गेल्या आठवड्यात हैदराबाद ( आंध्रपद्रेश) येथे जाण्याचा योग शेवटी जुळून आलाच. :) गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जाण्याचा बेत होता. आता रमजानचा मुहूर्त पाहून ही भेट शक्य झाली. या धावत्या भेटीचा हा धावता वृत्तांत.
हैदराबाद ! - हैदराबाद असं केवळ ऐकून होतो. वाचून होतो. बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे होऊन पाच नवीन शाह्या (शाही चे अनेकवचन) तयार झाल्या होत्या त्यात आपल्या जास्त ओळखीचे म्हणजे विजापूर, अहमदनगर (निजाम), बिदर, बेरार (वर्हाड) आणि गोवळकोंडा (कुतुबशहा) असे होते.
यातील गोळवकोंडा म्हणजे आताचे हैदराबाद. अर्थात गोवळकोंड्याचा किल्ला आजही आहे आणि तो शहराच्या पश्चिमेस आहे. हा गोवळकोंडा म्हणजे आपल्या लक्षात येईल की येथील कुतुबशहाने शिवाजी महाराजांना आपल्या राज्यात राजअतिथी म्हणून आमंत्रीत केले होते. तो हा गोवळकोंडा. पुढे पेशवाईच्या काळात येथील निजामशहा आणि पेशवे यांच्यातील लढाया गाजलेल्या आहेतच.
तर अश्या हैदराबादला जायचे ठरवले आणि सर्वात आधी संपर्क केला तो आपल्या विसुनानांना. विसुनांनांशी या आधी पुण्याला भेट झाली होती. आणि नाना संपर्कात होतेच. त्यांनी पहिला प्रश्न केला की किती दिवसांसाठी येताय? मी म्हटलो दोन दिवस, तर नाना म्हणाले की अहो दोन दिवसांत काय बघणार? किमान आठ दिवसांसाठी या म्हणजे हैदराबाद अगदी तब्येतीने बघता येईल. तरीसुध्दा ही दोन दिवसांची भेट ठरवली. पुढे कधीतरी आरामात जाऊया. सध्या हा रमजानचा मुहूर्त जायला नको असं म्हणून आम्ही निघालो.
सकाळी सिकंदराबाद रेल्वेस्टेशनवर उतरल्यावर विसुनाना घ्यायला आले. तेथून काचीगुड्याला आम्हाला हॉटेलवर आलो. आम्ही तिघे मित्रं होतो त्यामुळे तयार व्हायला आरामात साडे नऊ वाजले. त्यानंतर आम्ही सकाळी सकाळी स्वाती लंच होम मध्ये नास्ता केला. आणि तयार झालो हैदराबाद भ्रमंतीसाठी...
नाना आल्यावर सर्वात आधी जायचं ठरलं हैदराबादच्या आयटी केंद्र असलेल्या सायबराबाद भागात. हैदराबादच्या बंजारा हील, ज्युबली हील अश्या भागातून आम्ही सायबराबाद मधील ऑरबिट मॉल मध्ये गेलो. खूप मोठा मॉल होता. वेगवेगळ्या दालनांतून भटकत थोडा वेळ घालवला. एव्हाना हैदराबादच्या दोन मिपाकरांशी फोनवर बोलून झालं.
भटकत असताना भूक लागल्याची जाणीव झाल्यावर मग बाहेर पडलो. हैदराबादच्या टॉलीचौकी येथील हैदराबाद हाउस येथे जाऊन खास हैदराबादी मटण बिर्याणी मागवली.
खरं सांगतो बिर्याणीचा स्वाद एवढा अप्रतिम होता की बस..! सोबत मिर्ची का सालान तर अप्रतिमच. अख्खी बिर्याणी संपवून आम्ही बाहेर पडलो तो चक्कं ०२:३० वाजता अंधार पडेल एवढे ढग जमा झाले होते. तरी सुद्धा आम्ही कुतूबशाही टोंब पर्यंत गेलो मात्र एवढ्या जोरात पाऊस सुरू झाला की आत जाता आलं नाही. याच प्रकारे पुढे गोवळकोंड्याला गेलो तेथे सुद्धा खूप पाऊस सुरू होता. शेवटी आम्ही गावात परत आलो. गोवळकोंडा बघायचा राहिलाच.
गावात आलो ते हैदराबाद आणि सिकंदराबादच्या मध्ये असलेल्या टँकबॅन्ड नावाच्या तलावावर. "टँन्कबॅन्ड ला हुसेन सागर म्हणणारा आजच हैदराबाद मध्ये आलाय असं समजावं" - इति विसुनाना :)
अतिशय मोठा तलाव हा याच्या एका बाजूला इटस्ट्रिट आहे.
मी व माझे सहकारी
त्याबाजूने येऊन झकास पावसानंतरच्या वातावरणात आम्ही कॉफी घेतली आणि बोटीने तलावाच्या मध्यातील भगवान बौद्धांच्या मूर्तीकडे निघालो.
आंध्रप्रदेशातील नागार्जुन हे बौध्दमताचे मोठे विद्वान होते आणि अमरावती (आंध्र) भागात बौध्दमताचा खूप प्रभाव होता आदी माहिती विसुनानांनी पुरवली.
येथून परत हॉटेलवर आलो थोडा आराम करून तयार झालो. आणि हैदराबादच्या मुख्य आकर्षण म्हणजे चारमिनारसाठी निघालो. जाता जाता हैदराबादची प्रसिद्ध कराची बेकरीमध्ये थांबलो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांमधून आपल्या हवी तेवढीच निवडण्याचे कठीण काम आम्ही थोड्या वेळात पार पाडले आणि निघालो.
