तुझी घागर नळाला लाव...

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 11:55 pm

छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं. माझ्या भाच्यानं डेस्कटॉपवर हे गाणं लावलं होतं. भाच्याचं वय वर्ष साडे चार. नुकतीच सिनियर केजी संपवून पहीलीत जायच्या तयारीत असलेला हा "नेक्स्ट जनरेशन" चा प्रतिनिधी. ज्युनियर आणि सिनियर दोन्ही केजी मराठीतून केल्या असल्यामुळे इंग्रजीचा गंध नाही. पठठया सिक्वेंस लक्षात ठेवतो. "इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं आणि मग हे गाणं मिळालं". त्याच्या दृष्टीने मशिनवर गाणं शोधणं इतकं सोपं आहे.

असो. ते गाणं. ते गाणं त्याचं आवडतं. कारण त्याची चित्रफ़ीत. मुख्य पात्राचे विदुषकासारखे चित्रविचित्र हावभाव पाहून तो अगदी खदखदून हसतो. ते गाणं माझ्याही आवडीचं आहे. पण मला ते गाणं आवडण्याचं कारण मात्र वेगळं आहे.

"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे तुझा. कसं ऐकू शकतो तू ही अशी गाणी?" ईति माझा एक मित्र.
"जाऊ दे रे. तुला नाही कळणार. जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही स्वत:ला उच्चभ्रू म्हणवणारे लोक अशा गाण्यांकडे नेहमी पुर्वग्रहदुषित नजरेने पाहता. एखाद्या गाण्याला अगदी सहजपणे डबल मिनिंगवालं गाणं म्हणून लेबल लावून मोकळे होता. हे विसरता की अशी गाणी म्हणजे जनसामान्यांचे एक्स्प्रेस होणं असतं. तुम्ही ज्याला रीडींग बिटवीन दी लाईन्स म्हणता तसा त्यांच्यामध्ये खुप मोठा अर्थही दडलेला असतो. बास तशी दृष्टी हवी." मी एका दमात बोलून टाकलं.
"असं का महाराज? मग जरा या अज्ञानी बालकाला समजावून सांगाल का असा कोणता गहन अर्थ द्डला आहे या गाण्यात?" मित्रही आता माघार घ्यायला तयार नव्हता. मला बोलावंच लागलं...

हे केवळ एक लोकगीत नाही. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा, खेड्यापाडयातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेला, मोठया शहरांमधील श्रमजीवी जनतेला आपल्या आजूबाजूच्या सुशिक्षित जगात घडणार्‍या बदलांची जाणिव व्हावी म्हणून एका नवकवीने ही आपल्या जनसामान्य बांधवांना घातलेली एक साद आहे. मनापासून केलेली एक आर्त विनवणी आहे. आता या गीताच्या सुरुवातीच्याच ओळी पाहा.

जागं झालंय सारं गाव
तांबडं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव
पाणी सुटाया लागलं

एका सकाळचं वर्णन. किती सहज साधं व्यक्त होणं. नाही म्हणायला यमक आहे, परंतू तोही किती सहजपणाने जुळून आलेला. र ला र आणि ट ला ट जोडून आपल्या ब्लॉगांवर कवितांचा रतिब घालणार्‍या संगणक अभियंत्यांना यापासून नक्कीच बोध घेता येईल. असो. मुद्दा तो नाही. कवी म्हणतोय की पुर्वेला तांबडं फुटलं आहे. सार्‍या गावाला जाग आली आहे. एका लहानशा रम्य अशा खेडयाचं चित्र नजरेसमोर उभं राहतं की नाही? पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्या शेजार्‍याला किंवा शेजारणीला घागर नळाला लावायला सांगतो. इथे शेजारी की शेजारीण अशी संदिग्धता असली तरी हा उल्लेख शेजारणीसंदर्भात आहे हे गीताच्या पुढील कडव्यांमध्ये कवी स्पष्ट करतो. आता तसा नळ आणि घागर यांचा संबंध नाही. नळ ही प्रामुख्याने शहरामध्ये उपलब्ध असणारी सुविधा आहे. आणि घागर खेडयातला फ़्रिज. काही गावांमध्ये हल्ली नळ दिसतात. नाही असं नाही. कुणीतरी नेता पुढारी नळ योजनेचं उद्घाटन करतो. दोनचार दिवस पाणी येतं. नंतर बंद. आणि समजा नळाला पाणी येणं चालू राहीलंच तरीही गावातल्या गोरगरीबांना पाणीपटटीचे पैसे न भरता आल्यामुळे पुढे मागे कधीतरी ते नळ कोरडे होतातच. अर्थात कवीला याची जाणिव आहे. परंतू तरीही खेडयातली घागर आणि शहरातला नळ या दोन गोष्टी एकत्र आणून कवी सामाजिक एकात्मकता साधतो. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर या मुंबईच्या उपनगरातील झोपडपटट्यांमधील सर्वसामान्य जनता आजही पाण्यासाठी सार्वजनिक नळांवर अवलंबून आहे हे विदारक सत्यच कवी या ओळींतून मांडतो असं वाटतं. ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्‍या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो.

