मागच्या भागात चर्चा केली व्हाईट वाइनची (श्वेत वारुणी) , आज चर्चा करूयात रेड वाइनची (रक्त वारुणी)
ह्या वाइनला जरी रेड वाइन म्हणत असले तरीही ही फक्त लाल नसते. काळपट, गडद लाल, लालसर, रूबी रेड, जांभळट, मरून अशा विविध रंगछटांमध्ये मिळते. ह्याचे कारण म्हणजे द्राक्षाची प्रजात, ज्यापासून ती वाइन बनते. ह्या वेगवेगळ्या प्रजातीच्या द्राक्षांचा एक खास रंग असतो जो लाल, गडद जांभळ्या आणि निळसर अशा रंगछटांपासून नैसर्गिकरीत्या मिळालेला असतो.
पण खरेतर हा रंग द्राक्षाच्या गराचा नसतो; तो असतो त्या द्राक्षाच्या सालीचा. वाईनच्या नेत्रसुखद, निराळ्या अशा वर्णपटाला सालीचा हा रंगच जबाबदार असतो. वाइन बनवताना द्राक्षे जेव्हा मोठ्या पात्रात रस काढण्यासाठी चेचली जातात त्यावेळी ह्या सालींचा संपर्क त्या रसाशी येतो. त्यावेळी ही साल त्या द्राक्षाच्या रसाला एक विशिष्ट रंगछटा देते. प्रत्येक वाइनची स्वतःच्या रंगाची वैशिष्ट्यपूर्ण छटा ही :
- ती वाइन बनवण्यासाठी वापरलेल्या द्राक्षाची प्रजात (सालीचा रंग) आणि
- त्या द्राक्षाच्या सालीचा रसाबरोबर संपर्क होऊ दिलेला कालावधी
- प्रत्येक वायनरीचा सीक्रेट फॉर्मुला आणि सीक्रेट रेसिपी
ह्यांनी बहाल केलेला असतो. ह्या साली नैसर्गिक यीस्टचेही काम करतात फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये.
ज्यावेळी ही साल द्राक्षाच्या रसाला विशिष्ट रंगछटा बहाल करत असते, बरोबर त्याचवेळी सालीतले 'टॅनीन' त्या रसात मिसळले जात असते. हे बहाल करते वाइनला "स्वतः:चे अंग". हे टॅनीन वाइनला एक 'पोत' (Texture) देते आणि हा पोत म्हणजेच वाइनचे अंग. हलके अंग, मध्यम अंग आणि जड अंग अशा चढत्या क्रमाने वाइन्समध्ये टॅनीनचे प्रमाण वाढत असते. वाइनचा प्रवाहीपणा (Viscosity) वाइनच्या अंगाच्या चढत्या क्रमाने कमी कमी होत जातो.
आता बघूयात रेड वाइनसाठी वापरण्यात येणार्या विविध प्रजाती (Varieties) :
Cabernet Sauvignon
Cabernet Sauvignon द्राक्षं King of Red Wine Grapes म्हणून ओळखली जातात.जिथे जिथे वाइनचे उत्पादन केले जाते तिथे तिथे ह्या द्राक्षाची पैदास केली जाते.फ्रांसमधे Bordeaux ह्या परगण्यात तयार झालेली ही द्राक्षे सर्व ठिकाणच्या द्राक्षामध्ये उच्च दर्जाची मानली जातात. Bordeaux इथल्या सगळ्या उच्च दर्ज्याच्या रेड वाइन्स ह्या द्राक्षापासून बनवल्या जातात.ह्या द्राक्षापासून बनवलेल्या वाइन्स बर्याच वर्षांपर्यंत मुरवत ठेवता येतात आणि त्या जितक्या जुन्या होत जातात तितक्या त्या चवदार होत जातात. जास्त काळ मुरवता येत असल्यामुळे चव परिपक्व होऊन ही द्राक्षे इतर द्राक्षांबरोबर ब्लेन्ड करायला उत्तम असतात. प्रामुख्याने Merlot ह्या द्राक्षाबरोबर तसेच Sangioveseआणि Shiraz ह्या द्राक्षांबरोबर ब्लेन्ड करण्यासाठी Cabernet Sauvignon उत्तम मानली जाते.ह्या वाइन्स मध्यम अंगाच्या आणि भरलेल्या अंगाच्या असतात. तसेच ह्या ‘ड्राय’ प्रकारात मोडतात. ह्या वाइन मध्ये टॅनीनचे प्रमाण जास्त असते.
