व्यावसायिक कामानिमीत्त काही दिवसांसाठी मध्यपुर्वेला सौदी अरेबिया ह्या वाळवंटी आणि खर्या‘ अर्थाने रूक्ष (dry) देशात जावे लागत असल्याने कॉकटेल लाउंज मालिकेत व्यत्यय येणार आहे.:( आंतरजालावरून इमेज गोळा करून नविन कॉकटेल्स मालिकेत टाकण्यात काही मजा नाही आणि इच्छाही नाही, पण मलिकेत खंड पडू नये अशी इच्छा जबर असल्यामुळॆ काय लिहावे असा विचार करीत असता जाणवले की एशिया मधे सर्व ड्रिंक्स मधे व्हिस्की जास्त प्रमाणात घेतली जाते. मग व्हिस्कीवर काहीतरी लिहावे से मनात आले म्हणून हा धागा ह्या मलिकेत टाकत आहे.
डिस्क्लेमर: माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी खरडत आहे, चूकभुल देणे घेणे आणि हलकल्लोळ न माजवता दुरुस्ती सुचवणे. :)
प्रथम सुरुवात करुया व्हिस्कीच्या स्पेलिंगने. व्हिस्कीची दोन स्पेलिंग्स आहेत, 1. Whisky and 2.Whiskey.
1. Whisky : स्कॉच, कॅनेडीअन आणि जापनीज व्हिस्की ह्या स्पेलिंगने लिहितात.
2. Whiskey : अमेरिकन आणि आयरिश व्हिस्कीचे स्पेलिंग असे लिहीतात.
हे अमेरिकन सर्व गोष्टी जगाच्या उलट करण्यात का धन्याता मानतात कोण जाणे. बघा ना, वीजेचे स्वीच उलटे, रस्त्यावर गाड्या उलटया बाजूने, सेXX...…जाउदे विषयांतर होतेय हे चाणाक्ष वाचाकांनी जाणाले असेलच ;)
आइशप्पथ, ‘चाणाक्ष वाचाकांनी’ हे असे लिहीण्याची कितीतरी वर्षांपासुनची सुप्त इच्छा आज पुर्ण करून घेतली, ह्याला म्हणतात मौके पे चौका :) असो मुळ विषयाकडे वळुयात.
ढोबळ मानाने व्हिस्कीचे दोन प्रकार मोडतात 1. सिंगल मॉल्ट व्हिस्की 2. ब्लेन्डेड व्हिस्की
आता म्हणाल की ही ‘मॉल्ट’ काय भानग़ड काय आहे? पण तीच तर खरी गंमत आहे. व्हिस्कीचे मूळ ह्या मॉल्ट मधेच दडलेले आहे. पाण्यात कडधान्य भिजवून त्याला मोड आणायचे आणि ते भट्टीत (Kiln) भाजून सुकवयचे. ह्या प्रक्रियेनंतर त्या बिचार्या् कडधान्याचे जे काही होते त्याला मॉल्ट म्हणतात. जे प्रतिथयश ब्रॅन्ड्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या भट्ट्या ही त्यांची खासिअत असते. व्हिस्कीची चव खुपशी ह्या भट्टीवर पण अवलंबून असते.
बर आता कडधान्य असे वाचल्यावर सर्व शाकाहारी वाचकांच्या चेहेर्यामवर आलेली चमक मला दिसतेय. होय व्हिस्की पुर्ण शाकाहारी आहे :P व्हिस्की प्रामुख्याने जवस, नाचणी आणि मका ह्या कडधान्यांपासुन बनवतात. वापरलेल्या कडधान्यामुळे आणखीन पोट्प्रकार पडतात ते पुढे येतीलच.
तर सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे डिस्टील केलेली हुच्च दर्जाची व्हिस्की. सर्व काही ‘एकच’ असल्यामुळॆ बनवन्याची प्रक्रिया महाग होते म्हणुन सिंगल मॉल्ट व्हिस्की बरीच महाग असते (आता हे विधान व्यक्तीसापेक्ष असु शकेल, पण माझ्यासारख्याला महागच)
तरीही ग्लेन फिडिच हा माझा आवडता ब्रॅंड काट्कसर करून माझ्या मीनीबार मधे विरजमान झालेला आहे हे जाता जाता येथे नमूद करतो. (कसलं साहित्यिक झाल्यासारख वाटतय आज, आहाहा)
रूम टेंपरेचरची सिंगल मॉल्ट ऑन दि रॉक्स न घेणार्याखचे ह्या भूतलावर जन्म घेणे फुकट आहे. जर त्यात थोडे ‘ड्राय व्हर्मूथ’ टाकले तर ते पिण्यात जे सुख आहे त्याची तुलना केवळ, इंद्राच्या दरबारात बसून वारूणी पिणार्या गंधर्वाच्या सुखाशीच होउ शकते. O:)
ब्लेन्डेड व्हिस्की ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड कडधान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या कडधान्यां प्रत वेगवेगळी असते/असू शकते. तसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेलया दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही जानेमाने ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
आता कडधान्यामुळे पडणारे पोटप्रकार बघुयात
स्कॉच व्हिस्की (जवस): स्क़ॉट्लंड मधे तयार होणार्या व्हिस्कीला स्कॉच व्हिस्की म्हणतात. उच्च दर्जाची जवस आणि स्प्रिंग वॉटर हे ही व्हिस्की बनवण्यासाठी अत्यावश्यक असते. मॉल्ट तयार करताना मोड आलेले कड्धान्य भाजण्यासाठी peat ह्या प्रकारच्या कोळश्याचा धूर (स्मोक) वापरला जातो आणि तेच असते ह्या स्कॉचच्या हुच्च दर्जेदार चवीच्या यशाचे गमक. स्कॉचमधे पाणि घालून पिणारे पीओत बापडे मला मात्र ऑन दि रॉक्सच आवडते.