अफजल गंज समोर निघालो तोच जुन्या शहराचा रंग दिसायला लागला. संथ झालेलं ट्रॅफिक पुढे तर बंदच व्हायला आलं. सर्वत्र रोशनाई आणि खरेदी विक्रीच्या दुकानांची जत्रा लागलेली होती. त्या गडबडीत सुद्धा विसुनाना ही मदिना बिल्डिंग आदी सांगत होतेच. ह्या झगमगत्या हैदराबादचे काही फोटो खाली देत आहे.
गर्दीतून वाट काढत काढत शेवटी आम्ही चारमिनार दिसेल एवढ्या जवळ गेलो मात्र एवढी प्रचंड गर्दी होती की त्यातून नानांची गाडी पुढे जाणार कधी हा प्रश्न पडला. शेवटी कसेबसे आम्ही रस्त्यावर आलो आणि रमजानच्या वातावरणात सहभागी झालो.
आम्ही जाई पर्यंत चारमिनार बंद झाला होता आणि चारमिनारच्या भोवतालचा बाजार ऐन भरात आला होता. निजामाच्या दवाखान्यातून मक्का मस्जीदचे फोटो घेतले
आणि पायी चालतच पिस्ता हाउस नावाच्या खास हैदराबादी हलीमच्या दुकानाकडे निघालो.
पिस्ता हाउस
हलीम हा अतिशय चवदार असा खास रमजान महिण्याचा रोजा (उपवास) सोडण्यासाठी बनवलेला पदार्थ आहे. मटण, खास मसाले ,अर्धे भरडे गहू , वेगवेगळ्या डाळी आणि भरपूर तूप असा सर्व एकत्र करुन मंद आचेवर ते दिवस भर शिजवल्या जाते आणि शेवटी भरपुर तुपासोबत वाढले जाते. अश्या अप्रतिम चवीच्या हलीम साठी आम्ही पिस्ता हाउस येथे आलो.
अतिशय मऊ, चवदार, आणि गरमागरम हलीम खाताना अस्मादिक :)
हलीम झाल्यावर कुर्बाणीका मिठा ( जर्दाळूची मिठाई) खाऊन मग परतीच्या वाटेवर निघालो. झगमगत्या बाजारात बांगड्या वगैरे घेण्यासाठी दुकांनांत डोकावलो मात्र थोड्याच वेळात हा आपला प्रांत नाही हे लक्षात येऊन काढता पाय घेतला.
एव्हाना रात्रीचे ११:०० वाजले होते तेथून हैद्राबादमधील कुर्ता खरेदी करण्यासाठी प्रसिध्द खुराणा दुकानात आम्ही गेलो. रमाजान सुरू असल्यामुळे दुकान एकदम भरात होते. तसेही खुराणा हा हैदराबाद मधील एक ब्रांड मानल्या जातो अशी माहिती विसुनानांनी पुरवली.छानसा कुर्ता घेऊन मग आमी पहाटे १ वाजता हॉटेलवर परतलो. अतिशय जड पोटाने (हलीम) आणि जड डोळ्यांनी (झोप) आम्ही आडवे झालो.
सकाळी नास्ता घरी येऊन करा असा सौ. नाईक वहिनींचा आदेश झाला. आम्ही तिघेही तयार झालो आणि नानांच्या घरी पोहोचलो. गरमागरम वडे, शिरा असा झकास नास्ता झाला आणि चहा घेत असतांना बेत ठरला तो सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी बघायचा. महाराष्ट्रातील श्री श्रीधर पाटील (IPS) हे अकादमीत असल्यामुळे लागलीच तिकडे जायचे ठरले.
भारतातील सर्वात वरिष्ठ अश्या पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही अकादमी करते. त्यामु़ळे अंतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या युध्द आणि डावपेच आदी कलांत अधिकार्यांना येथे प्रशिक्षीत केल्या जाते. आधुनिक शस्त्रे, जंगल युध्द , दंगल हाताळणी आदी.
हा अकादमीचा मुख्य प्रशिक्षण हॉल.
ही फायरिंग रेन्ज. (पिस्तुलसाठी)
हा शहरी भागातील परिस्थीती हाताळण्यासाठी प्रशिक्षण भाग (अर्बन वॉरफेअर)
या अकादमीत मोठं जंगल सुद्धा आहे त्यातील मोर वगैरे अकादमीचा आवारात वावरत असतात.
वेगवेगळ्या राज्यांनी आपल्या राज्याच्या नावाने येथे विश्रामगृह बांधलेली आहेत. अकादमीच्या मध्ये एक टेकडी आहे. त्याच्या टोकावर राजस्थान हाउस आहे. तेथून शहराचा देखावा छान दिसतो. डावी कडे पि.व्ही. नरसिंहराव उड्डानपुल दिसतो तर उजवी कडे फलकनुमा पॅलेस.
राजस्थान हाउस समोर
राजस्थान हाउस मध्ये विसुनाना
शेवटी येथून आम्ही पॅरेडाईज बिर्याणी कडे निघालो. तिन मजली पॅरेडाईज पाहून मजा आली. तसंही पॅरेडाईज नावाशी पुण्यापासूनचा स्नेह आहे ;)
येथे खास हैदराबादी चिकन बिर्याणी मागवली. नुकतीच नवी तेग फोडून आणलेली बिर्याणी अशी खुमासदार होती की नेमकं काय सांगावं? अतिशय उत्तम शिजलेली. हवा तेवढा मसाला बिर्याणीला सर्वत्र पोहोचलेला. अप्रतिम सगळंच अप्रतिम. या सर्व गडबडीत बिर्याणी संपल्यावर लक्षात आलं की आपण या बिर्याणीचा फोटो घेतलाच नाही :)
एकदम भरल्यापोटी आम्ही परत विसुनानांच्या घरी आलो. मस्त कॉफी घेत गप्पा केल्या. विसुनानांची २री मध्ये जाणारी गोड मुलगी आहे. एवढी छान बोलते आणि गाते सुद्धा छान. तिने तेलगु गितं आणि ती नुकतीच कर्नाटीक संगीत शिकत होती त्यातील गाणी म्हणून दाखवली. थोड्या वेळाने आम्ही शेरटॉन नावाच्या हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलचा मालक माझा सहकार्याच्या ओळखीचा होता. त्यामुळे पाहुणे आल्यागत स्वागत झालं आणि अद्याप बिर्याणी तळाला बसलेली सुद्धा नव्हती तर खास हलीम समोर आलं. चवदार हलीमवर ताव मारताना हॉटेल मालकाने येथील हलीम, बिर्याणी, बासमती तांदूळ आदी बाबत माहिती दिली.