Merlot
ह्या द्राक्षाचे मूळ फ्रांसमधे Bordeaux ह्या परगण्यात आहे.ह्या वाइन्स हलक्या अंगाच्या ते मध्यम अंगाच्या असतात. ह्या वाइन मध्ये टॅनीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे ह्या 'सॉफ्ट' असतात.रेड वाइन ह्या प्रकारात सुरुवात करणार्यांसाठी ह्या द्राक्षाच्या वाइन्स एकदम उत्तम असतात कारण ह्यांची चव फारच 'फ्रुटी' असते. तर ह्या मालिकेवरून स्फुरण घेऊन कोणी रेड वाइन सुरू करणार असेल तर सुरुवात Merlot ने केल्यास आगळीच लज्जत येईल. :)प्रामुख्याने Merlot ही Cabernet Sauvignon ह्या द्राक्षाला जरा मृदू करण्यासाठी ब्लेंड करताना वापरली जाते.
Pinot Noir
फ्रांसमधल्या Burgundy परगण्यातली ही एक उच्च दर्जाची, प्रसिद्ध द्राक्षाची प्रजात आहे.ह्या द्राक्षापासून तयार झालेल्या वाइनला 'रेड बरगंडी' असेही म्हणतात. फ्रान्समध्ये तयार होणार्या उच्च दर्जाच्या वाइनमध्ये ह्या वाइनची गणना होते.आता ह्या द्राक्षांची पैदास फ्रान्स व्यतिरिक्त इतर वाइन उत्पादक देशामध्येही मोठ्या प्रमाणात होते.ही द्राक्षे वाढवण्यास एकदम नाठाळ असतात. म्हणजे यांना दिवसा उबदार आणि रात्री प्रचंड थंड असे वातावरण लागते. पण एवढी चवदार असतात की ह्यांना वाढवण्याच्या मेहनतीचे एकदम चीज होते :)ह्या नाठाळपणामुळे ह्या द्राक्षांची पैदास इतर द्राक्षांच्या तुलनेत कमी होते त्यामुळे ह्या वाइन्स जरा महाग असतात.ह्या वाइन्स हलक्या अंगाच्या असतात आणि चव 'फ्रुटी' असते.
Cabernet Franc
फ्रान्स मधल्या Bourdeaux and Loire (लूव्र) Valley परगण्यात मूळ असलेल्या ह्या द्राक्षांना वाढीसाठी थंड वातावरणाची गरज असते. ह्या द्राक्षांमध्ये 'टॅनीन'चे प्रमाण कमी असते त्यामुळे ही द्राक्षे Cabernet Sauvignon ह्या प्रजातींच्या द्राक्षांबरोबर ब्लेंडींग साठी प्रामुख्याने वापरली जातात.आता ही द्राक्षे अमेरिकेत कॅलिफोर्निआ मध्येही मोठ्या प्रमाणात तयार केली जातात.
Shiraz
ह्या द्राक्षांना अमेरिकेत आणि फ्रांसमधे Syrah तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेत Shiraz म्हणतात.फार ऍसिडीक चव असते ह्या द्राक्षांपासून बनवलेल्या वाइनची. नुकताच सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2011 मध्ये गेलो होतो तेव्हा 'देशमुख वायनरी'ची D' Shiraz असे नाव असलेली Shiraz विकत घेतली. अतिशय ऍसिडीक आणि भयंकर तीव्र चवीची होती. मला नाही आवडली. (हे माझे वैयक्तिक मत आहे)
Zinfandel
झिंनफॅन्डल द्राक्षाची प्रजात अमेरिकेन द्राक्षोत्पादन इतिहासाच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. ह्या द्राक्षाचे मूळ इटलीत असावे असा समज होता. पण बर्याच संशोधनानंतर ( 10-12 वर्षांच्या ) हे मूळ क्रोएशिया मध्ये मिळाले. जरी मूळ युरोपात असले तरीही ह्या द्राक्षांच्या वाइनने आता न्यू वर्ल्ड मध्ये धूम केलेली आहे. ही प्रजात अष्टपैलू आहे कारण जरी हीचा लाल रंग असला तरीही 'माझीच लाल' असे न करता श्वेत वारुणी म्हणजेच व्हाईट वाइन बनवण्यासाठीही ही द्राक्ष दुजाभाव दाखवत नाही. म्हणजे ह्या लाल द्राक्षांपासून व्हाईट वाइनही बनवली जाते जिला व्हाईट झिन असे म्हणतात. नुसते व्हाईटच नव्हे तर पिंक (गुलाबी) वाइन्सही ह्या द्राक्षांपासून बनवल्या जातात.आहे की नाही अष्टपैलू!
