणि कसा करता येतो इथे लक्ष केन्द्रित करणं अपेक्षित आहे असंच मला वाटतंय.

लेखातील शेवटचे वाक्य "इथपर्यंत मुद्दा बर्‍यापैकी स्पष्ट असेल..." असे वाचले. वल्ली यांच्या मनातीलच प्रश्न आला.

आणि वरील उत्तरही नीट समजलेले नाही. या वाङ्मयीन उतार्‍यांचा प्राकृताच्या संदर्भात काय उपयोग करावा? किंवा कुठल्या भाषाविषयक आडचणींतून दिशा मिळू शकेल.

कथेवरून असे दिसते, की इंद्राने व्याकरण शिकवण्यापूर्वी अव्याकृत शब्द वापरात होते. व्यक्ती म्हणा, किंवा रूपक म्हणा. पण अव्याकृत -> (प्रयत्न) -> व्याकृत असा घटनाक्रम सांगितला आहे.

परंतु पिजिन (Pidgin) भाषांच्यावरून असा अनुभव आहे, की नव्या भाषा साधारण एका पिढीत नियमित होतात. गुलामांच्या व्यापार्‍यांनी आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांतून लोकांना पळवलेले आणि त्यांना कॅरिबियन बेटांवर वसवले. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, इंग्रजी-फ्रेंच वगैरे युरोपियन भाषा यांच्या अनियमित मिश्रणाच्या "पिजिन" भाषा वापरून या नव्या गुलामांनी आयुष्य घालवले. पण पुढच्या एक-दोन पिढ्यांतच नियमित क्रियोल भाषा (creole) त्या-त्या समाजात उदयाला आल्या. (आईती देशातील Creole भाषेवरून अशा सर्व भाषांना creole म्हणतात.)

मनुष्याच्या स्थायी समाजात अव्याकृत अशी भाषा असणे बहुधा शक्य नाही (संदर्भ : लँग्वेज इन्स्टिन्क्ट). असे आधुनिक भाषाशास्त्रात तरी मत आहे.

लोकांमध्ये "कुठले शब्दप्रयोग बरोबर आणि कुठले चूक" ही कल्पना व्याकरण न शिकता असते. हा पतंजलीचा व्याकरणमहाभाष्यातला सिद्धांत आहे. (थोडे अवांतर : पतंजलीने सांगितलेल्या पुराणकथेत बृहस्पती इंद्राला शब्द शिकवतो, आणि त्यात वायूचे काही नाही. कथेचा रोख काहीसा वेगळा आहे.) पतंजली सांगतो, की संस्कृतातल्या प्रमाणासारखे बोलणे हे धर्मकार्यासाठी आणि पुण्यासाठी असते. धर्मकार्याच्या संदर्भाच्या बाहेर (प्रमाणबोलीत "यद्वान" आणि "तद्वान" नावे असलेले ऋषी) यर्वाण आणि तर्वाण ऋषी हे प्रतिष्ठितच आहेत. पतंजलीच्या काळापर्यंत काही प्राकृते प्रतिष्ठित आणि व्याकृत होती, हे सांगणे नलगे. पतंजलीने "प्राकृत" शब्द वापरला नसला, तरी त्याच्या मते ती प्राकृते धर्मकार्यासाठी योग्य नव्हती. मात्र अर्थवाहनासाठी ती योग्य होती, हे सुद्धा सांगण्याचा प्रांजळपणा पतंजलीपाशी आहे.

- - -

त्यामुळे लेखातील वैदिक वाङ्मयीन कथांचा आपल्या भाषिक अडचणीकरिता या कसा उपयोग करता येईल? असे अधिक विवेचन केले, तर हवे आहे.

प्रास's picture

23 Nov 2011 - 3:29 pm | प्रास

या वाङ्मयीन उतार्‍यांचा प्राकृताच्या संदर्भात काय उपयोग करावा? किंवा कुठल्या भाषाविषयक आडचणींतून दिशा मिळू शकेल.