आता पुरेसा अंधार झाला होता आणि निघायची वेळ जवळ आली होती. मात्र हैद्राबादला येऊन ओस्मानीया विद्यापीठाला न जाऊन कसं भागेल? स्वतंत्र तेलंगणा आंदोलणाची बिजं येथेच रोवल्या गेलेली आहेत आणि सध्या भारतात माओवाद्यांची काही शिर्ष नेते सुद्धा याच विद्यापीठातून आलेली आहेत. त्यामुळे धावता का होईना विद्यापीठातून एक चक्कर मारायला निघालो. अंधारामुळे जास्त बघता आलं नाही.
परत नक्की येईन असं ठरवत आम्ही परतलो.
विसुनाना रात्री आम्हाला परत सिकंदराबाद रेल्वेस्टेशनवर सोडायला आले. गाडी आली आम्ही चढलो आणि गेल्या ३६ तासांची ही धावती भेट आठवत झोपी गेलो.
हैदराबाद पहिल्यांदाच बघत होतो. एवढं काही बघायचं आणि गावाबद्दल काहीच कल्पना नाही. असं असतांना सुध्दा, या हैदराबादच्या भेटीतून एवढं काही बघता आलं. हैदराबादच्या खास जागा आणि खास डेलीकसी चाखता आली याचं सर्व श्रेयं विसुनानांना जातं. संपुर्णवेळ ते आमच्या सोबत होते. एवढी धावपळ आणि सतत कुठेतरी भटकत असताना त्या त्या ठिकाणाबाबत माहिती देत. आणि काही जागी तर आग्रहाने घेऊन जाऊन त्यांनी हैदराबाद दाखवले आहे. आता कराची बेकरीचे बिस्कीटं खाताना आणि आज ईदीच्या दिवशी हैदराबादी कुर्ता घालून मिरवताना विसुनानांची आठवण येते. त्यांच्यामुळे ही भेट अविस्मरणीय झाली. धन्यवाद विसुनाना. :)
प्रतिक्रिया
31 Aug 2011 - 11:38 pm | अर्धवट
हॅ हॅ हॅ.. उनू क्या बोल्ते मिया..
बरं झालं सालारजंग ला गेला नाहीत, बाकी काहि बघताच आलं नसतं. बोलके नक्को बोला मै..
आत्ता रमजान होता म्हणून ठिक आहे हलीम चारमिनार वगैरे, पण एरवी "चटनीज्" मधे जाउन याच..
आणि कराची बेकरीची खासंखास खमंग भिस्कुटे नाही होय आणलीत. (कराची बेकरी म्हणजे आपल्या सानिया मिर्झाचे 'जुने' सासर)
आणी मुख्य म्हणजे हैद्राबादी भाषा कानात भरून घेतलीत की नाही,
( पंजागुट्टा एरीयामधे ग्लासभर थंड ताक वरून बोर्नव्हिटा घालून पिलेला ) - अर्धवट
31 Aug 2011 - 11:42 pm | आनंदयात्री
क्या मिंया, हैद्राबाद घुमके आये. गोलकोंडा भी गये कैते, बिर्यानी विर्यानी खाये कैते श्रावन के महिने मे !! ऐसा कैसा चलता यांरो ? अपने सारे आदम्यो की इज्जत को बैंगन मे मिला देरे बस. क्या वो हलीम वलीम भी खाये कैकी. बेगमपेटसे पंजाकुट्टा लाँग ड्राईप पे गये कैते .. तुम तो दबाके ऐश कर्रे मिंया !!
1 Sep 2011 - 10:06 am | धमाल मुलगा
क्या बोलतें रे...
मै तो कब्बीच बोला, हलीम, बिर्यानी पार्सल ला रे करके, ये नीलस्माईलभाई सुननेकोईच नक्को बोलते रे।
खुरानासे हैद्राबादी कुर्ता ब्बी खरिदे मियां...एक कुर्ता मेरेवास्ते भी उठातें, मै क्या पैसा नै देता क्या यारों?
ऐसे कैसे दोस्त बोलते रें उनों?
नीलस्माईलभाई, सच्ची बोलू तों एकीच बात भाई..बो हलीमका फोटू देख के मै तो हौवला हो गया यारों.. अब्बी गणपती बाप्पा के टैम पे कौन हलीम खिवायेंगा करके टेन्शन आया भाई अब्बी। :)
आउर वो विसूनाना को सलाम आउर ईद मुबारकां जी। (नाना, ईदी भेजो. ;) )
31 Aug 2011 - 11:48 pm | बिपिन कार्यकर्ते
हैद्राबदची सचित्र सफर आवडली. आज इतक्या वर्षांनी विसुनानांचे दर्शन झाले! :)
1 Sep 2011 - 12:04 am | चतुरंग
सचित्र हैद्राबाद दर्शन आवडले. जबरा मज्जा केलीत की तुम्ही!
विसुनाना ह्या व्यक्तिमत्वाचेही दर्शन झाले. या निमित्ताने बर्याच दिवसानी नीलकांत लिहिता झाला याचाही आनंद झाला.