अर्थात हा झाला शब्दांचा वरवरचा अर्थ. शब्दांमागचा अर्थ मात्र खुप गहन आहे.

कालपरवापर्यंत हे जनसामान्य अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होते. आता मात्र सार्‍यांना ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. शिक्षणाची गंगा आता खेडोपाडी पोहोचली आहे. जणु काही या त्यांच्या आयुष्यात एक नवी पहाट झाली आहे. परंतू अजूनही काही जनता या परीवर्तनापासून अनभिद्ज्ञ आहे. कवीला ही ज्ञानाची गंगा समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत पोहचवायची आहे. म्हणूनच कवी अशा अजुनही शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना म्हणतो की हे माहितीचं युग आहे. हे ज्ञानाचे युग आहे. तुम्ही आता मागे राहू नका. लिहा, वाचा. आपलं जीवन समृद्ध करा. पहा बरे किती खोल अर्थ दडला आहे.

सार्‍या गावात जळला बोभाटा झाला
पाणी येणार न्हाय सार्वजनिक नळाला
लवकर उरकून घे, डोकं उठाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं

कष्टकरी, श्रमजीवी जनता बिचारी साधी-भोळी असते. कुणी काहीही म्हटले तरी अगदी पटकन विश्वास ठेवते. शिक्षण घेणं ही गोरगरीबाच्या आवाक्यातली गोष्ट राहीलेली नाही, हा एक काहीही तथ्य नसलेला समज. हा समज कसा पसरला, कुणी पसरवला देवास ठाऊक. तसंच शिकण्याचं एक विशिष्ट वय असतं हा अजून एक गैरसमज. अर्थात यातली एकही गोष्ट खरी नाही. शालेय शिक्षण मोफत आहे. उच्च शिक्षणासाठी सरकारी बॅंका कर्ज देतात. परंतू हे या लोकांना माहितीच नसतं. आणि मुळातच शिक्षणाबद्दल अनास्था असल्यामुळे कुणी त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला तरीही फारसा उपयोग होत नाही. हे लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल. हीच गोष्ट थोरामोठयांची. खेडयापाडयांमधील तसेच शहरांमधील श्रमजीवी जनतेसाठी शासन खुप सार्‍या योजना राबवत असतं. परंतू ज्यांच्यासाठी या योजना राबवल्या जातात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचतच नाही. आणि म्हणूनच या लोकांनी आता स्वत:च शहाणे होणे गरजेचं आहे. परंतू त्यांना शहाणं करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. कवीला याचा अनुभव आहे. आणि आपल्या या खडतर अनुभवाचं वर्णन कवी "डोकं उठाया लागलं" या अगदी समर्पक शब्दांत करतो.

पाण्याच्या चिंतेनं झोप झाली का नाही
म्हणूनच ऊठवलं, जाग आली का नाही
अगं तरीही का गं तुझं, डोळं मिटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं

अर्थात शिक्षण अगदी जुजबी असलं, किंवा अजिबातच नसलं, आजूबाजूला घडणार्‍या सुधारणांची, सुखसुविधांची फारशी जाणिव नसली तरीही आपलं जीवन सुखी व्हावं या सर्वसामान्य जनतेला वाटते. किंबहूना आपल्याही मुलाबाळांना शिक्षण मिळावं, आपलंही जीवन सुखी व्हावी, घरात सुबत्ता नांदावी असं या कष्टकरी जनतेलाही वाटत असतं. ही चिंता कायम त्यांच्या मनात असते. हे सारं ध्यानात घेऊन कवी अगदी आत्मियतेने विचारतो, की भविष्याच्या काळजीने तुला झोप व्यवस्थित लागते का? कुणीतरी तुला हे शिक्षणाचं, ज्ञानाचं महत्व समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे जनजागृतीचं कार्य मी हाती घेतलं आहे. मी ज्या काही तुझ्या भल्याच्या चार गोष्टी सांगत आहे, त्या तुला पटत आहेत ना? "जाग आली का नाही" असे अगदी नेमके शब्द योजून कवी आपली जनांच्या उद्धाराची तळमळ व्यक्त करतो. अर्थात समाजसुधारणेची चळवळ जेव्हा नुकतीच सुरु झालेली असते तेव्हा सुरुवातीला जनता तिच्याकडे दुर्लक्षच करते. आणि मग त्या चळवळीच्या प्रवर्तकांना असा प्रश्न पडतो की हे जे काही आम्ही करतोय ते लोकांच्या भल्यासाठीच करतोय पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष का बरे करतात? कवीचा "अगं तरीही का गं तुझं, डोळं मिटाया लागलं" हा प्रश्नही हीच भावना व्यक्त करतो नाही का?

नको करू बाई लय सांडासांडी
अगं गर्दी झाल्यावर होईल भांडाभांडी
तुझ्या ओढाओढीने डोकं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं

जेव्हा एखादी सामाजिक किंवा सांस्कृतिक चळवळ सुरू होते, तेव्हा त्या चळवळीची काही ध्येय धोरणं असतात. चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या आपली चळवळ कशी पुढे जावी याबद्दल काही अपेक्षा, काही आराखडे असतात. तशाच अपेक्षा कवीच्याही आहेत. सर्वसामान्य जनता आणि शिस्त (ज्याला उच्चभ्रू समाज डिसिप्लिन म्हणतो) यांचा नातं तसं फारसं सख्याचं नसतं. एखादी गोष्ट फारसे कष्ट न करता मिळाली की हेवेदावे सुरु होतात. अगदी गैरमार्गाने आपल्यालाच कसा फायदा होईल हे पाहीलं जातं. कवी या सार्‍या अनुभवांमधून बहुतेक गेला असावा. त्याला या सार्‍या गोष्टींनी क्लेश होतो. मन व्यथित होते. आपल्या मनाची ही व्यथा कवी "तुझ्या ओढाओढीने डोकं फुटाया लागलं" या जनसामान्यांच्या शब्दांतच व्यक्त करतो. तसेच जनसामान्यांसाठी राबवल्या जाणार्‍या विविध योजनांचा फायदा सर्वांनी शिस्तीने घ्यावा, वादविवाद टाळावेत अशी अपेक्षा करताना कवी पुन्हा एकदा "नको करू बाई लय सांडासांडी" असा बोली भाषेचा आधार घेतो.

शेजारधर्म म्हणून मी आलो जवळ
अगं नंतर जीवाची होईल तळमळ
या संदीपचं सांगणं आता पटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं

हे सारं कवी का बरे करत असावा? याचंही स्पष्टीकरण तो देतो. बहुधा कवीने परिस्थिती जवळून पाहिली असावी. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या आजुबाजुच्या उपेक्षित जनतेला व्हावा असं त्याला कळकळीने वाटतं. ज्या समाजात आपण वाढलो, लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणिव कवीला आहे. आपल्या मातीसाठी काही करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. वेळ निघून गेल्यावर "अरेरे, कुणी समजावून सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती" असं म्हणायची वेळ या कष्टकर्‍यांवर, उपेक्षितांवर येऊ नये असं कवीला अगदी मनापासुन वाटतं. आज आपण लोकांना चार गोष्टी शिकवल्या, त्यांचं भलं झालं तर उद्या हेच लोक आपलं नाव आदराने घेतील याची त्याला पुर्ण खात्री आहे.

पाहीलंत? हे असं आहे. लोकगीते हे खेडयापाडयातील जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे एक प्रभावी अस्त्र आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनामधल्या उपमांचा चपलख वापर करून लोकांना शहाणे करुन सोडण्याचे कार्य ही लोकगीते करतात. परंतू ग्रामिण जीवनाची ओळख नसलेली सुटाबुटातील शहरी संस्कृती मात्र अशा लोकगीतांना "डबल मिनिंग सॉंग" असं लेबल चिकटवून मोकळी होते. असो.