Malbec
फ्रान्स मधल्या Bourdeaux परगण्यात मूळ असलेली ही प्रजात. पण आता 'पिकते तिथे विकत नाही' ह्या उक्तीनुसार युरोपामध्ये हिची लोकप्रियता ढासळू लागली आहे.त्याउलट अर्जेंटिना मधल्या पोषक वातावरणामुळे तिथल्या ह्या द्राक्षांपासून बनलेल्या रेड वाइन्सनी धुमाकूळ घातला आहे आणी प्रचंड लोकाश्रय मिळवला आहे. ह्या द्राक्षापासून बनलेली वाइन चवीला रस्टीक आणि टॅन्जी (रानवट आणि तीव्र) असते
Sangiovese
इटली मध्ये मूळ असलेली आणि सर्वात जास्त व कॉमनली उत्पादित केली जाणारी ही द्राक्षांची प्रजात. इटली मधला Tuscany परगणा Sangiovese द्राक्षांची मायभूमी आहे असे म्हणतात. प्रख्यात Chianti वाइन ही इटलीतील Chianti परगण्यातील Sangiovese द्राक्षांपासून बनविलेली असते.
Gamay
फ्रान्स मधल्या Beaujolais परगण्यात Gamay द्राक्षापासून तयार होणार्या वाइन्सच अस्सल Gamay वाइन समजल्या जातात. अमेरिकेत तयार होणार्या Gamay वाइन्स ह्या दुय्यम समजल्या जातात कारण त्यांचा दर्जा फ्रेंच Gamay वाइनपेक्षा हलका असतो. ह्या वाइन्स 'तरुण' असताना प्यायच्या असतात.
रेड वाइन कशी प्यावी
चांगल्या वाइन्स चुकीच्या पद्धतीने सर्व्ह केल्यास अथवा प्यायल्यास अतिशय वाईट लागू शकतात, तर सो सो वाइन्स ह्या योग्य पद्धतीने सर्व्ह केल्यास आणि प्यायल्यास अत्युच्च अनुभूती देऊ शकतात. वाइन सर्व्ह करताना योग्य ग्लास वापरणे फार गरजेचे असते. तसेच योग्य तापमानाला वाइनचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो आणि वाइनची लज्जत वाढते.
रेड वाइनचे योग्य तापमान
रेड वाइनसाठी तापमान एकदम "पर्फेक्ट" असावे. रेड वाइन जर जास्त थंड प्यायली तर तीच स्वाद आणि टॅनीनमुळे आलेला पोत गायब होऊ शकतो. त्याउलट जर गरम, कोमट अशी प्यायली तर ती फ्लॅट लागेल. रेड वाइन प्यायचे "पर्फेक्ट" तापमान असावे 15 ते 18 डिग्री सेल्शिअस. पण हो त्यासाठी थर्मामीटर घेऊन बसू नका प्यायला नाहीतर मग प्यायचे मीटर गंडेल ;) रेड वाइन जनरली रूम टेंपरेचर ला प्यावी असे म्हणतात पण ते रूम टेंपरेचर भारतातले नसते बरं का, ते रूम टेंपरेचर म्हणजे जुन्या काळातील ब्रिटिश मॅन्शन्स मध्ये असणारे रूम टेंपरेचर जे असायचे 15 ते 18 डिग्री सेल्शिअस.
रेड वाइनसाठी वापरायचा ग्लास हा असा असावा:
रेड वाइनचे 'कॅरॅक्टर' खर्या अर्थाने खुलवायचे असल्यास योग्य ग्लास हा नितांत आवश्यक असतो. रेड वाइनच बाटलीचे बूच उघडल्यानंतर प्यायच्या आधी वाइनच हवेशी (पक्षी: हवेतील ऑक्सिजन) संपर्क होऊन ऑक्सीडेशन झाल्यास वाइनचे 'कॅरॅक्टर' खुलते म्हणजे तिचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो. ह्या ऑक्सीडेशनसाठी रेड वाइनच ग्लास मोठ्या तोंडाचा असतो. साधारण बाऊल (Bowl) सारख्या पसरट आकारामुळे हवेशी संपर्क वाढण्यास मदत होते.ह्या ग्लासेसचे पसरटपणाच्या प्रमाणानुसार अजूनही पोट प्रकार पडतात
- Bordeaux (मराठी उच्चार ?) ग्लास
- बरगंडी ग्लास
रेड वाइन कधी प्यावी
रेडवाइन जेवणापूर्वी आणि/किंवा जेवताना जेवणाबरोबर घायची असते.