दहा वर्षांपूर्वी हैद्राबादला राहत होतो त्याच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या. हैद्राबाद मला जाम आवडले होते अजूनही आवडते. इतकं आपल्याच मस्तीत असलेलं, निवांत शहर मी दुसरं बघितलं नाहीये.
पॅराडाईज बिर्यानी तर लाजवाबच असते! पंजागुट्टा वरचं चटनीज आणि सिकंदराबाद मधलं ईस्ट स्ट्रीटच्या थोडं आतल्या बाजूला असलेलं नेस्ट ही दोन्ही हाटेले आवर्जून भेट द्यावीत अशी आहेत. जुन्या हैद्राबाद मधे गोकुल चाट सेंटर म्हणून एक प्रकार होता तिथलं चाट जबरदस्त होतं. पुढे तिथे बाँबस्फोट झाला की आग लागली असं काहीतरी होऊन ते बंद पडलं......खूप आठवणी आहेत्...नॉस्टालजिक झालो!
कुर्बानी का मीठा असं नसून खुबानी का मीठा असा शब्द आहे. जालीम लागतो हा पदार्थ!
-रंगामियां
13 Sep 2011 - 5:52 pm | रत्नागिरीकर
गोकुळ चाट चालु आहे अजुन..तिथे बाँबस्फोट झाला होता...
हैद्राबादी (चिन्मय कामत)
1 Sep 2011 - 12:07 am | शिल्पा ब
मस्त. बाकी तुम्ही बांगड्याच्या दुकानात कशाला गेला होता?
1 Sep 2011 - 12:10 am | बिपिन कार्यकर्ते
हैद्राबाद नवाब्ज नावाचा चित्रपट बघितला आहे का? त्यातही असाच बांगड्यांच्या दुकानातला सीन आहे. तशीच काहीशी भानगड असावी नीलकांतची असा मला फुल्ल डाउट आहे नीलकांतवर! ;)
1 Sep 2011 - 12:19 am | चतुरंग
उगीच गेली होती काय स्वारी हैद्राबादला रमजानचा मुहूर्त साधून?
त्यांनी तिकडे 'ईद का चांद' आधीच बघितला असणार! ;)
-रंगामियां
1 Sep 2011 - 12:57 am | चित्रा
तिकडे काचा लावलेल्या लाखेच्या बांगड्या मिळतात म्हणून गेले असतील. नववधूंना त्या घालतात असे म्हणतात. :)
पिस्ता हाऊसचा फोटो आणि वर्णन आवडले.
1 Sep 2011 - 1:14 am | बिपिन कार्यकर्ते
बघ रे भौ नीलकांत! मी काय बोल्लो नाय हां! ;)
1 Sep 2011 - 12:08 am | चिंतामणी
दोन महीन्यापुर्वी हैदराबाद भेट झाली होती. चापून खाल्लेल्या बिर्याणीच्या आठवणी जाग्या केल्यास तु.
1 Sep 2011 - 12:17 am | नीलकांत
हलीम बाबत शोधत असताना हा व्हिडीओ मिळाला.
1 Sep 2011 - 12:26 am | शुचि
छान लेख. फोटो आवडले. अपेक्षा वाढल्या आहेत :) . अजून लेख येऊ द्या.
1 Sep 2011 - 12:46 am | रेवती
रिपोर्ट वाचनाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही तिथे असताना सायबर टॉवर्स नुकतेच बांधून तयार झाले होते.
पुढल्यावेळी चटनीजमध्ये जाऊनच या.
तिथला चिरंजिवी दोसा/उत्तप्पा जो काय आहे तो नक्की ट्राय करा.
दहा वर्षांपूर्वी तरी तिथे आणि कामत या दोन्ही ठिकाणी चवदार पदार्थ मिळत असत.
नीलकांतचे जसे बांगड्यांबाबतीत झाले तसेच माझेही झाले होते.
मी तिथून एकदाही बांगड्या (माझ्यासाठी) खरेदी केल्या नाहीत.
नातेवाईकांसाठी मात्र बर्याच नेल्या. त्यानिमित्ताने मंगतराय मोतिवाल्यांची आठवणही आली.
तिथल्या प्रसिद्ध अश्या साड्या, इमिटेशन दागिने, मोत्यांचे दागिने, बांगड्या यातलं मी काहीही खरेदी केलं नाही अडीच वर्षात. रंगाच्या हापिसातल्या एकीला हे समजल्यावर तिने हे प्रकार माझ्यासाठी आणले होते.
टँकबंडची गौतम बुद्धांची मूर्ती पाहून तर हैदराबादला पुन्हा जावेसे वाटत आहे.
ती मूर्ती तिथे उभी करताना पाण्यात आडवी पडली असतानाच्या बर्याच गोष्टी पेपरमध्ये येत असत ते आठवले.
फोटू छान आलेत.
1 Sep 2011 - 1:28 am | पाषाणभेद
प्रवासवर्णन आवडले.
काही शहरे आपल्याच मस्तीत जगतात. त्यांना तथाकथित शहरीकरणाची हवा लागत नाही. हैदराबादही त्यातलेच.
आणखी काही नावे द्यायची झालीच तरः लखनौ, मीरत, थोड्याप्रमाणात इंदुर, बडोदा, बनारस आदी.
1 Sep 2011 - 1:33 am | विकास
वर्णन आणि फोटो मस्त आहेत... दोन दिवसात बरेच काही केलेले दिसतयं! :-)
1 Sep 2011 - 1:55 am | गणपा
माताय ऐन रमझान मध्ये हैद्राबादेस जाऊन आलास म्हणजे ईफ्तार दणक्यात झाला असणार. :)
बाकी बरेच दिवसानी लिहिता झालास बरे वाटले.
अवांतर : हैदाबादाची चित्रससफर आवडली. :)
1 Sep 2011 - 6:31 am | सहज
ऐन रमझान मध्ये हैद्राबादेस जाऊन आलास म्हणजे मज्जाच!!
