सोशल नेटवर्किंगची कमाल!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 9:33 am

जानेवारी २००६ ते जून २००९ या जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावद्यीत ट्युनिशियामधील अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिंग्टनला काही गुप्त संदेश पुरवले. असंख्य गुपिते फोडून जगभरातील सत्ताद्यीशांना घाम फोडणा-या आणि अनेक मुखवट्यांआडचे खरे चेहरे जगासमोर आणणार्‍या विकीलिक्सच्या हाती या संदेशांच्या दहा फाईल्स सापडल्या, आणि गेल्या नोव्हेंबरच्या आसपास ट्यूनिशियातील अराजकाच्या परिस्थितीची भयानक जाणीव तेथील जनतेला झाली. या संदेशांची कागदपत्रे स्थानिक भाषेत भाषांतरित करून तेथील काही वेबसाईटस्नी जनतेपर्यंत पोहोचविली, आणि ट्युनिशियाचा अध्यक्ष बेन अली व त्याच्या कुटुंबीयांनी माफिया पद्धतीने चालविलेल्या राजवटीविरुद्धच्या असंतोषाला वाचा फुटली. बेन अलीच्या कुटुंबाने कायदा खिशात ठेवून अनिर्बंध पद्धतीने चालविलेल्या राजवटीची असंख्य प्रकरणे उघड झाली. त्याची बायको, लैला, आणि अनेक नातेवाईकांनी मोक्याच्या सत्ताकेंद्रांवर बसविलेली पकड, प्रसारमाध्यमे, वाहतूक, वितरणाचे हक्क आणि वैधानिक नियोजनातील हस्तक्षेप अशा असंख्य बाबी विकीलिक्सने उघड केल्या. बेन अलीच्या गोतावळ्याने भ्रष्ट मार्गाने देश पिळून काढल्याचे वास्तव जनतेसमोर आले, आणि खदखदणारा असंतोष रस्त्यावर आला...
महागाई, बेकारी, गरीबी, भ्रष्टाचार आणि मुस्कटदाबी यांमुळे हैराण झालेली सामान्य जनता आणि अनिर्बंध स्वैराचारात आकंठ बुडालेल्या सत्ताधीशांची मुजोरी अशा सुमारे तीन दशकांच्या अवस्थेला विकीलिक्सने वाचा फोडली, आणि ट्युनिशियामध्ये जनतेचा उठाव झाला. गेल्या १७ डिसेंबरला मोहंमद बोआझिझी नावाच्या २६ वर्षांच्या एका फळविक्रेत्याने पोलिसी अत्याचाराच्या उद्विग्नतेतून स्वतःला पेटवून घेतले. `फेसबुक' आणि `यू-ट्यूब'सारख्या सोशल नेटवर्किंग साईटसनी ते भयानक दृश्य जनतेपर्यंत पोहोचविले आणि असंतोषाची आग भडकली... २८ दिवसांच्या तीव्र जनआंदोलनानंतर बेन अलीने राजीनामा दिला, आणि १४ जानेवारीला ट्युनिशियामद्यून पलायन केले. २३ वर्षांची सत्ता जनतेने आंदोलनातून उलथवून टाकली. जनक्षोभातून निर्माण झालेल्या या क्रांतीची जगाने नोंद घेतली.
.. इजिप्तच्या क्रांतीची ही पार्श्वभूमी आहे. ट्युनिशियाची क्रांती हा नव्या सहस्रकातील इतिहासाचा स्वतंत्र विषय असला, तरी इजिप्तमधील क्रांतीची बीजे याच क्रांतीने रुजू घातली आहेत. विकिलीक्स, फेसबुक, ट्वीटरसारख्या सोशल साईटसनी या क्रांतीची बीजे जिवंत ठेवली. नव्या जगाच्या या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभावही त्यामुळे अधोरेखित झाला आणि अनिर्बंध सत्ता उपभोगणा-यांच्या पोटात गोळे उठले... `फेसबुकचा फैलाव' दडपण्यासाठी अनेक देशांत खल सुरू झाला... इजिप्तच्या क्रांतीमध्ये याच माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कारण ट्युनिशियातील नाट्यानंतर लगेचच, २५ जानेवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये पसरलेल्या असंतोषाला ट्युनिशियातील क्रांतीचीच पार्श्वभूमी आहे. बेकारी, गरीबी, महागाई, मुस्कटदाबी, आणि भ्रष्टाचाराची बजबजपुरी असलेल्या इजिप्तमध्ये तीन दशकांपेक्षाही अधिक काळ होस्नी मुबारक यांची एकछत्री सत्ता आहे. तेथेही असंतोष खदखदत होता, आणि मुबारक मात्र, सारे काही आलबेल असल्याच्या भ्रमात वावरत होते.