कॉकटेल लाउंज १ : Mojito (mo-HEE-to, मोहितो)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
30 Jun 2011 - 12:13 am

मागे माझ्या एका धाग्यावर (कॉकटेलच्या) आलेल्या प्रतिक्रियेमधून नाटक्या ह्यांची साकिया ही मालिका अलीबाबाच्या गुहेसारखी सापडली. अधाश्यासारखी वाचून काढल्यावर नाटक्या ह्यांचा फॅन होउन मी त्यांचे स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले. एकलव्याप्रमाणे नाटक्या ह्यांना गुरुस्थानी मानून वेगवेगळी कॉकटेल्स बनविण्याची साधना सुरु केली. जवळ जवळ एक वर्षाच्या तपस्येनंतर आपणही काही कॉकटेल सादर करावी अशी इच्छा झाली.

त्यानुसार ‘कॉकटेल लाउंज’ ही माझ्या आवडीच्या कॉकटेल्सची मालिका सुरू करीत आहे. ह्यात काही खास ‘देसी धमाका’ कॉकटेल्ससुद्धा असणार आहेत. नाटक्या ह्यांच्याइतकी प्रतिभा नसल्यामुळे ‘साकिया’ ह्या त्यांच्या मालिकेत ढवळाढ्वळ न करता स्वतंत्र मालिकेचा प्रपंच. गुरूदेव (नाटक्या) चूकभुल देणे घेणे आणि आशिर्वाद असू द्यात.

तर ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील पहिले कॉकटेल आहे Mojito (mo-HEE-to, मोहितो).

Mojito 1

मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे :)
उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? ;))

साहित्य:
व्हाइट रम - 2 औस
लिंबाचे लहान तुकडे(फोडी) - 4-5
ब्राउन शुगर - एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर)
पुदीन्याची ताजी पाने - 8
लिंबाचा रस - 0.5 औस
शुगर सिरप - 0.5 औस
सोडा
बर्फ - बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस)
ग्लास - कोलीन्स असल्यात उत्तम

कृती:
ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे.
(चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते)
आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर
(ह्या, ‘ढवळा’ हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच :) ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार.

मोहितो 2

क्रमश: (पुढचे कॉकटेल : व्हाइट रशिअन)

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

30 Jun 2011 - 4:49 am | शिल्पा ब

छान. पुढच्या कॉकटेलाची वाट पाहतेय.
ओ गुरुदेव, जरा लक्ष द्या की इकडे. सांगा कसं काय जमलंय ते!! :)

शाहिर's picture

30 Jun 2011 - 12:11 pm | शाहिर

टांगा पलटी !!

अवांतर : औस घरी कसा मोजायचा ??

सोत्रि's picture

30 Jun 2011 - 1:34 pm | सोत्रि

सर्वात बेस्ट उपाय म्हणजे, लिकर measure, Jigger विकत आणावा.

किंवा

जनरली आपल्याकडे औषधाच्या बाटलीवर मोजण्याचे माप असते. ते साधारण 15 मिली चे असते. ते दोनदा वापरले कि झाले 1 औस :)

इरसाल's picture

30 Jun 2011 - 12:45 pm | इरसाल

छान दिसतेय.लागत पण छान असणार
पण मी " पिणारे " सदरात मोडत नसल्याने माझ्यापुरता बाद.

शाहीर : आमचे घोडे कधीच फरार ............

ह्या मधे जे 'पिणारे' सदरात मोडत नाहित, त्यांनी त्यात थोडासा व्हाइट रमच्या जागी खस सिरप व साधा सोडा टाकुन प्यावे, खुप छान लागते. (tried and tasted) कशी वाटते idea सोकाजीरावत्रिलोकेकर??

सोत्रि's picture

30 Jun 2011 - 1:57 pm | सोत्रि

मृणलिनी, सहमत.

खस सिरप बेस्टच खास करून त्याच्या रंगामुळे. कधीतरी मेंथॉल सिरप वापरुन बघा तेही छान लागते चवीला.
त्यात पुदीना फक्त सजावतीकरिता वापरा.
माझ्या मुलाची फर्माइश असते मॉकटेल्सची माझा कॉकटेल्स बरोबर, त्यामुळे दर रविवरी काहितरी रंगेबिरंगी मॉकटेल करावे लागते ;)

गवि's picture

30 Jun 2011 - 1:25 pm | गवि

मस्त.

आम्हास लाँग आयलंड टी आवडते. त्याची कृतीही दिली तर छान होईल. अडीचशे तीनशे रुपये देण्यापेक्षा स्वतःलाच बनवता आले तर काय बहार.. (अवघड नसावे अशी आशा.)