विसुनानांना पुढल्या वेळी त्रास दिल्या जाईल :-) हैद्राबाद असेही एक आवडते शहर आहे.
सहज रेड्डी
1 Sep 2011 - 4:04 am | योगप्रभू
नीलकांत,
हैदराबाद बघावं आणि अनुभवावं तब्येतीनं. आठ दिवसाचा काळ तुम्हाला सांगितला तो अगदी बरोबर आहे. दोन दिवसांच्या शॉर्ट ट्रीपमध्ये काय काय बघणार?
हैदराबाद म्हणजे बिर्याणी हे समीकरण आहेच. पुढील ट्रीपमध्ये 'पत्थर गोश्त' खायला विसरु नका. हा एक अफलातून प्रकार आहे. दगडाची लादी विस्तवावर तापवून त्यावर मसाल्यात मुरवलेले मटणाचे तुकडे भाजतात. म्हणून त्याला 'पत्थर गोश्त' म्हणतात. हा प्रकार तुम्हाला पुण्यातही कॅम्पातील 'गोलकोंडा' हॉटेलात खाता येईल. बेहतरीन.
बाय द वे, तुम्ही बिर्याणीच्या वर्णनात नवी तेग फोडून आणलेली, असे म्हटले आहे. ती तेग नसून डेग म्हणतात. डेग म्हणजे मातीची छोटी कढईच्या आकाराची हंडी. तेग म्हणजे तलवार (तब लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की)
'चटनीज'मध्ये दोसा/इडली/मेदूवडा खाणे म्हणजे केवळ सुख. इथे जे सांबार मिळते ते दक्षिण भारतातील मोजक्या चार-पाच ठिकाणीच मिळणार्या 'ऑथेंटिक' सांबारापैकी आहे. तुम्ही म्हणाल सांबारात कसलं आलंय अस्सलपण? पण समस्त उडप्यांच्या हॉटेलांत आपण आजवर खात आलो ते सांबार किती थर्डक्लास असते, हे चटनीजमध्ये समजते.
चारमीनारजवळील लाखेवर खडयांचे जडावकाम असलेल्या बांगड्या व नेकलेस विकणारी दुकाने म्हणजे समस्त नवरे लोकांचा छळ. बायका एकदा या लाडबझार भागात घुसल्या की बोलायला नको.
उस्मानिया विद्यापीठ परिसरातील हिरवाई नजरबंद करणारी. एनटीआर गार्डन, लुंबिनी पार्क, नेहरु बोटॅनिकल गार्डन, बिर्ला मंदिर, बिर्ला सायन्स म्युझियम, गोवळकोंडा किल्ला, सिकंदराबाद, रामोजी फिल्म सिटी, स्नो वर्ल्ड, सुधा कार म्युझियम, सालारजंग म्युझियम अशी अनेक ठिकाणे मन रमवणारी आहेत. तुम्हाला पोलिस अॅकॅडमी बघायला मिळाली, हे एक प्लस.
बाय द वे, माझ्यावतीने विसुनानांना एक गोष्ट विचारणार का? इसामिया बझारमध्ये रस्त्यावर पुस्तके मांडून विकणारे बसलेले असतात. त्यांच्याकडे खूप जुनी पुस्तके असतात का?
2 Sep 2011 - 8:33 pm | नीलकांत
पुढच्या वेळी पत्थर गोश्त नक्की !
तेग नसून डेग आहे हे आलं आता लक्षात. ( हैद्राबादी शब्दा साठी दिल्लीच्या बादशहाचा शेर ... काय मोगलाई लेख झालाय हा ;)
चटनीज बद्दल वाचलेलं होतं पण दोन दिवसात फक्त चार वेळाच खाऊ शकत असल्यामुळे यावेळी व्हेज टाळावे असा पावित्रा घेतला होता. मात्र एरवी मला सांबर आवडतं, चटनीजचं सांबर एवढं चवदार असेल तर जाणे नक्कीच.
बांगड्यांच्या बाजारात एवढी रोषणाई होती की काय सांगु... मात्र तेथे आपला टिकाव लागला नाही. पुण्यातल्या तुळशीबागेत कसं एकटं गेलं की कुत्रं विचारत नाही तसा काहीसा अनुभव होता.
पुढच्या वेळी राहीलेली यादी पुर्ण करता येईल. आता या ना त्या कारणाने हैद्राबाद जात रहावं लागेलच.
- नीलकांत
13 Sep 2011 - 7:27 pm | पैसा
>> पुढच्या वेळी राहीलेली यादी पुर्ण करता येईल. आता या ना त्या कारणाने हैद्राबाद जात रहावं लागेलच.
(अभिनंदन म्हणू का?)
बाकी लेख, फोटो, आणि मधून मधून इतिहासाची माहिती सगळंच छान जमलंय!
1 Sep 2011 - 7:31 am | नंदन
हैदराबादची चित्रसफर आवडली. गोवळकोंडा आणि तिथला 'साऊंड अँड लाईट शो' पाहण्याचा सुदैवाने एकदा योग आला होता. एकदा पाहण्यासारखे नक्कीच आहे. बाकी खाण्याच्या जागांच्या यादीत योगप्रभू आणि रंगासेठनी सुचवलेल्या जागांची भर घातली आहे.
1 Sep 2011 - 8:24 am | सन्जोप राव
प्रवासवर्णन आवडले. हैदराबाद बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अवांतर: विसुनानांना किमान लोकल निवडणुकीला उभे राहाण्याचा सल्ला दिला की नाही? पायांची चौकट बांधलेला आणि किरण शांताराम यांच्याप्रमाणे आणि गालावर बोट रेललेला त्यांचा फोटो तरी बघा! आहे की नाही अजित पवार इन दी मेकिंग?
1 Sep 2011 - 11:07 am | श्रावण मोडक
अवांतरातील निरिक्षण जबरदस्त आहे. सहमत! नाना, घ्या मनावर.