आरयरिश व्हिस्की (मीक्स / ब्लेन्ड): आयर्लंड मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे आरयरिश व्हिस्की. आयरिश लोकांचे म्हणणॆ आहे कि स्कॉटिश लोकांनी व्हिस्की ‘प्यायला’ सुरुवात करण्याआधिपासून ते व्हिस्की ‘तयार’ करीत होते. ही व्हिस्की मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड कडधान्यांच्या मिश्रणापासून (Pure-pot still) तयार केली जाते आणि ती ट्रिपल डिस्टील्ड असते. ह्या व्हिस्कीच्या मॉल्ट प्रक्रियेमधे कोळश्याचा धूर वापरला जात नाही त्यामुळे ह्या व्हिस्कीची चव स्कॉचच्या चवी पेक्षा वेगळी असते.
कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की (नाचणी): कॅनडामधे मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की. ही व्हिस्की Rye म्हणजे नाचणी पासून बनवितात. कॉकटेल जगतात ही व्हिस्की, व्हिस्की बेस्ड कॉकटेल बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरतात. ‘क्राउन रोयाल’ हा एक कॅनडीअन व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅन्ड आहे. (प्रख्यात अश्यासाठी की तो माझ्या मीनीबार मधे दाखल आहे ;) )
बर्बन व्हिस्की (मका): अमेरिकेत तयार होणार्या व्हिस्कीला बर्बन व्हिस्की असे म्हणतात. ह्या व्हिस्की तयार करण्यास 51% मका वापरतात. ही व्हिस्की प्रामुख्याने Tennessee आणि Kentucky ह्या स्टेट्स मधे बनवली जाते. मक्यामुळे ही चवीला थोडी गोड असते. जॅक डॅनीअल्स हा ह्या व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅंड आहे.
जापनीज व्हिस्की: जपान हा टॉप 5 देशांपैकी व्हिस्की उत्पादक देश बनला आहे. जपानमधी ‘Santory’ ही डिस्टीलरी व्हिस्की बनवते. जापनीज व्हिस्की ही स्कॉच व्हिस्की किंवा आयरीश व्हिस्की बनवन्याच्या पद्ध्तीने बनवली जाते.
भारतीय व्हिस्की (ज्वारी आणि साखरेची मळी): भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. आद्य दारू उत्पादक, लिकरकिंग, माननीय विजय माल्या ह्यांचा मॅक्डोवेल्स नं 1 हा ब्रॅंड हा तमाम भारतीयंचा आवडता ब्रॅंड समजला जातो.
माननीय कृषिमंत्री ह्यांच्या कृपेने भारत व्हिस्की उत्पादनात आघाडी मारेल अशी चिन्हे दिसत आहेत, पण हे लोकशाहीतील विरोधक म्हणजे ना, ह्यांना मेले जरा काही चांगले म्हणुन झालेले बघवतच नाही.
अश्याप्रकारे ही व्हिस्कीची गाथा इथेच संपवतो.
नोट:
1. ह्या व्हिस्कीमय धाग्यातल्या सुद्धलेखणातल्या आणि व्याकरनातल्या चुका तपासणार्यांना ऑन दि रॉक्स बुडवण्यात आले आहे म्हणजेच फाट्यावर मारण्यात आले आहे.
2. कोणाला हातभट्टीच्या व्हिस्कीची रेसीपी हवी असल्यास व्यनीतुन कळविणे म्हणजे ताकालाही जाता येइल आणि भांडेही लपवता येइल :)
प्रतिक्रिया
5 Jul 2011 - 2:58 pm | सुनील
माहितीपूर्ण लेख!
1. Whisky : स्कॉच, कॅनेडीअन, जापनीज आणि आयरिश व्हिस्की ह्या स्पेलिंगने लिहितात.
2. Whiskey : अमेरिकन व्हिस्कीचे स्पेलिंग असे लिहीतात.
येथे किंचित सुधारणा.
आयरिश व्हिस्कीचे स्पेलिंगदेखिल Whiskey असेच होते (फक्त अमेरिकनच नव्हे).
याबाबतीतील एक "अंगठ्याचा नियम" - ज्या देशांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये "E" हे अक्षर आहे, त्या देशांत व्हिस्कीच्या स्पेलिंगमध्ये "E" लावला जातो. जसे की, United States, Ireland इत्यादी.
आणि ज्या देशांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये "E" हे अक्षर नाही, त्या देशांत व्हिस्कीच्या स्पेलिंगमध्ये "E" लावला जात नाही. जसे की, Canada, Scotland.
नियमास अपवाद - England!!!
असेच अजून लेख येऊद्यात...
5 Jul 2011 - 3:02 pm | सोत्रि
सुनील,
दुरुस्तीबद्दल धन्यावाद !
- सोकाजी
5 Jul 2011 - 3:19 pm | गवि
बाय द वे.. डब्लू या अक्षराला आयकाओ (International Civil Aviation Organization (ICAO)) फोनेटिक कन्वेन्शननुसार जोडलेला शब्द व्हिस्की (. _ _ ) हाच आहे.
