आज पर्यंत आपण अनेक समूहांवर, ब्लॉग्जमध्ये, 'संस्कृत' भाषेसंबंधी लिखाण वाचले आहे. अनेक ठिकाणी "संकृत भाषा किती महत्त्वाची आहे?", "संस्कृत भाषेची आज खरोखरच गरज आहे का?", "संस्कृत भाषा का शिकावी?" असे प्रश्न उपस्थित करून जोराजोराने वाद घातले गेले आहेत. या वादांना पुढे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे वळणही लागलेले दिसून आलेले आहे. अशा वेळी सोयिस्कररीत्या संस्कृत ब्राह्मणांची भाषा आहे आणि आमची ती प्राकृत भाषा असा मुद्दा काढल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे. प्राकृत सन्दर्भातील मुद्दा निघाल्यावर एक गोष्ट फार लगेचच लक्षात आली आणि ती म्हणजे मुद्दलात 'प्राकृत' भाषा हे काय प्रकरण आहे तेच अनेकांना ठाऊक नसतं. संस्कृतेतर सगळ्या भाषा प्राकृत किंवा मराठी, हिन्दी वगैरे भाषा प्राकृत असा एक ढोबळ समज झाला असल्याचंही जाणवलं. तेव्हा विचार केला की या 'प्राकृत' भाषेवर काही लिखाण करता येतंय का ते बघावं म्हणून हा टंकन-प्रयोग.
लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की इथल्या या लिखाणात संस्कृत श्रेष्ठ की प्राकृत? किंवा संस्कृत आधी की प्राकृत? संस्कृत माझी आणि प्राकृत त्यांची किंवा प्राकृत माझी आणि संस्कृत त्यांची असल्या निरर्थक प्रश्नांना आणि मतांना काडी इतकंही महत्त्व नाही. माझ्या भाषा विषयातल्या थोड्याफार अभ्यासाचं सार किंवा त्याद्वारे तयार झालेली माझी स्वतःची काही मतं इथे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
या विषयावर अनेक जणांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. कृपया त्यांच्या मतांचे संदर्भ स्वतःचे किंवा मला मान्य आहेत म्हणून या ठिकाणी चिकटवण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासाला वाढवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती इथे करून ठेवत आहे.
हा प्रयोग एकूण विषय-विस्तार बघता, कदाचित एक सलग असणार नाही. पण म्हणून तसा प्रयत्नच न करणं अयोग्य ठरेल. माझ्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे सुरूवात करायला काय हरकत आहे? बाकी आपली बुद्धीमान आणि सूज्ञ मंडळी आवश्यक तिथे योग्य ती भर टाकतीलच, याची खात्री आहे. सदर माहितीचा स्रोत प्रामुख्याने Introduction to Prakrit हे A. C. Woolner लिखित पुस्तक आणि विश्वविद्यालय प्रकाशन, वाराणसीने प्रकाशित केलेले डॉ. कपिलदेव आचार्यांचे 'लघु सिद्धांत कौमुदी' हे पुस्तक आहे. याशिवाय जिथे शक्य होईल तिथे संदर्भासाठी घेतलेल्या पुस्तकांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईलच.
आज आपण ज्याला प्राकृत भाषा असं संबोधत आहोत, ती 'एक' भाषा नसून तो म्हण्टलं तर अनेक भाषांचा बनलेला एक भाषा समूह आहे. म्हणजेच अनेक भाषांच्या समुदायाला सामायिकपणे (collectively) आपण 'प्राकृत' हे नाव दिलेलं आहे. याचा अर्थ असाही होतो की या एकमेकांपासून भिन्न भाषा आहेत.
भाषा समूह निर्माण होण्यासाठी आधी तशा भाषेचे प्रयोग करणारे मानव समूह निर्माण होणं आवश्यक असतं. म्हणून या संदर्भात असंही म्हणता येईल की ज्यांना आपण प्राकृत म्हणतो त्या भाषा बोलणारे अनेक मानव समूह आपल्या इथे उपस्थित होते. मग हे मानव समूह भौगोलिक दृष्ट्या एकमेकांपासून लांब होते का? तर हो, बर्यापैकी लांब होते. म्हणजे त्यांच्या भाषा, त्यातील शब्द, त्या शब्दांचे उच्चार, त्या शब्दांतून ध्वनित होणारे अर्थ या गोष्टी एकमेकांपासून भौगोलिक दृष्ट्या दूर असल्यामुळे भिन्न असतील, तरी मग त्या सगळ्या भाषांना वेगवेगळं न गणता त्यांचा केवळ 'प्राकृत' या एकाच प्रकारात अंतर्भाव होतो. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करूनही त्यांचं वर्गीकरण या एकाच प्रकारात होतं, हा संदर्भ नक्कीच महत्त्वाचा आहे.