1 Sep 2011 - 8:26 am | यशोधरा
नीलकांत, छान लिहिले आहेस, सचित्र सफर आवडली.
1 Sep 2011 - 9:52 am | जाई.
फोटो आणि वृत्तांत आवडला
सर्वच फोटो सुरेख आलेत
1 Sep 2011 - 10:08 am | प्रचेतस
हैद्राबादेची सचित्र सफर फारच आवडली.
1 Sep 2011 - 10:13 am | मैत्र
अतिशय मस्त शहर आहे! आणि खाण्याच्या बाबतीत तर बेष्टच... निजामी आणि दक्षिण भारतीय चवींचा तेलूगू आणि मुस्लिम संस्कृती आणि राहणीचा एक निराळाच थोडा मजेशीर मिलाफ असलेलं शहर.
मस्त चित्रसफर... पण एका बाबतीत फाऊल आहे.
सर्वोत्तम बिर्याणी ही आर टी सी क्रॉस रोड्स इथे असलेल्या (आणि आमची इतरत्र कोठेही शाखा नाही वाला अभिमान मिरवणार्या) "बावर्ची" इथेच मिळते !
त्यापुढे हैद्राबाद हाउस म्हणजे केवळ फसवणूक ! पुढच्या वेळी जरूर भेट द्या ...
हैद्राबादस्थित विसुनानांना आग्रह आहे की जर अजून बावर्ची बिर्याणीचा आनंद खरंच घेतला नसेल तर जरुर वेळ काढून जा.
चटणीज बद्दल वर अनेकांनी लिहिले आहेच. सेंट्रल जवळ नागार्जुना हिल्स इथे असलेलं वैशिष्ट्य पूर्ण आणि नेहमीचे डोसा इडली हे पदार्थ वेगळ्या चवीने खिलवणारे ठिकाण.
आंध्र प्रदेशाची खासियत असलेला पेसरट्टू आणि त्याहून उत्तम म्हणजे ज्याला काही कारणास्त्व "एम एल ए पेसरट्टू" म्हटले जाते तो मुगाचा डोसा आणि आत बटाटा भाजीच्या ऐवजी अतिशय मऊ भरपूर कांदा आणि मिरची असलेला उपमा ! चटणीज च्या पेटंट चार चटण्या आणि पाण्याइतक्या तत्परतेने अखंड भरत राहणारी गरम सांबाराची वाटी !
त्याच बरोबर तिथली एक बबई इड्ली आणि स्टीम डोसा हे पदार्थ केवळ जिभेवर ठेवताच विरघळतात !!
ओहरीज मधले हॅव मोअर चे किंवा मोझामजाही मार्केट चे फेमस चे आइस्क्रिम म्हणजे स्वर्ग सुख.. विशेषतः ओहरीज मधले टायटॅनिक !
कराची बिस्कीटे...गोकुळ चाट, ईट स्ट्रीट च्या फ्रँकीज... कुठेही मिळणारा कडक चहा ...
खुबानी किंवा कुर्बानी का मीठा चा एक लहान भाऊ -- डबल का मीठा ...
वाटतं पुन्हा एकदा निवांत जावं आणि ऑटो मध्ये बसून मियांला सांगावा... आमां आर टी सी क्रॉस रोड "होना"
1 Sep 2011 - 10:20 am | धमाल मुलगा
खरे माहितगार बोलले पहा. ;)
1 Sep 2011 - 12:07 pm | चिंतामणी
"त्या"बद्दल दोघांनिही नाही लिहीले म्हणून विचारतो.
तीथे "ते" आपल्यापेक्षा स्वस्त आहे. (आंध्र सरकारची कृपा. कर फारच कमी आहेत ना.)
1 Sep 2011 - 10:20 pm | सिद्धार्थ ४
तिथे 'ते' मला तरी महाग वाटले. एक तर Quarter ची पद्दत नाही. त्या मुळे तब्बेतीने पिणाऱ्या चे फार हाल. हां बिअर साधारण आपल्या इतकीच पडते.
1 Sep 2011 - 4:09 pm | रेवती
गोकुळ चाट
ते पुन्हा चालू झालं का?
मागल्यावेळच्या बॉम्बस्फोटात पार उध्वस्त झालं होतं म्हणतात.
2 Sep 2011 - 8:33 pm | नीलकांत
बावर्ची तसं विसुनानांनी आधीच सुचवलं होतं मात्र तेथे जाणं शक्य झालं नाही. त्यांच्या घराजवळ असल्यामुळे येताना बाहेरून पाहिलं. ते अगदी अप्रतिम आहे असं विसुनाना बोलले सुध्दा. मात्र यावेळी शक्य झालं नाही.
- नीलकांत
1 Sep 2011 - 11:06 am | इरसाल
नीलकांत,
काय हे.अहो आज गुरुवार आणि चतुर्थी .....उपवास असूनही बिर्याणी आणि हलीम पाहून तोंडचे पाणी नाही थांबवू शकलो.
बाकी हैद्राबाद सफर छान घडवलीत.
(हैद्राबादोत्सुक ) इरसाल
1 Sep 2011 - 11:22 am | तिमा
हैदराबादचे फोटो व वर्णन आवडले. तसेच इतर प्रतिक्रियांमधून खाण्याच्या ठिकाणांविषयी मौलिक माहिती मिळाली. आता मात्र हैदराबादला गेलेच पाहिजे असे वाटू लागले आहे.
1 Sep 2011 - 1:33 pm | स्मिता.
हैद्राबादचे प्रवासवर्णन छान झालेय. रमजानमध्ये गेला होतात म्हणजे तर काही बोलायलाच नको.
बाकी बिर्याणी आणि कराची बेकरीचे वर्णन वाचून तोंपासु.
1 Sep 2011 - 2:19 pm | स्पा
नील्स...