अल्फा, ब्राव्हो, चार्ली, डेल्टा, ईको, फॉक्सट्रॉट, गोल्फ, हॉटेल, इंडिया, ज्युलिएट्.....टँगो, युनिफॉर्म, व्हिक्टर, व्हिस्की, एक्सरे, यँकी, झुलू..
डब्लूवाले बरेच शब्द असूनही हा निवडला गेला.. तेव्हा मानाचा शब्द आहे हा... :)
माहिती उत्तम..
5 Jul 2011 - 3:27 pm | सोत्रि
गविजी,
ICAO च्या महितीबद्दल धन्यावाद.
>> डब्लूवाले बरेच शब्द असूनही हा निवडला गेला.. तेव्हा मानाचा शब्द आहे हा</em>
+10000
5 Jul 2011 - 3:30 pm | सहज
फटकेबाजी व माहिती उत्तम मिलाफ!
अजुन येउ द्या!
5 Jul 2011 - 3:36 pm | स्पा
हे वाचून घश्याला कोरड पडल्या आहे ;)
5 Jul 2011 - 3:37 pm | कवटी
सुंदर माहितीपुर्ण लेख.
आवडला.
अवांतरः पुर्वी मिपावर सिंगलमाल्टची माहिती नव्हे तर दीक्षा दिली जायची ते आठवले.
--कवटी दीक्षित
5 Jul 2011 - 3:42 pm | गणपा
ज्ञाणात भर पाडल्या बद्दल मंडळ आभारी आहे. :)
और भी आंदो.
5 Jul 2011 - 3:48 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय उत्तम लेखन.. मिपावरील दर्जेदार लेखनपैकी एक.
-
(ब्रँड: ब्लेन्डर्स प्राईड) इंट्या दारुडा.
5 Jul 2011 - 4:29 pm | माझीही शॅम्पेन
+ १
*****सिंगल /ब्लेन्डेड असा वाद उपस्थित करुन करुन व्हिस्कीच्या आनंदला धुसर छेद देण्याचा प्रयत्न करु नये. सिंगल किंवा ब्लेन्डेड असणं ही एक सोय आहे, 'आयडेंटीटी' नाही.****
जॅक-डी पिंट्या !!! :)
5 Jul 2011 - 6:52 pm | सोत्रि
>> सिंगल किंवा ब्लेन्डेड असणं ही एक सोय आहे, 'आयडेंटीटी' नाही.****
असहमत,
तुमच्या सहीतला गमतीचा भाग सोडला तर,
ती 'आयडेंटीटीच' आहे, सोय अजिबात असूच शकत नाही.
- (ब्लेन्डेड) सोकजी
5 Jul 2011 - 3:52 pm | अभिज्ञ
आमच्या अतिशय आवडत्या पेयाबद्दलचा हा लेख अतिशय आवडला.
अभिज्ञ.
5 Jul 2011 - 3:55 pm | गवि
+१..
अत्यंत आवडते. मुख्य म्हणजे इफेक्टिव्ह असते.. (आमचे रॉयल च्यालेंज)
फक्त या पेयाचा नंतर (तीन चार तासांनंतर किंवा पुढच्या सकाळी) होणारा त्रास हा बकार्डी व्हाईट रम, व्होडका अशा श्वेतपेयांपेक्षा जास्त असतो अशी खात्री झाली आहे. कारण कळले नाही.
5 Jul 2011 - 4:19 pm | योगेश गाडगीळ
व्हिस्कीच नव्हे, तर कुठलंही अल्कोहोलिक बेव्हरेज तयार करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही अल्कोहोल तयार करणा-या सूक्ष्मजीवांची असते. कुठला सूक्ष्मजीव वापरला आहे, ह्यावर खूपच काही अवलंबून असतं.
व्हिस्कीसाठी 'सेरेयल' (खायला वापरतात त्या) जातीचं काहीही वापरता येतं. ह्या प्रकारच्या धान्यांमधे 'स्टारच' असतो, जो थेट आंबवता येत नाही (फर्मेन्ट करता येत नाही). तो 'सॅक्करिफाय' करावा लागतो. स्टार्च हा एक पॉलिमर आहे प्लास्टिकसारखा. एकापाठोपाठ एक लागलेल्या ग्लुकोजच्या रेणूंच्या प्रचंड साखळ्या म्हणजे स्टार्च. हा पॉलिमर 'फाडण्यासाठी' एक एन्झाईम आवश्यक असतं: 'अमायलेज'. माल्ट केलेल्या धान्यांमधून-विशेषतः बार्ले ह्या धान्यातून हे मिळतं, आणि स्टार्च स्प्लिट होउन ग्लुकोजचे कण तयार होतात.
मग ऑक्सिजन संपर्क येऊ न देता हे मिश्रण आंबवलं जातं, आणि ते डिस्टिल करून-गाळून व्हिस्की मिळते.
ब्रेडचं मिश्रण फुगवण्यासाठी यीस्ट वापरतात. त्याच प्रकारचं, पण वेगळ्या जातीचं यीस्ट हे व्शिकी तयार होण्यासाठी कारणीभूत असतं. बीअर, वाईन आणि व्होडका सुद्धा यीस्टच फर्मेन्ट करतात.