२५ जानेवारीला जनता रस्त्यावर आली, जाळपोळ, दंगली, लुटालूट सुरू झाली, आणि आंदोलकांवर काबू मिळविण्यासाठी मुबारकनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. बळाचा वापर करून जनक्षोभ थोपविण्याचा प्रयत्न सुरू होताच आंदोलन चिघळले. `बदला घेण्याचा दिवस' जाहीर झाला. चार दिवसांतच या आंदोलनात १०५ हुतात्मे झाले. ७५० पोलीस आणि दीड हजार आंदोलक जखमी झाले. राजद्यानी कैरोला युद्धभूमीचे रूप आले, तर सुएझ शहरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला.
या आंदोलनात होस्नी मुबारक यांनी उचललेली प्रारंभीची पावले आणि ट्युनिनिशियाच्या बेन अलीने जनआंदोलन दडपण्यासाठी केलेली कृती यांमध्ये कमालीचे साम्य आहे. आंदोलकांवर गोळीबार झाला. `मुस्लिम ब्रदरहुड' या विराधी पक्षावर बंदी घालण्यात आली. इंटरनेट आणि फेसबुकवरही निर्बंध आले. पण आंदोलनाचा रेटा कमी झाला नाही. मुबारक मात्र नरमले. त्यांनी सरकार बरखास्त केले. स्वतः राजीनामा देण्यास मात्र नकार दिला. परंतु, मुबारक यांनाही आता पायउतार व्हावेच लागले.
इजिप्तमधील या क्रांतीबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काहीशा संमिश्र आहेत. अनेक देशांनी या आंदोलनाला शांतिपूर्ण जनआंदोलनाची उपमा दिली, तरी पाश्चिमात्य देशांत मात्र इजिप्तमधील परिस्थितीमुळे अस्वस्थता आणि चिंतादेखील आहे. कारण या अस्वस्थतेला आंतरराष्ट्रीय कंगोरेदेखील आहेत. १९८१ मध्ये अन्वर अल सादत यांची हत्या झाल्यानंतर मुबारक यांनी आपल्या नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीचा (एनडीपी) एकपक्षी अंमल देशावर प्रस्थापित केल्यापासून त्यांना पाश्चिमात्यांचा पाठिंबा सुरू आहे. होस्नी मुबारक पायउतार झाल्यास इजिप्तमध्ये आणि मध्यपूर्वेतही राजकीय पोकळी निर्माण होईल, अशी काही देशांना भीती वाटत असल्याने मध्यपूर्वेतील काही नेत्यांचा मुबारक यांना पाठिंबा असल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून इजिप्तच्या आर्थिक विकासाचा दर स्थिर असला तरी सर्वसमान्य जीवनमान मात्र हलाखीचेच आहे. सन २०१० च्या उत्तरार्धातही, इजिप्तमधील ४० टक्के जनतेचे दररोजचे उत्पन्न जेमतेम दोन डॉलर्सइतकेच असल्याचा पीटरसन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा निष्कर्ष आहे. सुशिक्षितांची बेरोजगारी ही इजिप्तची सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या चार दशकांत इजिप्तची लोकसंख्या जवळपास दुप्पट वाढून आठ कोटींच्या घरात गेली. नियोजनाचा अभाव, गरजांची पूर्तता करणार्‍या साधनसामग्रीच्या विकासाकडे दुर्लक्ष आणि जनमानसाला गृहित धरण्याची मानसिकता यांमुळे गरीबी, अनारोग्याच्या समस्या उग्र होत गेल्या. बेघरांची संख्या वाढत गेली. शेतीयोग्य जमिनीची उपलब्धताही कमी होत गेली. १९८१ ते २०१० या तीन दशकांत इजिप्तच्या समाजव्यवस्थेचा कमालीचा र्‍हास होत गेला, आणि जनतेला औदासीन्याने ग्रासले. अशा परिस्थितीत, बर्‍याचदा युवकांचा पहिला बळी जातो. युवक आक्रमक होतात, आणि नैराश्याच्या भावनेतून हिंसाचाराचा मार्ग स्वीकारतात. इजिप्तमध्येही तेच घडत गेले.
