अल्बर्ट स्पिअर - भाग १
अल्बर्ट स्पिअर - भाग २
अल्बर्ट स्पिअर - भाग ३
फिल्ड मार्शल मिल्चने अल्बर्ट स्पीअरची नेमणूक झाल्यावर सर्व संबंधित मंत्र्यांची व उद्योगपतींची एक मोठी बैठक बोलावली. त्यात या मंत्रालयाचे अर्थखाते सांभाळण्यास एक माणूस लागेल असे मत मांडण्यात आले. त्यानंतर याच सभेमधे अर्थमंत्री फूंक याने त्याच्या भाषणात म्हटले “ आपल्याला असा एक माणूस हवा आहे की ज्याचे उद्योग जगताशी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राईश मार्शल गोअरींगशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. असा माणूस असेल तर आपल्याला निधीची कधीच वानवा पडणार नाही. मला वाटते फिल्ड मार्शल मिल्चशिवाय हे काम कोणी करू शकेल ?”
अल्बर्ट स्पीअर काही दुधखुळा नव्हता. त्याच्या लगेचच लक्षात आले की हे सगळे अगोदरच ठरलेले आहे. तो लगेचच मिल्चच्या कानात कुजबुजला “ फ्युररने निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्या सगळ्यांशी बोलायची इच्छा व्यक्त केली आहे. ते आपली वाटच बघत आहेत” हे ऐकल्यावर मिल्च सुतासारखा सरळ झाला आणि तसे त्याने सभेला सांगितले. जर्मनीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात एखाद्या मंत्र्याची ओळख फ्युररने करून द्यायची अशी घटना पहिल्यांदाच घडत होती. पुढच्या सभेत हिटलरने सर्वांना ताकद दिली “ या माणसाशी सभ्यपणे वागा ! याने हे पद स्विकारून फार मोठा त्याग केला आहे” (ज्याच्यात रस आहे ते क्षेत्र सोडून ). त्यानंतर मात्र अल्बर्ट स्पीअरच्या विरूद्ध जायचे कोणाच्या स्वप्नातही आले नाही. अर्थात एक प्रसंग सोडून. एक दिवस, राईश मार्शल गोअरींगने अल्बर्ट स्पीअरला भेटीस बोलावले. त्याच्या कार्यालयात, त्याच्या भल्यामोठ्या टेबलावर ही भेट झाली. गोअरींगने अल्बर्ट स्पीअरच्या अंगावर एक फाईल फेकली आणि तो म्हणाला “ हा अहवाल वाच. त्यात तुझी काहीच चूक नाही. माझीच माणसे मूर्ख आहेत ज्यांनी तुझ्या ताटाखालचे मांजर होण्याची मान्यता दिली आहे. आता मला यांनी अहवाल पाठवला आहे की आता माझ्या चौवार्षिक अर्थ योजनेचे बारा वाजणार आहेत आणि त्याला जबाबदार आहेस तू.” हे बोलत असताना त्याच्या अवाढव्य शरीराला न शोभणार्या चपळतेने त्याने त्याच्या खुर्चीवरून उडी मारली आणि तो अत्यंत रागाने येरझारा मारायला लागला. प्रत्येक पावलागणिक त्याचा राग वाढतच होता “मी उद्याच फ्युररकडे जाऊन माझ्या सर्व पदांचा राजीनामा देणार आहे. नकोच मला हे सगळे !” शिव्या देताना तो देत होता त्याच्या माणसांना, पण त्याचा रोख होता अल्बर्ट स्पीअरवरच. पण ज्याअर्थी तो अल्बर्ट स्पीअरचे नाव उघडपणे घेत नव्हता त्याचा अर्थ अल्बर्ट स्पीअरने बरोबर घेतला. “ त्याचा आत्मविश्वास डळमळीत होता”.
खरे तर गोअरींग गेला असता तर तसे फार मोठे नुकसान होणार नव्हतेच. त्याने ज्या धडाडीने चौवार्षिक योजनांचा धडाका उडविला होता, ४ वर्षांनंतर त्या सगळ्याचा बोजवारा उडून त्या योजनांच्या अंमलबजावणीला फार महत्व उरले नव्हते. पण गोअरींगचा अहंकार जर सांभाळला असता तर हे प्रकरण तसे हाताळायला सोपे जाणार होते हे लक्षात येताच, अल्बर्ट स्पीअरने त्याच्या डावपेचांची पुढील आखणी केली.