असेच शेजारधर्माची महती सांगणारे एक अतिशय सुंदर लोकगीत आहे. परंतू त्याविषयी पुन्हा कधीतरी...

गीताचा संदर्भ:

कवी: संदिप
संगितकार/गायक: आनंद शिंदे
ध्वनीफित/चित्रफित: कृणाल म्युझिक

कवितासमाजजीवनमानआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

20 May 2010 - 12:00 am | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

मदनबाण's picture

20 May 2010 - 12:08 am | मदनबाण

परवाच हे गाणे यूट्युबवर ऐकले होते...

दादांची आठवण आली... ;)
बाकी मी बाबुराव बोलतोय हे गाणं ऐकलं का तुम्ही ? ते देखील यूट्युबवर हाय बरं का ;)

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

टारझन's picture

20 May 2010 - 1:15 am | टारझन

हा हा हा .... असेही काही ? =))
आणंद शिंदे / मिलींद शिंदे च्या बाकीही फेमस गाण्यांच असंच रसग्रहण कर र बाल्या :)

- (बाबु) टारझन
आजंच माझा झालाय पगारं ... करुया रोखं नको उधारं ...

मिसळभोक्ता's picture

20 May 2010 - 5:43 am | मिसळभोक्ता

पाणी सुटायला लागलं मधली नि रे ग म प सा ही स्वरसंगती, म्हणजे आमच्या बाबूजींची यमनातली खासियत, बरं का मंडळी.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

फटू's picture

20 May 2010 - 11:35 am | फटू

बाबूजींचा उल्लेख आलाच आहे तर इथे प्रल्हाद शिंदेंचा अर्थात आनंद शिंदेंच्या बाबूजींचाही उल्लेख करावासा वाटतो.

प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्राच्या ग्रामिण भागाला भक्तिगीते गाणारे एक ताकदीचे गायक म्हणून परिचित आहेत.
गीतकार दत्ता पाटील, संगितकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे या त्रयीने उत्तमोत्तम अशी भक्तिगीतांची देणगी महाराष्ट्राच्या भाविक जनतेला दिली.

पुण्याच्या उपनगरांमध्ये सकाळी टाळ वाजवीत येणारे वासुदेव बरेच वेळा ज्ञानदेव आणि तुकारामांचे अभंग न गाता प्रल्हाद शिंदेंनी गायलेली भक्तिगीते गातात.

- फटू

सहज's picture

20 May 2010 - 6:00 am | सहज

फटू जी हुच्च विवेचन!

:-)

अमोल केळकर's picture

20 May 2010 - 11:17 am | अमोल केळकर

'नेक्स्ट जनरेशन' गाण्याचे रसग्रहण आवडले
:)

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दत्ता काळे's picture

20 May 2010 - 11:39 am | दत्ता काळे

ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्‍या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो.

- पण आता चित्र उलटे दिसते, डेक्कन, प्रभात रोडपेक्षा जास्त पाणी झोपडपट्टीवासियांना.

निदान पाण्याच्या बाबतीततरी पुण्यात गरीब सगळ्यात 'श्रीमंत' आहेत. पुण्यात झोपडपट्ट्यात चोवीस तास पाणी असतं. तिथे पाण्याचा जरा पुरवठा कमी झाला तर झोपडपट्टीतल्या बायका-माणसे हंडा मोर्चा काढतात.

तिथे गट्ठा मते असल्याने स्थानिक नगरसेवक, पुढारी त्या गरीबांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्याबरोबर प्रशासनाला दोष देत, मोर्चात सामिल होतात. पुण्यात सध्या दररोज एकवेळच पाणी पुरवठा आहे, तरी झोपडपट्टीत पाणी मुबलक उपलब्ध आहे.

तुम्ही निरूपण फारच छान केलंय, पण खुद्द त्या कवीला तरी एव्हढे विचार ही कविता लिहिताना सुचले असतील का, याबद्दल साशंक आहे.

अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात.

लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही.

फटू's picture

20 May 2010 - 6:00 pm | फटू

अनेकदा लेखक / कवी एका क्षणी उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार / काव्य लिहून मोकळे होतात आणि तथाकथित विद्वान समीक्षक / रसिक उगाचच काहितरी अर्थ लावत आपली विद्वत्ता पाजळत बसतात.