एक गोष्ट या आंदोलनामुळे नक्कीच अधोरेखित झाली. ती म्हणजे, ट्वीटर, फेसबुक, यू-ट्यूबसारख्या सोशल मीडिया नेटवर्कमुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आणि इजिप्तच्या अस्वस्थतेला व्यक्त होण्याचे माध्यमही मिळाले. आंदोलनातील घडामोडी त्याच क्षणी जगासमोर येत गेल्या आणि आंदोलनाला जगभरातून पाठिंबा व्यक्त होऊ लागला. या माध्यमांचा दबाव वाढतोय हे जाणवताच मुबारक सरकारने इंटरनेट सुविधा आकसण्याचा प्रयत्न सुरू केला. सोशल मीडिया साईटसवर बंधने आली. मोबाईल सेवा बंद करण्यात आल्या. जगाशी संपर्क साधण्याची माध्यमे रोखली गेली. पंधरवड्यापूर्वी तर संपूर्ण `ब्लॅकआऊट' झाला. पण सरकारच्या दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून, आंदोलनाची माहिती हॅक होत गेली, आणि जगासमोर वास्तव उघड राहिले. इजिप्तच्या जनतेच्या भावना माध्यमांद्वारे जगासमोर आल्याच, आणि माध्यमांच्या शक्तीची जगालाही जाणीव झाली. इजिप्तमध्ये जनतेच्या भावनांना होस्नी मुबारक यांनी प्रतिसाद द्यावा, असे आफ्रिकी देशांनी म्हटले, तर इजिप्तमध्ये बहुपक्षीय लोकशाही प्रस्थापित झालेली आपल्याला आवडेल, अशी भावना अरब लीगचे प्रमुख उमर मुसा यांनी व्यक्त केली. युरोपियन युनियनच्या विदेश नीतीचे प्रमुख कॅथेरीन अशतॉन यांनीही जनतेच्या भावनांनाच कौल दिला. इजिप्तमद्यील जनक्षोभ म्हणजे तेथील जनतेच्या मनात खदखदणार्‍या चिंतांची परिणती आहे, हे जगातील नेत्यांनी जाणून घेतले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी सुनावले, तर इराणनेही जनआंदोलनाच्याच बाजूने आपला कौल दिला. जनतेच्या हक्कांची मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे, असे विदेशमंत्री रामीन मेहमानपरास्त यांनी स्पष्टपणे म्हटले, तर इराणमधील क्रांतीचा हा आवाज म्हणजे तेथील जनतेच्या धैर्याचा आवाज आहे, अशी प्रतिक्रिया देत इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष अली लारिजानी यांनी इजिप्तच्या क्रांतीला पाठिंबाच जाहीर केला. इजिप्तचा सख्खा शेजारी असलेल्या इस्रायलने मात्र, या घडामोडींकडे अलिप्तपणे पाहणेच पसंत केले. इजिप्त-इस्रायल यांचे संबंध संवेदनशील असल्याने, यावर कोणाही मंत्र्याने कोणतेही भाष्य करू नये, असे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी बजावले. जॉर्डनने इजिप्तला स्थैर्य, शांतता लाभावी आणि उभय देशांत बंधुत्वाचे संबंध राहावेत, अशा शुभेच्छांपुरत्याच मर्यादित प्रतिक्रिया दिल्या. पॅलेस्टिनी नॅशनल अ‍ॅथॉरिटीचे मोहम्मद अब्बास आणि कुवैतने मात्र, इजिप्त सरकारला पाठिंबा देत आंदोलनाची निंदा केली.
इजिप्तच्या क्रांतीला प्रसारमाध्यमांनी दिलेला आवाज हेच जगातून उमटणार्‍या या प्रतिक्रियांमागचे कारण आहे. त्यामुळे भावी काळात, जागतिक व्यवहाराचा गाडा रुळावरच ठेवण्याच्या कामात माध्यमांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, आणि सोशल नेटवर्किंग साईटस हे सामाजिक जागृतीचे अंग राहणार आहे, हेही अधोरेखित झाले आहे.
( http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/SpecialEdi...