पेयाची क्वालिटी, चव आणि एकूणच गुणवत्तेमागे मायक्रॉब्जचं असलेलं हे महत्त्व लक्षात आल्यानंतर, 'प्युअर कल्चर्स'चा वापराला अधिकाधिक चालना मिळत गेली. फर्मेन्टर्समधे फक्त ठराविक मायक्रॉब्जच वापरले जाऊ लागले.
आज दुनियाभरात बडवेजर आणि कार्ल्सबर्ग हे बीअरचे दोन ब्रान्ड प्रचंड लोकप्रिय आणि सर्वोच्च आहेत. ह्यातही कार्ल्सबर्ग ही त्यातल्या त्यात चांगली मानतात. कार्ल्सबर्ग त्यांच्या फर्मेन्टर्ससाठी एक खास यीस्ट वापरते: सॅक्करोमायसेस कार्ल्सबर्गेन्सिस. त्या खास यीस्टची ती किमया आहे.
5 Jul 2011 - 4:48 pm | सोत्रि
योगेश,
आपण मायक़्रोबायोलॉजीस्ट आहात का? डिटेल्स बद्दल धन्यवाद. परंतु.....
मस्त 3-4 पेग रिचवून, जमिनीपासून दोन इंच वर जाउन (आकाशापासून दोन इंच खाली नव्हे :P) बाइक वर भन्नाट वेगाने जाताना अचानक रस्त्यात पोलिस दिसल्यावर जशी धुंदी उतरते तशी काहिशी अवस्था ह्या प्रतिक्रियेने झाली. मी ह्या किचकट डिटेल्स कटाक्षाने लेखात टाळल्या होत्या. त्याने लेखाची व्हिस्कीमय तरलता माराली जाण्याची शक्यता होती.
पण प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यावाद.
- (व्हिस्कीमय) सोकाजी
5 Jul 2011 - 4:57 pm | गवि
मस्त 3-4 पेग रिचवून, जमिनीपासून दोन इंच वर जाउन (आकाशापासून दोन इंच खाली नव्हे ) बाइक वर भन्नाट वेगाने जाताना
-१००
तीव्र विरोध आणि असहमती असा काही प्रकार करण्यास..
5 Jul 2011 - 5:54 pm | सोत्रि
गविजी,
तो मुद्दा फक्त वानगीदाखल होता. कदाचित उदाहरणाची गल्ली चुकली असावी.
पण आपल्या पॉइंटाच्या मुद्द्याशी सहमत, दारू आणि त्यानंतर गाडीवरून वारू, अजिबात नको. :)
5 Jul 2011 - 5:56 pm | गवि
:)
5 Jul 2011 - 4:59 pm | sagarparadkar
हे दोन्ही एकत्र येवू शकते? असे परस्पर पूरक पण असू शकते?
मग 'हाय रे कंबख्त मैने कयू नही पी ली?' असा प्रश्न सतावायला लागला ते निराळंच .... :)
5 Jul 2011 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार
खत्तरनाक आवडलेला आहे लेख.
जेवढी व्हिस्की आवडते तेवढ्याच घाउक प्रमाणात हा लेख आवडला गेल्या आहे.
सोत्री पुण्यात असल्यास अथवा आल्यावर त्यांना आमच्यातर्फे एक लार्ज :)
परा
सदस्य
आर्य मिपा मदिरा मंडळ
अध्यक्ष
पडीक मिपाकर युवक संघटना
संस्थापक अध्यक्ष
दुर्लक्षित पँथर
5 Jul 2011 - 6:23 pm | सोत्रि
17 ज़ुलैला मायदेशात परत येत आहे. कुठे भेटायचे ते बोला, आणि हो, मला डच पद्धत आवडते ज्याला आपण पुणेकर T T M M म्हणतो. त्यामुळॆ चिंता नसावी.
- (व्हिस्कीप्रेमी) सोकजी
5 Jul 2011 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला पुणेरी पध्दत आवडते. म्हणजे तुमच्या एका पेगचे बिल आम्ही भरायचे आणि बाकीचे तुम्ही ;)
तुम्ही या तर खरे मग करु धमाल.
5 Jul 2011 - 6:53 pm | धमाल मुलगा
>तुम्ही या तर खरे मग करु धमाल.
मला हाक मारली का रे पर्या?
आलो आलो..तुम्ही ग्लास भरा, तोपर्यंत मी पोचतोयच की.
9 Jul 2011 - 2:16 pm | विजुभाऊ
आम्हाला पुणेरी पध्दत आवडते.
म्हणजे टी टी एम टी ना रे परा...
12 Jul 2011 - 10:50 pm | सोत्रि
विजुभौ,
तुमची पुणेरी पद्धत आवडली, तुम्ही या पुण्याला, तुमच्या पद्धतीने करूयात
.
5 Jul 2011 - 6:24 pm | शाहिर
मि.पा. वर अनेक पा . कृ मिळतात . व्हिस्की ची मिळेल का? एकदा घरगुती घ्यावी म्हणतो
अवांतर : आमचे येथे घरगुती दारु मिळेल
5 Jul 2011 - 6:37 pm | कवटी
होय, होय...
गेला बाजार वाईनची तरी द्याच कुणीतरी पाकृ/ दाकृ/ वाकृ.
अवांतर: इतर गोष्टी ५-१० रु. वाढल्या असता इतकी बोम्ब मारणारे लोक दारू / बीर च्या किमती ५० - ६० रू नी वाढल्या तरी चकार शब्द का काढत नाहीत? सामान्य पिणेकरांना कोणी वाली आहे की नाही या जगात?