इथपर्यंत मुद्दा बर्‍यापैकी स्पष्ट असेल... असं जे लेखामध्ये म्हंटलेलं आहे ते संस्कृत आणि प्राकृतांच्या मूळ भाषेसंबंधी आहे. मी जो मुद्दा म्हणतोय तो त्याच्याशी संबंधीत आहे. अडचण अशी आहे की आजपर्यंत या विषयावरील जितकं लिखाण वाचलेलं आहे ते संस्कृतातून प्राकृताची उत्पत्ती आहे की प्राकृतातून संस्कृताची या दुविधेमध्येच अडकलेलं आहे. अनेकांनी याबद्दल शाब्दिक आणि व्याकरणीय पुराव्यांची जंत्री दिलेली आहे आणि आपापले मुद्दे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लेखाचं शेवटचं वाक्य नीट वाचल्यास या वाङ्मयीन उतार्‍यांचा संस्कृत-प्राकृताच्या संदर्भात काय उपयोग होणार आहे ते पुढच्या लेखांकात स्पष्ट होईल हे सांगितलेलंच आहे. अर्थात संस्कृत-प्राकृताच्या पौर्वापर्वाच्या संदर्भातच हा उपयोग होईल अशी माझी धारणा आहे तेव्हा पुढला भाग प्रकशित होईपर्यंत संयम बाळगायला काय हरकत आहे? :-)

वल्ली यांच्या मनातीलच प्रश्न आला.

आणि वरील उत्तरही नीट समजलेले नाही.

वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासकांमध्ये एक मतप्रवाह असा आहे की वैदिक कथा या रुपकात्मक आहेत. या मताचा पुरस्कर्ता प्रामुख्याने मॅक्स म्युल्लर मानला जातो. त्याने या वैदिक मिथ्स पहिल्यांदा रुपककथा आहेत असं मत नोंदवलं आहे. व्यक्तिशः मला सगळ्याच कथा आणि त्यातील पात्रं ही रुपकत्मकच असतील असं वाटत नाही. किमान भाषेच्या संदर्भाने त्या कथा आणि त्यातली पात्रं रुपकात्मक घेण्याची काहीच आवश्यकता नाही. संवादाचं माध्यम असलेली भाषा संवाद साधू शकणार्‍या कोणत्याही सजीव विशेषांचा भाग समजण्यास हरकत नाही. त्याच संदर्भाने वल्लींना उत्तर देताना त्यांच्या मुद्द्याच्या अप्रस्तुतिचा उल्लेख केला आहे. अर्थात पौर्वापर्वाचा मुद्दा जसा स्पष्ट होईल तसं वल्लींना दिलेलं उत्तरंही समजून घेता येईल असं वाटतं.

परंतु पिजिन (Pidgin) भाषांच्यावरून असा अनुभव आहे, की नव्या भाषा साधारण एका पिढीत नियमित होतात. गुलामांच्या व्यापार्‍यांनी आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांतून लोकांना पळवलेले आणि त्यांना कॅरिबियन बेटांवर वसवले. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, इंग्रजी-फ्रेंच वगैरे युरोपियन भाषा यांच्या अनियमित मिश्रणाच्या "पिजिन" भाषा वापरून या नव्या गुलामांनी आयुष्य घालवले. पण पुढच्या एक-दोन पिढ्यांतच नियमित क्रियोल भाषा (creole) त्या-त्या समाजात उदयाला आल्या. (आईती देशातील Creole भाषेवरून अशा सर्व भाषांना creole म्हणतात.)

नक्कीच हे उदाहरण अभ्यासनीय आहे. पण इथे एक साधासा मुद्दा विचारात घेण्याची विनंती करतो. पिजिन ही मिश्र भाषा निर्माण होताना, ती ज्या भाषा-विशेषांचं मिश्रण आहे, त्या सर्व भाषा त्यांच्या त्यांच्या स्थानी स्पष्ट आणि विकसित भाषा आहेत. म्हणजेच त्या त्या समूहातल्या संवादांसाठी त्या परिपूर्ण आहेत. यामुळे ऐकान्तिकरीत्या त्यांना आपण अव्याकृत असं म्हणू शकत नाही. भिन्न भाषिक जनसमूहामधल्या संवादासाठी त्या जनसमूहाने निर्माण केलेली क्रियोल ही मिश्र भाषा एक सोय आहे. असं असल्यामुळे वैदिक वाङ्मयातील व्याकृत भाषेच्या अव्याकृतत्त्वातील परिणमनामध्ये क्रियोल भाषेच्या निर्मितीचीच प्रक्रिया घडली असली पाहिजे असं म्हणणं योग्य होईल असं वाटत नाही.