फक्त जेवतानाच रेड वाइन मजा आणते असे नाही तर निवांत वेळी (Leisure Time) नुसतीही प्यायल्यास रेड वाइन मजा आणते.
रेड वाइन बरोबर काय खावे
"Red wine with Red meat" हा रेड वाइन पिण्याचा 'थंब रूल' आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
स्टार्टर्स: गरम स्टार्टर्स, एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग चीज असलेले
मेन कोर्स: पास्ता विथ रेड सॉस, चीज बेस्ड डिशेस, बीफ,पोर्क, चिकन डशेस
आपले भारतीय (पक्षी: आशिआई) जेवण जरा मसालेदार आणि तिखट असते त्यामुळे कुठल्याही जेवणाबरोबर (साऊथ इंडिअन सोडून) रेड वाइन मस्त जोडी बनवते.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
18 Nov 2011 - 5:10 pm | आत्मशून्य
.
18 Nov 2011 - 6:46 pm | सोत्रि
आ.शू.,
खरच नजाकत!
नुसते ह्या द्राक्षांचे फोटो डोळे भरून बघूनच हलकी हलकी नशा येतेय :)
आता अशा मोहक आणि मादक द्राक्षांपासून बनलेली वाइन किती मादक असेल नाही!
- ('हलका हलका सा ये नशा...' हे गाणे आठवलेला) सोकाजी
18 Nov 2011 - 5:13 pm | सुहास झेले
जबरा !!
रक्त वारुणी छान वाटतं वाचायला..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत :) :)
18 Nov 2011 - 5:29 pm | गवि
मस्त लेख.
रंगाला भुलून शिराझ आणली मधे आणि एका घोटातच थुंकून टाकावीशी वाटली. कसली ती कडूझार चव.. आंबट म्हणू की आणि काही केमिकल चव म्हणू.. गोडपणाचा तर अंशही नाही.. नुसती जळजळ.
व्हाईट वाईन्स लालपेक्षा आमच्या जास्त आवडत्या आहेत. रेडमधे पोर्ट वाईन.
18 Nov 2011 - 5:54 pm | धमाल मुलगा
मलाही व्हाईट वाईन्स जास्त आवडतात. विशेषतः Sauvignon Blanc आणि chinen blanc
गवि, ट्राय धिसः १ स्कूप व्हॅनिला आईसक्रिम, त्यावर १ चमचा मध आणि chenen blanc ....माझं आवडतं कॉम्बिनेशन आहे. :)
बाकी, सोकाजीराव,
लेख नेहमीप्रमाणेच बहारदार आहे. पण कोरडा वाटतोय. ;)
कधी येऊ? :D
18 Nov 2011 - 6:19 pm | विनायक प्रभू
मस्त लेख.
धमुचे काँबो पण मस्त.
18 Nov 2011 - 6:29 pm | धमाल मुलगा
वर नमूद केलेल्या कॉम्बोमध्ये कोणतेही क्रिप्टिक नाही. ...These stunts are performed by trained professionals. Outcome may vary in un-standard conditions. खुलासा जनहितार्थ प्रसारित. ;)
मास्तर, चिअर्स!
18 Nov 2011 - 6:36 pm | विनायक प्रभू
काँबॉ मधील एक नंतरच्या डीश चा उल्लेख न केल्याबद्दल धमुचा निषेढ.
18 Nov 2011 - 10:22 pm | यकु
सोकाजींची अख्खी लेखमालाच बुकमार्क करावी लागणार आहे.
पण एक प्रश्न नेहमी पडतो, तुम्ही जे कॉकटेल्स सांगता त्याचे 'घटक' आपल्या नेहमीच्या बार मध्ये मिळतात का?
एक तर ते 'बार' म्हणजे चोखंदळ खरेदी करण्याचं ठिकाण नसतं (बर्याच लहान शहरात)..
घ्यायचं आणि पळायचं..
तर हा सगळा दारूगोळा नेमका कोणत्या ठिकाणाहून पैदा करायचा???
बाहेरगावची काही ठिकाणे सांगितली तरी चालतील.
(मार्गदर्शन अभिलाषी मद्यसंप्रदायिक) यशवंत
सेम हिअर...
म्हाराष्ट्र देशीच्या नाशिक परगण्यातील 'रेड पोर्ट' या ब्रॅण्डवर आमचा जीव फिदा आहे..
एकदा थोड्या थोड्या वेळानं दिवसभर एकटाच पीत बसलो होतो ती प्लॅस्टिकची बाटली घेऊन ...तर गावाकडून भेटायला आलेल्या दोस्तांनी 'पार वाया गेलंय ते... दिवसभर पीत बसतंय..' अशी गावात प्रसिद्धी केली होती..