5 Jul 2011 - 7:04 pm | धमाल मुलगा
साला मझा आला वाचूनच. :)
जियो रे त्रिलोककरा! कौतुक वाटते तुझें.
- धम्या गोरक्षकर.
>>रूम टेंपरेचरची सिंगल मॉल्ट ऑन दि रॉक्स न घेणार्याखचे ह्या भूतलावर जन्म घेणे फुकट आहे
सव्वालक्ष वेळा सहमत. :) सिंगल माल्टच काय, पण चांगली ब्लेंडेडही ऑन द रॉक्सच प्यावी असा आमचा कटाक्ष असतो. (आता चांगली म्हणजे कोणती ह्यावर वाद घालणेत येणार नाही...आम्हाला बेल, टिचर्स, हेग आणि ब्लेंडर्स प्राईड चांगल्या वाटतात.)
सालं, आयरिश आणि बर्बन काहीकेल्या फारशा आवडल्याच नाहीत हे खरं. कदाचित चवीची अक्कल नसेल. :)
हा हा हा!!! एव्हढे ४-५ पेग झाल्यावर बोंबलायला शोधता कुणाला येणार आहेत त्या चुका? तुम्ही घ्या हो...ग्लास असा मागे नका लपवू..घ्या! :)
>>कोणाला हातभट्टीच्या व्हिस्कीची रेसीपी हवी असल्यास व्यनीतुन कळविणे म्हणजे ताकालाही जाता येइल आणि भांडेही लपवता येइल
मला हवी आहे. ;) व्यनि पाठवा. ती बोंबलुन ताक मागतो, तुम्ही हवं तर भांडं लपवा. :D
5 Jul 2011 - 9:14 pm | आंबोळी
सोत्री वत्सा तुज प्रत कल्याण असो!!!
हे ज्ञानाच्या भांडारात जेव्हढे धागे टाकशील तेवढ्या तुझ्या पिढ्या स्वर्गात जातील असा मी तुला अशीर्वाद देतो!
मला हवी आहे. व्यनि पाठवा. ती बोंबलुन ताक मागतो, तुम्ही हवं तर भांडं लपवा.
मला पण पाठवा... (पर व्यनी १ पिढी )
5 Jul 2011 - 9:25 pm | गणपा
तुम्हा दोघांची विमान स्वर्गात लँड झाली की आम्हाला पण सिक्रेट धाडुन द्या . :P
5 Jul 2011 - 9:32 pm | आंबोळी
गणपाशेठ,
सोत्रींच्या या मालिकेला पॅरलल तुमची चखण्याची मालिका सुरू करा की राव.
सोत्रिंचे कॉकटेल, सोबत गणपाचे स्टार्टर्स..... अहाहा....
5 Jul 2011 - 7:39 pm | प्रभो
भारीच!!
9 Jul 2011 - 5:56 am | शिल्पा ब
बरीच माहीती आहे तुम्हाला. (हे चांगल्या अर्थाने म्हंटलेले आहे.)
एक शंका: ही व्हीस्की कडु का असते?
9 Jul 2011 - 1:27 pm | श्रावण मोडक
चव!!! ;)
9 Jul 2011 - 11:10 am | सोत्रि
शिल्पातै,
व्हिस्की कडू असते ????? मला तर ब्वॉ लैच ग्वॉड लागते. :P
9 Jul 2011 - 1:23 pm | श्रावण मोडक
गंडवण्याचा धंदा साला. ;) धाग्याचे शीर्षक सांगते 'चकणा', म्हणून उत्साहाने वाचायला आलो तर इथं...
9 Jul 2011 - 2:31 pm | गणपा
ते बहुधा 'घेउन' बसले असतील लिहायला.... ;)
9 Jul 2011 - 4:21 pm | सोत्रि
गणपाभौ,
काश ऐसा होता। इथे सौदी मधे "घेउन" बसायला कायद्याने बंदी आहे. :(
9 Jul 2011 - 5:31 pm | सोत्रि
ऎक्चुअली नवीन कॉकटेल मालिकेत टाकता येणार नव्हते म्हणून काहीतरी चघळायला अश्या अर्थाने ह्या धाग्याचे शिर्षक साइड डीश (चकणा) असे टाकले. त्यामुळे जर गंडवल्याचा फील आला असेल तर माझ्या नावने खडे फोडत एक लार्ज़ मारा.
:beer: चीयर्स !!!
- (गंडवणारा) सोकजी
9 Jul 2011 - 2:20 pm | विजुभाऊ
हो हो हो........... सहमत पण लेखातील द्रवांच्या उल्लेखामुळे शीर्षकाची गल्ली चुकलेले लक्षातच आले नाही
अवांतरः जवस मका नाचणी हे पदार्थ उपवासाला चालत नाहीत सबब उपासाला चालेल अशी एखादी व्हिस्की आहे का? धमाल परा अशा व्हेटरन जाणकारानी मदत करावी
9 Jul 2011 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
अन्न हे सर्व रुपात पुर्णब्रम्ह असते इजुभौ.
आणि खरे सांगु का, उपासाला चालते का? , चव कशी असेल ?, चढेल का ? असले प्रश्न पडणार्यांनी सरळ ताक किंवा सोलकढी प्यावी ;)
11 Jul 2011 - 3:00 pm | धमाल मुलगा
व्हिस्की घेतलेला माणूसच रांगत जातोय आणि तुम्ही विचारताय की खुद्द व्हिस्की चालते का?