मनुष्याच्या स्थायी समाजात अव्याकृत अशी भाषा असणे बहुधा शक्य नाही (संदर्भ : लँग्वेज इन्स्टिन्क्ट). असे आधुनिक भाषाशास्त्रात तरी मत आहे.

तुम्ही दिलेल्या संदर्भ-दुव्यातून तर अशा अव्याकृत भाषेच्या अस्तित्त्वाची शक्यताच अधोरेखित झाल्यासारखं दिसतंय. किमान

By calling language an instinct, Pinker means that it is not a human invention in the sense that metalworking and even writing are. While only some human cultures possess these technologies, all cultures possess language. As further evidence for the universality of language, Pinker notes that children spontaneously invent a consistent grammatical speech (a creole) even if they grow up among a mixed-culture population speaking an informal trade pidgin with no consistent rules. Deaf babies "babble" with their hands as others normally do with voice, and spontaneously invent sign languages with true grammar rather than a crude "me Tarzan, you Jane" pointing system. Language (speech) also develops in the absence of formal instruction or active attempts by parents to correct children's grammar. These signs suggest that rather than being a human invention, language is an innate human ability. Pinker also distinguishes language from humans' general reasoning ability, emphasizing that it is not simply a mark of advanced intelligence but rather a specialized "mental module". He distinguishes the linguist's notion of grammar, such as the placement of adjectives, from formal rules such as those in the American English writing style guide. He argues that because rules like "a preposition is not a proper word to end a sentence with" must be explicitly taught, they are irrelevant to actual communication and should be ignored. Instead, he recommends guides such as The Elements of Style, which focus on clarity of expression rather than prescriptive rules of grammar.

यातून तरी तसाच काहीसा विचार असल्यासारखा वाटतोय.

धर्माशी संबंधित यज्ञकार्यातील भाषेचा उपयोग आणि जनसामान्यांमधल्या संवादासाठी आणि शिक्षणासाठी भाषेचा उपयोग, त्याचप्रमाणे त्यांच्यातील भेद वगैरे हे संस्कृत-प्राकृताच्या मूलगामी जिज्ञासेनंतर निर्माण होणारे प्रश्न आहेत. सध्या तरी संस्कृत-प्राकृताचं मूळ ठरवण्याचा प्रयास या लेखमालेतून करण्याचा विचार आहे.

त्यामुळे लेखातील वैदिक वाङ्मयीन कथांचा आपल्या भाषिक अडचणीकरिता या कसा उपयोग करता येईल? असे अधिक विवेचन केले, तर हवे आहे.

हाच तर पुढल्या लेखांकांचा विषय आहे.

मुद्दा एकदम मान्य.
वेदांतील कथा या रूपकात्मक असल्या (किंवा नसल्या) तरीही भाषा विकासामाधील महत्वाचे संकेत त्यातून प्राप्त होतातच.

कॉकेशस पर्वतराजीतून आर्यांचा एक वंश भारतीय उपखंडात जाउन तिथे इंडो आर्यन भाषांचा विकास झाला (संस्कृत्, प्राकृत , हिंदी, उर्दू, मराठी इ.)
एक वंश युरोपात स्थायिक होवून तिथे इंडो युरोपियन भाषांचा विकास झाला (इंग्रजी, फ्रेंच, इटालियन इ.)
आणि एक वंश मध्यपूर्वेत जाउन तिथे इंडो इराणीयन भाषांचा विकास झाला (अरबी, फारसी इ. )

असे फार पूर्वी कुठेतरी वाचले होते.

याच कारणासाठी वरील सर्व भाषांमधील काही शब्द समान असावेत का?

अन्या दातार's picture

22 Nov 2011 - 10:09 pm | अन्या दातार

उत्तम माहिती मिळाली.

पैसा's picture

23 Nov 2011 - 8:32 am | पैसा

लेखमालिका छान रंगत आहे. या वेळी काही प्रश्न मनात आले. धनंजय म्हणतात की अव्याकृत भाषा असणार नाहीत म्हणून, कदाचित अशीही शक्यता आहे की हे व्याकरण मौखिक स्वरूपात असेल. किंवा अगदी संपूर्ण नियमानी बांधलेलं नसेल.