अर्थात त्यामुळं वाईनवरचं प्रेम कमी झालं नाहीच म्हणा..
21 Nov 2011 - 11:23 am | सोत्रि
तुम्हाला नेहमीचा बार म्हणजे 'वाइन शॉप' म्हणायचे आहे का?
जर तसं असेल तर, सर्वच वाइन शॉपमध्ये हे 'घटक' नाही मिळात नाहीत :(
दारूगोळा पैदा करण्याचे उपाय:
१. पुण्यात दोराबजी (कॅम्प) , मुकेश वाइन्स (बंड गार्ड्न), घुले वाइन्स (कॅम्प)
२. परदेशात कोणी येणार असेल तर त्यांना आणायाला सांगायचे
३. एअरपोर्टवरील ड्युटी फ्री शॉप्स
- (साकिया) सोकाजी
18 Nov 2011 - 5:45 pm | मदनबाण
सोक्या च्यामारी तू असं काय डिटेमंदी लिवतोस ना...की मजा येते वाचायला ! :)
जसे जागु ताईच्या मस्य पाकृ मुळे मी मांसाहारी होईन अशी धास्ती वाटते तसेच तुझ्या ह्या अशा लेखांमुळे मी वारुणी प्रेमी होईन की काय याची भिती वाटते...! ;)
(फ्रुट ज्युसवर तहान भागवणारा) ;)
18 Nov 2011 - 6:04 pm | सुहास झेले
टू बाणा...
तसा मांसाहारी झालोय कधीच ;)
18 Nov 2011 - 5:59 pm | विजुभाऊ
टेबल ग्रेप्स आणि वाईन ग्रेप्स यात काही फरक असतो का?
हल्ली बरेच ठीकाणी वाईनच्या दुकानात वाईन शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात. शोकेसवर उन्हे येत असतात. अशा वाईन्स खराब होतात की बीयरप्रमाणे त्या थंड केल्यावर पुन्हा चांगल्या होतात?
21 Nov 2011 - 3:09 pm | सोत्रि
टेबल ग्रेप्स : ही द्राक्षे खाण्यासाठी वापरतात.
वाइन ग्रेप्स : ही द्राक्षे वाइन बनवण्यासाथी वापरतात.
http://www.misalpav.com/node/19259#comment-342195
- (साकिया) सोकाजी
18 Nov 2011 - 6:18 pm | प्रचेतस
वारूणी एकदम जबराट.
18 Nov 2011 - 6:32 pm | योगप्रभू
मस्त लेख आणि माझ्या आवडीचा...
सोका, तुला आधीच एक गंभीर इशारा देऊन ठेवतो. मागून (पक्षी : कालांतराने) आपल्या दोघांच फाटलं (पक्षी : बिनसलं) तर मंग बोलायचं न्हाय.
जेव्हा बघावं तेव्हा तू स्टार्टर्स आणि मेन कोर्समध्ये पास्टा, पोर्क, बीफ असल्या यवनी पदार्थांचा उल्लेख करतोस. अरे विशुद्ध भारतीय मन आहे, की नाही तुला? म्होरल्या बारी आपलं बी साजेसं गावरान पदार्थ येऊ द्या म्हनलं.
बाकी सुंदर, गौरकाय, कमनीय, पुष्ट (अधिक विशेषणे महामहोपाध्याय ढापेशास्त्रींच्या कोशात पाहावीत) अशा फ्रेंच तरुणींच्या लत्ताप्रहाराने चेचल्या जाणार्या द्राक्षांची चव त्या वाईनमध्ये किती सुंदर खुलते नाही? त्याबद्दल तू मौन का बाळगलेस वत्सा? :)
18 Nov 2011 - 7:20 pm | सोत्रि
योगप्रभू,
आजच कोरेगाव पार्कात IL Fungo Magico Italian & Mexican Restaurant ह्या हाटेलात 'Enchiladas with Mushrooms' ही रेड सॉस मधे लडबडलेली डीश रेड वाइन बरोबर चापली आहे. त्यामुळे त्या 'कॉन्टिनेंटल' डीशला जागून खरच सांगतो अजून रेड वाइनबरोबर भारतीय खाद्यपदार्थ तसे खाल्ले नाहीत.