9 Jul 2011 - 5:21 pm | सुधीर
बाटलीवर १२ वर्षे जुनी किंवा`१६ वर्षे जुनी असे काहीसे लिहिलेले असते. ग्लेन फिडिच एका विशिष्ट लाकडाच्या (बहुदा ओक) ड्र्म? मध्ये ठेवतात. मग उत्पादन खरंच १२ वर्षांनी होते का? जितका काळ जास्त तितके ते मद्य "उंची" होते का? तुमचे व्यक्तीगत मत काय? मी अशीच १२ वर्षे जुनी ग्लेन फिडिच, आर सी चे ७-८ पेग सहज रिचवणा-या खास मित्राला भेट दिली,पण त्याच्या मतानुसार आर सी च सर्वोत्तम आहे. हे असे का? अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
9 Jul 2011 - 7:54 pm | सोत्रि
व्हिस्की तयार करण्याची प्रक्रिया खालील ट्प्प्य़ांमधे पार पडते:
1. Malting
2. Grinding
3. Brewing
4. Fermentation
5. Distillation
6. Aging (Maturing)
7. Bottling
बाटलीवर १२ वर्षे जुनी किंवा`१६ वर्षे जुनी असे काहीसे लिहिलेले असते ते सहाव्या टप्प्य़ावर अवलंबून असते. पाइनच्या लाकडाच्या ड्रममधे (कास्क) मधे डिस्टील केलेली व्हिस्की मॅचुअर करण्यास ठेवली जाते. ती जितकी जास्त वर्ष ठेवली जाते तितकी तीची चव वाढत जाते.
बॉटलींग नंतर व्हिस्की कितीही वर्ष बाटलीत स्टॉक करून ठेवली तर ती मॅचुअर होत नाही. मॅचुअर होण्यासाठी ती कास्कमधे असणे गरजेचे असते.
आता आर सी चांगली कि ग्लेन फिडिच हा मुद्दा व्यक्तीसापेक्ष आहे. नो कमेंट्स.
अधिक माहितीसाठी. किंवा.
- (36 Years Old) सोकाजी :)
9 Jul 2011 - 8:20 pm | गवि
आर सी चे ७-८ पेग सहज रिचवणा-या खास मित्राला
पेग सहजपणे रिचवले जातात म्हणण्यापेक्षा आर सी चे ७-८ पेग रिचवल्यावर सहजावस्था येते असे नमूद करु इच्छितो..
9 Jul 2011 - 10:45 pm | सुधीर
खरं असावं, कदाचित! गगनविहारीजी
सोकाजीराव, माहिती बद्दल धन्यवाद!
ह्म्म! कास्क हाच तो शब्द!!
अजून एक! व्हिस्की पिणारे (बरेच जण) बाकी पद्धतीच्या मद्याला (बिअर, व्होडका आणि वाइन इत्यादी) आणि मद्य पिणा-यांनाही कमी लेखतात. जणू काही व्हिस्की पिणे आणि पचवणे हा खूप मोठा दर्जा आहे.
9 Jul 2011 - 11:38 pm | माझीही शॅम्पेन
+१०० अगदी हाच अनुभव !!!
11 Jul 2011 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार
व्हिस्की विरुद्ध इतर पेये म्हणजे क्रिकेट विरुद्ध इतर खेळ अशा नजरेने बघितल्यास कदाचीत उत्तर मिळु शकेल ;)
9 Jul 2011 - 11:38 pm | माझीही शॅम्पेन
+१०० अगदी हाच अनुभव !!!
12 Jul 2011 - 6:35 am | हुप्प्या
सुरेख, माहितीपूर्ण लेख.
पण कडधान्य या शब्दाबद्दल शंका आहे. माझ्या मते हा शब्द डाळींकरता वापरला जातो. नाचणी, मका वगैरे मंडळी धान्ये आहेत कडधान्ये नाहीत. मटकी, हरभरा, तूर, उडीद वगैरे कडधान्ये आहेत असा माझा समज आहे.
जाणकार खुलासा करतीलच.
12 Jul 2011 - 1:21 pm | सोत्रि
हुप्प्या, मीही साशंक होतो. शंकेबद्दल धन्यवाद.
जाणकार लोक्स, कृपया खुलासा लवकरात लवकर करावा ही विनंती.
- (शंकेखोर) सोकजी
16 Jul 2011 - 2:06 pm | स्वानन्द
बिल्कूल शंका मत लेओ. हुप्प्या भाय खरंच बोल्या.
13 Jul 2011 - 12:25 am | धनंजय
कोण पाजेल म्हणून सोय करायला पायजेल.
(आमचे दारूचे बील आधीच गगनचुंबी... हा माणूस ते बील गगन छेदून इंद्रसभेत पोचवू बघतो आहे.)
14 Jul 2011 - 8:19 pm | मेघवेडा
सोत्रि.. झकास धागा! मजा आली वाचून! उशिराच वाचला पण देर आये दुरूस्त आये! ;)
>>रूम टेंपरेचरची सिंगल मॉल्ट ऑन दि रॉक्स न घेणार्याखचे ह्या भूतलावर जन्म घेणे फुकट
हाहाहा! व्हिस्कीचं नामकरणच फार इंटरेस्टिंग आहे. गॅलिक भाषेतलं या द्रव्याचं मूळ नाव - Uisge beatha (Meaning - Water of Life) त्याचा पुढं Uisgy/Usky असा अपभ्रंश झाला आणि त्याचं इंग्लिश रुपांतर Whisky!