तुम्ही पोटतिडकीने लिहिलेली ही प्रतिक्रिया वाचून अंमळ मौज वाटली. असो. ज्याची त्याची समज.

- फटू

jaypal's picture

20 May 2010 - 3:43 pm | jaypal

शाहिर विठठल शिंदे हे देखिल लोकगित लिहायचे आणि गायचे देखिल. ती गाणी निट ऐका मग ठरवा की "लोकगीते लिहून खपवणारे लोक इतका विचार करत असतील असं वाटत नाही" हे विधान किती खर ते?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अहो मी अशा "द्वयर्थी" शब्दरचना करणार्या लोककवींबद्दल म्हणत होतो ...

मध्यन्तरी गणेशोत्सव काळात कोंकणात एक लोकगीत फारच फेमस झाले होते ... काय तर म्हणे "काल रात्री या आण्टीची, जरा घण्टी मी वाजवली ..."
आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ... =))

फटू's picture

20 May 2010 - 6:04 pm | फटू

प्रतिसादासाठी धन्यवाद.

आता काही अति-उत्साही साहित्यवीर या लोकगीताचे सुद्धा असे काही निरुपण कर्तील कि जणु एखाद्या तत्त्ववेत्त्याने काहीतरी चिरकालीन सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे ...

तुम्ही खुपच जड घेता राव. जरा हलके घ्या की :|

- फटू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2010 - 3:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'तुझी घागर नळाला लाव' याचे रसग्रहणही वाचायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि वर उल्लेख आलाच आहे की कवीला सुद्धा असे काही सुचले नसते. पण तुम्ही अर्थ मात्र चांगला 'काढला' आहे.

लगे रहो.

-दिलीप बिरुटे

समंजस's picture

20 May 2010 - 4:10 pm | समंजस

वा!!गाणं एकदम मस्त समजावून सांगितलयं मित्राला :) परत पुन्हा कधी बोलणार नाही की काय थर्ड क्लास चॉईस आहे म्हणून :)

अविनाशकुलकर्णी's picture

20 May 2010 - 7:52 pm | अविनाशकुलकर्णी

गाण्याचा गर्भितार्थ गाणे निट ऐकल्यावर उमगेल...लई चावट मस्त गाण हाय

JAGOMOHANPYARE's picture

21 May 2010 - 8:46 pm | JAGOMOHANPYARE

गाणं मलाही आवडतं... भैरवीत आहे ... बासरीचे पीसेस छान आहेत..

अनिल हटेला's picture

22 May 2010 - 12:22 am | अनिल हटेला

लगे रहो फटू भाई.... :)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

हा हा हा मस्त पोस्ट्मार्टम केलय रे फटु.

(दुव्या बद्दल घाटपांडे काकांचे आभार :) )

तिथे साभिनय नृत्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मते ते ह्याद्वारे तिथीनुसार एका महाराष्ट्रियन दैवताची जयंती साजरी करताहेत.

इंटरनेटस्नेही's picture

23 Mar 2011 - 2:23 pm | इंटरनेटस्नेही

अजुन काही गाण्यांचे असेच रसग्रहण आल्यास आनंद वाटेल:

१. वाट बघतोय रिक्षावाला
२. बेंबाट सारं उघडं
३. लिंबु मला मारिला
४. हाताला धरलया म्हणतयं लगीन ठरलंया
५. बांबु डालके बारीक कुटना, जी फिर रात को आनंद लुटना

हे सर्व अप्रतिम संगीत आपण www.in.com/music येथे ऐकु शकता!

तिमा's picture

7 Nov 2012 - 8:21 pm | तिमा

तिकडे कुणीतरी 'यशोमती मैयासे' या सोज्वळ गाण्याचे रसग्रहण करतोय तर इथे....
असली गाणी ऐकली की ते सोज्वळ गाणे देखील 'राधाकी गोरी, मेरा क्यूं काला' अशी ऐकू येऊ लागतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 10:40 pm | निनाद मुक्काम प...

गाण्याचे रसग्रहण आवडले .

लोकगीतांना व त्यांच्या गायकांना कमी लेखण्याची काही जणांमध्ये अहमिका असते .

पण ती लोक खूपवेळा तळागाळातील लोकांची दुख जी त्यानी स्वतः अनुभवली असतात. तीच व इतर व्यथा किंवा एखादा संदेश आपल्या लोकगीता मधुन देतात .
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माझी मैना गावाकडे .... ह्या शाहिरांच्या गीताने तुफान उठवले .