देशांतरसमाजराजकारणविचारमाध्यमवेध

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

14 Feb 2011 - 10:43 am | इन्द्र्राज पवार

फार सुंदर विश्लेषण. खर्‍या अर्थाने सोशल नेटवर्किंगचा किती परिणामकारक उपयोग होऊ शकतो हे निव्वळ इजिप्त, ट्युनिशिया या प्रभावित देशानाच समजले असे नव्हे तर क्रांतीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक राष्ट्रांना एकप्रकारे चेतावणीच मिळाली आहे हे स्पष्ट आहे. 'दडपशाही' या अगोदरच्याही काळात झाली होतीच पण काही अपवादात्मक प्रकरणे (उदा.'तिएनेनमेन चौक') वगळता तीविरूद्ध जनमत तयार होऊन सत्ता उलथविण्याचे, काही प्रमाणात का होईना, यशस्वी झाल्याचेच दाखले आहेत.... (विशेषतः क्युबा). त्यावेळीही वर्तमानपत्रांनी जनजागृती जगभर पोचविण्याची महनीय कामगिरी केली होती....पूर्वी जे काम बीबीसी, सीएनएनसारख्या "संस्था" करून दाखवत तेच काम आता तुम्हाआम्हासारखे सर्वसामान्य नागरीकही माहितीच्या आदानप्रदानातून आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून (यशस्वीरित्या) करून दाखवित आहेत. विकिलिक्सवर कितीही टीका होवो (यात दुर्दैवाने काही वर्तमानपत्रेही होती) पण विविध राष्ट्रप्रमुखांना त्याने घाम फोडला ही सत्यता टाळू शकत नाही. माहितीची ताकद आज सोशल नेटवर्किंगने अशी काही अधोरेखीत केली आहे की, जनतेचा आवाज दाबून टाकतो अशी हिंमत कुठल्याही प्रकारचे सरकार करू धजणार नाही.

"...इजिप्त-इस्रायल यांचे संबंध संवेदनशील असल्याने, यावर कोणाही मंत्र्याने कोणतेही भाष्य करू नये, असे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी बजावले...."

~ इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी दाखविलेला हा संयम शहाणपणाचाच आहे. अन्यथा 'चालला आहे तिथे दंगा तर वाजवा आपल्याकडे फटाके' अशी वृत्ती दाखविणे त्याना अशक्य नव्हते, पण होस्नी मुबारक यांच्या कार्यपद्धतीबद्दल अन्य कुठलीही विरोधी मते असली तरी त्यानीच पुढाकार घेऊन इस्त्रायलबरोबरचे संबंध कसे मवाळ राहतील हे सत्तेवर आल्यापासून पाहिले होते आणि त्यात त्याना यशही आले होते. नेतान्याहू त्यानी हे श्रेय देतातच.

अभ्यासपूर्ण लेखाबद्दल श्री.दिनेश यांचे अभिनंदन !

इन्द्रा

सहज's picture

14 Feb 2011 - 10:48 am | सहज

इंटरनेटच्या माध्यमातुन अश्या बातम्या फार लवकर पसरल्या. बिचारे उत्तर कोरीयातील लोक, बरेचसे ब्रम्हदेशातील लोक मात्र अजुनही आंतरजालाच्या जोडणीपासुन वंचित आहेत.

किंचीत अजुन पुढे जाउन. प्रचंड दडपशाही नाही, जनतेची पिळवणूक नाही. थायलंडमधे मात्र आंतरजाल जोडणी असुनही लोकशाहीचे पाठीराखे असलेले दोन मोठे गट रेड शर्ट्स , यलो शर्ट्स मात्र आपापल्या मागण्याकरता आजही आलटून पालटून कायम रस्त्यावर उतरत असतात.

ज्ञानेश...'s picture

14 Feb 2011 - 11:16 am | ज्ञानेश...

लेख आवडला. सोशल नेटवर्किंगची ही ताकद दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे यात शंका नाही.

लेख आवडला. तरीही इजिप्तमधील उठाव, क्रांती ही केवळ समाजाच्या असंतोषाच्या उद्रेकाचाच परिपाक आहे हे मानायला मन अजून तयार नाही.

तसे झाले तर मग वाटत नाही या जगात पून्हा कधीही ऊघड ऊघड युध्दे लढली जातील अथवा छूप्या युध्दाना ही फार पाठींबा मीळेल.

गणपा's picture

14 Feb 2011 - 1:09 pm | गणपा

दिनेशभौ लेख आवडला.

स्वाती२'s picture

14 Feb 2011 - 5:52 pm | स्वाती२

लेख आवडला.

बेसनलाडू's picture

15 Feb 2011 - 2:38 am | बेसनलाडू

लेख आवडला.
(सोशल)बेसनलाडू

विकास's picture

15 Feb 2011 - 4:50 am | विकास

लेख आवडला. आता इराणमधे देखील निदर्शने चालू झाली आहेत. त्यात याचा किती उपयोग होऊ शकेल ते पहायचे.

मदनबाण's picture

15 Feb 2011 - 9:44 am | मदनबाण

अतिशय सुरेख लेख...

देव करो आणि चीन मधे देखील असा जोरदार उठाव होवो... ड्रॅगन फार डोइजड झाला आहे.

जरासे अवांतर :--- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7499005.cms