आता आमचीही थोडी माहितीत भर!
स्क़ॉट्लंड मधे तयार होणार्या व्हिस्कीला स्कॉच व्हिस्की म्हणतात.
हिचेही चार उपप्रकार आहेत. स्कॉटिश भूमी चार निरनिराळ्या भागात विभागली जाते - हायलँड, लोलँड, आयला आणि स्पेऽसाईड. तसे कँपबेलटाऊन आणि आयलँड्स असेही भाग होते पण कँपबेलटाऊन इज नो मोअर आणि 'आयलँड्स' ही हायलँड्समध्येच समाविष्ट केली जातात. तेव्हा व्हिस्कीज च्या अभ्यासाच्या दृष्टीने केवळ चारच प्रमुख भाग.
आणि या चारही प्रभागांच्या व्हिस्कीजना आपआपली निराळी चव आहे!
लोलँड्स - दक्षिण स्कॉटलंड. या भागातल्या व्हिस्कीज बहुदा जरा हलक्याच! फ्रुटी चव देणार्या. नवख्यांसाठी उत्तम! प्रसिद्ध ब्रॅण्ड्स - ग्लेनकिंची, ब्लॅडनॉख, स्ट्रॅथक्लाईड इ.
हायलँड्स - क्षेत्रफळाच्या दॄष्टीनं सगळ्यात मोठा भाग.या भागातल्या व्हिस्कीज ना थोडीशी फ्लॉवरी/मिंटची चव असते! प्रसिद्ध ब्रॅण्ड्स - ग्लेनमोरांजी, बेन नेव्हिस, बॅलब्लेअर, डॅलमोअर इ.
स्पेऽसाईड - क्षेत्रफळाच्या दृष्टीनं फार लहान भाग असला तरी जसं Brandy=Cognac" तसंच "Scotch = Spayside" असं हे नातं आहे! स्कॉटिश भूमीवरल्या सर्वाधिक डिस्टिलरीज इथंच! स्पेसाईडच्या व्हिस्कीजना लोलँड्सच्या फ्रुटी आणि हायलँड्सच्या फ्लॉवरी यांच्यामधली अशी चव असते! प्रसिद्ध ब्रॅण्ड्स - ग्लेनफिडीश, ग्लेनलिव्हेट, ग्लेनमोराय, इम्पिरियल इ.
आयला! (Islay) - मला या व्हिस्कीजची चव घेताच आपल्याकडे 'आयला' या उद्गारवाचक शब्दाची निर्मितीचं मूळ इकडं स्कॉटलंडात आहे का असं वाटून गेलं होतं! ;) "आयला! काय भारी चव आहे!" असेच उद्गार आले! या व्हिस्कीजना थोडी 'स्मोकी' चव असते! थोड्या जहालपणाकडे झुकणार्या या व्हिस्कीज. प्रसिद्ध ब्रॅण्ड्स - ज्युरा, बोमोअर, पोर्ट शार्लट इ.
साला नुसतं मॉल्ट आणि पाणी! पण बघा कसं त्याचं uisge beatha (विश्गा बाऽहा) होतं! स्कॉट लोकांची देणगीच ही सार्या जगाला! :)
14 Jul 2011 - 9:47 pm | सोत्रि
स्कॉचच्या डिटेल्स बद्दल धन्यवाद!
छान ऍडीशन झाली मुळ लेखाला
- (सिंगल मॉल्टेड) सोकजी
14 Jul 2011 - 9:48 pm | सोत्रि
स्कॉचच्या डिटेल्स बद्दल धन्यवाद!
छान ऍडीशन झाली मुळ लेखाला
- (सिंगल मॉल्टेड) सोकजी
27 Sep 2011 - 12:30 pm | मैत्र
मेव्याने मस्त डिटेल्स दिले आहेत...
काही वर्षांपूर्वी या पंढरीला भेट द्यायचा योग आला.. तेव्हापासून लेख टाकायचा राहिलाच आहे. सवडीने टाकेन किंवा इथे प्रतिक्रियाच बरी सोकाजीरावांच्या जबरदस्त माहिती आणि इतरांनी त्याला उत्तम हातभार लावल्यावर आमच्या सारख्या हौशी कलावंत ( पिण्यात) लोकांनी प्रतिक्रियामात्रच असावे.
इन्व्हर्नेस (Inverness) या स्कॉटलंडच्या हायलँड्स मधल्या मुख्य शहरापासून एक व्हिस्की ट्रेल आहे थोडक्यात एक निसर्गरम्य स्कॉटिश लॉक्स (Loch -- तळे) च्या बाजूने अतिशय अप्रतिम हिरव्यागार प्रदेशातून जाणारा एक लहानसाच वळणावळणाच केवळ अप्रतिम रस्ता आणि हर एक पुढच्या टप्प्यावर जगातल्या सर्वोत्तम स्कॉचच्या मूळ डिस्टिलरी समोर आणणारी वाट... -- http://www.thisismoray.com/the-malt-whisky-trail-i191.html
स्पे साईड -- इथल्या स्पे नदी मुळे हे नाव आलं आहे. या भागातल्या परंपरागत बार्ली आणि स्कॉटिश स्प्रिंग वॉटर मुळे स्कॉच ला किंबहुना सिंगल माल्ट ला ती उत्कृष्ट चव / वास आणि रंग येतो.