सामान्यत: वाङ्मयीन दृष्ट्या या प्राकृत भाषांशी आपली ओळख होते संस्कृत नाटकांच्या माध्यमातून. संस्कृत नाटकांमध्ये स्त्रिया आणि जनसामान्यांची भाषा म्हणून प्राकृत भाषांचा वापर झालेला दिसून येतो. यात सामान्यतः शौरसेनी, महाराष्ट्री आणि मागधी प्राकृतांचा प्रयोग झालेला आढळून येतो.
या प्राकृत भाषांच्या संदर्भात विवेचन करण्यापूर्वी एकूणच भाषा विषयाबद्दल प्राचीन संदर्भ कसे सापडतात, त्यांचं विश्लेषण कसं करता येतं याचा विचार यापुढे करण्याचा प्रयत्न करू.
(सभासदांना या विषयात रस असल्यास पुढचे भाग टाकण्याचा विचार आहे.)
प्रतिक्रिया
21 Nov 2011 - 10:24 am | प्रचेतस
उत्तम लेख.
वूल्नर यांचे पुस्तक वाचलेले नाही. पण प्राकृत ही मूळात संकृतोद्भव भाषा असे वाटते. पाकृतातले बरेचसे शब्द हे मूळ संस्कृतवरून आलेले आहे. अशोकाचे बरेससे शिलालेख, सातवाहनांचे तर सर्वच शिलालेख हे प्राकृतातच आहेत पण त्यावरचे मूळच्या संस्कृत भाषेचे संस्कार हे स्पष्ट जाणवतात.
वर तुम्ही म्हटले आहे की ती 'एक' भाषा नसून तो म्हण्टलं तर अनेक भाषांचा बनलेला एक भाषा समूह आहे.
म्हणजे नेमके काय? भाषांचा समूहात नेमक्या कुठल्या भाषा येतात? द्रविड भाषांचा समावेश पाकृतात होत होता का फक्त शौरसेनी, महाराष्ट्री, पाली, अर्धमागधी या उत्तरेकडील भाषाच प्राकृतात येत होत्या?
एक शंका:
प्राकृत भाषा ही ब्राह्मी, खरोष्टी लिपीत लिहिली जात असे. तिला देवनागरी लिपी केव्हा मिळाली? तसेच मूळ संस्कृत भाषा कुठल्या लिपीत लिहिली जात असे?
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहे हे सांगणे न लगे.
21 Nov 2011 - 10:38 am | प्रास
धन्यवाद वल्ली!
या लेखाचा उद्देश काहीसा वेगळा आहे. प्राकृताची जिज्ञासा करताना मूळात प्राकृताचा उद्गम कसा असावा याचा विचार केलाच नाही तर प्राकृताच्या अभ्यासापूर्वी आवश्यक असणारी कोणतीच गृहितकं मांडता येणार नाहीत किंवा मांडलेली गृहितकं एकांगी होण्याची शक्यता होईल म्हणून प्राकृताची जिज्ञासा करण्यापूर्वी या मुद्याचा उहापोह आवश्यक वाटल्याने ही लेखमाला लिहिली गेली.
प्राकृत संस्कृतोद्भव आहे की संस्कृत प्राकृतोद्भव या मुद्याला नक्कीच स्पर्श होईल पण निष्कर्श कदाचित निराळा येण्याचीही शक्यता आहे.
या लेखामध्ये जाणूनबुजून लिपीचा मुद्दा न घेण्याचं ठरवलं आहे कारण मग विषयाला मोठ्ठे फाटे फुटतील अशी भीती वाटली. पुढे कधी शक्य झाल्यास हा विषय वेगळ्या धागा स्वरूपात मांडण्याचा विचार आहे.
21 Nov 2011 - 12:24 pm | प्रचेतस
लिपीचा मुद्दा घेतला तरी जास्त अवांतर होईल असे वाटत नाही किंबहुना भाषेच्या विकासासाठी लिपीसुद्धा महत्वाची आहेच.
तरीही वेगळा धागा टाकल्यास त्याचेही स्वागतच आहे.
12 Feb 2013 - 8:19 am | नरेंद्र गोळे
प्रथमत। ह्या स्तुत्य प्रयासास हार्दिक शुभेच्छा!