तीन दिवसानंतर, तो गोअरींगला भेटायला गेला आणि त्याने त्याच्या टेबलावर एक फाईल ठेवली. त्या फाईलचे नाव होते “ चौवार्षिक योजनेअंतर्गत होणारे यंत्रसामुग्री उत्पादन खात्याचे काम”. फाईलमधे एका कराराचा मसूदा होता. त्या करारामधे अल्बर्ट स्पीअरला चौवार्षिक योजनेअंतर्गत काम करणार्या यंत्रसामुग्री उत्पादन खात्याचा प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आल्याचे नेमणूकपत्र व अधिकारपत्र असे दोन महत्वाचे कागद होते. या पत्रात अल्बर्ट स्पीअरला चौवार्षिक योजनेमधून शस्त्रास्त्रे उत्पादन खात्यासाठी कितीही पैसे काढण्याची मुभा दिली होती. . जे अधिकार त्याला अगोदर होते, त्यापेक्षा कितीतरी जास्त अधिकार आता त्याला मिळाले होते. गोअरींगने आनंदाने या करारावर आणि त्या पत्रांवर सह्या केल्या.
दुसर्याच महिन्यात त्याने उद्योगजगतातील प्रमुख ५० उद्योजकांची हिटलर आणि गोअरींगच्या उपस्थितीत एक सभा घेतली ज्यात अल्बर्ट स्पीअरने अगदी मुद्देसूद भाषण करून त्या उद्योजकांकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट केले. गोअरिंगने एक भलेमोठे लांबलचक कंटाळवाणे भाषण ठोकले ज्यात त्याने चांगल्या शस्त्रास्त्रांचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ही सभा झाल्यावर गोअरिंग अल्बर्ट स्पीअरच्या फारसा वाटेला गेला नाही असे म्हटले तरी चालेल, कारण तो एक आळशी माणूस होता आणि त्याने हावरटासारख्या अनेक जबाबदार्या स्वत:वर लादून घेतल्या होत्या. जसे त्याचे अल्बर्ट स्पीअरवरचे लक्ष कमी होत गेले, तसे अल्बर्ट स्पीअरने अजून एक चाल खेळली. त्याने हिटलरकडून अजून एक आज्ञापत्र मिळवले त्यात आता उत्पादन खाते हे युद्ध जिंकण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यांच्या सर्व गरजा अगोदर भागवा असे अर्थखात्याला सांगण्यात आले. अर्थखाते आता उत्पादन खात्याच्या अंतर्गत काम करणार होते असे म्हणायला हरकत नाही ! हे झाल्यावर अल्बर्ट स्पीअरच्या हातात अमर्याद सत्ता आणि पैसे आले.
लवकरच अल्बर्ट स्पीअरने सर्व कारखान्यांमधे एक समान उत्पादन धोरण राबवले. व्यवस्थापनाची जी तत्वे त्याने वापरली त्यामुळेच हे उत्पादन चौपट होऊ शकले. ही तत्वे त्याची नव्हती तर डॉ. टॉडने अंमलात आणली होती आणि डॉ. टॉडने या कल्पना उचलल्या होत्या जर्मनीच्या एक ज्यु अर्थशास्त्रज्ञ वाल्थर रेथान्यू याच्याकडून. (हा पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीचा अर्थमंत्री होता). स्पिअरने प्रत्येक प्रकारच्या शस्त्रासाठी एक अशा १३/१४ समित्या तयार केल्या आणि प्रत्येक समितीला एक अशी पुरवठसमिती नेमली. प्रत्येक समितीला फौजेतील तज्ञ जोडले होते आणि त्यांना ग्राहकाची वागणूक द्यायची अशा सक्त सूचना दिल्या गेल्या होत्या. म्हणजे एक समिती, एक कारखाना, त्यात एकाच प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन,एक ग्राहक, एक पुरवठासमिती असा एक कार्यक्षम गट तयार झाला आणि अशा १४ गटांनी उत्पादनाचे आश्चर्यजनक आकडे नोंदवले. अल्बर्ट स्पीअरने दुसरी सुधारणा केली ती म्हणजे प्रत्येक गटाला उत्पादन विक्रीची हमी. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की जे उत्पादन गरजेप्रमाणे गावखात्यातील उत्पादनासारखे होत होते ते बंद होऊन ते एखाद्या औद्योगिक उत्पादनासारखे प्रचंड प्रमाणात व्हायला लागले आणि त्या काळात त्याचीच गरज होती. सर्व उद्योजकांना त्यांच्या गोपनीय माहितीची काळजी वाटत असे कारण ती त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यालाही द्यायला लागायची. अल्बर्ट स्पीअरला त्यांना हे पटवण्यात यश आले की सगळे तात्पुरते आहे.