जशी ब्राह्मी लिपी ही आजच्या बहुंताश लिप्यांची जननी समजली जाते (चित्रलिप्या सोडून) तशीच संस्कृत आणि इतर प्राकृत भाषा एकाच मूळ भाषेतून वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत गेल्या असतील. नंतरच्या काळात हेच मराठी, कोंकणी गुजराती वगैरे भाषांबाबत घडत गेलं.

त्यातूनही संस्कृत ही नियमानी बद्ध, म्हणून कळायला, शिकायला सोपी असल्यामुळे वेगवेगळ्या प्राकृत भाषा बोलणार्‍यांनी संपर्क भाषा म्हणून स्वीकारली असेल, जसं नंतरच्या काळात हिंदी आणि इंग्लिशच्या बाबतीत झालं.

हे विचार माझ्या सहजच मनात आले. मी भाषा तज्ञ नव्हे, पण याबद्दल आणखी वाचायला नक्की आवडेल.

प्रास's picture

23 Nov 2011 - 3:38 pm | प्रास

संस्कृत आणि इतर प्राकृत भाषा एकाच मूळ भाषेतून वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत गेल्या असतील.

अगदी बरोबर! याचसाठी केला होता अट्टाहास..... :-D

माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे. ही एक शक्यता म्हणूनही कुणी गृहित धरली असल्यास तसं माझ्या वाचनात आलेलं नाही. पण त्याच अनुशंगाने एका वेगळ्या विषयाच्या अभ्यासादरम्यान ही शक्यता ध्यानात येऊन त्या दिशेने काही शोधण्याचा प्रयत्न केला असता काही पुरावे समोर आले आणि त्यातून ही लेखमाला लिहिली जातेय.

ही मूळ भाषाच कोणती असावी? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या मालिकेचे पुढचे भाग म्हणता येईल.

जशी ब्राह्मी लिपी ही आजच्या बहुंताश लिप्यांची जननी समजली जाते

यावर मात्र असहमती आहे. शक्य झाल्यास एक मालिका लिपींवर लिहिण्याचा विचार आहे.

याबद्दल आणखी वाचायला नक्की आवडेल

धन्यवाद! लिहिण्याचा प्रयत्न करतो.

:-)

चैतन्य दीक्षित's picture

28 Nov 2011 - 3:13 pm | चैतन्य दीक्षित

लेखमाला खूपच रंजक आणि माहितीपूर्ण आहे.

सायणभाष्यात- 'अखण्डाया कृत्स्नाया वाचश्चतुर्धां व्याकृतत्त्वात्' असं जे लिहिलं आहे त्याबद्दल अजून काही स्पष्टीकरण आहे का? म्हणजे,
अखण्डा वाक् = वेद असं तर नाही ना?
आणी चतुर्धा= अनंत वेदराशीचे चार भाग असं तर नाही ना?

किंवा 'चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्बाह्मणा ये मनीषिण:' याचा अन्वय-
ये मनीषिण: ब्राह्मणा:, तानि चत्वारि पदानि वाक्परिमिता विदु: असा घेतला जाऊ शकेल काय?
म्हणजे, 'जे बुद्धिवंत ब्राह्मण होते, ते त्या चार पदांना 'वाक्परिमित' समजत?
इथे, चत्वारि पदानि म्हणजे, तत्पद, त्वंपद, असिपद आणि अजून एक (ते आत्ता आठवत नाहिये)
'तत्त्वमसि' मध्ये तीन पदे येतात. की अयमात्मा ब्रह्म, अहं ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, अशी काही वाक्ये आहेत त्यांनाच चत्वारि वाक्पदानि म्हटले असावे?
(हेच अथर्वशीर्षातही आहेच- त्वं चत्वारि वाक्पदानि)

बर्‍याच शंका उपस्थित केल्या. त्यामुळे लेखाच्या मूळ मुद्याला फाटा फुटत असेल, तर सोडून द्या.

- चैतन्य

नरेंद्र गोळे's picture

12 Feb 2013 - 8:39 am | नरेंद्र गोळे

त्याचप्रमाणे वायुच स्पर्श आणि शब्द यांचे मूळ कारण आहे.>>>>
ह्यावरून स्पर्श संवेदनेचे कारण वायुच असतो असा अर्थ निघत असेल तर तो बरोबर नाही असे मला वाटते आहे.

वायुच्या स्पर्शामुळेच शब्दनिष्पत्ती होते असा अर्थ निघत असल्यास तो सयुक्तिक वाटेल!