बिर्याणीचे फटू पाहून खपलोय .. चायला मजा केलीत लेको
1 Sep 2011 - 2:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा मालक व्वा...! हैदराबादचा फोटो- वृत्तांत आवडला...!
-दिलीप बिरुटे
1 Sep 2011 - 3:11 pm | मदनबाण
सुंदर लेखन... :)
1 Sep 2011 - 3:49 pm | मृत्युन्जय
झक्कास.
पण हैद्राबादेत जाउन चटणीज ला न जाणे हे म्हणजे सिंहगडावर जाउन भजी न खाण्ञासारखे आहे
1 Sep 2011 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार
चित्रमय सफर आवडली रे नीलकांता.
जरा टेप तो लगाओ उस्ताद ;)
1 Sep 2011 - 8:12 pm | प्रभो
मस्त रे नीलकांत!!
2 Sep 2011 - 6:26 am | स्पंदना
बर्याच दा वरुन (आकाशातुन पाहिल आहे) मला या शहराला वळसा घालणारी नदी कृष्णा च ना? फार आवडते.
आता वाटतय एकदा थांबायला हव होत. निदान बांगड्यांसाठी तरी,
2 Sep 2011 - 7:36 pm | योगप्रभू
अपर्णा,
हैदराबादला वळसा घालणारी नदी कृष्णा नसून 'मुसा' आहे.
2 Sep 2011 - 11:06 am | समीरसूर
नीलकांतराव,
हैदराबादी बिर्याणीसारखाच झक्कास जमून आलाय लेख. अगदी फर्मास!!
नुकतेच हलीमविषयी लोकप्रभेत वाचले होते. एकूण १२ तास लागतात म्हणे हलीम पूर्ण व्हायला. बकरीच्या मटणाला १०-११ तास मॅरिनेट करायला ठेवतात आणि मग पकवतात.
मी हैदराबादेत होतो १०-१२ दिवस. त्या वेळी चारमिनार आणि सालरजंग म्युझियम या दोनच ठिकाणी गेलो होतो. पॅराडाईजमध्ये पण गेलो होतो. मी असरानी इंटरनॅशनल नावाच्या एका हॉटेलमध्ये (सिकंदराबाद) राहिलो होतो. कामामुळे ही २-३ ठिकाणेच बघता आली. पॅराडाईज या हॉटेलपासून अगदी जवळ होते, चालात जाण्याइतक्या अंतरावर होते असे वाटते; आता ठामली आठवत नाही. जाणकारांनी कृपया खुलासा करावा.
हैदराबाद मला देखील आवडले होते. एक छान लय आहे त्या शहरात. मी जाने. २००५ मध्ये गेलो होतो. आता ६-७ वर्षात बर्यापैकी बदलले असावे.
माझ्या हैदराबाद भेटीचे दिवस या लेखाने जागवले. धन्यवाद! :-)
समीर
2 Sep 2011 - 6:54 pm | चतुरंग
महात्मा गांधी रस्त्यावरच्या असरानी इंटरनॅशनलमधून बाहेर पडल्यावर डावीकडे चालत पाचच मिनिटांच्या अंतरावर पॅराडाईज आहे.
(कधीकाळी पॅराडाईजवारी करणारा) रंगा सिकंदराबादी
2 Sep 2011 - 11:10 am | आंसमा शख्स
तुमच्या बरोबर आम्हालाही फिरवलेत.
(बिर्याणीचे) फोटो आवडले.
खुदा करो तुम्हाला असेच मनमुराद भटकायला मिळो.
2 Sep 2011 - 11:28 am | भडकमकर मास्तर
वा.... मजा आली...धावत्या भेटीचे मस्त वर्णन..
दिवाळीच्या आठवड्यात हैद्राबादेला जायचा प्ल्यान आहे....
2 Sep 2011 - 11:29 am | विसुनाना
नीलकांत, पुनरागमनायच| तुमच्यामुळेच पोलीस अॅकॅडमी पाहण्याचे भाग्य लाभले. बर्याच दिवसांनी असा भटकलो. मझा आला.
खरे म्हणजे तुम्ही आलात आणि आम्हाला हा आनंद मिळवून दिलात याबद्दल मीच तुमचा आभारी आहे.
पुन्हा एकदा - टँक बँड नव्हे - टँक बंड! तेही उच्चारात - टँक्ग्बंड! :)
@बिपीन,चतुरंग,सहज,श्रावण मोडक आणि इतर मंडळी - आता हैदराबादला या म्हणजे ओळख वाढेल. :)
@योगप्रभू , जुनी पुस्तके इसामिया बझारला मिळतात का? ते माहित नाही. पण 'अॅबिड्स' फुटपाथवर दर रविवारी नव्या/जुन्या पुस्तकांचा भरणा असतो. हल्ली दुर्मिळ पुस्तके फारशी दिसत नाहीत. मात्र चुकूनमाकून खजिन्यातली रत्ने रस्त्यावर सांडलेली दिसतात. तीन-चार तास वेळ पाहिजे.
@मैत्र, मी 'बावर्ची' पासून आठ-दहा मिनिटांच्या (पायी चालत) अंतरावर राहतो. एक बिर्यानी मारली की मी शतपावली करत घरी पोचतो. ;)
@सन्जोपरावसाहेब, तुम्ही तिकीट देत असाल तर नांदणीच्या ग्रामपंचायतीत उभा राहतो. कसें? ;)
@योगप्रभू, वेळ तर कमी पडलाच पण पोटही प्रत्येकी एकच होते याचा खेद वाटला. :)
मोरया!
2 Sep 2011 - 6:34 pm | विजुभाऊ
कुर्बाणीका मिठा ( जर्दाळूची मिठाई)
कुर्बाणीका नाही रे. खुबानीका मिठा ( खुबानी या हिंदी शब्दाचा अर्थ जर्दाळू )
आणि सिद्धीकी चे कबाब खाल्ले नाही का? तेथे एक हिरव्या फ्लोरोसंट रंगाची चटणी देतात सोबत.