या सगळ्या गटातून १० ते १५ हजार माणसे प्रत्यक्ष काम करत होती तर अल्बर्ट स्पीअरच्या कार्यालयात काम करत होती फक्त २००. अल्बर्ट स्पीअरने नोकरशाहीवर चांगलाच अंकुश ठेवला होता. कागदी घोडे नाचावायला त्याच्या राज्यात बंदी होती. आणि गेस्टापोपासून सगळ्या कर्मचार्यांना संरक्षण होते. दुसरी सुधारणा त्याने केली ती माहिती संकलनात. पहिल्यांदा प्रत्येक अधिकारी हा त्याच्या मंत्र्याला ही माहिती द्यायचा. तो त्याला चाळणी लावून उरलेली अल्बर्ट स्पीअरकडे पाठवायचा. त्याने ते बंद करून ती सर्व माहिती एकदम त्याच्याकडेच पाठवण्याचा आदेश काढला. याचा फायदा असा झाला की माहिती त्याच्याकडे वेळ न दवडता येऊ लागली आणि त्यातील कुठली महत्वाची आहे हे तो स्वत: ठरवू लागला.
या व अशा अनेक सुधारणांचे फळ लवकरच दिसायला लागले. पहिल्या सहा महिन्यात तोफांचे उत्पादन २७ % ने वाढले तर रणगाड्यांचे २५ टक्क्याने. दारूगोळ्याच्या उत्पादनाने तर उच्चांक प्रस्थापित केला. त्यात भरघोस ९७ टक्के वाढ झाली. सगळी मिळून ५७ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १९४१ ते १९४४ पर्यंत उत्पादनाचा निर्देशांक ९८ पासून ३२२ एवढा वर गेला. २० जुलै १९४४ रोजी जो हिटलरची हत्या करायचा कट आणि प्रयत्न झाला त्यानंतर नाझी पक्षातले आणि पक्षाबाहेरचे असे गट पडू लागले. या संधीचा फायदा उठवून बोरमन, गोबेल्स इत्यादि मंडळींनी अल्बर्ट स्पीअरच्या वर्चस्वाला सुरूंग लावायचा आटोकाट प्रयत्न आरंभला. अल्बर्ट स्पीअरने तत्परतेने हिटलरला पत्राने हे त्याला मान्य नसल्याचे कळवले व अशीही मागणी केली की त्याच्या कार्यालयात व एकंदरीत त्या सगळ्या गटात जे कोणी आहेत त्यांना गेस्टापोंच्या चौकशीपासून संरक्षण देण्यात यावे. तेही लगेचच मंजूर करण्यात आले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एवढे सगळे करूनही जर्मनीला पहिल्या महायुद्धाच्या काळातील उत्पादनाचे आकडे गाठता आले नाहीत. त्याची कारणेही अल्बर्ट स्पीअरने शोधून हिटलरला कळविली. त्यात प्रमुख कारण होते “परंपरावादी नोकरशाही, जी कागद तयार करण्यात धन्यता मानत होती.” अल्बर्ट स्पीअरने हिटलरला स्पष्ट कळविले होते की “अमेरिकेमधे जे वातावरण आहे ते उत्पादकतेला अत्यंत पोषक असे आहे. आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तेथील उत्पादनव्यवस्था (सिस्टीम) ही अत्यंत साधी आणि सुटसुटीत आहे.”
१९४२ मधे जेव्हा रशियाच्या आघाडीवर जर्मन सेना फसल्या तेव्हा अल्बर्ट स्पीअरने राखीव फौजा हलवाव्यात असा आग्रह धरला. होता कारण त्याने रशियाच्या आघाडीवरचे थंडीतले धोके ओळखले होते. त्याने एका बैठकीत म्हटले “ रशियाच्या आघाडीवरचे युद्ध आपण ऑक्टोबरच्या आतच जिंकले पाहिजे. तसे झाले नाही तर आपला पराभव निश्चित आहे. आपल्याकडे जी शस्त्रास्त्रे आहेत ती वापरूनच हे युद्ध जिंकले पाहिजे. उद्या आम्ही हे अस्त्र आणू आणि वापरू या कल्पना विसरायला हव्यात”. ही चर्चा कशी कोणास ठावूक लंडन टाईम्सच्या हाती लागली आणि ती त्यांनी छापली.