स्मिता.'s picture

30 Jun 2011 - 1:34 pm | स्मिता.

मोहितो तर मस्तच दिसतंय.

आम्हास लाँग आयलंड आईस टी आवडते. त्याची कृतीही दिली तर छान होईल.

या विनंतीला आमचेही अनुमोदन.

त्रिलोकेकरांनी न दिल्यास मी देते रेसिपी. चालेल काय?

स्मिता.'s picture

1 Jul 2011 - 1:54 pm | स्मिता.

नीधप ताई, चालेल की! आनंदच आहे. आम्हाला काय, रेसेपी मिळण्याशी मतलब :)

विनंतीची नोंद घेण्यात आली आहे ह्याची नोंद घेण्यात यावी ;)

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 3:01 pm | श्रावण मोडक

नो कमेंट्स! ;)

गेल्या महिन्यात गोव्यात फिशरमन्स व्हार्फ या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आमरसात मार्गरिटा (उच्चाराची चू.भू.दे.घे.) बनवून देत होते.

आंब्यांचा सीझन चालू होता त्यामुळे ताजा आमरस उपलब्ध होता. आणि तो प्रकार झकास लागत होता.

फोटो: फिशरमन्स व्हार्फच्या वेबसाईटवरुन..

म्हणून नुकतेच मुंबईत एका हाटलीत मार्गारिटा (उच्चाराची चू.भू.दे.घे.) आमरसात बनवायला सांगितली आणि त्यांनी बनवलीही.

.

माझीही शॅम्पेन's picture

30 Jun 2011 - 7:09 pm | माझीही शॅम्पेन

मार्गारिटा आणि टकीला हा आपला विक पॉइण्ट आहे (टोपण नाव शॅम्पेन असूनही) :)

मार्गरीटा बनवताना टकीला अधिक मार्गारिटा मिक्स टाकतात , हे मिक्स आंबा (आमरस शब्द जरा जड वाटला :) ) , लेमन , स्ट्राबेरी , आननस किवा ह्याचे कुठलेही कॉंबिनेशनने आणि मीठ + बर्फ यानी बनवतात !

सोत्रि's picture

30 Jun 2011 - 8:51 pm | सोत्रि

>>मार्गारिटा आणि टकीला हा आपला विक पॉइण्ट आहे

आपले सुत जुळणार असे दिसतेय :)

लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस काढून बघा मोसमात. कमाल रसायन तयार होतं.
बादवे नुसती टकीला नाही चालत मार्गारिटासाठी. ट्रिपल सेक, कुराकाओ (उच्चार नक्की माहित नाही!), कॉनथ्रू असं काहीतरी ऑरेंज लिक्योर/ फ्रूट लिक्योर टाइपचं लागतंच.

गवि's picture

1 Jul 2011 - 11:06 am | गवि

छान आयडिया.

प्लीज तेवढी लाँग आयलंड आईस टीची कृती द्या.. किंवा पूर्वी कोणी दिली असल्यास दुवा द्या.

त्यात "टी" नसतोच मुळी असे ऐकले आहे.

सोत्रि's picture

1 Jul 2011 - 12:33 pm | सोत्रि

नी,

मान गये उस्ताद _/\_. माझ्या ह्या मालिकेत तूही कॉकटेल्सची भर घातल्यास आनन्दच होइल.
मला मिक्सिंगचे एक्स्पेरिमेंट्स करायला खूप आवडते, आफ्टर ऑल दाट इज व्हॉट मिक्सोलॉजी इज.

बादवे, Curaçao चा उच्चार वेगवेगळ्या ठिकणी वेगवेगळा केला जातो. मला माहित असलेले उच्चार
.
१. कुराखाओ
२. कुरास्सो
३. कुराकाओ

धमाल मुलगा's picture

30 Jun 2011 - 7:33 pm | धमाल मुलगा

ह्या सोकाजीराव त्रिलोकेकरानं उभी बटाट्याची चाळ बाटवायचा चंगच बाधला की काय? ;)

मस्त रे मित्रा. नाटक्या-गणपा ह्यांच्यासोबत आणखी एक भारी परफॉर्मर मैदानात आलेला पाहून आपुन तर बाब्बा लै खुश झाल्यालोय. :)

अवांतर: व्होडका मार्टिनी बिनचूक करण्याची एखादी विशेष युक्ती कोणी कॉकटेल यक्सपर्ट देईल काय?

सोत्रि's picture

30 Jun 2011 - 8:46 pm | सोत्रि

धमु,

थोडी कळ काढा, ह्या मालिकेत सर्व प्रकारची कॉकटेल्स कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे.