पुन्हा कधी गेलास तर जरूर चाखून बघ.
आणखी कराचीवाला ची फ्रूट बिस्किटे
2 Sep 2011 - 8:37 pm | नीलकांत
तुमच्या भरभरून प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. काही दुरूस्त्यांची नोंद घेतली आहे. जसं खुबाणी का मिठा आणि डेग.
पुढच्या वेळी चटनीज नक्की.
आणि चारमिनारच्या बाजूला फारच झगमगाट होता म्हणून त्या गल्लीत डोकावलो इतकंच ;)
- नीलकांत
2 Nov 2011 - 1:03 pm | वपाडाव
हैदराबाद म्हटले की, आपण लै वेडे होतो राव.....
द बेस्ट मेट्रो इन इंड्या....
हे नॉन व्हेज लोकांसाठी झाले....
व्हेज्जी लोकांसाठी
१. आर.टी.सी. क्रॉस रोड, संध्या थेटरच्या समोरील "बावर्ची" बिर्याणी....
२. रामाक्रिश्णा थिएटर, अॅबिड्स जवळच्या "कामत" मधील स्पे. जोवार थाळी (केळीच्या पानातील).... (२००८ साली ७०/- साधी अन ९०/- विथ डेझर्ट्स) - दोन्हीही अनलिमिटेड
३. पंजागुट्ट्याचा प्रसिद्ध पुल जिथे पडला होता, त्या ठिकाणाहुन जवळ असलेले हिमालया बुक सेंटर व त्या बाजुच्या पेट्रोल पंपाच्या गल्लीतले रोटी घर (छोटे खानीच आहे) - येथे पराठे अन मटर सब्जी खासम खास....
४. गुजराती गल्ली, कोटी येथील अमृत खानावळ - इथली गुजराती थाळी लैच फेमस - (२००८ साली ५५/-)
५. प्रगती कॉलेज गल्ली, कोटी येथील प्रगती डोसा सेंटरवर मिळणारा पनीर डोसा एक नंबरी....
६. नेहरु पुतळा, GPO, अॅबिड्स हुन नामपल्लीला जाताना नाइकी/रीबॉक व नेक्स्ट शोरूमच्या मध्ये (डाव्या हाताला) रात्री ८ च्या पुढुन एक जिलेबीवाला गाडा लावुन बसतो. फक्त गरम जिलेब्या देतो......
७. कुठल्याही रस्त्याच्या कडेला ब्लॅक ग्रेप/पायनॅपल/मोसंबी ज्युस तोही १०/- इतक्या कमी किमतीत....
८. अमीरपेट येथे मैत्रीवनम कॉम्प्लेक्सच्या बाहेर १०/- मँगो ज्युस....
९. कराची बेकरी (बंजारा हिल्ल्स व मोजामजाही मार्केट) येथील फ्रूट बिस्किट्स...
१०. मोजामजाही फ्रुट मार्केट येथील (इत्ते इत्ते तो कपा थे यारों - द अंग्रेझ) फुल्ल प्लेट आइसक्रीम...
११. इलेक्ट्रिकल मार्केट, ट्रूप बाजार, अॅबिड्स मधील चाट (एका हनुमान मंदिराशेजारी आहे)...
१२. गोकुल चाट, कोटी येथील मलाइ कुल्फी....
१३. आर.टी.सी. क्रॉस रोड्स वरील कुठलंही चायनीज (ठसकेबाज)....
१४. तारनाका क्रॉस रोड्सवर, नॅशनल इंस्टिट्युट ऑफ न्युट्रिशन समोर, रस्त्याच्या कडेचे पुदीना पानी (निंबु पाणी टाईप)...
सुचना :: लिस्ट खुप मोठी आहे....याखाली उपप्रतिसाद देउ नकात... आठवेल तशी भर घालण्यात येइल....
10 Apr 2020 - 3:45 am | हस्तर
भारतातील सर्वात वरिष्ठ अश्या पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ही अकादमी करते
सेल्फ प्रोमोशन
10 Apr 2020 - 12:25 pm | चौथा कोनाडा
भन्नाट हैदराबाद भटकंती ! फोटो मस्तच !
कराची बेकरीच्या बिस्किटांची चव अफलातून आहे.
ओस्मानीया विद्यापीठाचा उल्लेख वाचून अंमळ हळवा झालो.
माझे वडील इथे १९७०-७२ मध्ये इंग्लिश विभागात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होते.
त्यांचे आणि विद्यापीठातील सहकाऱ्यांचे विद्यापीठाच्या रम्य परिसरातील दोनचार फोटो अल्बम मध्ये आहेत.
10 Apr 2020 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत म्हणजे चक्क मिपाचे मालक लिहितात वगैरे हे वाचून त्या आठवणींनी डोळे भरुन आले.
-दिलीप बिरुटे
10 Apr 2020 - 2:43 pm | वामन देशमुख
माझा फेवरीट धागा वर आलाय!
10 Apr 2020 - 7:41 pm | सतिश गावडे
हैदराबाद हे एकदा तरी पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे शहर आहे.
10 Apr 2020 - 7:54 pm | प्रचेतस
तुम्ही गचीबावली परिसरात होतात म्हणे?
10 Apr 2020 - 8:05 pm | सतिश गावडे
होय. तरीही मुख्य शहर आणि जवळपासची प्रेक्षणिय स्थळे पाहीली. हिंजवडीला राहणारे महाराष्ट्राबाहेरील आयटीवाले जसे पुण्यात शनिवार वाडा पाहतात आणि दगडु शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतात तसे. :)
10 Apr 2020 - 8:09 pm | प्रचेतस
सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेका अप्रतिम आहे.