पण आता तुम्ही गंभीर इशारा (पक्षी: हग्या दम) दिला आहेच तर रेड वाइन आता भारतीय पदार्थांबरोबर ट्राय करून इथुन पुढे गावरान पदार्थही सांगीन :)
त्याहीपेक्षा त्याच फ्रेंच तरुणीं जर कवेत असतील तर जास्त खुलून येइल ना (जास्त चावटपणा नको फक्त वाइनच्या चवीबद्दलच म्हणतो आहे मी) ;)
- ('कॉन्टिनेंटल खाणारा' आणि 'फ्रेंच तरुणी कुठे शोधावी ह्या विचारात असलेला') सोकाजी
18 Nov 2011 - 8:37 pm | योगप्रभू
सोका,
अरे माझ्या प्रतिसादाला वेगळा संदर्भ होता. फ्रान्स आणि इटलीमध्ये वायनर्यांच्या परिसरात हा एक आनंदोत्सवच असतो. वाईनसाठी हंगामातील सर्वोत्तम द्राक्षे चेचायचा प्रारंभ हा सुंदर तरुणींच्या लत्ताप्रहाराने होतो. एका मोठ्या टबमध्ये द्राक्षांचे घडच्या घड ठेवले जातात आणि गावातील तरुणी ती द्राक्षे पायाखाली तुडवतात. तो लगदा आणि रस शकुनाचा मानतात, असे वाचले होते. निनादसारखे रसिक यावर काही लिहू शकतील का?
असो,
मनोरथा, चल त्या रम्य नगरीला... :)
18 Nov 2011 - 10:30 pm | सोत्रि
होय, तो संदर्भ माहिती होता आणि लक्षातही आला होता पण त्याला एक परंपरा ह्याच्यापलीकडे काही महत्व नाहीयेय. रंग, गंध आणि चव ह्यावर ह्याने काहीही फरक पडत नाही. म्हणुनच मी जरा अवांतर वाटणारा प्रतिसाद दिला होता.
त्याला महत्व आहे ते फक्त शो ऑफ ह्या दृष्टीने. बहुतेक सगळ्या तरूणीं जनरली नात्यातल्याच असतात वायनरी मालकाच्या. बाकीच्या ललना ह्या वायनरी मालकाच्या 'मैत्रिणी' असतात ;) आणि त्यांची संख्या तो किती शौकिन आहे ह्यावर अवलंबून असते.
- (शौकिन) सोकाजी
19 Nov 2011 - 12:44 am | श्रावण मोडक
कसला नशीलं लिहित होतास. या सोकाजीनं पार उतरवली. ;)
18 Nov 2011 - 6:52 pm | गणपा
माताय काळ्या द्राक्षांमध्येपण येवढे प्रकार पाहुन झिंगच आली.
मस्त ज्ञानवर्धक लेख.
18 Nov 2011 - 7:09 pm | इष्टुर फाकडा
सोकाजीराव, तुमचं वारुणी प्रेम आणि एकूणच मद्य प्रेम मला भावते...तुमचा मद्याकडे (इ सकाळ मध्ये हे 'मादयाकडे' असे टंकले गेले होते, नशीब अनुस्वार न्हवता; अनर्थ टळला !! ) पाहण्याचा दृष्टीकोन 'पवित्र' आहे ;)
गम्मत म्हणजे वाईन्स चे जे आरोग्यदायी गुणधर्म असतात, त्या गुणधर्मांना कारणीभूत असणाऱ्या पदार्थांवर माझे PhD चे संशोधन चालू आहे जर्मनी मध्ये....पक्षी सध्या तुमच्यामुळेच त्या गुणधर्मांचा लाभ चवीने घेतो आहे...उपक्रम चालू ठेवा.
18 Nov 2011 - 7:19 pm | सोत्रि
प्रकटाआ.
18 Nov 2011 - 7:28 pm | इष्टुर फाकडा
म्हणजे काय असते ??
18 Nov 2011 - 10:19 pm | प्रास
प्रकाटाआ = प्रतिसाद काढून टाकला आहे.
:-)
18 Nov 2011 - 8:15 pm | स्मिता.
शुक्रवारच्या मुहूर्तावर मस्त लेख टाकलात सोकाजी! Bordeaux आणि Burgundy या माझ्या आवडत्या...
आता आमच्या प्रिय, जिव्हाळ्याच्या गुलाबी वारूणीवरही एक असाच तपशीलवार लेख येवू द्या.
18 Nov 2011 - 9:27 pm | धनंजय
छान!
भोपळा आणि हेमंती कंद असलेल्या मसालेदार पदार्थांसोबत कृश अंगाची लाल वाईन चांगली लागते, असे मला वाटते.