तर दादा कोंडके ह्यांनी माझ्या मते हनुमानाचे संपूर्ण जीवित कार्य एक गीतातून दिले .व त्या गाण्यातील शेवटचे कडवे आजच्या जगातील मर्त्य मानवाला उद्देशून होते .

तेव्हा प्रगल्भ लिहिणे हे काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही हे ध्यानात असू दे
आमच्या जळगावच्या निरक्षर बहीणा बाई ह्यांनी खोप्या मध्ये खोपा हे गीत लिहिले
.
व आज अनेक सायाकोलोजीस्त त्याचे अजून रसग्रहण करीत आहेत .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2011 - 7:18 pm | निनाद मुक्काम प...

आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ , धर्म ,स्तरामधील लोक राहतात .त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात .
आज समाजात अनेक उच्चभ्रू लोकांची मुले सुध्धा शास्त्रीय संगीताला '' काय गळे काढतात ''
थोडक्यात आपण मध्यमवर्गीय फक्त आपण जे ऐकतो तेच उच्च दर्जाचे मनोरंजन

तळागाळातील लोक गातात ते द्वयर्थी
अर्थात आम्ही लपून ब्यू फिल्म पाहतोच मात्र चारचौघात सभ्यतेचा मुखवटा घेतो .
तस्मात तळागाळातील लोकांनी आता कोणत्या प्रकारचे मनोरंजन ऐकावेत हे आम्हीच ठरवणार

कारण गर्भ श्रीमंत आमच्यावर विनोद करतात .
म्हणून आम्ही मध्यमवर्गीयांनी ह्या तळागाळातील लोकांवर करणे
त्यांचे ते फालतू आमचे ते उच्च ( अशीच मानसिकता बाळगून आम्ही दिवस ढकलणार )

श्री's picture

6 Nov 2012 - 1:31 pm | श्री

झकास......

दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..." आठवलं.
शिवार फुलतंयं, तो-यात डुलतंयं, झोकात नाचतोय धोत्रा
तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा, लपलाय भुईमुग भित्रा
मधि वाटाणा बघ वळवळं, ...
खरोख्ररीच शेतात काम केल्याशिवाय हे समजणं अवघड आहे

वाचताना मजा आली. कसं काय लिहू शकतात लोक असं कोण जाणे. ;)

प्रचेतस's picture

10 Oct 2013 - 4:21 pm | प्रचेतस

=))

खरंय रे धन्या अगदी . ;)

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 5:24 pm | बॅटमॅन

=))

"तिकड"ची आठवण झाली एकदम ;)

प्रचेतस's picture

10 Oct 2013 - 5:50 pm | प्रचेतस

ह्या गाण्यावरून ' घागर का लपविता' असे काव्य कुणी प्रसवेल काय? =))

बॅटमॅन's picture

10 Oct 2013 - 6:07 pm | बॅटमॅन

नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ. सामग्रीवरून मिपास्थित रघुनाथपंडित नवीन नलदमयंतीस्वयंवराख्यान नक्कीच सजवू शकतील असे वाटते.

प्रचेतस's picture

10 Oct 2013 - 6:26 pm | प्रचेतस

=))

अनुप ढेरे's picture

14 Oct 2014 - 9:11 am | अनुप ढेरे

प्राडॉंच रसग्रहण वाचून हा धागा आठवला.

सतिश गावडे's picture

14 Oct 2014 - 9:29 am | सतिश गावडे

कालच हे गाणं हापिसच्या बसने घरी येताना एका मित्राला ऐकवलं.

त्याचा प्रश्न "कुठून आणतो रे अशी गाणी?". त्याला सांगावसं वाटत होते की हे गाणे खुपच सोज्वळ आहे.

या धाग्याचा दूवा त्याला देतो. :)

प्रचेतस's picture

14 Oct 2014 - 9:48 am | प्रचेतस

"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे तुझा. कसं ऐकू शकतो तू ही अशी गाणी?" ईति माझा एक मित्र.

असेच काहीसे म्हणणारे आमचे काही मिपाकर मित्र आठवले.

हो आणि अशाच गाण्यासाठी गाडीच्या पुढल्या सीटवर हट्टाने बसलेले पण काही आठवले. =))))