प्राकृताची जिज्ञासा करताना >>>>> तुम्हाला चिकित्सा म्हणायचे आहे का? कारण जिज्ञासा म्हणजे कुतुहल
21 Nov 2011 - 2:40 pm | गवि
उत्तम उपक्रम..
धन्यवाद... पुढील भागांची वाट पाहतो..
21 Nov 2011 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार
प्रास,
आतुरतेने वाट बघतो आहे ह्या उपक्रमाची.
21 Nov 2011 - 4:29 pm | सोत्रि
चांगल्या उपक्रमाच्या आणि चर्चेच्या प्रतिक्षेत!
- (प्राकृत जिज्ञासू) सोकाजी
21 Nov 2011 - 4:31 pm | मदनबाण
वाचतोय...
21 Nov 2011 - 4:34 pm | प्रास
खरं तर ही लेखमाला लिहिल्यावर कुणी वाचेल का हीच मनात शंका होती. काहीसा रुक्ष विषय असल्याने तसं वाटत असावं पण एकूण प्रतिक्रियांचा रोख बघता बरं वाटलं आणि अधिक लिहिण्याचा हुरूप आला.
भाषेचे जाणकार आणि अभ्यासू लोकांमध्येही प्राकृताच्या मूळाकडे जाण्यात मतभिन्नता आढळते. ही मतभिन्नताच पुढे जाऊन या पहिल्या भागात म्हंटल्याप्रमाणे वादांना कारणीभूत ठरते.
याचा विचार करून सर्व समावेशक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याच्या हेतुने हे लिखाण झालं आहे.
यात निघालेला निष्कर्श सगळ्यांना मान्य होईलच असं निश्चितपणे म्हणता येणार नाही पण त्या दृष्टीने अभ्यासूंना विचारप्रवण करण्यात जरी यशस्वी ठरला तरी या लेखमालेचं सार्थक होईल असा विचार आहे.
पुढील भाग लवकरच टाकला जाईल.
धन्यवाद!
21 Nov 2011 - 5:04 pm | जयंत कुलकर्णी
शेवटचे वाक्य महत्वाचे. यावर जरा सविस्तर लिहावे ही विनंती.
21 Nov 2011 - 6:04 pm | अन्या दातार
प्राकृताबद्दल शून्य माहिती असल्याने ही लेखमाला खंडीत होऊ नये असे आवाहन करत आहे. :)
21 Nov 2011 - 7:56 pm | पैसा
या विषयाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद! संस्कृत मृतप्राय आहे ती कशाला शिकायची असं काही जणानी इथे मिपावरच म्हटलेलं आठवतंय. त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर प्राकृत भाषा मृत म्हणायला हरकत नाही. पण आपण ज्या प्रादेशिक भाषा बोलतो त्यांचा फार मोठा भाग प्राकृतमधून आलेला आहे हे लक्षात घेता प्राकृतची तोंडओळख झाली तरी खूप झालं असं मी म्हणेन.
माझी आई एम. ए. करत होती तेव्हा तिला अर्धमागधीचा पेपर होता. घरातलं सगळं वाचायचं या सवयीमुळे तिची पुस्तकंसुद्धा वाचायचीच! तेव्हा कालिदासाच्या संस्कृत नाटकांतून प्राकृत मधेमधे वापरलेली वाचल्याचं आठवतं. अर्थात तेव्हा मला फार काही कळत होतं असं नव्हे, पण निदान काही शब्द वाचलेले नक्की आठवतायत!
या शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री, अर्धमागधी, पाली, पैशाची वगैरे भाषांबद्दल जमेल तेवढी माहिती द्या. वाचायची प्रचंड उत्सुकता आहे. शक्य असेल तर गाथा सप्तशती, आणि इतर महानुभव ग्रंथांबद्दल काही माहिती जरूर द्या.
संस्कृत आणि प्राकृत यापैकी आधी कोणती वापरात आली याबद्दल चर्चा करण्यात मतलब नाही हे खरंच असलं तरी त्यांच्या नावातूनच बर्याच गोष्टी स्पष्ट होतात. 'प्राकृत' म्हणजे नैसर्गिक तर 'संस्कृत' म्हणजे संस्कार केलेली. पण ते असोच! आमचं सगळ्याच भाषांवर प्रेम आहे त्यामुळे पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट बघत आहे!
22 Nov 2011 - 9:41 am | सूड
अतिशय सुंदर संकल्पना. पुभाप्र.