एक थोडी सुधारणा Glenfiddich हा सिंगल माल्ट मधला सर्वोत्तम ब्रँड मानायला हरकत नाही. स्थानिक उच्चाराप्रमाणे
ग्लेन फिडिच किंवा ग्लेन फिडीश नसून ग्लेन फिडिक असा आहे.
गेलिक (Gaelic) या स्कॉटिश स्थानिक भाषेतून आलेले हे दोन्ही शब्द आहे ...
ग्लेन (Glen) म्हणजे व्हॅली किंवा साधारणतः नदीचे खोरे.. फिडीक ही स्पे नदीची एक छोटी उपनदी आहे जिच्या जवळ किंवा खोर्यामध्ये डफटाऊन नावाच्या अतिशय लहानशा गावात ग्लेन फिडीक ची डिस्टीलरी आहे. त्यामुळे फिडीक च्या व्हॅलीमधली म्हणून ग्लेन फिडीक असा त्याचा साधारण अर्थ लावता येतो आणि तो इतर सर्व ग्लेन -- ग्लेन लिव्हेट, ग्लेन मोरांजी ईत्यादींना सुद्धा लागू पडतो. आणि तो त्याच्या सिंगल माल्ट असण्याचं प्रतीकही आहे की "ग्लेन फिडीक म्हणजे ज्यात बार्ली आणि स्प्रिंग वॉटर दोन्हीही फिडीकच्या ग्लेनमधलंच आहे अशी व्हिस्की"
तिथे डिस्टिलरीच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे फिडीक चा अर्थ डीअर (Deer) असाही होतो त्यामुळे ग्लेन फिडीक च्या लेबल वर ते हरीण आहे.
इतर बहुतेक सिंगल माल्ट जसे ग्लेन मोरांजी वगैरे प्रमाणे ही स्कॉच सुद्धा दिड एकशे - दोनशे वर्षांपूर्वी ग्रँट नामक एका कुटुंबाने त्या खोर्यात झर्याचे पाणी आणि माल्ट वापरून बनवायला सुरुवात केली. अजूनही मुळ संस्थापकांपैकी एक वारस याचा मालक आणि कर्ता धर्ता आहे.
जवळच स्पेसाईड कूपरेज इथे कास्क (ओक लाकडाचे बॅरल्स) परंपरागत पद्धतीने बनवले जातात. ज्यात ही सिंगल माल्ट किमान बारा वर्षे साठवली जाते (seasoned). डिस्टिलरी मध्येच एका बाजूला साठवण्याचे सेलार्स आहेत. तिथला दरवळ :) ... काही वर्षांनी पण शेरी आणि सिंगल माल्टच्या आडव्या कास्कला नाक लावून घेतलेला तो ओकचा आणि अनेक वर्षं सिझन केलेल्या ग्लेन फिडिकचा वास काही विसरत नाही.. :)
इथे चकटफू गाइडेड टुर मध्ये शेवटी अर्थातच टेस्टिंग होते ज्यात बारा वर्षांची ग्लेन फिडीक किंवा अतिशय जुनी सुमारे तीस वर्ष जुनी ब्लेंडेड लिक्युअर चाखण्याची संधी मिळाली. अर्थातच सगळी डिस्टिलरी पाहून चव घेतल्यावर स्टोअर मध्ये रांगच लागते खरेदी साठी त्यामुळे सर्व टुअर मोफत असण्याचे आश्चर्य नाही..
वाटेत शिवास रिगल चाही बोर्ड आणि एक डिस्टिलरी पाहिली जी स्पेसाईड मध्येच आहे. पण शिवास ही सिंगल माल्ट नाही.. त्यामुळे ती ग्लेन च्या मानाच्या रांगेत येत नाही...
त्या uncomparable स्कॉटिश वातावरणात सिंगल माल्टची मजा तशीच uncomparable आहे !
काही छायाचित्रे सावकाश टाकतो ...
28 Sep 2011 - 7:47 am | सोत्रि
मैत्र, फारच सुंदर माहिती!
छायाचित्रे सावकाशीने आली तरीही हरकत नाही पण न विसरता नक्की टाका :)
- (36 Years old सिंगल मॉल्टेड) सोकाजी
28 Sep 2011 - 8:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मेव्या आणि मैत्र, चिअर्स.
14 Jul 2011 - 9:18 pm | चतुरंग
वाचूनच सहजावस्था प्राप्त झाल्या गेली आहे! ;)
(अव्हिस्क) रंगा
16 Jul 2011 - 2:52 pm | विकाल
भौ.... रम वर पण एक लार्ज येऊ द्या ना राव...!!
16 Jul 2011 - 2:59 pm | विकाल
भौ.... रम वर पण एक लार्ज येऊ द्या ना राव...!!
16 Jul 2011 - 8:22 pm | मस्तानी
काल आमचे हे फार मन लावून टी व्ही वर काहीतरी पाहत होते ... ते 'काहीतरी' तुम्हा सर्वांना ही खूप आवडेल असं इथल्या प्रतिक्रिया वाचून वाटतंय :)
http://channel.nationalgeographic.com/series/ultimate-factories/5154/Ove...
27 Sep 2011 - 12:38 pm | मराठी_माणूस
ही ग्लेन फिडीक इथे मुंबईत मीळते का ?
28 Sep 2011 - 6:45 am | मराठमोळा
>>ही ग्लेन फिडीक इथे मुंबईत मीळते का ?
मिळते ना.. भारतात जवळपास सगळ्या विदेशी दारु मिळतात..
माहितीपुर्ण आणि अभ्यासू लेख..
धन्यवाद.