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 2:59 pm | धमाल मुलगा

आतुरतेनं वाट पाहतो द्येवा :)

प्रभो's picture

30 Jun 2011 - 8:10 pm | प्रभो

मस्तच....

अभिज्ञ's picture

1 Jul 2011 - 11:10 am | अभिज्ञ

उपयुक्त धागा.

अभिज्ञ.

लंबबेटावरील बर्फाळ चहा..

यात ५ व्हाइट अल्कोहोल्स समप्रमाणात असतात.
टकिला
जीन
व्हाइट रम
व्होडका
वर्माउथ (परत खरा उच्चार माहित नाही. हा स्पेलिंगाप्रमाणे उच्चार).

बेसिक टॉलरन्स वाल्यांनी समप्रमाण २० मिलि च घ्यावे. टाकीवाल्यांनी ३० ला जायला हरकत नाही. नवश्यागवश्यांना १५ मिलि पुरे होते झुलवायला. :)
ग्लासाच्या उंचीवर पण याचे प्रमाण बदलू शकते.

उंच ग्लास घ्यायचा. त्यात अर्ध्या भागात बर्फाचे खडे भरायचे. मग काचेच्या स्टररवरून एकेक व्हाइट द्रव्य हळू हळू सोडायचे. मग कोक घालायचा काठाच्या एक अंगुळ खालीपर्यंत पण फसफसून सांडू द्यायचा नाही. वरती पुदिन्याचं एक पान गार्निशला आणि ग्लासाला लिंबाची चकती लावायची. स्टरर काढून टाकायचा नाही. हळूहळू ढवळत ढवळत आस्वाद घ्यायचा.

(ही माझी कृती हो..)

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 3:07 pm | धमाल मुलगा

झक्कास!

ह्यावरुन आमच्या एका मैतराकडं पैजा लाऊन पोरांनी 'झोंबी' प्यायलं होतं त्याची याद आली. :)

थोडं थोडं आठवतंय त्याप्रमाणं बेस होता रम. रेड, व्हाईट, गोल्डन तिन्ही प्रत्येकी ३० मिलि, त्यात बहुतेक ऑरेंज आणि पाईनअ‍ॅपल ज्युस आणि ग्लासात ओतल्यावर वरुन बकार्डी-१५१.

पोरं सहा महिने एकमेकांना टाळत होती इतका धिंगाणा झाला होता. ब्लडी हाउस पार्टी! :D

म्हणजे फक्त लिकर्स आणि कोक?

एवढेच असते होय या कॉकटेलात? मला कोकखेरीज आणखी फ्लेवर्सचा भास झाला होता. लिंबू, चहा वगैरेसारखे काही.

नुसता कोक आणि अल्कोहोल इतकेच नव्हते वाटत.

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 4:38 pm | धमाल मुलगा

चवीचा तो फरक कदाचित vermouth मुळं वाटला असावा सायबा :)

स्मिता.'s picture

1 Jul 2011 - 6:07 pm | स्मिता.

मला वाटतं लेमन प्लेवर्ड आईस टी किंवा कोक यापैकी काहितरी एक वापरतात. काय, कसले व्हेरिएशन आहे ते माहिती नाही.

मला मात्र आईस टी घालून बनवलेलं आवडतं.

@ हा प्रतिसाद व त्यावर प्रतिसाद देण्यार्‍या सर्वांस,

ह्या कॉकटेलला "लॉन्ग आयलंड आइस टी'' हे नाव त्याच्या रंग साधर्म्यामुळे मिळाले आहे. कोक घातल्यामुळे आइस टी सारखा रंग येतो. ऍक्चुअल आइस टी ह्या कॉकटेल मधे नसते.

नी, ह्यामधे व्हरमुथ टाकत नाहीत. त्यामुळे चवीत फरक पडतो. तुझे इंग्रेडीएंट्स त्यामुळे 'पर्सनल व्हेरीएशन' ह्या सदरात मोडतात.

'सायट्रस' चवीचे काहीही पेय चालते. त्यामुळे आंबट (sour) चव येते व ती आइस टी कडे झुकते. जनरली ट्रिपल सेक व/किंवा लिंबाचा रस व/किंवा स्वीट & सार सिरप टाकतात. माझ्या एका 'पर्सनल व्हेरीएशन' नुसार कॉइंत्रु ही चालते. (पण ट्रिपल सेक हा गरीबांचा कॉइंत्रु आहे ;) )

पुढच्या धाग्यापासून फॉरमॅट मधे बदल करून 'पार्श्वभूमी' असे सेक्शन टाकून प्रत्येक कॉकटेल बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करीन.