ही सगळी परिस्थिती पाहता अल्बर्ट स्पीअरने हिटलरकडून सर्व बांधकामे थांबवण्याचे आज्ञापत्र घेऊन ते जारी केले. पण फक्त ९ वर्षाच्या राजवटीत भ्रष्टाचार इतका बोकाळला होता की, मंत्रिमंडळातील सर्व मत्र्यांनी हिटलरची खास परवानगी काढून त्यांची भव्य बांधकामे चालू ठेवली होती. त्यात हिटलरही होता. त्याने तो जाईल तेथे बंकर बांधण्याचा धडाकाच लावला होता. घाबरून त्याच्या बंकरच्या छताची जाडी आता वाढत वाढत १६.५ फूट झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून कारखान्यातील कामगारांची संख्या लक्षणीय कमी झाली. ही तक्रार जेव्हा हिटलरच्या कानावर गेली तेव्हा त्याने अल्बर्ट स्पीअरला त्याच्या मुख्यालयात बोलावून घेतले. व सांगितले “ आपल्या ताब्यातील भूभागावर २.५ कोटी लोक राहतात आणि त्यातील प्रत्येक जण आपल्यासाठी काम करू शकतो.” थोडक्यात अल्बर्ट स्पीअरला असे सांगण्यात आले होते की तुम्ही जिंकलेल्या देशातून कामगार पकडून, त्या गुलामांकडून काम करून घ्या. आणि इथेच अल्बर्ट स्पीअरचा घात झाला – त्याच्यावर चालवलेल्या खटल्यात हा महत्वाचा आरोप होता हे आपल्याला माहितच आहे.
जर्मनीचा अणूबॉंब.......... डॉ. हायझेनबर्ग व अल्बर्ट स्पिअर...............
यासाठी पुढचा भाग वाचावा लागेल..... :-)
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
7 Aug 2011 - 1:35 am | अर्धवटराव
मग पुढे काय झालं ??
(हावरट) अर्धवटराव
7 Aug 2011 - 11:01 am | प्रास
वाचावेच लागेल..... पुन्हा पुन्हा आणि पुढच्या भागांच्या ओढीने पुन्हा पुन्हा वाचावेच लागेल.
पुलेप्र.
फ्यान -
7 Aug 2011 - 3:44 pm | पल्लवी
>>> घाबरून त्याच्या बंकरच्या छताची जाडी आता वाढत वाढत १६.५ फूट झाली होती.
!!!!
लेखन आवडले.
7 Aug 2011 - 4:51 pm | जयंत कुलकर्णी
ते ठीक आहे पण एवढे सविस्तर लिहीत बसलो तर हिटलरच्या बाकी जनरलस् बद्द्ल केंव्हा लिहिणार मी, असं क्षणभर वाटून गेले खरे !
7 Aug 2011 - 5:08 pm | यकु
लेखन विषयाची व्याप्ती पाहाता जयंतरावांना फार लिहावं लागणार हे दिसतंय..
तुम्ही लिहा..आम्ही वाचायल तयार आहोत.. हिटलर किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल एवढ्या सखोल गोष्टी कधीही वाचनात आलेल्या नाहीत.
7 Aug 2011 - 6:00 pm | पल्लवी
सहमत आहे.
नाझी भस्मासुराचा उदयास्त वगैरे पुस्तकांतून माहिती मिळते खरी, पण ती मुख्यत्वेकरून दुसर्या महायुद्धाबाबत. हिटलरच्या निकट मंडळींबद्दल तसे फार त्रोटक लिखाण उपलब्ध आहेसे वाटते. ती महिती इथे सहज मिळत असल्याने मजा येतेय वाचायला..
तुम्हाला फार लिहावे लागणार हे खरंय पण..दिल मांगे मोअर..
सो, प्लीज कंटीन्यु ! :)
7 Aug 2011 - 7:12 pm | प्रास
जयंतराव,
खरं म्हणजे शक्य झालं तर तुमचा लेखनिक व्हायलाही आवडलं असतं बघा......
तुम्हाला फारच विस्तारपूर्वक लिहायला लागणार आहे हे मान्य. आमच्या आवडीसाठी तुम्हाला त्रास होईल, पण गोड मानून घ्या. नाहीतरी ही असली उत्तम माहिती कोण इतक्या छानप्रकारे सांगेल आम्हाला मायमराठीत?
तुमचा फ्यान :-)
7 Aug 2011 - 6:03 pm | स्वाती दिनेश
लेखमालिका वाचत आहे, मागे सांगितल्याप्रमाणेच.. आवडते आहे.
स्वाती
8 Aug 2011 - 3:21 pm | किसन शिंदे
नेहमीप्रमाणेच पुढे वाचण्यास उत्सूक..
9 Aug 2011 - 1:51 am | आनंदयात्री
छान. लेखमाला अत्यंत उत्कंठावर्धक आहे, पुढला भाग वाचण्यास उत्सुक आहे.