(या थँक्सगिव्हिंगला "सूप कोर्स"करिता "लालभोपळ्याची आमटी"मध्ये थोडा फरक करून वाढण्याचा विचार आहे. आमटी मस्त झाली म्हणजे नुसती आमटी ओरपता येते! त्यासोबत मर्लो किंवा पिनो न्वार जोडीने देण्याचा मनसुबा आहे. बघू जोडी कशी चालते.)
साल्मन किंवा मेदयुक्त/मजबूत स्वादाच्या माशांबरोबरही लाल वाईन चांगली लागते.
18 Nov 2011 - 10:20 pm | प्रास
वाचनीय लेख.
आवडला.
:-)
18 Nov 2011 - 10:33 pm | ५० फक्त
वाईन चांदिच्या भांड्यातुन पिल्याने काय होते याचा काही विदा आहे काय ओ, असेल तर उद्या घेउन या येताना .
18 Nov 2011 - 10:42 pm | सोत्रि
नको तिच्यायला,
तसा काही विदा नसताना तुमचा आत्ताच थोपुवर गैरसमज होऊ देण्यास कारणीभूत ठरलो. :lol: :) :lol:
जर विदा मिळालातर तुम्ही माझ्या मानगुटीवरच बसाल !
- (चांदीपेक्षा 'चंदी' आवडणारा) सोकाजी
18 Nov 2011 - 10:45 pm | पैसा
सोत्रि, या विषयात आम्ही अक्षरशत्रू! पण तुमचा अभ्यास प्रचंड आहे आणि द्राक्षांचे आणि वाईनचे फोटो झक्क आलेत एवढं कळलं!
18 Nov 2011 - 11:34 pm | नाटक्या
सोकाजीराव,
छान चालू आहे मालीका.. पण नुसतीच गाथा नको हो. एखादे कॉकटेलही टाका सचित्र. अजुन जास्त मजा येईल.. आणि लोकांनाही चवीचं इंद्रधनुष्य चाखायला मिळेल..
(मी बहुदा पुढच्या आठवड्यात "साकीया..." त एखादी भर घालीन म्हणतो :-) )
- नाटक्या
18 Nov 2011 - 11:41 pm | सोत्रि
आले आले गुरूदेव आले ! :)
नाटक्याजी तुम्हाला मिपावर अॅक्टीव्ह बघून मनापासून आनंद झाला.
भरपूर कॉकटेल्स टाकून झाली आहेत. ह्या पोस्ट्च्या स्वाक्षरीतील 'माझे लिखाण' लिन्क क्लिकल्यास सगळी कॉकटेल्स दिसतील.
ह्याला म्हणतात, आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन
- (नाटक्याजींचा एकलव्य) सोकाजी
19 Nov 2011 - 12:14 am | Mrunalini
वा... खुप छान... रेड वाइन म्हणजे माझा weak point आहे. मी ती कधीही कशासोबतही प्यायला तयार असते.
मागच्या महिन्यातच इथे जवळच प्रसिद्ध Toakj winery मधे गेले होते. तिथे ते wineries, wine चे barrels बघुन खुप छान वाटले. पण मग तिथे असलेल्या ५ wine samples च्या tasting नंतर माझी जी काय हालत झाली होती, ती मला आणि माझ्या नवर्यालाच माहिती. ;) १/२ तासावरच्या रेल्वे स्टेशन पर्यंत पोचायला २ तास लागले.
19 Nov 2011 - 5:41 pm | पिंगू
एकदा मित्राकडे १० मीली इतकी रेड वाईन टेस्ट केली होती. पण ग्लास उभट असल्याने चवीची मजा आली नाही.
- (दारुकामापासून अलिप्त) पिंगू
21 Nov 2011 - 12:22 pm | कपिलमुनी
तुमचे लेख सुंदर असतत ..
अवांतर : तुम्हाला रक्तवर्णी वारुणी म्हणायचे आहे का ?
21 Nov 2011 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार
कधी भेटूया ?
अर्थात तुझ्या घरी ;)
( साला चेक द्यायची लैच घाई केली मी )
21 Nov 2011 - 6:30 pm | मन१
नेहमीप्रमाणेच लेख रंजक झालाय.
पण पिणार्यांना प्यायला नक्की रक्क्म कशी मिळते, कशी पुरते व हा खर्च केल्यावर त्यांना ते आपले दैनंदिन गोष्टींना पैसा कसा काय पुरा पडतो ह्या सर्व गोष्टींचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे.
21 Nov 2011 - 6:57 pm | सोत्रि
मनोबा,
अहो, उगाच नाही तुकोबाराया म्हणून गेले...
"येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे" :lol: :) :lol:
- (येरागबाळा) सोकाजी
21 Nov 2011 - 9:50 pm | मन१
:)
23 Nov 2011 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार
साहेब जातीच्या पिणार्याच्या आयुष्यात 'पिणे' हीच एकमेव दैनंदिन गोष्ट असते ;) तिला पैसा पुरला की झाले.
21 Nov 2011 - 7:51 pm | दादा कोंडके
सोकाजीरावांचे धागे वाचुनच नशा घ्यायची. च्यायला आम्ही कर्मदरीद्रीच. :(
एकदा ते काय ग्ल्यु वाईन का काय ते पिउन पोटात ढवळायलागलं होतं तेंव्हा पासुनच वाईनच्या (किंवा कुठल्याच मद्याच्या) नादी लागत नाही. :)
21 Nov 2011 - 8:24 pm | मोहनराव
सोकाजीराव जियो!! आपली ही आवडती वाईन आहे!! अजुन येउद्या...
24 Nov 2011 - 4:19 pm | मोहनराव
सोकाजीराव, तुमचा धागा आवडला. तुम्ही तापमानाबद्द्ल लिहिले आहे. पण सध्या इकडे क्रिसमस जसा जवळ येइल त्यावेळी Gluhwine पिण्याची पद्धत आहे. ती गरम गरम सर्व्ह केली जाते. त्यामध्ये रेड वाईनच असते. तिला mulled wine वाईन असेही म्हणतात. जरा यावर प्ऱकाश टाकाल काय?
24 Nov 2011 - 5:58 pm | सोत्रि
मोहनराव,
मलाही ह्या वाइनची माहिती नव्हती. जरा 'अभ्यास वाढवल्यावर' कळले की रेड वाइन नव्हे.
ही वाइन रेड वाइन मधे आले, वेलची, लवंग, दालचिनी, कडू संत्री आणि ब्रान्डी किंवा वोडका घालून 'फोर्टीफाइड' केलेली असते. म्हणजे वेगवेगळ्या औषधी वनस्पती घालून स्पायसी (तीव्र व औषधी) बनवलेली असते. हा 'फोर्टीफाइड वाइन'चा प्रकार झाला. ही वाइन गरम तशेच थंडही प्यायली जाते.
पण गरम पिणे किंवा पाजणे खासकरून थंडीत (ख्रिस्टमसला) ही एक फार जुनी जर्मन परंपरा आहे.
- (फोर्टीफाइड) सोकाजी
24 Nov 2011 - 6:48 pm | मोहनराव
माहितीबद्द्ल धन्यवाद!!
24 Nov 2011 - 6:22 pm | निनाद मुक्काम प...
अप्रतिम लेख झाला आहे. ह्या लेखमालेमुळे मिपाकर मद्य संस्कृती कोळून पितील ह्यात शंकाच नाही.
आम्ही मुंबईत कॉलेजात असतांना शैक्षणिक सहल ह्या सदराखाली नाशकातील सुला वाईन ह्या वायनरिज ला भेट दिली होती.
तेव्हा संपूर्ण दिवस गुलाबी थंठीत द्राक्षाचे मळे वारुणी निर्मिती कशी होते ते पाहण्यात गेला होता´.
दुपारी वाईन टेस्टिंग हा आमचा आवडता सोहळा पार पडला ( टेस्टिंग साठी देण्यात आलेल्या वाईन च्या बाटल्या सुग्रास जेवणा सोबत संपवल्या तेव्हा माझ्या शैक्षणिक सहल खर्या अर्थाने पूर्ण झाली असे वाटले.
चौधरी बंधू ह्यांनी आपली आई सुलभा हिंच्या प्रीत्यर्थ सुला हे नाव वाईन ला दिले आहे.
आधी पंचतारांकित हॉटेलात
तळे राखी,तो पाणी
चाखी ह्या उक्तीला स्मरून काही परदेशी रक्त वारुण्या पुर्वी चाखल्या होत्या तेव्हा ही देशी चव प्रचंड कडवट जाणवली.
मी तिची तुलना आयुर्वेदिक काढ्याशी केली होती.
युरोप आणी वाईन ह्या बद्दल सविस्तर परत कधीतरी.
मला स्वतःला इटालियन रेड वाईन खूप आवडतात.
25 Nov 2011 - 2:00 pm | नगरीनिरंजन
मस्त लेख!
वाईन हा प्रकार मला अतिशय आवडतो. त्यावरचे तुमचे हे सुंदर विवेचन वाचून वाईन पिण्याइतकाच आनंद मिळाला.
मान गये उस्ताद!