- (कॉकटेलप्रेमी) सोकाजी.

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 7:28 pm | धमाल मुलगा

पुढच्या धाग्यापासून फॉरमॅट मधे बदल करून 'पार्श्वभूमी' असे सेक्शन टाकून प्रत्येक कॉकटेल बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करीन.

हां! हे कसं एकदम ब्येष्ट झालं बरं :)

नी, ह्यामधे व्हरमुथ टाकत नाहीत. जनरली ट्रिपल सेक व/किंवा लिंबाचा रस व/किंवा स्वीट & सार सिरप टाकतात. <<<
माझं उलटंच. मला मिळालेल्या रेसिपीमधे व्हरमुथ होते लिहिलेले. ते मिळण्यास कठीण इथे त्यामुळे मी विचार केला ट्रिपल सेक टाकल्यास बरे होईल. म्हणून मी बर्‍याचदा ट्रिपल सेक टाकूनच केले. ते व्हेरिएशन होईल म्हणून इथे लिहिले नाही..
:)

व्हरमुथ आणि ट्रिपल सेक म्हणजे काय?

धन्यवाद.

व्हर्मूथ ही एक व्हाइट वाइन बेस्ड लिक्युर आहे.

व्हाइट वाइन मधे लवंग, दालचिनी, वेलची तसेच वेगवेगळ्या हर्ब्स घालून व्हर्मूथ तयार होते.
स्वीट व्हर्मूथ : ह्यामधे 10–15% साखर असते.
ड्राय व्हर्मूथ : ह्यामधे 4% पर्यंत साखर असते, (जनरली दारुच्या भाषेत ड्राय म्हणजे, साखरेचा अभाव)

ट्रिपल सेक ही एक ऑरेंज फ्लेवर्ड लिक्युर आहे. तीला Curaçao लिक्युर असेही म्हणतात्
Curaçao ह्या बेटावर मिळण्यार्‍या कडू संत्र्यासारख्या फळाच्या सुकलेल्या सालीपासून ही लिक्युर तयार करतात.

धन्यु

नावाची नोंद घेतली आहे. :-)

पु.धा.प्र (पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत)

नन्दादीप's picture

1 Jul 2011 - 4:14 pm | नन्दादीप

धन्यवाद.....!!!!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

(वाचन खूण साठवली आहे... अडी-नडीला उपयोगी येउ शकते.....)

बाकी;;
.
.
.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2011 - 4:51 pm | बिपिन कार्यकर्ते

हे पेय एकदा आमच्या भाग्यात आले होते. लागोस मधे. अफलातून आहे. सोकाजीशेठ धन्यवाद!

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 5:21 pm | श्रावण मोडक

हा धागा बंद करावा, अशी संपादकांना नम्र विनंती.

कवटी's picture

1 Jul 2011 - 6:23 pm | कवटी

श्रामोंशी सहमत आहे...
संपादकानी त्वरीत इकडे लक्ष देउन हा धागा आणि त्या योगे येउ घाटलेली मालिका बंद पाडावी... जमल्यास हा आयडी पण बॅन करावा....
विकांताला इतक जिवघेण लिखाण (फोटोसकट) टाकणे माणूसकीला धरून नाही.

सोकाजीराव पटापटा येउद्यात राव... आणि लिहिताना जरा आमच्या सारख्या मध्यमवर्गीय माणसाला डोळ्यासमोर ठेउन कॉकृ द्या. म्हण्जे सहज उपल्ब्ध साधनांपासून बनवायच्या कॉकृ टाका.

या मालिकेवर डॉळा ठेवुन आहे. ;)

विजुभाऊ's picture

9 Jul 2011 - 10:59 pm | विजुभाऊ

ते धम्या कायपण बोलतय.......... त्याच्या सोबत टकीला मारून बघा एकडाव........ तो कुनालाबी जिंकू देत नाय.
अवांतरः सिग्नेचर व्हिस्की खरबुजाच्या तुकड्यावर टाकून अर्धा तास मुरू द्यावे. नंतर चवीत चाखत माखत खरबुजाचे ते तुकडे खावेत. हवी असल्यास वरून थोडी साखरपेरणी करावी.
लै खासमखास लागतय. या प्रकाराला काय म्हंणतात. क्यारेबीयन प्रकार आहे हा. व्होडका कलिंगडावर टाकुन सुद्धा खातात.

धमाल मुलगा's picture

11 Jul 2011 - 2:17 pm | धमाल मुलगा

;) मला कशाला मध्ये ओढताय? :D